बागुल

Submitted by बाबल्या on 22 May, 2008 - 00:53

मायबोली वर ही माझी पहीलीच कथा. वाचा आणि काय वाटलं ते जरुर कळवा.
*****************************************************
१.
प्रीती आणि प्रदीपचा नांदला गावातील आजचा तिसरा दिवस. नांदला गावाच्या परंपरेला अनुसरुन उगवलेली रम्य सकाळ. प्रदीपने आपली ऑफीसची बॅग घेतली आणि तो ऑफीसला निघाला, जाता जाता त्याने प्रीतीला आवश्यक त्या सुचना दिल्या आणि तो बाहेर पडला. प्रदीप दिसेनासा होईपर्यंत प्रीती दारातच उभी राहीली, प्रदीप दिसेनासा झाला तशी ती मागे वळली आणि हॉलच्या दारात हॉलकडे बघत उभी राहीली, केलेल्या सजावटी वरुन एक समाधानकारक नजर टाकुन ती किचन मध्ये निघुन गेली.
प्रदीप हा ऑटोमोबाईल इंजिनीयर होता आणि जैनपूर या भारताच्या एका प्रगत शहरात एका मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीत डीझाईन डीपार्टमेंट मध्ये मॅनेजर म्हणुन काम करत होता. कामानिमित्त प्रदीपने निम्मे जग पालथे घातले होते.
प्रीती, एका लहानश्या कुटुंबात वाढलेली सुशिक्षित व सुस्वरुप मुलगी, दिसायला कमालीची सुंदर. शिक्षण संपल्यावर प्रदीपचे स्थळ आले, नाव ठेवायला कुठेच जागा नव्हती. सगळ्यांच्या संम्मतीने लग्न झालेले. लग्नानंतर थोड्याच दिवसात प्रीतीला कळुन आले की तिची निवड चुकीची नव्हती.
लग्नानंतर थोड्याच दिवसात प्रदीप प्रीतीला घेऊन परदेशी गेलेला. प्रीती पन प्रदीपच्या मागोमाग तो जिथे जाईल तिथे जायची. प्रीतीच्या आयुष्यात आता फक्त प्रदीप आणि त्याचं प्रेम या दोनच गोष्टी जास्त मौल्यवान होत्या. प्रदीप पण शक्य होईल तेव्हढी प्रीतीची काळजी घ्यायचा आणि प्रीतीला स्वर्ग दोन बोटं उरायचा.
प्रीती आणि प्रदीपच्या या सुखी संसारात फक्त एकच दुख होतं ते म्हणजे लग्नाला आठ वर्षं झाली तरी अजुन प्रीतीचा मंगलकलश रीता होता. निम्मे जग फिरलेल्या प्रदीपने जगातील सर्वोच्च उपचार केले होते पण उपयोग शुन्य होता. प्रत्येक ठीकाणी, तुमच्यात काहीही प्रॉब्लेम नाही एव्हढंच उत्तर मिळायचं पण मुल का होत नाही याचं उत्तर अजुन तरी कोणी दिलं नव्हतं.
प्रदीपने प्रीतीची खुप समजुत काढली होती, पण त्यालाही कुठे तरी मुलांची आस होतीच याचाच परीणाम म्हणुन कधी कधी तो ही वैतागायचा आणि प्रीती त्याला कळु न देता रडुन घ्यायची.
आणि शेवटी प्रदीपने तो निर्णय घेतला, त्याने कंपनीला कळवले की आता त्याला भारतात जायचे आहे आणि तिथेच काम करायचे आहे. कंपनीनेही त्याला आपल्या भारतातल्या नविन प्लॅन्ट ची जबाबदारी सोपवली आणि प्रदीप बायकोसह भारतात परत आला. तसं त्याचं गाव नाशिक पण कंपनी जैनपूरला असल्याने त्याने जवळच असलेल्या नांदला गावात राहण्याचा निर्णय घेतलेला.
दिड दोन महीने निघुन गेले, प्रीती आणि प्रदीप नांदला गावात मस्त रमुन गेले. मुल होत नसल्याचा सल प्रदीपने स्वत:ला कामात बुडवुन बोथट केला होता आणि प्रीतीने अध्यत्मिक मार्गाला लागुन.

२.
पावसाळ्याची चाहुल लागली होती, आज उद्या कधीही पाऊस पडेल असे वातावरण गेले दोन तीन दिवस होते.
प्रदीप अजुन आला नव्हता, त्याला ऑफीसमध्ये एक मिटींग आणि नंतर डीनर पार्टी होती म्हणुन तो अकरा साडे अकरा पर्यंत येईन असे सांगुन गेला होता.
रात्रीचे दहा वाजलेले. प्रीती बेडरुममध्ये पुस्तक वाचत बेड वर लवंडलेली, तिच्या हातातुन पुस्तक गळुन बेड वर पडलेले आणि तिचा डोळा लागलेला.
अचानक, प्रीती दचकुन उठली, अवती भवती तिने नजर फिरवली, अनोळखी नजरेत ओळखीचे भाव उमटले आणि ती बेडवरुन उठली. हॉलमध्ये येऊन तिने पाहीले तर हॉलची एक खिडकी उघडी होती, बाहेर तुफान वादळ सुटलं होतं आणि खिडकीचा दरवाजा भिंतीवर वेड्यासारखा आपटत होता. प्रीती गडबडीत खिडकी कडे धावली, तिने घाईतच एक नजर बाहेर टाकली आणि खिडकी बंद करणार इतक्यात तिची नजर समोर गेली.
समोरचं पिंपळाचं झाड या तुफान वार्‍यातही आपल्याच मस्तीत डुलत होतं, प्रीतीला काहीतरी वेगळेपण जाणवलं आणि ती ताठरली, एक दोन क्षण ती एकटक त्या झाडाकडे बघत उभी राहीली आणि एका अनामिक भीतीनं गारठुन गेली............. तो पिंपळ तिच्याकडे बघुन हसत होता..........

३.
प्रदीपला डीनर संपवुन निघायला साडेअकरा वाजले होते, घरी फोन करुन प्रीतीला कल्पना द्यावी म्हटलं तर फोन बंद पडलेले. तसं ऑफीस ते घर हे अंतर जास्त नव्हतं म्हणा अगदी अर्ध्या तासाचे अंतर. पण प्रदीपला चैन पडत नव्हती, शेवटी मनातले विचार बाजुला सारुन त्याने गाडी सुरु केली. गाडी पार्क करुन त्याने बेल दाबली त्यावेळी घड्याळ सव्वा बाराची वेळ दाखवीत होते. बर्‍याच वेळ झाला तरी दार उघडत नाही म्हणुन त्याने दाराला चावी लावली, नशिब एव्हढंच की आतुन कडी लावली नव्हती. आत गेल्याबरोबर प्रदीपने बॅग सोफ्यावर फेकली आणि प्रीतीच्या नावाचा गजर करत तो बेडरुम मध्ये शिरला. समोरचं दृश्य बघुन तो जरा चमकलाच, प्रीती बेडवर पालथी झोपली होती, एक हात बेडच्या बाहेर लोंबकळत होता, प्रीतीच्या अंगावरचे कपडे अस्ताव्यस्त झाले होते, विस्कटलेल्या केसांनी अर्धवट चेहरा झाकला होता आणि डोळे अर्धवट मिटलेले होते. तिला सरळ झोपवायच्या हेतुने प्रदीपने प्रीतीच्या गळ्यात हात घातला आणि चटका बसावा तसा त्याने हात मागे घेतला, खरोखरच प्रीतीचे अंग तापाने फणफणले होते. कसेबसे तिला व्यवस्थित करुन प्रदीपने शेजारच्या डॉ. कुलकर्णींचा मोबाईल डाईल केला. दहा मिनिटात डॉ. कुलकर्णी आले त्यानी प्रीतीला तपासले, एक इंजेक्शन देऊन आणि सकाळी परत यायचे आश्वासन देऊन ते निघुन गेले.
डॉक्टर निघुन गेले तरी कीतीतरी वेळ प्रदीप प्रीतीच्या उशाशी बसुन होता, गेल्या आठ दहा दिवसातील कामाचा ताण असह्य होऊन असे झाले असेल अशी मनाची समजुत घातल्यावर त्याला थोडं बरं वाटलं. कपडे बदलुन तो विचार करत सोफ्यावर आडवा झाला. बर्‍याच वेळ भुतकाळात भटकल्यावर नकळत त्याला झोप लागुन गेली.

४.
कसल्याश्या आवाजाने प्रदीपला जाग आली, आळस देत तो सोफ्यावर उठुन बसला. एक दोन क्षण, कालचा प्रकार त्याच्या नजरेसमोर येऊन गेला आणि तो बेडरुमकडे धावला. प्रीती उठायचा प्रयत्न करत होती आणि तिचा हात लागुन जवळच्या टीपॉय वरचा फ्लॉवर पॉट खाली पडुन फुटला होता. प्रदीपने पुढे होऊन आधार दिला आणि तिला बसते केले. ताप कालच्या पेक्षा कमी होता पण चर्या मलुल होती.
प्रदीप म्हणाला, "अगं वेडे, जरा स्वताकडे लक्ष देऊन काम करीत जा. बघ कीती हाल करुन घेतलेस शरीराचे."
यावर प्रीतीला काहीतरी बोलायचे होते पण काही बोलायची इच्छाच होत नव्हती. क्षणभर तिने डोळे मिटुन घेतले, डोळ्यासमोरच्या काळ्या डोहात तो पिंपळ पुन्हा हसला आणि तिने खाडकन डोळे उघडले. तिने प्रदीप कडे पाहीले तर तो तिच्या केसावरुन हात फिरवत कसला तरी विचार करत होता. तिने काहीतरी बोलायचा प्रयत्न केला पण घशातुन विचित्र आवाज निघण्यापलिकडे काहीच साध्य झाले नाही, फक्त प्रदीपचे तिच्या चेहर्‍याकडे लक्ष गेले तशी त्याने तिला जवळ ओढुन घेतली, मग मात्र प्रीतीचा बांध कोसळला आणि ती हमसाहमशी रडु लागली. प्रीती रडत होती आणि प्रदीप तिला थोपटत होता. बर्‍याच वेळाने प्रदीपच्या लक्षात आले की प्रीतीला परत झोप लागली आहे, तसे त्याने तिला व्यवस्थित झोपवले आणि तो बाथरुम मध्ये जाणार इतक्यात डॉ. आले.
"काय प्रदीपराव, काय म्हणतय पेशंट?"
"अजुन झोपलीय, पण ताप कमी आहे असं वाटतंय?"
डॉ आणि प्रदीप तिच्या रुम मध्ये आले तशी तिलाच जाग आली, ती उठुन बसण्याचा प्रयत्न करणार इत्क्यात डॉ म्हणाले, "पडुन रहा वहीनी, आज पुर्ण आराम करायचा"
डॉ. नी तिला तपासले, औषधे दिली आणि ते व प्रदीप बाहेर आले.
"डॉ. हे असं अचानक काय झाले?"
"अहो प्रदीपराव, बरेच दिवस मी तुमची व वहीनांची पळापळ बघतोय म्हटलं. अतिश्रमानं होतं असं. तुम्ही काळजी करु नका संध्याकाळपर्यंत अगदी व्यवस्थित होतील त्या. पण एक करा, त्यांना पुर्ण विश्रांती घेऊ द्या."
डॉ. ना पोचवुन प्रदीप कीचन मध्ये गेला, मस्त पैकी दोन कप चहा घेऊन बेडरुम मध्ये गेला. त्याने प्रीतीला एक कप दिला. चहा पिल्यावर प्रीतीला जरा बरं वाटलं. बराच वेळ विचार करुन तिने कालचा प्रकार प्रदीपला न सांगण्याचा निर्णय घेतला होता. तो, नक्की काय प्रकार आहे याची शहानिशा केल्याशिवाय त्याला काहीच न बोलण्याचे तिने ठरविले होते.
चहा पिऊन झाल्यावर प्रदीपने तिला औषधे दिली व तो ऑफीसला फोन करायला म्हणुन हॉलमध्ये आला. ऑफीसला फोन करुन त्याने रजा मागुन घेतली. तो पुर्ण दिवस प्रदीप प्रीतीची व्यवस्थित काळजी घेत होता.
५.
दुसर्‍या दिवशी स्कळी प्रदीपला जाग आली ती प्रीतीने उठवल्यावरच. प्रीती चहाचा कप घेऊन त्याला उठवत होती.
"अगं तु कशाला त्रास घेतेस? तु आराम कर बघु." एका हाताने चहाचा कप घेत त्याने प्रीतीला बेडवर बसते केले
"काही विषेश नाही रे, मला आता बरं वाटतंय. आणि झोपुन झोपुन कंटाळा यायला लागला होता. तु उठ आणि आवर बघु पटपट, ऑफीसला जायचंय ना?"
"अगं पण तुला या अवस्थेत सोडुन कसा जाऊ?"
"मला काही धाड भरली नाही, आणि तसं वाटलंच तर शेजारी डॉ. आहेतच."
प्रीतीने प्रदीपची समजुत घातल्यावर प्रदीप थोडा नाराजीनेच ऑफीसला जायला तयार झाला. ऑफीसला जाताना, ‘काही वाटलं’ तर लगेच फोन करायला सांगुन प्रदीप गेला.
घरातलं सगळं आवरुन प्रीतीने परत पुस्तक हातात घेतलं आणि ती सोफ्यावर बसली. पुस्तक वाचता वाचता एकदम तिचं लक्ष त्या खिडकी कडे गेलं आणि तिच्या अंगावर सरसरुन काटा आला. बराच वेळ ती त्या खिडकीकडे बघत बसली, शेवटी काहीतरी निश्चय करुन ती उठली आणि त्या खिडकी जवळ गेली. अगदी थरथरत्या हातानं तिनं खिडकी उघडली आणि समोर पाहीलं. तो पिंपळ अगदी शांत भासत होता, अगदी सामान्य झाडाप्रमाणेच साधा सुधा पिंपळ. प्रीतीला आपल्या मनोव्यापाराची लाज वाटली आणि तिने खिडकी बंद केली. थोड्याश्या समाधानाने ती परत सोफ्यावर बसली आणि पुस्तक वाचण्यात गढुन गेली.
६.
गार वार्‍यानं प्रीतीला जाग आली आणि तिच्या लक्षात आलं की घरातले दिवे लावलेले आहेत, खिडक्या उघड्या आहेत आणि कीचन मधुन कसला तरी आवाज येतोय. प्रीतीने कीचन मध्ये जाऊन बघितलं तर प्रदीप चहा करत होता.
"अरे, तु कधी आलास?"
"अगं, आत्ताच आलो, म्हटलं तुला झोप लागलीय तर उठवा कशाला. चहा करुन तुला उठवावं म्हटलं तर तुलाच जाग आली."
चहा झाल्यावर, प्रीती नको म्हणत असताना प्रदीपने तिला जबरदस्तीने डॉ. कडे नेलं होतं. डॉ. नी प्रीतीला तपासुन आता ठीक आहे म्हटल्यावर प्रदीप आणि प्रीती निर्धास्त मनाने घरी आले. जेवण करुन थोडा वेळ गपा झाल्यावर प्रदीप म्हणाला, "चल आता झोपुया" आणि तो बाथरुमकडे निघाला.
प्रीतीपण सोफ्यावरुन उठली तिने दरवाजा लॉक केला आणि ती खिडकीकडे वळली. खिडकी बंद करता करता ती जागेवरच खिळुन उभी राहीली. समोरचं ते पिंपळाचं झाड आपल्याकडे बघुन हसत आहे असा प्रीतीला पुन्हा एकदा भास झाला. तिने घाबरुन खिडकी झाकायचा प्रयत्न केला पण मेंदुच्या आज्ञा मानायला शरीराने नकार दिला होता. ती तशीच संमोहीत झाल्यासारखी त्या झाडाकडे बघत उभी राहीली. आता त्या झाडाचे हसणे जाणवण्या इतपत रुंदावले होते. पानं फांद्या वेड्यासारख्या डुलत होत्या, एक दोन क्षण ते हास्य मोठं मोठं होत आपल्याला विळखा घालतंय असा प्रीतीला भास झाला आणि अचानक ते झाड शांत झालं. आजुबाजुच्या वादळी परीस्थितीची तमा न बाळगता शांत झालं. हळुच त्या झाडाचं एक पान फडफडलं नंतर दुसरं नंतर तिसरं असं करत करत एका भागात पुंजक्याने सळसळ सुरु झाली. होता होता त्यातुन एक लाल भडक ठीपका बाहेर आला..... मोठा होत होत एका जागीवर स्थिरावला..... एका ठीपक्यातुन दुसरा ठीपका बाहेर आला..... ते दोन ठीपके...... अगदी लाल लाल भडक जणु छोटे आगीचे डोळे असावेत तसे. ते ठीपके....... ते लाल लाल डोळे एकदम मोठे होत एका जागी स्थिरावले आणि प्रीतीकडे रोखुन बघु लागले, प्रीतीही डोळ्याची पाती न लवता त्या डोळ्याकडे रोखुन बघत होती..... वेड्यासारखी..... तिच्या शरीरातली ताकत कुणीतरी हीरावुन नेली होती......... आता त्या डोळ्यांची धग प्रीतीला जाणवु लागली....... अगदी चटके जाणवु लागले....... शेवटी अशरीरावर शरीराने मात केली आणि प्रीती जीव खाऊन किंचाळली........ आणि लोळागोळा होऊन खाली कोसळली.
७.
प्रदीप डॉ. च्या समोरच्या खुर्चीत बसला होता, डॉ. कुलकर्णी हसर्‍या चेहर्‍याने त्याच्याकडे बघत होते आणि प्रदीप अजुनच गोंधळात पडला होता.
"अहो, प्रदीपराव एव्हढं घाबरताय कशाला?"
"डॉ, तिला झालंय तरी काय? घाबरायचं कारण नाही ना?"
"अजिबात नाही, उलट ही तर गुड न्युज आहे."
"म्हणजे?"
"अहो, तुम्ही बाप होणार आहात"
हॉस्पिटल मधुन घरी आल्यावर प्रदीप जाम खुशीत होता, आल्या आल्या त्याने गावाकडे आईला फोन करुन कळवले आणि ताबडतोब यायला सांगितले. आता प्रदीप अजिबात रीस्क घेणार नव्हता, हे मुल त्यांच्या संसारात नवी आशा घेऊन येणार होतं, त्यांचा संसार आता परीपुर्ण होणार होता.
८.
शेवटी तो दिवस उजाडला. प्रीतीला वेदना सुरु झाल्या होत्या. प्रदीपने ताबडतोब प्रीतीला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले. ......आणि प्रीतीच्या कळा वाढल्या...... ती किंचाळत होती...... तडफडत होती पण त्यांच्या संसाराच्या वेलीवर कळी फुलायला अजुन वेळ होता. प्रचंड वेदनेचा डोंब पोट फाडुन टाकावा इतका असह्य झाला होता..... प्रीती गेली ४ तास झुंजत होती..... डॉ. पण असहाय झाले होते...... सगळ्या गोष्टी नॉर्मल असुनही हा असला प्रकार त्यांच्या वैद्यकीय बुद्धीला आव्हान होऊन बसला होता....... इतक्यात एक जीवघेणी कळ सळसळत पोटातुन मेंदुकडे गेली...... प्रीतीच्या थकलेल्या शरीरावर मात करत ती कळ मेंदुत लोप पावली आणि बाळाच्या आगमनाचे सुर पुर्ण हॉस्पिटलात घुमले.
९.
प्रीती तब्बल ७ तासाने शुद्धीवर आली. तिने शेजारी पाहीले तर पाळण्यात बाळ निजला होता. ती जागी होताच नर्स पुढे झाली. तिने प्रीतीला उशीच्या आधाराने बसते केले. नर्सने पाळण्याकडे जाऊन बाळाला प्रीतीच्या हातात दिले आणि ती बाहेर निघुन गेली.
प्रीती आपल्या बाळाकडे बघत हरखुन गेली होती, तिची आणि प्रदीपची आठ वर्षाची तपश्चर्या सफल झाली होती...... त्यांचं आयुष्य बाळाच्या आगमनाने परीपुर्ण झाले होते...... हळुच बाळाने डोळे उघडले..... प्रीतीने बाळाच्या डोळ्यात पाहीले आणि ती दचकली...... या क्षणी..... आयुष्यातल्या सर्वोच्च आनंदाच्या क्षणी तिला ते लाल भडक डोळे आठवले...... एक दोन क्षण...... ती लगेच सावरली...... मनात येणारे अशुभ विचार हुसकावत ती बाळाकडे बघुन हसली...... बाळाची आणि तिची नजरानजर झाली.... बाळाच्या डोळ्यात ओळख दिसली आणि बाळ हसला...... बाळाचे हसणे बघुन प्रीतीचे काळीज चरकले..... बाळ हसत होता...... अगदी पिंपळाचे झाड हसावे तसे....... आणि हसता हसता..... दोन पांढरे शुभ्र सुळे....... बाळाच्या ओठाआड चमकत होते......

समाप्त.

गुलमोहर: 

बाबल्या! पहिलाच प्रयत्न छान जमला आहे. पहिल्याच चेंडूवर चौकार!

बाबल्या, बापरे!...
पण छान गोष्टं... मला स्वतःला भयकथा लिहायला जमत नाही... पण वाचायला आवडतात (दिवसाढवळ्या... बाहेर वादळ पाऊस असलं काही नसतानाच :))
इथला पहिला प्रयत्नं म्हणूया... कारण तुम्ही लिहिण्यात मुरलेले दिसता... छान जमलय.

एकच गोष्टं, जी अजून स्पष्टं झालेली मला आवडली असती... ती म्हणजे, बाळाचे सुळे आणि पिंपळाचा संबंध. म्हणजे सुळेच का? बाळाचे डोळे लाल का नाहीत.... जे गोष्टीत पिंपळाच्या बाबतीत वापरले गेलेत?

पहिला प्रयत्न, म्हणजे फक्त इथलाच प्रयत्न ना ? छान जमलीय. दाद प्रमाणेच माझीही तिच शंका.
पिंपळाचा हेतू काय असावा वगैरे संभ्रम आहेत, पण इथे वाचकाच्या कल्पनाशक्तिवर सगळे सोपवले आहे तेही योग्यच आहे.
दाद, नवजात बाळाला पूढचे दोन दात असू शकतात. सुळे मात्र नसतात, सहसा.

बापरे काय लिहिलय बाबल्या,
सहिच,
अजुन भयकथा येवुद्यात.
(पहिला प्रयत्न नाहि वाटत, छान हाताळलि आहे कथा)

वरच्यांना अनुमोदक!!
पण बाबल्या मला बागुल म्हणजे काय ते अजिबात कळ्ळं नाही!! जरा कुणीतरी जाणकार खुलासा कराल का??

कथा छानच जमलीय!!
थोड वाईट वाटल की इतक्या वर्षाने मुल व्हावे आणि ते असे. Sad
पण बाकी भयकथा म्हणून खरच फार छान कथा आहे.

मुल नक्की कसे झाले? डोल्यात बघुन.... झेपले नाही. भीती मात्र वाट्ली.

बाबल्या सुंदर कथा. बागुल म्हणजे काय?

छान कथा, बागुल म्हणजे माझ्या मते लहान मुलांना भिति घालण्याखातर एखाद्या व्यक्तिचे नाव घेतो तेच. म्हणजे झोप नाहितर बागुल येइल असे म्हणतो आपण.

chhan jamaliy bhayakatha................

आई गं........ सरसरुन काटाच आला अंगावर !!

धन्यवाद येडाकाखुळा, दाद दिनेश, रमणी, सुश, mnp, रंगराव, किशोर, आशु, रुपाली, जयावि Happy
तुम्हा सर्वांना हा पहीला प्रयत्न वाटला नाही यातच सर्व आले Happy पण खरंच हा माझा पहीलाच प्रयत्न आहे Happy
दाद, दिनेश तुम्हाला कथा आवडली हे वाचुन आनंद वाटला Happy मला ही कथा अजुन पुढे लिहायची होती पण म्हटलं इथेच संपवु म्हणुन तिथेच संपवली Happy दिनेश म्हणतात तसे मी काही गोष्टी वाचकांच्यावर सोपवल्यात Happy
तसं मला ही कथा अजुन पुढे लिहायची होती पण मलाच तो फापट पसारा वाटायला लागला म्हणुन इथेच संपवली. ज्यावेळी मी मुळ कथा प्लॅन केली होती त्यावेळी त्यात त्या पिंपळाचे आणि त्या मुलाचे रहस्य उलगडायचा प्रयत्न केला होता पण काही कारणाने मलाच लिहावे वाटले नाही.
रमणी, रंगराव, किशोर, जर मी कथा अजुन वाढवली असती तर तुम्हाला याचा खुलासा झाला असता. पण पहीलीच कथा म्हणुन दडपण होतेच (दाद वगैरे मंडळींचे लिखाण वाचलेय मी) म्हणुन कथेला एक वळण देऊन ही कथा इथेच संपवली आहे Happy कदाचित याचा पुढचा भाग लिहेन.
परत एकदा धन्यवाद Happy

बाबल्या पुढचा भाग लिहाच तुम्ही.

बाबल्या जर पहीला प्रयत्न आहे तर खरच छान आहे ! सुटणारे धागे तुम्ही पुढच्या प्रयत्नात एकत्र करु शकता. विषय उत्तम कथासुत्रही छान आहे !

.................................................................................................................................. ** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **