तेजस्विता

Submitted by ठमादेवी on 28 January, 2011 - 07:30

तेजस्विता मकवाना... तिशीची देखणी तरुणी. मला माझगावच्या मॅजिस्ट्रेट कोर्टात भेटली. तिने तिच्या नवर्‍याविरोधात ‘महिलांचे कौटुंबिक छळापासून संरक्षण अधिनियम-2005’ (डीव्हीएन) अंतर्गत खटला दाखल केला होता. सुरुवातीला आम्ही एकमेकींना नुसत्याच बघायचो. मग हळूहळू ओळख झाली, मैत्रीही झाली. एके दिवशी तिने तिची कहाणी सांगितली-
तिचा आणि तिच्या नवर्‍याचा हा प्रेमविवाह. अर्थात तिचं पहिलं लग्न तर नवर्‍याचं दुसरं. तिचा नवरा दीपक कुठल्याश्या कंपनीत मार्केटिंग एक्झ्युक्युटिव्ह होता म्हणे. लग्नानंतर वर्षभर ठीकठाक चाललं होतं. पण हळूहळू तिला त्याचा आणि तिच्या सासू-सासर्‍यांचा स्वभाव कळू लागला. आधी टोमणे, मानसिक छळ आणि मग मारहाण करण्यापर्यंत मजल गेली. ती बिचारी अर्धमेलीच झाली होती. शेवटी छळाला कंटाळून घर सोडलं आणि आईवडिलांच्या आश्रयाला आली. घरच्यांनी आधार दिल्यावर मग तिने डीव्हीएनखाली केस दाखल केली. तिच्या इथून पुढच्या कथेची मी साक्षीदार होते.
खटला सुरू झाल्यावर सुरुवातीला काही दिवस दीपक कोर्टात यायचा. डीव्हीएनचा खटला 60 दिवसांत निकाली काढण्यात यावा, असे कायद्यात संकेत आहेत. पण तो लांबणार असं दिसल्यावर न्यायाधीशांनी तिला अंतरिम (तात्पुरत्या) स्वरुपात महिना दहा हजार रुपये एवढी रक्कम देण्याचे आदेश दीपकला दिले. त्यानंतर तो यायचाच बंद झाला. कधी पाय फ्रॅक्चर झाल्याचं कारण तर कधी आई अ‍ॅडमिट असल्याचं. त्याची वकीलही कोर्टात येईचना. शेवटी कोर्टाने त्याच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट काढलं. पण पोलिसांनी दिलेल्या पत्त्यावर तो राहत नसल्याचा आणि बेपत्ता झाल्याचा रिपोर्ट दिला. ती बिचारी चकरा मारतच होती. त्याच्या ऑफिसमध्ये गेली. तिथून त्याने नोकरी सोडली होती. आता एवढ्या मोठ्या मुंबईत त्याला शोधायचं कुठे आणि कसं? पण तिने हार मानली नाही. याच दरम्यान त्याने फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठीचा अर्ज दाखल केला होता. त्याच्या पहिल्या तारखेला तो आला आणि मग पुन्हा बेपत्ता झाला.. जणू हवेत विरघळला असावा.
त्याचे सगळे बँक अकाऊंट्स शोधून काढले. ते सील करायला भाग पाडले. कोर्टात यायचीच. नेहमी त्याला अजामीनपात्र वॉरंट काढावं आणि त्याच्याविरोधात आदेश द्यावेत, अशी विनंती करायची. पण न्यायाधीश म्हणायचे ‘आदेश द्यायला मी तयार आहे, पण कोणाच्या विरोधात देऊ? माणूस समोर तर येऊदेत.’
असं करत करत तब्बल दीड वर्ष उलटलं. शेवटी तिला तो वडाळाच्या कुठल्याश्या कंपनीत काम करत असल्याचं कळलं. तिथे जाऊन त्याची माहिती काढेर्पयत ती नोकरी त्याने सोडली आणि पुन्हा पळाला. मग वसईत कुठेतरी असल्याचं कळलं. तिथूनही पळाला. 2009 सालच्या दिवाळीच्या एक-दोन दिवस आधी तिला कुठूनतरी त्याचा कांदिवलीचा पत्ता सापडला. तिने तारीख नसतानाही कोर्टात येऊन धावपळ केली. कोर्टानेही तिची धावपळ लक्षात घेऊन दोन अजामीनपात्र वॉरंट्स जारी केली. पहिल्या वॉरंटनंतर सुटला तर दुसरं वॉरंट, असा हेतू होता. इथे तिने माझी मदत घेतली. आम्ही सरळ मुंबईचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांच्याकडे धडकलो. त्यांना मी फोनवरून केसची कल्पना दिलीच होती. त्यांनी तिच्या नवर्‍याला पकडण्यासाठी विशेष पथक पाठवलं. दिवाळीच्या दिवशी समोर पोलिस आणि आम्ही हे बघून तो हडबडलाच. त्याच्यासोबत एक छोटी मुलगी आणि आणखी एक स्त्री होते. हे त्याचं आणखी भलतंच प्रकरण दिसत होतं.
त्याला अटक झाली. आधी कांदिवलीच्या स्थानिक दंडाधिकार्‍यांकडे आणि मग माझगाव कोर्टात त्याला बखोटीला धरून आणलं गेलं. न्यायाधीश त्याला पाहून प्रचंड चिडले. त्याचा जामीनअर्ज हजर झालाच होता. ‘मी जज नसतो तर तुझ्या कानाखाली खेचली असती. आधी मेन्टेनन्सची रक्कम भरा आणि मग पुढे पाहू,’ असं सुनावलं. त्याने कशीबशी मुदत घेऊन थोडे पैसे भरले आणि पुन्हा सूंबाल्या केला. या वेळी मदतीला आले ते पश्चिम विभागाचे पोलिस उपायुक्त संजय बॅनर्जी. त्यांनी त्याच्यावर लक्ष ठेवलंच होतं. पुन्हा अटक झाली आणि मग तिचा घटस्फोट मार्गी लागला. तिला नुकसानभरपाई म्हणून काही लाख रुपये आणि एक फ्लॅट मिळाला. मग तिने डीव्हीएनचा खटला मागे घेतला.
हल्लीच तिने स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे आणि आता एक शांत आयुष्य जगतेय. पण ते दीड वर्ष तिने जे काही भोगलं ते शब्दातीत आहे. कितीतरी रात्री तिने झोपेशिवाय काढल्या, तो जिथे आहे असं कळायचं तिथे धावायची, मग कुठलीही वेळ असो, काहीही असो. तिचा तणावग्रस्त चेहरा काळजाला घरं पाडत जायचा पण तिचं हसू कधीही मावळलं नाही. "छोडूंगी नहीं मैं" हे शब्द तिने खरे करून दाखवले. शेवटपर्यंत पिच्छा सोडला नाही. तेजस्विता- आपल्या नावाचं असं सार्थक करणार्‍या या माझ्या मैत्रिणीचा मला अभिमान वाटतो...

गुलमोहर: 

खुप धावपळ झाली, त्रास झाला, त्याची भरपाई होणार नाही.
खरेतर, उगीचच मनस्ताप करुन घेतला, त्यापेक्षा स्वत:कडे लक्ष द्यायला हवे होते, असेच मी म्हणेन.

दिनेशदा, हे आपण आफ्टरथॉट म्हणून म्हणू शकतो कारण तिने हे सगळं केलं नसतं तर त्याने तिच्या हातावर एक छदामदेखील टिकवला नसता.. जो माणूस कोर्टाचा अवमान करून बेपत्ता होऊ शकतो तो काहीही करू शकतो आणि हो, बायको म्हणून स्वतःचा हक्क मिळवण्यासाठी तिला ही लढाई लढावीच लागणार होती... थेट फॅमिली कोर्टात केस गेली असती आणि हा पळून गेला असता तर कोर्टाने एकतर्फी फक्त घटस्फोट दिला असता. अशा वेळी तिला कायद्याचं संरक्षण राहिलं नसतंच आणि शिवाय वॉरंट वगैरेही ती काढू शकली नसती... तो तद्दन गुन्हेगारी मानसिकतेचा होता.

ते खरंय. पण कधी कधी या व्यवस्थेत भोगलेला मनस्ताप आणि मिळालेला "न्याय" यांचे प्रमाण व्यस्त असते. मे. कोर्टाच्या ऑर्डरची अंमलबजावणी होणे पण कठीण असते, बर्‍याचवेळा.
या मूलीच्या बाबतीत, तिला निदान काही प्रमाणात लाभ झाला, पण असा लढा देऊनही, हातात काहीच न पडलेल्या मुली बघण्यात असतीलच. मे.कोर्ट तरी, एका मर्यादेपलिकडे फार काही करु शकत नाहीत.

तेजस्वितेला सलाम! आपल्या ऐन उमेदिच्या काळातली महत्त्वाची वर्षे अशा फालतू लोकांकरता वाया जाणे खरेच क्लेषदायक. पण अशांना धडा शिकवलाच पाहिजे. एवढी धावपळ केली बिचारीने त्याचे जरातरी फळ मिळाले तिला. बर्‍याच जणींच्यातर हे ही नशिबी नसते.

दिनेशदा, लढाच दिला नाही तर अशा लोकांचे अजूनच फावते. मान्य आहे सिस्टिम मधे न्याय मिळायला वेळ लागतो, बरेचदा काहीच हातात पडत नाही पण म्हणुन लढायचेच नाही हे चुकीचे. त्यामुळे खरे तर एकटी बाई माझे काय वाकडे करणार आहे ही भावना वाढते. त्या पेक्षा अशा परिस्थीत काय पावले उचलायची. काय कागदपत्रे दाखल करायची याचे मार्गदर्शन मिळाले, संगठित प्रयत्न केले गेले तर न्याय मिळायला मदत होईल.

बापरे केवढी मोठी लढाई, त्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले असतील तिला. मनोबल खचू न देता ह्या सगळ्याचा पाठपुरावा तिने केला हे खूपच कौतुकास्पद आहे.
बरं एवढे करून तिच्या नवर्‍याला अद्दल घडली असेल तर तेही म्हणता येणार नाही कारण त्याने तिसरे लग्न केलेले दिसतच आहे कदाचित चौथेही करेल आणि सगळ्याच मुली तेजस्विता सारख्या हक्कासाठी लढा देणार्‍या असतील असे नाही. Sad

स्वाती २, रुनी, असूदेला अनुमोदन. तेजस्विताच्या लढ्यात तुम्हीही तिच्या बरोबरीने उभ्या राहिल्यात म्हणून तुमचंही अभिनंदन.

सर्वप्रथम तुमचे अन तेजास्वीताचे अभिनंदन.
दिनेशदा यांच्याशी पूर्णपणे असहमत....अशा नायालक माणसाला धडा शिकवायलाच हवा...काय होणार असे म्हणून गप्प बसले तर अशा गुन्हेगारांचे फावते...अशातही त्याने परत एका बाईला फसवल्याचे दिसतेय.

या सगळ्यात तिच्या माहेरची साथ मिळाली हेही कौतुकास्पद आहे.

तेजस्विताच्या लढाईला सलाम. पण प्रेमविवाह करताना काय पाहिल होत ? त्याचे आई-बाप घरदार यांचा काही उल्लेख नाही. अस आंधळ प्रेम केल की खड्ड्यात पडणारच.

अस आंधळ प्रेम केल की खड्ड्यात पडणारच.<<
वाद म्हणून नाही पण आईबापांनी व्यवस्थित पाहून बिहून करून दिलेल्या लग्नांमधे खड्ड्यात पडलेल्या मुलींची तेवढीच उदाहरणं आहेत. तेव्हा खड्ड्यात पडण्यासाठी प्रेमविवाह की ठरवून विवाह यावर काही अवलंबून नसतं.

नीरजाला अनुमोदन... असुदेलाही... सायोलासुद्धा Happy
प्रेम करताना सगळंच खरं माहीत असतं असं नाही... अशा फसणार्‍या मुली कितीतरी आहेत आपल्या समाजात.पण फसवले गेल्याची जाणीव झाल्यावर हरून निराश होणार्‍यांचीच संख्या खूप.. तेजू लढली म्हणून तिला काही प्रमाणात का होईना स्वतःचा हक्क मिळाला.त्या माणसाची पहिली बायको आजही काहीही न घेता अशीच कुढतेय. पण तेजूने त्याला पळता भुई थोडी केली... मला अशाच लढायांमधून प्रेरणा मिळत आली आहे... बाकी मी केलं ते एक मैत्रीण म्हणून आणि ते शक्य होतं म्हणून... ती जे करतेय त्यातला त्रास कमी व्हावा म्हणून...

धन्यवाद सगळ्यांचे प्रतिक्रियांसाठी... खरंच आभारी आहे... Happy

Pages