प्रणयगीत

Submitted by उमेश कोठीकर on 30 December, 2010 - 05:21

भिजून यावा गंधित वारा, लाजत यावी रात्र जराशी
तुझ्या मनातील गूज कळावे, मला धरावे असे उराशी

तुझ्यातले माझ्यात मिळावे, फक्त श्वास श्वासांचे यावे
ओठांच्या या मिठीत न कळे, काय बोलले कोण कुणाशी?

डोळ्यांमधले शब्द कळावे, लज्जेचे हे बंध गळावे
स्पर्शाआधी उमलून यावी, गर्द गुलाबी लाज जराशी

अंतर व्याकुळ मिटून जावे,एक होऊनि चिंब भिजावे
असे काहीसे मिसळून जावे,मी तुझ्यात अन तू माझ्याशी

मिटून डोळे, सुखात न्हावे, तनामनातून तूच भिनावे
नकोस आता थांबू सखया, फुटून गेला बांध मघाशी

तृप्त पहाटे तुला बघावे, 'नकोस जाऊ' म्हणत रूसावे
आठवणींचे चुंबन गहिरे, जातांना तू ठेव उशाशी

गुलमोहर: 

क्या बात है उमेश !!!! सगळी कविताच एकदम अप्रतीम !!! जियो !!!

डोळ्यांमधले शब्द कळावे, लज्जेचे हे बंध गळावे
स्पर्शाआधी उमलून यावी, गर्द गुलाबी लाज जराशी

-------- क्ल्लास !!!

क्या बात है... फार छान रचना.... सगळ्याच द्विपदी दिलखेचक...

अंतर व्याकुळ मिटून जावे,एक होऊनि चिंब भिजावे
असे काहीसे मिसळून जावे,मी तुझ्यात अन तू माझ्याशी

ही द्विपदी फार आवडली... नीट तपासले नाही ..पण ही मात्रावृत्तातील किंवा हिरण्यकेशीतील गझल आहे.

मस्तच

छान ... मस्त ... रोमॅंटिक कविता

“डोळ्यांमधले शब्द कळावे, लज्जेचे हे बंध गळावे
स्पर्शाआधी उमलून यावी, गर्द गुलाबी लाज जराशी”

हे सर्वात जास्त आवडलं.

ए उमेस भाय, एकदम मस्त है काव्य तुम्हारा!
एकदम मस्त.
(रोमँन्टीक प्रकृतीच्या लोकांना एकदम आवडेल असे काव्य! )

ही द्विपदी फार आवडली... नीट तपासले नाही ..पण ही मात्रावृत्तातील किंवा हिरण्यकेशीतील गझल आहे.

>>> त्यातले आपल्याला कायबी कळत नाय... Lol
बाकी कविता.... एक नंबर... जियो... Happy

सगळ्या मित्रमंडळींचे खुप धन्यवाद. डॉक्टरसाहेब, गझलेचे तंत्र शिकायची खुप इच्छा आहे; पण जमत नाही. बेफिकीरजींच्या लेखामुळे जमेल असे वाटतेय.

प्रणयाची धुंदी उतरली नाही अजुन मागे बातम्यात वाचल होत खुप तुमच्याबद्दल अश्या कविता सुचतात कशा बाइ

काय "मादक" कविता केलीस मित्रा - मादक या शब्दावरून वादंग सुरु न होवो.
खरंच अप्रतिम प्रणयगीत. खूपच सुंदर -जमलेली.

अगदी सहज सुंदर अशी कविता, आवडली रे उम्या Happy
नव्या वर्षात तुझ्याकडून अशाच सुंदर कविता वाचायला मिळोत या शुभेच्छा Happy

Pages