"माझे मी"पण

Submitted by दाद on 23 September, 2010 - 00:33

"किती नाजुक... सुंदर आहे गं, कानातलं...." माझा स्त्रीसुलभ सौदर्यदृष्टीची प्रतिक्षिप्तं क्रिया!
"काल ना, नवर्‍याशी भांडण झालं...." नवरा किती म्हणजे किती हाताशी येतो त्याचं उत्तम उदाहरण देत माझी ऑफिसातली सखी. "...त्यात सध्या सासूबाई आहेत इथे. त्यामुळे साध्याच बोलाचालीला भलभलती वळणं लागतात...."
मला अजून कानातल्याचा आणि ह्याचा बादरायणही संबंध दृष्टीक्षेपात नाही.
"त्या चांग्लच वागतात गं... पण शेवटी लेकाचीच बाजू घेणार ना... कारणं काही नाहीत गं.... आता विचार करतेय तर अगदी क्षुल्लक वाटतय....
पण तेव्हा ना.... खरच.... वैताग आला काल...... काही नको. कुणाची बायको नको, कुणाची सून नको, आई नको... लग्नाआधीची मी.... तीच परत हवीये...." आता हळू हळू डोळे तरळायला लागले. मी अजून अनभि‍ज्ञच.
".... मग हे कानातले घातले... माझ्या लहानपणीचे आहेत.", अन हसलीही खुदकन.

बोलता बोलता दुसरी म्हणाली की, " हो गं.. हो. मी ना, असं वाटलं की, शाळेत जाताना आई घालायची तशा दोन वेण्या घालायचे....एकदम आपलं आपल्याला सापडल्यासारखं काहीतरी... "
एक एक करीत असलच काही काही निघालं. आपण असलं काही केलं किंवा करतो हे लक्षात येऊन हसलो आणि किंचित हळव्याही झालो.

हे "माझी मी" किंवा "माझा मी"पण किती आतली भावना आहे ते कधी कळतं? तर बायको, नवरा, सून, जावई, शेजारी, सहकारी, वरिष्ठं, कनिष्ठं असल्या संदर्भांमधून, "कुणाचं कुणीतरी" बनण्याच्या प्रयत्नात आपण छिन्नी-हातोडा घेऊन स्वत:ला घडवत (का बिघडवत) बसतो तेव्हा. कधीतरी हे आपलेच आपल्यावरले घाव सहन होत नाहीत, टरफलांमधून जगणं असह्य होतं अन..... एकदम "मी माझी" किंवा "मी माझा" ह्या आतल्या अनुभूतीसाठी आपण हे असलं काहीतरी करतो.
म्हणजे माझ्या सहकारी सखीनं केलं.
तुम्ही? तुम्ही केलय असं काही... आपल्यातल्या आपल्याला गवसायला, घट्टं धरून ठेवायला?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटलं काही दिवसांपूर्वी असं..... अगदी असंच.......... माझी मी हरवलीये..... पूर्णपणे....... काहितरी खूप गमावल्यासारखं.....
मग ठरवलं.......... बास....... सगळे गेले उडत......... म्हणजे... हा काय म्हणेल... हिला काय वाटेल.... असले विचार न करता स्वतःला जे वाटतं तसं वागायचं.... या विचारानंच निम्मी मरगळ गेली.........

मी भिन झाले की...

माय बोली वाचते Happy

आवडीची गाणी लावुन बसते.. कित्ती काय काय आठवत जातं.. मरगळ जाते... 'मी पण' सापडतं.

शेजारी २ बहीणी आहेत.. त्यांच्या लहान पणात माझं आणी बहीणीचं लहान्पण शोधते..

बल्कनीत उभीरहुन वारा झेलते अंगावर.. विचार करत बसते.. लहान्पण्चा.. आजी असतानाचे दिवस.. जुन्या घरचे दिवस..
शाळेत जातानाचा गॅस चा अवाज, पाणी उकळतानाची खळ्खळ.. पावसाचा आवाज..
नवा गणवेश घालुन शाळेत जाणारी मुले.. हे सगळं बघुन.. फ्रेश होउन जाते..

बुचाच्या झा डाजवळ येणारा वास.. निलगीरी चा वास.. पाउस पडुन गेल्यवरचा ....नव्या पुस्तकाचा वास.. विशिष्ट भाज्यांच्या फोडणीचा वास.. आंब्याचा वास.. नव्या साबणाच्या कव्हर चा वास.. हे सगळे वास घेउन रोजचं स्ट्रेस बस्टींग..

रोज थोडं थोडं शोधते.. नाही तर पार च हरवुन जाय्चे Happy

दाद, पहिल्यांदाच वाचलं हे ललित. माझ्या नजरेतून हे बहुधा सुटलं असावं............

मला वाटतं की मी आता माझा असा स्वतंत्र विचारच नाही करू शकत नवर्‍याशिवाय आणि मुलींशिवाय. पण माझी मला मी सापडायची असेल तर मी मनसोक्त एकटीच रडून घेते........

हल्ली मोठी मैदानं नाहीत. मुलांना खेळताना पाहून त्यांच्यात स्वत:ला शोधता येतं.

शक्यतो उदासी माझ्या वाटेला येत नाही. पूर्वी बालपण सुटत चालल्याची भावना किंचित बोथट होतेय. किती रोजच्या त्या घडामोडी..रोज अनेक प्रसंगांची मालिका अक्षरशः अंगावर धबधब्यासारखी कोसळत असते. घरी लवकर आलं कि मुलांचा अभ्यास घेणं, फिरायला नेणं.

मग यातून स्वतःचा शोध घ्यायला वेळ काढावा लागतो. एखाद्या रविवारी बालपणीचे मित्र जमवायचे आणि त्याच जुन्या मैदानात जायचं. मैदान अजून आहे. अजून लोक ओळखतात. त्यांच्या नजरेत अप्रूप असतं. मिळालेल्या यशाचं खरं कौतुक इथं होतं. मग क्रिकेट खेळायचा अयशवी प्रयत्न होतो. पूर्वीसारखा वेग राहिलेला नाही ना चेंडूवरची नजर.पण इथून फोडलेली काच, खेळायला आल्यावर समोर मुली येउन बसल्यावर चढणारा जोर.. सगळं सगळं आठवतं. सगळेच नॉस्टेल्जिक होऊन जातो. आमच्या प्रत्येकातला मी एकमेकांच्ञा बालपणानं बांधला गेलाय. कुणी यशस्वी झालं, कुणी अयशस्वी... पण आमच्या बालपणाने बांधून ठेवलंय आम्हाला घट्ट..

मैदान सोडताना जाणवतं... "मी" ला सोडून चाललोय पुन्हा बुरख्यांच्या दुनियेत !

Pages