"मियाँ अकेले बैठनेसे तो बेहतर है आप हमारीही महफिल को रौशन करे??"
अशोक, वनदास आणि आत्मा निघून गेल्यानंतर खट्टू झालेल्या दिल्याने साजिद शेखचे हे आमंत्रण चार पाच वेळा नाकारले. पण शेवटी कुमार, शेखर आणि स्वतः धनराज यानेही आग्रह केला तेव्हा दिल्याने विचार केला, नाहीतरी रूमवर बसून आपण पिणारच, त्यापेक्षा निदान ही कंपनी तरी आहे, यांचेच आमंत्रण आहे म्हंटल्यावर हेच पैसे देतील आणि निदान आंगनच्या गार वार्यात बसून तरी गप्पा मारत आरामात घेता येईल.
पण प्रकरण भलतेच आहे याची कल्पनाच नव्हती त्याला!
चवथा पेग झाला तेव्हा ढाब्याच्या अंधारात कुमार आणि धनराजची झालेली आंखमिचौली जर दिल्याला दिसली असती तर त्याने त्या चार पेगवरच पिणे थांबवून तिथेच चौघांचा कोचा केला असता. पण अती प्रेमाचा आग्रह केल्यासारखा वागणारा साजिद शेख आणि आंगन ढाब्याच्या गार्डनमधील एकंदर अंधार यामुळे दिल्याचे तिकडे लक्षच नव्हते. विषय चालला होता नव्या आलेल्या वर्धिनी मॅडमचा!
वर्धिनी ही अक्षरशः वेड लावणारी फिगर असलेली स्त्री इलेक्ट्रिकलला लेक्चरर म्हणून जॉईन झाली होती आणि सुवर्णा मॅडमकडे आता कुणी बघेनासेच झाले होते. शेखरच्या वर्धिनीबाबतच्या लूज टॉक्सना दिल्या त्या वातावरणात खळखळून हसून दाद देत होता. आणि चवथाच काय, पाचवाही संपून कुमारने दिल्याचा जेव्हा सहावा पेग बनवला तेव्हा कुठे दिल्याच्या टाळक्यात प्रकाश पडला.
साजिदचे तीन, कुमार आणि शेखरचा तिसरा जस्ट सुरू झालेला आणि धनराज पिल्ले तर केवळ दुसरी बीअर घेतोय आणि आपण.... सहावा पेग सुरू?? का?
अशी विषमता का? आपल्यालाच पिण्याचा आग्रह का? आपल्याला पाच पेग घेऊन जी नशा आली आहे ती पाच पेगने नेहमी येणार्या नशेइतकीच आहे, विशेष काही नाही, पण या चौघांच्या मनात जर काही विचित्र असलं तर आपण योग्य त्या हालचाली करू शकू का?
खण्णकन मेंदूत कसलातरी घाव बसावा तसा हा विचार दिल्याच्या मेंदूत प्रवेशला!
आपण इतके मूर्ख कसे? इतके अडाणी कसे? आज अख्ख्या कॉलेजमधे निवासी स्टाफ आणि होस्टेलवरची चार, पाच पोरे सोडली तर कुणीही नसणार! सुट्या लागलेल्या आहेत. धनराजच्या गॅन्गपैकी एकही जण होस्टेलला राहात नाही. प्रत्येकाचे घर पुण्यातच आहे. मग आज हे इतका वेळ अगदी... याच ढाब्यावर का थांबले आहेत? पार्टीच करायची तर ती सुट्टी लागल्यावरही त्याच रटाळ कॉलेजच्या समोरच कशाला? आणि....
..... मुख्य म्हणजे... आपल्याला इतकं आग्रहाचं निमंत्रण आणि सर्वात जास्त आपणच पितो आहोत याकडे जाणीवपुर्वक लक्ष देणे हे..... हे कशासाठी!
अचानक सेकंदात दिल्या गंभीर झाला हे कुणाच्याच लक्षात आलं नाही. दिल्याने चेहरा अन शेखरच्या वर्धिनी मॅडमवरच्या कॉमेम्ट्सना असलेले प्रतिसाद तसेच ठेवले होते. पण आता त्याने पहिल्यांदा तीन ग्लास सटासट पाणी प्यायले. मग 'आलोच, लघ्वी करून' असे म्हणून उठला आणि बाथरूमला गेला. जातानाच त्याला जाणवत होते. पाच पेग घेतल्यावर जेवढे जाणवते तेवढेच, पण, या चौघांनी काही दगा केलाच तर ही नशा खूपच होती. पहिल्यांदा त्याने तोंडावर पाण्याचे हबके मारले. आत्तापर्यंत त्याने पाच पेग्जबरोबर चिकन फ्रायची दिड डिश संपवली होती. कसलाही विचार न करता दिल्याने सरळ उल्टी काढली. दारूचे एक असते. जर व्हॉमिटिंग झाले तर झटक्यात सगळा इफेक्ट जातो नशेचा! आणि बर्यापैकी दारू प्यायल्यानंतर मुद्दामहून व्हॉमिटिंग करणे शक्यही असते. दिल्याने तीन मिनिटे प्रयत्न केल्यावर कुठे एकदम व्हॉमिटिंग झाले त्याला. त्यावर अनेक चुळा भरून आणि तोंडावर पाण्याचे हबके मारून मग त्याने कोपरापर्यंत हातही धुतले. शरीराचे टेंपरेचर अनेकदा मनगटांवर आणि फोर आर्म्सवर पाणी मारल्यास कमी होऊ शकते. दिल्याला केवळ पाचच मिनिटात प्रचंड फ्रेश व हलके हलके वाटू लागले. इतके की जणू आत्ता पुन्हा बसून आणखीन दोन पेग सरळ लावले असते त्याने! बट... द शो मस्ट गो ऑन! बाथरूमच्या खिडकीत 'आतून बाहेर किंवा बाहेरून आत' बघता येऊ नये म्हणून जे कापड नुसतेच गजांवर घतलेले होते ते उडून जाऊ नये म्हणून त्यावर दोन दगड ठेवले होते मुठीएवढे! दिल्याने दोन्ही दगड खिशात घातले.
पाच पेगच्या नशेचे दिलीपकुमारच्या तोडीचे अॅक्टिंग करत दिल्या ग्रूपमधे प्रवेशला!
"ए *****... पेग भर माझा.... "
कुमारला अस्सल कोल्हापुरी शिवी देऊन त्याने 'स्वतःचा भरलेला पेग समोर असूनही दिसत नसल्याचे' अॅक्टिंग केले आणि ग्रूपला दिल्या संपूर्ण बेसावध होत असल्याची खात्री पटली.
कुमारने दिल्याच्याच समोरचा पेग हातात घेऊन त्याच्या डोळ्यासमोर नाचवला. त्यावर दिल्याने 'तिच्यायला भरलाय होय, दिसत नाय अंधारात.. चिकन मागव' असे वाक्य किंचित जड झालेल्या आवाजात म्हंटले. या दिल्याच्या वाक्यानंतर त्याने एका घोटात तो पेग संपवलेला पाहून त्याही परिस्थितीत साजिद शेख हादरला. पितो म्हणजे किती पितो हा? आणि दिल्याने कुमारला टाळी वाजवून सातवा भरायला सांगीतला तेव्हा मात्र दिल्याच्या लक्षात आले. वातावरणात मगाचपेक्षा खूपच फरक पडला होता.
सुन्न! एक सुन्नपणा अचानक ग्रूपमधे पसरलेला आहे हे दिल्याच्या लक्षात आलं! सगळ्यांच्याच मनस्थितीत फरक पडल्याचे हालचालींवरून व बोलण्याच्या ऐवजी ऐकू येणार्या छद्मी सुस्कार्यांवरून लक्षात येत होते.
पापण्यांच्या कोपर्यातून दिल्याचे प्रत्येकावर लक्ष होते. एकदम बोलणे बंद झाल्यासारखे वाटत होते. जणू बिल पेड झालेले आहे. जणू प्रवासातील एका थांब्यावर पाच अनोळखी माणसे बसून चहा घेत आहेत. जणु सगळे एकमेकांमधे होणार असलेल्या स्फोटाची वाट पाहात आहेत.
गार, भन्नाट वार्यामधे दिल्याने त्याची फेव्हरिट विल्स नेव्हीकट शिलगावली अन छातीत धूर भरून घेत चौघांकडे पाहिले. जो तो स्वतःच्या ग्लासकडे पाहात होता. जणू दिल्या तिथे नव्हताच!
मग दिल्याने हायवेकडे पाहिले अन तिकडेच टक लावून पाहिल्यासारखे करत गुणगुणू लागला..
मै बसाना चाहता हूं स्वर्ग धरतीपर... आदमी जिसमे रहे सिर्फ आदमी बनकर....
उस नगर की हर गली तय्यार करता हू...आदमी हूं आदमीसे प्यार करता हू....
गुणगुणताना त्याची जड झालेली जीभ मुद्दाम लक्षात आणून देत होता तो! तशीही काही अगदीच दारू उतरली होती असेही नाही. पण मगाचपेक्षा आत्ता खूपच फ्रेश वाटत होते. स्साला काय व्हायचे ते याक्षणी होऊदेत! टेन्शन नाय पायजेल! आणि दिल्याला अपेक्षित तो कुजबुजाट मिनिटभरात ऐकायला मिळालाच....
साजिद शेख - राज.... लेट्स स्टार्ट...
मध्यरात्रीचा एक वाजलेला! एक वेटर यांचे कधी आवरतेय ते पाहायला चुळबुळत थांबलेला! आंगनच्या भटारखान्यात बाकीचे सगळे जण भात आणि वरण खायला बसलेले! एकाही टेबलवर आता गिर्हाईक उरलेले नाही यांचे टेबल सोडून! हायवेवरून भरधाव वेगाने जाणारे ट्रक्स, त्यांचे लाइट्स आणि क्वचित हॉर्न्स हीच जिवंतपणाची खूण! आंगनचा मालक नाना आज ढाब्यावर नव्हता. नाहीतर दिल्याने त्याला बोलवून घेतलाही असता कदाचित सोबतीला!
'लेट्स स्टार्ट' म्हणजे काय? मारायला सुरुवात करतायत की काय? दिल्याने दोन्ही हात मोकळे ठेवले टेबलवर! कोणत्याही क्षणी फटका अडवण्यासाठी! पण फटका वगैरे पडलाच नाही. डायलॉग्ज सुरू झाले.
कुमार - राज, तूही मोठ्या मनाचा आहेस...
शेखर - हाड... साल्या ही पार्टी मी देतोय... अन हा मोठ्या मनाचा??
कुमार - गप बे! पार्टीचं बोलत नाहीये..
साजिद - मग मधेच राजचं मन मोठ असण्याचा काय संबंध...?? चढगयी क्या तेरेकोभी??
कुमार - ह्यानं ह्याला सगळ्यांदेखत मारलं... पण तरी राज याच्याबरोबर बसून पितोय..
साजिद - वो पुरानी बाते है... अब तो दोस्ती है..
कुमार - मान्य आहे... पण.. दोस्ती करण्यापुर्वी... हिसाब किताब चं काय??
साजिद - म्हणजे??
कुमार - दोस्ती दोन्ही बाजूनी नको का?
शेखर - काय बोलतो बे हा??
कुमार - काय बोलतो काय?? माझं एवढंच म्हणणं आहे... फिट्टंफाट करायची.. मग खरी दोस्ती..
साजिद - कसली फिट्टंफाट...??
कुमार - मी असं नाय म्हणत की सगळ्यांदेखत याने राजचा फटका खावा.. पण...
साजिद - फटका?? कुमार.. डोकं फिरलं का??
कुमार - पण.. आत्ता इथे... इथे कुणीच नाहीये.. इथे मात्र एक फटका खायला पाहिजे..
दिल्या अजूनही गुणगुणत दारू पीत होता. आपण काहीच बोलत नाही आहोत असे वाटायल नको म्हणून म्हणाला...
दिल्या - कसला फटका बे?? कोण कुणाला फटके देतंय?? आ??
कुमार - राज... तुझं काय म्हणणं आहे??
दिल्या - ए... तुझ्याशी बोलतोय मी??
दिल्याने कुमारच्या खांद्यावर ठेवलेला हात कुमारने झटकला.
आता धनराज म्हणाला..
धनराज - अजूनही गुर्मी बघ.. अंगाशी येतंय अजून...
साजिद - आत्ता इथे काही राडा नको हां.. सुट्ट्या लागल्यात..
कुमार - हे नेहमीच शेपूट घालतं...
शेखर - साज्या... मला कुमारचं पटलं पण... काय असेल तो हिशोब बरोबर व्हायला पाहिजे..
धनराज - काय राऊत... मान्यंय का ??
दिल्याने अजूनही चढल्यासारखेच दाखवले.
दिल्या - हा! हिशोब परफेक्ट पायजेल.. अजून पेग कसा नाय आला?
धनराज - बंद झालाय ढाबा... तुला फटका देणारे आता मी..
साजिद - ऐकतोय कुठे तो?? पिऊन लास व्हायची वेळ आलीय..
कुमार - साज्या.. तू धर त्याला मागनं...
साजिद शेख उठून दिल्याच्या मागे येऊन उभा राहिला. एका बाजूला कुमार होताच, शेखर दुसर्या बाजूच्या खुर्चीवर येऊन बसला. आता धनराज उठला. आता मात्र दिल्याला 'काहीतरी चाललेलं आहे हे मला समजतंय' असे दाखवणे मस्ट झाले होते. अॅक्टिंग आता चालणार नव्हते.
दिल्या - क्या कर रहे बाप?? मेरेको कायको घेर रहे??
कुमार - तू राजला मारलंवतंस ना?
दिल्या - आ?? ... मग? ... त्याचं आत्ता काय??
कुमार - आता तू मार खाणारेस..
हडबडून उठल्यासारखा दिल्या उठायला लागताच साजिद शेखने त्याला मागून दाबून बसवायचा प्रयत्न केला. तेवढ्यात कुमार आणि शेखरने दिल्याचा एकेक हात धरला. आणि साजिद थोडा बाजूला होताच मागून साजिदच्या शेजारी धनराज उभा राहिला. त्यने मागूनच दिल्याच्या कानाखाली खाडकन आवाज काढला.
नाऊ इट वॉज इनफ! धिस वॉज टू मच!
दिलीप जनार्दन राऊतासारखा माणूस हे सहन करणं शक्यच नव्हतं!
दिल्याने खाडकन हातांना हिसडा दिला तसे कुमार आणि शेखर हबकले. पण हात सोडवून घेण्याच्याच क्षणी खुर्चीतून दिल्या इतका त्वेषाने उठला होता की साजिदची ग्रीपही गेली. आणि मग...
तो पावणे सहा फुटी राक्षस दारूने लालभडक झालेले डोळे घेऊन संतापातिरेकाने धनराजकडे पाहात होता. त्याचा तो आवेशच असा होता की धनराजची लिटरली फाटली. काहीही समजायच्या आत दिल्याची उजव्या हाताची मूठ जीव खाऊन मारल्यासारखी धनराजच्या हनुवटीवर बसली. आपल्याला प्रचंड वेदना होत असून आपण आहोत तसे मागच्यामागे ढाब्याच्या जमीनीवर पडलेलो आहोत आणि तोंडभर रक्ताची चव पसरत असतानाच एका दाताच्या जागी फार दुखत आहे आणि बहुतेक तो दात आपल्या लाळेच्या अन रक्ताच्या मिश्रणात तरंगत आहे एवढी सगळी जाणीव त्या चार, पाच सेकंदांमधे धनराजला झाली.
हे दृष्य इतकं भयंकर होतं की आपण चौघे असून या प्रचंड प्यायलेल्या माणसाला सहज लोळवू शकतो हेच त्या तिघांच्या ध्यानात आलं नाही.
आलं! प्रथम ते साजिद शेखच्या ध्यानात आलं! त्याने दिल्याचे लक्ष राजकडे आहे हे पाहून दिल्याच्या उजव्या बाजूने त्याच्या कानावर एक प्रहार केला. खरोखरच तो प्रहार फार ताकदीने केलेला होता. दिल्यासारखा माणूस कानात कित्येक घणांचा एकत्र आवाज ऐकू यावा असे वाटून वेदनेने टेबलवर ओणवा झाला. त्याचे तोंड टेबलवर तर पाठ आकाशाकडे अशी अवस्था असताना भ्याड कुमार आणि शेखर या दोघांनी त्याच्या पाठीवर प्रत्येकी किमान पाच पाच फटके टाकले. आता मात्र असह्य झालं होतं! इतके सावध राहूनही आपणच मार खातोय? आयच्ची जय!
दिल्याने तसेच उठून पहिल्यांदा कुमारला धरला. उजव्या गुडघ्याचा मजबूत प्रहार कुमारच्या पोटात झाल्यावर आता किमान अर्धा तास तो उठणार नाही हे सगळ्यांनाच समजले. शेखर तर वीस फूट लांब पळून जाऊन उभा राहिला होता आणि भूत पाहिल्यासारखे दिल्याकडे पाहात होता. मात्र तेवढ्यात हॉटेलचे सगळे वेटर तिथे जमा झाले. पहिल्यांदा सगळ्यांनी या पाचजणांना एकमेकांपासून लांब केले.
धनराज गुणे आता रक्ताळलेल्या तोंडाने शिव्या देत होता. कुमार तर अजूनही उठलेला नव्हता. साजिद शेख वेटर्सच्या हातातून सुटून दिल्याकडे धावायचा प्रयत्न करत होता.
आणि दिल्या त्याला धरणार्या वेटर्सना आवरलाच नाही. धनराज गुणेची आई बहीण उद्धारत त्याने त्याच्याकडे धाव घेतली. आता गुणेला वाचवायला फक्त गुणेला धरणारे वेटर्स होते. त्यांना त्या मारामारीशी काही देणेघेणेच नसल्यामुळे त्यांनी दिल्याच्या आवेशाला घाबरून दिले सोडून गुणेला!
अख्या आंगन ढाब्यावर, सगळा प्लॅन व्यवस्थित करूनही, आत्ता या क्षणी दात पडका धनराज गुणे दिल्याच्या हातात एकटा सापडला होता. संपूर्ण आयुष्यात कुणी ऐकल्या नसतील अशा शिव्या देत दिल्याने शत्रूचीही होऊ नये अशी गुणेची अवस्था केली केवळ दोन मिनिटात! दिल्याच्या मुठींचे प्रहार गुणेच्या जवळपास सर्वांगावर झाले होते. नडग्यांवर लाथा बसल्या होत्या. दिल्याला खिशातल्या दगडांची गरजही भासली नव्हती. गुणेचे कान भण्ण झालेले होते. कान आहेत की नाहीत अशी शंका यावी इतक्या जोरात दिल्याचे हात तिथे बसलेले होते. पोटातून ढवळून येत होते. डावे मनगट पिरगाळले गेल्यामुळे निसटले वगैरे आहे की काय असे वाटत होते. नडग्या अक्षरशः 'नसत्या तर बरे झाले असते' अशा अवस्थेत गेल्या होत्या. आणि धनराज गुणे मातीत मातकटून पडून मार खात होता अजूनही! तेवढ्यात साजिद शेख सुटला. त्याने सोड्याची एक बाटली उचलली. साजिद शेखने सुटताना वेटर्सला दिलेल्या मोठ्या आवाजातील शिव्यांमुळे दिल्याला मागे काहीतरी वेगळीच हालचाल होत आहे हे त्याही परिस्थितीत जाणवले होते. धनराजला मारतानाच त्याने मागे वळून पाहिले तर शेख हातात बाटली घेऊन एकेक पाऊल टाकत येताना दिसल. वेटर्सनी आता शेखला धरण्याचे सोडून दिले होते.
दिल्या मागे वळून ताठ उभा राहिला. साजिद शेखला हातात बाटली असूनही त्या क्षणी दिल्याचे ते रूप पाहून भीती वाटलीच! पण ही हिंदी पिक्चरमधे दाखवतात तसली अॅरेन्ज्ड फायटिंग नव्हती. शेखरने दुसर्या बाजूने कधी नव्हे ते शौर्य दाखवून एक काचेची डिश पळत येऊन दिल्याच्या डोक्यात मागून मारली. वेदनेने तिरमिरलेल्या दिल्याचा तोल गेला. डिश फुटलीच होती. दिल्या हात डोक्यावर दाबून धरून हेलपाटला हे पाहून शेखरने आणखीन काही प्रहार केले अन त्या जोडीला शेख होताच!
पण एका विशिष्ट क्षणी मात्र साजिद शेख गुरासारखा किंचाळला. त्याच्या नाजूक भागावर दिल्याने त्याही परिस्थितीत प्रहार केला होता पडल्यापडल्याच! आणि शेखची ती किंचाळी पाहून आणि त्याने दोन्ही हात पोटाखाली दाबून लोळण घेतलेले पाहून मात्र शेखर नखशिखांत हादरला. या क्षणी आपण मागे मागे सरकून पळून जावे इतकेही त्राण त्याच्यात उरलेले नव्हते. वास्तविक गेल्या मिनिटभरात त्या दोघांनी दिल्याला दिलेला मार लक्षात घेता आत्ता दिल्या पडूनच होता आणि लगेच पळूही शकला नसता. पण शेखर भ्याड होता.
तेवढ्यात शेखचे ते भयानक किंचाळणे पाहून सगळे वेटर्स पुन्हा मधे पडले. एकट्या दिल्याला मात्र कुणीही हात लावत नव्हते. दिल्या मिनिटभराने उठला. इकडे तिकडे पाहिले तर गुणे जमीनीवरच उठून बसला होता. त्याला कुणीतरी पाणी दिले होते. शेख अजूनही तळमळत होता जमीनीवर! कुमारला वेटर्सनी एका बाकड्यावर बसवून पाणी दिलेले होते. लांबूनही कुमार दिल्याकडे पाहून हादरलेलाच होता. पोटात नेमके काय झाले असेल याचा त्याला अंदाज येत नव्हता. आणि शेखर मात्र 'सोड, सोड' असे वेटर्सना म्हणत असला तरीही त्यांनी अजिबात सोडू नये असेच त्याला वाटत होते.
कान आणि डोक्याच्या वेदना कशाबशा सहन करत दिल्या एकेक पाऊल टाकत गुणेकडे आला. गुणेच्या एकतर दोन बीअर झालेल्या, त्यात शरीराची मोडतोड झालेली, त्यात ती कुठे कुठे झालेली आहे हे कळत नाही अशी परिस्थिती आलेली आणि खाली बसून वर पाहिले तर हा असा दिल्या उभा! धनराज गुणेवर सर्वांदेखत थुंकत दिल्या मोठ्याने म्हणाला...
"गांडू... मी माझ्या बापाला खलास केलाय... तू चौकीवर गेलास ना?? महिन्यात टाटा करशील दुनियेला... मामा आमदार आहे माझा... आणि आणखीन एक... छक्यासारखा गेम टाकत जाऊ नको... काय करायचे ते समोरासमोर... काय?? अजून अंड्यात आहेस तू अंड्यात..."
दिल्याची एक सणसणीत लाथ पुन्हा छातीत बसल्याने बसलेला धनराज पुन्हा मातीत लोळला.
सिंहाप्रमाणे मागे नजर टाकून दिल्याने खिशातले दोन्ही दगड काढून भिरकावले. टेबलपाशी येऊन शेखरच्या खुर्चीसमोर असलेली थ्री एक्स रमची अर्धी उरलेली निप उचलली अन ...
..... आंगनच्या अख्या स्टाफला एक अभुतपुर्व दृष्य बघायला मिळाले... एक घोट घेतल्यावर घशातील वेदनेचा अंदाज आल्यानंतर दिल्याने उरलेली रम दुसर्या घोटात ड्राय संपवून टाकली उभ्या उभ्या.....
'हा' असा आवाज करत ती वेदना घालवून साजिदकडे पाहात थुंकत दिल्या होस्टेलवर निघाला होता...
... साजिद शेखला 'आजवर आपण गोड गोड बोलायचो ते जाळ्यात अडकवण्यासाठी' हे दिल्याला समजल्याचा अंदाज येण्याआधी.... आपण नक्की पुरुष राहिलो आहोत की नाहीत याचा अंदाज येणे महत्वाचे वाटत होते...
आणि एक वेटर शेखरच्या पुढ्यात बिल घेऊन उभा होता.
थ्री एक्स रमचा नाईन्टी ड्राय दोन घोटात घेणारा दिल्या जेव्हा पार्किंग जवळून रूमवर जायच्या बेतात होता... त्याला निश्चीतपणे तसे वाटले असे म्हणता येणार नाही... पण बहुतेक... पार्किंगच्या मागच्या बाजूने दिल्याच्या भीतीमुळे दिल्यावर कसेबसे रोखले गेलेले डोळे....
... शिर्केचे होते...
============================================
पंधरा दिवस कंप्लीट शांततेत गेले. ते तसे जाणार हे दिल्याला माहीतच होते. मामा आमदार आहे म्हंटल्यावर केस तर होणारच नाही, पण चौघेही बरे होईपर्यंततरी आपल्याकडे पाहणार नाहीत हे दिल्याने जाणलेले होते. मात्र त्याचवेळेस त्याने ही गोष्टही पूर्णतः पचवलेली होती की हे प्रकरण संपलेले तर मुळीच नाही, पण ही नुसतीच सुरुवात आहे. प्रचंड दक्षता बाळगावी लागणार होती आता! हे चौघेही आपल्यावर भयानक खवळलेले असणार, आपल्यावर लक्ष ठेवणार आणि वेळ येईल तेव्हा आपला पार भुगा करायला बघणार हे दिल्याला माहीत होते. यापुढे एकटे कुठेही उगाचच जायचे नाही, कुणी ना कुणी निदान इतरांना हाका मारण्यापुरता तरी बरोबर पाहिजे! रात्री बेरात्री आंगनला पडीक राहायचे नाही. जी काय प्यायची असेल ती रूममध्येच!
या पंधरा दिवसातही दिल्याच्या मनात धाकधूक होतीच. रूमचे दार बंद करूनच आत बसायचा तो! शेवटी काही झाले तरी ते चौघे होते आणि हा एकटा! एखाददोन जीवघेणे फटके बसले तर प्रतिकारही करणे शक्य होणार नाही हे त्याला माहीत होते. जेवणापुरता तो मेसला जायचा. सुट्टीत मेसमधे जेवायचे असल्यास तसा आधीच अर्ज करावा लागायचा जो दिल्या गेले तीन वर्ष करत आलेला होता. निवासी स्टाफपैकी चार जण आणि विद्यार्थ्यांपैकी चार पाच जण असायचे मेसला! पटापटा जेवण उरकून रूमवर परत यायचा दिल्या! शरम वाटत होती घाबरण्याची! पण हे घाबरणे योग्यच होते. अचानक एखाद्या दिवशी रात्री पुन्हा चौघे आले अन धिंगाणा घातला तर होस्टेलवर त्याला वाचवायलाही कुणी नव्हते. दिवाळी सगळ्या पुण्यात जोरात साजरी होत होती. दर वर्षी दिल्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी रोडवर जाऊन सोनारांनी केलेली आतषबाजी पाहायचा. पण या वर्षी न जाणेच योग्य होते.
आणि एकदाचा तो प्रतीक्षेचा काळ संपला! चवदा दिवस उलटले आणि चवदाव्या संध्याकाळी साडे पाच वाजता पहिल्यांदा 'आणखीन पाच किलो वजन कमी केलेल्या' अशोक पवारचे आगमन झाले.
दिल्या - आली ब्याद तिच्यायला...
अशोक - रूम तुझ्या नानाची नाहीये..
दिल्या - कोचा करीन कोचा....
'कोचा करीन कोचा' हे तीन शब्द ऐकल्यावर अशोक पवारला जणू 'काठावर तडफडणार्या माश्याला कुणीतरी उचलून पुन्हा समुद्राच्या लाटेत फेकावे' तसे वाटले. दिलखुलास हासला अशोक! ते पाहून दिल्याही हासला.
अशोक - ती बुजगावणी कुठंयत दोन?
दिल्या - तू कोण मला विचारणारा?
अशोक - आली नाहीत का अजून?
दिल्या - दिसतायत का आलेली?
अशोक - लाडू आणलेत..
दिल्या - बातम्या देऊ नको... समोर ठेवायची पिशवी...
अशोकने काहीही न बोलता आणलेली पिशवी दिल्याकडे फेकली. अन्नपदार्थ फेकून देऊ नयेत हा विचारही दिल्याच्या किंवा त्याच्या मनात आला नाही. दिल्याने निवांत पिशवी खोलली आणि चार प्लॅस्टिकच्या पिशव्या बाहेर काढल्या. चिवडा, लाडू, करंज्या आणि चकल्या! केली सुरुवात भरायला!
अशोक - त्या दोन पाप्याच्या पितरांना ठेवायचंय.. एकटाच हादडू नकोस..
दिल्या - चिवड्याचा भुगासुद्धा ठेवणार नाही...
अशोक - कशी झालीय रे करंजी?
दिल्या - लय भन्नाट...
अशोक - ..... वहिनीने केल्यायत...
एकदम अशोकचा स्वर ओलावला तसा दिल्याही जरा गंभीर झाला..
दिल्या - काकांचं बरंय का?
अशोक - हं! तू काय केलंस पंधरा दिवस?
दिल्या - ओल्ड मंक... विल्स... विचार...
अशोक - विचार?? ... कसला??
दिल्या - तू आलास की तुला कसा फेकून द्यायचा बाहेर त्याचा..
अशोक हसायला लागला.
अशोक - रोमानोव्हचा खंबाय माझ्याकडे...
दिल्या - लाज वाटत नाही का होस्टेलमधे दारू आणायला?
अशोक - नाय वाटत..
दिल्या - मग काढ की तो??
अर्ध्या तासाने अशोकने फ्रेश वगैरे होऊन रोमानोव्हचा खंबा काढला. सगळी तयारी केली अन मग बॅगेतून तीन मदनिकांचे फोटो काढले अन भिंतीवर चिकटपट्टीने चिकटवले.
दिल्या - ह्या रे कोण?
अशोक - वाईन शॉप वाला मित्र आहे... त्याने दिले फोटो..
दिल्या - आत्म्याचं काय खरं नाय आल्यावर..
अशोक - येडं होईल त्ये...
दिल्या - इथे एक आयटेम आलाय..
अशोक - कॉलेजला?
दिल्या - हं..
अशोक - कोण? असा कसा मध्येच आला? सेमिस्टर झाली की...
दिल्या - लेक्चरर म्हणून आलीय बे..
अशोक - कोण रे??
दिल्या - वर्धिनी...
अशोक - तिच्यायला .... मग?
दिल्या - आहे तेवढं पब्लिक पागल झालंय .... आता तुमच्यासारखे आले की राडा होणार..
अशोक - प्रॉडला?
दिल्या - अंहं.. इलेक्ट..
अशोक - आपल्याला बघायला तर मिळेल ना.. चीअर्स...
दिल्या - ... चीअर्स!
तब्बल चवदा दिवसांनी दिल्या चीअर्स म्हणत होता. एकदम सळाळता मूड आला रूममध्ये!
आणि तीन पेग झाले तेव्हा...
"हे दोघे मद्यपान करतायत.... आणि या तीन अर्धवस्त्रा??? या कोण?? किती अश्लील छायाचित्रे ही!"
आत्मानंद ठोंबरे व मागून वनदास लामखेडे प्रवेशले!
दिल्या - आलं साजूक तूप..
आत्मा - तुम्ही आमची प्रतीक्षाही न करता धुंद होऊ लागलात?
दिल्या - भर रे.. भर त्याचा पेग..
आत्मा - अशोक... ही छायाचित्रे कुणाची आहेत...
अशोक - नावं नाय माहीत... कितीच्या गाडीने निघालात??
आत्मा - सकाळी दहाच्या.... हे घ्या... काही चकल्या... कडबोळी आणि शेव....
वनदास - या माझ्या घरच्या चकल्या... आता मला एक सिक्स्टी द्या बरं
चार ग्लास किणकिणले आणि रूम नंबर २१४ मधे जणू जान आली.
आत्मा - यांचा कटीप्रदेश लोभस आहे..
दिल्या - तू नीट बोल पहिला... च्यायला याचं हनीमूनला कसं होईल रे?
अशोक - पहिल्या रात्री हा म्हणेल... प्रिये... हे उत्तरीय थोडं स्वेच्छेने बाजूला कराल काय?
दिल्या - खीक खीक खीक...
अशोक - मग ती म्हणेल.. नाथ... तुम्हीच का नाही हवं ते करत??
आत्मा - हे चांगले नाही... स्त्रीची अशी थट्टा करणे तेही अध्ययनाच्या काळात... शोभत नाही..
अशोक - मग हिचा कटीप्रदेश कसा काय रे लोभस??
आत्मा - त्या स्वतःहून दाखवतायत... आपण आग्रह केलेला नाही..
दिल्या - पुढे बोल पुढे बोल...
अशोक - मग आत्मा म्हणेल... मी केले असते.. पण तुमचे हे सलज्ज भाव पाहून मला अपराधी वाटत आहे...
वनदास हसू लागला.
अशोक - हे पवित्र स्त्रिये... माझ्या स्पर्शांनी तुझ्या कोमल त्वचेवर रोमांच उठलेले पाहून मला कसेसेच होत आहे...
दिल्या - अरे तिच्यायला.. पळून जाईल लेका ती पळून...
अशोक - परंतु... हा निसर्गाचा नियम आहे... की स्त्री व पुरुषाचे मीलन व्हावे...
वनदास - हां!
अशोक - त्यामुळे तात्पुरती आपली ही सर्वत्र पसरलेली लज्जा आवरून तुम्ही माझ्या या बाहूपाशात याल काय?
आत्मा - अशी थट्टा करू नका.. अलकांना मी असे काहीही म्हणणार नाही...
'अलकांना' म्हणाल्यावर सगळे एकदम दचकलेच!
दिल्या - म्हणजे? ठरलं बिरलं का काय?
आत्मा - ठरलं वरतूनच आहे.. आपण फक्त निमित्त!
दिल्या - नीट बोल नाही तर तुझा कटीप्रदेश सुजवीन...
आत्मा - आता... सहाध्यायींनी सहाय्य केलं तर आमचंही जुळेलंच की...
दिल्या - ..... म्हणजे काय?
अशोक - म्हणजे आपण याला मदत करायची तिच्याशी जुळण्यासाठी...
दिल्या - काशीत जा... तिच्यायला लग्न झाल्यावर आपल्या नावाने शिव्या देईल ती...
मजेत पीत होते सगळे! सगळ्यांची नजर चुकवून आत्म्याची नजर हळुच त्या तीन फोटोंपैकी मधल्या फोटोतल्या स्त्रीच्या शरीरावरून फिरत होती. तिच्या हातात रोमानोव्हची एक बाटली होती आणि अंगावर जेमतेम वस्त्रे! हे तीनही फोटो पाश्चात्य मॉडेल्सचे होते. त्यामुळे रेश्मा आणि शकिला बघून कंटाळलेल्या आत्म्याला हे नावीन्य फारच उपयुक्त वाटत होते.
पण एकदा तिकडे पाहाताना त्याला अशोकने पकडलेच!
अशोक - तुम्ही वारंवार तिकडे का पाहात आहात?
आत्मा - छे छे! वारंवार कसलं? आत्ताच नजर वळली..
अशोक - अशी कशी काय वळली पण?
आत्मा - मी हा विचार करतोय की अशा अवस्थेत यांना छायाचित्र द्यावेसेच कसे वाटते??
अशोक - त्यांच त्यांना पाहूदेत.... तुम्ही प्या!
आत्मा - त्या शकिला गेल्या का?
अशोक - आहेत... बॅगेत आहेत...
आत्मा - त्या बर्या म्हणायच्या यांच्यापेक्षा!
बोलता बोलता विषय निघाला. दिल्याने एक शब्दही न वगळता पंधरा दिवसांपुर्वीचा प्रसंग सांगीतला.
सगळे अक्षरशः हबकलेले होते. आत्मा तर जाड भिंगाच्या चष्म्यातून टक लावून दिल्याकडे पाहात होता. या माणसाने दारू प्यायल्यानंतरही चार जणांना होकले म्हणजे हा काय माणूस असेल ते आत्म्याला समजत नव्हतं!
त्या विषयावर घनघोर चर्चा झाली. अशोकने शपथ घेतली. यापुढे दिल्याला एकटा रूमवर ठेवायचाच नाही. सुट्टी लागली तर त्याला आपल्या घरी घेऊन जायचं! आणि अशोकचे हे वाक्य बोल्न झाल्याझाल्याच आत्म्याने अत्यंत थम्डपणे ते वाक्य उच्चारलं!
"आता यांना आपल्या घरी घेऊन जायची वेळच येणार नाही"
'म्हणजे काय' या कुणाच्याही प्रश्नावर काहीही न बोलता आत्मा ते तीनही फोटो काढून एका पलंगाखाली ठेवत होता. सगळी रूम आवरायला घेतली त्याने! फोटो का काढले या रागीट प्रश्नावर तो फक्त 'उद्या रात्रीपासून लावू' एवढेच म्हणाला! सगळ्यांनाच बर्यापैकी झालेली असल्याने आणि दिल्याच्या मारामारीचा किस्सा जिवंत असल्याने आत्म्याकडे कुणाचे लक्षच नव्हते. अशोक आणि वनदा आणखीन घनघोर शपथा घेत होते. एकदा त्यांना धरून कुदडूच, कोचा करून टाकू वगैरे!
आणि पहाटे दोन वाजता जेव्हा सगळे नशेत झोपले तेव्हा.....
...... खोली लख्ख झालेली होती!
आणि आत्म्याने तसे का केले हे दुसर्या दिवशी सकाळी साडे आठला समजले....
आज कॉलेजचा पहिला दिवस! दोन वाजता झोपलेले असूनही सगळेच साडे सातला पूर्ण तयार झालेले होते. त्यात 'पहिल्याच दिवशी बुडवाबुडवा नको' हा एक उदात्त हेतू व 'वर्धिनीला पाहणे' हा दुसरा बाय-हेतू होता. आणि नाश्ता करून रूमवर आले तेव्हा दिल्याच्या तोंडातून आत्म्याने सिगारेट काढून टाकून दिली. दिल्याने रागाने आत्माकडे पाहिले तेव्हा आत्मा म्हणाला...
"बाहेर बघा... "
एक काळी चकचकीत आलिशान अॅम्बॅसॅडर कॉलेजच्या पोर्चमधे पार्क होत होती. एम एच झेड.. १२१४!
आकाशातील विजेचा धक्का बसावा तसा दिल्या ताडकन उभा राहिला होता. ती गाडी कुणाची होती हे त्याला कुणी सांगायला नको होते. श्रीमती कौशल्या राऊत!
दिल्याची आई कॉलेजला आली होती!
एखादे शिल्प असावे तसा दिल्या खिळून रूममधूनच बाहेर पाहात होता. आपण धावत बाहेर जावे हेही त्याला समजत नव्हते. काही झाले तरी.... ती....आई होती ना?????
त्या गाडीच्या पुढे दोन मोटरसायकल स्वार होते. गाडीच्या मागे तीन मोटरसायकलस्वार होते.
अख्खं कॉलेज स्टॅन्डस्टिल होऊन त्या प्रकाराकडे पाहात होतं! गाडी येण्यात नावीन्य काहीच नव्हतं! पण ज्या थाटात या गाडीपुढे आणि मागे एकंदर पाच मोटारसायकलींचा ताफा होता आणि ज्या प्रकारे गाडीतून उतरलेले ड्रायव्हर आणि आणखीन एक माणूस मागच्या सीटचे दार उघडताना नम्रतेची पराकाष्ठा करत होते त्यावरून आत बसलेली असामी कुणीतरी भलतीच मोठी असामी असणार हे शेंबड्या मुलालाही समजले असते. लेडीज होस्टेलच्या गॅलरीत मुलींची रांग तयार झाली होती बघायला! नॉन टीचिंग स्टाफ भांबावून बघत होता. पोर्चमधे आणि इतरत्र असलेली इतर मुले मुली आपापल्या गप्पा थांबवून तिकडे बघत होती. आणि टीचिंग स्टाफ स्वतःचा आब राखूनही तिकडेच बघत होता.
आणि बघण्याचे फळही मिळाले! विधवा असली म्हणून काय झालं! शेवटी तेज ते तेजच! श्रीमती कौशल्या राऊत गाडीबाहेर आल्या तेव्हा त्यांच्या अध्यात्मिक भाव असलेल्या चेहर्याला पाहून सर्वांच्याच मनात आलं!
अशी बाई कधी बघितलीच नाही. त्याही वयात कांती झळाळणारी! विधवा असल्याने कोणताही दागिना नाही! फक्त गळ्यात एक अगदी बारीक सोन्याचं गळ्यातलं! गोरा पान रंग! दिल्याचा रंग असा का होता ते आता समजत होतं! अत्यंत शार्प डोळे! डोळ्यांना महागडा चष्मा! आणि खणखणीत आवाज...
"धनंजयला बोलव"
आपलं दुसरं नाव धनंजय आहे हेही दिल्या विसरून गेलेला होता. लांबूनच आईचे दर्शन घेऊन तो अक्षरशः पाय जमीनीत रुतावेत तसा पाहात होता. अशोक, वनदास या दोघांना माहीतच नव्हतं या बाई कोण आहेत.
अशोक - कोण रे दिल्या?
आत्मा - यांच्या मातु:श्री!
दिल्याने खाडकन आत्म्याकडे पाहिले. त्या नजरेत एकाचवेळेस अनंत भाव साठलेले होते.
ही आपली आई आहे हे आत्म्याला कसे माहीत? आणि ही येणार आहे हे माहीत असल्यासारखे कसा काय वागत होता कालपासून? आपली आई कॉलेजला कशी आली? आपलं नाव काढून टाकायला आली आहे की काय? इतक्या वर्षांनी आईला पाहून आपल्याला... एवढंसंसं... लहानसं झाल्यासारखं का वाटतंय... आणि.... या क्षणी जाऊन तिला कडकडून मिठी मारायची इच्छा होत असतानाही आपण.. अजून रुममधेच का खिळलेलो आहोत....
दिल्या लहान झाला होता लहान! काय नातं असतं! साठ वर्षाच्या मुलाला पंचाऐशी वर्षांची आई गेली तरी पोरकं झाल्यासारखं वाटतं! निसर्गाने निर्माण केलेलं सर्वात पवित्र, सर्वात प्रेमाने काठोकाठ भरलेलं नातं!
आई आणि मुलगा!
घरातून आलेल्या सात नोकरांपैकी एक कॉलेजच्या बिल्डिंगमधे धनंजयची चौकशी करायला निघाला तसा इकडे आत्मा म्हणाला...
" जा... भेटा ना त्यांना.. तुम्हालाच भेटायला आल्या आहेत..."
एकच क्षण! त्या एका क्षणात गेली तीन वर्षे एखाद्या थेंबासारखी वाहून गेली. काळ मागे मागे जात दिल्या तीन वर्षांचा होता तो काळ आल्यासारखे झाले... केवळ एक क्षण आत्माकडे पाहून दिल्या.....
.... सुसाट सुटला.... सुसाट!
नोकर बिल्डिंगच्या आत गेलेला असताना या बाई नेमक्या कुणासाठी आल्या आहेत याचा विविध अंदाज मांडणार्या सर्वांना ते दृष्य दिसले. तिकडून होस्टेलच्या बिल्डिंगमधून एखाद्या तीरासारखा दिल्या धावत येत होता आणि ओरडत होता... आई.....
आईंचे लक्ष तिकडे गेले. त्या सळसळून तयार झाल्या. घराण्यातील रिवाजाप्रमाणे दिवसात पहिल्यांदा दर्शन होईल तेव्हा आणि रात्री झोपायच्या आधी घरातील मोठ्यांना नमस्कार करायला हवा असायचा... तो नियम दिल्याने पाळला खरा.... जोरात धावत येऊन आईकडे क्षणभरच बघून तिच्या पावलांना हात लावला खरा... पण तो नियम त्याच्या आईंनीच पाळला नाही... त्या क्षणी त्या मातेने आपल्या पिल्लाला उठवून उभे केले आणि क्षणभर त्याच्याकडे बघून त्याला घट्ट मिठी मारली...
'दिल्याची आई आहे ही'! शेकडो आश्चर्योद्गार निघाले पाहणार्यांच्या तोंडातून!
ही भव्यदिव्य, देवीसारखी दिसणारी स्त्री या दारुड्या, गुंड मुलाची आई आहे...
नोकरांपैकी जुन्या तिघंनी त्या मिठीला मिठी मारली. दिल्याला त्यांचा स्पर्श झाला तसा दिल्याने त्यांनाही वाकून नमस्कार केला. सगळ्यांनीच दिल्याला जवळ घेतले. अश्रू दु:खाचे होते की आनंदाचे हेच समजत नव्हतं!
आई - तीन वर्षे... आठवण नाही आली आईच??
मारामारी करणारा, होस्टेलमधे दारू पिणार, कुणाचीही पर्वा न करणारा... दिल्या आज... हमसाहमशी रडत होता...
आई त्याच्या कपाळावरून, खांद्यांवरून हात फिरवत होत्या!
केवळ दहा मिनिटांत प्राचार्य बोरास्तेंना बातमी समजली. आमदारसाहेबांच्या भगिनी खुद्द आलेल्या आहेत. मग काय विचारता? कॉलेजच्या गेस्ट हाऊसमधे आलिशान सोय करण्यात आली. त्यात त्यांचं घराणं मोठं! ते त्यांच्या व्यक्तिमत्वातूनच दिसत होतं! आत्मा, अशोक आणि वनदासही त्यांना भेटायला आले आणि नमस्कार करून बाजूला आदराने उभे राहिले. दिल्या आईजवळ बसला होता.
आई - हा तुझा मित्र अन त्याचे कीर्तनकार वडील... दोघेही आम्हाला भेटून गेले.. त्यांनीच सांगीतलं.. तू मला भेटायला यायला लागू नये म्हणून मुद्दाम नापास होतोस... म्हणजे इथेच राहता येईल... असं का करतोस धनू?? झालं ते झालं! पण म्हातार्या आईची आठवण नाही येत कधीच?? मला कोण आहे दुसरं?? मला म्हणाले.. सारखा तुमचं नाव घेत असतो खोलीवर.. दिवाळीत तरी यायचंस... मला सगळं कळलं आहे तुझ्याबद्दल.. खूप जणांना मदत करतोस... त्य मुलीने खोटी तक्रार नोंदवली होती हे पण भाऊने सांगीतलं मला...
हे वाक्य ऐकून व्यवस्था बघायला समोरच उभा असलेल्या शिर्केच्या पाठीच्या कण्यातून एक शहारा खाली गेला.
आई - आम्ही आता लगेच निघतोय.... पण एक लक्षात ठेव... आई ही शेवटी आई असते... आता दर शनिवार रविवार गावाला यायचं.. आणि हा तुझा मित्र आणि त्याचे वडील आले म्हणून मला समजलं तरी... की एक क्षणही जात नाही जेव्हा तुला माझी आठवण येत नाही... नाहीतर मला वाटत होत... की तू मला विसरलास... मग... मी तरी कशाला जगायचं???
दिल्याने पटकन आईच्या तोंडावर हात ठेवला.
दिल्या - लगेच का निघालात??
आई - गावात उत्सव असतो विसरलास?? आपल्याच हातून पूजा व्हायची! वैधव्य आल्यावर मग ते बंद झाल... माझी सून आली की पुन्हा सुरू होईल.. धनंजय... लवकर पास हो... मग लग्न करू तुझं... घराला पुन्हा घरपण आणू...
कारण नसताना अशोक मधे पचकला. हळूच कुजबुजत म्हणाला...
अशोक - आई... याच कॉलेजमधे एक मुलगी आहे ना?.. ती याला.. यांना... आवडते...
झालं! सुरेखाची इथ्यंभूत माहिती द्यावी लागली दिल्याला! सुरेखाचं घराणं यांच्या घराण्याच्या तुलनेत काहीच नव्हतं! यांच्याबाबत तिच्या घरच्यांना समजलं असतं तर ते हवेत उडले असते. दिल्याची आई पण भन्नाट! दिल्यापेक्षाही तुफानी वेगात काम करणारी!
आई - आत्मानंद... बोलव तिला... तिच्या वडिलांचा नंबर घेऊ तिच्याकडून...
दिल्याने केलेला प्रचंड विरोध मोडीत काढून आईंनी आत्म्याला पिटाळलाच!
दहा मिनिटांनी चक्क सुरेखा प्रवेशली.
आई - ये... तुझ्या वडिलांचा नंबर लिहून दे या दौलतला! आम्ही त्यांच्याशी बोलू... तुला... तुझी काही हरकत तर नाही ना??
सुरेखाला आत्म्याने काहीच पार्श्वभूमी सांगीतलेली नसल्याने तिच्यासाठी हा प्रचंड धक्का होता. ही बाब अशी सर्वांसमोर कॉलेजमधे चर्चेला यावी हे पाहूनच ती हादरली होती. त्या धक्यातून सावरण्यापुर्वीच तिची मान आईंच्या दारार्यामुळे एकदम 'हरकत नाही' या अर्थी हालली. आणि मग तिला स्वतःची चूक समजली.
खाडकन दिल्याकडे पाहात ती तिथून पळून गेली. आई हसू लागल्या तेव्हा दिल्याला समजले! सुरेखा आपलीच होणार!
त्याने या तिघांकडे पाहिले! अशोकने कुणाला कळणार नाही अशा पद्धत्ने हळुच उजव्या हाताचा अंगठा 'चीअर्स' अशा अर्थी हालवला.
आणि बोरास्ते सरांशी बराच वेळ बोलून श्रीमती कौशल्या राऊत कॉलेजमधून निघून गेल्या.
============================================
कॉलेजच्या पहिल्या वर्षात.. कथेच्या नायकाने.. आत्मानंद ठोंबरेने..एक घर पुन्हा वसवले होते... खरे तर... दोन घरे... राऊत यांचे आणि.. सुरेखाचेही...!
आणि त्याचे सेलेब्रेशन आंगनमधे रात्री दहा वाजता होत असताना....
..... होस्टेलवरून एका मुलाने आंगनमधे येत सगळ्यांसमोर दिल्याला निरोप सांगीतला...
"तुझ्या घरून फोन आला होता... सुरेखाच्या घरच्यांनी ताबडतोब होकार दिलेला आहे..."
बेफिकीरजी किती वाट बघायला
बेफिकीरजी किती वाट बघायला लावलित या भागाची?? आता वाचते.
यावेळी मी
यावेळी मी दुसरा.....................
अरे मेरा नंम्बर कब आयेगा?
अरे मेरा नंम्बर कब आयेगा?
वाचक नं.४
वाचक नं.४
बेफिकीर, तुम्ही नविन लिखाण
बेफिकीर, तुम्ही नविन लिखाण पोस्ट केलंत की एक कंपाऊंडरसुद्धा पोस्ट करा नंबर लावायला आलेल्यांचे नंबर ठेवायला आधी नंबर लावायचा मग डॉक्टरला भेटायचं तसं, आधी नंबरासाठी पळापळ मग वाचन
मस्तच....
मस्तच....
मला पहिली येवुन वाचण्यापेक्षा
मला पहिली येवुन वाचण्यापेक्षा वाचण्यात इंटरेस्ट आहे. त्यामुळे जे कोणी कंपाउंडर साहेब आहेत त्यांनी मला दुर्लक्षिल तरी चालेल
बेफिकीर, थोडीशी लांबी वाढवली असती तरी चालली असती. आणि एकदम अचानक दिल्याच्या आईने केवळ एका सहाध्यायाच्या सांगण्याखातर मुलावरचा सगळा राग विसरुन त्याचे सगळे गुन्हे माफ करुन लग्न जमवण नाही पटल. अर्थात हे माझ मत. पण वेग कायम ठेवलात.
अश्वीनी
अश्वीनी
बेफिकीरजी खुप दडपण घेवुन
बेफिकीरजी खुप दडपण घेवुन (प्रतिक्रियांच) लिहित असाल तर तस नका करु. तुम्ही चांगलच लिहिता त्यामुळे लिहित रहा, पुलेशु
बेफिकीरजी, खरोखरच हाही भाग
बेफिकीरजी,
खरोखरच हाही भाग खुप छान झाला आहे.
स्वराली, माझं लिखाणाबद्दल
स्वराली, माझं लिखाणाबद्दल काही म्हणणं नाहिये गं. फक्त नंबरासाठी चाललेला आटापिटा पाहून मजा वाटली म्हणून वरची पोस्ट टाकली
सर्वांचे मनःपुर्वक आभार!
सर्वांचे मनःपुर्वक आभार!
स्वराली - जमेल तसे लिहीत आहे. कृपया चुका दाखवत राहावेत.
-'बेफिकीर'!
किंवा टोकन इश्यू करायचे
किंवा टोकन इश्यू करायचे सवडीने वाचूया.
बेफिकीर, तुमच्या ह्या
बेफिकीर, तुमच्या ह्या कादंबरीचा पुढचा भाग कधी येतो याची इतकी उत्सुकता लोकांना लागलेली असते की वाचायच्या आधीच प्रतिसाद देण्याचा खटाटोप करतात लोक
असो. हा भाग पण आवडला
मंदार, धन्यवाद! तशी
मंदार,
धन्यवाद! तशी उत्सुकता असते हे मी खरे मानत आहे व ती कोंप्लिमेंट समजत आहे. स्वार्थीपणे!
-'बेफिकीर'!
अरे पण ते लिखाण कुठे पळून
अरे पण ते लिखाण कुठे पळून जातं का? की रेशनवर आलेलं रॉकेल आपला नंबर येईपर्यंत संपून जाईल म्हणून टँकर यायच्या आधीच दगड लावून ठेवल्यासारखं करायचं? हेच असं नाही, कुठलंही लिखाण आपल्या पद्धतीने नीट आस्वाद घेऊन वाचावं आणि मग प्रतिसाद द्यावा. लिखाणाची उत्सुकता असेल तर लिखाण पोस्ट झाल्या झाल्या उघडून वाचलं जाईल आधाशासारखं, प्रतिसादांचे नंबर लावण्याची उत्सुकता असणं हे वेगळंच आहे.
असो
हे प्रतिसाद नंबर लावून देणं
हे प्रतिसाद नंबर लावून देणं हे ''बेफिकीर'' यांच्या पर्यंत मी आपल्या लेखनाचा मोठा फॅन आहे व आपल्या लेखनाची कीती उत्सुकतेने वाट पहातो हे पोचवण्यासाठी केलेला अट्टाहास आहे.... मी तरी त्या साठीच करतो...... वाचणार तर आहेच... प्रतिसाद आधी दिला तर काय बिघडलं? प्रतिसाद लेखनावर नंतर देतो.
चलता है
चलता है
सहि चालु आहे कथा..... आवडली.
सहि चालु आहे कथा..... आवडली.
सहिच. चीअर्स.................
सहिच.
चीअर्स..................!!!!!!!!!!!!!!!!!१
मजा आ गया. आता दिल्याचे लग्न?
मजा आ गया.
आता दिल्याचे लग्न? नको हो
वसतिगॄहातील आनंद संपुष्टात येईल अशाने >>>
सरस...हा फराळ
सरस...हा फराळ आवडला.....गोड....
सावरी
व्वा!!! कधी पासुन वाट बघत
व्वा!!! कधी पासुन वाट बघत होतो ह्या भागाची...खुप खुप आवडला...सह्ही...दिल्याच्या लग्नाला बोलवा आम्हाला लवकर
तुफान वेग आहे या भागाचा.....
तुफान वेग आहे या भागाचा.....
अरे वा... मस्त आहे हा भागहि
अरे वा... मस्त आहे हा भागहि खुप आवडला...
या भागाचा शेवट तर खुपच आवडला.
बेफिकीर जी.......... रूम नंबर
बेफिकीर जी.......... रूम नंबर २१४ मध्ये अजुन काय कय होणार आहे याची उत्सुक्ता लागुन राहीली आहे.....
पु ले शु......
खुपच छान. कादंबरी एकदम जलद
खुपच छान. कादंबरी एकदम जलद गतीने जात होती पण मधेच हे प्रतिक्रीयेचे स्पिडब्रेकर आल्यामुळे कादंबरीला ब्रेक जरा जास्तच लागत आहेत. लेखणीची उंची वाढतेय पण लांबी कमी होतेय.
कैलास, मंदार, सनि, तृष्णा,
कैलास, मंदार, सनि, तृष्णा, सुरश, सावरी, सुमेधा, पारिजातक, पाकळी,
मनःपुर्वक आभार!
जुयी, या भागाचा शेवट नेहमीच्या भागांसारखा नकोसा नव्हता हे खरं आहे.
विद्या बालन,
रूम नंबर २१४ मधे भरपूर धमाल येणार आहे.
आपल्या सर्वांच्या प्रेमळ प्रोत्साहनाचे मनापास्न आभार!
-'बेफिकीर'!
मस्त !!!!!
मस्त !!!!!
काय जबराट भाडंण झालि बापरे
काय जबराट भाडंण झालि बापरे डोळ्या समोर अगदि सगळे प्रसंग उभा राहिला ......
आनि आत्ता तर काय मस्तच आईचि आनि मुलाचि भेट सुन्दर खुप आवडलि पुद्चा भाग लवकर येउ देत वाट पाह्त आहे
Pages