तीन म्हणायच्या आत....

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
1’

स्वित्झर्लंडमधली एक सकाळ....

स्वित्झर्लंडमधलं Lucerne हे लहानसं गाव. गावासाठी कदाचित नेहेमीचीच, पण आपल्यासारख्या भटकंतीसाठी आलेल्या प्रवाशांसाठी नक्कीच वेगळी भासणारी सकाळ. समोर वाहणारी Reuss नदी. Kapellbrucke चं नदीत पडलेलं प्रतिबिंब.. मधूनच बदकांच्या जलक्रीडांमुळे ढवळून निघणारं आणि परत आपसुक स्थिरावणारं. नदीमधे मनसोक्त विहार करणारे राजहंस. नदीच्या दोन्ही काठांना जोडणारे लहान मोठे पूल...पुलावरची सायकलींपासून ते बसेस पर्यंत सगळ्या गाड्यांची शानदार वाहतूक. वाऱ्यावर दिमाखत फडकणारा तोच तो.. लहानपणापासून ’चाकू, घड्याळं आणि फूटबॉलच्या टीम' मुळे मनावर ठसलेला लालगडद 'अधिक' चिन्ह मिरवणारा प्रसिद्ध 'स्वीस फ्लॅग' !
स्वित्झर्लंड...लहानपणापासून केवळ चोप्रांच्या सिनेमात पाहिलेले स्वित्झर्लंड आपणही कधी पाहू शकू, अनुभवू शकू याबद्दल असलेलं आश्चर्य, कुतुहल, अप्रुप, उत्साह हे सगळे भाव एकाच वेळी चेह-यावर दिसून येतील असे आम्ही !

माऊंट पिलाटसला जाण्यासाठी फेरीवर चढलो. आमच्यासारखीच अनेक देशांची अनेक माणसं त्या फेरीवर होती. सगळ्यांच्या चेह-याकडे, हालचालींकडे एक ओझरती नजर टाकल्यावर जाणवलं "We're all in the same boat !" सगळेजण थोड्याफार प्रमाणात आमच्यासारख्याच emotions मधून जात होते....आपल्यात जसे चोप्रा आहेत, तसेच त्यांच्यातही नक्कीच कोणीतरी लिंग चू, अल्फ्रेड देबोवास्की, राबर्तो ग्वाझेमिली किंवा मिंग जिन वू असणारच ना !
भावनांची ही सगळी नवलाई जरा कमी झाल्यावर मग कॅमेरा सरसावला गेला.. एकीकडे फोटो काढत असताना आता आमचं आजूबा़जूच्या माणसांना बघणं, बघून अनुमान मांडणं, वेगेवेगेळ्या सांस्कृतीक background च्या लोकांचं निरिक्षण करणं, माणसं समजून घेणं चालू झालं.
कोणाच्या कडे कोणत्या कंपनीचे SLR आहेत? कोणत्या वयोगटातले लोकं simple point and shoot कॅमेरा वापरतात, कोणाकडे कशा backpacks आहेत? युरोपियन लोकं, चायनीज लोकं, भारतीय लोकं, जपानी लोकं फोटो काढताना कोणत्या typical actions करतात... एका ग्रुपमधले लोकं एकमेकांशी कशी वागतात, त्या ग्रुप चं डायनामिक्स काय असावं, कोणाचं व्यकतीमत्व 'लीडर' चं असावं तर कोण नुसतचं ऐ़कून घेणारं... एक ना अनेक !
एकीकडे अशी 'माणसं वाचणं' चालू असताना, ह्या निरिक्षणाची मजा घेत असताना आता शेजारच्या छोट्या तीन जर्मन मुलांशी माझी मैत्री झाली... त्या ७-८ वर्षाच्या मुलीनं आधी माझ्या कॅमे-याशी दोस्ती केली आणि मग माझ्याशी...
बरोबरची तिच्याच वयाची दोन मुलगे आता कॅन्डी मागण्याइतपत धीट झाले... आम्हाला कोणालाही एकमेकांची भाषा कळत नव्हती.. पण डोळ्यातले प्रामाणिक भाव आणि चेह-यावरचं साधं हसू ...मैत्री करायला, माणसं जोडायला पुरेसं असतं याचा परत एकदा अनुभव आला.
ह्या तीन पोरांच्या आईंनी आता एकमेकीत गप्पा मारायला सुरुवात केलेली आणि एकीकडे या पोरांनी आता हळूहळू आपला दंगा करण्याचा, फिरण्याचा आवाका आणि परिघही वाढवलेला.
आता पोरं आई पासून जराशी लांब... आणि कदाचित म्हणूनच खेळाचं आता शारीरीक मस्तीमधे आणि मग मारामारीमधे आपोआपच पर्यवसन झालेलं.
पोरांचा असा दंगा थोडावेळ खपवून घेतल्यावर आणि आता ती मस्ती हाताबाहेर जातीये हे लक्षात येता क्षणी त्यातली एक आई जर्मन मधे काही तरी ओरडली. " तीन म्हणायच्या आत इथे समोर ये.... " असं काहीसं असावं असा त्याचा मराठीमधे मी अर्थ लावला. मी लावलेला अर्थ बरोबर असावा, कारण तिने पुढे लगेच "eins ...zwei... drei" असे आकडे मोजायला सुरुवात केली.
.... आणि खरंच drei म्हणायच्या आत ते लहानसं पोरगं समजूतदारपणे त्या आईसमोर उभं राहिलं. आम्ही हा शेजारी घडणारा प्रसंग शांतपणे नुसते पाहात होतो.
"तीन म्हणायच्या आत इकडे ये... एक...दोन.. तीन" ही कसली "universal concept" आहे हे आम्हाला त्या क्षणी जाणवलं.... आम्ही फक्त एकमेकांकडे बघून एक स्मितहास्य केलं.
आईनी त्याच्या पिट्याच्या चिमुकल्या हातावर एक कॅन्डी ठेवली... आपल्या पोरानं आपल्या हाकेला 'ओ' दिली याचं कौतुक तिला वाटतंय हे तिच्या डोळ्यात, चेह-यावर स्पष्ट दिसत होतं !
आणि..
मलाही माझं लहानपण आठवलं. माझंच काय, आपलं सगळ्यांचंच !
आई-बाबा हाका मारुन थकायचे.. आपण मित्रमैत्रीणींशी खेळण्यात, किंवा आपल्याच विश्वात मग्न .. आणि मग हे शेवटचं अस्त्र निघायचं आई-बाबांकडून - " तीन म्हणायच्या आत इकडे ये, नाहीतर... , एक .. दोन........ तीन".
त्या 'नाहीतर.. ' नंतर काय असेल त्यांच्या मनात...काय म्हणले असते ते...की काहीच नव्हतं म्हणायचं त्यांना ? माहित नाही.. कधी विचारच केला गेला नाही ... कधी ऐकलंही नाही त्यांच्याकडून...कधी ऐकायची वेळच आली नाही...
कारण खरंच त्या "दोन ... आणि ... तीन" च्या उच्चारामधे आपण समजूतदार पोरासारखे 'तीन म्हणायच्या आत' आई-बाबांच्या समोर उभे राहायचो...!

******************************************************
भारतातल्या अनेक घरातली सकाळ, दुपार, संध्याकाळ....

युरोपचा आणि इजिप्तचा दौरा करून भारतात पोचल्यावर 'घरी' पोचल्यासारखं वाटलं...माझ्या घरी 'उमेश' मधे गेलं , किंवा खरं तर एकूणच पुण्यात गेलं की मला मी ओळखीची वाटायला लागते...अवघ्या काही तासातच 'मी इथेच तर राहते.. मी कधी ह्या घरापासून, ह्या शहरापासून दूर परदेशात नव्हतेच' इतकं वाटावं, मला आणि इतरांनाही, इतकी मी तिथली होऊन जाते. पण...
हे असं 'मी इथेच तर असते' हे वाटणं हा 'भास' आहे हे जाणवतं, अंगावर येतं... आई-बाबांची, वयस्कर नातेवाईकांची, आजूबाजूच्या घरातल्या काका-काकूंची, मित्र मैत्रीणींच्या आई-वडिलांची थकत चाललेली शरीरं आणि उदासीनतेची झाक असलेले, प्रसंगी खोल गेलेले डोळे पाहिले की !
गल्लीतली काही घरं, आजूबाजूच्या दिमाखात उभ्या असलेल्या newly renovated घरांच्या शेजारी, खाली मान घालून शांतपणे उभी राहिलेली पाहिली की .. पालक-शिक्षकांच्या मीटींगला एखादंच शाळकरी पोरं अजून आई कशी आली नाही म्हणून डोळ्यात प्राण आणून सतत दरवाजाकडे चोरटी नजर टाकत मान खाली घालून बसलेलं असतं ना तसं वाटतं ही घरं पाहिली की !
एकेकाळी आपलाच सतत वावर असलेली, आपल्या सायकली-स्कूटर्सच्या आवाजानी, मित्रमंडळींच्या दारात उभं राहून गप्पा मारण्यानी, घरातल्या माणसांबरोबर झालेल्या संवादांनी... सतत गजबजलेली, जिवंत वाटणारी ही घरं आज भकास, निर्जीव झालेली दिसली की वाईट वाटतं.
ह्या घरांच्या सोबतीला आपल्यातल्याच काहींचे आई-वडिल, काका-काकू...आणि त्यांच्या सोबतीला ही भकास घरं. एकमेकांच्या साथीनं कशीबशी तग धरून उभं राहिलेली.
कधीतरी या घरात मुलं-सुना- नातवंड वावरतील म्हणून कष्ट करून, पैसा-पैसा जमवून बांधलेली !

अशी खूप घरं पाहिली, अनुभवली नुकतीच ! आणि व्याकूळ व्हायला झालं...

या घरातले आपण... प्रगतीसाठी, शिक्षणासाठी, नोकरीसाठी घराबाहेर पडलेले...आपलं विश्व निर्माण करुन आता त्यातच रमलेले.. ! आजूबाजूच्या गोष्टींचं भान न राहता लहानपणी खेळात रमायचो ना अगदी तसेच !

हे सगळं पाहून जीव तडफडला आणि वाटलं .. परत एकदा आपल्या आई-बाबांनी लहानपणचं ते अस्त्र वापरावं आणि आपल्याला बोलवावं..... 'तीन म्हणायच्या आत इकडे ये...नाहीतर... एक.. दोन .. तीन' !!!

विचार चालू झाला मनात...
आई-बाबांनी तशी हाक मारली तर आपण खरंच परत एकदा तसेच 'तीन म्हणायच्या आत.. ' आई-बाबांसमोर जाऊन उभे राहू का?
की मुलांच्या प्रगतीमधे आपली अडचण, अडथळा होऊ नये हा 'समजूतदारपणा' दाखवत आपल्या आई-वडिलांनी हाक मारणंच थांबवलं आहे का? मग समजूतदारपणा बद्दल आपल्याला त्यांच्या कडून मिळायचं लहानपणी तसं बक्षिस त्यांना का नाही मिळतं? त्यांच्या वाट्याला समजूतदारपणाचं फळ ह्या एकटेपणाच्या, भकासपणाच्या रुपात का?
... ..की त्यांचे तीन पर्यंत आकडे कधीच मोजून झालेत.. आणि ते ऐकूही न जाण्याच्या पलिकडे गेलो आहोत आपण?

आतुरतेनं आपली वाट पाहणा-या त्या खोल गेलेल्या डोळ्यांनी या मधल्या काही वर्षात किती आकडे मोजले असतील ... नुसत्या कल्पनेनीच काटा आला अंगावर !

.... आणि त्याही पेक्षा अस्वस्थ करायला लागलाय ... लहानपणी कधी विचारही न केलेल्या त्या 'तीन म्हणायच्या आत इकडे ये ....नाहीतर....' ह्या वाक्यातल्या 'नाहीतर...' नंतर काय असेल? हा विचार !!!!

विषय: 
प्रकार: 

सुंदर मुक्तकं!

निव्वळ पर्यटन न करता ते शोधक वृत्तीने केल्याचे जाणवते.
दुसरे मुक्तक अगदी टची झालय! मनापासून लिहिलयस! Happy

छान..
स्वतः पालक झाल्यावर "एक दोन....तीन..." चे सर्व अर्थ ऊलगडतात.
शिवाय दिवेलागणीला घरट्यातील पाखरे, एक दोन... तीन म्हणायच्या आत नक्की परत येतील हा विश्वास टिकवून ठेवण्याची जबाब्दारी अर्थातच पाखरावर. Happy

जबरदस्त! विशेषतः दुसरा भाग. एका प्रश्नावर विचार करताना डोक्यात येणारे पुढचे प्रश्न सही मांडलेत.

दुसरं जास्त आवडलं. खूप मनापासुन लिहील्यासारखे वाटले आणी डोळ्यासमोर चित्र उभे राहिले.

आतुरतेनं आपली वाट पाहणा-या त्या खोल गेलेल्या डोळ्यांनी या मधल्या काही वर्षात किती आकडे मोजले असतील ... नुसत्या कल्पनेनीच काटा आला अंगावर !>>

रार, सही लिहिलं आहेस. खूप आवडलं.

रच्याकने, तीन म्हणायच्या आतचा किस्सा माझी आजी म्हणजे 'मुक्ताई' चा आहे. गावजत्रेला सगळे नातेवाईक जमायचे मग गव्हाच्या लापशीचा बेत असायचा. खूप मस्ती ,दंगा, उन्हात खेळत बसायचो आम्ही मुले मग तेव्हा आज्जी सर्वांना म्हणायची.. "तीन म्हणायच्या आत जे पहिलं येईल त्याला मनुके जास्त लापशीमधे.. " मग सगळे धावत चूली समोर रिंगण घालून बसायचो. Happy पण आज तीन म्हणायला हि कोणी नाही .. अन "तीन म्हणायच्या आत"ची गम्मतही तेव्हासारखी राहीली नाही. Sad

Pages