लेखनसीमा

Submitted by निशदे on 23 January, 2011 - 22:21

लेखनशक्ती ही मानवाला उगाच दिलेल्या अनेक निरुपयोगी शक्तींपैकी एक आहे असे माझे मत आहे. आता मी म्हणजे कोणी जगन्मान्य कर्तृत्ववान व्यक्ती नसल्याने माझ्या मताला देखील काही किंमत नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. पण माझ्या एका (स्वघोषित) सहस्त्रबुद्धे आजोबांच्या शिकवणीनुसार " (लोकांचे कितीही डोके उठले तरीही) माझे मतप्रदर्शन मी करणारच " या उक्तीवर माझा गाढ विश्वास असल्याने मी बोलणारच. आणि शिवाय लेखनाचे फायदे किती यावर लेखनप्रेमी मंडळी कायमच बोलत असतात. तर लेखनाचे तोटे किती यावर आमच्यासारखी लेखनद्वेष्टी मंडळी कधी बोलणार ?
" दिसामाजी काहीतरी..... " असे काहीतरी समर्थांनी स्वतः एके दिवशी लिहून ठेवले त्याचे कारण ' भाषेच्या समृद्धीसाठी प्रयत्न ' किंवा ' चिंता करतो विश्वाची ' असे असेल असे मला मुळीच वाटत नाही. शिष्यगणांमधील लिखाणाबद्दलचे वाढते औदासिन्य पाहून चिंतित झालेल्या समर्थांनी मग ' दिसामाजी काही तरी ते लिहावे ' असा आदेश दिला आणि स्वतः दिलेला आदेश मग त्यांना पाळावाच लागला. ....नाहीतर एवढे श्लोक लिहीणे म्हणजे काय खायचे काम आहे का???? अर्थात खाण्याच्या कामात देखील मी काही फार पुढे आहे अशातली बाब नाही. देवाने भारताची दुष्काळग्रस्त परिस्थिती लक्षात घेऊन खाली पाठवण्याचा विचार केल्याने त्याला शरीराचे डिझाइन सुद्धा तसेच करावे लागले. परिणामी शरीराचे यंत्र कमीत कमी इंधनावर चालते व क्रियाशक्ती देखील आराम या स्थितीला राहणे पसंत करते........असो.
तर लिखाण हा माझा वीक पॉईंट! म्हणजे या बाबतीत मी लहानपणापासूनच वीSSSक आहे. वाचन कितीही आवडत असले तरी काहीही लिहायचे म्हणजे आमच्या हाताला कंप सुटत असे. परीक्षावेळी माझा ' सगळे आधीच पुस्तकात लिहीले असताना पुन्हा पेपरात कशाला लिहायचे ' हा युक्तिवाद असे. माझे प्राथमिक शिक्षण पुणे, मुंबई सारख्या शैक्षणिक ठिकाणी न होता एका खेडेगावात झाल्याने तेथे गुरुजी लोक असले युक्तिवाद समजून घेण्याच्या भानगडीत पडत नसत. " उत्तर विचारले की लिहायचे. तुझे नसलेले डोके चालवत जाऊ नकोस " असा भर वर्गात उद्धार व्हायचा. मला वाटते शैक्षणिक जीवनात लेखन कोणालाही आवडत नसावे आणि ज्याना ते आवडते ते लोक पुढे जाऊन मोठमोठे ग्रंथ वगैरे लिहितात. महाभारत सांगितले म्हणून मला व्यासांचे काडीचेही कौतूक वाटत नाही, ते लिहीले म्हणून गणपतीबद्दल मात्र मला शब्दांत सांगता येणार नाही एवढा आदर आहे. त्यात पुन्हा ते पूर्ण होईपर्यंत त्याने लेखणी खाली ठेवली नाही म्हणतात. बिचारा....काय अवस्था झाली असेल त्याची ! परीक्षेचे सर्व पेपर संपवून घरी आलो की मला दोन दिवस हाताला कोपर्‍याजवळच्या बेचक्यात अमृतांजन लावावे लागे आणि हाताची बोटे गरम पाण्यात भिजवून ठेवावी लागत. त्या दोन दिवसात क्रिकेट च्या टीम ठरून गेलेल्या असत त्यामुळे पूर्ण सुट्टी संपेपर्यंत मला अंपायरचेच काम करावे लागे. म्हणजे लिखाणानेच खेळातील एका भावी स्टार खेळाडूची कारकीर्द सुरु होण्याआधीच संपवली.

जसजशा माणूस इयत्ता चढत जातो तसतसा आपली शैक्षणिक पद्धत त्याला लिहिण्याच्या बाबतीत जास्त कोडगे करत जाते. त्यामुळे प्रथम जो पेपर "एका वाक्यात उत्तरे"मधे संपतो तो पुढे "एका वाक्यात उत्तरे, २-३ ओळीत उत्तरे" इथून " एका वाक्यात उत्तरे, ४-५ ओळीत उत्तरे " असा वाढत " एका वाक्यात उत्तरे, ५-६ ओळीत उत्तरे, संदर्भासहित स्पष्टीकरण " व पुढे " एका वाक्यात उत्तरे, ४-५ ओळीत उत्तरे, संदर्भासहित स्पष्टीकरण, १०-१२ ओळीत उत्तरे, कोणताही एक निबंध" असा मारुतीच्या शेपटीसारखा वाढतच जातो. बरं पुन्हा लिहायला वेळ काही वाढवून देत नाहीत. अहो, १०-१२ ओळीत उत्तरे लिहायची म्हणजे काय खेळ आहे का?? त्यात एवढी मोठी उत्तरे लिहायची म्हणजे केवढा विचार करावा लागतो! जिथे इतर लोकांचे विचार "उत्तर कसे लिहायचे?" इथे सुरु होत असे तिथे माझा विचार " उत्तर कोणत्या धड्यात असेल? " इथे सुरु होई. त्यामुळे परीक्षेतील माझा बराचसा काळ विचारमंथनात जात असे. वेळ संपल्यानंतर जास्तीचे १०-१५ मिनीट ज्यांना मिळत त्यामधे माझा नंबर कधीच नसे. " तीन तास नुसता पेन दातात चावत सिलींग फॅन कडे बघत बसला आहेस. आता १० मिनीटात काय मोठे दिवे लावणार आहेस? आण तो पेपर इकडे!!! " असे उत्तर मिळत असे. वर्गातल्या प्रस्थापित हुशार मुलांना मात्र हा वेळ सहज मिळत असे. मला वाटतं प्रस्थापित विरुद्ध नवोदित अशा लढाईचं बाळकडू तिथूनच मिळत असावे.

आमच्या घरीदेखील माझ्या लिखाणाबद्दल काही विशेष ममत्व नव्हते. माझे वडील डॉक्टर असल्याने त्यांचे स्वतःचे अक्षर अगम्य होते. मेडिकल स्टोरवालादेखील कित्येकदा वडिलांना फोन करून कोणती औषधे लिहिली आहेत याची खात्री करून घेत असे. त्यामुळे ते मला कधीही हस्ताक्षरावरून काहीही बोलले नाहीत. मात्र मी उत्तरे मोठी लिहावीत अशी त्यांची अपेक्षा असे. १०-१२ ओळीत उत्तर लिहायचे असताना मी बरोबर साडेदहा ओळीत उत्तर संपवत असे. ते वडिलांना आवडत नसे. माझ्या लिखाणाच्या बाबतीत आमच्या आईला काळजी वाटे. मार्कशीट मिळाल्यानंतर सर्व गल्लीला ऐकू जाईल अशा स्वरात ती माझा उद्धार करीत असे. पण लिखाणाच्या बाबतीत सर्वाधिक छळ केला आहे तो आमच्या आजोबांनी.

माझे आजोबा पंचक्रोशीमधे मोठे लेखक म्हणून प्रसिद्ध होते. खराड्यासारख्या दीड हजार लोकवस्तीच्या गावात आणि त्याच्या पाच कोसातल्या इतर वाड्यांमधे आमच्या आजोबांना 'शाणे मास्तर' या नावाने बोलावले जाई. 'शाणे' म्हणायचे कारण असे की १९४५ साली या गावांमधे लिखाण कसे करतात याचा गंध देखील नव्हता. पण (तत्कालीन) मायबाप ब्रिटिश सरकारच्या (अव)कृपेने माझ्या आजोबांची या जागी तलाठी म्हणून बदली झाली. आणि पहिल्याच दिवशी त्यांनी गावच्या पाटलाच्या सुनेचे बाळंतपण मुंबईत झाल्याची चिठ्ठी वाचून दाखवली आणि पाटलाने खूष होऊन त्यांचा हारतुर्‍यांनी सत्कार केला. (वास्ताविक ती चिठ्ठी पाटलाला एका पाहुण्याने दोन महिने आधीच आणून दिली होती पण "हितं रांडीचं कुनाला वाचाय येतंय मास्तsssर?" असे म्हणून पाटलाने दोन महिन्यापूर्वी जन्माला आलेल्या त्या मुलाचा जन्म दणक्यात साजरा केला) आणि सर्वाना "मास्तर तिच्याsssयला लई शानं बरं का? लिवाया वाचाया येतया म्हंजी काय साधं ब्येणं हाये का ते?" असे "कौतुकाने" सांगितले तेव्हापासून त्याना "शाणे मास्तर" असेच नाव पडले. रिटायर होऊन पुण्यात आमच्याबरोबर ते अखेरपर्यंत होते पण त्यानी लेखनाचा व्यासंग सोडला नाही. त्यांच्या लेखनाच्या वेळा ठरलेल्या असत. दररोज सकाळी पूजेनंतर व संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी ते माडीवरच्या त्यांच्या खोलीत लिखाणासाठी जात असत. घरी त्यावेळी पाहुणे आलेले असले तरीही गप्पा चालू असताना एकदम उठून "माझ्या लिखाणाची वेळ झाली" असे म्हणत असत व चहूकडे पाहुण्यांवर आणि घरातल्या मंडळींवर नजर फिरवत असत. त्यावेळी सर्वांच्या चेहर्‍यावर कमालीचा आदर असे. आजोबा वर जात असताना "कध्ध्ध्धी चुकत नाही हो त्यांची ठेप!! ऊन, वारा, पाऊस, अगदी काहीही झाले तरी लेखन मुळ्ळ्ळीच सोडणार नाहीत" अशी कौतुकाची वाक्ये स्त्रीवर्गातून तर "व्यासंग मोठा आहे त्यांचा......अगदी खोल अभ्यास आहे. लिखाण अगदी लीलया करतात" अशी गंभीर चर्चा पुरुषवर्गात होत असे. गंमत म्हणजे हे लि़खाण आमच्यापैकी कोणीही कधीही पाहिले नाही. जाड जाड वह्यांमध्ये आजोबा लिखाण करत असत आणि ते कुलुपबंद कपाटात ठेवीत असत. त्या कपाटाच्या फार जवळ गेल्याने मी काही वेळा त्यांचा मारदेखील खाल्ला आहे. आमच्या गल्लीतला विनायकदादा जोशी आजोबांकडे अनेकदा सल्ले घेण्यासाठी येत असे. त्याला मोठा लेखक व्हायचे होते. आजोबा त्याला "लेखनातून आद्ध्यात्मिक चेतना मिळाली पाहिजे. मानवी जीवनाचा दैवी अविष्कार म्हणजे लेखनशक्ती" असा ज्ञानोपदेश करीत असत आणि वर पुन्हा "हे आमचे नातू बघा. लिहिण्याच्या नावाने शंख आहे अगदी" असे सर्वांना ऐकु जाईल एव्हढ्या आवाजात त्याला सांगत असत. विनायकदादासुद्धा माझ्याकडे अत्यंत कारुण्यपूर्ण नजरेने बघत असे. आजोबांच्या या असामान्य साहित्यप्रतिभेचा अविष्कार आम्हाला त्यांच्या जिवंतपणी कधीच दिसू शकला नाही. आजोबांच्या मृत्यूनंतर त्याच्या कपाटात आम्हाला "श्रीराम जय राम जय जय राम" लिहिलेल्या सत्तावन्न वह्या सापडल्या. बाबांनी त्या गोंदवल्याला देऊन टाकल्या व आम्हाला याबद्दल कोणाकडेही काहीही न बोलायची सक्त ताकीद दिली. विनायकदादा मुंबई ला "त्रिवेदी अँड सन्स फार्मास्युटीकल्स" मधे अकौंटंट म्हणून काम करतो.

"शेजारी" या वर्गात मोडणार्‍या राक्षसांनी माझ्या निरागस लहानपणाचे वाटोळे करायचा चंगच बांधला होता. "निंदकाचे घर असावे शेजारी" असे जरी संत सांगून गेलेले असले तरीही त्याना निंदकास स्तुतिपाठक हे घरांचे गुणोत्तर १:४ (एकास चार) या प्रमाणात अभिप्रेत असावे. आमच्या मात्र चहुबाजूंनी निंदकांचा वेढा पडलेला असे. वरच्या मजल्यावर फडकुले तर खालच्या मजल्यावर सहस्त्रबुद्धे अहि-महिरावणाप्रमाणे माझ्यावर पहारा देऊन असत. फडकुलेंचा अभि हुशार (किंवा 'चंप्या') वर्गात मोडत असल्याने त्याच्या आईबाबांना "इतर मुलांचा अभ्यास" या विषयात कमालीचा उत्त्साह येत असे. खाटिकाकडे बकरे स्वतःहून चालून आल्यावर त्याला जसा आनंद होतो तसा आनंद या दोघांना मी दिसल्यावर होत असे. बारा वर्षाच्या शेजारधर्मात शेकडो वेळा आलेल्या संपर्कात प्रत्येक वेळी बोलण्याची सुरुवात फडकुले कुटुंब करत असत आणि प्रत्येक वेळी ती सुरुवात माझ्या शिक्षणातील "भविष्याबद्दल" असे. सहस्त्रबुद्धे कुटुंबाला मूलबाळ नव्हते. त्यांच्यापासून फडकुल्यांसारखा धोका नसला तरी त्यांच्यापासून वेगळाच धोका होता. सहस्त्रबुद्धे आजी आजोबा निवृत्त मुख्याध्यापक-मुख्याध्यापिका होते. आजोबांचा चष्मा सापडत नसल्याने त्यानी एकदा पत्र लिहीण्यासाठी मला बोलावले आणि माझे लेखनसामर्थ्य पाहून मला त्या दोघांनी जणू काही दत्तकच घेतले. चित्रपटात एखाद्या गरीब मुलाला रस्त्याकडेहून म्हातारी उचलते आणि तिच्या प्रेमाच्या वर्षावाखाली तो मोठेपणी डायरेक्ट अमिताभ बच्चनच होतो अशा "संस्कारात" आम्ही वाढत असल्याने मी काही काळ खूश होतो. पण या निरुपा रॉय-सत्येन कप्पू जोडीने मला प्रेम सोडून बाकी सगळे द्यायचा निश्चय केला होता. रोज संध्याकाळी म्हातारा-म्हातारी मला हाक मारून खालती बोलावून घेत आणि मोठमोठे निबंध लिहायला लावीत. ह्या तक्रारी घरी सांगण्याची सोय नव्हती. माझ्या आईने मला लिखाणात सुधारण्यासाठी संपूर्ण सदाशिव पेठेला जणू सुपारीच दिली होती. प्रोत्साहन न देता सदाशिव पेठकरांचे वागणे याबद्दल प्रबंध लिहून झालेले आहेत तर माझ्या बाबतीत तर सर्वाना वाटेल ते करायची पूर्ण मुभा होती तेव्हा माझे हाल विचारू नका. किराणा मालाचा दुकानदार देखील मला हाक मारून "जरा हिशेब लिहायला ये" असे खुशाल सांगत असे.

तारुण्याच्या उंबरठ्यावर आल्यानंतर प्रेमात पडणे वगैरे सगळे प्रकार देखील करून झाले. तिथे सुद्धा 'तू मला प्रेमपत्र का लिहित नाहीस? ते किSSSSSSSSSSSSत्तीSSSSSSSSS रोमांटिक असते रे' असाच हट्ट प्रेयसी ने धरला. तिला 'त्यापेक्षा तुला दिवसातून २ फोन जास्त करतो' असे म्हणाल्यावर दोन दिवस अबोला धरण्यात आला. वस्तुत: तिच्या मैत्रिणींचे सगळे बॉयफ्रेंड त्यांना (म्हणजे आपापल्या गर्ल फ्रेंड ना) प्रेमपत्र लिहित असल्याने सम-स्त्री-मैत्री-दबाव(म्हणजे 'अय्या.......तुझा बॉयफ्रेंड तुला loveletter लिहित नाही???????????माझा गोटू मला किSSSSSSत्तीSSSSSS गोSSSSSSSड प्रेमपत्र लिहितो.') या न्यायाने माझ्यावर ' तू मला प्रेमपत्र लिही ' अशी जबाबदारी टाकण्यात आली. आता वास्ताविक पाहता हा गोटू म्हणजे परशुराम ढमढेरे माझाच मित्र. परशुराम ला गर्ल फ्रेंड कशी मिळाली हे कोडे आज इतक्या वर्षांनी देखील आम्हा मित्रांना(आणि स्वत: परशुराम ला सुद्धा) उलगडलेले नाही. मात्र या परशुरामने आम्हा सर्व मित्रांना एकवीस वेळा ब्रह्मचारी करण्याचा जणू काही चंगच बांधला होता. महागड्या(किंवा जास्त चकचक करणाऱ्या) गोष्टी गर्ल फ्रेंडला भेट देणे, तिला सारखे बाहेर फिरायला घेऊन जाणे या असल्या काहीतरी गोष्टी करून याने आमचा रोष ओढवून घेतला होता. पण आता मात्र अति झाले होते. आम्ही मित्रांनी 'गोटू' ला फोन लावला.

'hello '

'परश्या भडव्या.......' मी सुरुवातीलाच पेटलो.

'आता काय झाले?' हा एकदम थंड......

'काय झाले म्हणून काय विचारतोस साल्या' आकाश भडकला.

'तू फोन केल्यावर मीच विचारणार न काय झाले म्हणून'

'भंकस करू नको. अश्विनी ला प्रेमपत्र लिहितोस काय रे गोट्या?'

'तुला कोणी सांगितले?' परश्या आता जरा सावध झाला.

'मनमोहन सिंगाने सांगितले. तुला त्याच्याशी काय करायचे आहे?' इति मोहन.

'ती माझी गर्ल फ्रेंड आहे. मी काय वाट्टेल ते करीन.' उसन्या अवसानाने परश्या म्हणाला.

'अरे नालायक, पण तिची गर्ल फ्रेंड माझी गर्ल फ्रेंड आहे. म्हणजे तुझ्या गर्ल फ्रेंड ने आमच्या गर्ल फ्रेंड ला सांगितले कि आमच्या गर्ल फ्रेंड आम्हाला पण तुझी गर्ल फ्रेंड जे करते ते करायला सांगतात.'......आकाश

'??? '

'कळले का रे बिनडोक?'

'मला नीट नाही कळले'

'अरे तुझ्या गर्ल फ्रेंड ला प्रेमपत्र का लिहितोस कालिदासा???????'........मी.

'ह्याला हाणला पाहिजे धरून'...........मोहन.

' अरे असे नका रे करू.........अरे तिने परवा मला notebook पिक्चर पाहायला लावला. आणि....'

' कसा आहे?' .....विनोद

'काय?'

'picture '

'torture आहे रे.......अक्षरश: torture '

'बर मग?'

'मग हट्ट धरला कि मी पण तिच्यासाठी एका दोनशे पानी वहीमध्ये रोज काहीतरी लिहून तिला वाचून दाखवायचे.'

बसल्या जागी आम्ही सगळे गारठलो!!!!!!!!!

'कशीबशी समजूत घातली रे तिची आणि तिला दर महिन्याला एक प्रेमपत्र लिहायचे कबूल केले'

आता मात्र परश्याबद्दल आदर वाटू लागला.

'अरे मला दुसरी नाही मुलगी मिळणार कोणी!!!!!!! प्लीज तुम्ही चिडू नका रे............ती तशी खूप चांगली आहे रे.........'

एका मिनिटाच्या अंतरात आम्हाला परश्याबद्दल राग, सहानुभूती आणि काळजी या सर्व भावना येऊन गेल्या होत्या. पुढचा अर्धा तास परश्या आमची समजूत घालत होता आणि आम्ही सर्वांनी काळजावर दगड ठेवून प्रेमपत्र लिहायचे ठरवले.

इतरांनी काय लिहिले हे कळण्याचा काहीच मार्ग नव्हता. पण माझे पत्र वाचून मात्र तिच्या तळपायाची आग मस्तकाला जाऊन भिडली. वास्तविक पाहता

'प्रिये,

जर तुझे माझ्यावर खरे प्रेम असेल तर यापुढे कृपया माझ्या प्रेमाचा लिखित पुरावा मागू नकोस.

तुझाच,

'
या पत्रात चिडण्यासारखे काय आहे हे मला समजले नाही, पण यानंतर तिने पुन्हा मला 'पत्र लिही' असे कधीही सांगितले नाही हे मात्र नक्की.

तात्पर्य : कळवण्यास अत्यंत हर्ष होतो की संपूर्ण बालपण लिखाणाच्या भितीत घालवल्यानंतर आता एक अभियंता म्हणून काम करताना मला लिखाणाच्या वाटेला जाण्याची फारशी वेळ येत नाही. लिखाणाला पर्याय नाही हे खरे असले तरी "दगडापेक्षा वीट मऊ" या न्यायाने मी टायपींगला स्वीकारले आहे. कोणत्याही (प्रकाशित वा अप्रकाशित) लेखकाबद्दल मला अतीव आदर आहे. पण हे माझे काम नाही हे माझ्या मनाने कधीच सांगितले व स्वीकारले आहे. लेखनाचे कौतुक करणारे अनेक भेटतात पण लेखन न आवडणार्‍यांचा प्रतिनिधी म्हणून मी भावना व्यक्त केल्या. आता भेट होत राहीलच..........तोवर........इति लेखनसीमा!!!!!

****************************************************************************************************
सर्व माबोकरांसाठी हा माझा लेखनाचा पहिला प्रयत्न. माबोचा सभासद झाल्यापासून अनेक मात:बरांचे लेखन वाचायची संधी मिळाली. लेखन जे वाचायलाच नाही तर लिहायलाही प्रवृत्त करते असे लेखन मला सर्वच मराठी साईट्स वर वाचनाला मिळाले. अशा सर्व मान्यवर लेखकांच्या जवळपास जाणारा देखील माझा हा प्रयत्न नसला तरी तुमच्या सर्वांच्या प्रतिसाद, सूचना आणि प्रोत्साहनाने तिथपर्यंत नक्कीच पोहोचेन यात शंका नाही.
******************************************************************************************************

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मस्त लिहिलय.

>>>>> महाभारत सांगितले म्हणून मला व्यासांचे काडीचेही कौतूक वाटत नाही, ते लिहीले म्हणून गणपतीबद्दल मात्र मला शब्दांत सांगता येणार नाही एवढा आदर आहे. त्यात पुन्हा ते पूर्ण होईपर्यंत त्याने लेखणी खाली ठेवली नाही म्हणतात. बिचारा....काय अवस्था झाली असेल त्याची !

चित्रपटात एखाद्या गरीब मुलाला रस्त्याकडेहून म्हातारी उचलते आणि तिच्या प्रेमाच्या वर्षावाखाली तो मोठेपणी डायरेक्ट अमिताभ बच्चनच होतो अशा "संस्कारात" आम्ही वाढत असल्याने मी काही काळ खूश होतो. पण या निरुपा रॉय-सत्येन कप्पू जोडीने मला प्रेम सोडून बाकी सगळे द्यायचा निश्चय केला होता.

प्रोत्साहन न देता सदाशिव पेठकरांचे वागणे याबद्दल प्रबंध लिहून झालेले आहेत तर माझ्या बाबतीत तर सर्वाना वाटेल ते करायची पूर्ण मुभा होती तेव्हा माझे हाल विचारू नका. किराणा मालाचा दुकानदार देखील मला हाक मारून "जरा हिशेब लिहायला ये" असे खुशाल सांगत असे.

>>>>> Biggrin Biggrin Biggrin

पु.ले.शु.

छानच लिहीलय. खुस्खुशीत..
विशेषतः गर्लफ्रेंडला पत्र हा चांगला पंच आहे. पुढच्या वेळी पंचेस वाढवा.. तुम्ही एक चांगले विनोदी लेखक आहात. लिहीत रहा.

>> परीक्षावेळी माझा ' सगळे आधीच पुस्तकात लिहीले असताना पुन्हा पेपरात कशाला लिहायचे ' हा युक्तिवाद असे.
Lol
मजेशीर लिहिलंय.

@रूनी पॉटर,
सदशिव पेठ प्रत्येक गावी असायला हवी असे माझे ठाम मत आहे..... Happy
धन्यवाद मामी, @अनिल, नक्कीच प्रयत्न करेन आणखी चांगले लिहायचा.
रैना, श्री, दिनेशदा.......खूप खूप धन्यवाद.
अरुन्धती, बराचसा काळ सपे मध्ये राहिलो आहे. लेख मात्र ९९% काल्पनिक आहे. Happy

काही काही विनोद आवडले.
>>>पण या निरुपा रॉय-सत्येन कप्पू जोडीने मला प्रेम सोडून बाकी सगळे द्यायचा निश्चय केला होता. >>> Biggrin

Pages