एका रात्रीच्या फ़ुलपाखराची कहाणी..!

Submitted by मणिकर्णिका on 30 December, 2010 - 19:01

’योरोईदो’ गावात कोळ्यांच्या वस्तीत राहणारी एक छोटीशी मुलगी..
चियो साकामातो.
आपल्याकडे दोन शेंडया घालणारी चिऊ असेल तशीच ही निळसर राखी रंगाचे डोळे असलेली जपानी चियो.
घरात अठराविश्वे दारिद्रय, आई बोन-कॅन्सरने आजारी, पहिल्या कुटुंबाच्या आकस्मिक निधनाने अकाले म्हातारे झालेले वडील, पोटाखेरीज आणखीनही भुका जागृत झालेली मोठी बहीण-सात्सू.
अशा हलाखीत आपली चियो काय करते?
काहीच नाही.
करण्यासारखं काही नसतंच तिच्याकडे.
असं झालं तर काय होईल आणि तसं झालं तर कसं? अशा कल्पनेच्या भरारया मारत, दिवास्वप्नं रंगवत चियो एकेक दिवस ढकलत असते..
अशातच..
योरोईदोचे असामी ’तानाका सान’यांची ’मेहेरनजर’होते आणि चियोची रवानगी सात्सूसकट ’गियोन’ परगण्यातल्या नित्ता ओकियात होते.
नित्ता ओकिया हे एक ’गेशा हाऊस’ आहे.
थोडक्यात तानाकांनी सात्सू आणि चियोला श्रीमती नित्तांना विकलेलं आहे.
चियो अधिक सुंदर असल्यामुळे तिला नित्ता ओकियात ठेऊन घेतात आणि सात्सूची रवानगी भलत्याच कुठल्यातरी परगण्यातल्या कमी दर्जाच्या ओकियात (जोरोऊया) होते.
अशा बहिणीच्या ताटातूटीपासून सुरु होते चियो नावाच्या ’होऊ घातलेल्या’ गेशेची कहाणी.
आर्थर गोल्डन यांनी उधृत केलेली चियो उर्फ़ नित्ता सायुरीची ’द मेमॉयर्स ऑफ़ अ गेशा’!
****
दिवसाढवळ्या जे घडतं त्याचा रात्री बंद दरवाजाआड घडणारया गोष्टीशी सुतराम संबंध नसतो या जपानी लोकांच्या ठाम समजुतीवर गेशांचे अस्तित्व पूर्वापार टिकून राहिले आहे.
’वेश्या’ आणि ’गेशा’ या दोन्ही अभिसारीकाच पण वेश्या ह्या गेशांपेक्षा खालच्या दर्जाच्या असतात.
गेशा होण्याकरता गायन, वादन, नृत्य, सरबराईचे यथासांग शिक्षण घ्यावे लागते.
शिवाय घरंदाज गेशा या कुठल्याही पुरुषाला एका रात्रीपुरता आपले शरीर वापरू देत नाहीत..एखाद्या पुरुषाकडून सोयी-सुविधा आणि योग्य मोबदला मिळत असेल तर वर्षानुवर्षे संबंध ठेवणे त्या पसंत करतात..नाहीतर ’दान्ना’ शोधतात.
’दान्ना’ म्हनजे असा पुरुष जो एखाद्या गेशेला आयुष्यभर ठेऊन घ्यायला तयार आहे..तिचा सगळा खर्च उचलायला तयार आहे.
असा दान्ना मिळणं म्हणजे गेशेचं सुखनिधानच जणू काही.
गेशा लग्न करत नाहीत पण आपल्या दान्नाची आयुष्यभर संगत-सोबत करतात, त्यांचं मन रिझवतात.
****
तर...
पम्पकीन नावाच्या एका समवयीन मुलीबरोबर चियोचं गेशा ट्रेनिंग सुरु होतं..
चियो एक नामांकीत गेशा होणार हे उघड असल्याने नित्ता ओकियातली एकमेव लावण्यखणी गेशा ’हात्सुमोमो’ तिचा रागराग करते, तिचं खच्चीकरण करते, तिला शक्य तितक्या अडचणीत आणायला बघते.
चियो आपल्या बहिणीचा शोध घेऊन तिच्याबरोबर पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न करते.
तिच्या या गुस्ताखीमुळे श्रीमती नित्ता तिचं गेशा ट्रेनिंग बंद करतात..आणि तिला मोलकरणीसारखं राबवून घेतात.
अशाच एका हताश क्षणाला चियोला ’चेयरमन’ भेटतो..चियो पहिल्या भेटीतच त्याच्याकडे ओढली जाते आणि चेयरमनपर्यंत पोहोचण्याचे साधन म्हणून ती तिच्या गेशा होण्याकडे पाहायला लागते..
चित्रपटसृष्टीत जसा गॉडफ़ादर तशी गेशा व्यवसायात शिकाऊ गेशेला योग्य ’मोठी बहीण’ मिळणे आवश्य़क असते कारण तीच आपल्या ’कॉन्टॅक्ट्स’ना आपल्या लहान बहिणीची ओळख करून देऊन तिच्यावर कृपानजर ठेवायला सांगते.
चियोच्या सुदैवाने मामेहा नावाची नामांकीत गेशा तिला मोठी बहीण म्हणून मिळते आणि चियो या शिकाऊ गेशेचं नामकरण ’सायुरी’ असं होतं.
तिथून मग चियो उर्फ़ सायुरी कधीच मागे वळून पाहत नाही.
’गेशा’ म्हणून तिची कारकीर्द सुरु होते ती तिचं इप्सित साध्य केल्यावरच थांबते...चेयरमनला ’दान्ना’ करून घेतल्यावरच!
****
पूर्वी परयांना शाप असायचे म्हणून त्या भूतलावर जन्म घ्यायच्या..आणि मुक्तीची वाट बघत भूतलावरच थांबायच्या.
या परीला केवळ रात्रीच भिरभिरणारं फ़ुलपाखरू बनून राहण्याचा शाप होता की काय कोण जाणे??
’द मेमॉयर्स ऑफ़ अ गेशा’ ही मला अशाच एका उ:शाप नसलेल्या परीची कथा वाटली.
पूर्वी ’ओशीन’ वाटली होती तशीच.
गेशांनी आपलं जीवन कुणासमोर उघडं करू नये हा पूर्वापार पाळला गेलेला संकेत आहे जो नित्ता सायुरींनी पण पाळला.
त्यांची ही कथा त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित करण्यात आली.
भरपूर वादविवाद झडले...आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडला..पण त्यामुळे केवळ रात्रीच बहरणारे एक निराळंच जग आपल्यासमोर आलं..
गेशांचा ’मिझुआबे’..’मिझुआबे’साठी कुमारी गेशांवर लावलेल्या चढत्या भाजणीतल्या बोली यासारख्या तिडीक आणणारया कथा जगासमोर आल्या.
’गेशा-संस्कृती’ जगासमोर आली जी आजपावेतो जाणिवपूर्वक पडदाशीन ठेवण्यात आली होती.
जपानमध्ये आजही गेशा-संस्कृती आहे.
पण ही माणसं अस्तित्वातच नाहीत अशा भ्रमात जगणारया प्रत्येक माणसाला सायुरींनी सत्याची जाणीव करून दिली.
त्यांची प्रातिनिधिक कहाणी मांडून..
’द मेमॉयर्स ऑफ़ अ गेशा’- एका रात्रीच्या फ़ुलपाखराची कहाणी!

गुलमोहर: 

'सायुरी' हे पुस्तकही वाचलंय. पिक्चरही पाहिलाय. दोन्ही ठिक ठिक. पाच सहा वर्षापूर्वी जरा बोलबाला होता पुस्तकाचा.

हं सायो,
सुनंदा अमरापूरकरांनी मराठीत अनुवाद करूनसुद्धा चारेक वर्ष झाली.
पण इथे लिखाण चालू करताना कोणत्यातरी पुस्तकाच्या संदर्भातच करावं असं वाटलं आणि मग हे आठवलं.
ठिक-ठाकच आहे. पण एव्हढं जाडं बाड होतं तरी पूर्ण वाचून होईपर्यंत खाली ठेववलं नव्हतं.
पिक्चर मी नंतर बघितला. झियि गोडच वाटली. वाचताना मी कल्पना केली होती तशीच.

नुक्तच वाचून संपवल होतं हे पुस्तक. त्यावर काहितरी लिहाव असं मनात होतं. आज हा लेख वाचला, बरं वाटलं.

अर्थात मी वाचलं ते सुनंदा अमरापूरकरांची केलेल भाषांतर / रुपांतर. मूळ पुस्तक वाचल्याखेरीज त्यावर मत देणं चुकीचच. पण अनुवादातही भावला तो लिखाणातील वेगळेपणा. ह्यातील उपमा उत्प्रेक्षा ईतक्या वेगळ्या आहेत की संस्कृतीतला फरक सतत जाणवत रहातो. म्हणूनच एक अस्वस्थ करणारी कहाणी वाचतानाही आपण त्यात अगदी गुंतून जातो.

@ असूदे
ह्म्म.
मूळ पुस्तक वाचलेलं असलं आपल्याही नकळत तुलना सुरु होते. मग भाषांतर किंवा रुपांतरांमधले कच्चे दुवे कचकन दाताखाली आल्यासारखे वाटत. जसं एखादा पुस्तकावर आधारीत चित्रपट बघितल्यावर काय कसं नसायला हवं होतं हे पटकन लक्षात येतं. त्यामुळे चित्रपटाला मिळायचा तो न्याय मिळत नाही.
अनुवादीत पुस्तकं वाचतानाही काहीतरी एक (मूळ किंवा अनुवादीत) वाचावं अशा मताची मी आहे. अमरापूरकरांनी अनुवाद चांगलाच केला आहे.
मूळ पुस्तकात आणि त्यात काहीही फ़रक नाहीये हे ही जाता जाता सांगते. Happy
तुम्ही आता पिक्चर बघून पाहा. अतिशय देखणा पिक्चर आहे. त्याहून देखणी ती सायुरी आहे.

नेट चेकलं. झीयी झ्यॅन्ग Happy आहे होय. जुनी आवड आहे...

<< मूळ पुस्तक वाचलेलं असलं आपल्याही नकळत तुलना सुरु होते................
अनुवादीत पुस्तकं वाचतानाही काहीतरी एक (मूळ किंवा अनुवादीत) वाचावं अशा मताची मी आहे. >>

सहमत, पण मी अनुवाद अनुभवतानाची गोष्ट सांगत नसून त्यावर मत मांडताना मूळ कलाकृतीचा अनुभव घेणे आवश्यक आहे असे म्हणतोय.

छान. धन्यवाद.
मेमॉइर्स ऑफ अ गीशा- उगीचच गाजलं असे मत जपानी लोकांकडुन ऐकले होता.
चित्रपट पाहीला नाही.
सायोला अनुमोदन. पुस्तक ठिक.

हा हा..आवड जुनी आहे का? चांगलंय.

<<पण मी अनुवाद अनुभवतानाची गोष्ट सांगत नसून त्यावर मत मांडताना मूळ कलाकृतीचा अनुभव घेणे आवश्यक आहे असे म्हणतोय>>

अम्म...मला जssरा झेपलं नाही हे. असो. खरंच वाचा मग मूळ पुस्तक. सायुरीचे मोनोलॉग्ज इंग्रजीत वाचायला आणखी छान वाटतात

रैना,
धन्यवाद!
आपल्याकडे नेहमी नेहमी घडणारया, नेहमीच्या वावरातल्या गोष्टी आपल्याला तितक्याशा ग्लॅमरस वाटत नाहीत जितक्या परक्यांना वाटतात. कदाचित म्हणून असेल ते.
म्हणून ह्या पुस्तकावर जपानमध्ये गदारोळ माजला पण जगभरात ते हातोहात खपलं.
कोणताही स्कूप हिट होतोच. पण त्यामुळे ज्याची सिक्रेट्स बाहेर आलीत तो बोंब ठोकतोच. नाही का? Happy

हो खरय.
एक सुचवू का? ही आपली आवड असेल तर ठीक, पण नसेल तर प्रत्येक प्रतिक्रिया देणार्‍याला उत्तर/ प्रत्युत्तर/ स्पष्टीकरणही शक्यतोवर द्यायची तशी सक्ती इथे नाही. तसेही हे पुस्तक आहे. कोणाला आवडणार, कोणाला नाही. त्या त्या व्यक्तिला त्यांचे मत देण्याचा अधिकार आहेच. Happy

पटलं.
कोणाला आवडेल , कोणाला नाही आवडणार हे ध्यानात धरून तर पब्लिक फोरम वर पोस्ट टाकतो ना!मत देण्याचा अधिकार मी अमान्य करतच नाहीये. उत्स्फूर्त प्रतिक्रिया होत्या त्या. तुम्हाला स्पष्टीकरणासारख्या वाटल्या असाव्यात कदाचित.:)
मी नवीन आहे.उत्साह उतू चाललाय. नंतर नाही वाटणार याचं काही.

रैना, आपला काहितरी गोंधळ होतोय का ? कि मी समजून घेण्यात चुकतोय ? मी नावडीविषयी काही बोलत नाहीये, म.क. मला नावडण्याविषयी काही बोलत नाहियेत.

माझा मुद्दा असा आहे की "एखाद्या अनुवादित, रुपांतरीत, भाषांतरीत कलाकृतीवर मत मांडताना मूळ कलाकृतीचा रसास्वाद घेणे महत्वाचे आहे."

मी अनुवाद वाचला आणि तो मला आवडलाही. पण त्यातील वेदनेने व्यथित होण्यापेक्षाही लिखाणातील वेगळेपणाचे चकित जास्त झालो. हा माझ्या बुद्धीचा दोष असू शकतो

मी बघितलाय तो चित्रपट. नेत्रसुखद आहे. चित्रपटासाठी ते सगळे गाव स्टूडियोमधेच उभारले होते, असेही वाचले होते.

खरंच खूप गोंधळ झालाय.
@असूदे,
रैना मला उद्देशून बोलत होत्या. मी आली कमेंट की दे उत्तर असं धडक्याने करत होते ना... म्हणून. तुम्हाला उद्देशून काही नव्हतं त्यात.

@दिनेशदा
स्टुडीयोमध्ये गाव वसवल्याची माहिती नवीन आहे मला.

@मेरा कुछ सामान.
अगदी अगदी सहमत! Happy