पेब (विकट गड) - माथेरान एक अविस्मरणीय अनुभव

Submitted by तुषार इंगळे on 9 October, 2010 - 02:09

रानवाटा सोबत हा माझा पहिलाच ट्रेक. ह्या आधी मी सिंहगड, प्रतापगड, कोथळीगड (पेठ चा किल्ला) कळसुबाई शिखर वगैरे केले आहेत. ओर्कुटवर रानवाटा चे नाव ऐकल्यापासून मला ह्यांच्या सोबत ट्रेक ला जायचे होते व हि संधी ह्या वेळेस चालून आली, ह्या ट्रेक चे माझे काही अविस्मरणीय अनुभव.

तसं खरं म्हणजे आम्ही जाणार होतो कोरीगड लोणावळा. पण दादर हून सुटणारी इंद्रायणी पूर्ण पणे पॅक असल्यामुळे प्लान मध्ये सडन चेंज झाला आणि नेरळ जवळ असणार्या पेब (विकट गड) - माथेरान ला जायचे ठरले. ह्या रानवाटा च्या ग्रुप मध्ये मी नवीन होतो फ़क़्त रानवाटा टीम चा लीडर स्वप्नील पवार ला ओळखत होतो. बाकी सर्व मंडळी मला अनोळखीच होती. आपण ह्या नव्या मित्र मंडळात आपण सामील होऊ कि नाही ते मला आपल्यात घेतील कि नाही अशी भीती आणि शंका दोन्हीही सुरवातीला वाटली पण स्वप्नील आणि त्यांच्या मित्र मंडळींच्या मनमोकळ्या स्वभावामुळे ती शंका केव्हाच दूर झाली आणि मी त्यांच्यातलाच एक आहे हे कळलंच नाही. ठाणे रेल्वे स्थानकातून आम्ही सकाळी कर्जत ला जाणारी लोकल पकडली आणि नेरळ ला उतरलो. नेरळ स्थानकाहून पश्चिमेकडे चालत आम्ही नेरळ गावाच्या हद्दीपर्यंत आलो. तिथून मुख्य रस्ता सोडून आम्ही हिरव्यागार अश्या मैदानावर आलो. समोर माथेरानचा डोंगर दिमाखात उभा होता. आणि त्याच्याच शेजारी डावीकडे पेबचा डोंगर जणू माथेरान च्या रक्षणासाठी सज्ज होता. त्या उंच उंच डोंगररांगा आणि त्याला बिलगणारे ते पांढरेशुभ्र ढग असं वाटत होती कि कुण्या वडीलधार्या माणसाने पांढरेशुभ्र रेशामिवस्त्राचे पागोटे घातले आहे. पुन्हा त्या डोंगरांच्या पायथ्याशी पसरलेली ती हिरवीगार शाल. त्यातूनच विजेच्या विद्युत तारांचे ते खांब जणू त्या डोंगरावर चढण्यासाठी बांधले असावेत. एक अप्रतीम मनोरम दृश्य.

इथून पुढे आमचा प्रवास सुरु होणार होता, त्याआधी सारिकाच्या आई ने आणलेली इडली आणि चटणीवर आम्ही सर्वांनी ताव मारला. अगदी मस्त झाली होती इडली. मग ओळखीपाळखिचे कार्यक्रम झाले. आमच्या टीम लीडर स्वप्नील ने सर्वाना सूचना दिल्या, आणि म्हणाला समोरचा पेब चा डोंगर आपल्याला चढायचा आहे. बापरे! पण चढायचा कुठून ? मार्ग तर अजिबातच दिसत नव्हता आणि हे महाराज असं भलताच आदेश काय देताहेत असं वाटलं. आम्ही सर्व जन उत्सुकतेने आमच्या ग्रुप लिडरच्या मागोमाग निघालो. पावसाळ्यात खाली उतरणाऱ्या छोट्या-मोठ्या जलप्रतापामुळे छोट्या-मोठ्या घळी पडल्या होत्या व हळूहळू आम्ही सर्व जन त्या घळीतून मार्ग काढत होतो. आमच्या ह्या ग्रुप मध्ये जगातील सर्वोत्कृष्ट फोटोग्राफ़र आहेत. जंगलात चालता चालता एखादं रानटी फुल किवा कीटक दिसला कि मंडळी मग तिकडेच ठाण मांडून बसायची. अगदी ट्रायपोड वगैरे घेऊन. मला तर त्या फुलांची आणि कीटकांची दया वाटत होती. कधी कधी हवी ती फ्रेम भेटत नसे कधी लाईट बरोबर नसे कधी फ़ोकस नीट होत नसे एक ४-५ टेक नंतर अप्रतीम फोटो निघत असे. तर असे हे आमचे फोटोग्राफ़र. दिवस तर पावसाळ्याचे होते पण पावसाचा काही पत्त्याच नव्हता वरून वारा सुद्धा अगदी रुक्ष झाला होता एकूणच वातावरण गंभीर स्वरूपाचे होते. वरून आदित्यानारायण आपल्या उष्ण ज्वालाने आम्हाला असह्य करत होता. चढून चढून दम लागला होता. निदान ३-४ ठिकाणी आम्ही विश्रांती घेत घेत गेलो. पाणी सुद्धा संपले होते. अश्या अवस्थेत माझे डोळे आमच्या त्या टीम लीडर ला शोधण्यात हा माणूस नुसता सश्या सारखा टुणटुण उड्या मारत होता. कधी ग्रुप च्या अगदी पुढे तर कधी मागे. खंदा ट्रेकर आहे तो. जरा सुद्धा दमत नव्हता. वरून इतकी मोठी सॅक घेऊन तो वर खाली करत होता. त्याला मी सारख विचारला होतं, स्वप्नील अरे अजून किती लांब. तो मिश्किलपणे हसत म्हणत असे अजून फ़क़्त ५ मिनट. पुन्हा तासाभारानातर विचारल्यावर अजून ५ मिनट ह्याची ५ मिनटे कधी संपणार देव जाणे. ह्या अश्या परिस्थितीत खर्या अर्थाने सह्याद्रीचा राकट पणा जाणवला आणि तेव्हा कळलं कि, महाराजांचा साधा मावळा होण्याची लायकी सुद्धा नाही आपली.

दाट जंगलातून वर चढत चढत एक छोटासा ओढा लागला. पुन्हा वर पाणी मिळेल कि नाही ह्या आशेने पोटभरून पाणी प्यायलो. नंतर त्या दाट जंगलातून डोंगर चढत चढत आम्ही एका मंचकावर आलो. तिथे हा आमचा टीम लीडर मस्त पैकी सॅक खाली ठेऊन आराम करत होता, खरं म्हणजे तो आमचीच वाट पाहत होता. त्या मंचकाहून पेब चा किल्ला अगदी स्पष्ट दिसत होता. उजवीकडे पेठ च्या किल्ल्याप्रमाणे दगडाचा एक उंच असा सुळका आकाश फाडून थेट गगनाला भिडला होता तो होता चंदेरी. समोर मोठी खोल दरी वातावरण साफ असल्यामुळे जवळ पास २०-२५ किमी चा परिसर सहज रित्या दृष्टीक्षेपात दिसत होता. उजवीकडचा पेब चा किल्ला तसा जवळच दिसत होता पण तिथे जाणारी वाट हि थोडी कठीण होती दोन छोटे डोंगर चढून उतरून आम्हास पुढे जायचे होते. त्या डोंगरावर काटेरी झुडपं आणि आजूबाजूला खोल दरी व मध्ये एक पायवाट. त्याकाळी आपले मावळे कसे काय पटापट चढायचे? हे एक न सुटणारा कोड होत. हे दोन्ही डोंगर कसेबसे पार करून आम्ही थेट पेबच्या पायथ्याशी आलो. आणखीन १०-१५ मिनट चढण चढून एक प्रशस्त अशी गुहा लागली. श्री रामदास स्वामींच्या शिष्यांनी ती गुहा आपल्या निवासासाठी वापरली होती असे आमचा टीम लीडर म्हणत होता. इतक्या मोठ्या पराक्रम नंतर ती गुहा एक अप्रतीम आश्रयस्थान वाटत होती. गुहेत महाराजांचा एक पुतळा सुद्धा होता. संपूर्ण गुहेला पांढरा चुना लावला होता त्यामुळे गुहेतील वातावरण अगदी शीतल होतं. आणि बरीचशी आमची मंडळी अजून यायची होती. तेव्हा म्हटलं ते येई पर्यंत आपण आपले पाय मोकळे करावेत. पण त्या गुहेत पाण्याची व्यवस्था नव्हती वरच्या खडकावरून थोडा पाणी ओझारत होत, त्यात ते पाणी साठवण्यासाठी आमची मशागत सुरु होती. मस्त पैकी केळीचे पान तोडून आणून आधी ते चांगले धुतले मग त्याचा आईसक्रीम कोन करून बिसलेरी च्या बॉटल ला अडकवून त्या संथ पाण्याच्या धारेखाली धरले निदान अर्ध्या तासात निम्मी बॉटल भरायची तर अशी हि आम्ही पाण्यासाठी केलेली कसरत.

दुपारचे साधारणपणे २ अडीच वाजले असतील ग्रुप मधली सर्व मंडळी हळूहळू गुहेत जमा होत होती. गुहेच्या समोर ची ती प्रशस्त दरी निसर्गाच्या सोन्दार्यात आणखीन भर घालत होती. समोर चंदेरी सुद्धा दिमाखात उभा होता. फोटोग्राफार लोकांचे कॉमेरे आणि ट्रायपोड बाहेर निघत होते, निसर्गाचे अप्रतीम सोंदर्य आपापल्या कॅमेरात बंधिस्त करत होते. पण विश्कार्त्याने बनवलेल्या ह्या विश्वाचे सौंदर्य असेच थोडीना टिपता येणार आहेत तरीही आमचा केविलवाणा प्रयत्न सुरु होता. पोटात कावळे सुद्धा ओरडत होते. ग्रुप लीडर ने आणलेल्या पुरण पोळ्या. वा !! आता काय म्हणायचं. मस्त पैकी जेवून तास दीड तास आम्ही सर्वांनी त्या गुहेतच आराम केला. आता शेवटचा टप्पा गाठायचा होता तो म्हणजे किल्ला चढायचा होता. पण इथे एक मोठा प्रोब्लेम झाला होता, वर किल्ल्यावर चढण्यासाठी एका सरळ उंच अश्या दगडावर शासनाने एक लोखंडी शिडी लावली होती जिच्यामुळे किल्ल्यावर सहज जाता येत होते पण नेमक्या त्याच दिवशी ती शिडी तेथे नव्हती. झालं आता काय करायचं. परतीची वाट किल्ल्यावर चढून किल्ल्याच्या पलीकडून माथेरान च्या डोंगरावर जायचं असं ठरला होत पण आता किल्ल्यावर जाण शक्य नव्हतं आणि जिथून आम्ही आलो पुन्हा त्याच मार्गाने खाली जायचं म्हटलं तर अंधार झाला असता. आता करायचं तरी काय ? इतक्यात हळूहळू सूर्याचा प्रकाश धूसर होत गेला. थंडगार असा वारा गुहेत शिरला त्या पाठोपाठ धुक्याची एक लाट संपूर्ण दरीवर पसरली क्षणातच वातावरणात सडन चेंज झाला आणि धोधो पावसाच्या सरी कोसळायला लागल्या. शिट !! आता काय करायचं एक तर वाट सापडत नाही वरून पाऊस तो पण ह्या वेळी जेव्हा पडायचं तेव्हा नाही पडला आणि आता प्रोब्लेम वर आणखीन प्रोब्लेम्स. पण खरं तर ह्या पावसामुळे आमच्या अंगातला क्षीण पणा नाहीसा झाला, ह्या आधी आम्ही पेंगाळलेलो सर्व जन पुन्हा उत्साही झालो. आमचा खंदा टीम लीडर आणि सोबतचे अनुभवी ट्रेकर्स ह्यांनी एक दुसरा मार्ग शोधण्याचे ठरवले.

दुसरा मार्ग शोधण्यासाठी आम्ही किल्ल्याच्या बाजूने प्रयत्न करत होतो. ग्रुप मधले अनुभवी दोन सदस्य आधी पुढे गेले नीट वाट आहे कि नाही हे पाहण्यासाठी. पण पुढे वाट होती हे कळल्यावर एक सुटकेचा निश्वास टाकला आणि पुढच्या भटकंती साठी आम्ही सर्व जन सज्ज झालो. तशी हि वाट सरळ आणि सोपी होती. पण तितकीच खडतर डाव्या बाजूला उंच खडक आणि मध्ये पाय वाट तर उजव्या बाजूला खोल दरी. वरून पाऊस आणि धुक. डाव्याबाजूच्या दगडावरून पडणार्या पावसाच्या पाण्यामुळे वाट थोडी चिखलमय झाली होती. पण ह्या शीतल वातावरणात माझा उत्साह अगदी शिगेला पोहोचला होता ४-५ तास डोंगर चढल्यामुळे आलेला थकवा कुठच्या कुठे नाहीसा झाला. जवळ पास तास पावून तास आम्ही सर्व जन चालत होतो संपूर्ण डोंगराला एक वळसा घालत होतो. नंतर माथेरान चा डोंगर दिसू लागला तिथे पुढे आमचा टीम लीडर आधी गेलेल्या आमच्या दोन वाटाड्यांसोबत उभा होता. आमची वाट पाहत होता. आम्ही हि सर्व जन तिथे पोहोचलो. ज्या वाटेने आम्ही आता आलो होतो ती वाट पुढे जाऊन माथेरान च्या डोंगरावर जात होती व मधूनच ती वाट पुन्हा एकदा पेब च्या किल्ल्यावर जात होती. एकूणच आम्ही पेब च्या किल्ल्याला एक प्रदक्षिणा पूर्ण केली. किल्ल्यावर जाऊ शकलो नाही म्हणून मन थोडस उदास होता. पण आम्ही एक नवी वाट शोधली होती आणि किल्ल्याला एक प्रदक्षिणा सुद्धा पूर्ण केली होती त्यामुळे माझा उर भरून आला होता. वाटत होता काहीतरी मोठा पराक्रम आपण केला आहे. फार आनद झाला होता.

पुढे हि निमुळती वाट थोडी खाली जाऊन पुन्हा वर चढत होती आणि माथेरानच्या डोंगराला सुरवात होत होती. ह्याच वाटेच्या आजूबाजूला खोल अशी दरी होती व आमचा ट्रेक सुद्धा आता संपत आला होता. तेव्हा आता वेळ आली होती घोषणेची, ती घोषणा जी बहिर्याच्या कानात जरी म्हटली तरी तो पेटून उठेल, ती घोषणा जी ह्या सह्याद्रीने ३५० वर्षाआधी ऐकली होती हा सह्याद्री त्या घोषणेचा साक्षीदार होता. ती घोषणा जी प्रत्येक मराठी माणसाला कधीहि एकू आली तर त्याच्या अंगात धगधगता एक लाव्हारस तयार होतो. आमच्या टीम चा लीडर स्वप्नील पवार पेब आणि माथेरान च्या डोंगराच्या अगदी मधोमध उभा राहून पश्चिमेकडे तोंड करून जणू त्या मावल्नार्याला सूर्याला सांगत होता. दरीतल्या प्रत्येक झाड झुडपांना प्रत्येक जनावरांना ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात म्हणला.

प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, गोब्राह्मण प्रतिपालक, सिंहासनाधिश्वर, हिन्दवि स्वराज्य संस्थापक, राजाधिराज..........राजा शिव छत्रपति कि...... जय....जय जय....जय जय....जय
जय....भवानि..... जय शिवाजि..
जय....भवानि..... जय शिवाजि.
......हर हर....... महादेव........
......हर हर....... महादेव.

दुष्मनाच्या कानठळ्या बसवणारा हा आवाज, मराठ्यांचे रक्त उसळणारा हा आवाज त्या वेळी संपूर्ण क्षितिजावर अधिराज्य गाजवत होता.

घोषणा झाल्यावर आम्ही परतीच्या वाटेला आलो. थोडसं चढण पुन्हा चढून आम्ही माथेरान ला आलो तिथे पुढे माथेरान मिनी रेल्वे ट्रॅक लागला. तिथे आम्ही सर्व जन पुन्हा जमलो. पुन्हा एकदा फोटोग्राफी सुरु झाली म्हटलं जाता जाता शेवटी एक ग्रुप फोटो होऊन जाऊ देत. आणि आप आपल्या सामानची बांधाबांध केली आणि सरळ त्या मिनी रेल्वे ट्रॅक वरून चालू लागलो. आणि थेट माथेरान चा घाट लागला. गाड्यांचे आवाज एकू येवू लागले. आमचा ट्रेक जवळ पास संपत आला. तिथून मग आम्ही टॅक्सी केली आणि थेट नेरळ स्थानक गाठलं. ट्रेन साठी अजून थोडा अवकाश होता म्हणून आम्ही सर्वांनी नेरळ स्थानकाच्या उपहार गृहामध्ये गरम गरम चहा घेतला आणि सर्वांचा निरोप घेऊन लोकल ने आपआपल्या घरी निघालो.

गुलमोहर: 

तुषार दोन पर्याय आहेत. एकतर पिकासावर फोटो अपलोड केले असशील तर त्याची एम्बेडड लिंक द्यायची.
सरळ कॉपी - पेस्ट पद्धतीने.

अन्यथा
http://www.maayboli.com/node/1556

इथे सर्व माहीती मिळेले.
पण माझ्या मते पिकासावरून फोटो टाकणे जास्त चांगले कारण त्यात हव्या त्या साईजमध्ये टाकता येतो. खासगी जागेत सेव्ह केलेल्या फोटोंना जागेची मर्यादा आहे.
मी तुला विचारपूसमध्ये टाकले आहे. ते वाच.