मी आज फुल झाले......पल्लि

Submitted by पल्ली on 18 May, 2008 - 09:41

खिडकीत डोकावणारा लाल उठावदार गुलमोहोर किती बहराला आलाय! उन्हं तापायला लागली की उन्हाचा रंग ह्या गुलमोहोरानं प्रथम पळवलाय असं वाटतं. गच्च भरलेल्या झाडाच्या हिरव्या गार पानातुन ही लाल फुल डोकावतात आणि हळुहळु संपुर्ण झाड लाल दिसायला लागतं...स्वत्व विसरुन फुलांच्या ह्या लालपणात लाल होउन जातं....सोसायटीच्या बाजुच्या पांढर्‍या भिंतिबाहेरचा गुलमोहोर त्या शुभ्र पार्श्वभुमिवर मस्त उठुन दिसायचा. मला नेहमी वाटतं माझं आणि ह्याचं काहि नातं असावं पुर्वजन्मीचं! नाही तर माझ्या मनातल्या प्रत्येक स्पंदनात कसा हा नेमका सामिल होतो? त्यावर नव्यानं चढलेली ती नवखी फुलवेल. अलिकडे ती सुद्धा सुंदर फुलायला लागली आहे. गुलमोहोराचा आधार घेताना तिनं काय विचार केला असेल? की तिलाही माझ्यासारखाच हा गुलमोहोर आपला जुना मित्र वाटला?? माझ्या विचारांच्या नादात मी किती वेळ अशीच उभी होते कोण जाणे! आणि उन्मेश ओरडला...'अरे आज ऑफिस आहे मला...सुट्टी नाही घेतलीय मी आजारपणाची.'.. हा कधी कधी असे जहाल टोमणे मारतो ना, की समोर नवरा नसुन कुणी वैरी उभा आहे असं वाटतं.
'काय हवंय्?'...मी जमेल तितक्या शांतपणे विचारलं.
'माझा इस्त्रीचा शर्ट मिळत नाहीये.....एकही रुमाल नाहीये....काय झाले सगळे रुमाल?'
'हे घे....पोहे खाणार आहेस का?'
'पटकन दिलेस तर खातो....थोडेच दे...कोथिंबीर घाल. आहे का?'
'देते.'..........मी घाईघाईनं कोथिंबीर चिरायला घेतली. मनांत म्हंटलं, एकदा तरी ह्यानं विचारावं-की काय झालंय शर्वरी, आज मूड नाहीये का तुझा की बरं नाहीये तुला?' पण छे! एवढा सौम्यपणा ह्यच्यात कुठुन यायला? खानदानी प्रॉब्लेम आहे ह्याच्या घराण्याचा. एकजण धड बोलेल तर शप्पथ! मी मनातल्या मनात एक टिपीकल शिवि घातली आणि....
'आई गं....' माझं जोरदार किंचाळणं ऐकुन उन्मेश धवत आला...'काय गं? बोट कापलं? थांब ट्युब आणतो..'
दुसर्‍याच मिनिटाला तो ट्युब आणि बॅन्डेड घेउन आला....अगदी हळुवार हातानं त्यानं ट्युब लावाली आणि बॅन्डेड्ची पट्टी लावली...
'शरु, आज काही स्वयपाक घरु नको...मी लंचमध्ये पार्सल आणुन देइन तुला.'
'काही नको, पुन्हा त्यावरुन टोमणे मारशील......'
अजुन आमचा हा प्रेमळ संवाद वाढला असता पण नेहमी प्रमाणे ह्याचा फुक्कट्छाप मित्र गणेश आला आणि मला बाय वहिनी म्हणत दोघं गेलेही. पोहे पण खाल्ले नाहीत. उन्मेश बिचारा उपाशी गेला.......मी पुन्हा गुलमोहोराकडे बघत उभी राह्यले. मे महिन्याच्या ह्या दहा वाजताच्या उन्हात किती एकटा वाटत होता.
------
शर्वरीचं हल्ली काय बिनसलंय कळत नाही. गेला महिनाभर बघतोय, सारखी चिडत असते. काही जोक केला तरी वसकन अंगावर येते. जवळ जरा प्रेमानं गेलो ना तरी ओरडते..माहीतीय मला तुला काय हवंय्..मी दमलीय आता...सारखा मी काय त्याच साठी जवळ जातो का?''' मी गण्याला पोटतिडकीनं सांगत होतो. मी खरंतर घरच्या गोष्टी कुणाशीच डिस्कस करत नाही. पण गण्या विश्वासाचा आहे. त्यानं खुप भोगलंय. त्याला आपल्याबद्दल आणि मला त्याच्याबद्दल आपुलकी वाटते म्हणुन तर आज न राहवुन हा विषय मी त्याच्याजवळ काढला.
गण्याला बायको सोडुन गेली. हा बिचारा अतिशय साधा सरळ. जाताना तिनं जमेल तितकं ह्याला बदनाम केलं आणि ह्याचा फ्लॅट स्वतःच्या नावावर करुन घेतला. गण्या आता वृद्ध आईसोबत भाड्याच्या घरी रहातो. ह्या सार्‍या प्रकारानं गण्याची आई आजारी पडली. हाच सगळं करतो. शर्वरीला किती आपुलकी वाटायची गण्याची. हा मान वर करुन्ही बघत नाही म्हणे....मग तिला अलिकडे ह्याचा राग का येतो?
'गण्या, तुच सांग यार. माझं काय चुकलं?गेला महिनाभर तणतण चालु आहे रे..'
'वहिनि माझ्यावरही भडकतात. माझ्या लक्षात आलं आहे रे. त्यांना माझं येणं आवडत नसणार. मग आपण बाहेरच भेटत जाउ.'
-------
अख्खा दिवस अशी चिडचिड करण्यात गेला. लंचचं पार्सलही कुणाबरोबर तरी पाठवलं. संध्याकाळी डॉक्टरांकडे जायचंय हे तरी ह्याच्या लक्षात आहे की नाही कुणास ठाउक??
----
उन्मेष घरी आला. हॉलमध्ये अंधार! हे काय, कैकेयीच्या कोपगृहासारखं ऍट्मोस्फीअर क्रिएट केलंय काय? मॅडम मलाच वनवासात पाठवणार की काय? उगीच ती ओरडेल म्हणुन त्यानं टी वी लावला नाही. शर्वरी, एकदम आवरुन बाहेर आली......आईशप्पथ, काय दिसतेय बायको आज? फिक्क्या लींबु कलरच्या साडीत काय दिसतेय. अशीच तिला घेउन एखाद्या टेकडीवर बसुन सुर्यास्त बघावा...लग्नापुर्वी भेटायचो तसं ! मग अंधारात.....'
'मी देवापाशी दिवा लावुन येते तोवर तु हा चहा घे.....'
तिच्या गुलाबी ओठांकडे बघण्यात कप कधी हातात आला कळंलच नाही त्याला... खिडकीतुन येणार्‍या मंद वार्‍याच्या झुळुकेनं तिचा पदर हलला. उन्मेषला वाटलं, बाहेर जायचं कँन्सल करावं का? पण हे बोलण्याचं धाडस काही झालं नाही त्याला. ही मेनका एकदम शुरपणखा व्हायची. नकोच ते. ही अलिकडे मेक अप करायला लागली की काय? पुर्वी करायची नाही ती. गालावर ही गुलाबी छटा....डोळ्यात एक वेगळीच चमक्...
दवाखान्यात रिसेप्शनीस्टनं एन्वलप हातात दिलं...उन्मेष बधीर सारखा बसलेल्या जोडप्यांकडे बघत होता. लग्नापुर्वी कधीही विचार केला नव्हता ते सगळं करतोय आपण. बायका तर बिचार्‍या काय काय झेलतात भाउ? आपण मुलगी असतो तर्..त्या कोपर्‍यातली ती बाई, काय चिकणि आहे, चान्स मिळाला तर मॉडेल होउ शकली असती पण प्रेग्नंट दिसतीय. बाप रे! कसं काय ह्या बायकांना झेपतं हे?....
असले उगाचचे टाईमपास विचार करत उन्मेष बसला होता. तिथलीच काही मासिकं निर्विकारपणे चाळत होता. गर्भवती महिलांची काळजी... नवजात शिशुचे संगोपन्... औषधांचे डोस्.......आईचं बाळाला दुध्....'एकदम त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. शरवरीला बाळ हवंय म्हणुन तर ती उदास नसेल्.....कुठे गेली ही?
शर्वरी रिसेप्शनिस्टशी काही तरी बोलत होती. पाठमोरी. वळुन ती उन्मेष्जवळ आली. अलगद त्याचा हात हातात घेउन म्हणाली,'चल'. उन्मेष्चा विश्वास बसेना, हीच्या चेहर्‍यावर आपण हसु बघितलं की काय? का भास झाला आपल्याला??
दवाखान्याच्या बालकनीत आल्यावर ती जवळ आली. त्याच्या कानाशी पुट्पुटली.....तिचे सोनेरी केस त्याच्या गालाला स्पर्श करुन गेले, ती काय बोलली त्याला कळलंच नाही....त्याला कळालं नाही हे समजुन ती पुन्हा जवळ आली... हुं...उन्मेषनं दिर्घ श्वास घेतला.....नाही. ह्या वेळेला निट ऐकायचं ती काय म्हणते ते......
-----
बाल्कनीतल्या सगळ्याचं लक्ष शर्वरी - उन्मेष कडे गेलं. सगळ्याना कळालं असणार. दोघंही आनंदात घरी निघाले..... ती म्हणाली,' इतक्यांत कुणाला सांगु नकोस्....जाउ दे जरा अजुन एक दिड महिना... हवं तर गणेशला सांग फक्त. तेवढच त्याला बरं वाटेल....
---
गुलमोहोर रात्रीतही किती सुंदर दिसत होता. चांदण्यांचा प्रकाश पांघरुन वार्‍याबरोबर हलकासा डोलत होता.... नवख्या फुलवेलीला कळ्या लागल्यात.... आधी कसं लक्षात आलं नाही. गुलमोहोर खिडकीकडे बघुन हसत होता. आणि कळ्यांनी बहरलेली फुलवेल जणु गात होती, मी आज फुल झाले..........

गुलमोहर: 

छान लिहीलीय कथा!
आवडली!
Happy
कथेचे शिर्षक "गुलमोहर" असते तर अधिक suitable झाले असते!
Happy

मी पहिल्यांदा कथेचं नाव 'मी आज फुल्ल झाले' असे वाचले Happy पण मग म्हटलं पल्लि ताई असली कथा लिहिणार नाही..
कथा छान लिहिली आहे..

तन्या, तुला अनुमोदक.... Happy
छान आहे ग कथा.

पल्लु कथा छाने. शिर्षक पण आवडले. (गोबड्या मोठा हो जरा.. :))

लिहिण्याची पद्धत खूप छान आहे पण कथा अशी काहि वाटलि नाहि, गणेशचे पात्र कशाला टाकले होते ते कळाले नाहि. एक स्थित्यंतर म्हणुन वाचायला सुखद आहे.

पल्लिताई, लिखाणात खुप निरागसता आणि माधुर्य आहे ग तुझ्या !
खुप आवडला हाही लेख !

पल्ली, अजून एक आटोपशीर कथुटली (छोटुकली कथा) Happy छानय.
गुलमोहराचं, त्यावरल्या वेलीचं नायिकेशी नातं... नायिकेच्या स्पंदनांत त्यांची गुंतवणूक... अजून स्पष्टं व्हायला हवी गं.

पल्ले, मोठी भरारी घे बाई आता. 'दम आहे' हे जाणवतय... सूट तू!

सर्वांचे आभार,
तिच्या मनातला गोंधळ दाखवण्यासाठी गणेश निर्माण केला. उन्मेष्नं तिर्‍हाईताकडे घरच्या गोष्टी बोलण्याचं स्पष्टीकरण म्हणुन गणेश ची परिस्थीती वर्णन केलि.
तुम्हा सार्‍यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रोत्साहनाने चांगलं लिहिन एक दिवस Happy

पल्ली, कथा चांगली जमली आहे. खूप आवडली.

गुलमोहोर रात्रीतही किती सुंदर दिसत होता. चांदण्यांचा प्रकाश पांघरुन वार्‍याबरोबर हलकासा डोलत होता.... नवख्या फुलवेलीला कळ्या लागल्यात.... आधी कसं लक्षात आलं नाही. गुलमोहोर खिडकीकडे बघुन हसत होता. आणि कळ्यांनी बहरलेली फुलवेल जणु गात होती, मी आज फुल झाले..........

टॉप.
..........................अज्ञात