वपु- भाग २

Submitted by रुणुझुणू on 25 December, 2010 - 11:31

०९/०६/२००१

काल दिवसभर खूप धावपळ. क्लिनिकमध्ये केस प्रेझेण्टेशन. सगळ्या गोंधळात दुपारचं जेवण संध्या. ५:३० ला.
६:३० वाजता मी आणि सई बापूंकडे जायला निघालो. (वपुंना त्यांच्या जवळचे लोक 'बापू' म्हणतात. आम्ही कधी 'बापू' म्हणायला लागलो कळलं सुद्धा नाही.)
२५ मार्चला बापूंच्या वाढदिवसानिमित्त दादर-माटुंगा सांस्कृतिक हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमानंतर मध्ये बापूंची भेटच नाही. फोन वर जरी बोललं तरी बरं वाटतं. पण बरेच दिवस झाले फोन सुद्धा लागत नाहीये.आम्ही जाम घाबरलो होतो. अर्थात माझं मन सांगत होतं की बापू एकतर स्वाती-सुहासकडे गेले असतील किंवा मग फोन खराब असेल.
झपूर्झा...बेल वाजवली. जोशीकाकांनी दार उघडलं. आत शिरलो. बापू आतल्या खोलीतून बाहेर येत होते.
"या."
त्यांच्यासाठी घेतलेली फुलं त्यांना दिली. एक माझी निवड. एक सईची.
"बापू, कुठलं आवडलं ?"
" दोन्हींत कोणतं फूल छान आहे हे ठरवणं, खरंच अशक्य आहे."
बापूंनी आमचं संभाव्य भांडण तिथेच मिटवून टाकलं.
" खूप दिवसांनी आलात." डोळे ओले.
खरंच 'म्हातारपणी धरण फुटायला एखादंच छिद्रही पुरत असावं.'
"बापू, आम्ही किती घाबरलो होतो. फोन का लागत नव्हता?"
"नंबर बदलला. घाबरला होतात ते 'आता गेल्यावर भिंतीवरच फोटो दिसेल' म्हणून का?"
बापू खुषीत होते. ह.मो.मराठेंच्या भाषेत सांगायचे तर- ' वपुंची आतषबाजी सुरू झाली होती. वेळ मजेत जाणार तर.'
तेवढ्यात समीर म्हणून एक अमराठी माणूस आला. त्याने बापूंचं 'नको जन्म देऊ आई' आणलं होतं. बापूंनी स्वतः त्या कविता वाचून दाखवल्या.
समीरसाठी त्या कविता इंग्लिशमधून ट्रान्सलेट करून सांगितल्या.
समीरच्या मैत्रिणीला वाचनाची आवड आहे. तिला खूपच बरं नव्हतं.तिनेच त्याला बापूंकडे पाठवलं होतं. ती स्वतः कधीच बापूंशी बोलली नव्हती.
बापूंनी समीरकडून नंबर घेऊन तिला फोन लावला. तिच्याशी आणि तिच्या आईवडिलांशी बोलले.
कुणी सांगूनही विश्वास बसला नसता की बापू त्या सगळ्यांशी पहिल्यांदा बोलत होते. He is simply great !
संवादाचं मस्त कसब आहे त्यांच्याकडे.
सगळेजण पाणीपुरी खाऊन आलो.
गप्पा मारताना बापू मध्येच म्हणाले, " आज नातीला पहावंसं वाटतंय, लहानपणीच्या रूपात. 'कळत-नकळत' ची सीडी मागवलीये."
आणि अगदी स्पोन्टॅनियसली विचारलं, " कंपनी देणार? "
I was really shocked !
कारण तिकडे जातानाच ट्रेनमध्ये मी सईला म्हणाले होते, " मला बापूंसोबत दिवसभर राहून त्यांची दिनचर्या पहायची आहे गं. त्यांचा स्वभाव जवळून अनुभवायचाय."
दहावीचा रिझल्ट लागल्यावर मी स्वाध्यायच्या दादांना ( पूज्य पांडुरंगशास्त्री आठवले ) भेटून आले, तेव्हा मी किती दिवस आईचं डोकं खाल्लं होतं, मला एक दिवसतरी दादा आणि दिदींसोबत रहायचंय म्हणून.
अशा मोठ्या लोकांच्या छोट्या-छोट्या गोष्टी जवळून निरखायची ओढ कायम असते माझ्या मनात.
पण ती इच्छा अशी पुरी होईल असं वाटलं नव्हतं.
होस्टेलवर फोन करून सांगितलं.
डॉ.जोशी आल्या. बांदरा वेस्टला त्या गायनॅकॉलॉजिस्ट म्हणून काम करतात.
आल्या आल्या बापूंनी चुगली केली, "डॉक्टर, ह्या दोघी तुम्हाला घाबरतात."
डॉक्टर- " का गं, viva घेते म्हणून का? "
( पहिल्याच भेटीत त्यांनी आम्हाला डायबिटिसवर ए टू झेड सगळं विचारून उलटंपालटं घुमवलं होतं !)
त्या पण मस्त आहेत. बापूंबरोबरची माणसं साधी असणं अर्थात शक्यच नाही. त्यांची तत्वं आणि त्यावरची त्यांची स्वतःची श्रद्धा. सहीच !

एक खूपच अशक्य वाटणारी गोष्ट झाली आज.
' मी ऑम्लेट खाल्लं --अंड्याचं.'
For the first & hopefully last time.
(देवा, प्लीज नवरोबाच्या घरचे सगळे वेजिटेरियन असू देत. मला अगदी मनापासून न आवडणार्‍या गोष्टी आहेत ह्या. नॉन्-व्हेज, स्मोकिंग, अल्कोहोल....आणि चहा !)
माझ्या महान 'न-आवडी' ऐकून बापूंचा शेरा- " चहा पीत नाहीस, अंडं खात नाहीस. सरळ रामदासी का नाही होत ?"
हम्म्म. काय बोलणार ?
डॉ़क्टर दमून आल्या होत्या. त्या म्हातार्‍या-कोतार्‍यांना स्वयंपाकाचा ताण देण्यात अर्थच नव्हता. आणि त्यांनी मला उपाशी राहू दिलं नसतं. त्यातून बापूंचं इतकं लहान मुलासारखं चाललं होतं- "सई, आज आपण हिला अंड्याची चव काय असते दाखवू. ए मनू, पण गरम-गरम खाण्यातच मज्जा आहे. गार करून तुला चव कळणार नाही."
इतका गोंधळ चालला होता त्यांचा. त्यांच्या निरागसतेकडे पाहून मला इतकी गंमत वाटत होती. शेवटी मी ते उचललं. मनाचा हिय्या करू पहिला घास घेतला. कसंबसं एक सॅण्डविच संपवलं. मला रात्रभर आणि दुसर्‍या दिवशीही मळमळल्यासारखं वाटत होतं......
सईने एकच कप चहा प्यायला लावला, बापूंनी एकच ऑम्लेट सॅण्डविच खायला लावलं...आता भावी नवरोबांनी चिकन-मटन खायला लावू नये, म्हणजे मिळवलं !
ह्या सगळ्या व्यक्ती माझ्या एक्स्ट्रीम आवडत्या आणि ह्या सगळ्या गोष्टी एक्स्ट्रीम नावडत्या !
'कळत-नकळत' आणि 'झनक झनक पायल बाजे'. दोन सीडी मागवल्या होत्या बापूंनी. आधी झनक झनक लावला. बापूंच्या वडिलांचं नेपथ्य. अप्रतिम पिक्चर ! खरंतर आमच्या पिढीने ते संध्याचं मान वेळावणं, बाकीच्यांचे आम्हाला नाटकी वाटणारे संवाद, हे सगळं पहायचं म्हणजे एरवी अशक्यच.
पण हा पिक्चर मात्र खरंच आवडला.
चित्रकला (नेपथ्य), नृत्य, लताचा आवाज आणि तो तबला.....simply marvellous !
आठ दिग्गज कलाकारांनी ह्यात वाद्यं वाजवली आहेत. हरिप्रसाद चौरासिया, बिस्मिल्लां खां, शिवकुमार, अल्लारखां हे त्यातले काही. तो तबला ऐकताना तर अक्षरशः वेड लागत होतं. शेवटचं 'शिवतांडवनृत्य' तर अप्रतिम !
आज बापूंनी दाखवला नसता तर एवढा छान पिक्चर बघायचा राहून गेला असता. ऑडिओ कॅसेट तरी घ्यायलाच हवी आहे सध्या. व्हीसीडी.....बडी होने के बाद !
बापू आणि डॉक्टर दोघेही त्यातले जाणकार. अगदी रंगून गेले होते.
बापू फोनवर कोणाशी तरी बोलताना म्हणालेच होते, " Today I am the happiest man in the world. अण्णांची कॅसेट पाहणार आहे आज."
वडिलांबद्दलचा अभिमान त्यांच्या चेहर्‍यावरून अगदी ओसंडून वाहत होता.
पहाटे २:३० वाजता पिक्चर संपला. बापू झोपायला निघाले. आम्हाला आतल्या एका खोलीत झोपायसाठी तयारी करून दिली. आम्ही कसल्या झोपतोय ?
निवांतपणे नाईट लॅम्पच्या प्रकाशात पुस्तकं वाचत बसलो.
सईच्या हातात ' नजराणा '. माझ्या हातात ' का रे भुललासी '.
फारतर दीड-दोन तास झोपलो असू. सकाळी ६:३० लाच जाग आली. स्लायडिंग विंडोजमधून बाहेरचा पाऊस आणि त्यात निथळणारी झाडे दिसत होती.काचा थोड्याशा बाजूला सरकवल्या.मग तर पावसाचा आवाज आणि आत घुसणारा गारवा.....वेड वाढायला आणखी काय पाहिजे ?
८-८:३० ला बापू आत आले.आम्ही निवांतपणे गप्पा मारत बसलो होतो.
बापूंनी विचारलं, " अगं, झोपलाच नाहीत का तुम्ही ? कमाल आहे तुमची !"
येऊन त्यांच्या इझी-चेअरवर बसले. एक मस्त कॅसेट टाकली.
खूप सही गाणी सगळी.
'उठाये जा उनके सितम'
'वो चांद खिला'
'किसीकी मुस्कुराहटोंपे'
'सबकुछ सीखा हम ने'
'कुछ तो लोग कहेंगे'
एक से एक !
आम्हाला कॅसेट लावून दिली आणि ते परत गेले झोपायला.
खूप छान वाटत होतं.सगळं स्वप्नवत्.
उठलो, आवरलो, पोहे खाल्ले.
....खरंतर चार शब्दांत तो सगळा वेळ मांडता येणं शक्यच नाही. तिथलं प्रत्येक वाक्य मनात खोल खोल उतरत होतं. शिंपलीतल्या मोत्यासारखं साठून राहत होतं !
फोटो पाहिले. एकच बॉक्स पहायला कित्ती वेळ लागला.
खरंच अवलिया माणूस आहे !
रस्त्यांचे, झुंबरांचे, कळस म्हणजे परदेशातल्या एका हॉटेलमधल्या टॉयलेट अ‍ॅक्सेसरीज एकदम हटके होत्या, म्हणून त्यांचेही फोटो काढलेत.
सई म्हटलीच, "बापू, हे क्काय ? टॉयलेटचे काय फोटो काढलेत ?"
बापू मिस्किल हसले. " सौंदर्य आणि कल्पनाशक्ती कुठेही दिसू शकते. त्याला काय कळतंय हे टॉयलेट आहे म्हणून."
स्वातीला दिलेला ' घरचा आहेर '.
बापूंमधल्या 'बापाचं' दर्शन...अत्यंत लोभस, हलवून सोडवणारं.
प्रत्येक फोटोशेजारची कमेंटही सही.
स्वातीच्या वेण्या घालतानाचा एक फोटो आहे. किती भूमिका सांभाळल्या....अंहं, 'जगले' आहेत बापू त्या भूमिकांमध्ये. अगदी जीव ओतून !
त्या दिवशी डोंबिवलीला कार्यक्रम होता. 'चतुरंग प्रतिष्ठान' तर्फे sort of public interview.
मन म्हणत होतं ' जायचं '. बुद्धी थोपवून धरत होती. आदल्या रात्रीचं जागरण, तेही कॉन्टॅक्ट लेन्स डॉळ्यांत ठेऊन, आता इथून जाऊन वॉर्डस अटेंड करायचे......प्रॅक्टिकल गोष्टी स्वप्नांच्या राज्यातून बाहेर खेचत होत्या !
निघालो. स्वत:च्याच घरातून निघाल्यासारखं वाटत होतं.
सकाळी डॉक्टरांनी कॉफी बनवली तेव्हा सई म्हणाली, " अगदी घरी आल्यासारखं वाटतंय."
तेव्हा डॉक्टर हसत म्हणाल्या होत्या, " पहिली वेळ आहे इथे रहायची, म्हणून हातात कप देतेय. पुढच्या वेळेपासून भरपूर कामं करायला लावणार हं मी."
बापुंचा नेहमीसारखा आम्ही जिन्यातुन वळेपर्यंत दारात उभं राहून, हात हलवून दिलेला निरोप आणि मग सगळ्या क्षणांना सेपेरेट करून त्यांना पुन्हा पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करत आमचं त्या कलानगरच्या रस्त्यावरून चालणं !
' आपण खूप उशिरा जन्माला आलो ' आणि ' ठीक आहे, जे मिळतंय ते सुद्धा काही कमी नाही ' हे परस्परविरोधी विचारही नेहमीचेच.
सगळं तसंच. फक्त एक नवीन अवर्णनीय समाधान....' येस्स, बापूंच्या चोपडीत आपलं नाव रजिस्टर झालंय.'
........माणसं जोडण्याची आणि 'शहाण्या' माणसांनाही 'वेडं' करण्याची कला तेवढी शिकवाल का हो बापू आम्हाला ?
**************************************************************************************************
वपु- भाग-१ http://www.maayboli.com/node/22160
वपु- भाग-३ http://www.maayboli.com/node/22236

गुलमोहर: 

खल्लास....काय शब्दच नाहीत....
आय जस्ट एन्व्ही यू....
बाकी काय बोलू....

wow रुणुझुणू...तुम्हाला वपुंच्या घरी रहायला मिळाल?...amazing...

सहीच् expereince आहे...मागच्या लेखातली तुमची एक भेट्च् मला J करून गेली होती..आताच तर विचारूच् नका..:)

तिस-या भागात् त्यांनी तुम्हाला दत्तक घेतल वगैरे लिहिणार आहात की काय? :)...

पण खरच् छान अनुभव कथन केलात तुम्ही...वर्णन उत्तम आहे !

३-या भागाच्या प्रतिक्षेत...

आशु, परीक्षित, बित्तुबंगा.....धन्स. Happy
<<तिस-या भागात् त्यांनी तुम्हाला दत्तक घेतल वगैरे लिहिणार आहात की काय? >> Proud
परीक्षित, नाही. पुढचा भाग टायपताना मला जाम त्रास झालाय. वाचताना तुलाही होईल. जमलं तर आज टाकते.

आधीचा फक्त ट्रेलर होता.. आता चांगला मोट्ठा .....जे (फॉण्ट साईज ७२) !!!

आवडला ( बळंच Happy )

लिखाणाला मात्र मनापासून दाद देतोय. आणि हे सगळं इथं शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

रुणुझुणू ,लेखक व.पु आम्हाला त्यांच्या गोष्टींतुन कळले ,पण माणुस म्हणूनही ते तितकेच great होते ,हे तुझ्या लेखातुन कळत आहे. खूप छान लिहीले आहेस्.पुढच्या लिखाणाच्या प्रतिक्षेत आहे .

<<आता चांगला मोट्ठा .....जे (फॉण्ट साईज ७२) !!!>> Proud
<<आणि हे सगळं इथं शेअर केल्याबद्दल धन्यवाद.>> झंडु, 'लेख टाकते' हे मी मंदारला सांगून जवळजवळ महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला. त्यानंतर मी बाकीचं लिखाण बरंच टाकलं पण हे लेख टाकायला जरा हेझिटेट होत होते. खूप पर्सनल अनुभव आहेत . टाकावेत की नाही, या संभ्रमात होते. तुझ्या आणि समईच्या वाक्यांनी बरं वाटलं. Happy
समई, नीलु....धन्स.
कदमसर, अनुभव सुमार वाटला की लेखाची भाषा सुमार वाटली ? Uhoh असो. Happy

लेख चांगलाच आहे.
वपुंचा एक चाहतावर्ग होता. वपुंचे जे टीकाकार होते ते ही आधी त्यांच्याकडे आकृष्ट झालेच होते. एक वेगळी शैली त्यांनी मराठी साहीत्यात आणली आणि तिच्याशी ते प्रामाणिक राहीले. कुणाला आवडो न आवडो.. हे देखील शिकण्यासारखं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे वपु कुणाला आवडो न आवडो ते दिग्गज साहीत्यिक होते ही वस्तुस्थिती उरतेच.

अशी माणसं प्रत्यक्षात कशी असतात. ती वागतात कशी, काय बोलतात, काय ऐकतात, काय वाचतात हे प्रश्न सर्वांना पडतात. हा लेख वाचल्यानंतर माणसं मोठी का असतात याची उत्तरं मिळून जातात. त्याबद्दल लेखिकेचे अभिनंदन ..

ग्रेट.. रुणुझुण्...लकी आहेस..!

हे सगळं इथं शेअर केल्याबद्दल धन्यवाद.>>> १००० मोदकं
लिखाणही सुंदर.....आणखी वाचायला आवडेल.

काल लिंक बघितली विपुत आणि आज सकाळी लवकर काँप सुरु करुन वाचायला बसलो.
नि:शब्द झालोय! वपु म्हणजे अजब रसायन हेच खरं!!

सही लिहीतेस Happy

भाग ३ ची वाट बघतोय.

खूप छान लिहिते आहेस.......अगदी आतलं.....:)

अनिल, चातक, सावली, रचु, मंदार, जयुताई धन्यवाद. Happy
<<सर्वात महत्वाचं म्हणजे वपु कुणाला आवडो न आवडो ते दिग्गज साहीत्यिक होते ही वस्तुस्थिती उरतेच.>> अगदी खरंय अनिल.
<< खूप छान लिहिते आहेस.......अगदी आतलं..>> खरंच हे खूप आतलं, मनाच्या जवळचं आहे. तुम्हालाही ते आवडतंय, हे पाहून आनंद झाला. Happy

<<<कदमसर, अनुभव सुमार वाटला की लेखाची भाषा सुमार वाटली ?>>>>

अनुभव खुपच छान.......... पण लेखाची भाषा खुपच हलक्या प्रतीची वाटली.
Never mind. कारण तुमचे लेख वाचताना एका वेगळ्याच विश्वात मी हरवून जात असतो.

Eagerly waiting for next part.

<<पण लेखाची भाषा खुपच हलक्या प्रतीची वाटली.>> Lol
असू शकतं बुवा. बोली भाषा काहींना हलक्या प्रतीची वाटू शकते. अलंकारिक काही नाही ना त्यात.
मला लिहायचंच नव्हतं अलंकारिक. अनुभव साधा-सरळ, म्हणून भाषा साधी-सरळ.
आणि हो, हलक्या प्रतीचा दुसरा अर्थ अभिप्रेत असेल तर, तसले शब्द नाहीत ह्या लेखात.
रच्याकने.....आजच मला काही मित्रांनी सांगितलं की,
"तुझे लेख छान असतात...शब्दबंबाळ न करता लिहितेस तू." Happy
( तुम्ही लिहायच्या आधीची प्रतिक्रिया आहे ही. त्यामुळे ते माझ्या सांत्वनासाठी नक्कीच म्हणाले नसणार. Proud )
पान, स्मिता, ठमादेवी...धन्स.

wow!!! सह्हीच गं...तू अ‍ॅक्चुली एवढ्या जवळुन अनुभवलंस वपुंचं वलय....खरंच हेवा वाटतो Happy