मराठी संकेतस्थळे व दिवाळी अंक

Submitted by राज जैन on 6 November, 2010 - 02:05

नमस्कार,

मराठी वाचक विविधता असलेल्या लेखाकरता आतुरतेने दिवाळी अंकाची वाट पाहत असे, पण हळूहळू नवनवीन बदल झाले व युनिकोडचा शोध लागला, मायबोलीने एका विदेशी भाषेचे, भरलेल्या, दाटीवाटी असलेल्या जंगलात, एक मराठीचे रोपटं लावलं व हळू हळू मराठी भाषेचे बीज चांगलेच फोफावले. प्रत्येकाच्या मनात दडून बसलेला लेखक ह्या युनिकोडचा आधार घेऊन आपली लेखणी पाजळू लागला, व त्यांची ही भुक पुर्ण करण्यासाठी नवनवीन मराठी संकेतस्थळे निर्माण होत गेली, काही रुजली, काही फोफावली तर काही काळाच्या ओघात वाळून बेचिराख झाली, पण जी बेचिराख झाली त्यांनी देखील जाता जाता, नवीन रोपट्यांना खतं म्हणून आपल्या संकल्पना दिल्या. व जे रुजले होते, त्यांनी माय मराठीची सेवा, जिवापाड केली.

१०-१२ वर्षापूर्वी मायबोली.कॉम सुरु होण्याआधी, महाजालावर मराठी लेखन वाचावयास मिळणे म्हणजे दुर्मीळ होते, व मायबोलीवर देखील लेखन करायची सोय इंग्रजीमध्ये होती, तो एक प्रकारचा फोरम होता. आजच्या सारखं त्याचं देखणं रुप नव्हते, ना विविध प्रकारचे लेखन होते, पण आज मायबोली एक समृद्ध व्यासपीठ आहे, व सर्वात जूने असून देखील वेगाने होणारे बदल आत्मसात करत आहे. २००० च्या सुमारास मराठीवर्ल्ड.कॉम ने आपली सुरुवात केली, पण ते एकतर्फी लेखन असलेले, वाचकांना आपले विचार मांडण्याची सोय तेव्हा नव्हती ( आता आहे की नाही ते माहिती नाही.) नंतर २००३ च्या आसपास मनोगत.कॉम सुरू झाले त्यांनी काही नवनवीन कल्पना, मराठी जाल विश्वावर यशस्वी राबवल्या. स्वतःचे असे लेखन न ठेवता, वाचकांनाही लिहावयास लावणे व इतरांच्या लेखाला प्रतिसाद देणे हि संकल्पना सुरु केली. शुद्धलेखन तपासनीक ही मराठी महाजालावर सर्वात प्रथम मनोगत ने कल्पना राबवली. त्यांच्या पासून प्रेरणा घेऊन, अनेक संकेतस्थळे चालू झाली, गद्य-पद्य, अनुभव अश्या विविध लेखन प्रकारांनी मनोगत सजत गेले. अगदी मोठमोठ्या कंपण्यादेखील मराठी संकेतस्थळे चालू करायचा विचार करत आहेत, अशी अफवा देखील पसरू लागली होती. नंतर काय झाले माहिती नाही त्याचे. पण तो आपला विषय नाही आहे सध्या. मनोगत नंतर, उपक्रम.ऑर्ग सुरू झाले व माहितीची देवाण घेवाण मराठी भाषेत सर्वात प्रथम सुरू झाली. इतिहासापासून ते तंत्रज्ञानापर्यंत सर्व माहितीपूर्ण लेखन तेथे वाचावयास मिळू लागले व रोपट्यांचे अवाढव्य वृक्षात कधी रुपांतर झाले हे कोणाला समजलेच नाही. २००६ च्या शेवटी शेवटी अजून एक संकेतस्थळाची पायाभरणी सुरू झाली होती, मिसळपाव.कॉम. एक वेगळाच झंझावात. सदस्यांना त्यांच्या भाषेत, त्यांच्या मनातील विचारांना जसेच्या तसे व्यक्त करून देण्याची सुविधा दिली. मिसळपाव.कॉम ने निरनिराळे उपक्रम यशस्वीपणे राबवून दाखवले, मोठ मोठ्या लेखमाला, कविता, विडंबने ही मिसळपावची बलस्थाने ठरलीच पण भटकंती व पाककृती हा लेखन प्रकार मिसळपावने जसा महाजालावर पुनर्जिवित केला.

२००८ च्या सुमारास संगणकावर खटाटोप करणार्‍या मराठी माणसाला, संगणकाची तोंड ओळख करुन देणे व त्यांना मदत करणे ह्या उद्देशाने, अभिनव अशी कल्पना घेऊन लोकायत.कॉम लोकांच्या सेवेसाठी रुजू झाले. बंद पडलेला संगणक ते प्रणालीची समस्या ह्यावर मनमोकळे पणे चर्चा व घरात स्वतः देखील करता येतील असे त्या वरील उपाय. लोकायतने महाजालावर मदतीचा हात देता येतो व गरज पडली तर मदतीसाठी आवाज देता येतो हे दाखवून दिले. त्यानंतर २०१० च्या मध्यास एक नवीन कल्पना, नवीन विचार घेऊन पुस्तकविश्व.कॉम मराठी मंडळी समोर उभे राहिले, नावावरून समजेल, पूर्णतः: पुस्तकांकरता, पुस्तकांसाठी असलेले पुस्तक वेड्या लोकांचे आगळे-वेगळे जग ! सध्या नवीनच पण वेगाने आपली मुळे जमिनीमध्ये रोवण्यास सज्ज असे हे संकेतस्थळ.

२००५ ते २०१० ह्या कालावधीत समुदाय संकेतस्थळाचे रोपटे वाढून वटवृक्षामध्ये रुपांतर झाले होते. पण हा वटवृक्ष फुलला-फळला व मराठी वाचकांची भुक सक्षमपणे भागवू लागला त्यासाठी अजून एक समुदाय कारणीभूत होता. "ब्लॉगर्स" मराठी ब्लॉगर्स ! सध्या हजारो ब्लॉग आहेत मराठीमध्ये, ह्यावर एक वेगळाच लेख होईल.

नमनालाच घडाभर तेल झाले आहे, आता मुख्य मुद्दा कडे वळू . नवनवीन उपक्रम राबवणारे ह्या मराठी महाजालाने नियमितपणे ऑनलाईन दिवाळी अंक प्रसिद्ध करण्याचा पायंडा पाडला आहे, त्याला जागून अनेक दिवाळी अंक प्रकाशित झाले आहेत, त्यातील मुख्य चार अंकाची फक्त माहिती देतो आहे, परिक्षण करण्याएवढी बुध्दी देवाने दिली नाही आहे, त्यामुळे ते काम तुम्हा वाचकांच्या स्वाधीन.

**********

१. मायबोली - हितगुज

मायबोली हे सर्वात जुने-जाणते म्हणून अपेक्षा देखील थोड्या जास्त. पण वाचकांच्या अपेक्षांचा भार त्यांच्या संपादक मंडळाने लिलिया वाहिलेला दिसतो आहे, व का वाहू नये १० दिवाळी अंकाचा अनुभव आहे पाठीशी त्यांच्या. देखणे मुखपृष्ठ, आकर्षक रंगसंगती व विभागवार अंकातील लेखांची मांडणी केलेली आहे. नेहमी प्रमाणे विषयांचे वेगळेपण जपण्यांचा प्रयत्न व त्यांमागे घेतलेले कष्ट अंक नजरे समोरुन घालताच दिसून येतात. महाजालवर अनेकवेळा नावाजले गेलेले लेखक तर दिसत आहेच, पण त्यांच्या लेखनात नाविन्य आहे.

२. मनोगत

ह्यांचे हे ४थे वर्ष दिवाळी अंकाचे. तांत्रिकदृष्ट्या मनोगत हे संकेतस्थ़ळ सशक्त आहेच, त्यांचीच छाप दिवाळी अंकावर देखील आहे. मग ते संकेतस्थळाच्या दर्शनी भागाच्या एका कोपर्‍यात दिवाळी अंकाचा दुवा असो वा पुर्ण दिवाळी अंक ! अनेकानेक सुंदर लेखांनी नटलेला, ललित, कथा, विज्ञानविषयक, अनुवादित कथाची मेजवानी , कवितांची जोडी असलेला व सोबत पाककृती व चवी साठी व्यंगचित्रे. अनेक महाजालावर नावाजलेले लेखक / लेखिका ह्यांच्या लेखांनी नटलेला आहे हा दिवाळी अंक.

३. उपक्रम

उपक्रमच्या दिवाळी अंकाचे हे तीसरे वर्ष. माहितीचा अखंड वाहता धबधबा, हे आपले रुप त्यांनी दिवाळी अंकामध्ये ही जपलेले आहे, पण अंक कुठे ही कंटाळवाना होत नाही हे ह्यांचे यश. माहिती-चर्चा अशा प्रकारची रुपरेखा असलेल्या संकेतस्थळाचा दिवाळी अंक मात्र मनोरंजक आहे, विविध विषय हाताळलेले आहेत, व्यंगचित्रे आहेत, छायाचित्रे आहेत, मुलाखत आहे. एकून दर्जेदार अंक ! वाचकांनी नक्कीच वाचावा असा हा अंक !

४. पुस्तकविश्व

आताश्याच बाळसे धरलेल्या ह्या संकेतस्थळाने, सर्वांनाच चकित केले, कोणाच्या कल्पनेत देखील नसताना ह्या संकेतस्थळाने आपला पहिला दिवाळी अंक प्रसिध्द केला. डोळे खिळून राहतात ते एखाद्या नावाजलेल्या पुस्तकांचे मुखपृष्ठ शोभावे असे सुंदर व आकर्षक मुखपृष्ठ. नीळसर झाक असलेली रुपरेखा व सहजसोपी मांडणी. पुस्तक ह्या विषयावर आधारलेल्या ह्या संकेतस्थळाचा दिवाळी अंक देखील त्यांचीच सावली दाखवतो, पुस्तक परिचय, काव्य संग्रह परिचय, लेखकांचे परिचय व मुलाखत ह्या विषयावर आधारलेला हा अंक.

*****

आता पुढच्या दिवाळीची वाटा पाहू, जुणे जाणते अंक येतीलच पण त्याच बरोबर नवनवीन अंक देखील आपल्याला वाचावयास मिळतील अशी आशा करु.

आपलाच,

राज जैन.
(मीमराठी.नेट)

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान माहीती.
आपल्या मी मराठीला हार्दीक शुभेच्छा !
मायबोली, उपक्रम, मनोगत, मानबिंदू च्या रांगेत मी मराठीही नक्कीच येईल असा विश्वास वाटतो.

४. पुस्तकविश्व चा दुवा ऊपक्रम च्या संकेतस्थळावर नेतोय.

मला वाटते पुस्तकविश्व चा दुवा खालील प्रमाणे असावा. क्रुपया चुकल्यास दुरुस्त करावे.

http://pustakvishwa.com/