भावनिक नसलेली गुंतवणूक!

Submitted by ठमादेवी on 10 January, 2011 - 02:22

बँकेत जायचा, आर्थिक व्यवहारांचा आळस, दुर्लक्ष आणि अवलंबित्व यांचा परिणाम स्त्रियांच्या गुंतवणुकीवर होत राहतो. पण त्यामुळे नवऱ्यांच्या मुठीत आपलं आयुष्य राहतंय याची जाणीवही होत नाही. त्याच वेळी नव-याचे कुठे काय व्यवहार आहेत हेही माहीत नसल्याने त्यांचे अधिकारच जातात.

गुंतवणूक कुठे, कशी, कधी करायची याची माहिती घेऊन मला काय करायचंय? मला तर माझ्या बँक अकाऊंटचा नंबरही माहीत नाही, असं म्हणणा-या किंवा एखादा एजंट गुंतवणुकीसंबंधी काही माहिती घेऊन आल्यावर ‘यांना विचारून सांगते’, ‘रविवारी हे असताना या’, असं सांगणा-या स्त्रियांची संख्या आजही मोठी आहे. बँक अकाऊंटचा नंबर माहीत नाही, हे मोठय़ा अभिमानाने सांगणा-या स्त्रियाही मोठय़ा प्रमाणावर आहेत. उच्चशिक्षित, मोठमोठय़ा पदांचं काम लीलया सांभाळणा-या स्त्रियाही स्वत:चे आर्थिक व्यवहार किंवा गुंतवणूक वगैरे म्हटली की चार हात दूरच राहतात.

सध्या डिसेंबर महिना सुरू आहे. म्हणजे आर्थिक वर्ष संपायला तीनच महिने आहेत. त्यामुळे बहुतेक पुरुष कर्मचा-यांची टॅक्स वाचवण्यासाठी काय काय करायचं, कशात गुंतवणूक केली तर टॅक्स कमी भरावा लागेल, वगैरे धावपळ सुरू असेल. पण बऱ्याचशा महिला कर्मचारी सरकारने आपल्याला इन्कम टॅक्समध्ये सवलत दिलीय, त्यामुळे आपण त्या गटातच मोडत नाही, असा विचार करून या भानगडीत पडणार नाहीत. अनेकींना रिटर्न फाइल करणे हा काय प्रकार आहे, याचीही कल्पना नसेल. आजही रिटर्न फाइल करणा-या स्त्रियांचं प्रमाण खूपच कमी आहे, ही वस्तुस्थिती आहे.

स्त्रिया जशा कमावत्या झाल्या, त्यांची क्षितिजं रुंदावली, हातात पुरुषांच्या बरोबरीने, किंबहुना थोडा जास्तच पैसा खुळखुळू लागला तशी गुंतवणुकीची आवश्यकताही निर्माण झाली. ‘घर दोघांचं’ या संकल्पनेबरोबर आपल्या घरासाठी दोघांनीही कमवण्याची आणि ते उभारण्याची गरज भासू लागली. जागतिकीकरणाच्या रेटय़ात कामातली गुणवत्ता जास्त महत्त्वाची ठरली. पण बाहेरचं काम पुरुषांनी बघायचं आणि घरातलं स्त्रियांनी बघायचं, हा पूर्वापारचा अलिखित नियम कायमच राहिला. नाही म्हणायला काही ठिकाणी घरांवर पुरुषांऐवजी स्त्रियांची नावं लागली. पण थोडय़ाफार फरकाने ही गोष्ट तशीच कायम राहिली.

‘मला एका संस्थेमध्ये नोंदणी करायची होती. त्यासाठी थोडे पैसे भरावे लागणार होते. पण म्हटलं नवरा आल्याशिवाय कसा हा व्यवहार करणार? त्यामुळे तो लंडनहून येईपर्यंत थांबले आणि तोपर्यंत संधी गेली होती,’ व्यवसायाने इंटिरिअर डेकोरेटर असलेली संध्या राणे म्हणाली. असंच अनेकींच्या बाबतीत होतं. एलआयसीची पॉलिसी, म्युच्युअल फंड्स, शेअर्स, जागांचे व्यवहार आपल्या पचनी पडत नाहीत, असं म्हणणारा वर्ग खूप मोठा आहे. कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीबाबत जाणून घेणं आणि पैशाचे व्यवहार करणं आम्हाला जमत नाही, असं या स्त्रिया म्हणतात. वर्षानुर्वष नोकरी करणाऱ्या स्त्रियांनाही बँकांचे व्यवहार माहीत नसतात. व्रिडॉवल स्लिप कशी भरायची,

लाइटबिल कुठे भरायचं, सोसायटीचं बिल कुठे भरायचं अशा साध्या गोष्टीही बऱ्याच स्त्रियांना माहीत नसतात आणि अनेकदा त्या माहीत करून घ्यायची तयारीही नसते, असं दिसतं. या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षामध्ये काही राज्यांमध्ये स्त्रियांसाठी प्रॉपर्टी टॅक्सचे दर कमी केले आहेत. स्त्रियांनी रियल इस्टेटच्या गुंतवणुकीत जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असा प्रयत्न या राज्यांकडून केला जातो. शिवाय स्त्रियांनी जमिनींमध्ये गुंतवणूक केल्यास त्यांना इन्कम टॅक्समध्येही जास्त सूट दिली जाते. स्त्रियांच्या हातात मालमत्तेबाबत आणि गुंतवणुकीबाबत निर्णयक्षमता यावी, त्यांनी स्वत:चे निर्णय स्वत: घ्यावेत यासाठी प्रयत्न केले जातात. एकटय़ा स्त्रियांकडून रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक होण्याचं प्रमाण जास्त आहे. नोकरीसाठी गेलेल्या ठिकाणी भाडय़ाच्या घरात राहण्यापेक्षा स्वत:चं घर घेऊन कर्जाच्या हप्त्यांमध्ये रक्कम जावी, असा विचार त्यामागे दिसतो. पण लग्न झालेल्या किंवा वडीलधारं कुणी पाठीशी असलेल्या स्त्रिया या वडीलधा-यांच्या जिवावर गुंतवणुकीशी संबंधित निर्णय सोडतात, असं दिसतं.

मात्र, एरवी स्वयंपूर्ण असलेल्या आणि पैशाचे महत्त्वाचे व्यवहार नव-याच्या किंवा इतर कुणाच्या हातात सोपवणाऱ्या स्त्रियांसाठी काही काळानंतर अडचणी निर्माण होतात. एखाद्या वेळी कुणाचं निधन झालं की मग कुठले पैसे कुठे ठेवले आहेत, कुठे, किती काळासाठी गुंतवले आहेत, हेच कळत नाही. त्यामुळे अशा काही घटनांनंतर काय करावं तेच यांना कळत नाही. अनेकदा घटस्फोटासारख्या घटनांनंतरही आर्थिक गोष्टी माहीत नसल्याने त्यांचं नुकसानच होतं. शिवाय आर्थिक व्यवहारांची नाडी नव-यांच्या हातात राहिल्याने स्त्रियांना स्वत:च्या आयुष्याचे निर्णयही घेता येत नाहीत. त्याचाही फटका या स्त्रियांना बसतो. मिळणारे पैसे आपल्यालाच वापरता येत नाहीत, अशीही खंत व्यक्त केली जाते.

बँकेत जायचा, आर्थिक व्यवहारांचा आळस, दुर्लक्ष आणि अवलंबित्व यांचा परिणाम स्त्रियांच्या गुंतवणुकीवर होत राहतो. पण त्यामुळे नव-यांच्या मुठीत आपलं आयुष्य राहतंय याची जाणीवही होत नाही. त्याच वेळी नवऱ्याचे कुठे काय व्यवहार आहेत हेही माहीत नसल्याने अधिकारच जातात. एटीएममध्ये जाऊन पैसे काढायचा कंटाळा असलेल्या आणि कार्डासकट अत्यंत खासगी असा पिनकोडही नव-याच्या ताब्यात देणा-या स्त्रियांनो, एकदा विचार जरूर करा!!!

गुलमोहर: 

छान लेख...

खुपदा नवरा पाहतोय ना आर्थिक व्यवहार, तो बरोबरच करेल हा सुर जवळ जवळ
९०% बायकाचा (भारतीय) असतो.

छान लेख. आणि रेशमसंदीप ला पुर्ण अनुमोदन . आर्थिक व्यवहारात लक्ष घालायची इच्छाच दिसुन येत नाही .

कोके, मस्त लेख.
अजुनही समाजात ह्या बाबतीत उदासिनता आहे हे सत्य काही नाकारता येणार नाही. मी तर कितीतरी जणींना टॅक्स वाचावण्यासाठी नवर्‍यावर गुंतवणुकिसाठी अवलंबुन असलेल पाहिलय.

ठमादेवी, लेख छान लिहीलाय.

ह्यावर एक सविस्तर रिप्लाय देईनच.

मी उरलेल्या १० टक्क्यात आहे कारण माझ्या घरात याच्या एकदम उलट परिस्थिती आहे, ती देखील माझ्या आजोबांच्या पिढीपासून. आमच्याकडे पुरुषमंड्ळींचा पैशाशी संबंध फक्त कमावण्यापुरता येतो, त्याचे पुढे काय होते ते बायकांच्याच हातात असते. मी ही याच परंपरेचा निष्ठावान पाईक आहे! Happy

एकदम पटले. पण दुसरी बाजू अशी की महिला वर्ग देखील याबाबतीत उदासीन असतो. आणखी एक गोष्ट अशी की आपल्या देशात फायनान्शियल लिटरसी कमी आहे. मग तो सीए असो वा आयसीड्ब्लयू असो. टॅक्स्,गुंतवणूक याबाबतीत या कम्युनिटीचे ज्ञान तटपुंजे असते हे माझे ऑब्झर्वेशन आहे. तेव्हा फायनान्शियल लिटरसी वाढवणे हे खरे काम आहे.

छान लेख. नुकताच ह्याबाबतीत एक अनुभव आला. माझ्या एका लांबच्या नातेवाईकांचे अकस्मात हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या बायकोला घराच्या व बाहेरच्या आर्थिक व्यवहारांची काडीचीही माहिती नाही. त्यांच्या इस्टेटीतील बराच भाग, गावची शेती इ. बायकोच्या नावे आहे. बँकेत तिच्या नावाने एफ. डी., सेव्हिंग इ. इ. आहे. पण तिने ह्या व्यवहारात कधीच लक्ष घातले नाही. बँकेची स्लीपही कधी भरली नाही. आता नवर्‍याच्या पश्चात वयाच्या साठाव्या वर्षी तिला हे सर्व व्यवहार शिकावे तरी लागतील किंवा मुलावर अवलंबून राहावे लागेल. दुसर्‍यांवर अवलंबून राहाल तेवढे फसवले जाण्याचा धोकाही वाढत जातो.

धन्यवाद सगळ्यांना. स्त्रिया स्वतःच्या गुंतवणुकीबद्दल जितक्या अनिभिज्ञ, आळशी राहतील तितकं त्यांचंच नुकसान आहे..

कोमल,
लेख छान लिहीलाय ! अगदी खरं आहे !
अजनही ग्रामीण भागात तर बहुतेक बायकां फक्त चुल आणि मुलमध्येच अडकलेल्या (कि अडकवलेल्या ?) दिसतात
Happy

ठमादेवी की जय Happy
छान लिहिलयस.. ग्रामीण भागातच नाहीतर चांगल्या शिकलेल्या,शहरात वाढलेल्या बायकांमधे बँकेचे साधे व्यवहार म्हटले तरी त्यांना ते करायचा कंटाळा आहे.. नवरा गुंतवणींबद्दल सांगत असला तरी त्यांचे या व्यवहाराकडे क्वचितच लक्ष असते.. Uhoh

मी म्युच्युअल फंडात कार्यरत होतो.(त्यामुळे) माझ्या सहकर्मी स्त्रिया वर वर्णन केल्याप्रमाणे नाहीत.:) काही तर नवर्‍याच्या उत्पन्नातुन बचत, त्याची गुंतवणूक ही स्वतःच करतात. त्यांच्याबाबतीत नवरा बायको सांगेल तिथे डोळे मिटून सही करतो!

उत्तम फाइलिंग व इझी लाइफ सारखे सॉफट वेअर असल्यास अर्थव्यवहार सोयीचा होतो. उत्तम रेकॉर्ड कीपिन्ग व फॉलोअप च्या सवई असल्या पाहिजेत.

कोमे. मस्त अगदी सत्यता आहे लेखना मध्ये.....खुप बायकांना असेच वाटते नवरा करतो न मग कशाला लक्ष द्यायचे .....पुढे त्या गोष्टीचे गंभिर परिणाम भोगावे लागतात हे लक्षातच येत नाही काही बायकांच्या...
असो. अप्रतिम लिहलेस.... :स्मितः

धन्स कोमल. असं थोड्या थोड्या वेळानं जागं करत जा मला Proud
खरच मी पण करते या क्षेत्रात खुपसा आळस. पण काय करणार ? जसा काहींना कलेचा गंध नसतो, जसा काहींना वाचनाचा छंत नसतो तसा माझ्यासारख्यांना हा "अर्थ"गंध नसतो Sad पण तुम्ही मित्रमैत्रिणी (यात नवराही आला बरं का) असे मागे लागलात की होईल हळूहळू सवय Happy

या दुव्यावर टिचकी मारा. सकाळ मधे ८ मार्च २००९ (आन्तरराष्ट्रीय महिला दिन) रोजी प्रकाशित झालेला माझा लेख.

http://4.bp.blogspot.com/_iunEXbsILVw/ScSsCG6NB1I/AAAAAAAAABk/QGSTOQKoi-...

छान आणि उपयुक्त लेख.
आमच्या घरातही नवर्‍याचा सहभाग फक्त सह्या करण्यापुरताच आहे.अर्थात सगळ्या गुंतवणूकिची माहिति त्याला आहेच, पण अ‍ॅक्टिव सहभाग नाहि.

एक मात्र आहे, एकमेकांवर अतिशय विश्वास असेल तर एटीएम चा पासवर्ड माहिती असणे गैर नाही.
(आमची दोघांचिही एटिएम कार्डे सुद्दा मीच ऑपरेट करते Happy )

बाय द वे तुम्ही कधी एटिएम मशीनमध्ये कार्ड घालून मग नवर्‍याला मोबाईलवर पासवर्ड विचारणार्‍या बायका बघितल्यात का ?
मी खूप पाहिल्यात. Happy