अजून...

Submitted by उमेश कोठीकर on 6 November, 2010 - 04:35

अजून आहे जरा बिलोरी
डोळ्यांमधला चंद्रगारवा
अजून आहे मिठीत ओठी
थरथरतो सलज्ज मारवा

अजून येते साद रेशमी
स्वप्नांमधल्या कणाकणांतून
अजून येते तीच विराणी
व्याकुळलेल्या तनामनातून

अजून वाटे मिठीत घ्यावे
दिवस कोवळे डोळ्यांमधले
अजून वाटे चुंबून घ्यावे
श्वास बोलण्या आतुरलेले

अजून वाहे स्पंदनगंगा
हृदयामध्ये तुझ्याचसाठी
अजून वाहे अवखळ वारा
तुझ्या मिठीच्या निवांत काठी

अजून मिटते शरीरपाकळी
चुंबून घेता हळूच प्रियकर
अजून उमले पुष्प शरीरी
तृप्त तृप्त अन तरीही नवथर

गुलमोहर: 

उमेश, बर्‍याच दिवसांनी आलास ते ही गुलाबी पान अन पानावरचे स्पर्श तसेच घेऊन आलास रे ..:डोमा:

मस्त कविता... Happy

अजुन तुम्ही मोहुन घेता,
कवितेमधल्या भावांमधुनी Happy

मस्त! welcome back Happy

सुंदर कविता !!!! welcome back उमेश !!!!

अजून येते साद रेशमी
स्वप्नांमधल्या कणाकणांतून
अजून येते तीच विराणी
व्याकुळलेल्या तनामनातून>>> खास !!

<< अजून आहे जरा बिलोरी
डोळ्यांमधला चंद्रगारवा
अजून आहे मिठीत ओठी
थरथरणारा लज्ज मारवा >>
व्वा ! सुरेख. खूप आवडली !