बेडूक

Submitted by ट्यागो on 2 October, 2010 - 02:29

झोप उघडली तेव्हा न जाणे किती काळ उलटला होता. जे काही विसरायचे होते ते सगळे एक स्वप्नात परावर्तित करून विस्मृतीत गाडायच्या हेतूनेच झोपलो होतो. आणि आता एखाद्या विचित्र भयानक स्वप्नातून जाग आल्यावर जी अंगभर विषारी कळा पसरलेली असते तसलाच प्रकार झाला होता माझ्याबाबत. सगळ्या इंद्रियांनी असहकार पुकारला होता. नेहमीचीच नाटकं साली. आताशा सवय होऊन जायला पाहिजे होती मला या सगळ्याची पण शरीराचे आणि सवयींचे वाटते तितके देणे-घेणे नसतेच.

खुर्चीतल्या त्या अवघडलेल्या अवस्थेतून उठलो आणि घड्याळात बघितले. झोपून जास्त वेळ झाला नव्हता. २-३ तास फक्त. भरदुपारची वेळ असूनही बाहेर अंधारले होते. मी खिडकीतून खाली बघितले. पाऊस भुरभुरत होता. मी लगेचच घराबाहेर पडलो. मला तो पाऊस हवा होता. मला स्वच्छ व्हायचे होते. पुन्हा शोधायचे होते. पण बाहेर आलो आणि ४ पावले चाललो असेन इतक्यातच पाऊस थांबला. रस्त्यावर ठिकठिकाणी डबक्यांची घरटी मोडून पडली होती. म्हणजे त्या झोपेने फक्त माझा पाऊसच स्वप्नात बदलला होता. बाकी सगळे तसेच ठेऊन.
अंगावरती ४-२ ओले थेंब पडले असतील कदाचित. तेवढेच. साला बेडूक सुद्धा जास्त मुततो यापेक्षा आणि मला भिजायचेच होते. पावसाबरोबर रडायचे होते माझ्याही नकळत. मिठाच्या खड्यासारखे झिजत झिजत विरघळून जायचे होते. मग मी बेडूक शोधायला लागलो. साल्या शहराच्या या असल्या ओंगळ हवेत बेडूक सुद्धा मरून जात असावेत. पण तेही बरेच आहे म्हणा. नाहितर त्यांना खात साप सोकावले असते सगळीकडे आणि त्यांच्या त्या पाप फेडताना गळून पडलेल्या कातींच्या चिंध्या... साप असतील तिथे जगूच शकत नाही मी. केवळ त्यांना मारण्याइतपत गांडीत दम नसल्याने, दुस-यांनी त्यांना मारून आपापली मर्दानगी सिद्ध केलेलीही पटत नाही मला. माझ्या मनातल्या प्राण्यांविषयीच्या so called कळवळ्याचा उगम तिथेच असावा. बहुदा. Maybe. I am not sure. maybe आणि sure मधला फरक शेवटचा लक्षात आला त्याला किती वर्षे उलटली असावीत?

स्वत:शी असलेच काहितरी बरळत मी लांब चालत आलो. शहर संपून पुढच्या २० वर्षात जिथे शहराचा मध्यभाग असेल असल्या ठिकाणी पोहोचलो होतो. मधे पसरलेला लांबलचक, आडवारुंद हायवे आणि दोन्ही बाजूला पडिक जमीन. या शेताडीत शेती करणे द्वापारयुगातच बंद झाले असावे. तेव्हा जंगल असावे तिथे. त्यांची मुळं खोलवर कुठेतरी वाट पाहत असतील कधीतरी त्यांनाही सगळ्या आठवणींतून मोकळं करण्याची. आता ओस पडलेले मोकळे शेताड आणि खोलवरची मुळांची थडगी. नकोय मला यातले काहीही. खरच. आणि बाहेर कसे काढायचे सगळे?

मी खूप आशेने वर बघितले. जत्रेतल्या गर्दीत एखादा महारोगी शिरला की तेव्हढ्यापुरती गर्दी हटून मोकळी जागा तयार होते, तशी मधेच ढगांची चादर फाटून निळा गोल तयार झाला होता. निळा रंग मला आवडतो. आभाळाचा. पाहिजे ते मिळत नसले की आशावादाला चटावून बसलेल्या मनाला किती नाजूकपणे कुरवाळतो तो. आशावादातली पोकळी. पोकळ आशावाद. तिथूनच सूर्य डोळे वटारून मला शिव्या देत होता. बाजूला ढगांची गर्दी. कुठे कुठे शेजारी आपली जत्रा साजरी करत. आधी मी त्या रोग्याच्या सवयीने ओशाळलो. पण मग सनकलीच माझी भेंचोद. तसाच तणातणा ढांगा टाकत मी बाजूच्या शेताडीत घुसलो. चिखल मला गिळायला तयारच होता. पण त्याच्यातही इतका दम नाहिये साला. घोट्याच्या वर मला गिळायची ताकद नाही त्याच्यात. तरी उगाच पायाला लुचायचे.धरण्याचा प्रयत्न करायचा...

जवळच एक मोठा खड्डा होता. त्यात उतरलो. कमरेपर्यंत पाणी साचले होते त्यात. सगळे गढूळ. तपकिरी रंगाची त्या पिकासो नाहितर गायतोंड्यांना समजणारी शेड धारण करून. यात काय विरघळणार मी? हे तर आधीच विटाळलेय जगभरच्या घाणीने. मग मला अशीच वर्गात बसून बसून मेंदूला चिकटलेली chemistry आठवली. संपृक्त द्रावणात अजून काही विरघळवायचे असेल तर उष्णता द्या वगैरे वगैरे. मग मी सपासप हात चालवायला सुरुवात केली. नंतर आडव्या तिडव्या लाथा. मला भिजवत नाहीस साल्या? हे घे! माझ्या या कपाळावरचे दोन थेंब रक्त पुसायला वेळ नाही तुझ्याकडे? हे घे! गेले वर्षभर त्या आयघाल्या दुष्काळात मेलेल्या आक्कीचा गर्भ वाढवतोय मी पोटात आणि तिला घोटभर पाणी पाजायला वेळ नव्हता तुझ्याकडे? हे घे अजून! ऐक हा आवाज. सप्प सप्प. डुबूक डुबूक नाही भडव्या! तो आवाज कधीच मेला लाख वर्षापूर्वी. त्या आवाजाला ऐकना-या कानांनाही पुरून आलोय मी कधीचाच. सप्प सप्प. त्या आवाजाची लयच माझ्या कानात फिट्ट बसली होती. सप्प सप्प. मारत राहिलो. हातापायांची कातडीच नाही तरी अंगावरचे कपडे फाटेपर्यंत. सप्प सप्प. शेवटी दमलो. तेव्हा थांबून बघितले. फक्त चिखल शिल्लक राहिला होता त्या खड्ड्यात. मारून बडवून वाफ करून टाकली होती त्या सा-या पाण्याची. मग ती वाफ उंचच उंच गेली. पार आभाळापलीकडे. कुठेतरी चुकून शिल्लक राहिलेल्या कोवळ्या मनाच्या थंडाव्याने तिचे ढग झाले. दाटून आले. आठवणींची एकच वीज कडाडली आणि माझ्या डोळ्यांवाटे पाऊस बरसू लागला. मुसळधार पाऊस. मधून मधून गर्जणारे हुंदके आणि अश्रूंचा अखंड वर्षाव. तो खड्डा परत कमरेपर्यंत भरल्यावर माझे डोळे सुकले.
मी त्या खड्ड्याच्या सपाट भिंतीवर चिखलाच्या रंगाचे इंद्रधनुष्य कोरत बसलो.

गुलमोहर: 

सुरेख आहे. छोटे आहे व खूप उलगडून न दाखवल्यामुळे अनेक ठिकाणी थांबून राहिलो. त्याबद्दल धन्यवाद.

विरेचनाचा (catharsis) हट्ट विचित्र गोष्ट असते. मनाची एक बाजू जेवढ्या जोराने तो हट्ट लावून धरते, दुसरी बाजू तेवढाच प्रतिरोध करत राहते. हे मानवी स्वभावातील एक सनातन द्वंद्व असावे. अश्या विरेचनातून काय साध्य होणार असते? ते केले नाही तर आपण निर्ढावलेले ठरू की काय अशी भीती वाटते का? स्वतःला संवेदनशील ठरवल्यावर त्यानुसार येणार्‍या अनेक 'जबाबदार्‍या' आपण एका कैफातच पेलतो. हा संवेदनशीलकैफ कधी थोडा उतरला (आणि, सुदैवाने, तो कधीतरी थोडातरी उतरतोच) की सणसणीत हँगओव्हर येतो. मग आपले आतले द्वंद्व सुरू होते, कारण आपल्याला तो catharsis सुद्धा तेवढाच नेत्रदीपक, भव्य (स्वतःसाठीच, इतरांसाठी नाही) पाहिजे असतो.
बर्‍याच वेळा वाटते की कैफात आपण स्वतःच ओढवून घेतलेल्या (हे क्रूर वाटेल) निराशा, हताशपणा यांचा कधीतरी कंटाळा येत असणारच ना. मग आपण इरेला पडून साचून राहिलेले धरण फोडण्याचा प्रयत्न करणार. (इरेला पडून संवेदनशील Happy ) कदाचित, उद्विग्नतेचा कंटाळा येणे हेच विरेचन असते. तो कंटाळा आला तिथेच आपले धरण फुटलेले असते असे वाटते. ती भव्य घटना नसल्याने आपल्याला कळत नाही. मग आधीच कोरडे झालेले धरण फोडण्याचा प्रयत्न. ते फोडले की समाधानाचे एक इंद्रधनुष्य आपले आपणच चितारायचे. पण ते कमनीय नाही, नुसतेच बाक आलेले आणि सतरंगी नाही, तर फक्त चिखलाच्याच रंगाचे.

परमिंदर, सुरेख लिहलंत. विरेचन, द्वंद्व सगळं पटलं.
पण इतका अट्टाहास का? निर्ढावलेले ठरू वगैरे भीती वाटणे योग्यच, पण केवळ हेच कारणही नसेल, कदाचीत याचं उत्तर कोणीच देऊ शकनार नाही.
बर्‍याचदा वाचला होता मी हा लेख पण आपल्या विवेचनामुळे बरेच काही समजण्यास मदत झाली, धन्यवाद.

तगमगणार्‍या मनाची अस्वस्थता आणि सगळ्याच जाणीवांचा विखार उतरला आहेसा वाटतो.

यात जगण्याचीच, ऐशी की तैशी' असे म्हणत आलेले शब्द आणि त्यांची धग जाणवतेय!

अस्वस्थ तरीही जबरॅट!

परमिंदर, लिखाणाचं चीज झालं माझ्या, आपला अत्यंत आभारी आहे.
अनुजा, अंजली, साजीरा, आपले मनापासून आभार!

भन्नाट लिहीलंय. Happy
निळा रंग मला आवडतो. आभाळाचा. पाहिजे ते मिळत नसले की आशावादाला चटावून बसलेल्या मनाला किती नाजूकपणे कुरवाळतो तो. आशावादातली पोकळी. पोकळ आशावाद. >> असे बरेच काही भारी आहे!

एक लिखाण, एक शैली म्हणून लिखाण चान्गले आहे (दोनचार शिव्या आल्यात त्या नस्त्या तरी आशयात फरक पडणार नव्हता - उलट त्या शिव्यान्मुळे ही वैचारिक अवस्था त्या त्या शिव्या उघड उच्चारू शकणार्‍या-सर्रास वापरणार्‍या वर्गाचीच आहे की काय असा आभास मात्र निर्माण होतोय, तो टाळता आला असता तर बरे झाले असते)
मात्र, एकूण लिखाणातून जे काही अस्वस्थ/असमाधानी, कुणावर तरी चिडावे-ओरडावे-रागवावे असे वाटूनही कुणावर हे करावे तेच न समजणार्‍या काहीश्या आन्धळ्या व बर्‍याचश्या निराशावादी चडफडीचे चित्रण केले आहे, ते मला "एक मानवी वृत्ती म्हणूण" मान्य होऊ शकत नाही
जर दुर्दैवाने, अशा मनस्थितीचा अनुभूती नव्हे तर प्रत्यक्ष अनुभव घ्यायची वेळ आलीच, तर मला नाही वाटत अनुभव घेणारा नन्तर काही अर्थपूर्ण सान्गायला शिल्लक रहात असेल. अन म्हणूनच, ज्यान्ना याचा अनुभव खूप लाम्बची गोष्ट अनुभूतीदेखिल नाही, त्यास अशा लिखाणाद्वारे मुद्दामहून ओळख करुन देणे मला काहीसे "भयावह" वाटते.
असो, ही माझी मते आहेत वा केवळ विचार आहेत.
ग्राह्य धरा वा गेलाबाजार विचारात तरी घ्या असा आग्रह नाही.

(दोनचार शिव्या आल्यात त्या नस्त्या तरी आशयात फरक पडणार नव्हता - उलट त्या शिव्यान्मुळे ही वैचारिक अवस्था त्या त्या शिव्या उघड उच्चारू शकणार्‍या-सर्रास वापरणार्‍या वर्गाचीच आहे की काय असा आभास मात्र निर्माण होतोय, तो टाळता आला असता तर बरे झाले असते)>>> विचारांच्या फ्लो मधे जे सुचले ते तसेच्या तसे लिहले. नंतर शिव्यांबाबत विचारही केला, त्या टाळून काही इतर शब्द बसताहेत का तेही पाहीले, पण शिव्यांना पर्यायी शब्द मुश्कीलच. त्या गाळणेही रुचेना(ती उद्विग्नता कुण्या वर्गाची नसून स्वतःचीच अन् ती व्यक्त होण्या पर्यायी शब्द मराठीत तरी नाहीत/नसावेत) म्हणून ठेवल्या.

ते मला "एक मानवी वृत्ती म्हणूण" मान्य होऊ शकत नाही>>> यात फॅन्टसी वाटतेय? पण मालक मुळात काही गोष्टी अनुभुतींवर असतात अन ही आहेच. ही मानवी वृत्ती आहेच! इथे प्रश्न अनुभव्/अनुभुतीचा आहे, जो प्रत्येकास येईलच असे नाही. पण वृत्ती म्हणुन मान्य न करण्यात काय हशील? की मि जाणलेच नाही, अनुभवलेच नाही मग हे तसे असूच कसे शकते? हे चुक!

जर दुर्दैवाने, अशा मनस्थितीचा अनुभूती नव्हे तर प्रत्यक्ष अनुभव घ्यायची वेळ आलीच, तर मला नाही वाटत अनुभव घेणारा नन्तर काही अर्थपूर्ण सान्गायला शिल्लक रहात असेल. अन म्हणूनच, ज्यान्ना याचा अनुभव खूप लाम्बची गोष्ट अनुभूतीदेखिल नाही, त्यास अशा लिखाणाद्वारे मुद्दामहून ओळख करुन देणे मला काहीसे "भयावह" वाटते.>>>
काही अंशी मान्य. पण हेही व्यक्तीसापेक्षच.. एकट्या आपल्या वा माझ्या मताने फारसा फरक नाही पडणार.
(अन् अर्थात हे आपले वैयक्तीक मतंच, पण "भयावह" शब्द टोचला म्हणून.)

कांदापोहे, आशूडी, limbutimbu, गिरीश कुलकर्णी आपणा सर्वांचे आभार!

शिव्या ही कुणा एकाच वर्गाची-वर्णाची मक्तेदारी नाही. विशिष्ट परिस्थितीतल्या मानसिक अवस्थेचे सादरीकरण आहे ते- त्यात शिव्या आहेत म्हणून बोंब ठोकणे, हे मूर्खपणाचे आहे.

मयूरेश तू एका अक्षराचा देखील बदल करू नयेस, असं वाटतं. कलाकृती होतानाच्या कळा सोसल्यानंतर कलाकाराने त्रयस्थ व्हावे हे उत्तम. कुठचंही स्पष्टीकरण अजिबात गरजेचं नाही. वरती आले तसे निरर्थक परिच्छेद येतच असतात. आपण त्याकडे दुर्लक्ष करावे.

जबरदस्त आहे, अत्यंत थेट आणि विश्लेषणाच्या फंदात न पडता नुसते अनुभवावे असे.
तरीही, परमिंदरचे विवेचनही प्रचंड आवडले.
साजिर्‍याला अनुमोदन, कशातही बदल करु नकोस, स्पष्टीकरण तर नकोच नको.

मयुरेश, मला जे "काहीतरी(च)" सान्गायचे होते, त्याचा आशय तुमच्यापर्यन्त व्यवस्थित पोचला आहे असे तुमच्या स्पष्टीकरणात्मक पोस्टवरुन कळते Happy
अर्थातच, माझ्या प्रतिसादावरील तुमच्या प्रतिसादाकरता धन्यवाद Happy
मतमतान्तरे असणारच, ती व्यक्तिसापेक्ष असतात. ज्याला जेवढ झेपेल, तेवढच तो वाचू शकेल, व या अर्थी मी वरील आशयासारख्या गोष्टीन्चा वैचारीक ताण फारसा सहन करु शकत नाही हेच खरे, व ते मी संयत शब्दात तुमच्यापर्यन्त पोचविले!

>>> विचारांच्या फ्लो मधे >>>>> (ती उद्विग्नता कुण्या वर्गाची नसून <<<<<
वर्ग हा मी केलेला शब्दप्रयोग, अन कुणीतरी त्याबरोबर जोडून घुसडू पहात असलेला वर्ण या शब्दप्रयोगातील फरक आपणास चान्गलाच ज्ञात असावा, अन्यथा आपणही वर्गाबरोबरच लगेच "वर्ण" घुसडला अस्तात.
हा मजकुर नक्कीच पटला, म्हणूनच मी आधीच, केवळ "टाळता आले असते" अशी शब्दरचना केली होती
टाळता आले असते, असे म्हणणे म्हणजे लगेच आहे ते खोडा/बदला असा होत नाही हे आपणहि जाणताच! अन ताकाला जाऊन भान्डे लपविण्याची माझी पद्धत नसल्याने, जर काही बदला असे सान्गायचे असतेच, तर अगदी सु:स्पष्टपणे तसे लिहीले असते हे निर्विवाद सत्य!

>>>>ते मला "एक मानवी वृत्ती म्हणूण" मान्य होऊ शकत नाही>>> यात फॅन्टसी वाटतेय? <<<<
वरील सर्व लेखनाची रचना, ही मी मनुष्याच्या तत्कालिक अवस्थेतून आलेल्या भावभावनान्चे चित्रण आहे असे समजतोय, अन म्हणूनच, तत्कालिक अवस्था, अशी गरज नाही की दरवेळेस ती "नित्य वृत्ती" असेल. म्हणून तो "वृत्ती" हा शब्दप्रयोग केला असे, मात्र यास मी फ्यान्टसी अजिबात मानत नाही. हे विचार, अशी अवस्था कुणावरही प्रत्यक्षात आलेली असू शकते हे मला मान्य आहे. आणी म्हणूनच, असा जर प्रत्यक्ष अनुभव कुणाला आल्यास काय होऊ शकेल या भयकम्पित मनाने पुढील परिच्छेदातील वाक्ये लिहीली होति. "भयावह" हा शब्द टोचणे सहाजिक आहे, मात्र मला ते तसे का वाटले याचे विवरण देण्यास स्वतन्त्र धागाच उघडावा लागेल. त्यातुनही, माझ्या नजरेसमोर एक विचार असा दिस्तो हे की, जशी अनुभवान्ची पुनरावृत्ती ठराविक कालाने होत असते असे अनुभवास येते, तसेच जर मानसिक अनुभुतीची पुनरावृत्ती प्रत्यक्ष अनुभवात झाली तर काय? हे समजायला, छोटेसे उदाहरण, हॉरर फिल्म बघितली असता, सामान्य माणूस नन्तर रात्रीचा एकट्याने बाथरुमला जायला देखिल बिचकतो व काही काळ पर्यन्त तरी ती फिल्म जरी फ्यान्टसी असली तरी त्याचे मनात घर करुन रहाते. बाथरुममधील एखाद्या सावलीने देखिल तो दचकू शकतो....! वगैरे वगैरे. असो.

************
बाकी, मी माझ्या त्या आधीच्या निरर्थक परिच्छेदान्मधून तुम्हाला "एका अक्षराचाही बदल करा असे दूरान्वयानेही सुचविले नसतानाही "व्यक्तिसापेक्षतेच्या नियमाप्रमाणेच कुणी सोम्यागोम्या प्रकाण्डपन्डीत" विनाकारणच धास्तावत असल्यास, त्यास माझा तरी नाईलाज आहे.
आणि मला आशा आहे की वरील उत्तर देताना कलाकृती होतानाच्या जेवढ्या कळा तुम्हाला झाल्या असतील त्याच्या सहस्रान्शाने देखिल कळा वरील स्पष्टीकरण द्यावेसे वाटल्यावर दिले गेल्याने झाल्या नसतील! आय होप सो, पण जर वरील स्पष्टीकरण देताना कसल्या त्या कळा येऊन तुम्हास दुखलेखुपले असल्यास मी त्याबद्दल दिलगिर आहे! Happy
स्वगतः आयला, कळान्बाबतचे हे नक्राश्रू थोडेफार तरी, त्या बिचार्‍या कवि अन त्यान्च्या कवितान्च्या वाटेलादेखिल आले तर??? Proud
पण हे तरी मी स्वगतात देखिल का बोलावे? कुणाच्या पोस्टीचा स्पष्टीकरण देण्यासाठी वा अजुन कसाही, उल्लेख करा वा अनुल्लेख करा, असल्या गोळ्यान्च्या फैरी झाडणारा "कम्पुबाज सम्राट" आहे का मी? नाही ना? तेव्हा पुरे कविन्ची काळजी अन बास हे स्वगत! Wink
स्वगत समाप्त
गोष्ट वाचल्यावर निर्माण उत्स्फुर्त अशा माझ्या भावना तुमच्यापर्यन्त पोचल्या, कळल्या, व ते तुम्ही मला कळविले! याबद्दल मात्र पुनःश्च धन्यवाद Happy
(ही पोस्ट मी दोनतिनदा भर घालत अधिक सुधारायचा प्रयत्न केला आहे)

मयूरेश तू एका अक्षराचा देखील बदल करू नयेस, असं वाटतं. कलाकृती होतानाच्या कळा सोसल्यानंतर कलाकाराने त्रयस्थ व्हावे हे उत्तम. कुठचंही स्पष्टीकरण अजिबात गरजेचं नाही. वरती आले तसे निरर्थक परिच्छेद येतच असतात. आपण त्याकडे दुर्लक्ष करावे.

सहमत.

limbutimbu,
आपण बुआ फारच त्रास करुन घेताय असे वाटते. Happy
हा लेख लिहताना मला जितक्या कळा नसतील आल्या त्याहुन कैक कळा आपल्याला आपला हा वरील परिच्छेद्/प्रतिक्रिया लिहताना आल्यात की काय? (चारदा पोस्ट/परिच्छेद्/प्रतिक्रिया संपादित केलीत म्हणून..)
बाकी चालुद्या आपले!

साजिरा, आगाऊ, दीप्स, मीन्वा, नितीनचिंचवड आपली प्रतिक्रिया अन् पाठींब्याबद्दल मनापासून आभार!
अन् limbutimbu, आपलेही!

मस्त लिहीलयस रे... हेवा वाटला तुझ्या शैलिचा... वाचल्या वाचल्या मनात आलं... साला भोसडीच्याने काय भन्नाट लिहीलय. मस्तच रे... पुलेशु!

ठाऊक असते सारे काही सारे काही दिसत असते
वाहण्यासाठी जन्मलेली एक जखम इमानाने वहात असते
...अशीही एक लढाई असते जिचा शेवट असतो पराभव
वाया जाण्याकरिताच घ्यायचे असतात
असे काही काही अनुभव.....
...........................................शिरीष पै

लिंबुजी आपला आदर राखुन सुचवावेसे वाटते कोणत्याही लिखाणात आशय महत्वाचा. भाषा ही माध्यम आहे.

मयुरेश, तु आता काहीही लिहलेस तरी असल एखादा का होईना खडा येणारंच.
चलता है, मागे ईलियटवर 'नी' म्हणाल्यात तसे, अनुल्लेख!

मयूरेश तू एका अक्षराचा देखील बदल करू नयेस, असं वाटतं. कलाकृती होतानाच्या कळा सोसल्यानंतर कलाकाराने त्रयस्थ व्हावे हे उत्तम. कुठचंही स्पष्टीकरण अजिबात गरजेचं नाही. वरती आले तसे निरर्थक परिच्छेद येतच असतात. आपण त्याकडे दुर्लक्ष करावे.>>>
प्रचंड अनुमोदन.

काय प्रतिक्रीया देउ? कळला असेही म्हणवत नाही. अनुभव आला आहे, असे तर मुळीच नाही.
नुसतेच वर वरची प्रतिक्रीयाही देता येत नाही. काहीतरी वेगळे, खदखदणारे आहे असे जाणवत रहाते.
परमिंदराच्या प्रतिक्रीयेने लेखाचा संदर्भ कळण्यास मदत निश्चीतच झाली.

Pages