लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण

Submitted by जिप्सी on 21 October, 2010 - 23:20

Sulochana%20Chavan.jpg
(आंतरजालावरून साभार)

एकापेक्षा एक सरस लावण्या आपल्या ठसकेबाज आवाजाने अजरामर करणार्‍या "लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण" यांना नुकताच संगीत क्षेत्रातील विशेष कामगिरीसाठी दिला जाणारा महाराष्ट्र शासनाचा "लता मंगेशकर" पुरस्कार जाहिर करण्यात आला. त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे हार्दिक अभिनंदन.

काही वर्षापूर्वी एफएम गोल्डवर त्यांच्या कारकिर्दिवर आधारीत एक कार्यक्रम झाला होता. त्यातीलच माहितीआधारे उलगडलेला हा त्यांचा जीवनपट.

१७ मार्च १९३३ मध्ये मुंबईत सुलोचनाजींचा जन्म झाला. माहेरचे त्यांचे नाव होते सुलोचना कदम. मुंबईतील चाळ संस्कृतीत त्यांचे बालपण गेले. त्यावेळेस मुंबईत अनेक मेळे होते. सुलोचना चव्हाण यांच्या घरचाच एक मेळा होता "श्रीकृष्ण बाळमेळा". याच मेळ्यात त्यांच्यासोबत अभिनेत्री संध्या यांनीसुद्धा काम केले होते. या श्रीकृष्ण बाळमेळ्याच्या माध्यमातुन सुलोचना चव्हाण यांचे कलाक्षेत्रात पहिले पाऊल पडले. मेळ्यांच्या सोबतीतच त्यांनी हिंदी, गुजराती आणि उर्दु नाटकात बालभुमिका केलेल्या आहेत. त्यांची मोठी बहिण स्वतः कलाक्षेत्रात काम करत नसे पण त्यांना नेहमी प्रोत्साहन द्यायची आणि सुलोचनाजींनी उत्तम गावे असे त्यांना वाटत असे. याच प्रोत्साहनातुन त्यांची गायिका होण्याची बीजे रोवली गेली. सुलोचनाजी यांना गायनाचे कोणतेही शास्त्रीय प्रशिक्षण मिळालेलं नव्हतं. त्याकाळात ग्रामोफोन रेकॉर्ड ऐकुन ऐकुनच त्या गायनाचा रियाज करायच्या. आजच्या काळात नवोदित गायकांना अनेक सोयीसुविधा मिळतात, पण त्याकाळात परिस्थितीशी झगडुन त्यांनी हि कला आत्मसात केली आणि त्यामुळेच त्यांची हि कला अधिक चिरकालीन टिकावी अशी निर्माण झाली आहे.

त्यावेळेस वत्सलाबाई कुंठेकर यांनी गायलेली "सांभाळ ग, सांभाळ ग, सांभाळ दौलत लाखाची" हि लावणी त्या वारंवार गुणगुणत असे आणि त्यासाठी आईकडुन त्यांनी भरपुर ओरडा हि खाल्ला होता. कारण त्यावेळेस मुलींनी लावणी ऐकु नये, गाऊ नये असे त्यांच्या आईला वाटायचे. पण त्यांच्या आईला काय माहित होते कि हिच मुलगी पुढे जाऊन "लावणीसम्राज्ञी" म्हणुन नाव कमावणार आहे :). मराठी लावणीसम्राज्ञी ठरलेल्या सुलोचना चव्हाण यांनी पहिली लावणी गायली ती आचार्य अत्रे यांच्या "हिच माझी लक्ष्मी" या चित्रपटात. संगीतकार होते वसंत देसाई आणि हि लावणी चित्रीत झाले होते हंसा वाडकर यांच्यावर. या एका गाण्याने सुलोचनाजींच्या कारकिर्दीला लावणीच्या दिशेने वळण लावले. त्या लावणीचे शब्द होते "मुंबईच्या कालेजात गेले पती, आले होऊनशान बीए बीटी..." :). आचार्य अत्रे यांनीच त्यांना "लावणीसम्राज्ञी"असा किताब दिला.

१९५३-५४ च्या सुमारास "कलगीतुरा" या चित्रपटासाठी राजा बढे यांनी गायलेल्या काही लावण्या गायल्या आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक होते "एस. चव्हाण". पुढे याच दिग्दर्शकाबरोबर सुलोचनाजींचे लग्न झाले आणि सुलोचना कदम यांच्या सुलोचना चव्हाण झाल्या. यादरम्यानच "रंगल्या रात्री अशा" या चित्रपटातील गाणी सुलोचना चव्हाण यांनीच गावी असा आग्रह गीतकार जगदीश खेबुडकर यांनी धरला आणि "नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची" या गाण्याने त्यांचे आयुष्यच बदलुन गेले. त्यातुनच खर्‍या अर्थाने लावणीसम्राज्ञी म्हणुन सुलोचना चव्हाण पुढे आल्या. "मल्हारी मार्तंड, केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका, अशा अनेक तमाशाप्रधान चित्रपटातुन त्यांनी लावणी आपल्या ठसकेबाज स्वरात सादर केल्या. चपखळ, फटकेबाज शब्दांना आपल्या आवाजाच्या, सुरांच्या माध्यमातुन ठसका, खटका देण्याचे काम सुलोचनाजींइतक कुणीच उत्तम करू शकलेलं नाहीत. "पाठीमागे अंतरे कसेही असोत पण लावणीच्या मुखड्याची सुरूवात ठसकेबाजच झाली पाहिजे" असे सुलोचनाजींचे ठाम मत होते आणि याचा प्रत्यय त्यांनी गायलेल्या लावणीतुन येतोच.

लावणी गायनामध्ये नाव मिळवण्याआधी सुलोचनाजींनी विविध प्रकारची गाणी गायलेली होती. श्रीकृष्ण बाळमेळ्यामध्येच मेकअपमन दांडेकर हे चित्रपटसृष्टीशी संबंधित होते, त्यांच्यामुळेच संगीत दिग्दर्शक श्याम बाबू भट्टाचार्य पाठक यांच्याकडे पहिले गाणे गायले. तो चित्रपट हिंदी भाषेतील होता आणि चित्रपटाचे नाव होते "कृष्ण सुदामा". पहिले गाणे जेंव्हा सुलोचना चव्हाण गायल्या तेंव्हा त्यांचे वय होते अवघे नऊ वर्षे. फ्रॉकमध्ये आपण गाणे रेकॉर्डिंगसाठी गेलो होतो अशी आठवण देखील त्या आवर्जुन सांगतात. या नंतर त्यांनी मास्टर भगवानदादांच्या अनेक चित्रपटात पार्श्वगायन केले आणि त्यावेळेस त्यांच्यासोबत सहगायक असत "सी. रामचंद्र" ("जो बिगड गयी वो किस्मत हु / नजर से नजर लड गयी जिगर में छूरी गड गयी हाय राम). पार्श्वगायन करताना मोहम्मद रफी, मन्ना डे, शमशाद बेगम, गीता दत्त, श्यामसुंदर यांच्यासारख्या आघाडीच्या गायकांबरोबर गाण्याची संधी त्यांना मिळाली. करीयरच्या सुरुवातीलाच अनेक दिग्गजांबरोबर त्यांनी काम केले. वयाच्या सोळाव्या वर्षी गायक मन्ना डे यांच्यासोबत "भोजपुरी रामायण" त्या गायल्या होत्या. मराठी व्यतिरीक्त त्यांनी हिंदी, गुजराती, भोजपुरी, तामिळ, पंजाबी या भाषेमध्ये त्यांनी भजन, गझल असे विविध प्रकार देखील हाताळले आहेत. त्यांचे गझल गायन ऐकुन बेगम अख्तर यांनी त्यांना जवळ घेऊन दिलखुलास दाद सुलोचनाजींना दिली होती. सुलोचनाजींच्या आयुष्यातील आठवणींपैकी हि एक अतिशय महत्वाची आठवण. सुलोचनाजींचे शास्त्रीय गायकीचे शिक्षण झाले नाही हे ऐकुन तर बेगम अख्तर यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. असे अनेक सन्मानाचे प्रसंग त्यांच्या आयुष्यात आले आहेत. आपण सुलोचनाजींच्या लावण्या जेंव्हा ऐकत असतो त्यावेळेस संगीतातील त्यांची इतर मजल थोडी दुर्लक्षित होते.

पार्श्वगायनासाठी महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार "मल्हारी मार्तंड" या चित्रपटासाठी त्यांना १९६५ साली मिळाला. त्यापलिकडे जाऊन विविध स्तरावर त्यांनी गायलेली गाणी आणि लावणी या प्रकाराला त्यांच्या गायनाने मिळवून दिलेली मान्यात आणि यामुळेच जनमानसांच्या ह्रदयात मिळालेले स्थान, त्यांचे केलेले कौतुक हा देखील एक सर्वोच्च पुरस्कार म्हणता येईल.

सुलोचना चव्हाण यांना उदंड आयुष्य लाभावे आणि असे अनेक पुरस्कार मिळावेत याच शुभेच्छांसहित पुन्हा एकदा "हार्दिक अभिनंदन!!!!"

त्यांची गाजलेली काहि गाणी:
१. नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची
२. तरूणपणाच्या रस्त्यावरच पहिलं ठिकाणं नाक्याचं, सोळावं वरीस धोक्याचं
३. पाडाला पिकलाय आंबा
४. फड सांभाळ तुर्‍याला गं आला, तुझ्या उसाला लागलं कोल्हा
५. कळीदार कपूरी पानं, कोवळं छान, केशरी चुनाम रंगला काथकेवडा वर्खाचा विडा घ्या हो मनरमणा
६. खेळताना रंग बाई होळीचा होळीचा, फाटला गं कोना माझ्या चोळीचा
७. कसं काय पाटील बरं हाय का, काल काय ऐकलं ते खरं हाय का?
८. स्वर्गाहुन प्रिय आम्हाला आमचा सुंदर भारत देश, आम्ही जरी एक जरीही नाना जाती नाना वेष
९. मी बया पडली भिडंची, गाव हे हाय टग्याच
१०. मल्हारी देव मल्हारी
११. नाचतो डोंबारी गं नाचतो डोंबारी
१२. पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालु नवा
१३. गोरा चंद्र डागला
१४. मला म्हणत्यात पुण्याची मैना
१५. पावना पुण्याचा आलाय गं
१६. रात्र श्रावणी आज राजसा पाऊस पडतोय भारी, पाखरू पिरतीच लाजुन बसलंय उरी
१७. आई चिडली, बाबा चिडला, काय करू तुझ्यावर माझा जीव जडला
१८. दर रात सुखाची नवसाची, मज झोपच येते दिवसाची
१९. हिरीला इंजिन बसवा
२०. कुठवर पाहु वाट सख्याची, माथ्यावर चंद्र कि ग ढळला, अन् येण्याच वखत कि ग टळला
२१. दाटु लागली उरात चोळी कुठवर आता जपायचं, औंदा लगीन करायचं
२२. अगं कारभारनी, करतो मनधरनी (सोबत जयवंत कुलकर्णी)
२३. करी दिवसाची रात माझी
२४. तुमच्या नावानं गळ्यात माझ्या बांधा एक डोरलं
२५. जागी हो जानकी
२६. बाई मी मुलखाची लाजरी
२७. राजसा घ्या गोविंद विडा
२८. लई लई लबाड दिसतोय ग
२९. घ्यावा नुसताच बघुन मुखडा
३०. बाळा माझ्या कर अंगाई
३१. श्रीहरी गीत तुझे गाते

गुलमोहर: 

सुलोचना दि ला ऐकताना खरोखर.. फेटे उडवून .. नाद करायचा नाय.. असच म्हणावसं वाटतं रे योग्या.. बाकी फलटणकर शोभतोस रे Wink

अन त्यातही..

१. नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची
२. तरूणपणाच्या रस्त्यावरच पहिलं ठिकाणं नाक्याचं, सोळावं वरीस धोक्याचं
३. पाडाला पिकलाय आंबा
४. फड सांभाळ तुर्‍याला गं आला, तुझ्या उसाला लागलं कोल्हा
५. कळीदार कपूरी पानं, कोवळं छान, केशरी चुनाम रंगला काथकेवडा वर्खाचा विडा घ्या हो मनरमणा
६. खेळताना रंग बाई होळीचा होळीचा, फाटला गं कोना माझ्या चोळीचा
७. कसं काय पाटील बरं हाय का, काल काय ऐकलं ते खरं हाय का?
१४. मला म्हणत्यात पुण्याची मैना..
१२. पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालु नवा
१९. हिरीला इंजिन बसवा...

हि गाणी ऐकताना तर.. बुड जागेवर ठेवणं कठीणच होतं रे बाबा ! आपोआप चुटक्या वाजायला लागतात..

मस्त लिहिलं आहेस रे.. ! आवडेश.. Happy

धन्स सुकी, विन्या Happy

आणि जवळपास सगळी गाणी आवडीची..>>>>मालक, या लावण्या तुमच्या आवाजातसुद्धा एकदम झक्कास वाटल्या (मायबोली ववि २०१० Happy ).

विन्या.. हो हो तू तर जल्ला एकदम डायहार्ड फॅन आहेस.. कुलंग परतीच्या प्रवासात.. काय रंगत आणली होतीस यार !

लावनी, बारी आमाला बी आवडती. या बंद्या रुपयाच म्हन्न हाय अजुन येक लेख सुरेखा पुणेकरांवर होउन जाउद्या.

भारी आहे लेख आणि गाण्यांची लिस्ट तर त्याहूनही भारी! आता आठवण करून दिलीच आहेस तर काही माझ्याकडे नसलेली गाणी हुडकायला हवीत.

खेळताना रंग बाई होळिचा.. एक नंबर गाणं...

कोल्हापूरात सुलोचना बाईंना विशेष मान. लावणी बहुतेकदा द्वैर्थी असते(च) पण अशी गाणी गाऊनसुद्धा/गाताना सुलोचनाबाईंच्या डोक्यावरचा पदर कधी साधा खांद्यावरही ढळला नाही, शिवाय अशी गाणी जास्त गातात म्हणून कोणाची त्यांच्याकडे मान वर करून पहायचीही ताकद नव्हती... एकदम खानदानी रूप.. Happy

छान लिहिले आहेस. आणि नवल म्हणजे बहुतेक गाण्यांच्या चाली मला आठवताहेत.
नाचतो डोंबारी या गाण्यात माझ्या आठवणीप्रमाणे, कृष्णा कल्ले पण आहे. केला इशारा जाता जाता मधे आणखीही काहि गाणी आहेत (आली आली फळवाली आली.., थांबवू नका तूम्ही थांबवू नका गुर्‍हाळ थांबवू नका)

काहि गाण्यांचे ठसकेबाज मुखडे ...

१९ तूमच्या राणीचा काढा रुसवा, राया आता हिरिला इंजान बसवा

२३ करी दिवसाची रात, माझी सोडंना वाट, याच्या डोक्यात अक्कल पिकवा
कुनी माज्या रायाला शानपन शिकवा

२४ लाखामधुनी सख्या तूम्हाला अचूक मी हेरलं, तूमच्या नावानं गळ्यात माज्या बांधा एक डोरलं

धन्यवाद Happy

अशी गाणी गाऊनसुद्धा/गाताना सुलोचनाबाईंच्या डोक्यावरचा पदर कधी साधा खांद्यावरही ढळला नाही, शिवाय अशी गाणी जास्त गातात म्हणून कोणाची त्यांच्याकडे मान वर करून पहायचीही ताकद नव्हती... एकदम खानदानी रूप..>>>>>प्रचंड अनुमोदन Happy

नाचतो डोंबारी या गाण्यात माझ्या आठवणीप्रमाणे, कृष्णा कल्ले पण आहे>>>बरोबर दा. नाचतो डोंबारी आणि राजसा घ्या गोविंद विडा या गाण्यांना सुलोचनाबाईंसोबत कृष्णा कल्ले यांचा आवाज आहे (चित्रपटः केला इशारा जाता जाता).

मला वर्रील पैकी काहीच गाणी माहीत आहेत.....
आणी जी माहीत आहेत ती सगळी मला खुप आवडतात.....
तुझ्या या लेखामुळे त्यान्ची आणखी काही गाणी कळाली......धन्यावाद....

सावरी

मस्त लेख योग्या,
चला ६ तारखेला अजुन एक काम तुला, मोबाईल मधे घेऊन ये सगळ्या लावण्या. :p

सुरेख लेखन! लावणीसम्राज्ञी ही पदवी खरंच फार अवघड पदवी आहे मिळवायला आणि तिचा आब राखायला.
मला आठवतो तो १९७९-८० सालचा काळ. दरवर्षी होळिच्या आसपास भरत नाट्य मध्ये त्यांचा कार्यक्रम असायाचा आणि सारे थिएटर हाउसफुल्ल व्हायचे. कित्येक लावण्यांना हमखास वन्समोर मिळायचा. रात्री १२-१ वाजून जायचे पण गाणार्‍यांचा आणि प्रेक्षकांचा उत्साह उदंड! खानदानी पणा म्हणजे काय ते फक्त सम्राज्ञीना पाहिल्यावरच कळायचं.रसिक तॄप्त होउन जायचा. दिवस सुरेख होते.त्या आठवणी जागवल्याबद्द्ल आभार.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy

मोबाईल मधे घेऊन ये सगळ्या लावण्या.>>>>सम्या नक्की रे, माझ्याकडे जितक्या लावण्या आहेत त्या घेऊन येतो सगळ्या. Happy

हा लेख तुला विकीवर पण देता येइल... मराठी विकीवर काहिच माहिती नाहीये..>>>> धन्स सॅम, मी नक्कीच विकीवर करतो अपडेट हा लेख.

योग्या.. खरच विकीवर हा लेख तू अपडेट कर.. अन ह्यावेळेस.. जरा यो रॉक्स्च्या लावणीला काही टक्कर द्यायचा विचार कर भौ.. Wink कितीही झालं तरी तूमी.. प. महाराष्ट्राच फेटंवालं.. आम्हालाही डबल करमणूक:डोमा:

यो रॉक्स्च्या लावणीला काही टक्कर द्यायचा विचार कर भौ.. कितीही झालं तरी तूमी.. प. महाराष्ट्राच फेटंवालं.. >>>>>सुकी, मग प. महाराष्ट्र विरूद्ध कोकण असा सामना रंगेल Proud

रच्याकने, तो प्रांत काही आमचा नाहि आहे रे. आम्ही फक्त प्रेक्षकच Happy

खुप मस्त लिहीलंत योगेश..सुक्या म्हणतोय ती गाणी तर...सह्हीच!
त्यांच्या लावण्या जबरदस्त आहेत सगळ्या!

हा लेख तुला विकीवर पण देता येइल... मराठी विकीवर काहिच माहिती नाहीये..>>>>मराठी विकीवर हा लेख अपडेट केला Happy

योगेश मस्त लिहिलायंस लेख. मीही सुलोचना चव्हाणांची फॅन आहे.
परवाच आमच्या कोजागिरीत मी "कळीदार कपूरी" म्हटलं तर मला वन्स मोअर मिळाला.
या गाण्यात बाईंचा अगदी पूर्वीचा कोवळा आवाज आहे.
नंतर नंतर त्यांचा आवाज टिपिकल लावणीयोग्य ...थोडा पसरट ...होत गेला. अर्थातच त्याही आवाजाची खुमारी न्यारीच !