रंगमंच..

Submitted by विस्मया on 1 December, 2010 - 12:30

आताशा पूर्वीसारखी नशा नाही बघ..

ती झिंग नाही
ते थ्रिल नाही

विंगेत रंग लावून बसायचं. आपला रोल आला कि अंगावर रोमांच उठायचं..
आणि मग रंगमंचारव जातांना.. किंचितशी भीती आणि अफाट उत्सुकतेनं एन्ट्री घ्यायची.
आपला रोल निभावतांना... नुकतंच शैशव संपवून शाळेत पहिलं पाऊल टाकतांना वाटलं तसा एक जबरदस्त फील यायचा.

टाळ्या पडायच्या आणि धुंदी चढत जायची.
शाळेत मिळालेले स्टार्स..
कौतुकाची थाप
आइने घेतलेले मुके
बाबांनी डोक्यावरून फिरवलेला हात

जग जिंकल्याचा आनंद तसाच होता.
प्रत्येक वेळी तो तसाच होता...
माझ्या त्या छोट्या छोट्या विजयांची ती पावती असायची..
अगदी पहिल्यांदा तुझ्या डोळ्यात मला हवं ते दिसलं तेव्हाही
हाच आनंद होता
माझा आनंद होता

मग आताच असं का व्हावं ?
मजा नाही येत.
सगळं कसं व्यवस्थित चाललंय. यश मिळतंय. नाव झालंय. सगळं सगळं तर आहे.

असं का वाटतंय कि हे सगळं..
आधीच ठरलेलं आहे.
पटकथेबरहुकूम आहे..
कृत्रिम आहे.
आपला प्रत्येक डायलॉग, प्रत्येक कृती... कसं आधीपासून आखलं गेलंय. आपण बस कळसूत्री बाहुलीसारखे सफाईदारपणे वावरतोय..
हा आनंद मग "माझा" कसा ?
हा विजय तरी "माझा" कसा ?
हा रोल माझा कसा..?
एन्ट्री घ्यायची... एक्झिटही ठरलेली ..
या एन्ट्री आणि एक्झिटच्या मधे दिलेली भूमिका पार पाडायची..
तिच्या प्रेमात पडायचं..
आणि सहज प्रेक्षागृहात नजर टाकावी
तर सगळीकडे रंगमंच पसरलेला..
अफाट
अनंत
अमर्याद
सगळेच कलाकार, कुणीच प्रेक्षक नाही.. कुणीच टीकाकार नाही
ना कुणी दिग्दर्शक..
ना निर्माता
पण हे नाटक चालू आहे
बेमालूम..
बिनचूक
सफाईदार

आता एक्झिटची जाणीव होतीये.

कोण घेईल माझी जागा ?
छे.. ती जागा रिक्तच राहणार आहे. विरून जाणार आहे. जशी मी कधी काळी या नाटकाचा भागच नव्हते. आणि मग पटकथा आपोआपच बदलणार आहे.. नव्या पात्रासाठी.. नव्या संवांदांसाठी

नाटक चालूच राहणार आहे..

मग एन्ट्री घ्याच कशाला
सांगितलिये कुणी ही उठाठेव..
कुणाच्या समाधानासाठी चाललंय हे सगळं ?

कुणाचा रंगमंच आहे हा ?
सांग ना रे..

मैत्रेयी भागवत

गुलमोहर: 

नाटकच आहे म्हणालो, तर प्रत्येक भुमिका जिवंत करायची, निदान इतरांना तशी वाटायला हवी.
आपण मात्र ना नाटकात गुंतायचं ना भुमिकेत..

मग एन्ट्री घ्याच कशाला
सांगितलिये कुणी ही उठाठेव..
कुणाच्या समाधानासाठी चाललंय हे सगळं ?
>>>>>
ह्याचे ऊत्तर कितीतरी युगांपासुन मानवाला तरी सापडलेले नाहीये.. आणी सापडेल असे वाटत ही नाही Happy

लिखान एकदम छान..

पु,.ले.शु.

असे भावनाविवशतेने उदास होऊ नका हो!!

आता पहा, सगळे म्हणतील, वा, वा. छान! तुम्ही किती सुंदर लिहीता! म्हणजे मग तुम्हालाहि परत छान छान वाटेल!

मग एन्ट्री घ्याच कशाला
सांगितलिये कुणी ही उठाठेव..
कुणाच्या समाधानासाठी चाललंय हे सगळं ?
>>>>>
ह्याचे ऊत्तर कितीतरी युगांपासुन मानवाला तरी सापडलेले नाहीये.. आणी सापडेल असे वाटत ही नाही

आणि सापडलेच पाहिजे असे कुठे आहे? जे आपल्या हातात नाही, त्याबद्दल शोक करत बसायचे, की आहे जिवंत तोपर्यंत चांगल्या गोष्टींचा आनंद उपभोगायचा. स्वतः आनंदी रहायचे नि इतरांनाहि आनंदी ठेवायचे हे तर करता येईल ना? नि हे सर्व स्वतःसाठीच. 'कुणा' चा काय संबंध? आपल्याला कळते तरी का इतरांच्या मनात काय आहे? पण आपण आपल्या परीने जमेल ते करायचे!

सुख सांगावे जनाला, दु:ख सांगावे मनाला!

मग एन्ट्री घ्याच कशाला
सांगितलिये कुणी ही उठाठेव..
कुणाच्या समाधानासाठी चाललंय हे सगळं ?

मैत्रेयी,
रंगभुमी कुठली का असेना,तुम्हाला पडलेले प्रश्न हे सार्वत्रीक आहेत, थोडाफार फरक असेल एवढंच !
त्यामुळे पूर्वीची नशा आठवायची आणि पुन्हा अफाट उत्सुकतेनं एन्ट्री घ्यायची ..!
कारण नाटक चालूच राहणार आहे..
Happy

नाटक चालूच रहाणार आहे...... छान लिहिलंयस मैत्रेयी..... Happy

सुख सांगावे जनाला, दु:ख सांगावे मनाला....>>>>>>>

चांगली पोस्ट झक्की.....:)

ती जागा रिक्तच राहणार आहे. विरून जाणार आहे. जशी मी कधी काळी या नाटकाचा भागच नव्हते. आणि मग पटकथा आपोआपच बदलणार आहे.. नव्या पात्रासाठी.. नव्या संवांदांसाठी <<

अप्रतिम लिहिलं आहेस मैत्रेयी.. ! .. रंगमंच 'तूफान' आवडला. Happy

आवडले!
माझी जागा कोण घेईल याची चिंताच कशाला? आपला रोल मनापासून केला, हा एक 'रोल' आहे याची स्पष्ट-स्वच्छ जाणिव ठेवत; की झाले.
आपला प्रत्येक डायलॉग, प्रत्येक कृती... कसं आधीपासून आखलं गेलंय.>>> मला विचारशील तर हे अगदी रिलॅक्सिंग, नि:संग करुन टाकणारे फिलिंग आहे, चालवीशी हाती धरोनिया...

सुंदर विषय अन चांगलं लिहिलय. वेगवेगळ्या भूमिकांमधून "नाटक" जगताना, विसरतोच आपण, की ह्या भूमिका आहेत. आपले आपण गवसायला वेळच नाही, रंग उतरवून, स्वस्थं बसून स्वतःचा मूळ चेहरा निरखायला वेळ नाही...
लेख संपता संपता, कुमारांच्या "अवधूता गगन घटा गहरायी रे..." ह्या निर्गुणी भजनाची आठवण झाली.

किती सहज सुन्दर लिहीलेय.प्रत्येक वाक्याला अगदी अगदी .... खुप आवड्ले.

मैत्रेयी,
सुरेख मांडलं आहेस.

याच प्रकारचं लेखन सध्या ललित मध्ये पोस्टते आहेस. पण मला प्रश्न पडलाय की या लेखनप्रकाराला ललित म्हणावे का?? स्फुट म्हणता येईल का?? (हा अज्ञानातून आलेला प्रश्न आहे, याची कृपया नोंद घेणे)

थँक्स ...!

निंबुडा

खरं आहे ते. ही स्फुटंच आहेत. या प्रकारची कुणाचीतरी पोस्ट वाचनात आली होती. तसा पर्याय नसल्यानं ते ललित मधे पोस्टलंय..

मैत्रेयी

तुझं जुनं लिखाण चाळताना हे सापडलं.. माझ्या वाचनात कसं काय नाही आलं आधी ? Sad
तू पुन्हा लिहिती हो ..
( मटा मधे लिहायला वेळ मिळतो तर .. Wink )

कोण घेईल माझी जागा ?
छे.. ती जागा रिक्तच राहणार आहे. >>> हाच समज त्रासाचं कारण! Happy

मांडलंस फार छान...