मला आवडलेले चित्रपट : Becket

Submitted by नेतिरी on 30 January, 2011 - 21:34

बाराव्या शतकातल इंग्लंड. हेन्री ll (पिटर ओ टूल) चर्चच्या तळघरात थॉमस बेकेटच्या (रिचर्ड बर्टन) थडग्या समोर पापक्षालन करण्यासाठी बसलाय.त्याला जुने दोघांच्या मैत्रीचे दिवस आठवतायत.
राजा हेन्रीचा हा अगदी विश्वासू जिवलग मित्र.दारू पिण्यापासुन ते पोरींची प्रकरण निस्तरण्यापर्यंत आणी राज्यकारभारातील अनेक कटकटींमधून शिताफीने मार्ग काढण्यात बेकेट अगदी पटाइत आहे.अनेक सरदारांना आणी कुटूंबियांना मात्र राजाने स्वतः नॉरमन असुन या सॅक्सन सरदाराला जवळ करण आणी त्याच्या पूर्ण आहारी जाण आजीबात पसंत नाहीये.राजाला फ्रान्स वर चढाइ करण्यासाठी पैसे हवेत आणी त्यासाठी त्याने चर्चवर अतिरिक्त कर लादलाय.आर्चबिशपचा आणी इतरांचा याला बराच विरोध आहे.राजाला चर्चची वाढती सत्ता नको आहे.शेवटी जुने आर्चबिशप मेल्यावर हेन्री बेकेटला इंग्लंडचा नवा आर्चबिशप बनवतो.आयुश्यभर ऑनर करण्यासाठी काहीही न गवसलेल्या बेकेटला इथे मात्र देव आणी स्वत:ची काही वेगळी तत्व आहेत याचे जाणीव होते.राजाच्या एका सरदाराला चर्चमधील प्रिस्टला कैदेत घेउन नंतर मारून टाकल्या बद्दल बेकेट जातीबाहेर टाकतो.चिडलेला राजा बेकेटला निर्णय मागे घेण्यास सांगतो, बेकेट ऐकत नाही.दोघांमधील वाद विकोपाला जातो.बेकेटला अडकवण्यासाठी राजा त्यावर अफरातफरिचा आळ आणतो, पण आर्चबिशपला शिक्षा करण्याचा अधीकार फक्त पोप ला असल्यामूळे बेकेट इंग्लंड मधून निसटून फ्रान्सला येतो.फ्रान्सचा राजा लुइ (सर जॉन गिलगुड) याला पोपपर्यंत पोचण्यास मदत करतो.पोप बेकेटला काही दिवस एका मठीत पाठवतो आणी शेवटी सर्वांच्या मध्यस्थीने बेकेट इंग्लंडला परततो.अनेक सॅक्सन लोकांमधे बेकेट यामूळे बराच लोकप्रिय होतो.बेकेटला वैतागलेला राजा दारूच्या नशेत मला या बेकेट पासून कोण सोडवेल असा त्रागा करतो आणी तिथे उपस्थीत काही सरदार हे ऐकून चर्च मधे जाऊन प्रार्थना करत असलेल्या बेकेटचा खून करतात.मरणा नंतरसुद्धा बेकेटची लोकप्रियता वाढत जाते.शेवटी राजा बेकेटच्या थडग्यासमोर पश्चाताप म्हणून चाबकाचे फटके खातो आणी प्रजेसमोर बेकेटला संत घोषित करतो.

ही झाली या चित्रपटाची साधारण कथा.वाचताना अगदी रुक्ष, शेक्सपिरियन टाइप डायलॉग असलेला मध्ययूगीन काळातील चर्च आणी राज्यसत्ता यातील संघर्षाच चित्रण करणारा चित्रपट वाटेल, पण तस आजीबात नाहिये.मलाही बरेच दिवस असच वाटत असल्यामूळे मी हा चित्रपट पाहिला न्हवता आणी एका अप्रतिम कलकृतीला मुकले होते.

पूढेजाण्यापूर्वी थोडस मध्ययूगीन इंग्लंडबद्दल.दहाव्या शतकामधे विल्यम द काँकरर या नॉर्मन राजाने काबीज करण्यापूर्वी इंग्लंड मधे सॅक्सन सत्ता होती. हे मूळचे जर्मन रहिवासी.रोमन साम्राज्याच्या विनाशानंतर यांनी हा देश आपला केला.जवळपास आठ नउशे वर्ष यांची इंग्लडवर सत्ता होती. नॉर्मन्स हे फ्रान्स मधल्या नॉर्मंडीचे.जिंकलेल्या या देशावर नॉर्मन्सनी आपल्या फ्रेंच चालिरीती लादल्या आणी तो पर्यंत इंग्लंड वर असलेला स्कँडेनेव्हीयन/व्हायकिंग प्रभाव संपला.यानंतर सुद्धा नॉर्मन आणी सॅक्सन यात अनेक लढाया होत रहील्या पण सत्ता नॉर्मन्सकडेच राहिली.पूर्वी पोप आणी चर्चच्या हाती बरीच संपत्ती आणी सत्ता असायची.त्यांचा वाढता प्रभाव ही राज्यकर्त्यांची नेहमिची डोकेदुखी होती.पूढे आठव्या हेन्रीने पोपशी संबंध तोडले आणी तो इंग्लंडमधील चर्चचा प्रमुख बनला.हेन्री आणी थॉमस बेकेटची ही सत्यकथा बाराव्या शतकात घडली.

पिटर ओ टूल आणी रिचर्ड बर्टन यांच्या करीअर मधील अगदी "पिक" काळातिल हा चित्रपट.या मधे दोघांच्याही अभिनयाचा अगदी कस लागला आहे.आता आजीबात पाहायला मिळत नसलेल्या जून्या थिएटर एक्टिंगचा नमूना इथे पहायला मिळतो.चित्रपटाचा सर्व फोकस हेन्री आणी बेकेट मधल्या नात्यावर आहे.याच धर्तीवरचा आणखी एक चित्रपट होता A Man for All Seasons,यात आठवा हेन्री आणी थॉमस मूर यांच्यातिल संघर्ष दाखवलाय पण फोकस आहे राजकिय मतभेद आणी त्यामूळे इंग्लंड मधिल बदललेली धार्मीक आणी constitutional परिस्थिती.

हेन्री हे अगदी गुंतागुंतिच पात्र. ह्या कंट्रोल फ्रिक माणसाला नेहमी सत्ता आपल्या हातात हविये.याला आपल्या कुटुंबियांविषयी तिरस्कार आहे.बेकेट सोडून कोणावरही याचा विश्वास नाही.बेकेटविशयी याच्या भावना अगदी वेगळ्या आहेत.बेकेटला हा मित्र मानतो पण त्याच्या हुशारीमूळे त्याचा मत्सरही वाटतो.याला थंडी आजीबात आवडत नाही आणी रक्त तो पाहूसुद्धा शकत नाही.त्याला बेकेटवर सर्व सत्ता हविये.एका प्रसंगात शिकारीला दोघे गेलेले असताना एका गरिब सॅक्सनची मुलगी राजाला आवडते पण हल्ल्यातून राजाला वाचवल्या बद्दल हेन्री बेकेटला तुला काय हव ते माग म्हणतो.घाबरलेली ति मुलगी राजाची रखेल बनूनये म्हणून मग तो तिलाच मागतो.राजा त्याला हे बक्षिस देतो पण वेळ आल्यवर याच्या अगदी तोडीची गोष्ट तू मला दिलि पाहिजेस अस वचन घेतो.परत आल्यावर बेकेट जेंव्हा आपल्या ग्वॅन्डलिन ह्या मैत्रीणी कडे जातो तेंव्हा राजा तिलाच बेकेटकडून मागुन घेतो. ती आत्महत्या करून घेते.ते रक्त पाहून बिथरलेला राजा बेकेटकडे परत येतो.बेकेट आता आपला तिरस्कार करेल ही राजाला भिती वाटतिये.मी तुला सोडून कुठेच जाणार नाहे असे बेकेट सांगतोय पण तुझ्या विचारांवर माझ कंट्रोल नाही म्हणून हेन्री चिडचिड करतोय.बेकेट कोणाच्याही जवळ गेलेला याला आवडत नाहे.लुइ जेंव्हा हेन्री तुझ्यावर इतका का चिडलाय विचारतो तेंव्हा "मी त्याच्याऐवजी देव निवडला म्हणून" अस बेकेट उत्तरतो.बेकेट जेंव्हा राजाच ऐकत नाहिये तेंव्हा त्याच मन वळवण्याचा बराच प्रयत्न तो करतो आणी शेवटी "तू माझ्यावर का प्रेम करू शकत नाहीस " म्हणून आक्रोश सुद्धा.जाताना चडफडत "आता मी एकट रहायला शिकेन" म्हणतो. दुखावलेल्या हेन्रीला एकिकडे बेकेटला संपवायच आहे आणी आपल्याला तस कराव लागणार म्हणून दुसरीकडे त्याला अतोनात शोक होतोय.बेकेट आता संपणार यामूळे आनंदलेल्या राणीला त्याने " i forbid you to smile when Becket is being destroyed" अस बजावून ठेवलय.कोणीही बेकेटचा त्याच्यासमोर अपमान केलेला त्याला खपत नाही.एकिकडे बेकेटच तिव्र आकर्षण आणी दुसरीकडे तिरस्कार यामधे सापडलेला हेन्री पिटर ओ टूल ने प्रचंड ताकदीने उभा केलाय.या अभिनेत्याच हे लॉरेन्स ऑफ अरेबिया पेक्षाही सरस काम.बेकेट जेंव्हा याला अनेक राजकिय कटकटीतून सोडवतो तेंव्हा पहिलेंदा चिंताक्रांत असलेला याचा चेहरा हळूहळू सैल होतो, मग डोळे चमकतात, मग हळुच हसू फुटत, खांदे ताठ होतात आणी मग तो कमालिचा आनंदतो.बेकेट आपल्याशी प्रामाणीक आहे कि नाही हे पाहण्यासाठी तो त्याला सतत चाचपडत राहतो.ग्वॅन्डलिन ला घेउन जाताना बेकेटने जंगलात मागेच सोडलेल्या त्या मुलिला याने आणवलय आणी अरे हे बघ तू हिला मागेच विसरलास म्हणून सांगतो.ग्वॅन्डलिनने स्वतःला मारून घेतल्यामूळे हेन्री "थॉमस" अस ओरडत जिन्यावरून येतोय, त्याच शरिर थरथरतय आवाज कंप पावतोय.रक्त बघितल्यामूळे त्याला प्रचंड भिती वाटतिये.मला मदत कर म्हणून किंचाळत भिंतिच्या एका कोपर्‍यात त्याने आपल शरिर आक्रसून घेतलय.लुइच्या मध्यस्थिने या दोघांची भेट समुद्रकिनारी होते.मला थंडी वाजतिये याचा तूला आनंदच होत असणार अस हेन्री म्हणतोय.पूर्वी तू असताना थंडीवर उपाय म्हणून मी थंड पाण्याने अंघोळ करायचो पण आता मी काहीच करत नाही, now i only stink.ही कदाचीत आपली शेवटची भेट असेल म्हणून जेंव्हा बेकेट निघून जातो तेंव्हा "थॉमस" अशी अगदी ह्रदयद्रावक किंकाळी अंगावर शहारे आणते.हा माणूस अतिशय इनसेक्युअर आहे हे सतत जाणावत राहत. हेन्रीच्या बेकेट बद्दलच्या भावना वेगळ्या असू शकतात याची हिंट चित्रपटात बरेचदा दिलिये पण ते कुठेही उघडपणे दाखवल नाहिये.कदाचित काळ १९६४चा असेल म्हणून.ते व्यक्त होत पिटरच्या अभिनयातून आणी संवादातून. हेन्रीची आई सुद्धा "for all our sake think of England and not your disappointed love for this man.you have an obsession about him which is unhealthy and unnatural"म्हणते.

थॉमस बेकेट हे त्यामानाने समजायला अधीक सरळ पात्र. हेन्रीशी हा अतिशय प्रामाणीक आहे.राजाच्या मूडस् ची आणी आपल्या बद्दलच्या भावनांची त्याला चांगलिच कल्पना आहे पण तो कोणत्याही गोष्टीवर प्रेम करू शकत नाही.ग्वॅन्डलिन ला सुद्धा तो "somehow i cannot support the idea of being loved"म्हणतो.धूर्तपणामूळे याने हेन्रीला बर्‍याच पेचप्रसंगातून सोडवलय्.तू सॅक्सन असून सुद्धा माझ्या पदरी का आहेस अस विचारल्यावर " i like good living and good living is Norman" अस म्हणतो.जेंव्हा याला चर्च मधे दिक्षा दिलि जाते तेंव्हा तो क्रॉस समोर म्हणतो " dear lord i wish there was something i really regret in parting with, so that i might offer it to you.but forgive me lord its like going on a holiday".हळूहळू त्याला राइट आणी राँगची जाणीव होउ लागते.आपण आर्चबिशप आहोत, आपल्यावर काही जवाबदार्‍या आहेत लोक देवावर विश्वास टाकून येथे येतात आणी आपण सत्याच्या बाजूने उभे राहिले पाहिजे याची जाणीव होते.नॉरमन लोकांची चाकरी करतो म्हणून बरेच सॅक्सन याचा राग राग करतात पण याला मनातून सॅक्सन लोकांविशयी सहानभूति आहे.

संवाद हे या चित्रपटाच आणखी एक बलस्थान.हेन्री थॉमस ला तू माझा सरदार असून इतकी बारीक सारिक काम का करतोस विचारल्यावर तो "nobility lies in the man my prince not in the towel" म्हणतो.ग्वॅन्डलिनला हेन्री म्हणतोय"play something sad it helps digestion". राणी जेंव्हा हेन्री ला मी तुला मुल दिली माझ तारुण्य दिल म्हणते तेंव्हा हेन्री तिला "i don't like my children, and as for your youth, your body was an empty desert madam on which duty forced me to wander in alone"म्हणतो. हे संवाद दोघा अभिनेत्यांच्या खास पॉलिश्ड इंग्लिश एक्सेंट मधे ऐकण हा एक वेगळा अनूभव.

१९६४ चा हा चित्रपट Becket or The Honor of God या Jean Anouilhच्या नाटकावर आधारित आहे.चित्रपटाला दिग्दर्शन होत Peter Glenvilleच. सर जॉन गिलगूड यात लूइच्या एका छोट्या पण स्मरणीय भुमिकेत आहेत.यात टिपिकल हॉलिवुड क्लासिक्स मधे असतात तसे भव्य सेट्स, लढाइची दृश्य नाहीत पण हे सगळ भरुन निघत अतिशय जबरदस्त आणी अविस्मरणीय अभिनयाने.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अचूक विश्लेषणाने एका कसदार चित्रपटाच्या पुनःप्रत्ययाचा आनंद दिल्याबद्दल धन्यवाद.
<<हे संवाद दोघा अभिनेत्यांच्या खास पॉलिश्ड इंग्लिश एक्सेंट मधे ऐकण हा एक वेगळा अनूभव.>> अगदी खरंय. रिचर्ड बर्टन तर शेक्सपियरीअन रंगमंच गाजवूनच सिनमात आलेला अभिनेता होता.
<<हेन्री पिटर ओ टूल ने प्रचंड ताकदीने उभा केलाय.या अभिनेत्याच हे लॉरेन्स ऑफ अरेबिया पेक्षाही सरस काम.>> १००% सहमत.
<<याला आपल्या कुटुंबियांविषयी तिरस्कार आहे.>> स्वतःच्या मुलांविषयींचा तिरस्कार हेन्री व्यक्त करतो , ते दृश्य पाहून तर अंगावर कांटा उभा रहतो.
<<बेकेटला वैतागलेला राजा दारूच्या नशेत मला या बेकेट पासून कोण सोडवेल असा त्रागा करतो आणी तिथे उपस्थीत काही सरदार हे ऐकून चर्च मधे जाऊन प्रार्थना करत असलेल्या बेकेटचा खून करतात.>> हेन्री व बेकेट यांचं नातं घट्ट असलं तरीही हेन्रीचं पात्र इतकं गुंतागुंतीचं आहे कीं तो दारूच्या नशेत हे बोलतो कीं त्याची ती चाल असते, हा मुद्दा अजूनही वादग्रस्तच आहे.
<<टिपिकल हॉलिवुड क्लासिक्स मधे असतात तसे भव्य सेट्स, लढाइची दृश्य नाही आहेत पण हे सगळ भरुन निघत अतिशय जबरदस्त आणी अविस्मरणीय अभिनयाने.>>हे ऐतिहासिक कथानकच नाट्य, द्वंद्व व प्रभावी पात्रं यानी इतकं खच्चून भरलंय कीं कसदार अभिनय असेल तर इतर गोष्टी फारच दुय्यम ठरतात.
केवळ प्रतिकात्मक नेपथ्याच्या सहाय्याने सतिश दुभाषी व रवि परांजपे यानी मराठी रंगभूमीवर सादर केलेलं "बेकेट"देखील म्हणूनच आजही लक्षात आहे.
पुन्हा एकदा धन्यवाद.

मी पाहिला नाहिये पण हे वाचल्यावर पहावासा वाटतोय... नक्की बघेन.. Happy सुंदरच लिहिलय... Happy

हा पण टाकला बघा नेटफ्लिक्स च्या यादीत! ह्या सिनेमांचे पोस्टर अगदी डोळ्यापुढे येतात नाव बघितलं की. आता आवर्जून बघणार. धन्यवाद!! Happy

नेतिरि, धन्यवाद... माझ्या अत्यंत आवडत्या चित्रपटाची इतकी छान ओळख करून दिल्याबद्दल!!

कथा, पटकथा, चित्रीकरण, अभिनय.. सगळ्यातच बाजी मारून गेलेला हा चित्रपट. पीटर ओ टूल चा अभिनय तर केवळ जबरदस्त!
याच थीमवर आधारित आपल्याकडेही काही नाटक-सिनेमा करायचे दुबळे प्रयत्न झाले (नमकहराम, बेईमान, इ.) पण मूळच्या कलाकृतीच्या - म्हणजे फक्त हा सिनेमाच नव्हे तर मर्डर इन द कॅथेड्रल आणि बेकेट या नाटकांच्याही - जवळ्पास सुद्धा पोचू शकले नाहीत.
आता एकदा सीडी/डीव्हीडी घेऊनच टाकावी.. Happy