पाऊस आणि ती

Submitted by मंदार शिंदे on 25 September, 2010 - 14:58

"काय, ओळखलंस का मला? हो, तोच मी - ज्याची वर्षभर वाट पहायचास तू. माझ्या पहिल्या स्पर्शानं आनंदीत व्हायचास, नाचू लागायचास. आठवतंय का काही? यंदा झालंय तरी काय तुला? माझ्या येण्याची चाहूल लागली की लगेच दारं-खिडक्या बंद करुन घेतोयस. अरे, मन मोकळं करुन बोल की माझ्याशी. नेहमी बोलायचास तसाच... पुन्हा..."

डोळे उघडून मी बंद खिडकीकडं बघितलं. डोळे खरंच बंद होते का? झोप लागली होती? स्वप्न होतं की काय? की डोळे उघडे असून काही दिसत नव्हतं? बघायचंच नसेल तेव्हा डोळे उघडे असले काय नि बंद असले काय! ऐकायचंच नसेल तेव्हा कान उघडे असतील काय किंवा... नाही, कानांना ती सोय नाही. ते उघडेच नेहमी. म्हणून तर न बोललेलंही ऐकायला येतं ना... ऐकायचं नसलं तरी. जशी या पावसाची तक्रार येतीय कानांवर. का अर्थ लागतो आपल्याला, पावसाच्या सरींचाही? आपल्यालाच लागतो का? की इतरांनाही कळत असेल? कळत असला तरी आपल्यासारखाच कळेल, असं कसं शक्य आहे? ज्याचा-त्याचा अर्थ वेगळा, कारण ज्याचं-त्याचं ऐकणं वेगळं... पण...

...पण तिला कसा कळायचा नेमका तोच अर्थ - जो माझ्या मनानं लावलेला असायचा? तिला कसं कळायचं पावसाचं मन, माझ्याइतकंच? की माझंच मन ओळखायची ती? म्हणजे पावसाला मन नसतं का? नाही, नाही, पावसाला मन असतं, भावना असतात, भाषा असते, शब्द असतात – अगदी माझ्यासारखे...आणि तिच्यासारखेही. म्हणूनच तर तो बोलू शकतो ना माझ्याशी, आणि मी त्याच्याशी. जसं मी ऐकून घेतो निमूटपणे, त्याचं बरसणं रात्रभर, तसाच तोही समजून घेतो, माझा अबोला दिवसभर. बसून राहतो माझ्याशेजारी, उगीच आगाऊ प्रश्न न विचारता - अगदी ती बसायची तसाच.

का आवडायचं तिला असं बसून राहणं - माझ्या अबोल्यात तिचे उसासे गुंफत राहणं? बोलायला लागलो की थांब म्हणायची नाही. मीही थांबवायचो नाही, बरसणार्‍या पावसाला. झरझर कोसळून मोकळा-मोकळा होऊन जाऊ दे बिचारा! तिलाही असंच वाटायचं का - माझ्याबद्दल? या पावसाचं बरसणं आणि हरवणं, दोन्ही भरभरुन. अगदी माझ्या व्यक्त आणि अव्यक्तासारखं. दोन्ही कसं चालायचं तिला? का गप्प आहेस असं विचारायची गरजच नसायची तिला. मी तरी कुठं रागावतो या पावसावर? एकदा गेला की आठ-आठ महिने तोंडच नाही दाखवत, तरीही...

ती रागावली असेल का पण? नसावीच बहुतेक. रागावली असती तर आली असती शब्दांची अस्त्रं परजीत. अबोल्याचं ब्रह्मास्त्र माझं, तिच्याकडं शब्दांचा मोठा शस्त्रसाठा. तरीही ती गप्प राहिली. म्हणजे कळून घ्यायचा प्रयत्न करत असेल मला. मी जसा प्रयत्न करतो या पावसाला समजण्याचा. प्रत्येक सर वेगळी, हरेक वीज निराळी, अवघडच आहे नाही समजून घेणं?

...की समजलंय तिला, म्हणून गप्प राहिलीय? पण काय समजलं असेल तिला, मी समजावून न देताच? ... कोण हसलं? हा पाऊसच असणार खिडकीतला, "समजावून दिल्याशिवाय समजणारच नाहीत अशा गोष्टी आहेत आपल्यामध्ये?" हं, बरोबर आहे तुझं. कधी वेळच येऊ दिली नाही तिनं समजावून सांगण्याची. मग आज कुठून हा प्रश्न आला मनामध्ये? कसं समजलं असेल तिला?

घेऊ का त्याला घरात? सारखा खिडकीवर थपडा मारतोय. की नको, बाहेरच बरा आहे? आत आला तर आवरता येणार नाही. काय आवरता येणार नाही नक्की? बाहेरुन आत आलेला पाऊस, की आतून बाहेर झेपावू पाहणारा? दोन्ही वेगळे आहेत? की आतलाच पाऊस बाहेर जाऊन कोसळतोय? बघूयात तरी नक्की कोण आहे तो...

अहाहा, अत्तराची कुपी उपडी केलीय जणू धरणीवर. तिलाही वेडावून टाकायचा हा सुगंध. तिनेच तर शिकवलं होतं, हा सुगंध भरुन घेणं - ऊरभर. ती भेटण्याआधी कधी भेटला होता का आपल्याला हा गंध? अंहं, हा पाऊसदेखील बोलू लागला ती भेटल्यावरच. हा सुगंधही तिनंच सोडला नसेल ना मागं, तिची खूण म्हणून? तिच्यामुळंच जाणवणारा हा सुगंध आज कुठुन आला मग? हा या पावसानं आणलेला सुगंध नाहीये नक्कीच. माझ्या मनात खोलवर शिरुन एखादी कुपी नसेल ना पुरुन ठेवली तिनं? असली तरी मला थोडीच सापडणार आहे ती? इतक्या आत शिरायचं कसब तिचंच, माझं नाही.

याच रस्त्यानं यायची ती. नाजूकशी छत्री घेऊन न भिजण्याचं नाटक तिला आवडायचं नाही. एरवी इतरांची छेड काढणार्‍या या पावसाचीच फिरकी घ्यायची ती. नुकत्याच न्हालेल्या श्यामल तरुणीसारख्या सडकेशी प्रणयाराधन करणारा हा पाऊस, तिला पाहताच कावरा-बावरा व्हायचा. पावसाचंही मन कळायचं तिला. म्हणूनच मगाशी हसला ना तो, समजावून सांगितल्याविना कसं कळेल, म्हणालो म्हणून. तिच्यासाठीच बरसतोय का हा? पण... पण ती तर येणार नाही. कसं सांगायचं ह्याला? की हे कळाल्यानंच बरसतोय हा, वेड्यासारखा - माझ्यासारखा?

"काय रे, आज खिडकीतूनच बघतोयस. बाहेर नाही का यायचं?" खिडकीच्या अगदी जवळ येऊन विचारतोय हा पाऊस, अगदी कानात कुजबुजल्यासारखा.

"नाही, अजिबात भिजावंसंच वाटत नाहीये बघ आज. बाहेर आलो की तू भिजवूनच टाकशील, नाही का?"

मोठा गडगडाट करुन हसतोय हा पाऊस, "अरे, स्वतःकडं बघितलंयस का तू? मीही भिजवू शकणार नाही इतका चिंब भिजलायस तू आधीच... तिच्या आठवणींमध्ये..."

या पावसालाही कळायला लागलं की काय माझं मन? तिनंच शिकवलं असणार... नाही का?

http://aisiakshare.blogspot.com/2010/09/blog-post_24.html

गुलमोहर: 
शब्दखुणा: