तूरीच्या खळ्यात एक दिवस....

Submitted by किश्या on 7 October, 2010 - 02:06

आमच्या घरी शेती खुप आहे. मी गावाकडे असताना शेतीची सगळी कामे मीच करायचो.आजकाल घरी गेलो तरी रानात जाणेच होत नाही. पण आमच्या घरी कामाला असलेले गडी खुप मागे लागतात की मालक चला शेतात चला शेतात . वयाने ते खुप मोठे असुन सुध्धा ते मला मालकच म्हणतात. खुपच कसंतरी होते कधी कधी, पण जुने माणसे ती जुने माणसे.( त्यामुळे कधी कधी मी राजकुमार असल्याचा भास होतो.(तसा आहेच म्हणा मी राजकुमार घरचा))

त्या दिवशी असंच गावाकडे गेलो होतो. पुण्यावरुन गावकडे जायला १० तास लागतात पुर्ण रात्र जाते प्रवासात. मग सकाळी पोहचल्यावर माझा दिवसभर ताणुन देण्याचा कार्यक्रम असतो पण त्यादिवशी सकाळी सकाळी बस मधुन उतरल्या उतरल्या गडी धावत आला हातातील बॅग घेउन लगेच घरी, मला काही कळेचना का झालं ते नंतर कळाले की आज रानात खळं आहे तुरीचे, दिवस भर रानात खपायचे आहे म्हणुन बाबाने गड्याला पाठवले होते मला न्यायला.

' चला आज दिवस भर खपायचे आहे तुला '

जरा कुरकुर करत मी मनाची तयारी केली. पण एक गोष्ट बरी होती की रानात ३ च्या नंतर जायच होतं.

'चला ते एक बरं झालं'
मग मी जेवण करुन मस्त थोडी ताणुन ३ वाजता तयार झालो. एक गडी माझी झोप कधी पुर्ण होते याचीच वाट पाहत बसला होता. मी उठुन चहा घेऊन तयार होईपर्यंत त्यांनी बैलगाडी जुंपुन तयार झाले होते. मी आल्या आल्या बैलगाडीचा ताबा घेऊन टाकला खुप दिवस झाले होते बैलगाडी चालवुन.( बाईक आणि कार ला सुद्दा झक मारते बैलगाडी समोर .....एकदा अनुभव घेऊनच बघा.)
असो.
मस्तं बैलगाडी हळुहळु जात असताना आमच्या गड्याने रानातले सगळे सांगायला सुरुवात केली. गुंडीत काय झाले. कुठे काय पेरले, खुरपनं किती झाले, हरभारे कसे आहेत. पुण्यातल्या गमती जमती विचारत होते. (फरारी , रानुबाई, सोनारपट्टी, गुंडी हे आमच्या शेतांची नावे आहेत, खुप शेती असल्यामुळे नावे ठेवावी लागतात.) गप्पां सोबतं वाटेतील बोरे घेऊन खाणे चालु होते. आमच्या गड्याने आणलेल्या भाकरीचा आणि ठेच्याचा वास मस्त सुटला होता. तो वास म्हणजे कुठल्याही पंचतारांकीत हाटीलात मिळनार नाही.
४ वाजेपर्यंत मी शेतात पोहचलो. पोहचल्या पोहचल्या बघतो तर शेतात असलेल्या गोठ्यात आमच्या दोन गाई व्यायल्या होत्या.
एक गेली होती चरायला अनं एक होती दावणीला.

मस्त गेल्या गेल्या आमच्या गड्याच्या बायकोने खरवस दिला खायला. आणि मग ताज्या आणि नुसत्या दुधाचा चहा झाला.
तोपर्यंत तुरीची बरीच झाडे बडवुन झाली होती. तुर आधी बडवुन घ्यावी लागते बडवली की तुरीच्या शेंगा झाडा पासुन वेगळ्या होतात. मग बराच वेळ मळनीयंत्राची वाट पाहत बसलो. मग बसुन बोर होण्यापेक्षा मी पुर्ण रानाला येडा (पुर्ण रानाला चक्कर मारुन पीकांची पहाणी करणे म्हणजे आमच्याकडे येडा करणे) करुन आलो. तुरीच्या खळ्याच्या वेळेस ज्वारी बहरात येत असते. ती ही पाहुन आलो कारण परत हुर्ड्याचे दिवस होते. आणि तो मला मिस नव्हता करायचा..

मळनीयंत्र फार उशीरा आले म्हणजे जवळपास संध्याकाळी ६ वाजता आले. मग सगळी घाई गडबड सुरु झाली. बडवुन आणलेली तुर एका बाजुला घेतली गेली.

मग मी माझ्या शुभ हस्ते नारळ फोडुन खळ्याचा शुभारंभ केला. मग सगळे हात आळस झटकुन कामाला लागले. मळनीयंत्राचा आवाज सगळी कडे घूमु लागला.

मला पण काम करावसे वाटतं होते पण गड्याने हे म्हणवुन गप्प केले की,

"मालक तुम्हास्नी न्हाई सोसवायचं, पुण्यात असाता न्हवं, सवय ह्रायली नसलं, गप गुमान बसां.."

हा टोमणा एकताचं माझी विकेट गेली. मी आपलं शांत पणे बाजुला बसुन गप्पा मारत होतो आणि फोटो काढत होतो.
मग बर्‍याच वेळाने तुरीचा ढीग टाकण्याची तयारी सुरु झाली. आधी मोठे पोते खाली टाकले त्यावर कुर्‍हाड टाकली. (का? असं म्हणतात की कुर्‍हाड खाली असल्यामुळे चेटुका साऱखे प्रकार होत नाहीत.)
आणि खुप मोठा ढिग खाली ओतला.

मग त्याची मोजणी सुरु झाली. मोजणीला हि एक वेगळा प्रकार असतो. आमच्याकडे आदली नावाचा एक प्रकार असतो त्याने ही मोजनी करतात त्यात विशेष म्हणजे १,२,३,४ अस न म्हणता शुभ, लाभ, बरकतं, डोईवर अशी सुरुवात होते आणि मग सुरु ५,६. पण ८ हा आकडा आल्यवर परत राम असं म्हणतात. सरते शेवटी वरचा सर्व ढिग मोजुन झाला. आमच्या भाषेत १ खंडी च्या असपास आणि तुमच्या भाषेत १००० किलो तुर झाली.

हे सगळ होईपर्यंत मी थंडीने पार गारठुन गेलो होतो. मग मी तुरांट्याच्या (तुरीचे उरलेले झाड) काड्या घेऊन मस्त शेकोटी केली आणि शेकत बसलो. आता चांगलीच रात्र झाली होती ११ वाजले होते.
सगळं आवरुन पोती बांधली आणि गावकडे निघालो. रात्री मस्त चांदन पसरल होतं, चंद्र ही वर चांगलाच वर आला होता. अशा वतावरनात मी अनं माझ्या सर्ज्या राजाची जोडी. फोटो काढावेसे वाटत होते पण रात्री फोटो चांगले आलेच नाहीत.

घरी आल्यावर आईने मस्त मुगडाळ खिचडी केली होती. मस्त खाऊन झाल्यावर बेड वर अंग टाकुन झोपी गेलो.असा दिवस संपुन गेला.

गुलमोहर: 

वा मस्तच मजा केलीस रे Happy
गाईंचे फोटो मस्तच आहेत. , मोजणी माप पण मस्तच गमतेशीर... Happy

या कामात अर्थात तुला आवड आणि अनुभव आहे म्हणून अजून मजा आली असेल नाही. आणि या वेळी काम न करता नुसत बघत बसून गप्पा मारायला मिळाल्यात म्हणजे काय अजूनच मजा हो कि नाही Happy
बैलगाडीतून फिरायला खरच खुप मजा येते, आम्ही लहानपणी गावी गेल्यावर बैलगाडितून मस्त फेरफटका मारायचो. आठवले ते दिवस.. Happy Sad पण आता गावी बैलगाडीची मजा राहिलीच नाही , गावी देखील सर्वांकडे टु व्हिलर नाहितर फोर व्हिलर ....

आणि भाकरीच म्हणशील तर नुसत वाचूनच तोंडाला पाणी सुटल.. मस्त गरम भाकरी आणि लसणाची चटणी आहाहा... सकाळची न्याहरी एकदम फक्कड जमायची Happy

तूर कांडुन झाल्यावर (म्हणजे दाण्यापासून डाळ केल्यावर ) जे उरते त्याला तूमच्याकडे काय म्हणतात ? आईच्या सांगण्याप्रमाणे त्याला कळणा म्हणतात, पण मला खात्री करुन घ्यायची आहे.

मजा म्हणजे आफ्रिकेतील अनेक देशांत तूर पिकवतात आणि शिजवून भाताबरोबर खातात, पण त्यांच्याकडे डाळ करायची प्रथा नाही (आणि आम्हा भारतातील शहरवासीयांना अख्खे तूरीचे दाणे बघायला मिळत नाहीत.)

तूर कांडुन झाल्यावर (म्हणजे दाण्यापासून डाळ केल्यावर ) जे उरते त्याला तूमच्याकडे काय म्हणतात ? आईच्या सांगण्याप्रमाणे त्याला कळणा म्हणतात, पण मला खात्री करुन घ्यायची आहे.>>>

बरोबर आहे त्याला आम्ही कळणा च म्हणतो.

आणि आम्हा भारतातील शहरवासीयांना अख्खे तूरीचे दाणे बघायला मिळत नाहीत.>>
अहो आम्ही पॉलीश केलेली तुरीची डाळ कधीच खात नाही. अजुनही माझी आई घरी वर्षाची दाळ बनवुन ठेवते.....
पुण्यात आता वाट लागात आहे मेस मधल वरन खाऊन खाऊन.....

व्वा बेट्या धमाल केलीस...... खरवसच्या नुसत्या नावाने तोंडा ला लाळेची धार लागली.. Biggrin
गायीचे फोटॉ लै झ्याक गड्या..

किश्या खुपच छान रे Happy
एकदा यायलाच पाहिजे तुझ्या गावी Happy

मला तर खाल्लेल्या कोवळ्या तुरी आठवल्या लेख वाचताना.>>>>अगदी अगदी

अरे वा! छान माहिती सांगितलीस. १००० किलो डाळ करायला मळणीयंत्राला ५ तास लागतात? आणि डाळ लगेच पोत्यात भरतात का? त्याला मशीन वापरतात का? उन्हं दाखवायला लागत नाही डाळीला? ताज्या डाळीचं वरण अगदी खास लागत असेल नाही? आम्हाला मिळणारी डाळ कधीची असते कोण जाणे!

मी कधी तूरीच शेत बघितलं नाही आणि हुरडापण खाल्ला नाही. एकदा गेलं पाहिजे शेतावर. फोटो अगदी मस्त आहेत.

>>> मस्त गेल्या गेल्या आमच्या गड्याच्या बायकोने खरवस दिला खायला. आणि मग ताज्या आणि नुसत्या दुधाचा चहा झाला<<

लक्की! ताज्या दूधाचा चहा गूळ टाकून मस्त लागतो.

हे कुठल्या गावचे वर्णन आहे? म्हणजे कुठे तुरी पिकवतात?

आमच्याकडे पण आदली म्हणतात .. गाव कोणचं हो तुमचं >>
मंजरथ, बिड जिल्हा...

मी कधी तूरीच शेत बघितलं नाही आणि हुरडापण खाल्ला नाही. एकदा गेलं पाहिजे शेतावर.>>
नोव्हेंबर च्या पुढे हुरडा येतो.....
मी हुरडा आला की लगेच सांगतो.. तुम्ही या..........
आणी हो आर्च,
आत्ता नुसतीच तूर झाली आहे. डाळ कारण्यासाठी खुप वेगळी process आहे..
तुरीला आधी उन्हात वाळु घालायची (कमीत कमी ५ दिवस तरी,) मग खुप तेल लावायचे आणि परत उन्हात वाळु घालायची. मग तीला जात्यावर घेउन दळायची. आणी ती सुध्धा चुरी न होऊ देता....
माझ्या आईचे खुप हाल होतात हे करताना म्हनुन मी गावी असलो की दळणे हा प्रकार माझ्याकडे असतो. म्हणुन मला ही process माहीती आहे.( हे मुख्यतः उन्हाळी कामात येते.)

मस्तच वर्णन.... अग॑दी गावी गेल्यासारखे वाटले.

ताज्या चिकाचा खरवस खायला जीव अगदी आसुसलाय. नोवेंबरात गावी जाणार आहे, धनगराकडे निदान एकतरी म्हैस विउदे त्या दिवसात अशी प्रार्थना करतेय कधीपासुन. ताजाताजा खरवस केळीच्या पानावर ठेऊन देतात खायला... किती वर्षे झाली असा खरवस खाऊन Sad

किश्या छान वर्णन केलय, आदली आणि खंडी हे माहित होते, पण ईतर कधीच ऐकीवात आले नव्हते बाकी रात्री आकाशात चांदण्याची चादर बघण्याची मजा फक्त गावालाच मिळते........

किश्या मस्त रे मस्त !!१

आम्हालाही बोलव पुढच्या वेळी हुरडा खायला ...नक्की येईन !!!

....

प्रसाद गोडबोले,,,
आपल्या ट्रेक चा ग्रुप तर कधीही वेलकमच आहे रे...
माझा ही तो प्लान आहे.... तस सांगतो मी तुला...

त्याला आम्ही कळणा च म्हणतो- आमच्याकडे कळणा म्हणजे ज्वारी+तांदुळ्_अख्खे उडीद यांच पीठ. त्याच्या भाकरी करतात.
असो किश्या मस्त जमलाय लेख.

आमच्याकडे कळणा म्हणजे ज्वारी+तांदुळ्_अख्खे उडीद यांच पीठ. त्याच्या भाकरी करतात.>>
आमच्याकडे कळणा गाई ला खाऊ घालतात.
शुभांगी कुलकर्णी,सुमेधा धन्स...........

झकास रे भाऊ, मस्त लिहीले आहेस...

<<बाईक आणि कार ला सुद्दा झक मारते बैलगाडी समोर >>>> २००% सहमत. खासकरून बैलगाडीच्या अगदी एका कोपर्‍याला बसुन, किंवा जिथे बैल जोडलेले असतात त्या मधल्या लाकडी आधारावर (काय म्हणतात त्याला , विसरलो मी आता) बसुन बैलगाडी चालवण्यातली मजा काही औरच असते.
<<<मच्या गड्याने आणलेल्या भाकरीचा आणि ठेच्याचा वास मस्त सुटला होता. तो वास म्हणजे कुठल्याही पंचतारांकीत हाटीलात मिळनार नाही.>>>>
अगदी मनातले बोललास भाऊ. जोडीला वांग्याची तव्यावर नुसती परतलेली भाजी, तोंडी लावायला कांदा आणि चवळीच्या शेंगा........., हाSSSSSSSय , तोंडाला पाणी सुटलं राव !

Pages