हे चित्र आणि ते चित्र

Submitted by सुरेखा कुलकर्णी on 25 October, 2010 - 13:49

आज मी बारा वर्षानंतरआत्याच्या गावीं जात होते.पण आज आनंद नव्हता.आत्या गेली होती. उद्या तिचा चौदावा होता.
खरंतर आत्याचा गावांला जायचं म्हणजे मला नेहमीच आनंद व्हायचा. लहानपणापासून दरवर्षीच मी आणि आई हुरड्याच्या दिवसांत गावीं जायचो. गावांकडची माणसं कधी बसमध्ये भेटायची तर कधी उतरल्यावर. मग सुरु व्हायचं

" काय बाई कवां आलिस?"
"हेद्राबाद कंदी आलं?"
"काय पावनं कवां आलावं?" " लई दिसानी आलिस माय."

सगळ्यांच स्वागत स्वीकारतच मी गावांत जायची. गावकर्‍यांना खूप आनंद झालेला असायचा.
ह्येद्राबादसारख्या मोठ्ठ्या शहरातून येऊन एक मुलगी आपल्यामध्ये एवढी मिसळते त्याचा. आत्याची मुलं, पुतणे शेजारच्या तालुक्याच्या गांवी शिकायला होते. ते हुरड्याची सुट्टी झाली की गांवी यायचे. मग
आम्ही खूप धम्माल करायचो. शेत जवळंच होत. पण...

एक दिवस खास माझ्यासाठी बैलगाडी ठरवली जायची. बैलगाडीत जायला मजा वाटायची. एक दिवस हुरडा पार्टी व्हायची पण रोज दिवसातुन ५,६ चकरा शेतात व्हायच्या. खूप हुदडायच. ऊस, बोरं,हरभरा, शेंगा असा
रानमेवा खायचा.महादेवाच्या देवळात जायचं मग घरी यायचं. गावांत चहासाठी खूप आमंत्रणं असायची. चहा घेत नाही म्हणून दुध घेण्याचा आग्रह असायचा.घरी जाणं झालं नाही तर चहा,,साखर, दूध घरी आणून
दिलं जायचं. हरभरा, ऊस, बोरं यांनी ओसरी भरायची.

"पावनीला चा करून द्या काकु."

असं माझ्या आत्याला सांगितलं जायचं .ते सांगताना सुरेखाबाईला आपण कांहीतरी देऊ शकलो याचा प्रचंड आनंद चेहर्‍यावर असायचा.
.
आत्याच्या हातची हातावरची चुलीवर भाजलेली खमंग भाकरी, मधुर वासाच्या लाल तांदुळाचा जाड
भात, दूध याची चव जीभेवर रेंगाळत ठेवून, रात्री आत्याने सांगितलेल्या जुन्या गोष्टी, दिव्याच्या प्रकाशात दिसणार्‍या लांब लांब सावल्यांची भीति, चार दिवस आम्ही केलेली धमाल ह्या सगळ्या आठवणींच ओझं आणि ज्वारी, शेंगा, बोरं ऊस,ह्या सगळ्यांच ओझं घेऊन, गांवकर्‍यांबरोबर बस स्टँड वर निघायचे. बस स्टँड असे नव्हतेच, एका झाडाखाली बससाठी थांबायचे.गांवकर्‍यांच्या डोळ्यात पाणि असायचं आणि माझं मन भरलेल असायचं.

हळू हळू माझं जाणं कमी होत गेल. आणि गावांतलं चित्रही बदलत गेल. गावांत वीज आली,टी.वी. आले. सातवीपर्यंतची शाळा दहावीपर्यंत झाली.गाड्या आल्या. गावांतली घरं गावांबाहेर आली. सिमेंटची
घरं बांधणं सुरु झालं तशी मणसांची मनंही सिमेंट सारखी घट्ट व्हायला लागली. काळ्या मऊ मातीचा ओलसरपणा कमी व्हायला लागला. गावातली मातीची घरं ढेपाळलेली दिसायला लागली. कांही जुने लोक मात्र गावांला चिकटून होते.बैलगाडीची मजा संपली होती. शेतात कुठेही मोट दिसत नव्हती.विहिरी जाऊन
बोरींग आले होते.
गावांत गेलं की एखाददुसरा कुणितरी विचारी." कवा आलाव?".
हा बदल मनालाकासावीस करत होता.लग्नानंतर माझं जाणं कमी होत गेलं. आत्याही पुण्याला गेली.
गेल्या महिन्यात आत्याइथे आली आणि इथेच गेली. माझे एक चुलत काका नौकरीतून निवृत्त झाल्यावर
गावांतच रहायला आले होते.
आत्याच्या चारहि मुलांनी त्या मोठ्या चौसोपी वाड्यात चार हिस्से करून लहान तीन तीन खोल्यांची घरं
बांधली होती. आता आत्या तिथेच रहायला आली अन गेली.

मी जवळ जवळ बारा वर्षाने गावांत येत होते. एक वेगळी हुरहुर घेऊन. सगळे भेटणार म्हणून
आनंदहि झाला होता. पण आत्या नाही त्याचं वाईटहि वाटत होतं. मनांत सगळ्या आठवणींच काहूर
माजलं होतं. गाव आलं तशी मी खाली उतरले. सगळ्या गावाचा कायापालट झाला होता. दुकानं,घरं,सगळंच
नवीन होतं. मला कुणीहि ओळखलं नाही. घरी गेल्यावर पाहिलं पाहुणे खूप आले होते.सगळेच माझी
वाट पहात होते. आम्ही सगळेच एकमेकांना काही करणाने भेटत असू पण माझी चुलत बहिण मात्र खूप
वर्षानंतर भेटली. त्यामुळे तिने एकदम येऊन मिठी मारली.

चहापाणी, स्नान सगळं आटोपून आम्ही वरच्या माडीतल्या खोलीत गेलो. ज्या खोलीत आम्ही रात्री
गप्पा मारून जागून काढल्या होत्या. ती ही खोली नव्हती. ही खोली नवीन होती. धाकट्या भावाने ती जुनी खोली पाडून बांधली होती. खूप वर्षांने भेटल्यामुळे आम्ही एकमेकींची सगळी विचारपूस करून घेतली.
नंतर मी म्हट्लं,
"नीतु गावात कुणिच कसं दिसत नाहीये गं? कदम,शिन्दे,रक्मा सोनारिण, परटाची बाइडी. कुणिच
दिसत नाहीये."
ती म्हणाली, " अगं कुणि गांव सोडून गेलं कुणि गावाबाहेर रहायला गेलेत. काही जणांच्या मुलांना तालुक्याच्या गावी नौकर्‍या लागल्यात. ज्यांची शेती चांगली पिकते त्यांचं ठीक आहे पण जे दुसर्‍यांच्या शेतात काम करतात किंवा ज्यांची शेती पिकत नाही त्यांचं गावांत राहणं अवघड आहे. त्यांना वाटतं गावांत राहिलय काय? त्यापेक्षा तालुक्याच्या गावी जाऊन काम केले तर चार पैसे तरी द्दष्टीस पडतात. म्हणून कांही लोक गेले गाव
सोडून आजुबाजूच्या तालुक्याच्या गावी." मला हे सगळं ऐकून कसंतरी वाटलं.
इतक्यात सुभद्रा आली. आमच्याजवळ येऊन बसली. मला पाहून म्हणाली,"कवा आली सुरेखा?"
" सकाळीच. पण मावशी तू कुठे असतेस आता?" मी
"मी व्हय? माझं काय. कदी हिथं तर कदी थोरल्याकडं." ती.
"करमतं कां तिकडं?" मी.
"न्हाइ करमलं तरी काय करायचं. आता काकुचा चौदावा हाय म्हून आले बग. पण आता जावं लागल घरी,
लै येळ जाला बग." असे म्हणतच ती उठली.
"का गं बस ना. आत्ताच तर आलीस "मी म्हट्लं.
" न्हाइ ग बया. माझी सून लै खाष्ट हाय बग. नवर्‍याला सांगती तुझी माय हिथं काम करायला यिती पर समदं
गांव भटकतिया. जुनं दिस र्‍हायलं न्हैती सुरेखाबाय आता." तिचं तोंड उतरलं होतं. लगबगीनं गेली ती.

मी आणि माझी बहिण पाटलांच्या वाड्यावर निघालो. रस्त्यात माझी बहिण सांगत होती. सुभद्राचे
फार हाल होते.दोन्ही मुलं काम पडलं की बोलवतात काम संपलं की हाकलून देतात.
आम्ही जाताना कदमाची विमल दिसली.खूप म्हातारी वाट्त होती. डोळ्यावर आडवा हात ठेवून मला
पाहून काठी टेकवत माझ्या जवळ आली. सुरकुतलेल्या चेहर्‍याने ओशाळवाणे हसत म्हणाली,
, "सुरेखाच हायस ना ग? कवा आलिस? लै दिसानी भेटझाली बग. कशी हायेस?"
मी म्हट्लं," मी बरी आहे. तू कशी आहेस विमल अक्का?"
" बरी हाय " उदासवाणं उत्तर आलं.
"इथे बाहेर का बसलीस? जेवण झाल?" मी विचारले.
"हो, हो. तुमच्याकडं याचंच हाय की." कावरीबावरी होत इकडेतिकडे पहात ती म्हणाली.अन ती माघारी वळली.

माझी बहीण म्हणाली,"अग तिची सून तिला जेवायलाच देत नाही. गावातलच कुणितरी कांही देत. कुणी नाहीदिल तर तेंव्हा देते पण खूप बोलून." मला धक्काच बसला. मला आठवली ती विमल जी मला दूध प्यायला
बोलवायची." अवंदा खूप दुभतं झालया बघ" असं हसत सांगयला यायची.भरलेला गोठा, मुलंबाळांनी तिचं
भरलेलं घर आठवलं.कुठे गेलं सार?

आम्ही पाटलीण काकूकडे गेलो. त्यांचा मुलगा सदाने मला बोलावले होते, माझ्या आत्येभावांचा तो
चुलत भाऊ. मला तो बहीणच मानायचा. मी काकूंना नमस्कार केला. "बरी आहेस का? " थरथरत्या हाताने
पाठीवरून हात फिरवीत त्यानी विचरले. मी मान हलवली. सदाच्या बायकोने चहा केला. थोडस इकडचं
तिकडचं बोलून आम्ही निघालो. काकूजास्त बोलल्याच नाहीत. मला त्यांच्या त्या उदासवाण्या घरांत बसवेना.
काकू किती थकल्या आहेत. एकेकाळ्चा त्यांचा पाटलीणबाईचा रुबाब कुठे गेला?????

मी बहिणीला विचारलं ,"सदाची ती अर्धवट बहिण कुठे दिसत नाही गं?" ती अधनंमधनं सारखी गावांत यायची. तिचे आई वडील गावांतच असल्यामुळे तिला बरीच माहिती होती. म्हणून मी तिलाच सारखी
विचारत होते. "अगं तिच्यामुळेच तर घरांत भांडणं आहेत ना. सदा तिला घरांत ठेवून घ्यायला तयार नाही,त्यामुळे काकू घरांतच वेगळं करून खातात". आम्ही परत घरी येई पर्यंत बर्‍याच जणांच्या बर्‍याच कथा तिने सांगितल्या. आम्ही घरी पोहोचलो. सगळे आलेले पाहुणे पण गप्पा मारत बसले होते कांही जणील्या होत्या लाडू वळत
बसल्या होत्या. मी पण लाडू वळायला बसले. पाहुण्यांच्या गप्पा मध्ये सुध्दा " म्हातारी माणसं म्हणजे अडगळ" असाच सूर होता.

बारा वर्षात केवढा बदल झाला होता गावांत. गांव खूप सुधारलं होतं. पण त्या सुधारणेच्या साखळीने
फक्त गावालाच जखडले नव्हते तर माणसांच्या मनालाही घट्ट्केले होते. ज्यामुळे मनं कोरडी झाली होती.
'सुधारणा हवीच होती. पण त्याचा हा असा परिणाम? कशाचा परिणाम होता हा?'

' उत्तर न सापडणारा प्रश्न होता हा.'

प्रेमाचा झरा वाहात असलेलं, हिरव्या गर्द झाडीतलपलेलं,मातीच्या घरांचं, मातीच्या सुगंधाने भारलेलं
ते गांव आणि त्या गावांतली ओल्या मनाची ती माणसं मला दूर जाताना दिसत होती. पुन्हा कधीही न
दिसण्या साठी.....
दोन दिवस राहून जड मनांने सर्वांचा निरोप घेऊन मणामणाचं ओझं घेऊन मी हैदराबाद्ला आले.

* * * * * * * * *

आज एका मैत्रीणीकडे जायचे होते. आमचा वीस जणींचा ग्रुप होता. महिन्याला एकदा आम्ही तिच्याकडे
जमायचो. तिच्या कॉलनीतच जास्त मैत्रिणी होत्या. सगळ्यांनी एकेक पदार्थ करून आणायचा. दिवसभराचे कांही
कार्यक्रम ठरलेले असायचे. दिवसभर मजा करायची संध्याकाळी घरी यायचं.

आजही नेहमीप्रमाणे मी तिच्याकडे गेले. एकदोघी सोडून जवळपास सगळ्याच आल्या होत्या. मी
गेल्या बरोबर सगळ्यांचा एकच प्रश्न होता,"काय आणलंस गावाकडून?"

"काहीच नाही आणि या वेळी माझ्याकडे गावांतल्या गमतीजमतीही नाहीत सांगायला. पण त्या शिवाय वेगळं असं बरंच काही आहे. " नेहमी सगळ्या गावाकडची मजा ऐकायला उत्सुक असायच्या. मी पण खूप भरभरून सगळं सांगायची. एकमेकींशी गप्पामारता मारता त्या शांत झाल्या. मलाही मनांवरचं ओझ
केंव्हा उतरवतेअसं झालं होतं. त्यामुळे वेळ न घालवता मी भराभरा सगळं सांगून टाकलं. थोडा वेळ शांततेत गेला. कुणिच कांही बोललं नाही.मग एकेकीच सुरु झालं.

"हल्ली असंच ऐकायला मिळतय नाही का?"
"म्हातारी माणसं घरांत नकोशीच झाली आहेत. ए तुम्हाला माहितय? जोशींच्या लताने तिच्या
सासूसासर्‍यांना वृध्दाश्रमांत ठेवलय."
"का पण? तिच्या कडे सासूसासर्‍याचं करायला एक चोविस तसाची बाई पण होती. शिवाय ती नौकरी
पण करत नाही."
"हो. पण तिच्याकडे तिच्या मैत्रीणी येतात नवर्‍याचे मित्र येतात तेंव्हा त्यांच्या समोर ही आजारी माणसं
तिला नको आहेत."
"पण ते कांही झोपून नाहीत. त्यांचे तसे कांहीच करावे लागत नाही"
"नको असले म्हणजे काहीतरी कारणं सांगायची झालं."
"आपल्या त्या सरलाताईच बघ ना. दोन मुलं दोन मुली. मुंबईवाल्याला जागा पुरत नाही अन
दिल्लीवाल्याची बायको नको म्हणते. मी त्यांना म्हणाले," वृध्दाश्र्मात जा " तर त्या म्हणाल्या ,"मी
चार महिने राहून आले.पण तिथे तरी काय सगळ्यांच्या त्याच कहाण्या. शिवाय बहुतेक सगळे खूप
थकलेले, ज्यांना घरी कुणि बघणारे नाहीत किंवा आजारी, चिडलेले.असेच लोक आहेत.मग कसं मन
रमणार? त्यापेक्षा ह्या कॉलनीत माझ्या वयाच्या बायका आहेत. त्यामुळे मन रमतं इथं. सध्या ठीक
आहे पुढ बघु."
" ए स्मिताने आजही उशीर केला बघ" एकीला स्मिताची आठवण झाली.
"अग ही आली बघ, का ग, आज का उशीर? नेहमीचंच का?" स्मिता मान डोलवत खाली बसली.
"स्मिता तुझ्या लग्नाला किती वर्ष झाली गं.? एकीचा प्रश्न.
" पन्धरा वर्ष. का?"
"मग अजुनही तेच का गं. पहाटे उठायच पाणि,सडा,रांगोळी,स्वयंपाक, धुणं,भांडी"नीता चिडुन म्हणाली.
"हो. आणि तेच,सासुबाईंच जेवण झाल्याशिवाय जेवायच नाही. आत्ताही त्यांना जेवायला वाढून त्यांचं
जेवण झाल्यावरच आले."हतबल झालेली स्मिता म्हणाली.

"अगं ती मीरा आहे ना लेल्यांची ती एवढी शिकलेली आहे पण पण तिला कुणि नौकरी करू दिली नाही.
घरांत सासू इतकं काम करून घेते तिच्याकडून. ती म्हणते," मी लिहिणं वाचणं विसरूनच गेले आहे. मीरा
लेले, पोळ्या लाटण्यात जीवन गेले." सगळ्यांना हसू फुटलं.
"संध्याच्या मुलीला तर म्हणे रात्री जेवायला काय करायच ते पण विचाराव लगतं एवढच नाही तर म्हणे
कुणि आलं तर त्याना खायला काय द्यायचं का द्यायचंच नाही हे तिची सासूच ठरवते." आणि हो तुला
त्या महितायेत?......अगं त्यांच्याकडे पण.....तिला सुध्दा.....बिच्चारी......

विषयाला वेगळंच वळण लागलं होतं.सगळ्याच एकदम बोलायला लागल्या. नुसताच गोंधळ चालला होता.विषय आजकालच्या सुनांवरून सासूवर आला होता.प्रत्येकजण आपल्या माहितीतल्या सासवांबद्दल बोलत होती.. गप्पानां, हसण्याला ऊत आला होता त्यामध्ये तोही विषय संपला.आता वेगळाच विषय चालला होता. गप्पा रंगल्या. पानं वाढून घेतली. मी विचार करत होते. "किती सहज विषय बदलला होता या सर्वांनी?"

मी मात्र उगाचंच" ते चित्र खरे कां हे चित्र खरे" या विचारांत भिरभिरत होते
.

******************************

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

भावना पोचल्या.
पण फार घाईने तात्पर्याप्रत न पोहोचण्याचा मी प्रयत्न करते. सर्व चित्रच आपापल्या जागी खरीच की. Happy

दोन्ही चित्रे खरी.. व्यक्तिमत्वाचा प्रभाव, दुसरं काय.
कुणी dominating..कुणी व्यक्तिगत आदर/ space देणारे..
त्याच मुळे वेग वेगळी चित्रे आहेत.

ह्या चित्रातली माणसं खरी आहेत. अशी माणसं आपल्या सगळ्यांच्याच अवतीभवती
असतात. आपण त्याना पाहतो, ऐकतो. मी फक्त त्याना शब्दबध्द करण्याचा प्रयत्न
केला आहे. एवढ्या लवकर प्रतिक्रियेची अपेक्षा नव्हती. खूप आनन्द झाला.
सर्वाना.* धन्यवाद. *

********

सगळीकडचं तुम्हाला दिसलेलं, जाणवणारं चित्र चांगल्या पध्दतीने मांडलं आहे. मागे कोठेतरी वाचले होते : प्रत्येक गोष्टीला तीन बाजू असतात. एक तुझी बाजू. एक माझी बाजू. आणि सत्य ही तिसरी बाजू! Happy

सुरेखा, छान लिहिलंयत. दुर्देवाने दोन्ही चित्रं खरी आहेत....इथे तिथे थोडाफार फरक आहे इतकंच Sad

लेखन वाचलं. आवडलं. विषयाची मांडणी चांगली केली आहेत.

दोन्ही चित्रं आपापल्या जागी खरी असावीत.
घरातल्या वृद्धांकडे फारसं लक्ष न देणं, त्यांची जबाबदारी टाळणं, या गोष्टी आजच्या काळात (काही अपवाद वगळता) प्रकर्षाने जाणवायला लागल्यात. विभक्त कुटुंब पद्धती, सुखलोलूपता, आत्मकेंद्रित विचार, तसंच वृद्धांमधलेही काही दोष; या सार्‍याचा हा परिणाम आहे असं वाटतं.

दोन्ही चित्र सार्वत्रीक स्वरूपात आढळतात. याची कारणेही खूप असतील.
अर्थात त्याविषयी चर्चा करण्याची ही जागाही नव्हे.

छान लेख. Happy

नशीब.. आजुनही गावात गेलो तर ओळख दाखवतात..
आणी आपप्रे/ माणुसकी सगळ काही तिकडेच पाहायला मिळते.
पूणे/मुंबई मधे फक्त पैसा एके पैसा तो असेल तरच तुम्हाला माणुसकी मिळेल.. ती पण ऊधारीची Sad

खात्री करुन घ्यायची असेल तर पूण्या मधे घर नक्की शोधावे..

खरचं मनापासुन लिहीलत त्यामुळे आवडलं...
पण मला वाटत हे सगळ माणसाच्या स्वभावावर अवलंबुन असत, शेवटी कुठेही जा मोठा मासा हा लहान माश्याला खातो हेच सत्य आहे... ज्याचा स्वभाव साधा मऊ तोच दबला जातो.. Sad

छान लिहीले आहे. लेख संपादित करता येत नसेल तर नवीन भाग नवीन धाग्यावर लिहा, व तेथे आधी या लेखाची लिन्क द्या म्हणजे लोक हा आधी वाचतील.

छान लेख.
दोन्ही चित्र खरी. खर्‍या माणसांची.