सहन

Submitted by आशूडी on 29 November, 2010 - 02:04

संध्याकाळी साडेपाचची वेळ. आज बाहेर एके ठिकाणी जायचं असल्यानं ऑफिसमधून लवकर निघाले. मनपाच्याच बसने हिंजवडीहून शहरात जाणं अटळ होतं. बसस्टॉपवर फोनवर बोलत उभी असल्याने अर्थातच आजूबाजूला कोण आहे इकडे लक्ष नव्हतं. बस आली. घाईघाईत फोन खिशात टाकून बसमध्ये 'चढवली गेले'. माझ्यासोबत आणखीही काही जण डबाबंद झाले. लवकरची वेळ असल्याने अजून तरी खूप गर्दी नव्हती. सर्वात मागच्या आडव्या मोठ्या सीटवर काही काही जागा रिकाम्या होत्या. त्या सीटच्या पुढची दोन्ही सीट्स आता एकमेकांकडे तोंड करुन असतात जेणेकरुन दरवाजातून आत आल्यावर मध्ये मोठा चौकोन रिकामा राहील, तिथे एक जागा होती. माझ्यासाठीच.जशी जागा सापडेल तसे दट्टापेटीतल्या दट्ट्यासारखे सारे फिट्ट बसून गेले. थोडं बस्तान बसल्यावर आजूबाजूला एक नजर टाकली.

माझ्यासोबत एक अगदी गावाकडचं कुटुंब चढलं होतं. त्यात साधारण पासष्ठच्यापुढचे एक काकाआजोबा होते. काकाआजोबाच. कारण ते आजोबांच्या वयाचे असले तरी त्यांचा बांधा, आवाज मध्यमवयाइतका कडक होता. सहा फूट उंची पण कुठेही किंचितसा बाक नाही. चेहर्‍याची ठेवणही कष्टाचा व्यायाम करुन दगडात कोरल्यासारखी घट्ट. कित्येक पावसाळे झेललेल्या एखाद्या टेकडीवरच्या खडखडीत कातळासारखा शांत, समजदार भाव त्यांच्या चेहर्‍यावर झळकत होता. एक अशीच मध्यमवयातली थेट भुईशी नातं सांगणारी कष्टाच्या तुकतुकीत काळ्या वर्णाची स्त्री. आयुष्यातली जितकी कष्टाची वर्षं सरली, तितकीच आणखी हातावेगळी करण्याची तिची तयारी खसकून खांद्यावरुन ओढून पुढे पोटापाशी खोचलेल्या पदरात दिसत होती. त्यांच्यासोबत बिनाइस्त्रीच्या पण स्वच्छ धुतलेल्या पांढरा सदरा आणि लेंग्यातला एक साधारण चाळीशी पन्नाशीतला पुरुष - तिचा नवरा. आणि सोबत एकोणीस वीस वर्षांची, थोडी शिकलेली, मध्ये भांग पाडून चप्प केस बसवून वेणी घातलेली, मॅचिंग नसली तरी दोन्ही खांद्यांवरुन धसा गेलेली ओढणी लपेटून अंग चोरुन बसलेली त्यांची मुलगी. शक्य असतं तर नाकातल्या चमकीचं कचकन चमकणं ही तिनं समईसारखं शांत करुन टाकलं असतं असं वाटून गेलं. तिची आई जर शेतातली रांगडी काळी माती असेल, तर ही एखाद्या बंगल्याची बाग फुलवण्यासाठी खास मागवलेली हाच काय तो फरक मायलेकींमध्ये.त्या चौघांपैकी ते आजोबा अन ती मुलगी बसले होते आणि मधल्या मोकळ्या जागेत तिचे आईबाबा बर्‍याचशा मोठ्या पिशव्या; सिमेंटची पोती बनवण्यासाठी वापरतात तसल्या प्लॅस्टिकच्या बनवलेल्या, सांभाळत उभे होते. त्या आजोबा आणि मुलीच्या मध्ये माझ्याच वयाचे एक मुलगा आणि मुलगी बसले होते. आयटीतले. हे बघून कळतं तसंच मला समजलं. मुलगा तर इतका कोवळा दिसत होता की आताच हातातलं शाईपेन कंपॉसमध्ये ठेवून कीबोर्ड हाती घेतला असावा असं हातावरची नाजूक लव सांगत होती. मुलगी अजून कॉलेज आणि ऑफिस यांच्यातला फरक ओळखायला शिकली नसावी. टाईट जीन्स, पुरेशा खोल गळ्याचा टॉप, मोकळे केस इ.इ. अन माझ्या लक्षात आलं अरे हो! आज 'फ्रायडे' नाही का! त्या दोघांचं काहीतरी मोबाईल दाखवत हळू आवाजात बोलणं हसणं चालू होतं. माझ्या शेजारचा हाताला कळ लागेस्तोवर लांब करुन इंग्रजी पेपर वाचण्यात मग्न होता. मी ही बॅगमधून पुस्तक काढलं.
इतक्यात त्या आजोबांनी त्या स्त्रीशी बोलायला सुरुवात केली. ती बहुतेक त्यांची भाची पुतणी कुणीतरी असावी. ती त्यांना 'काका' म्हणत होती. आजोबांनी तोंड उघडलं आणि एखाद्या डोंगराचे आत्मवृत्त बोगद्यात उभं राहून ऐकतोय असा भास झाला. तिथे बोलताना त्यांनी उच्चारलेला खणखणीत शब्द न शब्द थेट पुढे ड्रायव्हरला ऐकू जात असावा. वास्तविक ती बाई त्यांच्यापासून पाऊलभरच लांब उभी होती. पण आवाजच पहाडी त्याला ते तरी काय करणार? ते सारे बहुतेक कुठेतरी घमासान भांडून आले होते. तेव्हाचा तापलेला डफ अजूनही घुमत होता. त्यांची भाषा पूर्ण गावरान नव्हती, की पूर्ण शहरी नव्हती. खेड्यातून खूप वर्षांपूर्वीच पुण्यात आले होते बहुतेक आजोबा.
"आता तूच सांग, मी तरी काय बोलण्हार??"
"पन मी बोलल्ये की त्येंना. काय सोडतेय होय?"
"मागल्या वर्षी दुसरी बाई होती, ती पन असलीच. केवडं नुकसान केलं.."
"यांना कळाया नगो का? माज्याकडं आला होता पर्वा, पैसे मागायला? मी कुटनं देनार?"
त्यांचं बोलणं इतक्या मोठ्यानं चालू होतं की आजूबाजूला आपोआपच शांततेनं अंग टाकलं. मी तर एकच ओळ तीन तीनदा वाचत होते. कान त्यांच्या बोलण्यानं भरुन वाहत होते. आयटी एम्प्लॉयीज वैतागले होते. इतक्या मोठ्यानं बोलायचं म्हणजे काय? काही मॅनर्स वगैरे? त्यांच्या डोक्यामनातलं हे डचमळणारं पाणी त्या मिटलेल्या मुलीच्या मनाच्या काठांवर धक्के देत होतं. ती अजूनच कानकोंडी झाली. घरात भावासमोरही ही तोंड उघडत नसेल तर इथे आई अन आजोबांसारख्यांना कशी सांगेल हळू बोला म्हणून? यांच सुरुच होतं,
आजोबा - " न्हाव काय?"
स्त्री - "आता? मला काय म्हाईत? तुमी म्हणलात या बसमधनं जाऊ म्हणून चढलो." मुलीकडे वळून, "काय गं, काय न्हाव?"
ती मुलगी - "स्वारगेट."
आजोबा - "आगं, ते म्हाईत आहे की मला, तुझं न्हाव! आजकाल काई लक्षात र्‍हात नाही."
स्त्री - "आस्सं आस्सं! मी कमल."
मला हसू आवरलं नाही, आणि ते लपवावसंही वाटलं नाही.
आजोबा -" हां, तर कुणी शामृगाची अंडी खाऊन खाऊन किती खाईल?"
मी अक्षरशः अवाक!!
स्त्री - "अहो पन असली चोरटी बाई काय कामाची? आं? "
एव्हाना आयटी एम्पलॉयी त्रस्त झाले. त्या मुलाने मोबाईल केला.
"हां, आई, " च, काही ऐकू येत नाहीये. शीट! काय माणसं आहेत! "आई, मीच.. हो.. निघालोय.."
एका कानात गच्च बोट घातले. "नेहमीच्या वेळेस पोचेन साडेनऊ.. हां ठेव."
इकडे -
आजोबा - "एक दोन अंडी खराब निघतील, एक दोन ती नील. पण आता लगेच हुसकावून लावणं बरं दिसायचं न्हाई. ठेवू वर्षभर. फारतर काय पंधरावीस हजारांना कात्री लागंल. लागू दे. आपण काहाडलं तर गावात कोण तिला काम दील? समज दिलीय ना?"
स्री - "बघा बा.. मधनं अधनं अचानक जाऊन येत जा...आपल्याला पैशांचं काय न्हाय वो, पन तिनं तरी असं कशाला करावं??"
आजोबा - "आगं, कुणी हौस म्हणून करतंया का असं? नड आसंल तिची.."
हे काही गप्प बसायचं नाव घेत नाहीत, आयटी बॉयचं डोकं भयानक ठणठणू लागलं. तो त्यांना कळावं म्हणून मुद्दाम डोक्यावर गुद्दे मारु लागला. कानात बोटं घालून खाली वाकून बसला. हिंदीतून शेजारच्या मुलीशी बोलू लागला.
"क्या यार, तेरा सुनके आज मै आया.. पूरी वाट लगा दी दिमाग की."
"मैने क्या किया रे? लोग समझते नही तो व्हॉट कॅन आय डू?"
या मातीच्या माणसांना हिंदी इंग्रजी समजत नसावं असा त्यांनी समज करुन घेतला होता बहुतेक. माझं लक्ष बागेतल्या मातीकडे. ती गपचिप. तिला हे ही बोललेलं कळत होतं आणि मगाशी काय चालू होतं ते ही.
एवढ्यात बस थांबली, रस्त्यावर गलका झाला. आरडाओरडा. एक मुलगा जोरात लांब ढांगा टाकत पळत होता अन मागे बसमधून उतरलेले ४-५ जण. पाकीट मारुन पळाला बहुतेक. तो रस्ताक्रॉस करुन शेतात गायब. ते ४-५ जण हात हलवत पुन्हा बसमधे. बस निघाली. माझ्या शेजारच्याने त्याच्या गुडघ्याला रेलणार्‍या बांधकामावर काम करणार्‍या एका मुलाला हटकलं.
"सीधे खडे रहो. गया वो. अब कहां मिलेगा? कितने थे?"
"सौ डेडसो होंगे.. "
"जाने दो... थोडा आगे जाओ ना... "
त्या मुलाने हताशपणे पायांची पाऊलभर निष्फळ सरकवा सरकवी केली. आणि हा 'मिड डे मेट' न्याहाळू लागला.

आजोबा आणि त्या काकूंच्या लांबरुंद गप्पा चालूच होत्या. इकडच्या घराचं काय केलं, अमक्याचं लग्न झालं का? आता यांना गप्पच करायचं या इराद्याने ती आयटीतली तरुणी पुढे झुकून खिडकीत बसलेल्या मुलाला मुद्दाम मोठ्याने म्हणाली,
"क्या सुनील, यार तेरेको अच्छा व्ह्यूव मिल राहा है ना?"
ती झुकल्यावर खोल गळ्यातून ब्रम्हांड दिसलं. माझ्या शेजारचा, तिच्या शेजारचा आयटी बॉय, तो सुनील, उभे असलेले काही यांनी गुपचूप नजरेखालून घालून मनातल्या मनात एक संधी मिळाल्याची टिक केली.
"कैसा व्ह्यूव रे? कुच्च नही."
"तेरे प्रोजेक्ट का क्या हुआ?"
"नाईन्टी फाईव्ह पस्सेंट हो गया है..."
"क्या बात है! "
बॉय- "सही है तू.. मैने बॉस को बोला है मेरेको जेटूईई प्रोजेक्ट चाहिए."
गर्ल -"हां, मिल गया समझ तेरे को... "
"तेरे जैसे होंगे लाईन मे तो मिलने से रहा मुझे.. पता है, मेरे दोस्त लोग भी बोलते है, तू साला इंड्या में ही सड!"
एव्हाना, आजोबा आणि त्या काकू शांत झाले होते. आता पाळी यांची होती. यातल्या कित्येक टर्म्स, गोष्टी त्यांना कळतही नसाव्यात. पण ते यांना बोलण्यासाठी अवकाश देत होते बहुतेक.
गप्पांच्या नादात यांचा आवाज किती मोठा झालाय हे मी मोजत होते..
सुनील -"अब गाडी कितने बजे है?"
बॉय - "साडे छे या सात.."
गर्ल - "मिल जाएगी रे... "
बॉय - "सब तेरी वजह से... "
गर्ल -"बार बोला ना तूने.. तो.." असं म्हणून तिने त्याच्या खांद्यावर जोरात फटका मारण्याची 'अदा'कारी केली. ती काकूंच्या, त्या मुलीच्या नजरेतून सुटली नाही. त्यांनी मान वळवली.
एवढ्यात आजोबा - "अर्र्र्र्र! आपण माघल्याच स्टॉपला उतराया हवं होतं."
काकू- "आता? तुमी सांगितलंच न्हाईत.."
आयटी एम्प्लॉयीज धरणी दुभंगून पोटात घेतील तर बरं, शेजारच्यांना! अशा आविर्भावात. त्या बागेतल्या मातीने बहुतेक डिओ, स्प्रे मारला नसावा. त्यामुळे कपडे धुवट, स्वच्छ असले तरी तेलाचा एक विशिष्ट वास तिच्याभोवती घुटमळत असावा. म्हणून 'गर्ल'ने नाकाजवळ रुमाल धरला होता. हे माझ्या आता लक्षात आले. आणि ती मुलगी एवढी अंग का चोरते आहे याचा उलगडा झाला.
आजोबा - "हरकत न्हाई.. तिथून लवकर बस पकडता आली असती फुडची..आता इथनं पकडू त्यात काय..?"
यांना गप्प करण्यासाठी पुन्हा हिंदीतून नारे देणं सुरु झालं होतं..
बॉय -"अरे यार.. क्या प्रॉब्लेम है! मुझे झंडू बाम चाहिए"
गर्ल -"मुन्नीवाला?" फिस्स. जणू मुन्नी आणि झंडूबाम यांचा परस्पर संबंध फक्त त्याच दोघांना माहित होता.
बॉय -"हां.. देगी क्या?"
गर्ल -"चूप कर स्ट्युप्पिड." डोळ्यांचे आयलायनर, मस्कारा दाखवण्यासाठी नाजूक उघडमिट.
बॉय -"हम आर मॉल जाएंगे.. नही तो सेंटर वन.."
गर्ल -"मुझे रस्ता नही पता.."
सुनील -"अरे, छाया टॉकीजसे--"
गर्ल -"ये कौनसी टॉकीज है? छाया ??"
बॉय सुनीलला- "इसको छाया टॉकीज दिखा दे क्या?" त्यानं डोळा मारला.
गर्ल- "हां समझ गयी, ऐसे टॉकीज मेरे को पता नही वोही अच्छा है.. "

आम्ही सारे शांत. माझ्या मनात द्वंद्व चालू होतं..या सार्‍या प्रसंगात एक साक्षीदार म्हणून मी काय पाहिलं? सुशिक्षित अन अशिक्षित यांना कागद शाईशिवाय ठरवायचं तर ओळखता येईल? सामाजिक जाणीव, मूल्य ही नैतिक शिक्षणाच्या तासात शिकवली तर ती आत्मसात होतात? एकीकडे त्या बाईला 'चोरटी' ठरवलं तर गावात कुठे काम मिळणार नाही म्हणून पंधरा वीस हजारांचा खड्डा सोसायला तयार असलेले आजोबा तर दुसरीकडे कॉलेजातून नुकतेच बाहेर येऊन किमान तीस हजार महिन्याला मिळताना आपण 'इंड्यातच सडत' असल्याची मूळ धरु लागलेली भावना. माझ्या शेजारच्याला, एखाद्याच्या रोजगारापेक्षा मिडडे मेट न्याहाळणं अधिक महत्त्वाचं वाटत होतं. नाकाशी धरलेल्या रुमालाचं कारण शेजारच्या मुलीला कळालंय एवढी जाणीवही त्या गर्ल ला एका सबंध तासात होऊ नये? माणसाचं माणसाशी माणूस म्हणून असलेलं नातं, एक समान धागा ओळखून तो जोपासणं, समाजातील वावर, आचार, अभिव्यक्ती हे आपण नक्की कोणत्या पुस्तकात शिकतो? दुसरे बोलत असताना आपण किंचितकाळ ऐकावं, कदाचित कळत नसेल तरी, एखाद्याच्या परिस्थितीवरुन, राहणीमानावरुन त्याला टोचेल असे बोलू वागू नये या प्राथमिक शाळेत शिकवलेल्या गोष्टी अशा विसरण्यासाठी असतात?समाजात आपल्याला जेवढे हक्क आणि अधिकार आहेत तेवढेच ते इतरांनाही आहेत, त्यांना ते वापरु द्यावेत हे कर्तव्य आजोबा, काकू, अंग चोरणारी मुलगी यांना ज्ञात होतं पण आयटी बॉय, गर्ल यांना नव्हतं असं बिनधोकपणे म्हणू? आणि हे 'इंड्यात सडत' असलेलं पब्लिक इंड्याबाहेर जाऊन काय झेंडे फडकवणार?

इतक्यात शिवाजीनगर आलं.. ती पोरं पटापट उतरली. आता आजोबांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली.. तोवर माझ्या लक्षात आलं, मला कंडक्टरकडून एकोणचाळीस रुपये घ्यायचेत. मला सुट्टे हवे होते म्हणून दहाच्या ऐवजी मुद्दाम पन्नासची नोट दिली होती. त्याच्याकडे जाऊन मागितले. तो म्हणे "अहो, संपले की सुट्टे.. थांबा थोडं." मनपा आलं. तरी एकोणचाळीस रुपये.. माझा जीव वर खाली. शेवटी मीच पाकिटातून अकरा रुपये काढले.
कंडक्टरकडून 'अर्थपूर्ण' स्मितहास्य झेलल्यावर पटकन कबूली दिली "अहो मला सुट्टे हवे होते ना.."
मी उतरताना कंड्क्टर ड्रायव्हरला म्हणाला, "अरे, ते गावाकडचं पब्लिक उतरलं का? त्यांचे पैसे राहिले की.."
ड्रायव्हर -- "रिकामी झाली बस आता.. उतरलं असेल.."
कंड्क्टर -- "अरे, बरेच होते त्यांचे पैसे, चारपाचशे तरी असतील..." तो दारातून वाकून पाहू लागला तसं..ड्रायव्हर ओरडला, "जाऊदे की मग... आपली चांदी!"
मी अक्षरशः ओशाळले, अन खालच्या मानेने चालू लागले. नक्की कोण कुणाला सहन करत होतं?

***
* आयटी क्षेत्राचा उल्लेख प्रसंगानुरुप आला आहे. त्या क्षेत्राशी संबंधित कोणत्याही व्यक्ती अथवा कार्यावर टिप्पणी करायचा हेतू नाही.

गुलमोहर: