निसर्ग गटग ! @ जिजामाता उद्यान

Submitted by Yo.Rocks on 13 January, 2011 - 05:35

राणीचा बाग(जिजामाता उद्यान), निसर्गाच्या गप्पा ठोकणारे मायबोलीकर नि वनस्पतींचा डेटाबेस असलेले "अवघी विठाई माझी" फेम दिनेशदा या सर्वांचा मिलाफ होणार असेल तर जायलाच हवे म्हणत नेहमीप्रमाणे ऐनवेळी म्हणजे रविवारी सकाळी या निसर्ग गटगला जाण्याचे ठरवले..

जिप्सीला फोन केला तर दादर सोडले होते.. इथे मी नुकतेच बोरिवली स्टेशन गाठत होतो.. Proud "मी येतो.. तुमचा कार्यक्रम सुरु करा " म्हणत निघालो.. भायखळा स्टेशन इंद्राला दूर नाही म्हणून वाटेत त्याला मोबाईल ट्राय केला.. पण साहेबांचा फोन उचलला जात नव्हता.. म्हटले झोपला असेल.. मी ठरलेल्या वेळेच्या बरोबर दिडेक तासांनी उशीराने भायखळाच्या राणीच्या बागेत पोहोचलो.. Proud

रविवार असल्याने अपेक्षित गर्दी होतीच.. पण राणीच्या बागेच्या विस्तारामुळे तेवढे जाणवत नव्हते.. खरे तर भरपुर प्राणी बघायला मिळतील अश्या मोठ्या आशेने आलेला पब्लिक इथे रिकामेच पिंजरे जास्त आहेत बघून वैतागतो हे एक जळजळीत सत्य..

मी मायबोलीकरांच्या घोळक्याला गाठले तर सगळे अवतीभोवती असणार्‍या झाडांना टकामका बघत होते.. घोळका म्हणावा तसा मोठाच होता.. दिनेशदा, साधना, तिचा भाउ व वहिनी, जागू एन्ड फॅमिली, हसरी, विजय, जिप्सी अन मी..दिनेशदांना प्रत्यक्षात भेटायला मिळाल्याने आनंदच झाला.. वाटले होते मला उशीर झाल्याने बरेच काहि मिस झाले असेल.. पण निसर्गओळखीच्या कार्यक्रमाला नुकतीच सुरवात झाली होती..

ग्रुपला अर्थातच दिनेशदा लिड करत होते.. त्यांच्याखालोखाल साधना, जागू नि मायबोलीवर दोनतीन दिवसापुर्वीच जॉइंड झालेले विजय हेदेखिल तसे तज्ञ होतेच.. विजय आणि जिप्सीकडे असलेल्या वह्या पाहून बरे वाटले.. त्यामुळे लक्षात न राहणारी नावं कळणार होती.. प्रत्येकजण इथे ना तिथे काही दिसतेय का बघत होते.. मी बापड्या आपला फक्त ऐकायचे, पहायचे, फोटो काढायचे नि वाटले तर अधूनमधून हे कुठले ते कुठले असे विचारायचे एवढच करत होतो.. या दिग्गजांपुढे तर आपण अडाणी होतो नि त्यात ती अवजड नावं लक्षात ठेवणे हे माझ्यादृष्टीने लै अवघड काम !

असे पुढेच दिनेशदांनी एका झाडाकडे नेले नि नविन पालवी दाखवू लागले.. सुक्या पाचोळ्याप्रमाणे जे मला वाटत होते ती पालवी होती !! नि मस्तपैंकी कोंबातून फुटून ती पालवी बाहेर येते... या झाडाचे नाव ब्राउनिया !!

.....

-----------------------

पुढे एक लाल रंगाची म्हातारी दिसली.. जिचे नाव होते पाउडरपफ !! अश्याच प्रकारचे फूल जे लांबट आकारात आढाळते त्याला बॉटलब्रश म्हणतात !! अर्थात ही माहिती जिप्सीकडून कळली तेव्हा जिप्सी पण आता मास्तर बनतोय याची जाणीव झाली.. Wink

आमचे फुलझाडे निरीक्षण सुरु असतानाच दिनेशदांना ठमादेवीचा फोन आला नि मग त्यांना आणायला जिप्सी आणि मी दिनेशदांबरोबर उद्यानाच्या गेटजवळ गेलो.. वाटेत दिनेशदांनी खालील अजाणत्या फळांचा फोटो काढायला सांगितला.. हिरव्या फळातून फुटून बाहेर पडणारी लाल छोटी फळे मस्तच वाटत होते बघायला..

आम्ही उद्यानाच्या गेटजवळ पोहोचलो पण ठमादेवींना ओळखायचे कसे हा प्रश्ण होता.. पण गेटजवळ एका बाजूस उभ्या असणार्‍या ह्याच ठमादेवी हा आमचा अंदाज खरा ठरला नि आम्ही घोळक्याच्या दिशेने जाउ लागलो..

वाटेत दिसलेले लसुण वेलीचे झाड.. त्याला लागलेल्या कळ्या अतिशय सुंदर..

मला झाडंफुलांची आवड जरी असली तरी पशुपक्षी जास्त प्रिय.. त्यातपण स्वातंत्र्य उपभोगणारे पक्षीप्राणी बघण्यात जास्त मजा.. अशीच माझी नजर ह्या पोपट महाशयांवर गेली..

ढोलीत मस्तपैंकी विराजमान झालेल्या या पोपटाला (पॅराकिट) बघून ज्याम खुष झालो.. असे दृश्य पहिल्यांदाच बघत होतो.. शक्य तितका झूम करुन कसाबसा फोटो घेतला..

आमच्यातला प्रत्येकजण इथे ना तिथे झाडाझुडुपांत काहि वेगळेपण दिसतेय का बघत होते..फोटो टिपत होते.. तर एकीकडे आपल्या तल्लख स्मरणशक्तिच्या जोरावर कुठल्यातरी कोपर्‍यात कुठले तरी असलेले झाड बघायचेय असा दिनेशदांचा विचार चालू होता..

लवकरच भटकंतीमध्ये एक ब्रेक घेण्यात आला.. पेटपुजेचा कार्यक्रम उरकण्यात आला.. एव्हाना आतापर्यंत उद्यानातील खेळ भरपुर खेळून आलेली ज्युनिअर जागू पण हजर झाली.. पेटपुजेचा महत्त्वाचा भाग म्हणजे 'जागू पेशल हलवा' नि 'साधना पेशल पराठे' ! नि हो दिनेशदांनी केनियाहून आणलेल्या माकडमिया नटस !! Proud चव अगदी खारे काजुसारखीच..पेटपुजा आटपताना इंद्राचा फोन आला.. 'नुकताच क्रिकेट खेळून आलोय तेव्हा येतो दहा पंधरा मिनीटात 'असे म्हणत त्याने फोन ठेवला..

आम्ही पुढे निघालो.. दोघातिघांकडे कॅमेरा, हातात वहीपुस्तक नि सार्‍यांच्या नजरा वरती झाडावर नाहीतर आजुबाजूच्या झुडूपांवर.. त्यामुळे साहाजिकच आतापर्यंत "काहि दिसतेय का..." या कुतूहलाची सवय झालेला त्रस्त पब्लिक आमच्याभोवती जमा होत होता.. "पिंजर्‍यात नाही निदान इथे तरी काहितरी दिसेल .' या कुतूहलाने ते आमच्य भरवश्यावर झाडाझुडूपांत डोकावू लागले.. Proud (जला यम टिव्ही बकरा बनवण्यासाठी मस्त आयडिया :D)... या निसर्गनिरीक्षणाच्या गडबडी-गोंधळात 'हसरी' कधी टाटा करुन गेली ते कळलेच नाही..

पुढे दिनेशदा अत्यंत दुर्मित जातीपैंकी एक असलेल्या झाडापाशी घेउन गेले.. त्या झाडाचे नाव 'उर्वशी' ! नावाइतकेच सुंदर झाड नि फुले !

....

........

.........

खरच प्रेमात पडावे अशी ही उर्वशी ! आमचे नशिब होते की आम्ही अगदी योग्य म्हणजेच फुले बहरण्याच्या काळात इथे आलो होतो..

तिथेच पुढे सिताअशोकाचे बहरलेले झाड होते.. माझ्या दृष्टीने नाही म्हटले तरी बरीच ज्ञानात भर पडत होती..
दिनेशदांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ह्या उद्यानात अशा बर्‍याच दुर्मिळ जातींची झाडे आहेत..

कृष्णवड वृक्ष - ह्या झाडाची पाने मुळात द्रोणासारखी असतात.. याच पानाच्या द्रोणातून कृष्णाला दही दिले होते म्हणून हा वृक्ष कृष्णवड म्हणून ओळखला जातो..

.........

- -- - - - - - -- -
चेंडुफुले नावाची फुले तर झाडावर अगदी सजावट केल्यासारखी भासत होती..

चेंडुफुलांचे दर्शन घेतल्यावर मग काही कामानिमित्त ठमादेवींनी आमच निरोप घेतला.. जाते जाते म्हणत थांबतच होत्या.. Proud

करमळ लागलेले झाड -

या झाडांबद्दल दिनेशदांकडून कळले की अत्यंत मोठी फुले येतात.. महाराष्ट्रातील मोठ्या आकाराच्या फुलांपैंकी एक झाड.. ही फुले खाल्ली जातात.. फुलेच काय तर फोटोत दिसत असलेली फळे खाउ शकतो.. गुरांनादेखिल खायला दिली जातात.. माझा आणि साधनाचा विचार होता चव चाखण्याचा.. पण फळे काढ्णे कठीण नि त्यात पहारेकर्‍यांच्या नजरेत गुन्हा होता सो बघण्यातच समाधान Happy

असेच एक विशेष झाड पाहिले ते म्हणजे कोकोचे झाड.. चॉकलेटमध्ये वापरले जाणारा कोको..

या झाडाला लागणारी फुलेदेखील सुंदर दिसतात..

आमचे इथे बघणे, फोटो काढणे सुरु असतानाच इंद्रा आमच्या घोळक्यात सामिल झाला.. एकंदर फार मजा येत होती सारे काही अनुभवताना... पाहताना..


(इंद्राने मग माझ्या कॅमेर्‍यावर हात साफ करुन घेतला त्यातील हा एक सुंदर नमुना)

आम्ही पुढे जिथे शेवाळग्रस्त तळ्यात मगर आहेत त्या परिसरात आलो.. मगर नेहमीप्रमाणे पाण्यात दडून बसल्याने काही दिसल्या नाहीत.. पण हे मुनी ध्यान लावून बसले होते..

........
याच तळ्याच्या एका बाजूस फुलांनी बहरलेला वृक्ष लक्ष वेधून घेत होता.. त्याचे नाव.. निवरीचे झाड

इथेच एका उंच झाडावरती घारीने एक पोझ दिली होती.. पुन्हा एकदा शक्य तितका झूम वापरून फोटो टिपण्याचा प्रयत्न बर्‍यापैंकी यशस्वी झाला..

इकडूनच मग संपूर्ण उद्यानाला प्रदक्षिणा घालत आम्ही अंतिम टोकाजवळ आलो जिथे पक्ष्यांचा मोठा पिंजरा आहे ज्यात फ्लेमिंगोसारख्या मोठ्या आकाराचे विविध पक्षी आहेत.. माझ्यामते राणीच्या बागेचे सध्या तरी हेच खरे आकर्षण आहे.. त्यातील मी टिपलेल्या काही मुद्रा..

(अनोखी बैठक !!)
- - - - - - -

(पाण्यातले प्रतिबिंब पाहताना..)
- - - - - - -

(यांच्या पंखांची फडफड ऐकण्यासारखी असते..)
- - - - -- -

(राजहंस )
- - - - --
मी क्षणभर विश्रांती घेतली नि इंद्राने मग माझ्या कॅमेर्‍याचा ताबा घेतला.. खालील मुद्रा इंद्राने टिपल्या आहेत..


(हा दिनेशदांच्या केनियाचा राष्ट्रीय पक्षी..lilac-breasted roller.. आपल्या राष्ट्रीय पक्षीसारखाच देखणा )
- - - - - --

(एका पायावर उभे राहून इंद्राला खुणावताना.. Wink )

-------------------------------------

फोटोसेशन काही थांबणार नव्हते पण माझ्या कॅमेर्‍याचे सेल आजारी पडू लागले तेव्हा आटपण्यात आले.. Proud इथेच जागू अँड फॅमिलीने आम्हाला अलविदा केले.. नि मग आम्ही पुन्हा उद्यानाच्या आत पुष्करणी तलावापाशी गेलो.. जिप्सीला फुललेली कमळं टिपायची होती. पण त्यांचा मुड नव्हता ! मी आपला तिथे गुलाबी रंगाची कचनार पहायला मिळाल्याने खुष झालो.. हा परिसर पण मस्तच आहे..

इथूनच उद्यानात दिनेशदांनी एक झाड दाखवले.. नशिबाने त्याला सुंदर फुलही आले होते..

- - ----
इथेच एक उलगडा न झालेले झाडही नजरेस पडले..

(ह्यांच्या फळांचा आकार वैशिष्ट्यपुर्ण असाच होता..)
-- - - - - -

आमची संपुर्ण भटकंती होउन उद्यानाच्या बाहेर पडेपर्यंत संध्याकाळचे चार वाजत आले होते.. इथूनच पुढे जिप्सी, इंद्रा आणि मी आम्ही तिघांनी हँगिंग गार्डनला फिरुन येण्याचे ठरवले.. पण दिनेशदांनी एकत्रित जेवण घेण्याचा चंग बांधला नि सर्वांनुमते गिरगाव चौपाटीला न्यु यॉर्कर हॉटेलात मस्त व्हेज जेवण घेण्यात आले.. जेवण येण्यापुर्वी कोडी सोडवण्याचे सेशन खूप धमाल होते.. Lol त्यात जिप्सीचे फोटोसेशन.. Proud जेवल्यानंतर मग थंडगार कुल्फी खात आमचा कार्यक्रम संध्याकाळी ५.३० च्या सुमारास आटपला.. !!!!

मग वेळ झाली निरोपाची.. दिनेशदांनी आपल्यासोबत आणलेल्या खाद्यवस्तू नि रोपटे यांचे वाटप केले.. दिनेशदांना पुढच्यावेळी वेळ काढून या म्हणजे एक मस्त ट्रेकही करु अशी विनंती केली.. आता बघूया कधी जमवताहेत.. सर्वांनी मग एकमेकांना अलविदा करत आपली वाट धरली.. तर आम्ही तिघे हँगिंग गार्डनकडे कूच केले..

एकंदर आजचा दिवस एका अनोख्या गटगसाठी नक्कीच लक्षात राहील... ज्याला निसर्गाशी आवड आहे तो रमलाच समजा.. दिवसभरात काहितरी नविन ऐकायला, पहायला मिळाले याचा आनंद जास्त झाला.. तेव्हा पुढील काळात निसर्गप्रेमींनी एकत्र येउन असे अनेक निसर्ग गटग करावेत ही सदीच्छा.. Happy

ह्याच गटगचा आणखीन एक पण अगदी माहितीपुर्ण वृत्तांत इथेही पाहता येइल.. Happy
राणीबागेत एक दिवस - वनस्पतीतज्ज्ञासोबत

गुलमोहर: 

_/\_

सगळेच फोटो एकदम खासच!!!!! Happy
आणि वृतांत नेहमीप्रमाणे खुसखुशीत

अश्याच प्रकारचे फूल जे लांबट आकारात आढाळते त्याला वॉटरब्रश म्हणतात>>>>रच्याकने, ते वॉटरब्रश नसुन बॉटलब्रश आहे रे Happy

व्वा.. यो..रॉकिंग वृ. आणी सुंदर,हटके फोटोज.. वावा..मजा आली वाचून आणी फोटो बघून.. ढोलीतून डोकावणारा पोपट तर खूपच गोड आलाय.. कृष्णवड,उर्वशी..एक्दम खास्..खास!!!
फीलिंग जे जे जे Lol

सोल्लीड लिहिलेस यार..

जल्ला पक्षी सुंदर होतेच पण तुझ्या कॅमे-यात अजुन सुंदर दिसायला लागले. तो पाय दुमडुन बसलेला आणि इंग्रजी ४ चा आकडा करुन एका पायावर उभा असलेला तर खासच... इंद्रा मस्त आहेत हा फोटो... Proud

सगळे फोटो अगदी मनापासुन आवडले. एकाच झाडाचा फोटो तिघांच्या कॅमे-यातुन पाहताना प्रत्येकाची कॅमे-याच्या व्हुफाइंडरमधली दृष्टी वेगळी अन त्याच्या कॅमे-याची शक्ती वेगळी हे लक्षात येते. Happy

दिनेश, त्या अर्धवट कापल्यासारख्या फळे असलेल्या झाडाचे नाव सांगा. हा फोटो कसा निघाला ते योलाच माहित. दोघांच्याही बॅट-या राम म्हणत होत्या हा फोटो घेताना Happy

योगेश तू आणि इंद्राने पक्ष्यांचे फोटो मस्तच टिपले आहेत. पिंजर्‍यामूळे मला ते कधीच मला जमले नव्हते. तिथले आणखी पक्षी तूम्हाला दाखवायला हवे होते.

खरतर त्या राजहंसच्या चालीचा विडियो शूट करायला पाहिजे होता... त्याचा डौलच निराळा!

सचित्रवुत्तांमुळे गटगच्या आठवणी ताज्या झाल्या... मस्तच Happy योग्य वेळी फोन केल्याने बद्दल योचे आभार Happy

माकडमियाच्या (चुभुदेघे) सुकामेवासाठी दिनेशदांचे खूप खूप धन्यवाद... अगदी खार्‍या काजूंची चव आहे.

मस्तच रे योगी...
वृत्तांत आणि सगळे फोटो मस्तच Happy
माहिती पण छानच

हिरव्या फळातून फुटून बाहेर पडणारी लाल छोटी फळे , ढोलीत मस्तपैंकी विराजमान झालेल्या पोपटाचा आणि चेंडूफुलांचा फोटो तर खुपच आवडला... Happy

सर्वांचे खूप धन्यवाद ! Happy

जिप्सी... झाली रे बॉटल Happy

इंग्रजी ४ चा आकडा करुन >>अरे सहीच !

दोघांच्याही बॅट-या राम म्हणत होत्या हा फोटो घेताना >> अगदी.. Lol

दिनेशदा.. तूम्ही याल तेव्हा पुन्हा जाऊ.. Happy

त्याचा डौलच निराळा! >> अगदी.. Happy

अर्रे सही धम्माल केलीत लोको.. कधी ठरला हा गट्ग?? मला काय पत्त्याच नव्हता Sad
काय एकेक फोटो आहेत.. योग्या तुझे पाय कुठे आहेत?? Happy __/\__
>>दिनेशदा.. तूम्ही याल तेव्हा पुन्हा जाऊ.>> मी येणार तेव्हा नक्की Happy

सर्वात पहिल्या फोटोतील फुल कोणते आहे??

Pages