सावित्रीबाई फुलेंचा वारसा

Submitted by नितीनचंद्र on 17 October, 2010 - 02:35

शिक्षण आणि महिला हे दोन शब्द आले की आणखी एक नाव त्याच्याबरोबर भारताच्या स्वातंत्र्यपुर्वकाळात स्त्रियांच्या शिक्षणासाठी घेणे अत्यावश्यक ठरते ते सावित्रीबाई फ़ुले यांचे. महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा वारसा आज अनेक ठिकाणी रुपांतरीत झालेला दिसतो आहे. या वारश्याचे नाव आहे लीला पुनावाला फ़ाउंडेशन.

ज्यांनी पुण्याच्या किंवा अन्य औद्योगीक क्षेत्रात काम केले आहे त्यांना पदमश्री लीला पुनावाला यांचा परिचय आहे. औद्योगीकक्षेत्राशी संबंध नसलेल्या व भारताबाहेर रहाणार्‍या मायबोलीकरांना लीला पुनावाला या कर्तुत्ववान महिलेचा व त्यांच्या कार्याचा परिचय व्हावा हा या लेखाचा उद्देश.

future.jpg

लीला पुनावाला यांचा जन्म पाकिस्तानातला. १९४७ च्या फ़ाळणीच्या वादळात हे कुटुंब सुरवातीला लोणावळ्याच्या निर्वासितांच्या कॅप नंतर पुणे येथे आले. चार सख्खी भावंडे आणि पाच चुलत भावंडे यात लीला एकटीच मुलगी. पाकिस्तानातुन आलेल्या अनेक कुटुंबांना भारतात जगण्यासाठी संघर्ष करावा लागत होता त्यात लीला पुनावालांचे कुटुंबिय अपवाद कसे ठरणार. पण हा संघर्ष त्यांना त्यांचे भावी आयुष्य घडवण्यासाठी प्रेरणादायी ठरला. मोठा भाऊ काम करत होता तर उरलेल्या तिघा भावंडांना बसने शाळेत जाणे किंवा अंडे खाणे यासाठी आठवड्यातल्या त्यांच्या वाराची वाट पहावी लागे. ही चैन या तिघांना फ़क्त आठवड्यातुन दोनदाच करता येई.

या सर्व प्रतिकुलतेमधुन लीला पुनवाला यांनी शाळा किंवा कॉलेज यात सतत यश मिळवण्यासाठी ध्यास घेतला. एखाद्या सामान्य मुलीची अपेक्षा त्या काळात काय असेल. एस.एस.सी शिकावे आणि लग्न करुन या सुखी संसार करावा. लीला पुनावाला यासाठी जन्माला आल्या नव्हत्या. इंटर सायन्स नंतर त्यांनी पुण्याच्या इंजिनियरींग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पुण्यात काय संपुर्ण भारतात त्या पहिल्या मेकॅनिकल इंजिनीयर झाल्या यावरुन त्यांचा निर्णय किती धाडसाचा असेल याची कल्पना येते.

इंजिनियरींग पुर्ण झाल्यावर त्यांनी सुरवातीला रस्टन या कंपनीतुन सुरवातीचा उमेदवारीचा अनुभव घेतला.याच काळात फ़िरोज पुनावाला यांच्याशी झालेली ओळ्ख ही जन्मभराच्या लग्नबंधनात रुपांतरीत झाली. त्यांच्या प्रत्येक उपक्रमात आजही फ़िरोजजी सहभागी असतात.

त्यानंतर अल्फ़ा लवाल ही बहुराष्ट्रीय कंपनी त्यांचे कार्यक्षेत्र बनले. इंजिनीयर ते मॅनेजिंग डायरेक्टर हा प्रवास अनेक वेगवेगळ्या खात्यांच्या प्रमुखपदाच्या जबाबदार्‍या कुशलतेने संभाळत पुर्ण केला. हे सर्व करताना त्यांचे व्यवस्थापकीय व नेतृत्वगुणांचा परिचय देत मॅनिजींग डायरेक्टर पदाला शोभेल अशी दैदिप्यमान कामगिरी केली. १९८७ ते १९९६ या त्यांच्या नेतृत्व काळात कंपनीची उलाढाल ४५० दशलक्ष रुपयावरुन २७५० दशलक्ष इतकी बहरली. नफ़ाही ४५ द्शलक्ष रुपयांवरुन ३०० दशलक्ष रुपयांवर पोहोचला. आजच्या काळात असलेला अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग नसताना अशी प्रगती घडवणे हे लीला पुनावाला यांच्या उत्तम नेतृत्व गुणांचा व व्यवस्थापकिय कौशल्याचा अतुलनिय संगमाचा परिपाक म्हणावा लागेल.

लीला पुनावाला जश्या भारतातल्या पहिल्या महिला मेकॅनिकल इंजिनियर तशाच त्या भारतातल्या औद्योगीक इतिहासतल्या पहिल्या महिला व्यवस्थापकिय संचालक. त्यांच्या काळात त्यांनी उत्पादन, पणन आणि कंपनीचा विस्तार याच बरोबर उत्तम औद्योगिक संबंध, ग्राहक समाधान यांचे नवे मापदंड निर्माण करत केलेल्या कामगिरीचे प्रतिक म्हणुन त्यांना अनेक सन्मान मिळाले. यातला पदमश्री हा तत्कालीन राष्ट्रपती श्री वेंकटरामन यांच्या हस्ते मिळालेला सर्वोच्च सन्मान म्हणावा लागेल.

ही पुरस्कारांची मालिका पहायला http://www.lilapoonawalla.com/html/accolades.shtml या संकेतस्थळावर जायला हव.

औद्योगीक क्षेत्रात औद्योगिक संबंध हा नाजुक तसाच व्यवस्थापन आणि कामगार यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा भाग आहे. लीला पुनावाला यांनी वरिल यश मिळवताना हे संबंध औपचारिक सलोखा इतकेच मर्यादेत न ठेवता त्यापुढेही जिव्हाळा, स्नेह किंवा त्याही पुढे जाउन सख्य असे वर्णन करावे इतका चांगला पायंडा निर्माण केला. त्यांच्या कारकिर्दीनंतर आजही कामगार त्यांचा आदरपुर्वक उल्लेख करतात हे त्यांना मिळालेले यश आहे.

क्वालिटी सर्कल हे लीलाजींच्या नेतृत्व गुणांनी भारलेले आणखी एक औद्योगीकच नाही तर सर्वच क्षेत्रात कामगार कर्मचार्‍यांना दररोजच्या कामात सुधारणा करण्यास वाव देणारे आणखी एक क्षेत्र. लीला पुनावाला यांनी क्वलिटी सर्कल ओफ़ इंडिया या अशासकिय संस्थेच्या पुणे विभागाचे अध्यक्षपद तसेच केंद्रिय उपाध्यक्ष या पदावर राहुन आपले अनेक ठ्से उमटवले. पुण्यात अखिल भारतीय संमेलन भरवणे आणि भोसरी येथे सरकारी जागा मिळवुन क्वालिटी सर्कलच्या उद्दीष्टांचे प्रशिक्षण देण्यासाठी कायमस्वरुपी प्रशिक्षण केंद्र स्थापणे ही महत्वाची कामगीरी त्यांनी केली.

क्वालिटी सर्कलच्या अखिल भारतीय संमेलनाच्या निमित्ताने त्यांच्या माणसे ओळ्खण्याच्या गुणाचा परिचय मला आणि संबंधीत व्यक्तींना घडला. ही माहिती इथे देणे अपरिहार्यच आहे. मिलिंद उर्फ़ राजा पंडित हा बजाज मधला कामगार. क्चालिटी सर्कलचा उपासक आणि लीला पुनावला या परिसाचा स्पर्श होईपर्यंत केटरिंग मध्ये कोणतही व्यावसायीक प्रशिक्षण नसलेला परंतु ३०० माणसांची एका वेळेची जेवणाची व्यवस्था सांभाळु शकेल इतकी क्षमता लाभलेला कुशल व्यवस्थापक. हे सर्व तो पार्ट टाईम व्यवसाय म्हणुन करायचा.

या संमेलनाची तयारी सुरु झाली आणि अनेक नामांकित केटरिंग व्यावसायिकांना सलग तीन दिवस चहा, नाष्टा व जेवण या कामासाठी ३००० संमेलनार्थींच्या व्यवस्थेसाठी विचारण्यात आले. मिलिंद पंडितकडे कोणताही व्यावसायिक परवाना नव्हता इतकच काय तर साधा फ़ोन किंवा करंट अकाउंट सुध्दा नव्हते. त्याने बनवलेले खाद्यपदार्थांचे नमुने उत्कृष्ट ठरल्यावर हा प्रश्न निर्माण झाला की ३००० लोकांचे सलग तीन दिवसांचे सर्व भोजन व्यवस्थांचे कंत्राट व्यावसायिक पात्रता नसलेल्या, अनुभव नसलेल्या व्यक्तीला का द्यायचे ? या समितीतल्या लीला पुनावाला सोडता सर्व माननीय सदस्यांचे मत हे काम मिलिंदला देऊ नये असे होते. एकट्या लीलाजी ते मिलिंदला द्यावे यावर ठाम होत्या.

संमेलनाचा दिवस उजाडला. ठरलेल्या शर्ती आणि अटींच्या पुढे जाऊन मिलिंद व मिलिंदच्या लोकांनी सलग तीन दिवस ही व्यवस्था उत्कृष्ट्पणे सांभाळली. अनेक नव्या गोष्टी मिलिंदने मोबदला ठरलेला नसताना केल्या म्हणुन लीलाजींनी ठरलेल्या मोबदल्यावर ७ % बोनस दिला. महत्वाचे म्हणजे लीलाजी आणि मिलिंदची या आधीची कोणतीही ओळख नसताना लीलाजींनी त्याची केलेली पारख होय. पुढे मिलिंदने बजाज सोडली आणि पुर्णवेळ व्यावसायीक म्हणुन काम सुरु केले तेव्हा मदत आणि मार्गदर्शन लीलाजींनी केले. त्यांच्या या गुणामुळे मध्यमवर्गातला एक मराठी नोकरदार पुर्णवेळ व्यावसायिक बनला.

लीलाजींचे वैयक्तीक स्तरावरचे त्यांचे गुण म्हणजे वक्तशीर पणा, वागण्यातला कमालीचा साधेपणा कोणत्याही कार्येक्रमाच्या आयोजनात दिसल्याशिवाय रहात नाही. त्यांचा सहभाग असलेला कोणताही कार्येक्रम नेटका झाला नाही असे घडतच नाही.

वैयक्तिक जीवनातही त्यांनी त्यांचे पती श्री फ़िरोज पुनावाला यांच्या सहकार्याने उत्तम आयुष्य जगावे कसे याचा वस्तुपाठ निर्माण केला आहे. वैयक्तीक अश्या अनेक गोष्टींचे श्रेय त्या फ़िरोजजींना देतात. एका उच्च्पदस्थ व्यावसायिकाला छंद जोपासायला वेळ मिळणे दुरापास्त. पण लीलाजींचा अनेक गोष्टींचा संग्रह करण्याचा छंद आहे आणि त्यासाठी त्या किमान रोज अर्धातास देतात हे आगळे वेगळे उदाहरण म्हणावे लागेल.

ज्या साठी या लेखाचा प्रपंच आहे तो भाग आल्याशिवाय हा लेख पुर्ण होऊ शकत नाही. वयाच्या ५०व्या वर्षी लीलाजींना त्यांच्या कंपनीकडुन एक भेट लीला पुनावाला फ़ाउंडेशन च्या रुपात मिळाली. अनेक त्यांच्या सारख्या लीला पुनावला तयार व्हाव्यात ही इच्छा मनात धरुन १९९६ साली या फ़ाउंडेशनची मुहुर्तमेढ रोवण्यात आली.

आज इंजिनियरींग मध्ये शिकणाया मध्यमवर्गातल्या मुलींना पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी लीला पुनावाला फ़ाउंडेशन ही संस्था शिष्यवृत्ती प्रदान करते. या शिवाय परदेशातही जाणाया मुलीना शिष्यवृत्ती दिली जाते. ही कामगिरी म्हणजे अधुनिक काळातला सावित्रीबाई फ़ुलेंचा वारसा म्हणता येईल.

त्यांच्या प्रयत्नातुन व प्रेरणेतुन आज अनेक स्त्रीया धडाडीने स्वत:च्या क्षेत्रात यश संपादन करत आहेत. आपल्या सारखे करुन सोडावे हा अत्युच्च गुण लीलाजींच्या या त्यांच्या कार्यातुन दिसतो.

हा लेख त्यांच्या कर्तबगारीच्या मानाने अपुरा आहे. मायबोलीकरांनी विस्तृत परिचयासाठी http://www.lilapoonawalla.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. आणखी एका आवाहनाशिवाय हा लेख पुर्ण होत नाही. ज्या मुलींना इंजिनियरीग मध्ये करियर करायचे आहे पण शिष्यवृत्तीशिवाय पुढे जाता येणार नाही अश्यांपर्यत हे माध्यम पोचवणे हे काम मायबोलीकरांनी करावे.

दुसरे असे की या फ़ाऊंडेशनला सध्या काही मर्यादा आहेत. जर आणखी काही आश्रयदाते मिळाले तर याचे कार्यक्षेत्र रुंदावले जाऊन आणखी जास्त मुली याचा लाभ घेतील.

गुलमोहर: 

नितीनचंद्रजी छान लेख,
लीलाताई आणि त्यांच्या कार्यासंबधित माहिती आणि विस्तृत परिचयासाठी संकेतस्थळ सुचवल्याबद्दल धन्यवाद!

नितिन खरच छान व काहिंना ऊपयोगि होइल अशि माहिति दिलित. .. पण आपला नितिनचा नितिनचंद्र कधि झाला?

नितीन, चांगला परिचय करून दिला आहेत. ह्या लीला पूनावाला (माहेरच्या थडाणी) माझ्या वडिलांबरोबर होत्या फर्ग्युसनला व इंजिनियरिंगला. त्याकाळी पुण्यात इंजिनियरिंग कॉलेजला मुली जवळपास नसतच! त्या वेळी लीलू थडाणी व अजून एक मुलगी (जी पुढे संरक्षण खात्यात खूप मोठ्या पदापर्यंत गेली व ज्येष्ठ संशोधिका म्हणून निवृत्त झाली) ह्या दोघीच मुली वडिलांच्या बॅचला होत्या. खूप हुशार, महत्त्वाकांक्षी, कर्तबगार आणि एकाग्र वृत्तीने काम करणार्‍या. कॉलेजच्या मुलांनी सुरुवातीला थोडे रॅगिंग करून पाहिले. पण ह्या मुली म्हणजे भन्नाट ''कूल'' होत्या. त्यांनी ते रॅगिंग, मस्करी इत्यादीही अतिशय खिलाडू वृत्तीने घेतले. मुलांनी त्यांच्या वडिलांच्या व्यवसायावरूनही त्यांना अप्रत्यक्ष चिडवून पाहिले. पण त्या सर्व चिडवाचिडवी हसून उडवून लावत.

कालांतराने त्या ज्येष्ठ संशोधिका एकदा आमच्याकडे गौरीगणपतीचे दरम्यान गौरींचे दर्शन घ्यायला आल्या होत्या तेव्हा माझे वडिल व त्यांनी आपल्या कॉलेजच्या आठवणींना उजाळा दिला. आज त्याही लीला पूनावाला फाऊंडेशनच्या कामात बरेच सहाय्य करतात.

पूनावाला फाऊंडेशनच्या शिष्यवृत्तीसाठी आमच्या ओळखीतील एका होतकरू मुलीला शिफारसपत्र हवे होते, तेव्हा त्या संदर्भाने पुन्हा एकदा त्यांच्या कार्याची ओळख झाली.

आता तुमचा हा लेख माझ्या वडिलांना नक्की वाचायला देणार. त्यांना वाचून आनंद होईल.

नितीनचंद्र, खरोखर उत्तम लेख... छान माहिती दिलीत. लीला पूनावालांचे कार्य प्रेरणादायी आहे. तुम्ही लिहिण्यासाठी हा विषय निवडलात, यासाठी तुमची आभारी आहे. अरुंधती कडूनही अधिक सविस्तर माहिती मिळाली... धन्स त्याबद्दल Happy

खुपच छान लेख,
नी आपण दिलेली माहिती स्तुत्य.....वा...स्त्रीवर्गाला या लेखाच्या निमीत्ताने एक नवीन ओळख दिलीत आपण....
आपले खुप आभार.....

सावरी