या हृदयीचे त्या हृदयी!

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

ही माझी तशी पहिलीच कथा. २००५ मधे लिहिलेली. माबो वर टाकली होती पण तेव्हाचे अर्काइव्हज नाहीयेत. आणि तेव्हानंतर आता काही बदलही केलेत.
--------------------------------------------------------------------------------------------------------
"केवढा फुललाय चेहरा! काय विशेष आज?"
"आज खूप आनंद झालाय.. मस्त वाटतंय.."
"काय झालं काय एवढं? नवर्यानं काही गिफ्ट आणलं वाटतं नवीन!!"
"केलात पचका!! लावलीत वाट!!‘
"का? नाही आणलं काही त्यानं? मग काय झालंय? का काही विशेष? काही खावंसं वाटतंय का? मला सांग हो, इथे तुझी आई नाही आणि सासूही नाही पण मी करीन हो सगळं!!"
"आक्का! स्लो डाउन! मला दिवस गेलेले नाहीत. थॅन्क गॉड! पण मी आज एका मस्त व्यक्तीला भेटले. चांगल्या दोन तास गप्पा झाल्या। कधीची माझी इच्छा होती त्यांना भेटायची."
"हात्तिच्या! कोण ती व्यक्ती? पुरूष आहे की बाई?"
"आक्का, येते मी!"
"अशीच चाललीस? सांभाळून हो। इतक्या उड्या मारतेयस। काही झालं तरी आपला संसार महत्वाचा हो. तू आपली रोज याला त्याला भेटत असतेस म्हणून म्हणलं!"
"आक्का! गेले मी.. अच्छा..."
आज मी रवींद्र माहुलकरांना, माझ्या आवडत्या लेखकाला भेटले. अचानकच संधी मिळाली आणि 2 तासाचं चोख सोनं हाती लागलं. तसं मला सेलेब अ‍ॅट्रॅक्शन असं नाहीच पण माहुलकरांचं जिवंत लिखाण, थेट कानफडात मारणारं लिखाण वाचून त्या व्यक्तीला समजून घ्यायची प्रचंड इच्छा होती, आहे. असं इतकं थेट कसं कोणी बोलू शकतं हा प्रश्न पडायचा. त्यांचं लिखाण वाचून आणि झोपडपट्टीमधल्या वर्कशॉपवाल्या माझ्या मुलांचे प्रश्न ऐकूनही.

मजा आली!! काय सही माणूस आहे. वय पंचाहत्तरच्यावर असेल पण थकलेल शरीर सोडलं तर हा माणूस म्हातारा वाटतंच नाही. माझं काम समजून घ्यायची इच्छा दर्शवली परत मला आधी इमेल कर म्हणाले म्हणजे बर होईल म्हणाले. मोबाइल नंबर दिला स्वत:चा. एखाद्या मित्राने द्यावा तसा. गंमतच.

आक्का पण ना सगळ्याची वाट लावतात. काय तरंगत होते मी.. सगळ्या मूडचा कचरा केला.. आनंद झाला म्हणजे एकच कारण असू शकत त्यांच्या मते.. मरो ते. पण माहुलकरांना इमेल करायला हवा. आजच करावा की एकदोन दिवसांनी?.. बघू..हा अनुप अजून कसा नाही आला? त्याला माहितीये मी माहुलकरांकडे जाऊन आल्याचं. त्याला माहितीये मला किती बोलायचं असणार त्यांच्याबद्दल..

अरे हो! अनुपला खूप उशीर होणार होता आज अस सकाळी म्हणाला होता. विसरलेच. हं. चला आता मस्त वाचन करावं थोडावेळ. असं म्हणत मी पुस्तकांच्या कपाटाकडे जातेय तोच दारावरची बेल वाजली दारात वसुमति.
"वसू? तू? आत्ता? या वेळी?" तिला घरात घेत मी म्हणाले.
"का ग? माझी अडचण होतेय का? कोणी येणारे का घरी? कोणी स्पेशल?"
आपण प्रचंड विनोद केलाय अश्या विश्वासाने वसूने मला कोपर आणि डोळा मारला.
"वसू अश्या विनोदांचं मला कॉलेजमधेही हसू आल नाही. काय पण पीजे!"
"ए मास्तरणी, माझ्या या पीजेज मुळेच बर्‍याचदा आपली मैत्री वाचलीये. आठव आठव. आणि ते असू दे तू एवढी इरीटेटेड अस्वस्थ का दिसतीयेस?"

वसू म्हणाली तशी मी इरीटेटेड नव्हते. खरंतर माहुलकर ह्या एकाच शब्दाने मी तरंगत होते. पण आक्कांनी मस्त पचका केला आणि तो वाढवायला वसू आली म्हणून कदाचित मी इरीटेट झाले असावे. जाउदे वसू तर वसू.
"वसू, तुला माहीतीये आज मी कोणाला भेटले ते?"
"हो, रवींद्र माहुलकर!"
"काय? अग पण तुला?"
"घाबरू नकोस, खालती आक्का म्हणाल्या!"
चला आक्कांच्या बातमीपत्राने बहुतेक सगळ्या कॉलनीला बातमी पुरवलेली दिसतेय.
"तर बोल मग, कशी झाली भेट? काय म्हणाले तुझे लाडके माहुलकर?"
"तु ऐकणारेस? कुठलीही टर न उडवता?"
"आय कॅन ट्राय!! आता मोठ्या झालो आपण."
"खरंच सांगू?"
"बोला आता!"
"मी गेले होते ते छोट्याश्या कामासाठी. पण नंतर इतक्या वेगळ्याच गप्पा झाल्या ना. काय मस्त माणूस आहे। अजूनही इतके स्पष्ट विचार. घडणारी प्रत्येक घटना कुठेही उगाच भावनाप्रधान न होता पडताळून पहाणे. नवीन गोष्टींचे स्वागत. हा माणूस फक्त पंचाहत्तरच्या वर आहे म्हणून म्हातारा मानायचा का?"
"बाय माझी ती!! ते पंचाहत्तरच्या वर आहेत हे विसरली नाहीयेस अजून हे बरय एक!"
"म्हणजे काय?"
"म्हणजे असं की या म्हातार्‍यांचं काही सांगता येत नाही. तरूण मुलगी. आपल्या लेखनावर खुश. म्हणजे."
"वसू! पुरे! तू जा इथून. आज तरी मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. जा तू."
वसू वैतागून निघून गेली. बरंच झालं म्हणायचं. अजून पाच मिनिटं सहन झाली नसती. कॉलेजच्या हॉस्टेल पासून ही अशीच. उथळ आणि आनंदी. बरंय.

अनुपला फोन करून उशीर म्हणजे किती उशीर हे तरी विचारावे का? असं मी म्हणतेय तोच त्याचाच फोन आला.
"अगं मी रात्रीच निघतोय दौर्‍याला. सकाळी तिथे पोचून तालीम करायची ठरलीये."
"अरे पण!"
"परवा पहाटे हजर होतो. आणि मला जरा कल्पना होतीच त्यामुळे मी आधीच कपडे बरोबर घेतलेयत. झोप निवांत."
"ठीकाय तर मग. परवा पहाटे!!"
कसला सूड हा!! आज नेमकं काहीतरी बोलावंसं वाटतं आहे तर. सरळ माहुलकरांना इमेल करते आता.
श्री. रवींद्रजी माहुलकर...
काय पण मायना आहे!!...
ती रवींद्रकाका माहुलकर... माहुलकर काका!! इइ!
बघा! ते तिकडे उत्तमोत्तम लिखाण करताना मसुदेच्या मसूदे लिहितात आणि तुम्हाला साधी इमेलची सुरूवात येत नाही सुचरीता बाई!!
आयडीया! सुचरीता बाई जसं आहे ना तसं माहुलकर बुवा लिहिते..... (ए सुचे!! वेड लागलं का?)
माहुलकर बुवा, विठ्ठल मंदीरात आपले किर्तन आयोजित करण्याचा मानस आहे. तरी.... (सुचे!! कल्पना वाईट नाही )
हं... मायना ठरवू आणि मग करू इमेल.

जरा नेट बंद करून वळतेय तोच मोबाइल चिवचिवला.
"भेटले माहुलकर? काय म्हणतायत?"
चला! शेवटी कुणाला तरी सांगता येईल...
"हो भेटले तर. अग इतके सही आहेत ते. 2 तास गप्पा झाल्या. खूप वेगवेगळ्या विषयांवर बोललो आम्ही. मला इतक मस्त वाटल ना.."
"सुचरीता, माझ्या कामाचं काय झालं? काढलास विषय त्यांच्याकडे?"
"विषय? कसला विषय?"
"त्यांची ‘मनास..’ वापरायची आहे मला. तू विचारणार होतीस."
"ओह! ते! हो विचारले. तूच जाऊ शकलीस तर बर होईल अस म्हणाले."
"ओह! ओके! बघते मी.."
"बघते? इतक्या सहज तुला भेटायला मिळतेय आणि तू फक्त बघणारेस?"
"मग काय म्हणू मी सुचरीता? मला वेळ व्हायला हवा ना? तेवढा वेळ असता तर तुला कशाला विचारायला सांगितले असते!! चल ठेवते मी."
"अग ऐक ना ते काय म्हणत होते ते.."
"सुचरीता, मी आत्ताच सांगितले मला वेळ नाहीये. खरच नाहीये. ठेवते मी"
ही देवी, अनुपची मोठी बहीण. नावारूपाला येत असलेली दिग्दर्शिका. नेहमी नको त्या वेळेला फोन करते आणि सगळा मूड घालवून टाकते. असेल बये तुझ काम महत्वाचं पण आजतागायत एकदातरी विचारलंस सध्या मी काय काम करते ते!! मी माहुलकरांकडे जातेय असा अनुपला कळवल नुसतं तर हिचा फोन लगेच,
"सुच, माझं काम करशील का?"
अग पण विचार ना मी का चालले आहे त्यांच्याकडे ते. अर्थात माझ्याकडे खूप रिकामा वेळ असतो म्हणूनच मी चालले होते असे तिने ठरवलेच होते म्हणा.

संताप.. संताप.. ह्या संतापात आता येणारे फोन पण घ्यायची इच्छा होत नाहीये पण साळवींचा नंबर दिसतोय. घ्यावाच लागणार. त्यांच्या कृपेनेच तर जायला मिळाले आज माहुलकरांकडे.
"सुचरीता, झाली भेट? मिळाले फोटो?"
"भेट झाली पण फोटो नाही मिळाले. त्यासाठी पुढच्या आठवड्यात जायचंय."
"बर ठीक आहे. तसं कर. आणि कळव मला काय होतेय ते."
"काका, तुमचे खूप खूप आभार! मला खूप छान वाटलं!"
"वाटलं ना! मग ते लेखात येऊदे आता. अजून तुझा ‘सत्तरीतले लेखक’ लिहून झालेला नाहीये. पहिला मसुदा आल्यशिवाय कस करायचं सदर चालू? लवकर सुरुवात कर. ठेवतो मी."
"हो काका."
जेमतेम हो काका तरी तोंडातून बाहेर पडले हे खूप झाले. नाहीतर काका असं कळवळून सांगायला लागले की स्वत:बद्दल राग, चीड, दया आणि गिल्ट अश्या सगळ्या गोष्टी वाटून रडू फुटायचंच बाकी राहतं. चला काका म्हणाले तसं माहुलकरांच्या भेटीच्या आनंदात तरंगत न राहता लिखाण करायला लागावं.
‘आज सत्तरीच्या घरात असलेल्या मराठीतील प्रमुख लेखकांपैकी माहुलकर हे एक महत्वाचे नाव. आणि विशेष म्हणजे ते आजही समकालीनांमधेच येतात.’

सुचे काय ग रुक्ष लिहितेयेस! हे मिळालं तुला आज? हे काय इयत्ता तिसरीच्या पुस्तकातला धडा लिहिल्यासारख.. साधारण अर्धी वही संपली हे करत करत सुचे! आणि रात्रही बरीच झाली.. झोप आता..

सकाळी मस्त मूड लागला लिहायचा. लेखमालेतला पहिला लेख बर्‍यापैकी पूर्ण झाला. आज शनिवार म्हणजे वर्कशॉपचा दिवस. वेळ होतंच आलीये, आवरायला घ्यावं म्हणत उठले आणि बेल वाजली. हजार प्रश्नचिन्ह घेऊन आरती दारात उभी होती. ही आरती आमच्या वर्कशॉपमधली मुलगी पण हिची आई माझ्या आईच्या घरी धुणीभांडी करायची म्हणून माझ्यावर हिचा स्पेशल अधिकार. त्यात सगळ्या मुलांमधे ही सगळी कामं करण्यात चटपटीत, प्रयत्नपूर्वक शुद्ध बोलणारी. म्हणून माझंही विशेष लक्ष हिच्याकडे.
"ताई मला सांगा देवाचंच नाटक करायला हवं का? आमच्या झोपडपट्टीतल्या देवाचं नाटक करायचं झालं तर देवळाच्या पायरीवर चालणारे पत्ते, मागे उभी रहाणारी रेशम, बाजूनं वहाणारं गटार हे पण येणारच की."
मी चक्रावले. तेराचौदा वर्षाच्या या मुलीला काय सांगू कळेना आणि अचानक माहुलकरांच्या नाटकातले शब्द आठवले.
"देव दानव आपणच निर्माण केले आणि आपणच पोसले. आता देवाला त्याच्या सुरुवातीच्या इमेजमधे ठेवता नाही आलं आपल्याला ही चूक कुणाची? आपलीच ना? पण एक मात्र खरं आताचा देव जास्त इंटरेस्टींग वाटतो, आपल्यातला वाटतो."
आरतीला हे सगळं या वयात कळणं शक्य नवतं तरी या शब्दांचा आधार घेत तिला समजावलं आणि यावेळच्या नाटकाचा विषय देव हा का आहे हेही सांगितलं. काहीतरी गवसल्यासारखी ती खुश झाली.
"मला आई मारंल मी असं काही केल तर पण मी तेच करणार. मी नाटकात तरी डेरींग करून विचारणारच ताई."

आपल्या उत्साहाची लागण मलाही करून देऊन ती मला वर्क शॉप ला घेऊन गेली. मुलं धुमसत होतीच. सगळी वस्तीतली मुलं. देवाला लागून येणार्‍या गोड गोड गोष्टी कधीतरी लहानपणी ऐकलेल्या आणि नंतर आयुष्यात ज्याला त्याला देवाला शिव्या घालताना किंवा त्याच्या नावावर लोकांना लुटताना पाह्यले होते. हे वर्कशॉप घेताना खरंतर मी पण अजून शिकत होते. पण आज काय माहीत कुठून बळ आलं, त्यांच्या पोटातल्या खळबळीला थोडसं शांत करता आलं. तुम्हाला जे वाटतं ते निर्भयपणे मांडा अस मला निर्भयपणे म्हणता आलं. समाज तुमच्या विरूद्ध रान पेटवेल पण तरी तुम्हाला जे म्हणायचंय ते म्हणत रहा हे म्हणण्याचंही बळ आलं.

कुठल्याश्या धुंदीत घरी आले. नंतर जाणवलं हे बळ आलं कालच्या दोन तासातून. हे सगळं करत असलेला, आजही उभा ठाकलेला माणूस काल प्रत्यक्ष पाह्यला. त्याचंच हे फळ. मी माहुलकरांना भेटले ह्याचं माझ्या मनात सोनं झालं. पहाटे अनुप दौर्‍यावरून परत आला. आणि मला उठवून म्हणाला,
"बोल काय म्हणाले माहुलकर? कशी झाली भेट? किती वेळ होतीस? कसे वाटलं त्यांच्याशी बोलताना? सगळं सांग. मला माहीतीये एवढा वेळ ते कुणाला सांगता आलेलं नसणार तुला."
"भेट झाली. दोन तास होते. खुप काय काय छान बोलले ते. परत भेटायला बोलावलंय. मस्त वाटलं खूप."
आता माहुलकरांची भेट शेअर करायची माझी गरज उरली नव्हती. गोंधळलेल्या माझ्या नवर्‍याकडे मी हसून पाह्यलं आणि त्याला पांघरून घेऊन पहाट अनुभवत पडून राह्यले.

--------

समाप्त

- नीरजा पटवर्धन

प्रकार: 

अशातच वाचली होती ही कथा ,जुन्या मायबोलीवर न वाचलेल्या कथा शोधताना.
छान आहे पण परत तुझ्या बाकी कथांशी कंपॅरिझन सुरु होतंच. Happy

सु र्रे ख ..भारी इन्टरेस्टिन्ग कथा गं नी.. मजा आली वाचायला Happy

यात्ली देवी आणि सुचरिता परत आले आहेत.
देवीची आणि अदितीची दुसरी गोष्ट एकदम खरी खरी जाणवते.
असे war चाललेल्या मित्रां बरोबर ग्रुप मधुन प्रवास करण्याचा अनुभव २ दा घेतलेला आहे Happy
फारच त्रासदायक होते जेंव्हा लोकांना कॉमन कर्टसी नसतात.
असो प्रतिक्रिया चुकीच्या धाग्यावर दिली पण ही देखील छान जमली.

मस्त लिहिलं आहेस, फ्लोवाईज.. सुचरिता दिसायला लागते डोळ्यापुढे.. Happy
मात्र वर्कशॉपचादेखील प्रसंग आला असता तर जास्त मजा आली असती.. सावकाश वळणं घेत, कथा एकदम संपतेच.. तसं झालं नसतं..

मला आवडली.

आधीची कुणाशीतरी शेअर करण्याची तगमग आणि नंतरची शेअर करायची गरजच उरली नसल्याची जाणीव इथपर्यंतचा प्रवास छान रंगलाय. Happy

धन्स लोक्स..
जवळजवळ पहिलीच कथा ही त्यामुळे मला पण सध्या वाचताना काही ठिकाणचा बालिशपणा जाणवतोय. चुकून पुस्तक बिस्तकापर्यंत गेलीच बात तर बघेन रिव्हिजिटून!! Happy

आहे आहे, ही अजून जुन्या मायबोलीवर. पण शोधाणं खूप अवघड जातं तिथे. बरं झालं इथे आणलिस.
बाकीच्या सगळ्या लेखक -लेखिकांनो, प्लिज तुमच्या जुन्या माबोवरच्या कथा इथे आणा. Happy

"समाज तुमच्या विरूद्ध रान पेटवेल पण तरी तुम्हाला जे म्हणायचंय ते म्हणत रहा हे म्हणण्याचंही बळ आलं"- आणि हेच जर दुसरं कुणी करत असेल तर आपणही रान उठवु नये, हे ही महत्वाच!