धडा

Submitted by rupalisagade on 26 May, 2008 - 03:21

माझ्या पहिल्या कथेला आपण दिलेला प्रतिसाद पाहून आणखी कथा लिहायला हुरुप आला. कशी वाटते ते नक्की कळवा.
सुचनांचे स्वागत आहे.
************************
धडा
************************
"काय वं.. कामावर जायच नाही का...पार नउ वाजून गेले तरी लोळत पडलाय?"
शांतीचा चढलेला आवाज गण्याच्या कानात घुसला...त्याकडे लक्ष न देता, त्याने तितक्याच शांतपणे चौथ्यांदा कूस बदलली..
शांतीला कळेना, रोज आठाच्या ठोक्याला घराच्या बाह्येर पडणारा गडी.. उन्ह अंगावर आली तरी का झोपलाय ?
बरं बिरं नाही का काय ह्याला?
"अवं, काय म्हणते मी... बरं नाई का वाटतं...चहा करुन देउ का..जरा हुशारी वाटंल.." तिने त्याच्या कपाळावर हात ठेवला..
ताप तर नाही आलेला.. ती पुटपुटली.
"काय त्रास आहे.. गप बस की जरा..गुमान झोपू दे..", गण्या खेकसला, तशी शांती गप झाली.
उठल आपसूक पोटात कावळं कोकलायला लागले की..शांतीने विचार केला.

गणू शिंदे..त्याची बायको शांता, आणि दोन पोरं, मोठी मुलगी, गीता आणि धाकटा माधव.. चौकोनी कुटंब..गण्याच्या आईची, कृष्णावर फार श्रद्धा. नातीचं नाव ठेवलं गीता आणि नातवाचं माधव.
गणूला अभ्यासाची गती ब-रापैकी होती. साठ टक्क्याने ..दहावी पास झाला.. अकरावीला प्रवेश घेतला.. पण अचानक वडिल गेले. आई व लहान बहिणीची जबाबदारी गणूवर पडली. त्याने I.T.I ला प्रवेश घेतला. गणु शिंदे वायरमन झाला. लवकरच सरकारी नोकरीत चिकटला पण.
गणू गेले पंधरा वर्षं इमानदारीत नोकरी करत होता. कोणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही. आपण बरं आणि आपलं काम भंल हे गण्याच तत्व.

शांतीने खूप प्रयत्न केले तरी गडी काही उठला नाही. गेल्या कित्येक वर्षात नव-याने दांडी मारल्याचे तिला आठवत नव्हते.
भाकरी थापतानाही, तिच्या डोक्यातून ते जाईना. भाकरीवर हात फिरवता फिरवता, तिचा हात तव्यावर आला तशी ती चटका सहन न होवून ओरडली, भानावर आली.
तिच्या आवाजाने गण्या उठला..तिच्यावर वैतागतच त्याने स्वत:चे आवरले.. बारा वाजून गेले.. पोरं पण शाळेतून आली.
बाबाला कधी नव्हे ते घरी पाहून खूश झाली.
भूक भूक कोकलत, तिघांनीही वांग्याचा रस्सा आणि भाकरीचा फडशा पाडला.
जेवता जेवता शांतीने पुन्हा विचारलं..
’आज कामावर गेला नाही..’
’हूं..’
’रजा टाकली?’
"..."
"काय विचारते मी?’
"आता शांतपणे जेवू दे की जरा.."

गणू तिच्या ताकास सूर लागू देत नव्हता...शांती वैतागली..

दुस-या दिवशी पुन्हा तेच... पुन्हा शांतीची चिडचिड... पोरं मात्र मजेत होती. घरी आल्यावर बाबा भेटत होता.दुपारभर त्याच्याशी मस्ती करायला मिळत होती.. संध्याकाळी बाबा घरचा अभ्यास करुन घ्यायचा.

गेले चार दिवस झाले.. गणू घरीच होता. मुलं घरात नाहीत हे बघून शांतीने विषय काढला..
’कामावर कधी जाणार...’
’नाही जाणार आता..’
’म्हंजी...?’ शांती हादरली.. तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
’म्हणजे मी राजीनामा दिलायं..’ गणूने शांतपणे उत्तर दिले.
’पर का म्हणते मी..? ही काय अवदसा आठवली तुम्हाला.. सोन्यासारखी सरकारी नोकरी.. तिला अशी लाथ मारली व्हय तुम्ही?’
’मला कंटाळा आलाय नोकरीचा.लई केली नोकरी...’
’अरं वा..म्हने कट्टाळा आलायं.. आनि काय करनार आता..?’
’घरात बसणार... तू नाही का बसत?’
शांती उखडली... तिचा आवाज वाढला..
’आनि खायच काय? दगड धोंडे..? की हवा खाउन जगायच आम्ही? अवं आपला नाई तर पोरांचा तरी इचार.. !"
’तू आहेस ना... तू कर काहीतरी आणि आण पैसे..नाहीतर बापाकडून का आणिनासं.. नाहीतरी देतच असतो तुला काई-बाई.’
बापाचं नाव काढताच शांती आणखी चिडली.. भांड भांड भांडली.. पण गण्या डोक्यावर बर्फ ठेवल्याप्रमाणे थंड होता.

शांतीची झोपच उडाली. नवरा कामावर जात नाही म्हंटल्यावर कुठल्याही बायकोच असंच व्हायचं..रात्रभर आढ्याकडे बघत ती विचार करत होती.
’काय करावं ह्यांच? असं वेड्यागत का करताहेत? सासूबाई असत्यातर त्यांनी तरी समजावल असतं.. माझ तर काडीचंबी ऐकायचं नाहीत...माझा नाही तर पोरांचा इचार.. माध्याला इजिंनीयर करायच म्हणे.. पैसे काय आभाळातून पडणार आता?’
सकाळी लवकर उठून ती नणंदेकडे गेली..
’काय वो वैनी... आज सकाळी सकाळी..? सार ठीक आहे ना?’
’जरा पाणी आणता का वन्सं?’ चालून चालून शांतीला दम लागला होता.
अनिचा नवरा कामावर जायला निघाला होता. त्यालाही आश्चर्य वाटले..
पाणी पिउन शांती म्हणाली, ’दाजी थांबता का जरा..’
’काय झालय वैनी?’ त्याच्या लक्षात आले.. काहीतरी झालंय खास.
’ह्यांनी नोकरी सोडली’
’काय!’ दोघानाही धक्का बसला.
’व्हय.. बघाकी, कुठली अवदसा आठवली, देवाला ठावं..चार दिस झालं, घरीच हैत.’
’अरे देवा..’ अनिने डोक्याला हात लावला..ती मटकन खालीच बसली.
’काई ऐकत नाहीत.. नोकरीचा कट्टाळा आलायं म्हनं ! तुमच काई ऐकलं तर बघा की.. घरी येवून बोलता का येकदा?’
’आम्ही दोघ येतो संध्याकाळीच’.. म्हेवण्याने हे काय नवीन खूळ काढलं, सुन्याला समजेना..

दिवसभर शांतीला चैन नव्हते. तिने गावाला माहेरी फोन लावला. बाप म्हणाला,
’पोरी आता आमच राज्य संपल..तुझा भाउ काय करत असेल तर बरं’
भावाने फोन घेण्याआधीच धाकट्या वैनीने फोन घेतला.
’हे बघा वन्स, आमचं आमाला होईना.. आनि तुम्ह्लाला काय मदत करनार आमी?’
शांतीवर आभाळ कोसळले जणु. माहेराचा आधार वाटत होता, तो पण तुटला. आता वन्संनी काही केल तर ठीक...तिचं डोस्कं काम करेना झालं.
दुपारभर गणु आपला ढाराढूर आडवा तिडवा झोपलेला. बायकोच्या त्रासाशी काही सोयर-सुतक नाही. पोरांना समजलं आपल्या आई-बापाचं वाजलय. काहीतरी बिघडलयं खरं ! ती बिचारी गरिब कोकराप्रमाणे गप होती.
आयुष्यात पहिल्यांदाच शांतीला अशा प्रसंगाला तोंड द्याव लागत होतं. लग्नाआधी तीन भावात एकलुती एक म्हणून घरी खूप लाड झालेले. कशीबशी शांती दहावी झाली. बापाने, सरकारी नोकरी बघून गणू शिंदेला पोरगी दिली, तेव्हा त्याच्या घरी काही फार चांगली परिस्थिती नव्हती. पण गणु पगारातून जमेल तसे घर सजवत होता. शांती म्हणजे मुलखाची आळशी. जितके कमी काम करता येइल तितके करायचे. सासू होती तोपर्यंत ती बोलून, चिडून शांती कडून काम करुन घ्यायची. पण ती गेली आणि तेही संपले. नव-याचा डोक्याला काही त्रास नाही.
शांती फक्त स्वयपाक करायची मनापासून. कारण तिला चांगल-चुंगल खायला लागायच. धुणं-भांडी कशी तरी रडत खडत उरकायची. सगळ्या घरभर पसारा टाकून दुपारी पोराना जेवून झोपवले की ही टिव्ही बघायला मोकळी. दिवसभर टिव्ही बघत लोळायला फार आवडायचं तिला. मालिकांमधल्या बायकांप्रमाणे आपण नटलोय, मस्त बंगल्यात रहातोय, ती स्वप्न बघायची.
मुलांकडे लक्ष नाही, त्यांच्या अभ्यासाकडे नाही.. कायम टिव्ही, रेडिओत गुंग. टिव्ही बंद केला कि रेडिओ सुरु. शांतीला पिच्च्ररची गाणी ऐकायला फार आवडायचं.तिच बघून पोर पण तेच करायला लागली. तिचा नट्टापट्टा बघून दहा वर्षाची गीता सुदधा आरशासमोर तास घालवायला लागली.
गणू बिचारा साधा सरळ गडी. घरी आलं की जमेल तेवढा मुलांचा अभ्यास घ्यायचा. दिसेल तो पसारा उचलायचा. कधी वैतागलाच तर तिला बडबड करायचा पण शांती त्याच्याकडे लक्ष द्यायची नाही. खाली मुंडी आणि पाताळ धुंडी. दुस-या दिवशी पुन्हा तेच.
आख्ख आयुष्य असं आरामात काढल्यावर ही काय नवी पीडा मागे लागली असं तिला राहून राहून वाटत होतं. रडून रडून तिचे डोळे सुजले तरी गण्याला काही फरक पडला नाही.
दिवेलागण होवून तास झाला तरी अनि आली नाही. शांतीच्या जीवात कालवाकालव झाली. बु-या वक्ताला कुनीबी साथ देत नाही, ती स्वत:शीच बडबडत होती. नणदेला शिव्या देत होती. तोच गीता ओरडली...
’आई... आत्या आलीये..’
शांतीला वाटले आपण उगाच शिव्या घातल्या तिला. मनातल्या मनात तिने देवाची माफी मागितली.
गणु बातम्या ऐकत होता साडे-आठच्या.
सुन्या आलेला बघताच टिव्ही बारिक करुन तो दारात आला..
’काय आज कुणीकडे वाट चुकली जोडी...’
’चुकली नाही... वाट वाकडी करुनच आलोय..’ सुन्या म्हणाला.
’म्हणजे...काय झाल सुन्या..?’
’दादा तूच विचारतोस होय रे काय झालं? तुला चांगल ठाव हाय काय झाल ते.’ अनि चिडून बोलली.
’खरय दादा.. काय झालय तुम्माला, ते विचारायला आलोय आमी.’
’ह्या शांतीने च्हाडी केली व्हय तुज्याकडे’.. गण्या रागाने शांतीकडे बघू लागला.
’मग नवरा असा खुळं लागल्यागत वागायला लागल्यावर मी तरी काय करनार..’
’ह्ये बघ दादा, असा वेडा होवू नकोस. का सोडतोस इतकी बेस नोकरी?’
अनि आणि सुन्या बराच वेळ समजावत होते.

’मी माझ्या मर्जीचा मालक आहे..कोणी मला शिकवू नये. मी काही कुणाचं ऐकायचा नाही’ शेवटी गण्या असं म्हणाल्यावर दोघेही चिडून निघून गेली.

दुस-यादिवशी गण्या लवकर उठला, तयार झाला. शांतीला उठवून तिला लवकर स्वयपाक करायला लावला. शांतीला वाटलं चला गाडी रुळावर आली म्हणायची एकदाची. तिने आनंदाने चपाती-भाजी केली. डबा भरला. बघते तर काय, नवरा कुठल्याशा पिशवीत कपडे भरतोयं. तिचं अवसानच गेलं..
’ह्ये काय आता नवीन?मला वाटल तुमी कामाला निगाला.!’
’तुला लागलयं खुळ.. मी काही आता तिकडं जायचा नाही. मी गावाकडं चाललोय. चुलता बोलावण पाठवतोय धा-धा वेळेला. जमिनीचं काय चालू आहे बघून येतो..’
’अन येणार कधी.. ’
’अं...?’
’मी म्हनते, तुमी येनार कधी?’ शांतीचा आवाज चढला..
’येक-दोन महिन्यात येतोच की..’
’अन तोवर आमी काय करायच इथ?’
’काय म्हणजे? पोरांच्या शाळा आहेत ना.. आणि अनिला सांगतो मी, ती येइल रोज झोपायला. मग तर झालं!
शांतीला खूप भांडायच होत त्याच्याशी. पण मनातच शिव्यांची लाखोली वाहून ती गप झाली.
निघताना भांडून गेला, तर दोन महिन्यातबी यायचा नाही.त्यापेक्षा चूप राहिलेलं बर. तिने विचार केला.
**********************************************
’अरे देवा.. पैसे बी दिले नाहीत xxxने. आता काय करावं?’ गणू गेला आणि तासा-दीड तासाने, दूधवाला बिल घ्यायला आला तसं शांतीने डोक्याला हात लावला.’
दुधवाल्याला तिने कसंतरी कटवलं, आणि गल्ल्यात हात घातला. चार-पाचशे हातात आले.. हयाने काय होणार..तिला रडुच फुटले. घरात महिन्याचा किराणा पण भरला नव्ह्ता गणुने !
संध्याकाळी अनि आली.
तिने शांतीला समजावले..
’असं हातपाय गाळून कसं चालल वैनी? आता दादा असा वागतोय तर काय करनार आपन..? पर ह्या मुलांचा काय दोष.. तो नाहीतर तुमी तरी समजुतीने घ्या.’
’अन खरं सांगू का वैनी, तुमच बी चुकतय बघा..तुमच घरात लक्ष नाही म्हट्ल्यावर गडीमाणूस तरी कुठवर सहन करनार वो.. बघा बर.. हे घर हाय का उकिरडा... ? कस रहाव वाटल त्याला इथं? कधी साफसफाई नाही,झाडलोट नाही, स्वयपाक करता आनि टिव्ही पुढ लोळता...मी स्वता बघितलयं कितीदा, दादा बिचारा कामावरन येऊन झाडू हातात घेतो. पोरांचा अभ्यास तो बी त्यानंच घ्यायचा..त्याला तरी काय जीव हाय का नाई? मग त्याला बी वाटलंच की आपन एकट्याने कुठ-कुठ जीव द्यायचा?’ राग डोक्यात घालून दिली असंल नोकरी सोडून..’ अनि पोटतिडकीने बोलत होती.
शांतीने कधी नव्हे ते सारं ऐकून घेतलं
’पर आता काय करु मी? एक पै बी दिली नाई जाताना..’ चार-पाचशे होते घरात फक्त, ते त्या मारवाड्याच्या मढ्यावर घातले तेवा कुठे संध्याकाळी भात शिजला. वन्स, तुमी देता का थोडे पैसे उसने? वाटलं तर मी बोलते दाजींशी’
’आमी तरी कुटून देनार वैनी? तुमाला तर माहिती आहे, ह्याना काय पगार मिळतो. मीच पापड-बिपड लाटून थोड-फार मिळवते म्हणून चाललयं ’
सकाळी उठून अनि निघून गेली.
पोरं शाळेत पाठवून शांती हताशपणे बसली होती. तिने घरावरुन नजर फिरवली. घरभर कचरा झाला होता. स्वयपाकघरात भांडी अस्ताव्यस्त होती. केर काढले नव्हते कालपासून, अंथरुण तसंच लोळत पडल होतं, चहाच्या कपबशा जवळच लवंडल्या होत्या.तिला अनिच बोलण आठवलं. गणूची आठवण आली. गणू असता तर आत्ता शंभर बडबड केली असती. आणि सार आवरल असतं. बिचारा.. काय काय करायचा आणि कामाला जायचा. शांतीला पहिल्यांदाच वाईट वाटलं. स्वत:चीच शरम वाटली.
तिला दिवसभर टिव्ही बघावा वाटेना.. रेडिओला ही हात नाही. सारखी नव-याची सय यायची. डोळ्यात पाणी. तिने दिवसभर राबून घर आवरलं. धूवून पुसून लख्ख केलं.
रातीला झोपायला म्हणून अनि आली. आपल्या बोलण्याचा परिणाम झालेला बघून खूश झाली. मग म्हणाली, ’वैनी ह्येच जर आधी केल असतं तर..?’
शांतीला अजूनच रडायला आलं.’ गावाकडं फोन लावून बोलवून घेवू या का यांना?’
’असं म्हनता..बर चला जाउया.’
अनिने फोन केला..पण गणू तिकडे गेलाच नव्हता..
काका म्हणाले, ’ समदं ठीक हायं नव्ह?’
’व्हय हाय की..’ अनिने फोन ठेवला.
गणू गावाला गेला नाही हे ऐकून शांतीचे हात पाय गळाले..ती धाय मोकलून रडायला लागली.
’हाय रे माज्या कर्मा... कुठं गेला वो तुमी...माझं चुकल वो..काय रे देवा हे आक्रित घडलं?’
अनि शांतीला घेवून घरी आली.

**********************************************
महिना होत आला तरी गण्या काही आला नाही.घरातल होत ते सामान संपत आलेलं.. दुधवाल्याने बिलासाठी तगादा लावला होता. बिल दिले नाही तर दूध बंद करतो म्हणाला.शांतीचं डोकं सुन्न झालेलं. काही मार्ग दिसत नव्हता. मुलांच्या शाळेची फी भरायची होती पुढच्या महिन्यात. पैसा यायची एक वाट बंद झाली पण खर्चाच्या हजार वाटा उघडयाच होत्या.
शांतीच लक्ष शिलाई मशिनकडे गेलं. तिला आठवलं, किती हौसेने ते गणुने तिला आणून दिल होतं. तो कितीदा तिच्या मागे लागायचा,
’शिवणकाम शिक, तुझे, मुलांचे कपडे शिव, तेवढेच आपले थोडेफार पैसे वाचतील, बाहेरचे चार कपडे शिवशील तर चार पैसे कमावशील, तेवढाच आपल्या संसाराला हातभार लागेल, पोरांच्या शिक्षणाला थोडेफार पैसे साठतील...त्या टिव्हीत दिवसभर डोक घालून काय मिळतं ग तुला?’ पण ऐकेल तर ती शांती कसली.
तिला वाटलं, त्याच ऐकल असत तर किती बर झाल असतं.. आज थोडा तरी उपयोग झाला असता.
खूप विचार करुन ही तिला पैशे कमावयचा काही मार्ग मिळेना.. अचानक तिला आठवले, अनि पापड लाटून देते कुणालातरी.
ती तडक अनिकडे निघाली.
’काय वो वैनी, इतक्या दुपारच्या आल्या? मी येणारच आहे की संध्याकाळी..’
’वन्स, काम होतं जरा..’
’बोला की.’
’तुमी पापड लाटता रोज त्याचे किती मिळतात तुमाला?’
’का वो? मिळतात एक चाळीस पन्नास.’
’मला बी मिळल का वो पापड लाटायला?’
अनिला बर वाटलं, ’चला, उशिरा का होईना अक्कल आली म्हनायची’ अनि स्वत:शीच पुटपुटली.
दुस-या दिवशीपासून शांती पापड लाटायला लागली.दहा दिवसात जे पैसे मिळाले, त्याने पोरांच्या फिया भरल्या. थोडफार मिठ-मिरची घरात आलं.
**********************************************

शांतीने पापड लाटायला सुरु केले त्याला महिना उलटला. किमान रोज खायला तरी मिळत होते. तिला रोज गण्याची आठवण यायची. त्याला शिव्या घालायची. मध्येच नशिबाला दोष द्यायची. आपलंच नशिब फुटक म्हणायची. कधी स्वत:वरच चिडायची, आपल्या गुणानी आपण त्याला गमावलय अस बडबडायची.
रोज दिवस उगवला की तिला वाटायच, आज तरी गणू परत इल. दिवस मावळला की आशा ही मावळायची. कधी वाटायचं ह्याने दुसरा घरोबा तर केला नसलं?
आजपण संध्याकाळ होईपर्यंत तिचे डोळे त्याची वाट पहात होते. आजचा दिवस ही तसाच गेला असं म्हणत ती उठली. देवापुढे तेल-वात केली. ’म्हाजा नवरा लवकर सुख्रुप येउ दे..’ असं म्हणत देवापुढे तिने मनोभावे हात जोडले.पोरांना दामटून अभ्यासाला बसवलं. दिवसभराचे पापड लाटून तिचे दंड भरुन आले होते. ती पापड मोजू लागली.’चला आज धा रुपये जास्त मिळणार..’ तिने मनातल्या मनात हिशेब केला.
विचार करता करता तिला गणूची सय आली. ’धा रुपये कमवायाला किती तरास पडतोय जीवाला..आणि ह्यांच्या पगारातून आपन हव तस पैस उधळायचों, किती कंजुशी करता असं म्हनत उलट त्यांनाच शिव्या घालायचो’,शांतीला खूप वाईट वाटलं. गणू परत आला की त्याला पुना कधी कधी असा तरास द्यायचा नाही, तिने ठरवून टाकलं.
दारात चप्पल कुरकुरल्याचा आवाज आला म्हणून शांती बाहेर आली. ’मी सपान तर बघत नाही ना?’ ती आनंदाने ओरडली. गणू दारात उभा होता. तिला काय करु न काय नको.. काहीच सुचेना.
तो घरात येताच, तिने त्याचे पाय धरले.. ’अवं बायको वाईट-वंगाळ वागती, म्हणून असा तरास द्यायचा व्हयं? मला मारायचं झोडायचं, पर घर सोडून का गेला तुमी? म्हाज चुकलं, मला माफी करा.. मी अशी नाई वागायची आता.. घरातल संमद काम नीट करीन, येड्यागत दिसभर टिव्ही नाई बगनार..तुमी म्हनाल ते ऐकीन, शिलाईकाम बी शिकीन.. ह्ये बघा मी पापड लाटायला बी सुरु केलयं..रोज तीस-चाळीस रुपये मिळतात...तुमी जानार नाई ना पुना आमाला सोडून?’ शांती बोलत होती. डोळ्यातल पाणी थांबायचं नाव घेत नव्ह्तं. गणू काही न बोलता गालातल्या गालात हसत होता. कधी एकदा अन्याला भेटतोय असं झाल होतं त्याला.
’बर ठीक आहे. मी बी कुठ जायचा नाही आता तुम्हाला सोडून.. आणि कामावर बी जाणार आहे आता.. पण एका अटीवर...आता जशी वागतीस तशीच वागत राह्यली पाहिजेस.. जरा का वेड-वाकड वागशील, तर मी पुन्हा घरातून निघून जाईन...’ गणूने जरा आवाज चढवला..
’नाई नाई’, शांती स्वत:च्या गालात मारुन घेत म्हनाली..’ पाहिजे तर मला चपलीने झोडा.. पर आता घर सोडून जाउ नका.. तुमच्या मागं नाई राहू शकत आमी तिघं..!’
’बर. नाही जाणार.. आता डोळ्यातल पाणी थांबव बघू.. आलोय न मी आता..? आणि फक्कड चहा कर आणि ही नवी साडी नेसून दाखव मला..’ गणूने तिला एक झकास साडी दिली.
’साडी!’ शांती खूश झाली एकदम !
**********************************************
गणू शिंदे, साहेबाच्या केबिन मध्ये होता.
’काय शिंदे, कस झाल खामगावचं काम..?
’ठीक झालं साहेब..’
’गुड. माने साहेबांचा फोन आला होता.. तुमची तारीफ करत होते खूप. आणि इतका चांगला माणूस तीन महिने कामाला पाठवला म्हणून आमचे पण आभार मानत होते..’
’त्यांचा मोठेपणा साहेब.. आम्ही आपले हुकुमाचे ताबेदार, ते सांगत होते त्याप्रमाणे तर केलं सारं !’
’बर येऊ साहेब?’
गणू केबिनच्या बाहेर पडला.
**********************************************

दुपारची सुट्टी होताच, गणूने घाई-घाईने अन्याला गाठले. अन्या, अनिल कदम. गणूचा जिगरी दोस्त. त्याला घेउन गणू कॅंटीनमध्ये आला.
’अन्या, लेका... तुला काय पाहिजे ते बोल.. मी एकदम खुश आहे आज..’
’काय झालं काय पन? काय लॉटरी-बिटरी लागली की काय तुला?’
’काय झाल? अरे चमत्कार झालाय चमत्कार.’
’म्हणजे?’
’म्हणजे शांती सुधरली..गेले चौदा वर्षे तिला आरडून-ओरडून जे झालं नाही, ते तुझ्या एका युक्तीने झालं बघ.’
’काय बोलतोस...माझा विश्वासच बसत नाही..’
’अरे खरंच बाबा... ’ असं म्हणत, गणूने काल रात्री तो घरी आल्या नंतरचा सगळा प्रसंग सांगितला..
’आणि हे सार तुझ्यामुळे घडलयं. तू म्हणालास म्हणून मी तिला खोटं सांगितलं खरं राजिनाम्याचं पण तरी मला नव्हत वाटलं रे, माझ्या जाण्याचा तिच्यावर इतका परिणाम होईल. पण काल येउन बघतो तर काय, माझी बायको एकदम गुणाची झाली की रे...
’हे झकास झाल.. पण एक कर, तिला कधी हे समजू देवू नकोस.. तू तीन महिने कुठ गेला होतास, हे तिला कधीच सांगू नकोस..’
’अरे म्हणजे काय....ते आलच की ओघानं.’
**********************************************
गणू आणि शांतीचा संसार आता सुखाने चालू आहे.. अधून मधून शांती येड्यासारखं वागते, पण तिला पुन्हा त्या तीन महिन्यात मिळालेला धडा आठवतो आणि ती शहाण्या बायकोसारखी वागू लागते.
**********************************************
समाप्त
**********************************************

गुलमोहर: 

रुपालीजी, हा धडा म्हणजे तुमचा कल्पना विस्तार आहे.. का तुमच्या मिस्टरानी असा एखादा तुमच्यावर प्रयोग केला होता?

रुपालि खुप छान मला आहे. मला मनापासुन आवडली.

@JAGOMOHANPYARE
ही कथा पुर्णपणे काल्पनिक आहे.
प्रतिसादाबद्दल सगळ्यांना धन्यवाद.

कथा आवडली..
- अनिलभाई

कथा आवडली. असेच लिहीत रहा. शुभेच्छा.

आजच्या सास-बहु च्या मालिकांमधे रमणार्‍या समस्त महिलांनाच हा "धडा" आहे.

आवडलि कथा.
अश्विनी.

छान आहे कथा! आणि एकाच भागात पूर्ण केलीस! आवडली!!

मस्तंच Happy खरंच छान धडा आहे Wink

छान हलकीफुलकी कथा आहे.

खरच हलकी-फुलकी कथा. भाषेचा ग्रामीण बाज छान राखलाय, रूपाली. लिहीत रहा अजून.

मस्त कथा रुपाली. आवडेश. खरच अश्या नोकरी न करणारर्या आणि घरकामातही रस न घेणार्‍या बाया असतात. मी अशी उदाहरणं बघतेय. त्यामुळे खुपच भावली कथा.

चांगली आहे कथा. टी.व्ही. मुळे खरचं बरेच नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत.
बायकांच्या टी.व्हीच्या वेडाने मुलं सुना नातवंड नवरा सगळ्यांचे नुकसान होऊ शकते.
टी.व्ही सिरीयल्स हे दारूपेक्षा, दारूइतके किंवा दारूखालोखाल वाइट व्यसन आहे.

सुंदर लिखाण !
.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **