जादूचा पूल

Submitted by सुर्यफूल on 27 December, 2010 - 23:31

स्वरूपाचा आणि फ्लायओव्हरस् चा लहानपणापासुनच फार जिव्हाळ्याचा संबंध होता. तसं पाहिलं तर कोणतेही लहान-मोठे ब्रीज, नदीवरचे छोटे पूल यांचंहि तिला अनामिक आकर्षण होतं.

स्वरूपा लहान असताना त्यांच्या मुंबईतल्या घराजवळच एक फ्लायओव्हर होता. ‌ट‍ॅक्सीने येत जात असताना तिचे आई – बाबा मुद्दाम वाट वाकडी करून तिला त्या ब्रीजवरून घेऊन जात असत. ती जगाच्या पाठीवर कुठेही फिरून आली असली तरी ब्रीजवरून गेल्याचा आनंद काही वेगळाच असे.

ती दुसरी – तिसरीत असताना स्वरूपाच्या बाबांनी लुना घेतली. जेव्हा कधी बाबा तिला शाळेतून घ्यायला येत , ती खूप खुश होत असे. ती हट्ट धरून बाबांना त्या फ्लायओव्हरवरून जायला लावत असे. त्या ब्रीजकडे जाणाऱ्या रस्त्याला लागताच तिचा आनंद गगनात मावत नसे. हा ब्रीज आज पेडररोड कडे न जाता तिला दूर ढगात, परीच्या राज्यात घेऊन जाईल. एखादा एन्जल तीचं हासून स्वागत करेल आणि तिला अलगद परीराणीच्या मांडीत बसवेल असं तिला दरवेळेस वाटत असे. दरवेळेस तो ब्रीज पेडररोडकडेच उतरल्यावर तिचा थोडासा भ्रमनिरास होत असे. पण आज नाही तर पुन्हा कधी, इथे नाही तर इतर कुठे तरी; त्या परीच्या राज्यात नेणारा ‘जादूचा पूल’ नक्की सापडेल याची तिला खात्री होती.

एके दिवशी टीव्हीवर ‘अमेरिकन फ्री-व्हेज’ बद्दल कार्यक्रम लागला होता. त्यातील ते प्रचंड फ्लायओव्हरस्, स्वरूपा आ-वासून बघत होती. अधून – मधून, “बाबा हे कुठे आहे हो?”, “इथे कसं जातात?” असे प्रश्न विचारून बाबांना भंडावत होती. विशेषत: लॉस ‍अ‍ँजेलेसचे एकावर एक ३-४ मजली फ्लायओव्हरस् पाहून तीचं बालमन वेडावलं होतं. त्यातून त्या कार्यक्रमात लॉस ‍अ‍ँजेलेसला ‘सिटी ऑफ एंजलस्’ असंहि संबोधलं गेल्यामुळे स्वरूपाने विचार केला कि शहराचं हे नाव म्हणजे काही योगा – योग नाही. हा नक्कीच जादूच्या दुनियेचा कोडवर्ड असावा. ती शोधात होती तो ‘जादूचा पूल’ नक्कीच तिथे असणार. तिने कधीतरी अमेरिकेत आणि मुख्य म्हणजे लॉस ‍अ‍ँजेलेसला जाऊन ‘जादूचा पूल’ शोधण्याचा विचार पक्का करून टाकला. अधून मधून लॉस ‍अ‍ँजेलेसला पोहोचल्याचे ‘खयाली पूल’ हि ती बांधत असे.

कालांतराने शाळा, इंजिनिअरिंग, नोकरी या साऱ्या वास्तवाच्या भूलभूलैयेत तिचा ‘परीच्या राज्याचा’ आणि ‘जादूच्या पुलाचा’ शोध मागे पडला.

आता स्वरूपाच्या अमेरिकेतील वास्त्व्यालाही सहा वर्ष पूर्ण होतील. अजूनही मिशिगनमधील ‘मॅकिनॉ ब्रीज’ असो कि सॅन- फ़्रँसीसकोचा ‘गोल्डन गेट ब्रीज’, त्यावरून जाताना स्वरूपाचं मन कोणत्यातरी उत्स्फूर्त आवेगाने भारावतं. अंगावरून अलगद मोरपीस फिरल्याचा भास होतो. गेली काही वर्ष ती लॉस ‍अ‍ँजेलेसमध्येच रहाते. कोणे एकेकाळी ज्या ३-४ मजली फ्लायओव्हरसना टीव्हीवर बघून ती वेडावली होती, त्यापैकी कोणत्या ना कोणत्या ब्रिजवर ती ट्रॅफिकमध्ये अडकलेली असते. मनात एन्जल किंवा परीराणी ऐवजी, “ आज डिनरला काय करायचं? उद्या डब्यासाठी कोणती भाजी करता येईल?” असे विचार असतात.

आजही स्वरूपा 405 North वरील ट्रॅफिकमधून हळूहळू पुढे सरकत घराकडे निघाली होती. उजवीकडे एका हिरव्या पाटीवर लिहिलं होतं, ‘Howard Hughes Next Exit’. हा एक्झिट रँप म्हणजे डौलदार वळण घेणारा एक फ्लायओव्हर. अनेकदा हा फ्लायओव्हर स्वरूपाला खुणावत असतो. कदाचित कुठेतरी खोल आंतरमनाच्या कप्प्यात लपून बसलेल्या तिच्या बाल्याला, तो ‘जादूचा पूल’ पुन्हा एकदा शोधण्याचं आमंत्रण देत असतो. आज अचानक तिने ते आमंत्रण स्वीकारण्याचं ठरवलं. गाडी एक्झिट लेनच्या दिशेने धावू लागली.

बघता बघता स्वरूपा त्या फ्लायओव्हरवर येऊन पोहोचली. बालपणीच्या आठवणींनी मन मोहरून गेलं. हातात गाडीचं स्टिअरिंग नसून ती त्या लुनावर, माकडाच्या पिल्लासारखं बाबांच्या पोटाभोवती घट्ट हात आवळून बसल्याचा तिला भास झाला. ब्रीजवरून जाताना कशी मज्जा आली हे आईला सांगता सांगता तिच्या पदराशी खेळत असतानाचा तो पदराचा मऊसूत स्पर्श आठवला. डोक्यात अचानक लख्ख प्रकाश पडल्यासारखं लक्षात आलं. ती इतके दिवस शोधात होती तो एन्जल तिच्या सोबत ती लुना ब्रिजवर चढत नाही म्हणून धापा टाकत त्यावरील सायकलसारखे पेडलस‍् मारत होता. त्या मलाबार हिल्स मधील धानाड्य लोक त्यांच्या मर्सेडिझ मधून जाताना आपल्यावर हासत असतील याची त्या ‘बाबा’ नावाच्या एन्जलला अजिबात तमा नव्हती. स्वरूपाच्या चेहऱ्यावरील आनंदासाठी पुन्हा पुन्हा असं पेडल मारणं त्याला मंजूर होतं. कामाच्या एवढ्या धबडश्यातहि तिच्यासाठी चिमणीच्या आकाराच्या पोळ्या करून ठेवणारी आईच तिची खरी परीराणी होती. आजवर स्वरूपाला न सापडलेला तो परिचा गाव इतर कुठेही नव्हता, ते तर तिचं रम्य बालपण होतं

ते बालपण आता कायमचं मागे पडलय पण त्या रम्य आठवणींतून स्वरूपाला बालपण नावाच्या जादुई दुनियेत क्षणात नेऊन सोडणारा तो ‘जादूचा पूल’ मात्र एकदाचा सापडलाय....

गुलमोहर: 

मला माझे बाबा आठवले ! सगळ्याच नशिबवान मुलांच्या नशिबात असे एक बाबा एंजल आणि आई परी असते. माझ्याकडे पण आहेत.

सुरेख!

फारच छान.

आजच्या धावपळीच्या आणि दगदगीच्या काळात आपले नशीब कुठे नेईल याचा काही नेम नाही. आपल्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणार्‍या आपल्या आई-वडिलांना सोडून जगाच्या कुठल्या कोपर्‍यात भविष्य शोधण्याचे दिवस आहेत. दुर्दैवाने आई-वडिलांपासून दुरावलेल्या अनेक स्वरूपा / स्वरूप बालपणीच्या मखमलींची किनार लावून जीवनातले रुक्ष वास्तव जरा मऊ करतात. तरी आपल्या एंजल आणि परीच्या रम्य आठवणी मनाला सैर्-भैर करतात आणि कधी असं वाटतं की एखादा असा जादूचा पुल असावा, ज्यावरून झटकन त्या तीरावर जाऊन आपल्या एंजल आणि परीची भेट घेता येईल.