मराठी चित्रपट दशा आणि दिशा

Submitted by सीमा बने on 12 November, 2010 - 01:40

मराठी चित्रपट दशा आणि दिशा

एका व्यक्तिच्या दांडग्या इच्छाशक्तीने, जिद्दीने, धडाडीने देशाला चित्रपट निर्मितिची दिशा दिली, करोडोंचा व्यवसाय दिला त्या श्री दादासाहेब फाळकेंच्या मायभूमीत मराठी चित्रपट लावा म्हणून टाहो फोडावा लागतो. सरकारला कायदे करावे लागतात. राजकारणी पक्षांना आंदोलनं उभारावी लागतात हे महाराष्ट्राचं दुर्देव समजायचं का?

एकवेळ मल्टीप्लेक्सवाले जबरदस्तीने म्हणा, कायद्याने म्हणा मराठी चित्रपट आज ना उद्या लावतील, पण ते बघण्यासाठी आजचा चोखंदळ रसिक, तरूण प्रेक्षकवर्ग येईल का? हा खरा प्रश्न आहे ते जे पैसे मल्टीप्लेक्समध्ये, मराठी चित्रपटांसाठी मोजतात त्या मोबदल्यात त्यांना त्या दर्जाचे चित्रपट पाहावयास मिळतात का?

आजचा मराठी चित्रपट म्हणजे काय तर तेच तेच दिसणारे दोन - तीन चेहरे जे सतत टि. व्ही वर नाटकात, चित्रपटात पाट्या टाकत असतात, पैसे मिळतात म्हणून वाटेल त्या दर्जाची कामं करतात व व प्रेक्षकांच्या नजरेतून उतरतात. अशावेळी एखाद्या प्रामाणिक निर्माता, दिग्दर्शकाने चांगला चित्रपट देण्याचा प्रयत्न केला तरी लोकं तिकडे लवकर वळत नाहीत कारण त्या कलाकारांची ती पूर्वपुण्याई लोकं विसरलेले नसतात.

हिंदी किंवा दक्षिणेकडील हिरोंना जे वलय आहे ते मराठी चित्रपटातील हिरोंना का नाही ?सामान्य लोकांना चित्रपटातील हिरोंबद्द्ल जे प्रचंड आकर्षण असतं ते मराठी चित्रपटातील हिरोंना का नाही? शारीरिक तंदुरुस्तीबदद्ल किती मराठी हिरो जागरूक असतात? याचा त्यांनी जरुर विचार करावा.

अलिकडेच आलेल्या एका मराठी चित्रपटात एका तरुणाने झाडाला लटकून आत्महत्या केल्याचे दृश्य होते.ते कॅमेरामन,दिग्दर्शकाने इतक्या विविध कोनातून चित्रीत केले होते की आत्महत्येचा आशय लक्षात न घेताच ती फ्रेम सुंदर कशी दिसेल याचाच विचार त्या दोघांनी केल्याचं स्पष्ट दिसत होतं.अशा अर्थहीन पद्धतीचे एकच नाही तर अनेक चित्रपट आज निर्माण होत आहेत आणि त्यांच्या त्या तसल्या चित्रपटांना प्रेक्षकांनी गर्दी करावी ही अपेक्षा.

चित्रपट हे जरी प्रामुख्याने मनोरंजनाचं माध्यम असलं तरी त्याचंही एक शास्त्र आहे, हे किती चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथाकारांना ठाऊक आहे? आजकाल कुणीही उठतं, अनुदान मिळतं म्हणून चित्रपट निर्माण करण्याची अपेक्षा बाळगणं मूर्खपणाचंच ठरणार.मुंबई, पुणे, गोव्यात सातत्याने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होत असतात किती मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथाकार हे चित्रपट बघतात, तर उत्तर आहे अत्यंत कमी, नगण्य, जगात काय चाललंय हे तर सोडाच पण आजच्या समाजाची, तरुणाईची काय आवड निवड आहे याचा कानोसा घेऊन चित्रपट बनवायला हवा हा साधा विचार ही दिसत नाही. हिंदी वाल्यांनी इंग्रजी चित्रपटांची नक्कल करायची. हिंदीवाल्यांची भ्रष्ट नक्कल मराठी चित्रपरटात हे असं किती दिवसं चालणार?

चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम समजलं जातं, त्याचा तो कॅप्टन असतो. मराठीत आज असे कितीतरी दिग्दर्शक आहेत की त्यांना संगीत, पटकथा, एडिटींग, या अत्यंत महत्त्वाच्या विभागाचे प्राथमिक ज्ञानसुद्धा आहे की नाही इतपत शंका यावी असे त्यांचे चित्रपट असतात.

आपला तो विषय नाही असे मानून तो विषय समजावून न घेण्याचीच वृत्ती दिसून येते. कित्येक वेळा तर दिग्दर्शकाच्या गैरहजेरीतच चित्रपट एडिटींग टेबलवर तयार होत असतो. याचा व्हायचा तोच परिणाम चित्रपटाच्या गुणवत्तेवर होतो.

आठ - दहा कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्टात मराठी चित्रपट १० टक्के लोकांनी जरी बघितला तरी किती कोटींचा निर्मात्यांनी जरुर करुन पाहायला हवी.

मराठी चित्रपटांचा व्यवसाय कोटी - कोटींमधे होत नाही. याचाच अर्थ स्पष्ट आहे की मराठी चित्रपट १० टक्के लोकांपर्यंत एकतर पोहचत नाही किंवा त्यांचा प्रतिसाद नाही. विचारांनी प्रगत असलेल्या महाराष्ट्राला नक्कीच हे भूषणावह नाही.

शेजारच्या दक्षिणेकडील राज्यात त्यांचे चित्रपट प्रादेशिक भाषेत असूनही प्रचंड प्रमाणात व्यवसाय करताना दिसतात. शनिवार, रविवार त्यांचे चित्रपट मुंबईच्या परिसरात गर्दी खेचताना दिसतात. याचा अर्थ त्यांचे चित्रपट ग्रेट असतात असे नाही पण ते प्रेक्षकांची नाडी ओळखून त्यांना खुर्चीवर खिळवून ठेवण्यात यशस्वी होतात. काहीवेळेस तर त्यांच्या हिरोंचे मानधन हिंदीतील सुपरस्टार्सपेक्षाही जास्त असते. त्याच्या उलट परिस्थीती आपल्याकडे आहे. मराठी चित्रपट अजूनही ६० - ७० लाखांच्या पुढे जात नाही. एकदा का एवढं बजेट ठरलं की त्यानुसार्च चित्रपटांची मांडणी केली जाते. यामुळे चित्रपटासाठी आवश्यक असलेले भव्य काल्पनिक विचार रूजण्यापूर्वीच खुरडले जातात. अल्पशा बजेटमध्ये चित्रपट निर्माण करण्याचे बंधन पटकथाकार व दिग्दर्शक आल्याने ते ही वाट्टेल ती तडजोड करून कसातरी चित्रपट संपवतात व आपण एक चित्रपट केला यात धन्यता मानतात. यामुळे धड चित्रपट निर्माण होतो, ना धड तो लोकांपर्यंत पोहचतो, ना धड तो व्यावसायिक स्पर्धेत उभा राहतो. या दृष्ट चक्रामुळे केवळ चित्रपट व्यवसायानेच नुकसान होत नाही तर अगोदरच दोन हात दूर असलेला मराठी प्रेक्षक अजून चार हात दुरावतो व अल्पशा बजेटमधला. अल्पविचारांनी बनलेला चित्रपट बॉक्स ऑफीसवर अल्पायुषी व्हायला वेळ लागत नाही.

चित्रपट निर्मिती करणं ही एक अत्यंत अवघड, जोखमींनी भरलेली कामगिरी असते पण त्याकडे अजूनही तितक्या गंभीरपणे न बघितल्याने आज फक्त मराठी चित्रपटांची संख्या वाढत आहे. दर्जा अपवादानेच.

मराठी चित्रपट इतर भाषिक खास करून दक्षिणात्यांच्या तुलनेत खूपच मागे पडल्याचे दिसून येते. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे विषयांत नसलेले वैविध्य. कनी बजेट,ढिसाळ पटकथा, कलाकारांचा तोच तोच ठोकळेबाज अभिनय.चित्रपट ज्या कथा - पटकथेवर उभा राहतो; या कथा- पटकथाकारांचे महत्त्व आता तरी मराठी चित्रपट निर्मात्यांनी ओळखून त्यांना उत्त्तम मानधन,पुरेसा वेळ देऊन विविध विषयांवर लिहिण्यास प्रोत्साहन दिलं तर महाराष्ट्राच्या या सुपीक जमिनीतून नक्कीच उत्त्तम पटकथांची फुलं फुलतील. त्याचा लाभ शेवटी निर्मात्यांनाच होऊ शकतो.

एक चित्र वारंवार पाहण्यास मिळते ते म्हणजे मराठी निर्मात्यांकडे चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी आवश्यक बजेट नसते.हे म्हणजे देऊळ बांधायचं व कळस चढवायला पैसे नाही म्हणण्यासारखे झाले. चित्रपटाची प्रसिध्दी हे अत्यंत महत्वाचं अंग दुर्लक्षित झाल्याने चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचत नाही. चित्रपट पोहोचलाच नाही तर प्रेक्षक कसे येतील? याचा गंभीरपणे विचार करुन निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी आवश्यक त्या बजेटची सोय करायला हवी.

अनुदान मिळतं म्हणून जे चित्रपट बनवले जातात त्यात काही सन्माननीय अपवाद वगळता बहुतांशी चित्रपट हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असतात. त्यांची नावेही तेवढीच हलक्या दर्जाची असतात.

इंग्रजीत म्हटलं जातं (Titled sold) नाव विकलं जातं पण आपल्या लोकांना चित्रपटांना नाव देण्यास वेळ असतो कुठे ?

एखाद्या चित्रपटात एखादी लावणी चालली की येणार्‍या जवळपास प्रत्येक चित्रपटात गरज असो वा नसो लावणी हवीच हे कशाचं लक्षण म्हणायचं?याचाच अर्थ असा होतो की वाहत्या गंगेत हात धुवून घ्या.या हात धूवून घेण्याच्या वृत्त्तीमुळेच प्रेक्षकांचा चित्रपटांकडे बघण्याचा दृष्टीकोन दूषित होतो हे किती जणांच्या लक्षात येतं. एखाद्याने जर नवीन कलाकृती निर्माण केली व तिला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला तर त्या गोष्टीची भ्रष्ट नक्कल न करता आपण ही नवीन दर्जेदार कलाकृती निर्माण करायला हवी हा विचार केला जात नाही.

शेवटी चित्रपट ही एक अनेक कलागुणांनी मिळून बनलेली एक कलाकृती असते.या प्रक्रियेत सामाविष्ट असलेल्या प्रत्येकाने प्रामाणिकपणे,नाविन्यपूर्ण पध्दतीने योगदान दिले तर चांगली कलाकृती निर्माण होणे अवघड नसते फक्त त्यासाठी अंतरी इच्छाशक्ती हवी असते.

काहीतरी भव्य करण्याची जिद्द, झपाटून टाकणारी इच्छाशक्ती. विशाल दृष्टीकोन, नाविन्यपूर्ण कल्पनांना अमलात आणण्याची हिंमत. हे जर नजिकच्या काळात घडून आलं तर जगाच्या पाठीवर मराठी चित्रपटांची दमदार पावलं उमटल्याशिवाय राहणार नाही.अजून लेख, साहित्य, संस्कृती, चित्रपट, दुरदर्शन, यासाठी भेट द्या या संकेतस्थळाला www.marathimaya.com/new/menu_jivan/Nov2010_lekh03.html

(

गुलमोहर: 

अशावेळी एखाद्या प्रामाणिक निर्माता, दिग्दर्शकाने चांगला चित्रपट देण्याचा प्रयत्न केला तरी लोकं तिकडे लवकर वळत नाहीत कारण त्या कलाकारांची ती पूर्वपुण्याई लोकं विसरलेले नसतात.>>> अगदी खरं!
मी तर विहीर चित्रपट सोडला तर एकही नविन मराठी चित्रपट पाहीला नाहिये या वर्षभरात!
'गैर' नामक एक भंपक सिनेमा पहायला गेलेलो.. २०-२५ मिनिटात थेटर सोडले.. धसका घेतलाय अगदी!
पण अधेमधे चांगले पिक्चर येतात.. संख्या कमी आहे, पण चलता है!

नटरंग आणि जोगवा नंतर एकही पाहिला नाही. आणि ह्या दोन्हीचे बजेट जास्त नवते. चांगला चित्रपट असला कि लोक आवर्जून बघतात. मग तो कोणत्याही भाषेत असो. विहीर बघायचा आहे, बघू कधी सवड भेटते, आणि विशेष म्हणजे त्याचेही बजेट जास्त नाही आहे. मला तर वाटते पैसे नाही गुणवत्ता कमी पडत चालली आहे. (हे माझे अगदी वैयक्तिक मत आहे)
नुकताच एस एस राजमौली चा मर्यादा रामाण्णा पाहिला. लो बजेट पण सुंदर.
बाकी तुमच्या लेखातील बऱ्याच मताशी सहमत आहे, आणि मराठीमायाच्या लिंक साठी आभारी आहे.

पैसा आणि गुणवत्ता याचा काहीही संबंध नाही. मी साउदी सिनेमा जवळून फॉलो केला आहे. प्रचंड पैसा आणि कधीमधी गुणवत्ता- तेलूगु आणि तमिळ, कमी पैसा आणि प्रचंड गुणवत्ता- मल्याळम, आणि; कमी पैसा व कमी गुणवत्ता- कन्नड, अशी साधारण परिस्थिती आहे. मराठी सिनेमे यात कुठे बसतात?
मराठी सिनेमात 'ग्लॅमर' आल्याने तो सुधारेल हा अंधविश्वास आहे, आणि तो हिंदी सिनेमाच्या फार जवळ असल्याने आहे. साउदी सिनेमा वाढला कारण त्यांनी स्वतःची 'बॉलीवूडनिरपेक्ष' ओळख बनवली. अशी स्वतंत्र ओळख बनवल्याशिवाय मराठी सिनेमाला पर्याय नाही.

नटरंग अजिबात आवडला नाही. फडाचं पुन्हा उभं राहून भरभराटीला येणं गुंडाळलं चक्क. अतुल कुलकर्णीचा अभिनय मात्र (अर्थात नेहमीप्रमाणे) अत्युत्तम.

अप्रतीम अभिनय असला म्हणजे चित्रपट अप्रतीम असेलच असं नव्हे. रडूबाई चित्रपटांची तर लाटच आली होती मध्ये. सहानुभूती मिळवणारा विषय असला की प्रेक्षक आपोआप उचलून धरतात हा धंदेवाईक विचार मराठीत जास्त बळावू लागला आहे. मग एका स्त्रीचा अत्याचारी सासूरवास असो किंवा एखाद्या लहान मुलाला एखादा असाध्य आजार झाला आहे असा विषय असो, किंवा तत्सम काही. प्रचंड कंटाळवाणं.

चांगला लेख. बरचसं पटलं. काही नाही पटलं.

>>इंग्रजीत म्हटलं जातं (Titled sold) नाव विकलं जातं पण आपल्या लोकांना चित्रपटांना नाव देण्यास वेळ असतो कुठे ?<<
हे एलॅबोरेट कराल का?

गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा!
आरं आरं आबा, आता तरी थांबा!
गोन्द्या मारतंय तंगडं (तत्सम काहीतरी) कैच्या कै नावं देतात सिनेमाला! नाव आणि कथेचा संबंध असवाच असे काही नाही.. अर्थात हे हिंदीतही होतंच! उदा. दे टाली Sad
(हे माझं मत बरं का, लेखिकेला काय वाटतं ते ती सांगेलच.)

माझ्या अंदाजाप्रमाणे यापेक्षा वेगळं म्हणायचंय लेखिकेला.

बाकी वरच्या शीर्षकांचे सिनेमेही तेवढेच वाईट होते. आणि शीर्षक व सिनेमाचा आशय यांचा ताळमेळ नसणे हे जगभरातल्या अनेक चांगल्या वाईट सिनेमांबद्दल म्हणता येईल. जेव्हा फक्त मराठी चित्रपट बनवणार्‍यांच्या संदर्भात स्पेसिफिकली हा मुद्दा त्या लिहितायत त्याअर्थी अजून वेगळा काहीतरी अर्थ आहे. त्यांना नक्की काय अपेक्षित आहे हे मला जाणून घ्यायचंय.

पैसे मिळतात म्हणून वाटेल त्या दर्जाची कामं करतात व व प्रेक्षकांच्या नजरेतून उतरतात. >>> अनुमोदन.

परंतू प्रगती होते आहे. मराठी चॅनल्स, काही चित्रपट पाहता वातावरण आशादायक आहे असेही वाटते आहे.

सीमा छान मत मांडलय.
बजेट हे एकमेव कारण नसावं. कथानक / पटकथेवर पण अजिबात मेहनत घेतली जात नाही. संवादावर पण मेहनत घेतली जात नाही.
प्रेक्षकांना काय आवडेल, याचे विचित्र आडाखे असतात यांचे. मकरंद अनासपुरे, निर्मिती सावंत (ही केवळ उदाहरणे) यांचा एकाच प्रकारचा आक्रस्ताळी अभिनय, नेमका कुणाला आवडतो ?
जे खरेच दर्जेदार चित्रपट निर्माण होतात, त्यांचे वितरण नीट होत नाही. त्यांच्या सिडीज निघत नाहीत. पुरेशी प्रसिद्धी मिळत नाही.
एखाद्या सिनेमाची आठवण काढत (भारतभेटीत) सिडीची चौकशी करावी, तर ती निघालेलीच नसते.

काहीतरी भव्य करण्याची जिद्द, झपाटून टाकणारी इच्छाशक्ती. विशाल दृष्टीकोन, नाविन्यपूर्ण कल्पनांना अमलात आणण्याची हिंमत. हे जर नजिकच्या काळात घडून आलं तर जगाच्या पाठीवर मराठी चित्रपटांची दमदार पावलं उमटल्याशिवाय राहणार नाही.

व्वा! असे झाले तर काय बरे होईल?

माझे तर स्वप्न आहे की मराठी भाषेत असे चित्रपट, नाटके, लिखाण, कविता झाल्या तर लोक मुद्दामून मराठी भाषा शिकतील, मराठी भाषेत बोलणे, मराठी वाचणे, मराठी चित्रपट, नाटके बघणे, यातच स्वतःला जास्त शिकलेले, सुसंस्कृत समजतील.

मग चांगला चित्रपट, चांगले नाटक, चांगली कविता म्हंटले की प्रथम मराठीची आठवण होईल.

याला कदाचित् दोनशे वर्षे लागतील. किंवा त्या आधीच 'मराठी भाषा' असे वेगळे न रहाता, 'भारतीय भाषा' नावाची, सर्व भाषेतले शब्द एकत्र आणून केलेली, परंतू काश्मीर (भारतात राहिला तर) पासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरात ते आसाम (भारतात राहिले तर) पर्यंत एकच भाषा सर्व लोक बोलतील, व्यवहारात वापरतील.

काय मराठी सिनेमाला नाव ठेवताय ? अमिर खान म्हणाला मी मराठी सिनेमा बनवणार, परवा रजनीकांत मुंबईला येऊन हेच सांगुन गेला. मधुर भांडारकर पण सरसाउन आहेत. चांगले दिवस नक्कीच येणार आहेत.

एक जमाना होता मुळ कथा, पटक्था आणि सिनेमा मराठीत यायचा पुढे अनेक भाषात रुपांतरीत व्हायचा.

या वर्षात आलेल्या सिनेमांचा लेखाजोखा निट घेतला गेलेला नाही.

यावर्षी खालील सिनेमे आले.

विहीर
झेंडा
जिंग चिक जिंग
प्रतिसाद
मुंबई पुणे मुंबई
पारध

पारधचे परिक्षण केल्याशिवाय हे वर्ष संपणार नाही. गजेंद्र अहिरे यांचा हा अत्यंत वेगवान, वेगली कथा असलेला चित्रपट होता.

नोव्हेंबर मधे खेळ ( स्पोर्ट्स) विषयावरचा बहुदा पहिला मराठी आणि इतिहास घडवाणारा सिनेमा येउ घातलाय. तो पाहु मग हा लेखा जोखा पुर्ण होईल.

बाकी रजनीकांतवरचे जोक पाहिल्यानंतर आणि दबंगचा पाचकळ्पणा पाहिल्यानंतर बिग बजेट म्हणजेच सर्व काही ही कल्पना घुवुन जायला हरकत नाही.

सीमा, छान लेख.

शेवटी चित्रपट ही एक अनेक कलागुणांनी मिळून बनलेली एक कलाकृती असते.या प्रक्रियेत सामाविष्ट असलेल्या प्रत्येकाने प्रामाणिकपणे,नाविन्यपूर्ण पध्दतीने योगदान दिले तर चांगली कलाकृती निर्माण होणे अवघड नसते फक्त त्यासाठी अंतरी इच्छाशक्ती हवी असते.
------------------------------------------------------------------------------------
एक लक्षात घ्यायला हवे की कलाकृती चांगली झाली तरी तिला व्यावसायिक यश मिळेलच असे नाही. मला वाटते "जैत रे जैत" हे एक उदाहरण.. चांगले संगीत, दिग्दर्शन, अभिनय, कथा असुनही व्यावसायिक दृष्ट्या तो फारसा सफल झाला नाही.
व्यावसायिक यशाची गणिते वेगळीच असतात आणि त्यामुळे जे "खपते" ते विकायला लोक तयार होतात. उदा. सिद्धार्थ जाधव हा सध्या हॉट कमॉडिटी झाल्यावर त्याला हिरो म्हणुन घेउन बरेच चित्रपट तयार व्हायला लागले आहेत. मकरंद अनासपुरे आणि भरत जाधव यांची चलती होती तेव्हा त्याना घेउन भाराभर चित्रपट तयार झाले. उद्या दुसरा कोणी चालला तर त्याची चलती होइल.

आपण कितीही नाकारले तरी आर्थिक बाबीचा मुद्दा महत्वाचा आहेच.
यावर एक उपाय असा करता येइल का की सरसकट अनुदान देण्यापेक्षा.. एखाद्या आर्थिकदृष्ट्या मजबुत स्टुडिओ बरोबर मराठी चित्रपट काढण्यासाठी (प्रॉफीट शेरिंग बेसिस वर) संयुक्तपणे निर्मिती करायची. आणि त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर, वितरण, प्रसिद्धी इ. वापरायचे. त्यामुळे निर्माते, दिग्दर्शक या आर्थिक कटकटीतुन मुक्त होतील आणि ते क्रीएटीव गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रीत करु शकतील.

मी लिहीलेले निरर्थक किंवा विषयाला सोडून असेल तर क्षमा करा. पण मला अक्कल कमी असल्याने इतरांना निरर्थक वाटणारे असे अनेक प्रश्न पडतात.

मराठी चित्रपट इतर भाषिक खास करून दक्षिणात्यांच्या तुलनेत खूपच मागे पडल्याचे दिसून येते.

काय झाले की मराठी चित्रपट इतर भाषातील चित्रपटांच्या पुढे गेला असे म्हणता येईल?

उत्तम दर्जाचे, पण पैसे न मिळवणारे बरेच चित्रपट काढले की?
त्यांना ऑस्कर, निदान फिल्मफेअर सारखे भारतातले सर्वोच्च बक्षीस मिळाले की?
लोक प्रिय झाले की?
खूप जास्त, अनेक कोटी रुपये, मिळाले की?

आणि हे असे दरवर्षी केले की? आणि असे अनेक चित्रपट काढले की?

वस्तुस्थिती अशी दिसते की शहरात रहाणारे बरेच मराठी लोक, नेहेमीच्या वापरात इंग्रजी, हिंदी चा, कधी कधी जरुरीपेक्षा जास्त, वापर करतात. बरीच मुले इंग्रजीतून शिकतात, मराठी भाषेतले वाङ्मय वाचतात तरी का? मराठी भाषेतले बारकावे त्यांना कळतात का? त्यापेक्षा इंग्रजी त्यांना जास्त समजते ना? मग
समजा उत्तम दर्जाचे, खूप पैसे मिळवणारे, सर्व बक्षिसे मिळवणारे असे एक दोन चित्रपट काढले, त्यांना मराठीत समर्पक नाव दिले, पण वास्तवतेच्या नावाखाली चित्रपटात मराठी पेक्षा इंग्रजी, हिंदी संवादच जास्तीत जास्त घातले तर त्याला मराठी चित्रपट म्हणायचे का?

जाउ द्या झाले, मला नाही काही समजत!
मला वाटते चित्रपट मला आवडला, चांगला वाटला, की कुठल्या भाषेत आहे, कुणि काढला, पैसे मिळाले का, कुणाला मिळाले? लोकप्रिय झाला का, इतरांच्या मते त्याचा दर्जा काय हे प्रश्न गौण आहेत.

नितीनचंद्र यांना अनुमोदन...सध्या (in few years) मराठी चित्रपटांमध्ये बदल होत आहेत...
काही उदाहरणे:

  • झेंडा
  • नटरंग
  • वास्तुपुरुष ( हातर माझ्या all time top 10 मध्ये आहे)
  • देवराई
  • जिंग चिक जिंग
  • विहीर
  • गाभ्रिचा पाऊस
  • गोष्ट छोटी आभाळाएवढी/li>
  • श्‍वास
  • हरिश्चंद्राची फॅक्टरी
  • जोगवा

>>व्यावसायिक यशाची गणिते वेगळीच असतात आणि त्यामुळे जे "खपते" ते विकायला लोक तयार होतात.<<
जे खपते ते खपतेच असे दिसत असलं तरी दुर्दैवाने ट्रेड मॅगझिन वेगळं सांगतात.

>>आपण कितीही नाकारले तरी आर्थिक बाबीचा मुद्दा महत्वाचा आहेच.<<
याला पर्याय नाही. अगदी खरे. ही कला खर्चिक आहेच पण आर्थिक बाबीचा मुद्दा महत्वाचा हे सूत्र इतक्या चुकीच्या पद्धतीने वापरले जाते आणि लोकांवरही थोपले जाते. असो.

>>यावर एक उपाय असा करता येइल का की सरसकट अनुदान देण्यापेक्षा..<<
सध्या सरसकट अनुदान दिले जात नाही. मुळात अनुदान हे दुसर्‍या सिनेमाला मिळते निर्मात्याच्या. पहिल्या नव्हे. आता अनुदानाची पद्धत बदलली आहे. आधीचा सिनेमा व पुढच्या सिनेमाचे प्रपोजल अश्या दोन्ही गोष्टी पारखून १५ लाख ते ३० लाख या दरम्यान अनुदान मिळते.

>>एखाद्या आर्थिकदृष्ट्या मजबुत स्टुडिओ बरोबर मराठी चित्रपट काढण्यासाठी (प्रॉफीट शेरिंग बेसिस वर) संयुक्तपणे निर्मिती करायची. आणि त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर, वितरण, प्रसिद्धी इ. वापरायचे. त्यामुळे निर्माते, दिग्दर्शक या आर्थिक कटकटीतुन मुक्त होतील आणि ते क्रीएटीव गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रीत करु शकतील.<<<
हे अनेक प्रमाणात चालू आहेच की. पण खूप म्हणजे खूपच जरतर आहेत यात. अगदी प्रत्येक केस वेगळी म्हणण्याइतके. परंतु शासनाकडून स्टुडिओला (हे प्रकरण अजून आपल्याकडे नाहीच खरतर) मराठी चित्रपट निर्मितीसाठी प्रोत्साहन द्यायचे हा मामला लॉजिकल नाही.

(आता पुढच्या परिच्छेदाबद्दल मीच स्वतःच्या दोन तोंडात मारून घेणारे कारण त्याबद्दल मला नको ती बडबड ऐकून घ्यायला लागणार आहे.)
ऑस्कर = आजतागायत एकाही भारतीय चित्रपटाला मिळालेले नाही. काही भारतीय व्यक्तींना वैयक्तिक मिळालेले आहे. लाइफटाइम - सत्यजित राय, वेशभूषा - भानू अथैया, संगीत - ए आर रेहमान, ध्वनी - रेसूल पोकुट्टी
फिल्मफेअर = यामधे जोवर रिजनल विभाग होता तोवर बर्‍याचश्या वर्षी एका मराठी चित्रपटाला तो मिळतच होता. बहुतेक 'बिनधास्त' हे शेवटचे वर्ष असावे. आता फिल्मफेअर हे फक्त हिंदी चित्रपटसृष्टीसाठी आहे.

मला तर असे ऐकल्याचे आठवते की कलेला, संगिताला, भाषा, धर्म, सामाजिक बंधने असे काही नसते. मग चित्रपटात तर कित्येक कला एकत्र येतात, त्यात मराठी काय नि इंग्रजी काय?

मला तर मुळात 'मराठी' चित्रपट म्हणजे काय हेच कळले नाही.

काय असले की चित्रपट मराठी असतो नि काय असले तर नसतो? समजा अस्सल महाराष्ट्रीय गावातील मुसलमान लोकांच्या वस्तीसंबंधी चित्रपट काढला, त्यातले लोक उर्दूमिश्रित मराठी बोलतील, कुराणात काय प्रार्थना, भजने असतात ते कुराणातल्या भाषेत म्हणतील. मुस्लिम रीतिरिवाज, कल्पना यांची त्यात रेलचेल असेल, चित्रपटात दाखवलेल्या काळानुसार महाराष्ट्रीय दैवते, थोर पुरुष, अनेक महाराष्ट्रीयांचा जो हिंदू धर्म, यांच्याबद्दल बरेच काही आक्षेपार्ह असेल.

पण त्याचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार महाराष्ट्रातले आहेत. महाराष्ट्र सरकारने त्याला अनुदान दिले, करमाफी दिली तर तो मराठी चित्रपट होईल का?

नि चित्रपटातले स्वतःला समजते असे समजणार्‍या सर्वांना तो आवडला, केवळ मनोरंजनासाठी बघणार्‍यांना तो आवडला, त्याला खूप पैसे मिळाले की मग एकदाचा 'मराठीचित्रपट पुढे गेला' असे सिद्ध होईल का?

तशीहि एक खास बॉलीवूडची भाषा आहे असे म्हणायला हरकत नाही. तिला चांगले म्हणा, वाईट म्हणा, पण भारतात सर्वांना ती समजते. एखादा चित्रपट अनेक कलांच्या आविष्कारातून उत्ताम दर्जाचा आहे असे सर्वांचे मत झाले तर तो मराठी आहे की नाही, याचा काय संबंध?

मराठीची तमिळ, तेलुगू शी तुलना कदाचित बरोबर नाही. कारण त्या राज्यांतील सर्वसाधारण माणसाला तेवढे हिन्दी समजत नाही (तमिळनाडु मधे व हैदराबाद च्या बाहेर आंध्र मधे). बंगाली, गुजराथी वगैरे चित्रपट मराठी च्या तुलनेत कसे चालतात कोणाला माहीत आहे का?

आगाऊ आणि दक्षिणेतील लोकांच्या चित्रपट प्रेमाची माहिती असलेले लोक - आपल्याला वरकरणी निर्बुद्ध व भडक वाटणारे चित्रपट , आपल्या हीरो च्या कोणत्याही इमेज मधे न बसणारे हीरो वर्षानुवर्षे तेथे कसे चालतात? त्यातील मणी रत्नम वगैरेंचे पिक्चर्स चांगले असतात हे माहीत आहे पण इतर अनेक असे आहेत की जे हिन्दीत कधीच चालणार नाहीत.

आपल्याला वरकरणी निर्बुद्ध व भडक वाटणारे चित्रपट , आपल्या हीरो च्या कोणत्याही इमेज मधे न बसणारे हीरो वर्षानुवर्षे तेथे कसे चालतात?>>>>
हे जे सगळे आपल्याला वाटते आहे ते त्यांना वाटत नाही कारण त्यांचा सिनेमाच मुळात हिंदी सिनेमाच्या व्याकरणाबाहेर, त्याच्या प्रभावाशिवाय तयार झाला आहे. दुसरी गोष्ट ही की आपल्याला जे दक्षिणी सिनेमे जनरली दिसतात त्यात असलेच भडक सिनेमे असतात, त्यातले चांगले फार कमी वेळा आपल्यापर्यंत पोचतात (किंवा पोचतात ते भयानक रिमेक होऊन, उदा. कमलहसनचे अदभुत काम असलेला 'स्वातीमुथ्यम' आणि त्याचा बकवास रिमेक 'इश्वर'). अचाट सिनेमासाठी आपण रजनी-कमलची टर उडवतो, पण त्यांनी केलेले अनेक जबरदस्त रोल्स आपल्याला माहितीही नाहीत (एकच उदाहरण देतो, कमल-रजनी-श्रीदेवी अशी अफाट कास्ट असलेला '१६ वयथिनिले' हा पहाच). बसता-उठता हॉलिवूडच्या शपथा घेणार्‍यांनी आपल्या रिजनल सिनेमाकडेही कधीतरी पहावे.
सिनेमाच्या तंत्रात, नवे विषय हाताळण्यात सर्वच साउदी सिनेमाने हिंदीच्या आधीच सुरुवात केली होती.
मराठी सिनेमाचे मात्र तसे नाही. मुंबई आणि बॉलीवूड महाराष्ट्रात असल्याने आपल्यावर त्याचा प्रचंड पगडा आहे. आपल्या कलाकारांना कधी एकदा हिंदीत जातो असे वाटते, हिंदी गाजवणार्‍या मराठी कलाकारांनी मराठीत काम करावे असे साकडे घातले जाते.
दुसरे असे की तमिळ किंवा तेलूगु सिनेमा अनेकदा दोन भाषात, दोन्ही राज्यात एकदम रिलिज होतो. त्यामुळे त्याचा प्रेक्षकवर्ग प्रचंड असतो आणि फायदाही. रिमेकने मिळ्णारे पैसे वेगळेच. जुन्या काळात जितेंद्र, नंतर अनिल कपूर आणि आता अक्षयकुमार दक्षिणी रिमेकच्या जोरावर तगुन आहेत.