नवीन फटाके लॉन्चींग

Submitted by देवनिनाद on 1 November, 2010 - 09:04

दुकानदार - आले, आले सुप्रसिध्द भाई भांगरे यांचे दिवाळी स्पेशल `नवे' फटाके आले. भाई भांगरेचे फटाके घ्या आणि सणाचा आनंद द्विगुणीत करा.

गिर्‍हाईक - का उगाच सणाच्या नावाखाली गिर्‍हाईकांना लुटताय.

दुकानदार - लुटायला मी काय दरोडेखोर आहे का ? काहीतरी बोलून का उगाच भरल्या बाजारात फटके खायला लावू नका. त्यापेक्षा आल्यासारखे फटाके घ्या. आले, आले सुप्रसिध्द भाई भांगरे यांचे फटाके आले.

गिर्‍हाईक - हे बघा आधी तुमची जाहीरातबाजी बंद करा. चांगलं वाईट लोकांना कळतं.

दुकानदार - अहो, गेल्यावर्षीचा गिर्‍हाईकांचा वाढता प्रतिसाद पाहूनच तर भाई भांगरे यांनी बाजारात नवीन फटाके लॉन्च केले आहेत. भाईंच्या हया नव्या फटाक्यांनी नाही जर का चायना फटाक्यांच मार्केट डाऊन केलं ना तर सांगाल ते हरेन. जमाना बदल गया तुम भी बदलो. भाई भांगरे का नया फटाका ले लो.

गिर्‍हाईक - एवढं चॅलेंज करताय तर पाहू तरी भाई भांगरेनी कोणते नवे फटाके लॉन्च केले आहेत.

दुकानदार - हां, आता कसं धंद्याचं बोललात. हे बघा हां एक फटाका आहे

गिर्‍हाईक - अरे बापरे एवढा मोठा.

दुकानदार - घाबरू नका हा दिसायला मोठा आहे पण आवाजाला छोटा आहे. ह्या फटाक्याचं नाव आहे मिस कॉल.

गिर्‍हाईक - मिस कॉल ?

दुकानदार - म्हणजे आपण कसं मोबाईलचा १/२ रुपये बॅलन्स असला की एखाद्याला ट्रिंग .. असा पटकन मिस कॉल देतो तसाच हा फटाका आहे. वात पेटवली की झटकन जळतो... पटकन वाजतो फूटूक ... म्हणून ह्या फटाक्याचं नाव आहे मिस कॉल. तुम्हाला आपटी बार माहीत्येय ना.

गिर्‍हाईक - हो, पण तो आपटी बार नाही. त्याचं नाव टीप टॉप बार आहे.

दुकानदार - अहो, तो बार नाही म्हणत आहे मी. निदान सणासुदीला तरी तो `बार' विसरा. मी फटाक्यातला आपटी बार, जे जमिनीवर आपटतात ते म्हणतोय.

गिर्‍हाईक - हां हां ते होय. ते माहित्येय. आपटले की आवाज येतो फटाक

दुकानदार - बरोबर त्या फटाकचीच ही पुढची आवृती फुटूक .. अर्थात मिस कॉल ...बोला, किती मिस कॉल देऊ.

गिर्‍हाईक - थांबा, आणखी काय काय आहे ते तर पाहू दे. हां फटाका कोणता आहे.

दुकानदार - हां, डायलिंग आहे.

गिर्‍हाईक - डायलिंग ?

दुकानदार - हो, एखादयाला फोन करताना नंबर दाबतो म्हणजे आपण काय करतो

गिर्‍हाईक - डायलिंग. हो, पण ह्याचा आवाज.

दुकानदार - फार मोठा नाहीए. हो पण तुम्ही नेमकी कोणती वात पेटवताय त्यावर सारं अवलंबून आहे. कारण ह्या फटाक्याला दोन वाती असतात

गिर्‍हाईक - दोन वाती ?

दुकानदार - हो, पहीली वात जर पेटवलीत तर आपल्या आवडत्या माणसाजवळ जाऊन वाजतो `ताड ताड ताड' अगदी एकदम नाजूक, एखाद्या लवेबल रिंगटोन सारखा.

गिर्‍हाईक - आणि समजा दुसरी वात पेटली तर

दुकानदार - तर `तड तड तड तड तड धूम फटॅक' साधारण १०-१५ मीटर अंतरात जो कुणी तुमचा शत्रु असेल त्याच्या जवळ जाऊन वाजतो आणि त्यांच तोंड काळ करतो.

गिर्‍हाईक - पण माझं सर्वांशी चांगलं आहे

दुकानदार - मग तुम्ही नका घेऊ हा `डायलिंग' फटाका. कारण ज्याचं कुणीच शत्रु नाही तो स्वतःचाच शत्रु असतो. हा फटाका घेऊन तुम्ही कोणतीही वात पेटवलीत तरी ती तुमच्याच पायाजवळ एकदाच फुटेल `धडाम' कशाला उगाच स्वत:च तोंड काळं करताय.

गिर्‍हाईक - बापरे !! नको मला तुमचा डायलिंग फटाका. त्यापेक्षा हा फटाका द्या. दिसायला बरा आहे हा.

दुकानदार - ह्या फटाक्याचं नाव आहे. कस्ट-मर केअर. ह्याला १० वाती आहेत. (कस्टमर केअरच्या स्टाईलने बोलत) तुम्हाला जर फूस आवाज हवा असेल तर १ नंबरची वात लावा, सुर्रर्र आवाज हवा असेल तर २ नंबरची वात लावा, फूस आणि सुर्रर्र असे दोन्ही आवाज हवे असतील तर ३ नंबरची वात लावा, आधी सुर्रर्र आवाज हवा असेल तर ४ नंबरची वात लावा आणि फूस सुर्रर फूस तर ५ नंबरची वात, सुर्रर्र फूस सुर्रर्र तर ६ नंबरची वात लावा. धूम फटाक ७ नंबरची वात, फट फट फटॅक ..८ ... धडाम धूम ९ वी वात .. आणि सगळे आवाज हवे असतील तर फूस, सुर्रर्र, धूम, फटाकसाठी १० वी वात लावा.

गिर्‍हाईक - ये, मरू दे तुझे मिस कॉल, फिसकॉल ... धूम धडाक फटाके .. तू मला आपले नेहमीचे म्हणजे लवंगी, भूईचक्र, पाऊस, ताजमहल हेच फटाके दे.

दुकानदार - तुम्हाला ह्याच नावाचे दुसरे फटाके चालतील का.

गिर्‍हाईक - ते कोणते आहेत

दुकानदार - म्हणजे आमच्याकडे लवंगी ऐवजी भरली वांगी आहे.

गिर्‍हाईक - भरली वांगी नावाचा फटाका आहे.

दुकानदार - हो, म्हणजे काय माहीत्येय का, ह्या फटाकाचा आकार वांग्यासारखा आहे, आणि ह्यात विविध रंगाची फटाक्याची दारु भरलेय म्हणून ह्याचं नाव भरली वांगी ... सॅंपल वाजवून दाखवू का.

गिर्‍हाईक - हो.

दुकानदार - त्याचे ५ रुपये होतील.

गिर्‍हाईक - मग राहू दे. दुसरं काय आहे.

दुकानदार - दुसरं हे ... थुईचक्र .... भुईचक्रासारखचं हे पण जमिनीवरच फिरतं, पण ह्यातून जो धूर निघतो तो मोराच्या पिसार्‍यासारखा दिसतो ... म्हणून ह्याचं नावं थुईचक्र. त्यानंतर ताजमहल फटाक्याला कॉम्पीटीशन म्हणून आमच्याजवळ झोपडीमहल .... हा गरीबातल्या गरीबाला परवडेल असा हा फटाका आहे. शिवाय ...

गिर्‍हाईक - अरे ये !! फूल टॉकटाईम ...

दुकानदार - ह्या नावाचा आमच्याकडे पाऊस आहेत ... म्हणजे तुम्ही दिवाळीची पहिली आंघोळ झाल्यावर जर का पाऊस लावलात तर तूळशीच्या लग्न लागेपर्यंत हा पाऊस चालूच राहतो. आमचे `फूल टॉकटाईमचे' एक डझन पाऊस जर घेतलेत ना, तर ख्रिसमस, न्यू इयर सगळे सण साजरे होतील. शिवाय ह्याची आणखी एक खासियत म्हणजे नार्मली रेग्यूलर फटाक्याचा पाऊस कसा खालून वर उडतो, हा पाऊस वर उडतो, वरती गेल्यावर उलटा होतो, मग त्यातून पाऊस पडतो ... आणि खरा पाऊस पडतोय असा फिल येतो. घ्या फिल द पाऊस.

गिर्‍हाईक - हे सगळं राहू दे बाजूला तुम्ही मला एक बंदूक आणि टिकल्यांचा एक रोल द्या.

दुकानदार - ठीक आहे. आमच्या भाईंनी बंदूकीत पण वेगवेगळे प्रकार शोधून काढलेएत, म्हणजे कॉमनवेल्थ मधलं आपल्या भारतीय नेमबाजाचं यश बघून .. ..

गिर्‍हाईक - मी तुमच्या पाया पडतो, मला कोणताही नवा प्रकार न समजवता साधी बंदूक आणि टिकल्या दयाल का.

दुकानदार - त्यासाठी तुम्हाला पाठीमागे जावं लागेल.

गिर्‍हाईक - का ?

दुकानदार -कारण साध्या बंदुकी, जूने लवंगी, पाऊस, भूईचक्र हे फटाके फक्त बाबू ढोलकीवालाच विकतो.

गिर्‍हाईक - बाबू ढोलकीवाला ?

दुकानदार - हो तसा तो उत्तम ढोलकी वादकच . पण दिवाळी म्हटलं की तो ढोलकी बाजूला ठेवून फटाके विकतो, त्याच्या दुकानात फू बाई फू ब्रॅन्ड काही फटाके आले आहेत. म्हणजे गेल्या सिझनचे आरती तुडतूडी, वैभव सुरसुरी, विकास चुरचूरी, दिग्या ढॅगचिक, सुप्रिया रापचिक, आनंद किचकिच, क्षिती धपाक धूम फटाके आले आहेत. अरे ले लो भाई ...

गिर्‍हाईक - दिवसें दिवस परंपरा, सण बदलतच चाललेएत .. .. आता फटाके सुध्दा. एकदा ह्या भाई भांगरे ना भेटलं पाहीजे.

दुकानदार - मग भेटा ना, मीच भाई भांगरे.

गिर्‍हाईक - काय ?

दुकानदार - हो. अरे ले लो भाई फटाके ले लो .. (परत आरोळी देतो)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Biggrin

गेल्या सीझनचे तुडतुडी,सुरसुरी,चुरचुरू..... हाहा... फार छान देवनिनाद. Happy

मस्त: .. तुमच्याकडून हे स्कीट लिहायला शिकलं पाहीजे..
तुमची अनेक स्क्रीप्ट बघतोच. जमलं तर एकाददुसरं करून पण बघेन..

डॉक्टर, परदेसाई, नुतनजे, अमित ... प्रतिसादाबद्दल धन्यवाद...

नाही, नुतन. फू बाई फू मध्ये आजकाल सहज सोपे विनोद नकोयत. फक्त मॅड पंचेस ... थिल्लरपणा आणि उथळपणा हवाय. तो माझ्या लिखाणात म्हणावा तसा येत नाहीए, म्हणून तुर्तास तरी दिवाळी स्पेशल मध्ये माझे स्किट नाही.

असो.

सस्नेह
देवनिनाद !!

अरे Sad मी तर हा संवार फु बाई फु चा सेट समोर ठेवूनच वाचत होती... हरकत नाही पण वाचून खुप मस्त मजा आली... Happy

मिस कॉल , डायलींग फटाका... Lol

बाबू ढोलकीवाल्याचे फटाके पण एकदम भारीच आहे.... Happy