कुणी घर देता का घर???

Submitted by tilakshree on 31 May, 2008 - 03:09

देशाच्या कानाकोपर्‍यातल्या जनतेलाच नव्हे तर शेजारी राष्ट्रातल्या अधिकृत, अनधिकृत स्थलांतरितांनाही महानगरांच आकर्षण असतं. त्यातल्या त्यात मुंबईचं आकर्षण जरा जास्तंच. कारण या मुंबामातेचा हात सतत 'दाता' आहे. वरदायिनी लक्ष्मीसारखा!

या महानगरीत ज्याला जे हवं ते तुलनेने अधिक सुलभपणे उपलब्ध होऊ शकतं. अनेक क्षेत्रात नवोदितांना संधी मिळते. व्यासपीठ मिळतं. पैसा मिळतो. प्रसिद्धी मिळते नोकर्‍या मिळतात. व्यवसायाची क्षितीजं रुंदावतात. गरिबांची अतिशय स्वस्तात गुजराण होऊ शकते आणि श्रीमंतांना असलेला पैसा गुंतवण्याचे अनेक मार्ग उपलब्ध होऊ शकतात आणि उडवण्याचेही! मुंबईत दुष्प्राप्य असलेली कदाचित एकमेव गोष्ट असावी; ती म्हणजे घर! वांद्रा-कुर्ला संकुलाच्या आवारातल्या एका झोपडीला तब्बल एक कोटी रुपयांचा मोबदला मिळाला. पुढे काय बोलणार?

नोकरीच्या निमित्ताने पुण्याहून मुंबईच्या वेशीवर; म्हणजे नवी मुंबईत येण्याचा योग आला. सुरुवातीच्या दिवसात कल्याणला बहिणीकडे राहून नव्या मुंबईत घराचा शोध जारी ठेवला. अर्थातंच भाड्याने. एकटंच रहायचं असल्यामुळे घराबद्दल फार मोठया अपेक्षा नव्हत्या. तरीही मनाजोगती आणि खिशाला परवडेल अशी जागा काही मिळत नव्हती. याला सर्वात महत्वाचं कारण म्हणजे जागांच्या व्यवहारातली 'एजंट'गिरी! "नवी मुंबईत जागेचा एकही व्यवहार 'एजंट'च्या मध्यस्थी शिवाय होऊ शकत नाही;" असं माझ्या स्थानिक सहकार्‍याने स्पष्टपणे सुनावलं. "कधी चप्पल झिजवून एखाद्या जागेचा मालक शोधलासंच आणि त्याच्याशी व्यवहार ठरवायला गेलास; तर तो मालकही 'एजंट'च्या नावाखाली स्वतःच्याच जागेच्या व्यवहारापोटी तुझ्याकडून 'कमिशन' वसूल करुन घेतल्याशिवाय रहाणार नाही;" हे ही त्याने सांगितलं. आपल्याच व्यवहारात आपणंच 'एजंट' अन आपल्यालाच 'कमिशन' ही भानगड ऐकून मी हतबुद्ध! बरं; आमचे हे सहकारी तसे वाशीचे 'मूलनिवासी' आणि नवी मुंबईच्या 'अनभिषिक्त सम्राटां'च्या 'आतल्या गोटां'तले. त्यांच्या सांगण्यावर अविश्वास तरी कसा दाखवायचा? तसंही हळू हळू त्यातलं तथ्यही प्रत्यक्ष अनुभवातूनंच निदर्शनाला येत होतं. अखेर एखाद्या खोलीच्या का होईना; पण 'सेल्फ कंटेंट' घराचा 'दुराग्रह' सोडून मी स्थानिक वृत्तपत्रात 'पेईंग गेस्ट'च्या जाहिराती शोधायला सुरुवात केली. वाशीच्या प्रसिद्ध कृषी उत्पन्न बाजार समिती; म्हणजेच 'ए.पी.एम्.सी. मार्केट'च्या परिसरात असलेल्या एका 'लॉज'मधे 'मासिक तत्वा'वर खोल्या भाड्याने देणे असल्याची जाहिरात बघून तिकडे धाव घेतली. पण अपेक्षाभंगाचा मोठा झटका! एकतर मासिक भाडं नऊ हजार रुपये फक्त! आणि त्या खोलीला खोलींच काय; खुराडं म्हणणं हा खुराड्याचा अवमान ठरेल! एका मोठ्या 'हॉल'मधे एका कोपर्‍यांत चार संडास आणि बाथरूम. उरलेल्या जागेत 'प्लायवूड'चं 'पार्टिशन' घालून या तथाकथित खोल्या बनवलेल्या. प्रत्येक खोलीत एक भला मोठ्ठा आरसा. त्याच्यासमोर एक कॉट; आणि कॉटच्या बाजूने एक मानवी देह; तो ही सर्वसामान्य आकारमानाचा असेल तरंच (!) कशी तरी जा-ये करू शकेल इतकी जागा; अशी ही खोली. ज्यांनी कधी 'लाल बत्ती' परिसरातली 'धंदेवाईक' घरं प्रत्यक्षात किंवा कुठल्यातरी चित्र-माहितीपटात बघितली असतील त्यांनाच या सगळ्या रचनेची अचूक कल्पना येऊ शकेल. अशा 'खोली'कडे बघताक्षणीच मी 'अबाऊट टर्न' करुन काढता पाय घेतला. परतताना मला खोली दाखवणार्‍या त्या कर्मचार्‍याने किंवा त्या 'लॉज'च्या व्यवस्थापकानेही मला 'काय झालं' म्हणून विचारणं तर सोडांच; पण साधं ढुंकूनही बघितलं नाही. कदाचित त्यांना माझी ही प्रतिक्रिया त्याला अपेक्षित असावी किंवा त्यांना माझी तितकीशी गरज नसावी.

अखेर अशाच एका 'पेईंग गेस्ट'च्या जाहिरातीमधून नेरुळच्या सेक्टर ८ मधल्या एका फ्लॅटचा शोध लागला आणि मुंबईत रहाणार्‍या मालकाला एक महिन्याचं आगाऊ भाडं आणि चालू महिन्याचं भाडं अशा रकमेचा धनादेश देऊन मी माझा बाड-बिस्तरा त्या फ्लॅटमधे हलवला. प्रशस्त अशा चार खोल्यांच्या फ्लॅटमधे स्वयंपाकघर सोडलं तर दोन बेड-रूम मधे प्रत्येकी दोन जण आणि मोठ्या हॉलमधे चार जण असे एकूण आठ जण रहायचे. हॉलमधे रहाणार्‍यांपैकी तिघे आसाममधून येऊन 'मर्चंट नेव्ही'मधे नोकरी शोधणारे. चौथा कोण होता तो मला माझ्या तीन महिनाच्या वास्तव्यात कधी भेटलांच नाही. दुसर्‍या बेडरूममधे रहाणारे दोघे दिल्लीचे. 'महापे एमआयडीसी'तल्या कुठल्याशा कंपनीच्या नोकरीत स्थिरावलेले. माझा 'रूम पार्टनर' म्हणजे तर एक नमूनाच होता. तो ही मूळचा पुण्याचाच. सुस्थापित, उच्चशिक्षित कुटुंबातला. मुंबईत एका कंपनीत 'मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन'चं काम करायचा. मोठ्ठ वाटोळं डोकं. त्यावर खराट्याच्या काड्यांसारखे उभे राहिलेले राठ केस. चेहेर्‍यातून बाहेर आल्यासारखे दिसणारे बटाटे डोळे. बेताची उंची. पाप्याचं पितर असावं अशी हडकलेली देहयष्टी. माणूसघाणा आणि घुमा स्वभाव. सुरुवातीचे दोन-तीन दिवस मी काम आटोपून घरी येतोय तर आमच्या खोलीचं दार बंद. दारावर टक टक केली तर आमचा पार्टनर म्हणतो;"भाई रुको जरा. योगा चल रहा हैंl' योगा झाल्यावर त्याचा घामाने डबडबलेला चेहेरा, आधीच गरगरीत; त्यात तांबरल्यामुळे जास्तच भयानक दिसणारे डोळे, थरथरणारे हात-पाय यामुळे मला पहिल्यापासूनंच त्याच्या 'योग प्रकारां'बद्दल शंका होती. एके दिवशी भल्या पहाटेच मला त्याच्या कॉटखाली एका वाटीत पांढरी पावडर असलेली प्लॅस्टिकची छोटी पिशवी आणि इंजेक्शनची सिरींज सापडली. त्याच्या 'योगा'बद्दल मला नीट कल्पना आली. मी शांतपणे माझं चंबू-गबाळ उचलून हॉलमधे आणलं. माझ्या कॉटवरची गादी उचलून हॉलमधे जमिनीवरंच अंथरली. आमचा मुक्काम बेडरूममधून हॉलमधे आला.

दुपारी ऑफिसमधे पोहोचल्यावर फ्लॅटच्या मालकाला फोन करून माझ्या पार्टनरच्या 'योगाभ्यासा'बद्दल कल्पना दिली. त्याचा प्रतिसाद थंडाच! या फ्लॅटमधे रहाणारी सगळी मंडळी नोकरीसाठी किंवा नोकरीच्या शोधासाठी दिवसभर बाहेरंच असायची. त्यामुळे फ्लॅट दिवसभर रिकामाच. या फ्लॅट मालकांचे धाकटे बंधुराज अधून मधून अशावेळी आपल्या मित्र मैत्रिणींसमवेत येऊन या फ्लॅटचा अक्षरश: 'रंगमहाल' करायचे. अखेर या भानगडींना वैतागून मीच नेरुळच्या त्या फ्लॅटला राम राम केला.

नेरुळचा फ्लॅट सोडल्यानंतर कोपरखैरण्यात रहाणार्‍या माझ्या एका मित्राने त्याची वापरांत नसलेली; मोडकळीला आलेली तुर्भ्याच्या चाळवजा वस्तीतली एक खोली थोडी डागडुजी करुन मला रहायला दिली म्हणून ठीक. नाहीतर जागेच्या शोधात आणखी किती वणवण करावी लागली असती अणि काय काय दिव्य 'अनुभूतीं'ना आणि 'विभूतीं'ना सामोरं जावं लागलं असतं कुणास ठाऊक!

मुंबई हे गिरणगाव होतं तेव्हाची परिस्थिती तुलनेने किती तरी सोईस्कर असावी. त्या काळात बांधल्या गेलेल्या चाळी या चाकरमान्यांसाठी वरदानंच ठरल्या असणार. (चाळींची सद्यस्थिती हा स्वतंत्र विषय आहे.) कुटुंब-कबिला घेऊन येणार्‍यांप्रमाणेच एकेकट्याने रहाणार्‍या नोकरदारांची अशा चाळीतली एक वेगळीच व्यवस्था काही वर्षांपूर्वी अगदी योगायोगाने बघायला मिळाली.

सातारा जिल्ह्यातल्या लष्कर अपशिंगे या गावामधून शिक्षणासाठी पुण्याला आलेल्या एका मित्राचा दुचाकीवर अपघात झाला. त्याचे वडील आणि थोरला भाऊ मुंबईला माझगाव डॉकमधे कामाला होते. परळला दादाभाई चाळीत रहायचे. संपर्कासाठी त्यांच्या कार्यालयातला दूरध्वनी क्रमांक उपलब्ध नव्हता. 'मोबाईल' तर तेव्हा आपल्याकडे अस्तित्वातंच नव्हते. अखेर मी आणि एका मित्राने भल्या पहाटे मुंबई गाठली आणि ती चाळ शोधून काढली. त्यांना अपघाताबद्दल सांगितले आणि दुपारपर्यंत त्यांच्या खोलीतच आराम केला. या काळात बरीच मनोरंजक, उद्बोधक माहिती मिळाली. या तीन मजली चाळीतली त्यांची खोली 'अपशिंग्या'ची खोली म्हणूनच ओळखली जायची. नैमित्तिक कामासाठी एखाद्-दोन दिवस किंवा नोकरीसाठी मुंबईत येणार्‍या अपशिंग्यातल्या किंवा पंचक्रोशीतल्या कोणत्याही माणसाला या खोलीची दारं सदैव उघडी असायची. चाळीतल्या आजूबाजूच्या खोल्याही अशाच कुठल्या कुठल्या 'गावां'च्या होता. ही बहुतेक गावं सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातलीच. आपापल्या गावच्या खोलीत त्या त्या परीसरातली माणसं गुण्या-गोविंदाने रहायची. कुणाच्या येण्या-जाण्याचा त्रागा नाही. नाकं मुरडणं नाही. कधी तात्कालिक वाद असलेच तरी समूहाच्या शहाणपणामुळे म्हणा किंवा गरजेतून आलेल्या समजुतदारपणामुळे म्हणा; फारसे ताणले जायचे नाहीत. एवढ्या मोठ्या महानगरीत एकेकटं राहून आपलं आणि गावाकडच्या कुटुंबियांच पोट तुटपुंज्या कमाईत भरण्याची पराकाष्ठा करणार्‍या चाकरमान्यांच्या दृष्टीने ही व्यवस्था केवळ आदर्शवत म्हणायला हवी.

एकेकाळी गावाकडून नोकरीधंद्यासाठी मुंबईत आलेल्या मराठी माणसांनी आपल्या माणसांसाठी निर्माण केलेली ही व्यवस्था चाळींबरोबरंच मोडकळीला येऊ लागली असली तरी इतर काही मंडळी मात्र वेगवेगळ्या माध्यमातून मुंबईत असे प्रयत्न आवर्जून करंत आहेत. माहीमला चर्चच्या माध्यमातून ख्रिश्चन बांधवांसाठी तीन मजली इमारतीत वसतिगृह चालवलं जातं. या वसतिगृहाचं व्यवस्थापन या वसतिगृहात रहाणार्‍या लाभार्थींकडूनंच काटेकोरपणे चालवलं जातं. वसतिगृहात खानवळीचीही व्यवस्था आहे. वसतिगृहाच्या व्यवस्थेसाठी चर्चकडून अनुदान मिळतं आणि लाभार्थींकडून नाममात्र शुल्क आकारलं जातं. लाभार्थी कृतज्ञतेच्या भावनेतून खर्चाचं नियोजन काटकसरीने करतात आणि जास्तीत जास्त कामं स्वयंस्फूर्तीने, स्वयंसेवी पद्धतीने पार पाडली जातात. त्यामुळे 'कुरियर बॉय'ची नोकरी करून तीन हजार रुपये पगार घेणारा केरळमधला युवक मुंबईत सुखाने राहू शकतो.

होतकरू मुस्लिम बांधवांसाठी लहान मोठ्या शहरात मदरशामधे निवासाच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. माझा एक पत्रकार मित्र विदर्भातल्या छोट्या गावातून येऊन पुण्यातल्या एका हिंदी दैनिकांत काम करायचा. आता तो प्रसिद्ध मराठी वृत्तवाहिनीचा वरिष्ठ प्रतिनिधी म्हणून मुंबईत काम करतो. त्याच्या या यशस्वी वाटचालीत समाजाकडून; जमात, जकात आणि मदरशाच्या माध्यमातून मिळणार्‍या सहकार्याची मोलाची साथ लाभली आहे.

उत्तर भारतातून येणारे लोंढे महानगरात कसे येतात, कसे रहातात, काय काय करतात हा वादाचा मुद्दा असला तरीही त्यांचे परस्पर सामंजस्य आणि सहकार्य स्वीकारार्ह आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबईतून मराठी टक्का हद्दपार होत असल्याचा कंठशोष करणारे किंवा आपल्याच माणसांना लाथा घालून बाहेरच्यांना गालिचे अंथरणारे सर्वपक्षीय राजकारणी, तथाकथित चळवळे, आणि उंटावरून शेळ्या हाकण्यात पटाईत असलेला मराठी; विशेषतः मध्यमवर्गीय मराठी माणूस बाहेरून येणार्‍या मराठी माणसांचे आयुष्य सुस्थिर, सुसह्य करण्याचे तर सोडांच; पण काही पिढ्या मुंबईत राहून या महानगराच्या विकासात खारीचा वाटा उचलणार्‍या अस्सल मुंबईकराला मुंबईतून उपनगरात आणि उपनगरातून ठाणे, डोंबिवली , कल्याणकडे फेकलं जाण्यापासून वाचवू शकला का? मुंबई मराठी रहाणार तरी कशी, अन किती काळ???

गुलमोहर: 

अतिशय सुन्दर लेख. विषय भावला...

आज आम्ही त्याच सिचुएशन मध्ये आहोत.मी आणि घर मालकाने किती काळ घरात रहायचे याबाब्त कोणताच लेखी करार केला नाही. सुरुवातीला व्यवहाराच्या वेळी एजन्ट्ला कमिशन दिले. मालकाची कोणतीच तक्रार नसल्याने आता मी त्याच घरात रहात आहे. पण एजन्टाचे म्हणणे असे की मी प्रत्येक वर्षी त्याला कमिशन दिलेच पाहिजे .. कदाचित मालकालाही तो असे सान्गत असेल.. आम्ही तिघेही महाराश्ट्रियन आहोत..

आपल्या या प्रसन्गाचा काळ कोणता आहे?...

तिलकश्री. नवी मुंबईमधे घर शोधताना मला उलट खूप चांगला अनुभव आला.
मी बेलापूरला नोकरी मिळाल्यावर ऑफिसच्या ओळखीने एक एजंट गाठला. त्याने मला सुरुवातीला किती जण राहणार? काय बजेट आहे आणि कुटल्या एरियामधे पाहिजे इतके नीट विचारून एका दिवसात पाच घरे दाखवली. मी एकटी राहणार होते आणी माझे बजेट अडीच हजारापेक्षा जास्त नव्हते. तसंच मला बेलापूर सेक्टर पंधराच्या आसपास घर हवे होते.
अक्षरशः एका दिवसात त्याने घरचा व्यवहार पूर्ण केला. (लेखी करार वगैरे) एक बेडरूमचा ५६० sq ft चा फ्लॅट. आणि दीड वर्षात कधीही काहीही प्रॉब्लेम झाला (पाणी आले नाही/ फ्युज उडाला) की त्याने येऊन लगेच मदत केली. शिवाय कामवली वगैरे पाठवून देणे. इत्यादि.. तो पण मराठीच होता.