प्रवास्वानुभव...

Submitted by ठमादेवी on 27 December, 2010 - 06:01

मी प्रवासाला जाणार आणि काही एक्सायटिंग घडणार नाही, हे केवळ अशक्य!!! देवाने जणू काही सर्व एक्साइटमेंट्स माझ्याचसाठी राखून ठेवल्या आहेत, अशा थाटात मी वावरत असते. आता माझी लेकही याला सरावलीय. माझ्या प्रवासांमधले असे काही किस्से काही भागांत टाकतेय.. आवडलं तर उत्तम!
.......................

औरंगाबाद- प्रवास-1

मला प्रवासाची खूप हौस आहे. मनात आलं की उठायचं आणि बाहेर निघायचं, असा खाक्या. तशीच सप्टेंबर महिन्यात बहिणीला भेटायला म्हणून औरंगाबादला जायचं ठरलं. तेही कसं, शनिवारी रात्री मुंबईतून खासगी स्लीपर कोचने निघून रविवारी सकाळी पोहोचायचं आणि सोमवारी सकाळी 6 वाजताची जनशताब्दी एक्सप्रेस पकडून दुपारी 1 वाजता ऑफिसला हजर व्हायचं, असं ठरवलं. रिझर्वेशनही केलं. शनिवारी ऑफिस संपवून निघाले. रात्री गाडीत बसले आणि औरंगाबादजवळ पोहोचलेही.. औरंगाबादपासून जवळपास साठेक किलोमीटर अंतरावर गाडी बराच वेळ थांबली होती. सकाळचे सहा वगैरे वाजले असतील. आतार्पयत मी घरी असायला हवं होतं. बाहेर येऊन बघते तर ड्रायव्हरच्या केबिनमध्ये काचांचा चुरा पडलेला. ड्रायव्हरसमोरची खासगी ट्रॅव्हल्सना असते ती भलीमोठी काच गायब!
‘काय झालं?’
‘माहीत नाही,’ एकाचं उत्तर.
‘गाडी खूप वेगाने चालली होती. समोरून जोरात येणारा वारा काच सहन करू शकली नाही. फुटली आणि अक्षरश: चुरा झाला,’ इति. क्लीनर.
ड्रायव्हरला जखम झालेली नाही हे पाहून मी हुश्श केलं. काच साफ करायला तब्बल दोन तास लागले. घरी पोहोचायला साडेआठ..
सोमवारी पहाटे बहिणीचा नवरा स्टेशनला सोडणार होता. ‘आवर रे बाबा,’ असं मी म्हणे आणि तो ‘किती वेळ लागतो स्टेशनला? दहा मिनिटांत सोडतो.’ शेवटी 5.40 ला निघालो घरातून. रस्त्यांवर नुकत्याच झालेल्या पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांची कृपा झाल्यावरही वेगात स्टेशनला पोहोचलो. प्लॅटफॉर्मवर आले तर गाडी वेगात स्टेशनच्या बाहेर पडत होती आणि इंडिकेटर मला 6.01 मिनिटं अशा वाकुल्या दाखवत होता..
आपण एक मिनिट उशिरा आलोय आणि गाडी चुकली आहे, हे मेंदूत रजिस्टर व्हायलाच वेळ गेला. मग परिस्थितीची जाणीव झाली आणि ऑफिसला पोहोचायचं आहे हेही जाणवलं.
आधी तिकीट रद्द करावं म्हणून तिकीट काऊंटरवर गेले. काऊंटरवरच्या माणसाने कॅन्सलेशनचा फॉर्म हातात दिला. त्यावर हिंदी, इंग्रजी आणि तेलुगू भाषा. ‘महाराष्ट्रात या तीन भाषा आल्या तरच जगता येतं वाटतं,’ माझं तिरसट विधान. त्यावर बाई जरा क्रॅकच दिसते, अशा नजरेने बघून त्याने माझं तिकीट मागितलं. वर म्हणाला, ऑनलाइन बुकिंग आहे, इथून रद्द होणार नाही. मला ‘बरं’ म्हणावंच लागलं. तेवढ्यात तोच म्हणाला, ‘निझामउद्दीन एक्सप्रेस चार तास लेट आहे. ती सात-सव्वासातला येईल. तुम्ही तिने जाऊ शकता मनमाडपर्यंत. तिथून हवं तर पुढे जा.’ ‘ही माझ्यासाठीच लेट झालेली दिसत्ये,’ मी मनातल्या मनात. त्याच्याकडून जनरलचं तिकीट घेतलं आणि प्लॅटफॉर्मवर येऊन उभी राहिले.
निझामउद्दीन एक्सप्रेस तिच्या लेट झालेल्या ‘वेळेत’ आली. समोर दिसलेल्या डब्यात चढले. रिझर्वेशनचा डबा आणि मी त्यात जनरलचं तिकीट घेऊन घुसलेले. टीसी नेमका त्याच डब्यात असावा? त्याने मला मारक्या बैलासारखं बघितलंच. तो माझ्याकडे येणार तेवढ्यात मीच गेले आणि म्हटलं, ‘मी पत्रकार आहे आणि सुटीसाठी आले होते. आता माझी गाडी चुकलीय आणि ऑफिसला तर जायचंय.’ विश्वास बसावा म्हणून रिझर्वेशन आणि आयकार्ड दाखवलं. म्हणाला, ‘35 ते 90 मध्ये सीट रिकाम्या आहेत. कुठेही जाऊन बस. पण तिकिटाचा 90 रुपये फरक भरावा लागेल.’ पडत्या फळाची आज्ञा. गेले आणि बर्थवर आडवी झाले तर झोपच लागली. मनमाड आलं आणि तो समोर येऊन बसला हेही कळलं नाही. ‘मॅडम, मनमाड आलंय. ते पण चुकवायचंय का? ही गाडी शिर्डीला जाणार आहे.’ मी खाडकन उठले. त्याच्या हातात शंभराची नोट टेकवली. म्हणाला, ‘पावती फाडू का?’ मी म्हटलं ‘नाही फाडलीत तरी चालेल.’ त्याने ‘प्रामाणिकपणे’ पन्नास रुपये परत केले.
प्लॅटफॉर्मवर समोर दोन गाड्या दिसत होत्या. समरसता आणि दुसरी कुठली तरी होती. धावत पळत तब्बल एक किमीचा प्लॅटफॉर्म पार करून जवळपास 9 तास लेट असलेल्या समरसतामध्ये समरस व्हायचं असं ठरवलं. एक सीट रिकामी दिसली. सरळ जाऊन बसले. तेव्हा सकाळचे साडेदहा झाले होते. आजूबाजूचे लोक अशा विचित्र नजरेने बघत होते, जणू मी परग्रहावरून आलेय. समोर नागपूरहून आलेला एक माणूस बसला होता. त्याच्या तोंडासमोर पुस्तक उघडून बसले. पण त्याने बडबड करायला सुरुवात केलीच. नागपूर, पुणे, मुंबई असा सगळा प्रवास त्याने बडबडीतून घडवला. काही खाल्लेलंही नव्हतं. तसंच काहीबाही खाऊन, या खच्चून भरलेल्या गाडीत मुंबईपर्यंत आले. ही गाडी शेवटी कुर्ला स्थानकात दुपारी साडेतीन वाजता सुस्कारे देत थांबली आणि मी पळतच टॅक्सी गाठली. चार-सव्वाचारला ऑफिसात पोचले तेव्हा माझा चेहरा बघण्याजोगा (की न बघण्याजोगा ?) झाला होता. नीट केलेल्या प्लॅनिंगचा धुव्वा कसा उडतो आणि वेळ पाळली नाही की काय होतं, हे मला आणि माझ्या बहिणीच्या नवर्‍याला चांगलंच कळलं!

गुलमोहर: 

प्रवास्वानुभव... >>>
ललित वाचलं नाहीये अजून. पण प्रवास्वानुभव या शब्दाने कोड्यात टाकलंय मला. प्रवासानुभव असायला हवा ना तो शब्द??? Uhoh

प्रवास्वानुभव या शब्दाने कोड्यात टाकलंय मला. प्रवासानुभव असायला हवा ना तो शब्द???
>>> प्रवास्वानुभव म्हणजे प्रवासाचा मी स्वतःच घेतलेला अनुभव... असे काही किस्से मी इथे लिहिणार आहे आता... Happy

Happy

कोके, नशीबवान आहेस तु, रेल्वे सौजन्य सप्ताहात हा प्रवास केलेला दिसतोयस. चक्क टीसी ने पैसे परत केले तुला? Proud

ठमे, सॉरी पण मला यात फारसं एक्सायटींग वगैरे काही वाटलं नाही. हा असे अनुभव त्रासदायक असतात Wink
आणि प्लानींग करुनही हे असं होतं तेव्हा तर जाम वैताग येतो.
मागच्या वर्षी एका चुलतबहिणीच्या लग्नासाठी गावी गेलो होतो. लग्नाच्या दुसर्‍या दिवशी रात्री कुर्डुवाडीहून परतीचं रिझर्वेशन होतं. आमच्या गावी घोटीला फक्त एकच एस.टी. जाते, सकाळी साडे सात वाजता कुर्डुवाडी ते करमाळा अशी ही गाडी. परत संध्याकाळी साडे सात वाजता करमाळा कुर्डुवाडी बनुन परत फिरते. सकाळी ९-९.३० च्या दरम्यान घोटी, आणि परतताना साडे आठ ते नवाच्या दरम्यान. वेळेवर आली तर तिला कुर्डुवाडीला पोचायला साडे दहा अकरा होतात. त्यामुळे माझी परतीची गाडी जिचं रिझर्व्हेशन केलं होतं ती सिद्धेश्वर मिळु शकते (रात्री साडे बाराच्या दरम्यान)
त्या दिवशी नेमकी हि गाडी (एस.टी) कशामुळे तरी कॅन्सल झाली. (तशी ती नेहमीच होते) नशिब ती कॅन्सल झाली हे दुपारीच कळलं होतं. (ड्रायव्हर जगन्नाथ राऊत आमच्याच गावचा आहे सुदैवाने) माझं रिझर्वेशन तर होतं. म्हणुन धडपडत दुधाच्या ट्रकने केम गाठलं. घोटीपासुन साधारण १० किमी. संध्याकाळी साडे सहा वाजता तिथुन एक एस. टी. पकडुन कुर्डुवाडीला आलो, साधारण ९ वाजले असावेत रात्रीचे. तासभर इकडे तिकडे टाईमपास करुन स्टेशनवर आलो, केप मुंबई एक्सप्रेस लागली होती. माझं तिकीट वरच्या खिश्यात होतं. गाडीच्या या टोकापासुन त्या टोकापर्यंत चक्कर मारली. म्हणलं बघु कोणी ओळखीचं दिसतय का? ती गाडीही त्या दिवशी तासभर लेट आली होती.
नंतर आरामात १२ च्या दरम्यान सिद्धेश्वर येवुन थांबली. मी पळत पळत A1 बोगीपर्यंत जावुन पोचलो, रिझर्वेशनची लिस्ट बघीतली त्यात माझे नावच नाही. टी सी ला पकडला, त्याला हातातले तिकीट दाखवले.
"साहेब , माझे रिझर्वेशन आहे, पण इथे लिस्टवर माझे नावच नाही, असे कसे झाले."

त्याने तिकीट बघितले, एकदा माझ्याकडे बघितले....
"साहेब तुम्ही शिकली, सवरलेली माणसे....!" मी चाट.....
त्याने तिकीट माझ्या हातात दिले, तिकीट पाहताना मला एकदम आठवले. परतीचे बुकींग करताना सिद्धेश्वर फुल्ल आहे म्हणुन मी केप मुंबईचे बुकींग केले होते. माझ्या डोक्यात मात्र सिद्धेश्वरच होती आणि केप मुंबई थोड्याच वेळापुर्वी मला वाकुल्या दाखवत निघुन गेली होती.
पुढची गाडी सकाळी साडे पाच वाजताच होती. शेवटी ठरवले बसने जावु.

तिथुन आमची यात्रा कुर्डुवाडी एस.टी. स्थानकावर आली. विचार असा होता की मिळेल ती गाडी पकडुन इंदापुरपर्यंत जायचे व तिथुन पुन्हा बदलुन मिळाली तर थेट मुंबई, नाहीतर पुणे, पनवेल जसे जमेल तसे गाड्या बदलत निघायचे. पण मुंबई. गेला बाजार इंदापुरकडे जाणारी एकही गाडी अशी येइना की जिच्यात उभे राहायला जागा मिळेल. रात्री अडीच पर्यंत वाट बघुन कंटाळलो. कुणीतरी सांगीतले की बार्शीवरुन पहाटे पाच वाजता मुंबईला गाडी आहे. इथुन आता सकाळी ९ वाजताच गाडी. झाले पुढची गाडी पकडुन आम्ही बार्शीला हजर.
(एकदाही डोक्यात आले नाही की सकाळी साडे पाचची ट्रेन पकडुन मुंबईला जाता येइल)
वेळ झाली होती पहाटेचे साडे चार, पावणे पाच ! म्हटले पंधरा मिनीट वेळ आहे अजुन तोवर चहा मारुन घेवु. म्हणुन स्टँडच्या बाहेर येवुन चहा घेतला. चहा घेतला आणि इतका वेळ शांत असलेल्या पोटाने असहकार पुकारला. दुसरा पर्यायच नव्हता...
"सुलभ" झिंदाबाद !

बाहेर आलो, ५.१० झाले होते. धावत पळत फलाट गाठला.
"मुंबई गाडी कुठे लागते हो?"
"हि काय आत्ताच गेली!"
मी तिथेच बाकड्यावर बसलो.

समोरच सोलापूर जनता गाडी लागली होती, ती पकडुन सोलापूर गाठले. आई-आण्णा अवाक !

"अरे मुंबईला जाणार होतास ना तू परत?"

मी काही न बोलता खुणेनेच नंतर सांगतो म्हटले आणि बेडरुममध्ये जावुन ताणुन दिली.

याला म्हणतात एक्सायटींग .......! Proud

ठमादेवी तुमचा हा॑ किस्सा वाचुन मला थोड आश्चर्य आणि प्रचंड उद्वेग आला. 'वैय्यतिक लाभासाठी यंत्रणेचा गैरवापर' म्हणजे भ्रष्टाचार असा माझा समज होता आणि तो आपले नेते आणि सरकारी नोकर करतात अस आपल्या व्यवसाय बंधु भगिनिंच्या लिखाणातुन जवळपास रोजच कळत. त्या पार्श्वभुमिवर आपल टी सी ला पावती न फाडण्याची परवानगी देण्याच औदार्य प्रचंड खटकल. ज्या अर्थी आपण ही गोष्ट इथे पब्लिक फोरम वर लिहलित त्यावरुन तुम्हाला ह्यात काहिहि चुकिच वाटत नसाव असा मी निष्कर्श काढला आणि त्याच आश्चर्य वाटल आणि चीडहि आलि. कधि कधि नोकरशाहि आपलि प्रचंड अडवणुक करते आणि त्यांच्या हातात असलेल्या अधिकाराकडे बघता लाच देण्यावाचुन पर्याय नसतो हे वास्तव आहे. पण टी सी ला त्याच्या कार्यकक्षेत येणार काम करण्याबद्दल बक्षिसि देण्याच औदार्य मला खरच कळल नाहि मात्र 'भ्रष्टाचाराने किडलेलि, पोखरलेलि यंत्रणा कशी तयार होत जाते ह्याच सोदाहरण स्पष्टिकरण मात्र मिळाल!

प्रवास्वानुभव असं शीर्षक द्यायचं कारण कळलं नाही.
दुसर्‍याने केलेल्या प्रवासाचे अनुभव आपण शब्दबद्ध केल्याचे मी अजून वाचलेले नाही.

विकु... आपण जेव्हा त्यातून जात असतो तेव्हा त्याचा वैताग येतोच... पण नंतर त्याकडे वळून पाहिल्यावर मात्र ती गंमत वाटते... आणि प्रत्येकवेळी प्रत्येक प्रवास मला काही ना काही शिकवत आलेला आहे. त्यामुळे मी त्याला वैताग न म्हणता एक्सायटिंग म्हटलेलं आहे... बाकी हे असले अनुभव प्रत्येकाच्या आयुष्यात येतात कधी ना कधी.. पण माझा प्रत्येक प्रवास हा असाच गडबडीचा होतो...
भरत- हा एकच भाग मी अजून लिहिला आहे... मला मान्य आहे की प्रत्येकजण स्वतःच्याच प्रवासाचे अनुभव लिहितो... मग तुम्हीच नाव सुचवा याला... तुमच्या सूचनेचं स्वागत आहे...