दवा-दारू

Submitted by ठमादेवी on 20 January, 2011 - 03:49

दवा-दारू
‘रोग परवडला पण डॉक्टर आवर’ असं म्हणण्याची वेळ तुमच्यावर कधी आलीय? फिल्ममधल्या नायकांना, प्रेमभंग झालेल्यांना दारूच दवा वाटते. पण दव्याने दारूचं रूप घेऊन झिंग येणारी मी पहिलीच असावे. अशाच एका दवा-दारूचा अनुभव मी अलीकडेच घेतला.
झालं असं, दोन-अडीच वर्षापूर्वी मला रूमाटाइड आर्थरायटिसचा (आमवात) अ‍ॅटॅक आला. सुरुवातीला काही लक्षात आलं नाही पण महिन्याभरातच त्याने गंभीर रूप धारण केलं आणि मी जवळपास अंथरूणच धरलं. ऑफिसला जायचे पण एका दिवसात तीन-तीन पेनकिलर्स घ्याव्या लागायच्या. या आजारात तुमच्या सर्व सांध्यांमध्ये सूज येते, ते गरम होतात आणि तुम्ही जरा जरी हालचाल केलीत तरी असह्य वेदना होतात. माणूस मरत नाही पण वेळेत नीट आणि योग्य उपचार घेतले नाहीत तर आयुष्यभर अंथरूणाला खिळून राहतो नाहीतर मग हातपाय वाकडे होतात, गुडघे कायमस्वरूपी बाद होतात. यावर मी अनेक उपचार घेतले आणि त्यातला सर्वाधिक भर आयुर्वेदावर होता. योग्य रितीने घेतलेल्या उपचारांचा फायदा होऊन आता तो बरा झाला आहे. पण आजार होता तेव्हा मला अंथरूणावरून उठवून बसवायला आईचा आधार लागायचा, एरवी जे अंतर मी 5 मिनिटांत चालून जायचे तिथे 20 मिनिटं लागायची. वेदना चेहर्‍यावर दिसायच्या.
आर्थरायटिस ऐन भरात असताना माझ्या एका उच्चपदस्थ नातेवाइकांनी माझ्या वडिलांना सल्ला दिला तो एका वैदूकडे जाण्याचा. महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर खिळेगाव नावाचं एक देवस्थान आहे. त्यापासून दोन किलोमीटर अंतरावर पांडेगाव नावाचं एक खेडं आहे. त्या खेड्यात हा वैदू त्याच्या आजोबांच्या पिढीपासून झाडपाल्याचं औषध द्यायचा. पण त्याच्या औषधाने दारूची नशा काय चढेल, असली नशा चढायची. त्याचं औषधं घेऊन धिंगाणा घालणार्‍यांचे बरेच किस्सेही मला त्यावेळी सांगितलं. जयसिंगपूरच्या आमच्या घरापासून त्याचं गाव 80 किमी होतं. माझी इच्छा नव्हती पण वडिलांनी आग्रह धरून जायला लावलं.
झालं, जयसिंगपूरच्या घरात एक कार्यक्रम होता. तो झाल्यावर दुसर्‍या दिवशी माझ्या दोन चुलतबहिणी, माझे एक काका (औषध घेतल्यावर मला झिंग आली आणि मी ताब्यातून सुटले तर काय म्हणून) आणि मी अशी वरात पांडेगावला गेली. पांडेगावच्या वाटेवर यातल्या एका बहिणीचं सासर. तिला सोडून पुढे गेलो. सकाळी नऊच्या आधी त्याने यायला सांगितलं होतं आणि तेही उपाशीपोटीच, आंघोळ न करता. आम्ही जाऊन बसलो. तेवढ्यात तो शेतातून आला आणि त्याने माजघरात जाऊन बरीच कुटाकूट केली. तासाभराने एक फुलपात्र भरून काहीतरी घेऊन समोर येऊन बसला. म्हणाला, ‘तुला म्हाइती हाय नव्हं? औषध घ्या. पन दिवसभर काय खायचं न्हाय. संध्याकाळी आंघोळ करायची आणि तूपभात खायचा. रात्रीबी काय खायचं न्हाय. लईच खुळ्यागत कराय लागली तर तिला सरळ नळाखाली धरून उबं करा.’ ताईने बरं म्हटलं. मग म्हणाला, ‘पूर्वेकडे तोंड करून बस. तुज्या देवाचं नाव घे आणि एका घोटात हे पिऊन टाक.’ मी समोरच्या खुर्चीवर बसले आणि आजूबाजूला औषध घेण्यासाठी आलेल्या, माझ्याकडे कापायला आणलेल्या बकर्‍याकडे बघतात तसं बघणार्‍या इतर लोकांकडे कावर्‍याबावर्‍या नजरेने बघत आईची आठवण काढली आणि ते पिऊन टाकलं. अत्यंत थंडगार आणि गिळगिळीत. त्याच्या बायकोने माझ्याकडे बघत ‘धाडसाची गं बाय’ म्हणत कानशिलावर बोटं मोडली.
मग त्याने पाण्याची बाटली दिली. म्हणाला, ‘साधारणपणे अध्र्या तासाने त्याची नशा होईल. जितकी नशा जास्त तितकं औषध प्रभावी. पण पाणी प्यायचं नाही. फक्त चुळा भरायच्या. पुढच्या आठवड्यात परत या. असे चार आठवडे या.’ तिथून बाहेर पडलो. गाडीतून निघालो. खिळापूरला थांबल्यावर ताई मला दर्शनाला घेऊन निघाली. पण अर्ध्या तासानंतरची झिंग मला दहाच मिनिटात चढू लागली होती. मी जायला नकार दिला आणि गाडीत डोकं ठेवून बसून राहिले. (हे मात्र मी आधीच ठरवलं होतं. नशा चढू लागली की सरळ डोळे मिटायचे आणि झोपायचं. नाहीतर मी नेमकं काय काय बडबडले असते ते देवच जाणे! उगाच काहीतरी बोलून जायचो आणि काका-मामांना निमित्त मिळायचं गॉसिपला! )
गाडी पुन्हा सुरू झाली. मला काहीच शुद्ध नव्हती काय चाललं आहे त्याची. वाटेत ज्या बहिणीला सोडून गेलो होतो तिच्या घरी गेलो. आपल्याला काही अवयव आहेत आणि ते हलू शकतात याची जाणीवच नव्हती. आपण कुठे आहोत, काय करतो आहोत, कशासाठी चाललो आहोत हेही कळत नव्हतं. म्हणजे माणसं कोण आहेत हे कळत होतं पण बाकीचं भान नव्हतं. आपल्याच बायकोला ‘बहनजी’ म्हणण्याइतकी वेळ आली नव्हती. काका आणि ताईच्या सासूने मला धरून बाहेर काढलं आणि घरात नेऊन झोपवलं. झोप लागली नव्हती पण नशा काम करतच होती. कुशीवर होतानाही मला उंचावरून कुणीतरी खाली टाकतंय आणि आपण निर्वात पोकळीत पडतोय, असं वाटत होतं. झोपेत मी कुणालातरी शिवीगाळ केली, असं ताईने नंतर सांगितलं.
संध्याकाळ झाली तशी मला उठवलं गेलं. ताईच्या सासूनेच नेऊन आंघोळ घातली कारण मला तांब्याच धरवत नव्हता. त्याही वेळी मला आपण जयसिंगपूरच्या घरी आहोत असं वाटत होतं आणि मी ताईला ‘अगं स्वयंपाकघरात अमुक ठिकाणी अमुक ठेवलंय’ असं सांगत होते. तूपभात खातानाही हात मोठ्या कष्टाने मी तोंडापर्यंत नेऊ शकत होते. मग थोडी तरतरी आली आणि आम्ही पुन्हा गाडीत बसलो. (यावेळी मला जास्त आधाराची गरज पडली नाही.) घरी आलो आणि मी पुन्हा झोपले. दुसर्‍या दिवशी सकाळीही मला नशा जाणवतच होती. आदल्या दिवशी काही महत्त्वाचे फोन येऊन गेले होते. पण ते पाहायची शुद्ध होती कुणाला? त्यांना एसएमएस टायपायला घेतले तर अक्षरं दोन दोन दिसू लागली! त्याच दिवशी मुंबईला निघाले पण गाडी जरा हलली तरी मला आकाशात उडल्यासारखं वाटत होतं. तिसर्‍या दिवशी त्याची नशा पूर्ण उतरली पण नंतरचे चार-पाच दिवस मला अंगात बारीक कणकण असल्यासारखं वाटायचं, थकवा जाणवायचा. मग लक्षात आलं की ही सगळी धत्तुर्‍याच्या नशेची लक्षणं आहेत.
दोन-तीन दिवसांनी माझ्या वहिनीचा फोन आला. ‘अगं तू नशेत काय काय बडबडलीस? सगळ्यांनी इथे कहर केलाय. तुझ्याबद्दल काहीबाही बोलताहेत! ’ मला जामच आठवेना. मग शेवटी मी कपाळावर हात मारला. माझ्या काही डॉक्टरांना नंतरच्या वेळी माझ्यासोबत यायचं होतं. एका मित्राला हे औषध दारू म्हणून विकायचं होतं. पण मी काही तिकडे पुन्हा फिरकले नाही. त्यांच्या मनातले मांडे तसेच राहिलेत.

गुलमोहर: 

मस्त अनुभव आहे ठमादेवी. पण हे भयंकर पण आहेच कि? आणखी जास्त नशा झाली असती तर? Uhoh

अश्याच प्रकारचा पण काहीसा वेगळा अनुभव भोर जवळ एका छोट्याश्या गावात आला. तिथे एक बाबा आहेत ते हाडं मोडलेली असेल, सांधेवाताचा त्रास असेल तर बरं करतात. अगदी प्लॅस्टर असणारा माणूस त्यांच्याकडे जाऊन आला कि प्लॅस्टर काढून घरी जातो. एकदा माझ्या मित्राचा पाय खुब्यातून निसटला तेव्हा त्याला पुर्ण प्लॅस्टर होतं. तरूण वयात आंथरुणाला खिळून असल्याने त्याला लाज वाटायला लागली. मग हे ठिकाण अन हा ईलाज सुचवला. गेलो आम्ही त्या बाबाकडे. बाबाने एखादी भाता हलवावा तसा त्याचा पाय वर खाली हलवला. त्याला वेदना होत होत्या भरपूर. थोडा वेळ सहन कर असं तो सारखा सांगत होता. आमचा मित्र बोंबलतोय हे आम्हालाही वाईट वाटत होतं. त्याने थोडावेळ तो पाय हलवून कट्टकन हाड मोडावं तसा आवाज आला आम्हाला वाटलं झालं काम आता पाय तुटला. मग त्याने त्याच्या पायाला एक विशिष्ट ( कोंबडीचं अंड अन शेंदुर ) मिक्स करून केलेला लेप लावला त्यावर घट्ट कापूस, एक सुती कापडाने पाय घट्ट बांधून घेतला. नंतर त्याने त्याला बांबुच्या काट्यांचे काप करून आधार म्हणून मांडीपासून पोटर्‍यांपर्यंत तो पाय घट्ट बांधला अन म्हणाला. पुढच्या आठवड्यात थोडसं लंघशील मग तुझा पाय एकदम व्यवस्थीत होईल. अन आश्चर्य म्हणजे खरोखर त्याचा पाय आता व्यवस्थीत झाला. पण कधीही तो भेटला तर बोलतो. पाय तुटला तरी चालेल पण त्या बाबाकडून इलाज करून घेणार नाही. मायचा.. त्याला काय दया बिया आहे कि नाही?

नाखु, हो अरे हाडवैद्य असंच करतात... पूर्वीच्या काळी आणि आताही खेडोपाड्यात असे सापडतात लोक... मला एका खूप मोठ्या आयुर्वेदिक डॉक्टरने (हा डॉक्टर नंतर राज्याचा आयुर्वेद संचालक झाला) सांगितलं होतं- वाड्याजवळच्या आदिवासी पाड्यांमधले आदिवासी आमवातावर मधमाशीच्या विषाचा उपयोग करतात... एका विशिष्ट प्रमाणात आणि ठराविक काळाने ते शरीरात टोचलं तर आमवात बरा होतो असं ते म्हणाले...

डॉक्टर anesthesiachप्रमाण किती असावे? त्यांनंतर पेशंट साधारण किती वेळात शुद्धीवर येईल? याची सगळी गणितं मांडूनच एखादं ऑपरेशन करतो. पण इथे पहिल गपगुमान घ्या मग बाकीच बघू. शेवटी स्वतःच्या रिस्कवर बरं व्हा. असंच आहे हे. प्रत्येक जिल्ह्यात असे हाडवैद्य, दारू सोडवणारे आणि इतर बर्‍याच व्याधींचे इलाज करणारे आहेत.

बापरे ! धोत्र्याचं विष RA वर?

>>> बहुधा वापरत असावेत... पण डॉक्टर्स ते प्रमाण ठरवून देतात...
जागू- मला फरक पडला. पण त्याने पडला की नाही हे सांगू शकणार नाही... तब्बल तीन वर्षांनी माझी थंडी वेदनांशिवाय आहे... मी आयुर्वेदिक, अ‍ॅक्युपंक्चर, पंचकर्म आणि शेवटच्या टप्पात (जिथे प्रतिकारशक्ती वाढवण्याची गरज होती) अ‍ॅलोपॅथिक औषधं घेतली... तीन वर्षं... आर्थरायटिसच्या औषधांची मास्टर झालेय मी आता!!!

त्यावेळेस कुठली गाणी सुचली असेल .. "झूम बराबर .. झूम " आणि झिंग उतरल्यावर "तेरे गलियों मे ना रखेंगे कदम" होय ना? Biggrin

मला काहीच आठवत नव्हतं... राहून राहून प्रश्न पडायचा... ये कहां आ गये हम? मैं कहां हूं? Biggrin

ठमे,तू जे घेतलंस ते धोतर्‍याचं चूर्ण होतं..... आणि जे तुला झालं त्याला बेलाडोना किंवा अ‍ॅट्रोपिन सायकोसिस असं म्हणतात. नशीब काही वाईट झालं नाही..... कारण बेलाडोना ने जीव सुद्धा जावू शकतो.

मी बर्‍याचदा अस्थम्यावर हैद्राबादच्या मासळी औषधाची जाहिरात पाहिली आहे..... जिथे मासळीत मिसळून स्टीरॉईड दिलं जातं....

एचआयव्ही/ कॅन्सर पूर्णपणे बरा करण्याचा दावा करणारे असे असंख्य छद्मवैद्य ( क्वॅक्स) अस्तित्वात आहेत.

अलीकडेच तथाकथित सायंटीस्ट मुनीर खान याचं ''बॉडी रिव्हायवल'' हे बोगस औषध अन त्या औषधाने फसलेले लाखो लोक याचं ताजं उदाहरण आहेत.

ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म.... Sad

बाप्रे..कोमल..काटे आले अंगावर.. वाचतांनाच हे हाल्..तुझं काय झालं असेल..
तुझा अर्थरायटिस वर काही परिणाम झाला का???

RA हा भयाण प्रकार असतो. कमी काउंट आला असेल तर कंट्रोलमधे ठेवता येणं शक्य असतं पण मुळातच काउंट प्रचंड असेल तर सांधेदुखी, एक्स्ट्रीमिटीज ना वाकडेपणा येणे, हालचालींना त्रास, प्रतिकारशक्ती कमी होणे, स्नायूंची लवचिकता कमी होणे हे सगळं होतं.
त्यातून हार्ट डायलेट होणे, पल्मनरी माल्फक्शन कीम्वा पल्मनरी हायपरटेन्शन, पोटात पाणी होणे अश्या अनेक गोष्टी होऊ शकतात.
सगळा खेळ मूळ RA चा असतो पण औषधयोजना केवळ कारण व परिणाम या प्रकारातली करावी लागते कारण एकदा RA ने आपले काम केल्यावर काउंट खाली आला तरी झालेले दुष्परीणाम रिव्हर्सिबल नसतात.
मी हे सगळं माझ्या घरात बघितलंय. ते सगळं भयंकर असतं. व्यक्ती अक्षरशः झिजत असते. मुळात डिटेक्ट होतानाच १०००+ ला काउंट आल्यापासून साधारण १० वर्षांची लढाई मी बघितलीये. शेवटची ३-४ वर्ष खूपच वाईट होती.

घाबरवण्याचा हेतू नाही पण वेळीच काळजी घेणे आणि काउंट वाढू न देणे. आहारातील बदलांनी काही प्रमाणात वेदना आटोक्यात यायला मदत होते हे मी तरी पाह्यलेय.

माझा आयूर्वेदावर ठाम विश्वास आहे, पण त्याचा असा गैरफायदा घेणारे पण अधिक. खरेच रोग परवडला पण औषध नको असा प्रकार होता हा.
त्या औषधाचा नमुना आणला, आणि तो तपासून घेतला, तर त्याच्यावर केस करता येईल.

त्या औषधाचा नमुना आणला, आणि तो तपासून घेतला, तर त्याच्यावर केस करता येईल.>>

म्हणून तर तिथल्या तिथे प्यायला लावतात. Wink

दिनेशदा, अश्या किती केस आपण करणार? अन केस करावं हे आपलं मत असतं फक्त. तिथे येणारे दुसरी लोकं ह्याला प्रतिकार करतात. हेच तर दुर्दैव आहे.

त्या औषधाचा नमुना आणला, आणि तो तपासून घेतला, तर त्याच्यावर केस करता येईल.>>>>

दिनेशदा..... औषध तपासणे वगैरे दूर राहिले..... असा व्यवसाय त्याला करताच येत नाही... त्याबद्दल तो दोषी ठरु शकतो....

बापरे. काय अनुभव आहे! उगाच काही झालं असतं तर??? अ‍ॅलो नको असेल तर होमिओपाथी, आयुर्वेदिक वगैरे करावं ग.. उगाच कोणा वैदुच्या मागे जाण्यात काय अर्थ आहे? आता बरं आहे हे ऐकून बरं वाटलं.

बापरे, धत्तुर्‍याची नशा? हे पहिल्यांदाच ऐकलं मी.
आर्थरायटीसचा त्रास हल्ली पहिल्यांदाच जवळून बघण्यात आला. जवळच्या मैत्रिणीला खूप होतो आहे सध्या. पण स्वतः डॉक्टर असून स्पेशालिस्टकडे न जाता पेन किलर्सवर भागवतेय.

तुम्हांला बरं वाटतंय हे चांगलंय.

<<मी बर्‍याचदा अस्थम्यावर हैद्राबादच्या मासळी औषधाची जाहिरात पाहिली आहे..... जिथे मासळीत मिसळून स्टीरॉईड दिलं जातं.... <<
माझ्या आईने घेतलेलं एकदा...! Sad
पण ते दरवर्षी बोलावतात.... कोजागिरीला! त्यातही गोची अशी आहे की ओरीजिनल माणुस वेगळाच आहे.... हे दुसरे भोंदु वैद्यच जास्त जाहिरात करतात.

बापरे फारच विचीत्र अनुभव ..
तुम्हाला आता बरे आहे .. वाचुन चांगले वाटले..
भोर चे ते बाबा माहितीतले आहेत.. अगदी १००% खात्रीशीर ईलाज करतात..
आमच्या माहीतीतील २ डायबेटीज पेशंटस ला पुर्णपणे बरे केले..
तसे आमच्या एका फॅमीली फ्रेंड ला स्पाँडीलायसीस चा त्रास होता. तो पण पुर्ण पणे बरा केला आहे..

आणखी एक विचीत्र गोष्ट त्यांच्या कडे झालेली ऐकण्यात आली..
पॅरेलीसीस झालेला एक पेशंट त्यांच्या कडे गेला होता..
त्यांनी त्याची नाडी तपासुन विचारले.. तुमच्या आई आणी वडीलांची नाड एकच असायला पाहीजे..
(जे की एकदम खरेच निघाले)..
त्यांनी सांगितले ह्या केस मधे कुठेपण जा ह्यांचा रोग बरा होत नाही.. (तेच खरे ठरले आहे)
आता सगळ्यात महत्वाचे.. ते १ रु. सुध्दा तपासणी फीस घेत नाही.. फक्त औषधांचे पैशे आणि सेवादान्(जर शक्य असेल तर)..

नीधप अगं मला आर ए काऊंट आता लक्षात नाही पण माझी ईएसआर लेव्हल खूप जास्त होती. पण मी नीट उपचार घेतल्यावर आता तो पूर्ण बरा झाला आहे. टचवुड... बाकी सध्या खाणंपिणं योग्य आणि नीट व्यायाम यांनी तो पुन्हा कधीच माझ्या वाटेला जाणार नाही...
मला अनेक डॉक्टरांनी भीती घातली होती की तो आता तुझा आयुष्यभराचा सोबती झाला...पण तो का आला याची कारणं मी शोधून काढली आणि त्यावर उपाय केला... मानसिक, शारिरीक आणि भावनिक... खूप पेशन्स ठेवावे लागले... आणि डॉक्टरांवर विश्वास, स्वतःवर विश्वास यामुळे मी त्याच्याविरोधातली लढाई जिंकले आहे... आता मला कुणी भेटेल तर विश्वासही ठेवणार नाही की मला हा आजार झाला होता... आपल्याकडे लोक पथ्य करायला तयार नसतात, जास्त काळ उपचार घेण्याची तयारी नसते त्यामुळे ते आजाराला शरण जाताना दिसतात... पण केवळ इच्छाशक्तीच्या बळावर तुम्ही जगाशी लढू शकता आणि त्यातून बाहेर येऊ शकता...

Pages