एक भेट बाबा आमटेंशी- इट वॉज डेस्टाइन्ड

Submitted by ठमादेवी on 25 December, 2010 - 07:29

आकाशवाणीच्या हॉलमध्ये अभय बंग यांचा कार्यक्रम संपला आणि गाडीत बसल्यावर कुमार केतकरांनी मला विचारलं.
‘जाणार का शोधग्रामला?’
नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. 2003 च्या मार्च महिन्याच्या आसपास गडचिरोलीच्या आदिवासी पाड्यांमध्ये मृत्यूपासून बचावलेल्या अर्भकांचा ‘अंकुरोत्सव’ आयोजित केला होता. त्यासाठी जायचं असं ठरलं. आकाशवाणीच्या एक अधिकारीही सोबत जाणार होत्या. त्यांच्यासोबत विदर्भ एक्सप्रेसमध्ये चढल्यावर मला थोडी साशंकताच होती की आपण नेमके कुठे जाणार आहोत, काय पाहणार आहोत.. पण त्यानंतरचे दोन दिवस माझ्या आयुष्यात कधीही न विसरण्याजोगे आहेत.
नागपूरहून गडचिरोलीतलं धानोरा आणि तिथून शोधग्राम.. जिथे अभय बंग आणि राणी बंग यांनी आपलं नंदनवन फुलवलं आहे. अत्यंत नीटनेटकं, देखणं छोटंसं गावच जणू. लाल रंगाच्या भिंती, त्यावर वारली पेंटिंग, ठिकठिकाणी झाडं, छोटेखानी आखीव-रेखीव रस्ते असं डोळ्यांत साठवून ठेवण्यासारखं हे छोटंसं गाव. हो गावच.. तिथे आदिवासी मुलं राहतात, शिकतात, त्यांच्या आया काहीबाही काम करतात, बचतगट चालवतात, एक छोटं हॉस्पिटलही आहे इथे. हे सगळं गाव फिरले. इथे दुसर्‍या दिवशीच्या कार्यक्रमानिमित्त काही स्वयंसेवी संस्थाही आल्या होत्या आणि असंच फिरता फिरता नेमके मंदार फणसे (हा सध्या आयबीएन लोकमत वृत्तवाहिनीचा सहसंपादक आहे) आणि मंदार भारदे भेटले. तीन मित्र जमा झाल्यावर एकत्र फिरणं, गप्पा मारणं, त्याचबरोबर मंदार-1 चं शूटिंग, माझं काम असं सगळं केलं. दुसर्‍या दिवशीच्या अंकुरोत्सवही डोळे भरून पाहिला. पण खरी एक्साइटमेंट पुढेच सुरू व्हायची होती.
मंदार-1 म्हणाला ‘मी हेमलकसाला चाललोय प्रकाश आमटेंकडे. मंदार-2 ही येतोय. येतेस का?’
मला जागेचा काहीच अंदाज नसल्याने नाहीच म्हटलं.
मग गंमतीत म्हणाला,
‘बघ हं, नक्षलवादी दाखवेन तुला, पस्तावशील.’
शेवटी ‘नक्षलवादी दाखवायच्या अटीवर’ मी जायला तयार झाले. त्यानंतरच्या दिवशी संध्याकाळी सातची सेवाग्राम एक्सप्रेस मला नागपूरहून पकडायची होती. तेवढा वेळ होताच हातात.
त्या दिवशी संध्याकाळी पाचच्या आसपास आम्ही शोधग्रामहून निघालो. सुमारे 250 किमीचं अंतर आणि छत्तीसगढच्या सीमेपासून जेमतेम दोन किमी अंतरावर हेमलकसा, वाटेत किर्र्र जंगल. या जंगलातून आम्ही निघालो होतो. मार्च महिना म्हणजे तेंदुपत्याचा (विडीची पानं) सीझन. ही पानं लवकर खाली पडावीत यासाठी आदिवासी लोक जंगलातली जमीन जाळतात. असाच मोठ्ठा ‘वणवा’ आम्ही जातानाच पाहिला. माझ्या मनात खूप भीती होती. एवढ्या मोठ्या जंगलात फक्त आमची गाडी आणि गाडीत आम्ही पाचजण. आसपास काहीही नाही. याच सीझनमध्ये नक्षलवादी तेंदुपत्याच्या कंत्राटदारांच्या गाड्या अडवून खंडणी वसूल करतात, अनेकदा जाणार्‍या इतर गाड्या थांबवून ‘पुढच्या ठिकाणापर्यत सोड’ असंही सांगतात, मंदार म्हणाला. त्यामुळेही मला खूप भीती वाटत होती. डोळेच मिटून घेतले. कशासाठी मी इथे आलेय असं वाटू लागलं होतं. पण त्याचं उत्तरही मला नंतर मिळालं आणि या मूर्खपणासाठी मी डोक्यावर हात मारून घेतला. रात्र पडल्यावर रस्त्यावरून कोल्हे, ससे धावत होते आणि आदिवासी त्यांच्या शिकारीसाठी जातानाही दिसत होते.
बल्लारशा गेलं, पाठोपाठ अहेरी गेलं. रात्रीचे 8.30 झाले असतील. वाटेत खानावळीत जेवलो आणि मग रात्री 10.30 वाजता हेमलकसाला पोहोचलो. मंदार परिसराची, तिथल्या परिस्थितीची माहिती देतच होता. ऐकावं ते नवलच असं वाटत होतं.
पोहोचलो तर आमटेंच्या कुत्र्याने वर्दी दिली. प्रकाश आमटे, त्यांच्या पत्नी, मुलगा दिगंत असे सगळे बाहेर आले. थोड्या गप्पा झाल्यावर मला सकाळी सहा वाजता उठवायचं ठरलं आणि झोपायला गेलो. रात्री झोप कसली लागते? अंधारात मग मंदारसोबत गप्पा मारत बसले. कशीबशी झोप लागली. मला तेव्हा खरंच माहीत नव्हतं की दुसरा दिवस माझ्यासाठी एवढी सगळी आश्चर्यं आणि आयुष्यभर पुरेल असा अनुभव देणार आहे..
सकाळी नाश्ता करायला गेलो तर तो कुत्रा माझी वाटच पाहत बसलेला. आधीच मला कुत्रे आवडत नाहीत आणि त्यांची भीती वाटते. तो भुंकला नाहीच पण त्याच्याशी मैत्री झाली. प्रकाशभाऊ म्हणाले, ‘तो आणि प्रकाशभाऊंकडे असलेलं एक माकड दोघं एकाच पिंजर्‍यात गळ्यात गळे घालून झोपतात. त्यांना एकमेकांशिवाय झोप लागत नाही.’ मला एवढी गंमत वाटली!
मग दिगंत आणि त्यांचा आदिवासी डॉक्टर पांडू यांच्यासोबत प्रकाशभाऊ मला लोक बिरादरी प्रकल्प पाहायला घेऊन गेले. तिथे खूप पेशंट्स.. एका पेशंटच्या गालाला मधमाशी चावली होती आणि त्याच्या गालात पू जमा झाला होता. भाऊंनी माझ्यासमोरच तो फोडला आणि पू बाहेर काढून जखम धुवून काढली. पण त्या रुग्णाच्या चेहर्‍यावर जराही वेदना उमटली नाही. भाऊ म्हणाले, ‘या आदिवासींमध्ये खूप सहनशक्ती असते. हेच ऑपरेशन मला शहरातल्या रुग्णांवर अ‍ॅनेस्थेशिया देऊन करावं लागलं असतं. त्यांच्यामध्ये जीवनसत्वांची खूप कमतरता असते आणि त्यामुळे जराही काही झालं की त्याचं लगेच सेप्टिक होतं.’ तिथे रुग्णांसोबत नातेवाइकही होते. त्यांनी बाहेरच चुली मांडल्या होत्या. मध्येच मंदारही जॉइन झाला. ‘हेमलकसानंतर पुढे छत्तीसगढमधल्या बस्तरपर्यंत काहीही सुविधा नाहीत. कुणी आदिवासी आजारी पडला की त्याला पलंगावर (चारपाई) बांधतात आणि चालत चालत आणतात,’ प्रकाशभाऊ म्हणाले. मग आम्ही पुन्हा घराकडे गेलो. तिथे एका छोट्या मुलाच्या मांडीला वाघ चावला होता आणि त्याचं हाड मोडलं होतं. डॉक्टरांनी एका फटक्यात ते हाड बसवलं आणि प्लास्टर केलं. त्या मुलाचं धैर्य पाहून मी अक्षरश: थक्क झाले! मग भाऊंच्या सगळ्या प्राण्यांशी दोस्ती केली. त्यांचे ते फेमस बिबटे, तो अजगर सगळे त्यांनी दाखवले. ‘इथल्या आदिवासींचं खूप प्रेम आहे आमच्यावर. ते आम्हाला भेट म्हणून सापडलेला साप देतात, बिबट्याचं पिल्लू देतात. आम्ही त्यांचा सांभाळ करतो. जखमी झालेले प्राणीही येतात उपचारांसाठी,’ असं म्हणत त्यांनी आपला राज्याचा प्राणी असलेला अत्यंत दुर्मिळ असा शेकरू दाखवला.
खरं सरप्राइज तर पुढेच होतं. नेमके बाबा होते तिथे! (बाबा आपल्या उतारवयातला बराचसा काळ आनंदवनात घालवायचे.) बाबा आमटेंना आम्ही आल्याचं सांगितलं होतं आणि त्यांनी भेटण्याची इच्छा दाखवली होती. त्यांच्या खोलीत गेलो. बाबा तेव्हा शय्येला खिळलेलेच होते. बाबांनी मला पलंगावर बसवून घेतलं आणि माझा हात हातात घेतला. त्यावेळी माझा विश्वासच बसला नाही. मग म्हणाले, ‘बाळ, आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा इथे ना रस्ता होता ना दिवाबत्तीची सोय. आम्ही अंधारात काम केलं. आता तुम्ही आलात ते रस्ते आमच्यासाठी, आमच्यामुळेच बांधले आहेत. आयुष्यात एक गोष्ट नक्की लक्षात ठेव की इच्छा असेल तर मार्ग मिळतोच. काट्याकुट्याच्या का होईना पण त्या मार्गावरून चालावं. आपण इच्छित स्थळी पोहोचतोच.’ मग इकडचं तिकडचं बोलत राहिले. म्हणाले, ‘मला असं अंथरुणाला खिळून राहणं आवडत नाही. काठी घेऊन का होईना चालण्याचा प्रयत्न करायचो. पण बाथरूममध्ये घसरून पडलो आणि तेव्हापासून ही रुग्णशय्या आली. मला अजूनही खूप काही करायचं आहे. खूप स्वप्नं आहेत. आताही हे लोक उठू देत नाहीत म्हणून नाहीतर मी कामाला लागलो असतो,’ असं म्हणेर्पयत ते थकूनच गेले. मग आम्ही उठून बाहेर आलो. अवघी दहा-पंधरा मिनिटं. पण त्यात आयुष्याचं सारं काही उलगडून ठेवलं त्यांनी!
मी त्यातून बाहेर येते न येते तोवर नेमके भामरागढचे (हेमलकसापासून दोन किमी. महाराष्ट्रातलं शेवटचं ठिकाण. इथून पुढे रस्ताच नव्हता!) वन अधिकारी आले भेटायला. सोबत आम्हाला घेऊनच गेले. भामरागढला त्यांच्या बंगल्यावर थोडा वेळ घालवला. त्यांच्या हॉर्टिकल्चरच्या प्रयोगाबद्दल त्यांनी सांगितलं. मग म्हणाले, ‘गडचिरोलीतलं जंगल आता संपण्याच्या मार्गावर आहे. आम्ही खूप प्रयत्न करतो आहोत ते वाचवण्याचा. इथलं आताचं किमान 30 टक्चके जंगल मानवनिर्मित आहे. प्रचंड तोड आणि तेंदुपत्यासाठी जंगल जाळणं याचा फटका बसतो आहे.’
भामरागढहून हेमलकसाला परतेर्पयत 12 वाजले होते. आता नागपूरला मी सात वाजेर्पयत कशी पोहोचणार, याची काळजी लागली होती. तेवढ्यात कळलं की तिथून आनंदवनला (नागपूरपासून सुमारे 100 किमी) लोक बिरादरीची गाडी जाणार होती. मंदावहिनींनी माझ्यासाठी केलेलं जेवण रद्द करायला लावून मला मंदारने गाडीत कोंबलं आणि मी तशीच जातेय हे पाहिल्यावर त्या केळी घेऊन धावत आल्या! धोंडू मोहाची खूप फुलं घेऊन आला. गाडी सुसाट सुटली. आम्ही वरोराला साडेतीनलाच (मध्ये आलापल्लीला राम लक्ष्मण हे जुळं वडाचं झाड पाहण्यासाठी अर्धा तास थांबूनही) पोहोचलो. तिथून पुढे नागपूर आणि मग मुंबईला जाण्यासाठी मी ट्रेनमध्ये चढले तोर्पयत विचार करायला वेळच मिळाला नव्हता. रेल्वेत बसल्यावर मात्र माझ्या आयुष्यात नेमकं काय घडलं याची जाणीव झाली. माझी आणि हेमलकसाची, बाबा आमटेंची भेट अशी ठरली होती तर! इट वॉज डेस्टाइन्ड..

गुलमोहर: 

पुण्यवान.. Happy

इतकी वर्षे जातो जातो म्हणून अजून मी तिकडे का गेलो नाही ह्याचे उत्तर माझ्याकडे पण नाही... Sad

सॉलीड...काय तु पण ना...
एवढी मस्त गेली होतीस...बाबांशी भेट झाली...आमटे कुटुंबियांबरोबर अजून वेळ द्यायला पाहिजे होतास...
काम काय असतेच पाठीशी..हे दिवस पुन्हा येणार नाहीत...
असो, बाकी अनुभव मस्तच मिळाला असेल...
मी गेली कित्येक वर्षे घोकतोय जाणार जाणार म्हणून...अजून योग आलेला नाहीये

कोमल,
मन्त्र मुग्ध झालो मी.
अतिशय सुन्दर वर्णन. तुम्च्या लेखना मधे अजब ताकत आहे. चित्र कसे एक्दम डोल्यांसमोर उभे राहिले.
मला एक क्षण असे वाट्ले कि मी पण होतो तिथे तुम्हा सर्वांसोबत.
खूपच छान लेख.
आणि हो, इतर वाचकां ला सहमतः तुम्हि खरंच खूप भाग्यवान अहात. बाबांची भेट हा केवळ एक आशिर्वाद असावा तुम्हास! (खंर तर क्षणिक, हेवा वाट्ला तुमचा Happy ).
- आपला विनम्र
निनाव

ग्रेट ठमे...... गालावरचा अ‍ॅब्सेस ड्रेन केला हे ठीकंय.... पण प्राकाश आमटेंनी फिमर फ्रॅक्चर ला कास्ट घातली..... ??????? आदिवासींच्या सहनशक्तीची फक्त कल्पना केलेलीच बरी.

फार चांगला अनुभव शेअर केलास.. धन्यवाद. Happy

वयाने लहान असलीस तरी तूझे पाय धरावे लागतील आता. इतक्या थोर माणसांना प्रत्यक्ष भेटलेली व्यक्ती, माझ्यासाठी तेवढीच आदरणीय आहे.

धन्यवाद गं ठमा एवढा सुंदर अनुभव शेअर केल्याबद्दल ! मी दोन वेळा बल्लारशापर्यंत जावुन परत आलो. खरेच नशिबवान आहेस, तुझी बाबांशी भेट झाली Happy

रच्याकने , तुम्ही आकाशवाणीत काम करता का?
>>> नाही... तेव्हा मी लोकसत्ता नुकतं जॉइन केलं होतं. नंतर पाच वर्षं तिथे काम करून मी आता प्रहारमध्ये काम करते आहे... Happy
बाकी धन्यवाद सगळ्यांना... Happy
बाबा त्या दहा मिनिटांत माझ्याशी जे बोलले ते आयुष्यभर पुरणारं आहे... प्रकाशभाऊ आणि त्यांच्या कुटुंबियांशी असं अपघाताने जुळलेलं नातं अजूनही कायम आहे. नंतर अनेकदा इच्छा असूनही परत काही जाता आलं नाही.. पण आता मुलगी थोडी कळण्याइतकी मोठी झाल्यावर परत जाणार आहे... Happy

ठमा, सुंदर अनुभव. थोड्या थोड्याने आयुष्य पुर्ण होतं .. त्यातलंच हे डोंगराएवढंच थोडं. होय ना ?

सुरेख अनुभव ... Happy

काल तुमचा प्रहार मधील मायबोलीवरील लेख सुद्धा वाचला, फार आनंद झाला.
माझ्यातर्फे आपणास शुभेच्छा.

विनय, सुकि, अश्वे... धन्स...
मला तो कालचा प्रहारमधला लेखही टाकायचाय इथे... फक्त वेबमास्टरांच्या परवानगीची वाट पाहते आहे... कदाचित त्यांच्या मनात वेगळं काही असू शकेल म्हणून.. Happy

तो लेख खरच टाका इथे, अर्थात वेमा ची परवानगीने... असाही म्हणा तो पेपर मधे आलाय त्यामुळे काही प्रष्न नसावा.

Pages