Engineering.. काही आठवणी..

Submitted by Rohan_Gawande on 1 October, 2010 - 01:38

२००१ चा सप्टेम्बर महिना... पुण्यात माझ पहिलं पाऊल पडलं ते विश्रांतवाडीत, नाव फारच विचित्र वाटल, पण नंतर 'हडपसर', 'स्वारगेट' अशी नाव ऐकल्यावर हे नॉर्मल वाटल, असो!!... दादानी सांगितलेला पत्ता मी ऑटोवाल्याला दिला, पण त्यांनी मला एका भलत्याच सोसायटी च्या गेट वर सोडून धूम ठोकली.. मी ऑटोतून उतरलो तेव्हा 'दोन मोठ्या suitcase आणि भली मोठी गादी घेऊन' माझा अवतार फारच वाईट होता, आईनी सुद्धा एवढी मोठी गादी पाठवली, की जणू पुण्यात गाद्यांचा दुष्काळच आहे, सकाळचे जेमतेम 9 वाजले होते.. सोसायटीच्या गेटवरचा वॉचमन मला असा ताडत होता जसं सामान मी कुठून चोरूनचं आणलय... मी त्याला गादीमध्ये बॉम्ब नाही याची खात्री पटवून दिली आणि गादी गेटजवळ ठेवून दादाशोध सुरु केला... त्या काळी mobile हा प्रकार आमच्याकडे नसल्याने माझी बरीच वाट लागली , कुठेच दादाचा पत्ता लागत नसल्याने मी शेवटी धाडस करून, 'दार उघड' असलेल्या एका flat मध्ये शिरलो आणि त्यांना दादाला फोन लावून मागितला, त्यांचा रुपात मला देवच भेटला...

पहिल्याच अनुभवातून पुणे काही सोपे नाही याची थोडी जाणीव झाली, पुढे भाड्याने flat घेतला (आता कोण भाड्या हे विचारू नका) आणि आमचा engineering कॉलेजचा पहिला दिवस उगवला, कॉलेज बाहेरून दिसायला छान होत, कारण अजून आतल्या राक्षसी प्रवृत्तींची मला कल्पना नव्हती, कॉलेज मध्ये सगळे इंग्रजी बोलत असल्याने मी जरा बिचकून होतो, सिनेमात 'फक्त' पाहिलेल्या इंग्रजी शिव्या इथे मुल सर्रास देत होते... घाबरतचं मी आपली कोपर्यातली जागा पकडली आणि engineering नावाच्या ट्रेन मध्ये बसलो. नवीन ओळखी झाल्या, कळलं की दुरून दुरून मुलं शिकायला आलीत, तो हिंदी डायलॉग आठवला "मौत भी कीस कीस को कहा कहा से खीच के लाती हैं"...

lectures, practicals, submissions, M1,Mechanics असे जीवघेणे शब्द कानी पडायला लागले. ह्या सगळ्यात आमचं बसायचं, झोपायचं, जेवायचं आणि नाईट मारायचं ठिकाण म्हणजे आमच प्रिय हॉस्टेल... माझ्या सारख्या हॉस्टेल वर पडिक असलेल्यांना parasite म्हणतात हेही नवीन कळलं, आमच्यासारख्यांची कुठलीही एक रूम नसते, सगळ हॉस्टेल आमचंच समजून कुठेही झोपायचो... lecture bunk करून दुपारी झोपणे संद्याकाळी उठून बन मस्का अन दूध, रात्री कोणाच्या तरी रूम वर मैफिल, पूर्ण हॉस्टेलला ऐकू येईल अशा आवाजात गाणे, आणि मग अभ्यास करत झोपी जाणे, सकाळी पुन्हा आंघोळ करायला स्वच्छ बाथरूम शोध... हॉस्टेलची आणखीन एक खासियत म्हणजे इथला डब्बा, त्या डब्याच्या वरणात रोज नवीन प्रकारच्या झाडांची पानं दिसायची, आमच्यातला एखादा जो महाग डबा बोलवायचा, त्याच्या डब्यातही सगळे जण 'फक्त taste करायला म्हणून' तोंड मारायची आणि ते पोर उपाशी राहायचं...
आमचा प्रवास मस्त सुरु झाला होता, सगळेच तसे मित्र होते पण तरी कॉलेज मध्ये, local आणि हॉस्टेलाईट असे दोन नकळत group पडले होते, आणि त्यातल्या त्यात आमचा group म्हणजे professors च्या डोळ्यात सदा खटकणारा...

आमचा एकदम झकास group झाला होता, तसं पूर्ण होस्टेलच ओळखायच पण तरी आमचा एक १५ जणांचा group खास होता... प्रत्येक क्लास मध्ये आमच्या पैकी कोणीच पहिल्या ३ बेंचेस वर नव्हत बसत, आमची engineering पूर्ण होई पर्यंत कोणत्याही professor नी आम्हाला ओळखू सुद्धा नये हीच इच्छा असायची, पण तरी आमचं सुख त्यांना कधीच बघवलं नाही. आमच्यातला प्रत्येक जण आपलं डोक engg subjects पेक्षा आपापल्या आवडीच्या क्षेत्रात वापरण्यात फार इच्छुक होतं. असाच माझा एक मित्र रवी, याला का कुणास ठाऊक पण इंग्लिश dictionary च वेड होत, ग्राफिक्स पासून electrical पर्यंत प्रत्येक lecture ला हा पठ्ठ्या लास्ट बेंच वर बसून vocab practice करायचा, एक दिवस विनाकारण याच्या जीवावर उठून ग्राफिक्स च्या lecture मध्ये त्याच्या वही मध्ये आमचे सर डोकावले आणि त्याची पूजा करायला त्याला समोर घेऊन गेले, पुढचे १५ मिनिट सरांनी त्याला तू या जगात येऊन किती मोठी चूक केली ते मराठीत मनसोक्त पटवून दिलं, इतक सगळ बोलून याच्या चेहर्यावरची रेघ सुद्धा बदलत नाही हे पाहिल्यावर ते आणखीन भडकले आणि त्याच्या जवळ जाऊन ओरडायला लागले, हे सगळ अंगावर येत आहे हे पाहून आमचा रवी हळूच म्हणाला, "सर i dont understand Marathi", पूर्ण क्लास पोट धरून पोटातच हसला...

पोरांची डोकी सुद्धा अजब होती, कोणी हातात दिवसभर पुस्तकं घेऊन फिरायची पण result आला की "गम" मे हातात बाटली, तर कुणी पुस्तक हातात न घेता first क्लास घ्यायचे, आमच्या group मध्ये जवळपास सगळेच ४० च्या race मध्ये लागले असत, बास ४० मिळाले की देव पावला, ४१ आले तर first क्लास चा आनंद, आणि चुकून ५० च्या वर आले तर university top केल्यासारखे छाती ठोकून आम्ही फिरायचो.

आमची branch जरी इलेक्ट्रोनिक्स असली तरी कोणालाही त्याच्या practical मध्ये उत्साह नसायचा, कुठल्या वायर मध्ये इतका current असेल आणि इतक voltage असेल म्हटलं की आमच्या तोंडावर बारा वाजायचे, एकदा आमच्यातल्या एकाला, सरांनी कुठलस circuit दिलं आणि म्हणाले क्लास ला explain कर, ते कारट म्हणतं, "सर पेहले तो याहासे बिजली बहेगी, फिर वो यु यु होके याहासे जायेगी"; आमच्या सरांनी डोक्याला हात मारला.. आमच्या हिरोनी current आणि voltage असा भेदभाव न करता, सरळसोट बिजली म्हटलं, आणि मग त्याच्यावर बिजली पडली.

हॉस्टेल मध्ये संध्याकाळी मस्त वातावरण होऊन जायचं, थंड हवा, नुकतीच झोपेतून उठलेली पाखर रूम्स मधून बाहेर यायची, मग कोणी निवांत कट्ट्यावर बसून गप्पा करत, कोणी चहा प्यायला निघत, कोणी आपल्या डमबेल्स काढून व्यायाम करत, तर कोणी आमच्या श्याम्या सारख फोनला चिकटून तिच्याशी बोलण्यात अगदी रंगून जात, संध्याकाळ अजून एका गोष्टीची आठवण करून देते, ते म्हणजे सिनेमे, हॉस्टेल ला दर तीन महिन्यात एक तरी सिनेमामुळे वेड लागायचं, मग तो 'तेरे नाम' असो वा 'देवदास', RHTDM किंवा स्वदेस, देवदास नंतर तर जणू प्रत्येक गोष्ट चुन्निबाबूच्या भाषेत होत होती, द से दर्द, द से दुनिया, द से दोस्ती भी होती हैं रे आणि मग मोठ्ठा हशा...

होस्टेल असो किंवा आमचा flat, परीक्षेच्या आधी सगळेच तहान भूक विसरून अभ्यास करायचे, रात्रीचे दिवस आणि दिवसाची रात्र व्हायची, मग ते exam आणि oral चे दिवस आणि मग यायचा नको असलेला result चा दिवस, आम्ही सगळे result च्या आदल्या दिवशी रात्रभर जगायचो, जणू उद्या मरण आहे अश्या भावनेनी, हव ते खायचं, हवा तो सिनेमा आणून बघायचा, ती रात्र म्हणजे जणू वादळापूर्वीची शांतता असायची, जसा जसा result चा तो वेळ किंवा काळ जवळ यायचा आम्ही एकमेकांना आधार देत "मेरा रंग दे बसंती चोला" गाण म्हणत result रूम कडे जायचो, आणि मग हळू हळू आमच्या त्या semester ची पापं उघड्यावर यायची. पण ते दुख किंवा सुख खूप वेळ टिकणार नसायचं, कारण तिथे कुणाला कधीही दुखी राहू न देणारे "मित्र" होते..

हळू हळू दिवस जात गेले engineering झेपायला लागल म्हणा किंवा पास व्हायची कला आम्हाला अवगत झाली म्हणा, पण हो हो नाही नाही म्हणता म्हणता आम्ही engineer झालो, खूप यातना झाल्या, बाकी universities सारख भरभरून percentage नाही आल, पण या काही वर्षांनी खुप काही दिलं, सगळ्यात महत्वाच म्हणजे चांगले मित्र, आणि कुठल्याही परिस्थितीत लढायची ताकत. कुठलीही गोष्ट आम्हाला आयती नाही मिळाली, इथे प्रत्येक गोष्ट आम्ही कमावलेली आहे आणि त्याचाच आम्हाला अभिमान आहे.
ह्या सगळ्या आठवणी वाचून मनात हसणाऱ्या तुम्हा सगळ्यांसाठीचं होता हा लेख. विसर पाडू नये म्हणून माझ्या काही लिहून ठेवलेल्या आठवणी.. Engineering च्या.. .

गुलमोहर: 

Engineering........... हा शब्दच वाचायला प्रवृत्त करतो मला नेहमी ...... बाकी लिखान छान !!!!

वाहवा... चांगल्या आठवणी रोहन...... आता नोकरी आणी जीवनातल्या पुढल्या वाट्चाली पेन डाउन करायला विसरु नको.

शुभेच्छा.

रोहण, आठवणी छान लिहल्या आहेत. मी कधी हॉस्टेल ला राहिलो नाही पण माझ्या कॉलेजच्या हॉस्टेलची मुलं म्हणजे खरोखरच विचीत्र प्राणी होते. गणपती, होळीच्या निमीत्ताने पुर्ण कॉलेजने (हो कॉलेजने, फक्त एका क्लासने नव्हे) कॉमन ऑफ घ्यायचा ठरवला तरी ही कार्टी लायब्ररीच्या निमीत्ताने कॉलेजमधे जायची आणि दोन तीन मुलांमधेच टिचर सोबत लेक्चर घेवुन आमचा एटेन्डन्स पर्सेन्टेजचा ग्राफ खाली उतरवायला मदत करायची.
सुट्टीवरून आल्यानंतर कळायचे की पोर्शन किती पुढे गेलाय ते.sad.gif

रोहन.. तुझे गावंडे आड्नाव पाहून जरा भितीच वाटली.. पण धन्स.. तु निराशा केली नाहीस.. खुप छान लिहीलेस..
पु.ले.शु..

व्वा रोहन...इंजीअरींग मध्ये मी होस्टेल लाईफ तर अनुभवलं नाही, म्हणुन माझ्या लेखमालेत पण ते आलं नाही Sad पण तुमच्या आठवणींने पुन्हा एकदा ती धम्माल डोळ्यांसमोर आली Happy
आमच्या वर्गात मुलं दहा च्या ब्रेक च्या आधीच म्हणजे पहिल्या लेक्चर मध्येच कोणा कोणाचे डब्बे खाऊन पोटोबाला सुरूवात करायची. असंच एकदा पहिल्या लेक्चरला एका मुलाला मॅडमने काही प्रश्न विचारला. पहिल्याच बेंच वर बसलेला पट्ठा..तरी तोंडातल्या घासामुळे त्याला बोलता येत नाहीये कळल्यावर अख्ख्या वर्गाची हहपुवा झाली Happy

ठकु Rofl

रोहण, छान लिहिलं आहेस!!!!!!!!
मी इंजीअरींगला असताना हॉस्टेलला राहिलो.माझ्या कॉलेजची local मुलंच विचीत्र प्राणी होते. कॉमन ऑफ घ्यायचा ठरवला तरीही हीच कार्टी कॉलेजमधे जायचीच.आणि submissions ला हॉस्टेलाईट च्या मागे मागे फिरायची.

धन्यवाद संदिप, डॉ. कैलास, प्रसिक, दिनेशदा, ठकू, सुमेधा, स्वप्ना_राज , चारुनिल... तुमच्या प्रोत्साहनासाठी...

हो नक्की डॉक्टर साहेब... आता जरूर मनावर घेतो लिखाण...

खर तर अजून अशाच खूप आठवणी आहेत engg च्या, पण म्हंटल रटाळ नको व्हायला, म्हणून थोडक्यात आटोपल...

रोहण, मस्त लिहिले आहेस.
नावाच्या ट्रेन मध्ये बसलो. नवीन ओळखी झाल्या, कळलं की दुरून दुरून मुलं शिकायला आलीत, तो हिंदी डायलॉग आठवला "मौत भी कीस कीस को कहा कहा से खीच के लाती
हे तर जोरदारच!