घर - ९

Submitted by बेफ़िकीर on 1 February, 2011 - 01:06

कित्येक वर्षांनी .... कित्येक वर्षांनी आईंनी पुन्हा वसंताच्या पाठीवरून हात फिरवला होता. आज हॉटेल सुरू करणार होता तो! अर्थातच घरातल्या रीतीप्रमाणे सगळ्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेणारच होता तो!

आणि बाबांना नमस्कार केला तेव्हा त्यांनी तोंडभर आशीर्वाद दिले.

"जे करशील ते विचारपुर्वक कर, यशस्वी होशीलच, पण आता तू एकटा नाहीस, गौरीची पण जबाबदारी आहे, तेव्हा सांभाळून राहा..."

इतके बोलून होईपर्यंत वसंताने आईला नमस्कार केलेलाही होता. आणि आईचाच हात तो! त्याची उब, त्यातील परिचित प्रेमलहरी आणि स्पर्शातून अक्षर अन अक्षर बोलण्याची हातोटी! वसंताला आज खूप जाणवले. खूपच पुर्वी, बहुतेक तो बी कॉमच्या पहिल्या वर्षाला निघाला तेव्हा आईने असा हात फिरवला असेल!

आई काही बोललीच नाही. कारण तिचा स्पर्श बोलला!

"दादा, नमस्कार करतो..."

कुमारदादानेही आशीर्वाद दिला....

"काही लागलं तर सांग रे... संकोच करायचा नाही.. काय?"

तोवर अंजली वहिनींनी 'वसंता लहान असताना त्या बोलायच्या' तसेच वाक्य त्यांना त्याने नमस्कार केल्यावर टाकले.

कित्येक वर्षांनी आज त्या गहिवरून आपसूकच वसंताला वसंता म्हणाल्या..

"वसंता.. तुझं कसं होणार नेहमी वाटायचं... पण.. गौरीने आणि तू चंग बांधलेला आहेतच.. आम्हीही सगळे आहोत तुमच्या बरोबर... पण .. एक सांगते.. गिर्‍हाईकांना खायला थोडे पदार्थ ठेव बर का? एकटाच संपवू नकोस..."

वसंताने इतकी घट्ट मिठी मारली अंजली वहिनींना की गौरी अवाकच झाली. अंजली वहिनींचे डोळे डबडबलेले होते.

त्या म्हणाल्या...

"कसे काय चालवणार हा हॉटेल काय माहीत? स्वतःचे ताटही उचलून ठेवायची सवय नाही.. गौरी... न संकोचता... केव्हाही हक्काने सांग हो..लागलं तर मीही येऊन बसत जाईन तिथे मदतीसाठी... "

गौरीला आज पहिल्यांदाच पटवर्धनांच्या घरात आल्याचा मनापासून आनंद होत होता. इतकेच काय तर 'आपले पहिले लग्नच इथे झाले असते तर' असाही विचार तिच्या मनात येऊन गेला.

"मी आलो चहा घ्यायला तरी पैसे घेत जा बरं का.. नाहीतर म्हणायचास आपलाच अण्णा आहे.. क्काय??... धंदा तो धंदा..."

अण्णाने वसंताच्या पाठीवरून हात फिरवून हे वाक्य उद्गारले आणि वसंता ओशाळून त्याच्याकडे बघत म्हणाला...

"केव्हाही ये.. मी तर म्हणतो रोजच ये... "

तारकावहिनींनी मात्र त्याला वाकायच्या आधीच हातांनी उठवले आणि दोन्ही हातांनी त्याचे खांदे धरत म्हणाल्या...

"आता कळेल घरकाम आणि स्वैपाक म्हणजे किती दगदग असते... नेहमी म्हणायचात ना? ... तुम्ही बायका काय? पोळ्या लाटल्या अन कूकर लावला की झालं काम.."

"नमस्कार तर करूदेत??"

वसंता वाकला तसा त्याच्या पाठीत गुद्दा घालत तारका वहिनी गौरीला म्हणाल्या..

"तू घरात आली नसतीस तर आयुष्य चितळ्यांकडेच काढलं असतं हो यांनी.... आणि मी म्हातारी होईपर्यंत म्हणत बसले असते.... वहिनी.... चहा टाका... मी आलोय..."

दादा आणि अण्णा वसंताबरोबर हॉटेलमध्ये आले. उद्घाटन करायला ते काही चितळे स्वीट मार्ट नव्हते की अष्टेकर ज्वेलर्स! देवाची एक तस्बीर लावून तिच्यासमोर उदबत्ती ओवाळून तिघांनी नमस्कार केला आणि...

.... .. ए टी जी उपहारगृह सुरू झाले.

ए फॉर अंजली, टी फॉर तारका आणि जी फॉर बोथ, गीता आणि गौरी!

त्या काळात असे इंग्रजाळलेले नाव पाहून आजूबाजूचे लोक कुजबुजू लागले..

"मटण करणार बहुतेक इथे... नाहीतर बैदाकरी तरी निश्चीत.. सदाशिवपेठेचा नुसता मोमीनपुरा झालाय"

तेवढ्यात 'दर-फलक' लागला.

चहा - ०.५०
कॉफी - १.५०
फक्कड - ०.७५
मारामारी - १.००
दूध - २.००

भजी - २.००
मिसळ - ४.००
दही मिसळ - ५.००

(तसेच येथे ऑर्डरप्रमाणे दाण्याचे लाडू करून मिळतील)

(आमची कुठेही शाखा नाही)

पहिले गिर्‍हाईक येईपर्यंत दादा आणि अण्णा थांबणार होते. वसंताने सकाळीच येऊन मिसळीचा कट करून ठेवलेला होता. भजी कशी करायची याचे प्रशिक्षण घरात गेले महिनाभर चालूच होते. अण्णाने पटकन चहा ठेवला आणि दादा बाकीचे पाहू लागला.

दिड तास! तो दिड तास असह्य होता सगळ्यांसाठी! कारण लोक नुसतेच बघून निघून जात होते.

आणि भिकारदास मारुती बसस्थानकाची पहिली पीएमटी लागली..

'भि.मा. ते खानापूर'

या बसने वसंता आजवर तीन वेळा सिंहगडला गेलेला होता. पण या बसकडे या कारणाने डोळे लावून बसावे लागेल असे त्याला कधीच वाटले नव्हते. तोवर गौरीही घरचे आवरून आली.

आणि गौरीचे पाऊल जसे एटीजीमधे पडले....

"कवा चालू झालं ह्ये हॉटेल???? "

बसचा ड्रायव्हर त्याच्या दुसर्‍याच क्षणी आत येत म्हणाला..

कुमारदादाने तत्परतेने सांगीतले..

"हे काय.. आत्ताच सुरू झाले.. या... बसा ना.. वसंता.. चहा घे.. मिसळ खाणार??"

वसंताने शक्य तितक्या तत्परतेने मिसळ, दोन पाव आणि एका वाटीत तर्री वेगळी असे आणून ठेवले. मिसळीच्या कटाचा तो लालभडक रंग आणि फ्लेवर बघूनच ड्रायव्हरने पुढचा मागचा विचार न करता पहिला घास घेतला.... सगळे श्वास रोखून बघत होते... आवडतीय की नाही टेस्ट??

"कांदा शेपरेट नाय का??"

सातव्या मिनिटाला मिसळीची प्लेट दोन एक्स्ट्रॉ पावांसकट घासून पुसून ठेवावी तशी ड्रायव्हरने लख्ख केलेली होती...

आणि त्याचवेळेस कंडक्टरही आत येत होता आणि गाडी सुटायला अजून पंधरा मिनिटे असल्याने खोळंबलेले दोन प्रवासीही!

आणि दादा आणि अण्णा वसंताकडे हासत हासत बघून घरी निघाले... गौरीने तेव्हाही त्या दोघांना पुन्हा नमस्कार केला...

आणि एटीजी... सुरू झाल्याच्या केवळ दहाव्याच दिवशी.. सर्वतोमुखी झाले...

'आजचा गल्ला किती' या फिगरवर घरात जेवताना थट्टा मस्करी व्हायला लागली. तारका वहिनी तर वसंताला 'शेठजी'च म्हणायला लागल्या. गौरीला प्रथमच या घरात इतका आनंद वाटू लागला की आजवर आपण उगाचच गैरसमज करत होतो की काय असे वाटू लागले.

आर्थिक आघाडी चांगली असणे हे मनाच्या शांततेसाठी नसले तरी उभारीसाठी खूप महत्वाचे आहे.

आणि फार जास्त नसला तरी वसंता रोज 'खर्च वजा करून' चक्क सव्वाशे रुपयाचा गल्ला जमवू लागला. त्यातील चाळीस तर भाड्यासाठी वेगळेच काढून ठेवायला लागायचे. उरलेले ऐंशी पंचाऐंशी तो घरी घेऊन यायचा. त्यातील हजार रुपये तो दर महिन्याला बाबांकडे देऊ लागला. दोघे घरात राहतात आणि जेवतात याचे! आजवर तो कधीनव्वदच काही पैसे देऊ शकायचा! आता हा एक चांगला हप्ता सुरू झाला. या हप्त्याचे महत्वही बरेच होते. कारण त्यामुळे आता कुणीच असे म्हणू शकणार नव्हते की यांचाही भार आमच्यावरच पडतो आहे.

उरलेले जवळपास चौदाशे रुपये म्हणजे दोघासाठी स्वर्गच होता. या वयात अचानक इतका पैसा हातात येईल ही कल्पनाच नव्हती. पण हे सगळे पैसे जपून ठेवायचे असेच दोघांचे मत होते. घरातील माणसांनी आपल्याला मोठे करण्यासाठी खस्ता खाल्लेल्या आहेत. आता आपल्याकडे पैसे येत आहेत म्हणून आपण मौजमजा करायची आणि तीही त्यांच्यासमोर, हे तितकेसे प्रशस्त वाटत नव्हते दोघांना!

तसे अधून मधून रात्री फिरायला गेले की हळूच आईसक्रीम वगैरे खाऊन यायचेही ते! पण बहुतेकवेळा जे काही करायचे ते सगळ्यांसाठी करता येईल असेच असायचे. म्हणजे कुठे बाहेर पडले आणि खारे दाणे, फणसाचे गरे किंवा इतर काही दिसले तर ते घरातील सगळ्यांनाच आणायचे!

हे सगळे केवळ दोन महिन्यातच झालेले होते. वसंताबरोबर भागीदारीस आधी उत्सुक असलेले मित्र आता त्यांचा निर्णय फसला असे वाटून हळहळत होते. गौरीच्या आई अक्का आता हळुहळू पोरीचे सुख पाहून समाधानी होत होत्या. गौरी अजूनही आठवड्यातून दोन वेळा जुन्या सासरी जाऊन यायची. वसंताने एका अक्षरानेही तिला बंधन घातलेले नव्हते. म्हातार्‍या सासू सासर्‍यांचे अजूनही बघायची गौरी! ही बाब आईंना फारशी पटायची नाही, पण नवीन वाद नको म्हणून त्या काही बोलायच्या नाहीत.

वेदा आणि उमेश आठवड्यातून किमान दोन वेळा एटीजीमध्ये येऊन काही ना काही खाऊन जायचे. इतकेच काय तर अण्णाने कॉसमॉस बॅन्केतील आपल्या मित्रांना एकदा कसलिशी पार्टीही तिथेच दिली. सकाळी फिरायला बाहेर पडणार ज्येष्ठ नागरिक इथपासून ते रात्री कामावरून उशीरा घरी परतणारे सडाफटिंग ब्रह्मचारी इथपर्यंत सर्वांसाठी एटीजी हे अत्यंत कन्व्हिनियंट उदरभरण व चहाचे ठिकाण बनत होते.

मध्यंतरी तर राजूदादाही कानपूरहून येऊन ती प्रगती बघून गेला. यावेळेस वसंताच्या आयुष्यात पहिल्यांदाच असे झाले की राजूदादाबरोबर गौरीने बिगुलसाठी एक शर्ट आणि काही खाऊ पाठवला. गीतावहिनीसाठी साडी पाठवली. जशी आई, आणि दोन थोरल्या वहिन्यांना घेतली होती तशीच, तितक्याच किंमतीची! वसंताला पहिल्यांदाच जाणवले की हे असले आपल्याला सुचले नसते. बायकांना देणीघेणी, पद्धती, रीतीरिवाज असतात हे आपल्या दृष्टीने बरे झाले असा एक विनोदी निष्कर्ष घरातील सगळ्यांना ऐकवून त्या दिवशी तो मोकळा झाला.

वसंता आणि गौरी यांचे संबंध आता ऑक्वर्ड राहिलेले नव्हते. गौरीचे पुर्वायुष्य हा विषय आता डोक्यातून हळूहळू नष्ट होऊ लागला होता. काळ हे किती मोठे औषध असू शकते याच प्रत्यंतर सदाशिव पेठेतील दोन समोरासमोरच्या घरांना एकाचवेळेस येऊ लागले होते.

दरम्यानच्या काळात एकदा खुद्द चितळे वसंताच्या आमंत्रणावरून एटीजीमध्ये येऊन गेले. अर्थातच वसंताने एक पैसाही घेतला नाही, उलट त्यांना निघताना नमस्कारच केला. चितळ्यांनी 'पुणेकरांवर केल्या गेलेल्या सर्व टीकेला खोटे ठरवत' तोंडभरून आशीर्वाद देत सांगीतले..

"हॉटेल तर चांगले चालेलच बरं पटवर्धन.. पण आपल्याही दुकानातला माल इथे ठेवायचा असला तर सांगा... कमिशनबेसीसवर ठेवू हो?? "

पण हा निर्णय वसंताने घेतला नाही. कारण मग एटीजीचे ब्रॅन्ड नेम, जे थोडेफार बनू पाहात होते, ते चितळे या अत्यंत गाजलेल्या नावामुळे अशक्त बनून राहिले असते. एटीजीला लोक चितळ्यांचीच एक शाखा मानू लागले असते.

रोजची प्रचंड दगदग असूनही, मिळणार्‍या उत्पन्नामुळे, सौख्यामुळे आणि स्थैर्यामुळे वसंता आणि गौरीच्या तब्येतीवर त्याचे परिणाम दिसू लागले. एकेकाळचा काहीसा हडकलेला, गालफडे बसलेला वसंता आता चांगला टुणटुणीत वाटू लागला. खरे तर हॉटेलमधील त्याच त्याच वासाने त्याला जेवायची इच्छाही व्हायची नाही. नुसता भात खायचा. पण तरी बाळसे धरणारच!

शाळेतील, कॉलेजमधील जुने मित्र अधेमधे रस्त्यात भेटायचे. आजवर त्यांन 'मी काय करतो' याबाबत काय सांगायचे असा प्रश्न पडणारा वसंता आता ठसक्यात म्हणू लागला.. 'ये ना एकदा हॉटेलवर.. चहा मिसळ घ्यायला.. आं???"

आजही रात्री जेवणे वगैरे झाल्यावर नेहमीप्रमाणे वसंता आणि गौरी बाहेर फिरायला निघाले. लकडी पूलापर्यंत जाऊन परत यायचे असा शिरस्ता असायचा. जाता येता भरपूर गप्पा व्हायच्या. हल्लीच्या गप्पांमध्ये 'या असं बोलल्या अन त्या तसं बोलल्या' हे विषय नसायचेच! उलट एकमेकांचे चांगुलपणेच सांगीतले जायचे. वसंताने आज पेशवाई हॉटेलपाशी गुडदाणी विकत घेतली. दोघेही गुडदाणी खात खात चालू लागले.

गौरी - वसंता... आईंना खूप त्रास होतो रे...

वसंता - डॉक्टरकडे जात नाही.. काय करायचं.... तूच उद्या घेऊन जा तिला..

गौरी - मी आजच म्हणत होते.. आज तर पाऊल सुजलेले आहे..

वसंता - सुजलंय??? मग ती कशाला चालतीय उगाच?? चल घरी.. बघू..

गौरी - अंहं.. मी तेल लावून दिलं थोडं...

वसंता - ... तू??

आपल्या आईच्या दुखणार्‍या पावलाला गौरीने तेल चोळून द्यावे याचा कोण अभिमान वाटला वसंताला! आता दोन्ही थोरल्या वहिनींइतकीच आपलीही बायको सुजाण आहे हे वाटू लागले होते त्याला!

गौरी - खूप दिवसांपासून बोलायचंय... गैरसमज करणार नसशील तर...

वसंता - बोल??

गौरी - जागांचे भाव झपाट्याने वाढतायत.... आपण राहायचं इथेच... पण.. गुंतवणूक म्हणून जर आत्ता एखादा फ्लॅट बूक केला ना.. पुढे खूप फायदा होईल..

वसंता - माझ्याही मनात तेच येतं..

गौरी - पटवर्धन बागेपाशी येतीय नवीन स्कीम... उद्या जाऊन यायचं का??

वसंता - हॉटेलमध्ये कोण बसणार पण??

गौरी - आता तरी ठेव की एखादा कामगार..

वसंता - ठेवायला काही नाही.. पण... त्याचा पगार नाही म्हंटले तरी पाच-सातशे असणारच..

गौरी - निदान डिशेस वगैरे विसळायला तरी लहान मुलगा ठेव??

वसंता - बघतो... तू जाऊन ये ना स्कीम बघून.. तारका वहिनींना घेऊन जा..

गौरी - पण.. घरात हा विषय काढला.. तर ... आवडेल का??

वसंता - आपण काही वेगळे होत नाही आहोत... नुसती गुंतवणुक आहे ती..

गौरी - तू विषय काढलास तर बरं दिसेल..

वसंता - ठीक आहे.. उद्या बोलतो दादाशी..

घरी आल्यावर आज वसंता आई बाबांच्या खोलीत गेला. बाबा आईच्या पायाला तेल लावून देत होते.

वसंता - खूप दुखतंय का?.. मी लावून देऊ का तेल??

बाबा - नाही नाही... लावतोय की...

आई - वसंता... आज फार दुखलं रे...

वसंता - तू किती दगदग करत असतेस आई.. जरा आराम करत जा ना?...

आई - ......

वसंता - डॉक्टरकडे गेला होतात का?

बाबा - बघू.. आता उद्या जाऊ..

आई - डॉक्टरांना काही समजत नाही रे... एक्स रे काढला.. पण हाडाला काहीच झालेलं नाहीये..

वसंता - त्या.. सबनीसांना दाखवायचं का?

आई - काही कळत नाही..

थोडा वेळ वसंताने आईच्या पावलाला तेल लावून दिले. त्यानंतर आपल्या खोलीत परत आला तो!

गौरी - काय झालं??

वसंता - पाऊल फार दुखतंय... ऐकत नाही.. धावपळ करतेच...

गौरी - मागे त्या पडल्या होत्या ना? तेव्हापासूनच दुखतंय.. लहानसं फ्रॅक्चर असेल...

वसंता - काय माहीत... हे आईचं एकदा बरं झालं की मग विषय काढू फ्लॅटचा...

गौरीने झोपताना विचार केला.

आपण आणि वसंता एक फ्लॅट घ्यायचा असा विषय काढायला घरातील परिस्थिती पाहतो. इतर घरांमध्ये असंच होत असेल का? ह्यांच्याकडे तर काय? पैसेच पैसे होते. सहज घेतला असता एखादा फ्लॅट! पण सासू सासरे म्हातारे होते आणि जुने घरही प्रचंडच होते. त्यामुळे फ्लॅट घ्यायची गरज भासली नाही.

विचार करतानाच गौरीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आले.

किती लागले असेल विपुलला? कळले तरी असेल का की आपण मरतोय!

या आईपणाला काय अर्थ आहे, जे आपल्या बाळाला ऐनवेळी वाचवण्यासाठी काहीही करू शकत नाही. मुले...मुले जगली असती तर... आपण केले असते वसंताशी लग्न??

हे विचार चालू असतानाच वसंताचा हात तिच्या अंगावर पडला. आज तिला त्या विचारांमधून बाहेर येऊन वसंताची साथ देणे शक्य नव्हते.. तिने अलगद तो हात दूर केला.

वसंता सूज्ञ होता. ओरबाडणार्‍या प्रवृत्तीचा नव्हता तो! ही स्थित्यंतरे महत्वाची होती. एक दिवस असाही होता जेव्हा गौरीला वाटत होते की वसंताने तिच्या जवळ यावे. आज हाही दिवस आला जेव्हा तिला असे वाटले की ती त्याच्याशी समरस होऊच शकणार नाही. आणि गौरीने स्वतःचा भूतकाळ ताबडतोब विसरावा अश्या आग्रही पुरुषी वृत्तीचा वसंता नव्हता. मनातल्या मनात गौरी देवाचे आभार यासाठी मानत होती की.. निदान नवरा समजूतदार तरी आहे..

आणि त्या अंधारात वसंता आढ्याकडे पाहात स्वतःच्या आयुष्यावर विचार करत बसला होता.

काय होतो आपण? एक बारावी झालेला आणि कशीबशी नोकरी करून बाकी वेळ उंडारणारा मुलगा! गौरी आवडते हे सांगायचे धाडसही नसलेला आणि ते सांगण्याचा कोणताही सामाजिक स्तरही नसलेला! सिगारेटी ओढणारा, जमेल तितके पिक्चर्स पाहणारा, घरातल्यांवर निस्सीम प्रेम करणारा आणि चितळ्यांकडे राबणारा मुलगा!

कधी शिक्षणातही चमकलो नाही अन कधीकुठल्या खेळातही! काहीच विशेष नाही आपल्यात! धड रंग रूपही नाही. आपले हे समान्यत्वच आपले असामान्यत्व आहे का? असेल का? इतके सामान्य तरी कुठे कोण असते? की जो शिकला काय अन नाही शिकला काय फरक पडत नाही. लग्न केले काय नाही केले काय फरक पडत नाही. दोन मुलांची आई असलेल्या विधवेशी लग्न केले तरी 'जास्तीत जास्त याचे हेच होऊ शकते' असा विचार लोकांच्या मनात येण्याइतका सामान्य!

आज आपल्याकडे पैसा येत आहे म्हणून आपल्याशी सगळे चांगले वागत असतील? छे! तसे नाहीच! गौरीने आपल्या वागण्याने सगळ्यांना जिंकलेले आहे. तिचे आपल्यावर जे उपकार आहेत त्यांना तोडच नाही. ज्या मनस्थितीत तिने केवळ स्वतःच्या आईची काळजी मिटावी म्हणून आपल्या प्रस्तावावर होकार दिला तो त्याग किती लोक करतील?? तिला फुलासारखे जपायला हवे. तिच्या मनाचा तिच्याहीहून अधिक विचार आपण करायला हवा.

आज नागनाथ पारापासून उंबर्‍या गणपतीपर्यंत कुणाच्याही घरात लहानसहान जरी कार्य असले तरी आता आपल्यालाही बोलवतात! कारण आता आपण एक सभ्य, विवाहीत पुरुष आहोत. संसारी माणूस आहोत. हा दर्जा आपल्याला कोणत्याही मुलीने आपली पत्नी होऊन दिला असताही! पण आपल्या आवडत्या मुलीने दिला याचे महत्व अपरंपार आहे.

मी मी म्हणजे काय असते नक्की? म्हणजे मी मीच का असतो? मी कुमारदादा का नाही? मीच गौरी का नाही? मी चितळे का नाही?

हे शरीर म्हणजे मी? माझे नाव .. वसंत पटवर्धन.. म्हणजे मी? या शरीराचे नाव, शरीराचे रंगरूप.. म्हणजे मी?

शरीर म्हणजेच मी असलो तर ... मी स्वार्थी असण्यात गैरच काय? पण मग.. हे प्रेम... तारकावहिनींशी दिवसातून एक शब्द तरी बोलल्याशिवाय चैन न पडणे.. बिगुलला कानपूरला जाऊन दिड वर्ष होत आलं तरी त्याला आजही पटकन उचलून घ्यावेसे वाटणे..

हे काय असते? हे प्रेम कशावरचे असते? म्हणजे बिगुल उद्या वीस वर्षाचा झाल्यावर त्याला जवळ घेणे शक्य नसले तरीही प्रेम तितकेच राहील ना? उद्या गौरीचे केस पांढरे झाले तरी.. प्रेम तितकेच राहील ना?

मग हे कसं? की 'मी' म्हणजे माझे शरीर... पण माझे इतरांवरचे प्रेम हे मात्र त्या शरीरावरचे नाही.. ते त्यांच्या ...

... अरे हो... खरच की.. मी म्हणजे शरीर नाहीच... माझे इतरांवरचे प्रेम जर त्यांच्या वागण्यावर असलं.. त्यांच्या दिसण्यावर नसलंच... तर मग माझं माझ्यावरचं प्रेमही माझ्या वागण्यावरच की?

म्हणजेच मी म्हणजे माझे वागणे...

.. मी कसा वागतो, काय बोलतो, किती मदत करतो, किती साथ देतो, कुणाला आधार देतो.. यावर ठरणार की... 'मी' कसा आहे..

आणि यावरच जर ते ठरणार असेल... तर मग.. फक्त चांगलेच वागायला हवे नाही का??

म्हणजे.. अगदी आत्ता या क्षणी जाऊन... आपल्याला बघायला हवे... आईला झोप लागलीय का नाही ते??

वसंता ताडकन उठला आणि खाली आला. दिसलेले दृष्य त्याला हेलावून गेले. सर्व भाऊ आणि वहिन्या, गौरीही झोपलेली असताना..

रात्रीचे साडे अकरा वाजलेले असतानाही...

... बाबा अजूनही आईचे पाऊल दाबून देत होते..

त्या सिच्युएशनमध्ये जाण्याचे धाडसही झाले नाही वसंताला.. न जाणो.. आपण ते पाहून दु:खी झालो कीकाय असे वाटून याच दोघांना झोप यायची नाही रात्रभर..

ओठ घट्ट मिटून गिळलेले आवंढे वर सरकून अश्रू झाले आणि मग मात्र ते थांबवता येईनात आवंढ्यांप्रमाणे!

गालांवर सरी ओघळलेल्या अवस्थेत वसंत पटवर्धन आपल्या खोलीत परत आले.

===================

'गगन' हे एक धमाल पात्र होतं खरोखर! तेरा वर्षाचं हे नेपाळी पोरगं कसा काय आपल्याला मिळालं हेच वसंताला समजत नव्हतं! जवळच्या एका बंगल्यावर गगनचे वडील गुरखा होते. आणि हा गगन आता एटीजी वर कार्यकारी व्यवस्थापक बनून डिशेस विसळणे व चहा देणे ही कामे करत होता. महिना अडीचशे रुपये या प्रचंड उत्पन्नावर!

पिचपिच्या डोळ्यांनी गिर्‍हाईकाला नुसत्याच भुवया उडवून 'काय पैजेल' असे विचारणारा गगन अल्पावधीतच गिर्‍हाईकांमध्ये लोकप्रिय झाला. तो चहाचे कप आणून पुढ्यात आपटायचा. पहिल्यांदा वसंताने समज दिली की असे करू नये. तर ते बेणं यालाच म्हणालं..

"अंदर तो चायहीहै.. फेका या रख्खा.. एकही बात है"

अत्यंत पोचलेलं कार्टं होतं ते! बोलण्यात अती तरबेज! मधेच एकदा त्याने सरळ एक प्लेट भजी घेतली अन खाल्ली! वसंता कही बोलला नाही. दुसर्‍या दिवसापासून तो रोज एक प्लेट भजी आणि दोन कप चहा पिऊ लागला. शेवटी वसंताने त्याला सांगीतले..

"अरे तुम रोज भजी खाओगे तो धंदा कैसे करुंगा??"

"पगार काटलो... छोटा बच्चा भूखा रहेगा क्या?"

सहा गिर्‍हाइके तिथे होती आणि सहाच्या सहा हासली.

एक दिवस वसंताने त्याला सांगीतले.

"कल मै नही आउंगा... ध्यान रखना.. सिर्फ चायही बनाना है.. वो मै सुबह और दोपहरमे आके बनाके जाउंगा.. तुम सिर्फ गिर्‍हाईकको चाय देते रहना.. और पैसा लेना.."

"कल छुट्टी है क्या?"

"तेरी नही.. मेरी छुट्टी है.."

"क्युं??"

बघा आता! आपणच कामावर ठेवलेलं पोरगं आपल्यालाच विचारतंय तुम्ही का सुट्टी घेताय म्हणून! पोरगं चमत्कारिक होतं !

"कल दादीका ऑपरेशन है..."

"फिर मै भजी कैसे खाउंगा??"

"कल भजीबिजी कुछ नही..."

"मै नही आयेगा कल... भूख लगती है..."

"तेरे लिये मै कुछ खाने के लिये लाउंगा..."

"फिर ठीक है... कुछ मीठाविठा लाओ.."

पोरगं ग्लासेस विसळताना ऑर्डर सोडत होतं! वसंताला हसावं का रडावं ते समजेना! हे पोरगं शिकलेलं नव्हतं, पण ज्या बंगल्यावर याचे वडील गुरखा होते त्या बंगल्यातील कुटुंबातील मुलांबरोबर हे खेळायचं! त्यामुळे बोलण्यात वाकबगार झालेलं होतं ते!

मोठीच एन्टरटेनमेन्ट झाली होती गगन म्हणजे! काही ड्रायव्हर आणि कन्डक्टर तर गगनला भेटायला म्हणून चहा प्यायला यायला लागले तशी मात्र वसंताला जाणीव झाली. एटीजी उपहारगृहाचे युनिक सेलिग प्रपोझिशन जर काही असले तर ते म्हणजे गगन! आता याला सोडण्यात अर्थ नाही.

एक दिवस म्हणाला..

"एक दस रुपया दो.."

"क्युं??"

वसंता गगनचा पगार त्याच्या वडिलांना द्यायचा.

"आज मेरा बड्डे है"

"किसने बोला तेरेको??"

"उसमे बोलनेका क्या है? सालमे एक बार होगाही बड्डे"

"लेकिन पैसेका क्या करेगा तू?"

ते पोरगं कहर होतं! ते जमलेल्या गिर्‍हाईकांकडेच बघत म्हणालं..

"अब मै ये हॉटेल चला रहा हूं.. मेरा पगार मांगरहा हूं... और ये पूछते है पैसा किसलिये?? क्या आदमी है देखो"

पब्लिक हसायला लागलं! वसंताने त्याच्यावर लटकाच हात उगारला आणि म्हणाला..

"तुम्हारे पिताजीको पगार देना है.. तुम अभी छोटे हो.."

ते बोललं काहीच नाही. एका कोपर्‍यात जाऊन बसलं नुसतं!

काही वेळाने वसंता म्हणाला..

"ए गगन.. वो प्लेट उठा.. "

गगनने नुसतीच नकारार्थी मान हालवली.

"नही मतलब??"

"मै छोटा है अभी... ऐसे काम नही करता मै.."

खरे तर अजून एक वर्षभर त्याला नोकरीवर ठेवणे हे तसे बेकायदेशीरच होते. पण त्याच्याच वडिलांनी त्याच्यावर जरा अंकुश रहावा म्हणून वसंताच्या मागे लागून ही नोकरी त्याच्यासाठी मिळवलेली होती. पण आता अंकुश कोण कुणावर ठेवतंय हा एक महत्वाचा प्रश्न निर्माण झाल्यासारखे वाटू लागले होते.

वसंताने मुकाट दहा रुपये दिले तसं ते बेणं कामाला लागलं!

आज वसंता आला हे पाहून गगन म्हणाला..

"होगया क्या ऑपरेशन??"

"हां... कल कितना गल्ला हुवा रे??"

"बीस रुपये..."

"सौ कप चाय के बीस रुपये??"

"बिकती किधर है चाय?"

"मतलब?"

"उधार पीके गये है बहुतसे लोग..."

"ऐसे कैसे उधार पीके गये??"

"फिर? बोले तेरेको छुट्टी नही देता तेरा मालिक.. उसका पैसाही नही देंगे चाय का.."

"थप्पड लगाऊं क्या एक??"

"आज मै छोटा हूं साहब.. जब बडा बनुंगा.. इन्तकाम लेलुंगा आपसे"

मिनि अमिताभ बच्चन बरळला.

"चूप... पैसा निकाल..."

गगनने साठ रुपये काढून दिले.

"पचास होता है ना?.. ये तो साठ है..."

टेबलावर फडके मारत वसंताची अक्कल काढत ते दिव्य बाळ बोललं..

"मैने पैसट पैसा रेट किया है चाय का... पचास पैसेमे जिंदगीभर चाय बेचना है क्या?"

हतबुद्ध होऊन वसंता त्याच्याकडे बघत बसला. रेट वाढवता येतो हे आपल्याला का सुचले नसावे हे त्याला कळत नव्हते.

"लेकिन... पैसट पैसा किया तो.. पैसट रुपिया होगा ना?"

"बादमे आप बक्षीसी करके पाच रुपया देते ही थे ना?... वो मैने काट लिया पहलेही.."

त्याला मिसळीच्या गरम रश्यात बुचकळून काढावा की काय याचा विचार वसंता करत असतानाच ते पोरगं पुढे बोललं..

"और मेरा भी पगार बढगया है अभी... ढाइसोमे गुजारा नही होता... तीनसौ है अभी पगार.."

ज्याने पगार वाढवायचा त्यालाच 'माझा पगार वाढलेला आहे आता' ही बातमी सांगणारा एकही कर्मचारी या विश्वात आजवर झालेला नसेल.

"मतलब जितना चाय का रेट बढाया उतना तेराही पगार बढेगा क्या?.. तो मुझे क्या मिलेगा?"

आपण हा प्रश्न विचारण्याऐवजी याच्या एक कानाखाली का चढवत नाही आहोत असे सात्विक विचार वसंताच्या मनात हल्ली येईनासे झालेले होते.

"मिस्सल भजी का रेट भी बढेगा नही क्या अभी?? .. वो मै कहा मांग रहा हूं??"

रात्री जेवताना वसंताने हा किस्सा सांगीतला तसे सगळे जेवण सोडून हासतच बसले. आई तर कधी नव्हे इतक्या हासत होत्या. इतक्या... की शेवटी डोळ्यातून पाणीच आले हासता हासता त्यांच्या...

बाबाही हासत होते... पण .. अरा अलगदच...

तारका वहिनी - किती हासताय सासूबाई... डोळ्यातून पाणी आलं...

आईचं हासणं पाहून तर सगळेच आणखीन हसायला लागले.

बाबा - ते पाणी हासण्यामुळे नाही आलेलं...

बाबांचा स्वर काहीसा गंभीर वाटला...

कुमारदादा - म्हणजे???

बाबांनी ताटाकडे बघत सांगीतलं...

"पॅथॉलॉजिस्टचा रिपोर्ट आला आज... क्लीअर केस ऑफ कार्सिनोमा.. आईला कॅन्सर झालाय"

गुलमोहर: 

"पॅथॉलॉजिस्टचा रिपोर्ट आला आज... क्लीअर केस ऑफ कार्सिनोमा.. आईला कॅन्सर झालाय"
अजुन एक जबरदस्त धक्का दिलात अहो हसवुन हसवुन एकदम गंभीर करता बुवा तुम्ही ...

माबो वर खुप दिवसनि आलो. घर ५ ते ९ वाचले. खुपच भारावुन गेलो. मला घर १ ते ४ वाचायला कुठे मिळतिल?

Gagan is Super Star Hero means Hero No. 1
बाकी कथा छान चालली आहे आणि गगनमुळे मज्जा येत आहे.
Keep it

सहि...
छान कॅरॅक्टर आहे गगन... मजा आलि आणि मिश्किल अस हास्य हि.
तुम्हि छानच लिहिता ह्यात दुमत नाहि.