GOAL!!!

Submitted by ट्यागो on 10 October, 2010 - 15:06

संध्याकाळचे तिरपे ऊन त्याच्या चेहर्‍यावरून मागे सरळ सावली पाडत होते.
त्याचे लक्ष दूरवर होते आणि त्याच्या पांढर्‍या शर्टाच्या पाठिवर
त्याच्या सावलीपेक्षा गडद रंगात त्याचे नाव लिहिले होते. त्याची नजर
स्थिर होऊन आता फक्त लांबून जवळच्या अंतरावर फ़ोकस होत होती. अंतर
झपट्याने कमी होत होते आणि त्याचे हाता-पायांचे स्नायू हळूच ताठरत होते.
ट्रेनच्या रुळांवर मधोमध ऊभे राहून समोरून येणार्‍या गाडीच्या हेडलाईट
कडे बघताना अगदी तसेच होते.
हेडलाईट हळूहळू मोठी होत जाते, श्वास आत घेतला जातो. आतापर्यंत स्थिर
असलेली नजर इतरत्र पाहुन घेते. अंतर आत नाममात्र राहिलेले असते. घ्यायचा
तो निर्णय घेउन झालेला असतो. येणार्‍या बॉलला छातीवर झेलून योग्य ठिकाणी
ढकललेले असते. आता फक्त तो आणि गोलकीपर, ईतर डिफेंडरस् मागे राहिलेत.
सुटलेल्या ट्रेनचा हताशा पाठलाग करणार्‍या अनोळखी चेहर्‍या‍सारखे.
गोलकीपरला चकवून सहज गोल मरला जातो. तो आनंदाने ऒरडत गोललाईनकडे धावतो.
आणि समोरून एक माणूस ओरडत त्याच्या दिशेने धावतो. मधेच थांबतो. शेजारी
पडलेला फूटबॉल मोठ्या प्रेमाने उचलतो. त्याने उचललेल्या बॉल मधून रक्त
गळताना पाहून, तिकडे तो आपले सारे सेलिब्रेशन विसरतो. आणि इथे त्या
माणसाच्या हतातला रक्ताळलेला फूटबॉल आपले डोळे उघडतो. समोर मला हातात
धरलेल्या माझ्या बापाचा चेहरा बघून मी दचकून उठलो, तेव्हा दुपारचे ऊन
माझ्या चेहर्‍यावर येत असते. माझ्या अंगावरच्या पांढर्‍या शर्टाच्या मागे
घामाचा चिकट स्पर्श असतो.

"कसे वाटतेय हे ?"
"ह्म्म.."
"म्हणजे कसे वाटतेय? सहज लिहित होतो तेव्हड्यात तुच समोर दिसलिस. तेव्हा
सहज म्हटले कि तुला दाखवावे"
"चांगले आहे"
"तसे नाही, खरच चांगले आहे का? म्हणजे तू उगाच तसे सांगणार नाहीस पण माझा
हा नेहेमीचा प्रॉब्लेम आहे. मी बर्‍याचदा काही विचार घेऊन लिहायला बसतो
पण शेवटी जे लिहून पूर्ण होते ते मला आवडतेच असे नाही. मग मी सोडून देतो
अर्ध्यातच किंवा फाडून फेकुन देतो. पण आता कंटाळलोय त्या सगळ्याला. मला
काहीतरी लिहुन पूर्ण करयचेय."
"हे चांगले आहे. लिहित रहा, हिच इंटेंसिटी कायम राहिली तर चांगलेच लिहून
होइल. इतक्यातच काही सांगता येत नाही पण माझा विश्वास आहे तुझ्यावर, तू
लिहू शकतोस, लिहिशिलच तू चांगले काहीतरी. तुला आवडेल असे."
"thanks. I needed that support. Hmm... लिहून काढतोच आता"
"मग आपण नंतर भेटूया का?"
"का? थांबना जरा. असाही मी काही आत्ता लिहित बसणार नाहिये"
ती माझ्या शेजारी बसली. माझा हात मी तिच्या खांद्यावर ठेवला. तिने तिथे
तयार झलेल्या ऊबदार त्रिकोणावर आपले डोके टेकवले. मी तिचे नाव आठवण्याचा
प्रयत्न करयला लागलो.

तेवढ्यात माझ्या पायाखाली काहीतरी हलल्याचा फील आला. आणि त्याला जोडूनच
एक थंड स्पर्श. साप शीत रक्ताचे असतात. त्यांचा स्पर्शही थंडच असतो का?
त्या विचारासरशी मी दचकलो. माझी खुर्ची मी मागे सरकवली. टेबल खाली वाकून
बघितले. एक लहानसा पोर्‍या फरशी साफ करत होता.
मी भानावर आलो. माझी कथा लिहिता लिहिता, मी ती ’तिला’ दाखवतोय आणि ती
तशीच माझ्या अथांग प्रतिभेत बुडून माझ्या प्रेमात पडल्याची दिवास्वप्ने
बघत होतो. त्या स्वप्नाच्या आठवणीने मी क्षणभर सुखवलो. दुसर्‍याच क्षणी
मी तिला फक्त एकदाच बघितलेय आणि तिच्याशी आतपर्यंत एकही शब्द बोललेलो
नाहीये हे आठवले. स्वत्ताचाच प्रचंड राग आला. का मी अशा फालतू
स्वप्नांमधे रमतो? काय करतोय मी? माझ्या पायाला पुन्हा थंड स्पर्श झाला.
मी परत चिडलो. खालच्या पोराला बाहेर बोलावले. त्याच्या हाताला धरून
हॉटेलच्या मालकाकडे नेले.
"किती पैसे देता याला दिवसाचे?"
"का साहेब? काय झाले?"
"का एवढ्या लहान पोराला कामाला लावता?" कायद्याच्या गप्पा मारून काहिही
साध्य होत नाही हे माहित असल्याने मी समजावण्याच्या सुरात बोलत होतो.
"जबरदस्ती नाय करत साहेब, त्याच्या घरच्यांनी पाठवलाय. दोन वेळंचं खायला
तरी मिळतं इथे" त्याच्या या बोलण्यावर मी नामोहरम होणारच होतो. काय करू
शकतो मी? माझा राग पुन्हा माझ्यावर कोसळत होता. माझ्यातला मी त्याखाली
दबून मरत होता. तो एकाएकी ऊफाळून वर आला. त्या रागावर स्वार होत मी
काहीतरी करायचे ठरवले. त्या मुलाला मी एक दिवस मोकळा मिळवून देणार होतो.
त्याच्या जागेवर दिवसभर काम करायचे ठरवले मी. पुढे ५०-६० वर्षांनंतर तो
छोटा पोरगा आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी असाच कुठेतरी संध्याकाळीच
बसणार होता आणि आपल्या ढिगभर आयुष्यातील मूठभर सोनेरी दिवस आठवणार होता.
त्यावेळी त्याला नक्कीच त्याच्या लाहानपणातला तो अचानक आलेला मुक्त दिवस
आठवणार होता. मग कदाचित मी किंवा माझा चेहरा, चेहरा नाही कदाचित पण किमान
माझे अस्तित्व तरी आठवणार होते. ’माझे अस्तित्व’ ह्‍ह... त्याला एक दिवस
मुक्त करणार्‍या देवदूताचे अस्तित्व.

मी टेबलाखाली फरशी पुसता पुसता त्या देवदूताच्या कल्पनेने स्वत्ताशीच
हसलो. पटकन भानावर आलो. मी हॉटेलच्या फरशीवरचे चपलांचे डाग नाही तर
स्वत्ता केलेल्या खुनाचे पुरावे एका अनोळखी घरत पुसतोय, हे सत्य मला
प्रचंड झटका देऊन गेले. लहानपणापासून असले देवदूत बनयचे स्वप्न बघत आलो
असलो तरी आज मी एक खुनी आहे. आता तसली सुंदर निरागस स्वप्ने बघण्याचा मला
काहिही अधिकार नाही. यार... काय करून बसलोय मी? मला मारायचं नव्हते
त्याला, खरंच मला त्याला मारयचं नव्हतं. मी फक्त त्याच्याशी बोलत होतो.
तिच्याविशयी विचारत होतो त्याला. त्या दिवशी जेव्हा तिला बघितलं तेव्हा
ती याच्याशी अगदी जवळिकीने बोलत होती. मला फक्त नाव विचारायचे होते तिचे,
याच्याकडून. झालेच तर आणखी थोडी माहिती. तिला भेटल्याशिवाय, तिच्याशी
बोलल्याशिवाय नाही जगू शकत मी. किमान एकदा तरी भेटायचेच होते तिला.
म्हणूनच मी याच्याकडे आलो होतो. खरंच. पण साला म्हातारडा काही ऐकायलाच
तयार नव्हता. मला कोणीतरी टपोरी समजून हाकलत होता. ठिक आहे म्हणून मी परत
जाणारच होतो पण म्हातारा जास्तच चिडला होता. अचानक मला मारयला लागला तो.
मी तेही सहन करत होतो, पण एकाएकी त्याने त्याची काठी माझ्या तोंडावर
मारली. शेवटी एक माणूस असलो तरी एक प्राणी आहे मी. I have my instincts
and here he was, hell bent to finish the
source of that instinct. My life! मी तिथे असलेला एक फ्लॉवरपॉट उचलला
आणि त्याच्या तोंडावर मारला. त्याची दारुण किंकाळी मला आतवर कापत गेली.
प्रचंड वेदना ऊमटली माझ्यात कुठेतरी आतवर आणि तिला दाबण्यासाठी मी परत
एकदा... मग परत एकदा, आणि परत, परत. कधितरी मी थांबलो कारण ती वेदना
थांबली होती. त्याबरोबर त्याचा श्वासही. मी घाबरलो. रडलो. पण तितक्यातच
पटकन सावरलो. चूक झाली होती. खूप मोठ्ठी चूक. पण तिला निस्तरने भाग होते.
मी तिथल्या माझ्या अस्तित्वाच्या सार्‍या खुणा मिटवायला लागलो. अगदी
काळजीपुर्वक. टेबलखालचे रक्ताचे डागही पुसले. कारण त्यात कुठेतरी माझ्या
बूटांचे डाग राहिले असते. You should read Agatha
Christie or James Hadley Chase or the master of them all, Sherlock
Holmes. It may come handy some day. You can't be sure... आणि हो,
आपल्या घरात ऊगाचच फ्लॉवरपॉट ठेऊ नयेत. फुले बागेतच किंवा मोकळ्यात
झाडांवरच सुंदर दिसतात. फारतर एखाद्या स्त्रीच्या केसात.

मी बागेतच बसून हे सगळे लिहितोय. सर्वत्र रंगीबेरंगी फुले दिसतायत आणि
त्या निसर्गाच्या उधळणीत मी पांढर्‍यावर काळे करतोय. पांढर्‍यावर निळे to
be precise. आता फार झाले. लिहायचा कंटाळा आलाय. मी ऊठलो. बराच वेळ गवतात
मांडी घालून बसल्याने पाय अवघडलेत. समोर बराच वेळ कुठून तरी धूर बाहेर
पडत होता. आधी मला कुतुहल वाटले होते पण शेजारीच स्मशानभूमी असल्याचे
आठवल्यावर मी त्याकडे जास्त लक्ष दिले नव्हते. इतक्यात अचानक ’ती’ दिसली.
तिने माझ्याकडे पाहिले. पहिल्यांदा बघितले होते तसेच. तसेच तर असणार...
तिच्यासाठी काहिच बदलले नव्हते. मी माझे रात्रंदिवस तिच्या कैफात एकत्र
केले असले तरी तिच्यासाठी मी तितकाच अनोळखी होतो. पण मला ती परत दिसेल कि
नाही याची आजिबात खात्री वाटत नव्हती. ही संधी गमावण्यात काहिहि अर्थ
नव्हता. मी उत्साहाने तिला हात केला. तिने ऒळखले नाहिच पण माझा ऊत्साहच
इतका होता कि तिलाही आम्ही सात जन्म एकत्र आहोत असे वाटले असावे. असे
क्षणभर वाटनेही तिचा चेहरा माझ्यासाठी अनुकूल बनवून गेले. मी तर याचीच
वाट बघत होतो.
"hi! कशी आहेस?"
"मजेत. पण सॉरी मी ओळखले नाही तुला."
"ह्म्म.. बरोबर आहे. आज पहिल्यांदाच बोलतोय आपण"
तिच्या चेहर्‍यावर एक गोड प्रश्नचिन्ह उमटले. आणि त्यापाठोपाठ थोडा राग.
पण मी कशिबशी आपली बाजू सावरून घेतली. ती छानसे हसली. मी तिचे नाव
विचारले. पण तिने सांगितलेच नाही. ती जेव्हा माझ्याशी बोलून पुढे निघून
गेली तेव्हा ती थांबावी असे मला मनापासून वाटत होते. अगदी मनापासून. आणि
तसे वाटने कधीच थांबणार नव्हते. ती गेल्यावरही मी तसाच ऊभा राहिलो.
बागेचाच एक भाग बनून. मी माझ्यावरच चरफडत पुन्हा एकदा स्वप्नांची वाट
पाहत होतो. तशी ती पुन्हा दिसायला लागली. हे स्वप्नच आहे या खात्रीने मी
त्याचा आस्वाद घेऊ लागलो. ती अगदी जवळ आली. तिने निरखून माझ्याकडे
पाहिले.
"त्या दिवशी रात्री माझ्या वडिलांना भेटायला तूच आला होतास ना? तूच
मारलयस माझ्या वडिलांना"
shit! हे काय होतंय? हे खरे आहे कि स्वप्न? मी बावचळलोय. आणि हे पोलिस
कुठून येतायत? आणि तेही इतक्या लगेच? It has to be dream!! पण खरे असले
तर? मी पळतो जोरात, कारण त्या कुत्र्या पोलिसांचे खरेखुरे कुत्रे माझ्या
मागे लागलेत. I can't beat them पण हे स्वप्न संपेल आणि मला जाग येइल या
आशेने मी पळतोय. माझा दम भरलाय. मी श्वास घेउ शकत नाहिये. प्रत्येक
पावलासह माझी छाती फुटायची धमकी देतेय. पण तरी मला जाग का येत नहिये? का
येत नाहिये मला जाग? क्षणभर सगळे शांत झाल्यासारखे वाटल्याने मी मागे
वळून बघितले. तशी त्या कुत्र्याने झेप घेतली आणि माझ्या नडगीचा चावा
घेतला. त्याचे दात वरच्या चामडीचा पडदा फाडून आत मांसात शिरले. ऊन-ऊन
रक्त त्याच्या तोंडात उतरले. प्रचंड वेदनेने मी ऒरडलो. मी माझ्या नडगीकडे
बघितले. कॉटचा बाहेर आलेला तुकडा त्या नडगीत रोवून तिथला भाग काळा-निळा
पडला होत. रक्ताची कोमट, गोड चव माझ्या जीभेवर पसरली होती. मी अगदिच
भांबावलो होतो. पुन्हा मी माझा ओठ दातांखाली दाबला. चोखला. फाटलेल्या
ओठातून लालेले रक्त पुन्हा जीभेवर खेळवले. थोडा-थोडा भानावर आलो. असल्या
आचरट स्वप्नांनी मला बराच काळ सतावलंय. आधी पण असेच स्वप्न पडले होते. पण
आधिच्या त्या स्वप्नात नक्की काय बघितले होते? पुन्हा माझा मेंदू धडपडून
कामाला लागला. अनेक चित्रे डोळ्यासमोरून सरकू लागली. पण यातले नक्की
स्वप्न कुठले? तशातच तिचा चेहरा आठवला. सुंदर, शांत. अ‍न जरा ऊबदार वटले.
नक्की कुठे बघितलंय हिला? कि नुसतीच स्वप्नातली ऒळख?

मी पुन्हा अस्वस्थ झालो. नाही केवळ स्वप्नातच नाही तर कुठेतरी
प्रत्यक्षातही पाहिले असावे. स्वप्न, सत्य, भास यांचा कुठेतरी संबंध
असतोच कुठेतरी. मी तिचा चेहरा डोळ्यासमोर आणुन विचार करत राहिलो. इतक्यात
त्या चेहर्‍यावरचे भाव बदलले. शांततेची जागा अस्वस्थतेने घेतली. मी
तिच्या त्या अस्वस्थतेचे कारण शोधणार तेवढ्यात तिचा चेहरा त्या
विचारांमधून नाहिसा झाला. काहितरी विचित्र असे डोळ्यासमोर यायला लागले.
मी पुन्हा ते कोडे सोडवायला लागलो. हळूहळू त्या विचित्र आकाराला स्वरूप
प्राप्त झाले. दिसायला लागला तो त्या म्हातार्‍याचा चेहरा. एक मोठा आवाज
झाला. मी दचकलो. इकडे-तिकडे बघितले. मी एकटाच होतो. एकटाच. मी भितीने
सुन्न झालो होतो. काहिच कळत नव्हते. पुन्हा आवाज झाला. दरवाजा धडधडत
होता. कोणीतरी होते बाहेर दरवाज्यावर. मी स्वत्ताला चादरीत लपवायचा
प्रयत्न केला. पण वाजणारा दरवाजा माझी चादर हिसकावून घेत होता. मेंदूचे
सारे लगाम भितिच्या ताब्यात होते. मी उठलो. मागच्या दरवाज्याने बाहेर पडत
पळत सुटलो. जमेल तितक्या वेगाने. जोरात. जोरात.

पण कुणीतरी पाठलागावर होतेच. मी मागे वळून न बघताच पळत राहिलो. बराच वेळ.
मागचा पाठलागही न दमता सुरुच राहिला. हे सर्व कधिच थांबणार नव्हते. मी
आता कुठेही बघत नव्हतो. दिसत होत तो केवळ पायाखालचा रस्ता. मग कधितरी
खालचा रस्ता बदलला. त्याची जागा लोखंडी रुळांनी घेतली. दूरवर ट्रेनचा
आवाज आला. तेव्हा मी वर बघितले. थांबलो. वेड्यासारखा त्या ट्रेनच्या
क्षणाक्षणाला मोठ्या होणार्‍या हेडलाइट कडे पाहत. कधीतरी असाही क्षण येतो
आयुष्यात, जेव्हा सर्व काही स्पष्ट होते. स्वप्न आणि सत्यातल्या सार्‍या
सीमारेषा पुसट होत होत विरघळून जातात आणि तरीही फरक कळतो त्यांच्यातला.
तेव्हा सर्व शांत होते. सर्व प्रश्नांची ऊत्तरे मिळतात.

माझी नजर परत एकदा स्थिर झाली होती. माझ्यातले आणि त्या हेडलाइटमधले अंतर
कमी कमी होत होते. मी फ्क्त वाट पाहत होतो योग्य क्षणाची. त्या हेडलाइटने
माझा पूर्ण चेहरा प्रकाशमान झाला. अंतर आता नाममात्र राहिले होते. झाला
तो निर्णय घेऊन झाला होता. मी सवयीने आजुबाजुला पाहून घेतले. पुढचा क्षण
माझा होता.
फक्त माझा.

GOAL!!!

गुलमोहर: 

...

वा!

दोन तीनदा वाचली.
इंग्रजी साहित्य, चित्रपट यांचा प्रभाव असल्यासारखे जाणवले. (याचा वेगळा अर्थ लावू नये)
एक उत्कृष्ट पटकथा होऊ शकते.
शुभेच्छा!

.

वाचली पुन्हा..

स्वप्न आणि सत्यातल्या सार्‍या सीमारेषा पुसट होत होत विरघळून जातात आणि तरीही फरक कळतो त्यांच्यातला....
तेव्हा सर्व शांत होते. सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात.>>>

वेगवान... आवडली Happy

मयुरेश,

ही कथा माझी कशी काय वाचयची सुटली ?
हिचकॉक नंतर कोण हा प्रश्न आता सुटला. केव्ह्डी भयानक कथा.