पाहिजेस तू जवळी

Submitted by मंजूडी on 17 May, 2008 - 03:01

गेल्या चार दिवसात हे तिसर्‍यांदा घडत होतं... गॅसवरून दूध ऊतू जातंय, ऋजुता जवळच उभी कुठेतरी तंद्री लावून आणि डोळे अगदी काठोकाठ भरलेले... काय बिनसलं होतं तिचं कोण जाणे. चहा पितानाही अशीच कप हातात घेऊन कुठेतरी हरवल्यासारखी बसली होती.
"ऋजुता, बरं नाही का वाटत आहे तुला?"
"अहं........ " नुसतीच मान हलवली तिने.
"अगं आईकडे चार दिवस जाऊन ये असं म्हटलं असतं पण आत्ता तिथला उन्हाळा सोसायचा नाही तुला.... आणि अजून तीन महिनेही पुरते झाले नाहीयेत तुला तेव्हा प्रवास नकोच, हो की नाही"
"हं........"
"हे बघ, अगं हळवं होतं मन ह्या दिवसात... उगाचच काहीतरी डाचत राहतं कारण नसताना. आपण आईलाच बोलावू या का थोडे दिवस इथे? नाहीतरी तुझी बातमी समजल्यापासून तिचाही जीव थार्‍यावर नाहीच्चे तिकडे......" तिच्या मनातलं काढून घ्यायचा प्रयत्न करत मी म्हणाले.
"आई, खरंच तसं काही नाही हो......" घाईघाईने डोळे पुसत ती म्हणाली.
"अगं मग चार दिवस बघत्ये मी तुला, सारखी डोळ्यातून पाणि काढत असतेस... खरंच काही त्रास होतोय का ऋजुता? अगं तू सांगितल्याशिवाय कसं समजेल मला?"
मी असं म्हटल्यावर ऋजुता स्फुंदून स्फुंदून रडायला लागली. काही समजेचना तिला कसं शांत करावं ते..... पाणि दिलं प्यायला आणि पाठीवरून हात फिरवत राहिले.
"आई, सागर पुन्हा नोकरी बदलायची म्हणतोय......" शांत झाल्यावर ऋजुता मला म्हणाली.
"अगंबाई!! " मलाही धक्काच बसला ते ऐकून.
गेल्या चार वर्षात सागरच्या तीन नोकर्‍या बदलून झाल्या होत्या. आणि आता चौथी नोकरी?....... ही हल्लीच्या मुलांची क्रेझ... काही कळत आपल्याला हेच खरं.
"आता कुठे म्हणतोय जॉइन करायचं? ह्याने निर्णय घेतला म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे सगळ्या फॉर्मॅलिटीज् पार पडल्याच असतील...."
"आनंदने पार्टनरशिपची ऑफर दिलीये.... म्हणजे जवळ जवळ सगळं नक्की झाल्यातच जमा आहे. पण मी तुम्हाला सांगितलं हे त्याला कळू देऊ नका प्लिज... कारण पार्टनरशिप ऍग्रीमेंट साईन झाल्यावरच तो तुम्हाला दोघांना सांगणार आहे..."
"आनंदला जॉईन होतोय ना... मग ठिक आहे. इथेच मुंबईतच असेल तो" मी अगदी बिन्धास्तपणे ऋजुताला म्हटलं.
"नाही हो आई. आनंदला कॅनडाचा एक क्लायंट मिळतोय. त्याचं तिकडेच प्रोजेक्ट असणार आहे, कॅनडातच..... आणि सागरने आत्तापर्यंत तिकडचेच क्लायंट्स हँडल केलेत म्हणून आनंदने सागरला ऑफर दिलीये... मलाही हे सगळं इतक्यात कळलं नसतंच.... पण सागरच्या बायो डेटाची कॉपी माझ्या ई-मेलवर होती... काहीतरी अडचण होती त्याची म्हणून मग मला फोन करून आनंदला पाठवायला सांगितला तो बायो डेटा... तेव्हा मला कळलं हे सगळं......." भरल्या आवाजातच ऋजुताने हे सगळं सांगितलं.
"अगं पण आत्ताच्या नोकरीत सगळं चांगलं चाललंय की त्याचं.... हे कुठलं खूळ काढलं मध्येच त्याने....."
"मी तरी काय सांगू आई...... तुम्हाला आणि त्यालाही...." अगदी हताश होऊन ऋजुता मला म्हणाली. आत्ता कुठे तिच्या अस्वस्थ होण्याचं कारण मला उमगत होतं.
"मी बोलेन त्याच्याशी......" आश्वासकपणे मी ऋजुताला म्हटलं तेव्हा 'काही उपयोग नाही त्याचा' अश्या अर्थी मान हलवली.

आत्ता ऋजुताची प्रकृती जपणं फार महत्वाचं होतं. सगळं काही ठिक असताना, प्रकृती उत्तम असूनही गेल्या खेपेला झालेला गर्भपात अगदीच अनपेक्षित होता. ऋजुताला शॉकच बसला होता त्याचा.... आपण सागरचं बाळ जपू शकलो नाही असं काहीतरी वेड्यासारखं मनात घेऊन उगाचच स्वतःकडे अपराधीपणा घेतला होता तिने. सागर नव्हताच त्यावेळी इकडे.... ऑनसाईट जॉबसाठी कॅनडात होता. एकटीने निभावलं सगळं ऋजुताने..... अगदी सायकीऍट्रिस्टच्या सेशन्स सकट सगळंच. कोलॅप्स झाली होती केवढी..... पण प्रयत्नपूर्वक स्वतःला बाहेर काढलं तिने ह्या सगळ्यातून.

सागरचं हे नोकर्‍या बदलण्याचं वेड वाढतच चाललं होतं. शिक्षण अगदी उत्तम त्यामुळे नोकर्‍याही पटापट मिळत होता. एका टेबलवर पंधरा वीस वर्षं काढायचे दिवस राहिले नव्हते हे खरं असलं तरी मनाजोगं काम, डोक्यावर बॉसिंग नाही कोणाचं, भरभक्कम पगार, गाडी, इतर सोईसुविधा असं सगळं व्यवस्थित होतं. बरं, संसाराची काही जबाबदारी डोक्यावर आहे असंही नव्हतं. वडीलांचा व्यवसाय आहे, बायकोची चांगली नोकरी आहे आणि घरही चांगलं मोठं आहे. असं सगळं असताना त्याचं हे असं वरचेवर नोकर्‍या बदलणं काही समजण्यासारखं नव्हतं.
क्लायंट फॉरेनचा म्हटल्यावर ऋजुताच्या डिलीव्हरीच्या वेळी हा तिकडेच असण्याची शक्यता होती. गेल्या खेपेचा अनुभव आठवून ऋजुताला टेन्शन येणं साहजिक होतं. नक्कीच असुरक्षित वाटत असणार तिला.... वर परत तसं बोलून दाखवायची चोरी. छे!! सागरला त्याच्या जबाबदार्‍यांची जाणीव करून द्यायलाच हवी होती.

शनिवारी आम्ही दोघंच घरात होतो तेव्हा म्हटलं आता हळूच विषय काढायला हरकत नाही. उगाचच त्याच्या सध्याच्या नोकरीची चौकशी केली.
"हां आई, हा जॉब नाss एकदम मस्त चाललाय... पण मी कदाचित सोडेन ही नोकरी..... आनंदबरोबर काम करायचं ठरवतोय.." बेफिकिरीनेच उत्तरला सागर.
"अरे पण अजून सहा महिनेही झाले नसतील तुला इथे लागून..... सोडायची काय म्हणतोस लगेच..."
"मग काय झालं आई....दुसरी चांगली ऑफर आली, सोडली पहिली नोकरी"
"अरे पण ह्या नोकरीत काय वाईट आहे..... तुझ्यासाठी?"
"अगं काही वाईट असतं म्हणून थोडीच सोडायची असते नोकरी....." माझी कीव करत सागर म्हणाला.
"अरे मग ऋजुताचं काय?" कुठून कशी सुरुवात करावी मला समजत नव्हतं.
"ऋजुताचं काय?? तिची चालू आहे की नोकरी झक्कासपणे...."
"तिच्या नोकरीबद्दल नाही...... प्रेग्नन्सीबद्दल बोलत्ये मी"
"ओह्.... ते होय. ह्यावेळी आहे ना सगळं व्यवस्थित. काही प्रॉब्लेम नाही. डॉक्टरच म्हणालेत"
"ते तर गेल्या वेळी पण सगळं चांगलं होतं रे..... तरीही जे व्हायचं ते झालंच ना.... ह्यावेळी काळजी घ्यायला हवी तिची."
"हो.... जातेय ती वेळच्या वेळी चेक-अपला..."
"वेळच्या वेळी? एकदाच तर जाऊन आलो आम्ही डॉक्टरांकडे...." विषयाला तोंड फुटतंय असं मला वाटू लागलं.
"हां.... तेच ते" स्वतःला सावरत सागर म्हणाला.
"तेच ते नाही सागर...... तुला फक्त तुझं करीअर, तुझा जॉब महत्वाचं वाटतंय. तिच्याबद्दलचं प्रेम, आस्था मला तुझ्या कुठल्याच कृतीतून, बोलण्यातून जाणवत नाहीये..." मी ठामपणे त्याला म्हणाले.
"असं कसं म्हणतेस तू आई.... मी घेतो ऋजुताची काळजी नेहमीच"
"म्हणजे काय करतोस? तिला सुट्टीच्या दिवशी सिनेमाला, फिरायला घेऊन जातोस.. आणि ते सुद्धा तुला आवडतं म्हणून... तिला सिनेमा आवडतो का? तिला चायनीज आवडतं का? विचारलयस कधी तिला? .... तिला नाटक बघायला आवडतं...... सुट्टीच्या दिवशी गाणी ऐकत लोळत पडावसं वाटतं तिला.... माहित्ये तुला?" माझ्या स्वरांना धार चढली होती.
"तिचं मिसकॅरेज झालं त्यानंतर आठवड्याने तू गेलास कॅनडाला.... किती एकटी पडली होती ती..... फोन करायचास तेव्हाही फक्त तुझ्याच कामाबद्दल बोलायचास तू... एवढं प्रेम आहे तुझं तिच्यावर तर तिच्या आवाजावरूनच तिची ढासळलेली प्रकृती तुला जाणवायला हवी होती. पण तू स्वत:तच मशगुल असतोस नेहमी. कायम ऋजुताला गृहीत धरतोस तू" माझी खरी तक्रार सागर समोर मी मांडली.
"अगं पण........ " सागर बोलण्यासाठी शब्द शोधत होता.
"तिला मी वेळ द्यायला हवाय हे समजतंय मला... पण घरी यायला रोजच किती उशीर होतो मला हे तुलाही माहित्ये"
"हो ना, उशीर होतो ते खरंय..... पण तिची विचारपूस करायला तू एखादा फोन करू शकतोस तू ऑफिसमधून. इतक्या सतत मिटींग्ज नसतात माझ्या मते..... आपण हवं तर डॉक्टरांची अपॉईंट्मेंट शनिवारची घेऊ. म्हणजे तुला जाता येईल ऋजुताबरोबर.."
"अगं पण तू आहेस ना जायला तिच्यासोबत..." हे काय नसतं झेंगट आई गळ्यात घालत्ये अश्या सुरात सागर म्हणाला.
"मी आहेच रे..... पण तू बरोबर यावंस असं ऋजुताला वाटत असेल तर?"
" ती तसं म्हणाली का तुला?"
"अरे बोलून कशाला दाखवायला पाहिजे? ह्या काळात नवर्‍याने आपली जास्त काळजी घ्यावी असं कुठल्याही मुलीला वाटतंच. तुझं तिच्याबरोबर असणं ही तिची, तुमच्या होणार्‍या बाळाची मानसिक गरज आहे. होणारं बाळ हे दोघांचं असतं. कोणा एकट्याची नसते ती जबाबदारी..... शरीरात किती बदल होत असतात मुलीच्या...... अरे नवर्‍याची एक आश्वासक नजर सुद्धा बाळंतपण सोसण्याची ताकद देते. नुसता हात पकडला तरी शंभर हत्तींचं बळ मिळतं रे..... ऋजुतासाठी फक्त तुझी उपस्थिती महत्वाची आहे. तू फक्त तुझा जास्तीत जास्त वेळ ऋजुतासाठी दे." त्याच्या कॅनडाला जाण्याच्या प्लॅन्सबाबत पूर्ण अनभिज्ञता दाखवत मी बोलले.
"अगं माझ्या असण्याने काय फरक पडणार आहे आई?" सागर एक दुबळा प्रयत्न करत म्हणाला.
"असं कसं म्हणतोस तू सागर...... अरे तुला शनिवारी सुट्टी असते, ऋजुताला अर्धा दिवस ऑफिस असतं.. ती घरी नाही म्हणून किती चिडचिड करतोस तू? तिच्या क्लोजिंगच्या वेळेला तिला यायला उशीर झाला की किती अस्वस्थ होतोस तू? तू घरी असताना तिने सतत तुझ्या अवतीभवती असावं असं वाटतं नं तुलाही? ते का वाटतं ह्याचं काही आहे उत्तर? नाही ना.... मग हेही तसंच आहे असं समज...." निर्वाणीच्या स्वरात मी सागरला म्हटलं, "मी तुझ्या प्रगतीच्या, महत्वाकांक्षेच्या आड येणार नाही. पण आयुष्यात कुठल्या वेळी कुठल्या गोष्टींना किती महत्व द्यावं हे तुला समजलं पाहिजे. तेवढा मॅच्यूअर्ड तू नक्कीच आहेस. त्यामुळे तुझ्या प्रायॉरीटीज् तू ठरव आणि त्याप्रमाणे निर्णय घे एवढंच माझं म्हणणं आहे."

मनातलं बोलून टाकल्याचं समाधान मला होतं पण त्याचा परीणाम प्रत्य्क्ष कृतीत दिसायला हवा होता.
दोन दिवसात ऋजुता नॉर्मलला आली. सागरने कदाचित काही दिवसांसाठी तरी सगळे प्लॅन्स स्थगित केले असावेत.... किंवा आनंदलाही आत्ता काही अडचण असावी. कोणास ठाऊक.... पण सागरने चालू नोकरी अजून तरी सोडलेली नव्हती.
पण थोड्याच दिवसात माझ्या बोलण्याचा उपयोग होतोय हे दिसू लागलं. काळजीचे तीन महिने एव्हाना संपले होते. ऋजुताची तब्येतही आता स्थिर झाली होती. तिच्याबरोबर सागर नियमित डॉक्टरांकडे चेक्-अपला जायला लागला होता.
सोनोग्राफीच्या वेळी डॉक्टरांनी त्यालाही जवळ बसवून घेतले, बाळाची पोटातली हालचाल त्याला स्क्रिनवर दाखवली तेव्हा सागर अगदी हरखूनच गेला. त्या क्षणाने त्याच्यावर काय जादू केली कोण जाणे पण खरंच तो अगदी मनापासून ऋजुताची काळजी घ्यायला लागला. वेब साईटवरून माहिती गोळा कर, ऋजुताला सारख्या हे खा, ते पी, अशी योगासनं कर वगैरे सूचना कर असं सगळं सगळं त्याचं चालू झालं होतं. थोडक्यात त्याला 'वूड बी फादर' ची लागण झालेली होती. काही का असेना, सागरला जबाबदारी कळली होती, आपल्या आयुष्यातल्या प्रायॉरीटीज् त्याला योग्य वेळी ठरवता आल्या होत्या ह्याचंच मला समाधान होतं. पुढचं सगळं नीट पार पडणार ह्याची मला आता खात्री पटली होती. माझ्यासाठी तेच तर महत्वाचं होतं ना.....

-------समाप्त----------

गुलमोहर: 

मस्त लिहिले आहेस ग...

मंजुडी, छान वाटलं गो वाचून.

छानच लिहिलयस, मंजू(डी). ती 'वुड बी फादर' ची लागण आवडली.
आजकालच्या सासवा अशा असतात नाही? सुनांना जास्तं समजून घेणार्‍या?

छान आहे गो कथा, स्वत चेच प्रतिबिंब पाहिल्यासारखे वाटले.

छान कथा. थोडक्यात आटोपली अस वाटल. ते पितृत्वाची जाण हा विशय चांगला निवडला कथेसाठी.

मंजू, मला वाटतं, पहिल्यांदाच हा विषय इथे हाताळला गेलाय. छान आहे कथा.

मंजू, छानच लिहिल आहेस. मनातले विचार छान उतरवले आहेस. अशी सासू सगळ्यांना मिळो.

मंजु.... खूपच छान झालीये गं कथा!! नि विषय पण वेगळा निवडलाहेस! Happy

मंजुबेन झकास !! आवडेश अपनेको. keep it up.

मंजू,

विषय सुरेख, पण कथाबीजाला नीट न्याय दिला नाहीस असं वाटलं.

काही काही गोष्टी, जसं सागरचा करीयरकडून पितृत्वाच्या जबाबदारीच्या जाणिवेकडे होणारा प्रवास हा एखाद दुसर्‍या प्रसंगातून यायला हवा होता, ते पूर्णपणे त्याच्या आईच्या निवेदनातूनच येतंय. तसंच ज्या माणसाचं आत्ताआत्तापर्यंत फक्त करीयरवरच लक्ष आहे त्याच्यात एकदमच फक्त आईच्या बोलण्याने परिवर्तन झालं असं काहीसं वाटलं. ते बदलणं काही तेवढ्या ताकदीच्या प्रसंगांतून अधोरेखित होणं चांगलं वाटलं असतं.

तुझी लेखनशैली सुरेख आहे बाकी! त्याचा पुरेपूर वापर करावास, असं वाटतं. (कथा मोठी झाली तरी हरकत नाही.) Happy

सगळ्यांचेच प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद.....

श्र, तुझं म्हणणं बरोबर आहे. करीअरकडून पितृत्वाच्या जाणीवेकडे होणारा प्रवास मला नाही आलाय नीट रेखाटायला...... अजून लेखणी तेवढी ताकदवान नाही झालीय. पण सागरमध्ये त्या जबाबदारीची जाणीव होतीच, सुप्तावस्थेत होती असं म्हणू आपण हवं तर... आई त्याला खडबडवून जागं करते इतकंच. आणि तसा तो मूळचा शहाणा असेलच की कोणी दाखवून दिल्यावर त्याला आपली चूक लगेच उमजते.
दीर्घकथा मी कधीच लिहू शकणार नाही. मलाच कंटाळा येतो संदर्भ भरत बसायचा....... ह्या कथा लिहिताना सुद्धा सारखं वाटत रहायचं खुप फापट पसारा तर नाही ना घालत आहोत आपण..... असो. तुझ्या मार्गदर्शनाबद्दल तुझे अनेक आभार...
तुम्हा सर्वांचा असाच लोभ राहू दे ही विनंती. Happy

मन्जुडी, सुरेख! Happy
छान लिहिल हेस, विषयही वेगळा!
माझ्यामते कथेचा तोल व्यवस्थित सावरला गेला हे!
सासुला दिसलेली सुनेची उलघाल, त्यावरील सासुची मते, नन्तर मुलाशी केलेला सन्वाद येथवर "स्त्रीयान्च्या भावनिक" प्रश्नान्चा प्रभाव जाणवतो, मात्र जेव्हा मुलगा बदलतो, आणि होय, आईच्या सान्गण्यावरुनच बदलतो, किन्वा बदलल्याचे दाखले ज्या शेवटच्या पॅरेग्राफ मधे दाखवले आहे ते तेवढेच पुरेसे आहे अन्यथा तो "पुरषी भावनीक प्रश्नान्चा अनावश्यक फाफटपसारा" झाला अस्ता अन तो मात्र अजिबात शोभुन दिसला नस्ता!!! (अगदी रडणारा पुरुष जसा बघवत नाही त्याप्रमाणेच पुरषान्च्या भावनान्चे अतितपशीलवार चित्रण असह्य ठरू शकते)
आपला, लिम्बुटिम्बु

चांगल लिहिल आहेस. Happy
पण पुरुष एवढेही दुर्लक्ष करत नाहीत बर. Happy
.............................................................
**Expecting the world to treat u fairly coz u r a good person is like
expecting the lion not to attack u coz u r a vegetarian.
Think about it.**

मंजू, खूप छान लिहिले आहेस. keep it up. (मला एक उताराही लिहिता येत नाही :()

छोट्या छोट्या मस्त कथा लिहिण्यात तुझा हात कुणी धरु शकत नाही Happy छान लिहिलय.

-प्रिन्सेस...

छान कथा आहे,आणि विषयही खूप छान आहे.
..प्रज्ञा

मंजू नेहमीप्रमाणे गोड कथा.

छान लिहीलेस मंजु , खुप सुंदर शैली आहे तुझी लिहीण्याची . मोठे लिखाण हाती घ्यायला हवे .

मंजुडी......
मला तर सागरमध्ये मीच दिसत होतो ......
वाव.... इतकं सहज आणि सुंदर ....

मंजु! कथा छान आहे.. अशि सासु असण भाग्याच.

छान लिहीलंय मंजु...खरंच काही माणसांचं नुसतं जवळ असणं किती महत्वाचं असतं हे पुन्हा पटलं Happy

सुमेधा पुनकर Happy
**************************************
पतंग्यानेच का जावं आगीजवळ ?
ज्योतीला सांग, नमन कर ना एकदा
**************************************

खुप छान आहे ग कथा , अप्रतीम

अभिजीत

Pages