दु:ख आता फार झाले

Submitted by अभय आर्वीकर on 29 January, 2011 - 12:51

दु:ख आता फार झाले
(तर ही गझल)

स्वप्नही लाचार झाले
दु:ख आता फार झाले

झोपलेले ते निखारे
जाग येता गार झाले

झुंजण्याची वेळ येता
शौर्य-धैर्य बिमार झाले

झुंजणारे वीर खंदे
आरशांचे हार झाले

खेळ येथे माकडांचे
या भुईला भार झाले

पान कोरे अक्षरांना
सांगते आचार झाले

बांधलेली भोवताली
भिंत होती दार झाले

उत्तरांना पेलताना
प्रश्नही बेजार झाले

“अभय”तेच्या ’त्या’ नशेचे
बंद आता बार झाले

...............गंगाधर मुटे............

गुलमोहर: 

आशय चांगला(च) आहे. पण आपण लिंगभेदावर आधारीत विषमतेला नकळत अनुमोदन देत जातो. ते टाळता येउ शकते इतकेच ...

छान. पेशवाशी सहमत. झुंजण्याची वेळ येता मर्द ते पसार झाले. नार हा शब्द नार ह्या संज्ञेसाठी उपहासात्मक वाटतोय.

नार हा शब्द नार ह्या संज्ञेसाठी उपहासात्मक वाटतोय.

हा शेर रचताना प्रारंभी मलाही तशी शंका आली होती. पण...

झुंजण्याची वेळ येता
मर्द तेही नार झाले

"मर्द/मर्दानी" हे शौर्याचे तर "नार" हे सौंदर्याचे प्रतिक मानले गेले आहे.

निव्वळ झुंजण्याच्या अनुषंगाने बघितले तर प्रत्येक पुरूषाला "मर्द गडी" हे संबोधन लागू पडत नाही. तसेच प्रत्येक स्त्रीला "नार" हे संबोधन लागू पडेल असेही नाही.
अशाच काहीशा भावनेने तो शेर रचला आहे.

पण वाचकाला असा थेट अर्थ जात नसावा, म्हणून
मर्द तेही नार झाले
या ओळीत बदल करतो आहे. Happy

आवडली...

झोपलेले ते निखारे
जाग येता गार झाले .>>. हा खूप आवडला

गंगाधर मुटेजी,
गजल मस्त जमलीय. अभिनंदन ! डॉ. कैलास यांनी दिलेल्या तरही मिस-यावर माझी गजल पण तयार आहे. थोड्या वेळात नट वर टाकत आहे. वाचून अभिप्राय जरूर द्यावा.

शौर्य-धैर्य बिमार झाले..... एकाच शब्दातील दोन लघु असायला हवेत ना मुटेजी?

ह्या बदलाची खरंच गरज होती काय? असा प्रश्न पडला

यतीभंग न होता दोन शब्दातील लघु घेता येतात, अशी माझी माहिती आहे.

ह्या बदलाची खरंच गरज होती काय? याचे उत्तर होय, असे आहे.
कवी जे काही म्हणतो, ते, तो आशय जसाच्या तसा (शक्यतो) वाचकापर्यंत पोचणे गरजेचे आहे.
कारण...

कविता लिहिपर्यंत ती कविता कवीची असते. लिहून पुर्ण आणि प्रकाशित झाली की ती वाचकांची असते.

आणि प्रत्येक वाचकापर्यंत अर्थ समजावून द्यायला, उलगडा करायला कवी जाऊ शकत नाही.
कविता प्रकाशित झाली की सदासर्वकाळ जे काही बोलायचे ते कवितेनेच बोलायला हवे, कवीने नाही.

आणि महत्वाचे म्हणजे कवितेतून अर्थ काढणे म्हणजे,
वांझोट्या गाईच्या स्तनातून दूध काढून दाखविण्याचा केविलवाणा, बुवाबाजीसारखा प्रकार
कवितेच्या बाबतीत घडू नये किंवा तशी वेळ प्रशंसकावर येऊ नये, असे मला वाटते.

धन्यवाद मुटेजी.

प्रश्न विचारण्यामागे

"अगोदरचा शेर नवीन शेरापेक्षा स्पष्ट आणि आधिक भिडणारा होता" ही भावना होती (अर्थातच माझ्या वैयक्तिक मतानुसार). शिवाय मर्द आणि नार ह्या प्रतिमा म्हणून वापरल्या गेल्या होत्या असा माझा समज आहे. प्रत्यक्ष स्त्री-पुरूष भेदाभेद गझलेत आणण्याचा आपला खचितच हेतू नसावा म्हणूनच बदल केला नसता तरी चालले असते असे मला वाटते

शिवाय मर्द आणि नार ह्या प्रतिमा म्हणून वापरल्या गेल्या होत्या असा माझा समज आहे. प्रत्यक्ष स्त्री-पुरूष भेदाभेद गझलेत आणण्याचा आपला खचितच हेतू नसावा म्हणूनच बदल केला नसता तरी चालले असते असे मला वाटते

हे खरे आहे.

पण पेशवासारख्या निव्वळ जटील कविता पेलणार्‍या कवीला/कविताप्रेमीला अर्थ उलगडताना दिसला नाही, म्हणून माझी त्रेधातिरपट उडाली. Happy
(पेशवा कृपया व्यक्तिगत घेऊ नये. माफी असावी.)

लिंगभेदावर/जातीभेदावर/शारिरीक व्यंगभेदावर/वर्णभेदावर आधारीत विषमतेला नकळत अनुमोदन देत जातो. ते टाळायलाच हवे. शतप्रतिशत सहमत.

माझा http://www.maayboli.com/node/22462 या गझलेतील

गुणवत्तेचा गळा दाबुनी, हा निकाल आला आज
कर्तृत्वाचा बोर्‍या वाजला, नि भारी पडली जात

हा शेर मला अजूनही बोचतो, तो याच अनुषंगाने.

स्वप्नही लाचार झाले
दु:ख आता फार झाले >>> कनेक्शन लक्षात आले नाही.

झोपलेले ते निखारे
जाग येता गार झाले>>> मस्त शेर!

झुंजण्याची वेळ येता
शौर्य-धैर्य बिमार झाले >>> एकाच शब्दात दोन लघु सलग असावेत.

झुंजणारे वीर खंदे
आरशांचे हार झाले >> कनेक्शन लक्षात आले नाही.

खेळ येथे माकडांचे
या भुईला भार झाले>>> सामाजिक!

पान कोरे अक्षरांना
सांगते आचार झाले>> समजला नाही.

बांधलेली भोवताली
भिंत होती दार झाले>>> व्वा! (भिंत होती नंतर स्वल्पविराम गृहीत धरला.)

उत्तरांना पेलताना
प्रश्नही बेजार झाले - सर्वात छान शेर!

“अभय”तेच्या ’त्या’ नशेचे
बंद आता बार झाले>> हझलीश!

शुभेच्छा!

-'बेफिकीर'!