शेक्सपीयर -एक वेगळा हृद्य अनुभव

Submitted by रेव्यु on 20 September, 2010 - 04:45

शेक्सपीयर-एक वेगळा हृद्य अनुभव
अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट.मनात दडून बसलेली एक सूप्त आशा मूर्तरूपास आली.१९८७च्या नोव्हेंबर मध्ये मला सर्व प्रथम विदेशी जायची संधी मिळाली.खूप काही शिकायला मिळाले,सुखद,नाविन्यपूर्ण अन अविस्मरणिय अनुभव आले.त्यातीलच हा एक.
माझा पहिला पडाव(तेंव्हा "कौन बनेगा करोडपती"प्रचलित अन लोकप्रिय होता,त्यातील हा वाक्प्रचार) लन्डन्. ही वारी मला पर्वणी वाटली.अनेक वर्षांपासून या देशाबद्दल,इन्ग्रजी भाषेच्या साहित्या बद्दल,इन्ग्रजी माणसाच्या "tongue in cheek" अन मिश्किल विनोद बुध्दिबद्दल( पी.जी.वोडहौस ते जेरोम के जेरोम पर्यंत्),बी बी सी च्या भरभक्कम्,(तेंव्हा तरी) नि:स्पृह रिपोर्टिंग बद्दल माझ्या मनात कुतुहल,कौतुक,अशा अनेक संमिश्र भावना होत्या.
या यादीत एक वेगळा विभाग होता शेक्सपीयर या महान नाटककाराचा.
शेक्सपीयर!!एक स्वयंपूर्ण असा इन्ग्रजी संस्कृतीचा वारसदार.याचे नाटक,त्याच्या आख्यायिका,त्याचे जन्मस्थळ Stratford upon Avon,त्याची प्रेयसी Ann Hathaway,त्याचे थियेटर्,मराठी रंगभूमीवर त्याचा प्रभाव्,अगदी कविवर्य कुसुमाग्रजांपर्यंत- या सर्वाबद्दल मला अपार जिज्ञासा होती अन आजही जागृत आहे.
यामुळे इंग्लंडच्या वारीत शेक्स्पीयरची वारी करायचीच हा संकल्प सोडला.जाण्यापूर्वी उपलब्ध साहित्य वाचन ,पुलंच्या अपूर्वाईची उजळणी आवर्जून झाली.
एका भल्या पहाटे सहा वाजता यूस्टन स्टेशन वरून स्ट्रेटफर्डला जाणार्‍या ट्रेन मधे चढलो.बाहेर आल्हाददायक गारवा होता.भरधाव वेगाने अर्ध्याएक तासात गाडी लंडन बाहेर पडली.मी किचन कार मधेच खिडकी बाजूची जागा घेतली. कंट्रीसाईड क्वचित लाभणार्‍या लख्ख उन्हाने न्हाऊन निघाली होती.लांब लचक हिरवळी,कलत्या छतांवरील लाल चुटूक कौले,कलरव करीत वाहणारे झरे अन ओढे,त्यांच्या काठा काठाने जाणारे सायकलींसाठी बनलेले पायरस्ते,त्यावरील छोटे पूल(यांना लवर्स ब्रिज म्हणतात हे नंतर कळले),गायी मेंढ्यांचे कळप,टुमदार चर्चेस असा हा नयनोत्सव माझ्या भाग्यास त्या दिवशी लाभला होता.प्रेक्षक वर्ग-दस्तूर खुद्द्,विदेशी प्रवासी (इंग्लंड बाहेरचे) ,गाडीतील बालगोपाल एवढेच.बाकी सर्व समवयस्क प्रौढ ब्रिटिश जनता वाफाळणार्‍या वर्तमानपत्रामागे डोके खुपसून बाहेरच्या सौन्दर्याक्डे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत होती. हा देखील एक वारसाच!!!हा वारसा आणि गुणधर्म मुम्बईकरांनी फर्स्ट क्लास लोकलच्या डब्यात तंतोतंत पाळला आहे!!!:)

माझा चहा व नाष्टा संपला अन बाहेर पाहिले तर स्ट्राटफर्ड स्टेशनात गाडी शिरत होती.जवळ जवळ अख्खी गाडी रिकामी झाली.३०० च्या आस पास शेक्सपीयरचे वारकरी तिथे उतरले.फक्त शेक्स्पीयरनामाचा गजर नव्हता एवढेच्,आश्चर्य एवढेच की या सर्व जंतेत मी एकटाच पन्चेचाळीशीचा.बाकी सर्व ६५-७० प्लस्.रंगीबेरंगी बुश शर्ट्,हाफ प्यान्ट्,काळा चष्मा,सुंदर ह्याट्स्,खांद्यावर क्यामेरे व दुर्बिणी,सहलीशी निगडीत गाईड बुक इ. जाम्यानिशी मंडळी उतरली.या सर्व नट्ट्यापट्ट्यास विसंगत फक्त हातातील काठी व चेहेर्‍यावरील सुरकुत्या .एक गोष्ट कॉमन -ती म्हणजे दुर्दम्य उत्साह.

स्टेशनपासून गाव २५ कि मी लांब आहे.लाईनीत उभे राहून ओपन टॉपच्या बसचे तिकिट घेतले अन वरचा मजला गाठला.तिकिट घेताना का कुणास ठाऊक -माझ्या मागे उभे असलेले वयस्क जोडपे माझ्यावर लक्ष ठेवून आहे व त्यांची नजर माझा पाठलाग करीत आहे असा भास होत होता,आमच्या बस मध्ये ३० लोकांचा ग्रूप झाला अन सहल सुरू झाली.

आमच्या गाईडीण बाई अत्यंत खेळकर पण तितकीच जाणकार होत्या. "गुड मॉर्निंग टू ऑल यंग शेक्सपीयर लव्हर्स टू हिज कंट्री "अशी प्रस्तावना होवून सहलीस सुरुवात झाली.

मग चालत्या बस मध्ये तो प्रदेश्,तिथली संस्कृती ,शेक्सपीयरची पार्श्वभूमी इ. माहिती तिने दिली.

याच सुमारास माझा भास खरा ठरला.माझ्याच ओळीत ते वयस्क जोडपे बसले होते,सत्तरी ओलांडलेले ते आजोबा आज्जी .ते माझ्याकडे पाहून स्मित करीत होते.फारसा न वापरलेला -बासनातून काढलेला किरमिजी सूट अन टाय धारण केलेले - या रंगीत जत्रेत थोडेसे विसंगत- ;सावरीच्या कापसासारखे शुभ्र पूर्ण मागे वळवलेले केस,साडेपाच फूटाच्या आसपास उंची ,रुंद कपाळ्,स्थूल पण कमावलेली बळकट शरीर यष्टी,चेहेर्‍यावर राजबिंडेपणा असे आजोबा.त्या तुलनेत वार्धक्याने थोड्या गांजलेल्या आजीबाई,मोठ्या फुलाफुलांचा ढगळसा फ्रॉक्,निळेशार मायाळू डोळे,चेहेर्‍यावर असंख्य सुरकुत्या,हातात भली थोरली पर्स्,अन चेहेर्‍यावर सदैव नोंदलेले एक प्रश्नचिह्न्,बसमध्ये चढताना आजोबानी आजीबाईंचा हात धरला होता,मोठ्या काळजीने अन कौतुकाने त्यानी कठड्यालगतची जागा पकडून दिली होती.या आजीबाईंना जर नऊ वारी साडी नेसवून्,कुंकू,अंबाडा वगैरे वेषात जर आपल्या लक्ष्मी रोड अथवा बुधवारात सोडून दिले असते तर त्या.च्या वर्ण ,कांती,डोळे वगैरे भांडवलावरून त्या नक्कीच दाते,लिमये अथवा सहस्त्रबुध्दे काकू म्हणून खपून गेल्या असत्या.असो!!

तर बस मध्ये चढता क्षणीच त्यानी मला पाहून स्मितहास्य केले अन पूर्ण दिवसासाठी नव्हे किंबहुना पूर्ण जन्मभरास साथ देणार्‍या सुरेल तारा जुळल्या-त्या अशा---

पहिला स्टॉप वाटेतल्या एका खेड्यात झाला.तिथे शेक्सपीयरचे बालपण जिथे व्यतित झाले ती शाळा,त्याचे घर्,त्याचा वर्ग,त्याचे बाक इ माहिती गाईडबाई देत होत्या.सगळ्याच सहलीप्रमाणे अतिउत्साही अन जिज्ञासू मंडळी तिच्या पुढेमागे होती.आम्ही शेपूटाप्रमाणे त्या जथ्याच्या शेवटास होतो.या स्टॉपवर उतरता क्षणीच या जोडप्याने माझा ताबा घेतला अन आपला परिचय करून दिला.ते इटलीहून आले होते.इटलीतील एका छोट्याशा गावात आजोबांचे मेक्यानिकल वर्कशॉप होते.दुसर्‍या महायुध्दात आजोबा आर्मीत टेक्निशियन होतें, नंतर वेस्पा कम्पनीत वरच्या हुद्द्यावरून सेवानिवृत्त झाले होते.मालकाचे ज्येष्ठ परममित्र.वय ७७.लग्नास ५६ वर्षे पूर्ण झाली होती् हे सर्व मोडक्यातोडक्या इटालियन मिश्रित इन्ग्रजीत,हातवार्‍यानी अन् सांकेतिक भाषेत चालले होते.साहजीकच वरील सर्व हकीकत सांगायला सहलीचा जेवणापूर्वीचा पूर्वार्ध लागून गेला.

या सगळ्या भानगडीत मला मात्र शेक्स्पीयरच्या जीवनातील इतर महत्वाच्या पाऊलखूणाना मुकावे लागले.त्याने नाटके लिहिली ती जागा,तो जन्मला ती खोली,त्याचे जुने थियेटर्,हे सर्व गाईडबाई उत्साहाने दाखवत होत्या पण या जोडप्याच्या साथीमुळे मला तिकडे लक्ष देणे अवघड होत होते.अन हळूहळू मला त्यांच्या सोबतीचा,सान्निध्याचा लळा लागत आहे याची गोड अनुभूती होत गेलीं, नंतर शेक्सपीयरची प्रेयसी अन त्याचे स्फूर्तीस्थान एना हेथावे हिची माहिती,प्रियाराधनाचा तो एवॉन वरील पूल इ दाखविण्यात आले अन लन्च ब्रेक झाला.

आता आजोबा आजी अन मी खूपच जवळ आलो होतो.आजोबाही "मी खूप जुना,निष्णात अन अनुभवी इन्जिनीयर आहे,मला युध्दात मेडल्स मिळाली आहेत," इ .अभिमानस्पद माहिती मला देवून बसले होते.त्या वेळेस आजीबाईंच्या चेहेर्‍यावर नवर्‍याबद्दलचा गर्व्,कौतुक ओसंडून वाहत होते.बाबाबदलचे प्रेम,इतक्या वर्षांच्या सहजीवनाबद्दल समाधान अन तृप्त भाव दुथडी वाहत होता,

मग आजी बाई सुरू झाल्या.आम्हाला पाच मुलगे अन एक मुलगी.त्यातील एक लंडनला मोठ्ठा वकील आहे,त्यानीच आम्हाला फर्स्ट क्लास ची विमानाची तिकिटे काढून आपले ऐश्वर्य व यश पाहण्यास बोलावून घेतले आहे,त्याच्या आग्रहाला नाही म्हणवेना इ. स्त्री सुलभ माहिती-आजोबा.च्या चेहेर्‍यावरील अढीस न जुमानता-मला पुरवली,एवढेच नाही तर त्याने स्थानिक ब्र्रिटिश मुलीशी लग्न केल्याची माहितीवजा नापसंतीही व्यक्त केली. खर तर मी इटालियन मुलगी पाहून ठेवली होती हे फक्त बोलायचे शिल्लक ठेवले होते.
मग माझी विचारपूस झाली.मुले किती?नोकरी कसली?बायको कशी अन कुठली?पगार पुरेसा का?अन कहर म्हणजे दोन मुलीच का -अरेरे ही खंत सुध्दा!!!! मधून मधून या वैयक्तिक प्रश्नांना आळा घालण्याचा आजोबांचा विफोल प्रयत्न.
या सर्व संभाषणात लंच दरम्यान आजोबानी अन मी बीयर पण घेतली .सकाळ पासून बस् मध्ये चढणे व उतरणे व चालणे या मुळे झालेली दमणूक या मुळे ते दोघेच काय -सर्व प्रवासीही थकले होते अन वर बहुतेकांनी घेतलेली बीयर्,त्यामुळे सर्वच सुस्तावले होते.उत्तरार्धात शेक्सपीयर च्या गावचा बाजार उरकताना हा वेग पाहून गाईडबाईनी"हे नेहेमीचेच आहे" हा "ता -शेरा" ही मारला. अन ही सगळी जत्रा तिथल्या शेक्स्पीयर चे नाटक प्रस्तुत करणार्‍या थेटर समोर अखेरच्या अध्यायासाठी उभी केली. ४ ते ५-३० पावेतो नाटक पहा-तुमच्या बसचा नम्बर ७ आहे-विसरू नका-सगळ्या बस सारख्या दिसतात्-चुकीच्या बस मध्ये चढू नका-(चुकल्यास जबाबदार नाही -एवढे वाक्य सोडून) बाई गायब झाल्या.आजोबा आजीना भाषेच्या प्रश्नामुळे बहुधा काहीच कळले नव्हते त्यामुळे मी त्यांचा करता करविता झालो.
थेटरातील वातानुकुलित हवा ,गुबगुबीत खुर्च्या,अंधार अन बरेच अगम्य इन्ग्रजी याच्या प्रभावाने सव्वाचार पर्यन्त अख्खे थेटर घोरू लागले अन ५-३० वाजता अख्खी जन्ता लाईट लागता क्षणी जागी झाली अन टाळ्या वाजवू लागली-ते टाळ्या वाजवतात म्हणून आजोबा आजीनी टाळ्या वाजवल्या -अन मी जरा उशीरा जागा झाल्यामुळे त्यांना पाहून मीही टाळ्या वाजवल्या.

माझ्या त्या मायाळू अन प्रेमळ सवंगड्याना घेऊन मी बस मध्ये चढलो,स्टेशन् वर ट्रेन आली.सगळेच सुतावलेले,पण तरीही त्यानी मुलाचा पत्ता अन फोन नम्बर दिला-आग्रहाचे निमंत्रण्-इटलीचे जास्त व लंडन् चे कमी( उघड कारणासाठी-सून???) दिले अन संभाषणास खिळ पडली-पुनः डोळे उघडले /गाडी युस्टन स्टेशनाच्या परिसरात प्रवेश करत होती.
उतरायच्या काहीच क्षण आधी मोठ्या अजिजीने अन काही संकोचाने मनाचा हिय्या करून आजीबाई मला विचारत होत्या

"मुला एक विचारू? गैरसमज करून घेऊ नगस!!!
हा शेक्सपीयर कोन व्हता रे बाळा???"

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

लंडनमधे असाल अजून तर ग्लोबमधे रॉयल शेक्स्पिअर कंपनीचे एखादे नाटक घडत असेल... ते जाऊन पहा.
शेक्स्पिअरचा थरार अनुभवायचा तर त्याच्या ग्लोबमधेच उभं राहून नाटक बघितलं पाहिजे. कॉमनर्स सारखं. Happy

मी किंग लिअर बघितलं होतं आणि तेव्हा तिथे खरोखर किंग लिअर पोचलं होतं माझ्यापर्यंत...

अनुजा
धन्यवाद(हे लिहिताना बिचकतो-आई शप्पत):)
Happy

नीधप
पुढच्या वेळी नक्की लक्षात ठेवीन.
परंतु माझ्या या वर्णनाचा रोख एक हृद्य"Human interest story"हा आहे.
त्या ट्रिप मध्ये शेक्स्पीयर हुकल्याची खन्त मुळीच नाहीये.
रच्याकने-ही आपबीती आहे-रीयल लईफ@@
Happy
शेक्स्पीयर हा इथे एक उखाणा आहे

त्या आजोबा आजींचा सहवास अन नंतर त्यांच्या घरी इटलीतील वास्तव्य Happy
ती एक दुसरी रम्य हकीकत
सम अदर टाईम!!!

नुसतीच टायपिंगची practice झाली म्हणायची!!!
मित्रहो काही तरी प्रतिसाद ,शिव्या सुध्दा चालतील!!
Sad

रेव्यु, मला आवडले हे लेखन. एवढ्या अप्रुपाची सहल सोडून त्या आजीआजोबांकडे आकृष्ट होणे, म्हणजे त्या दोघांत नक्कीच काहितरी होते.
अर्थात पुढच्या अनुभवाची वाट बघतोय. (ते शीर्षक तेवढे दुरुस्त करणार का ?)

"मुला एक विचारू? गैरसमज करून घेऊ नगस!!!
हा शेक्सपीयर कोन व्हता रे बाळा???">>> Rofl
वा वा रेव्यूजी, काय मस्त लिहिले आहे. तुमची लेखनशैली आवडली.

त्या आजोबा आजींचा सहवास अन नंतर त्यांच्या घरी इटलीतील वास्तव्य Happy
ती एक दुसरी रम्य हकीकत>>> लवकर येऊ द्या ही रम्य हकीकत Happy

आणखी काही प्रतिसादांची आतुरतेने वाट पाहातोय्.विशेषतः अश्विनीमामी,दाद्,अरुंधतीजी,मंदार आणि अनेक रसिक सहकार्‍यांकरून

,शेक्सपियर -एक हृद्य अनुभव'

रेबुजी छान म्हणजे मस्तच लेख लिहिलात .
भाषाशेली आवडली.छान अनुभव लिहिलात.
पुढच्या आठवणी वाचण्यासाठी उस्तुक..
थांबू नका .लिहिता हात नि गाता गळा .
वाट पाहतोय,

हा हा हा.... तुमचा अनुभव आगळाच होता म्हणा की! शेवटचा आजीबाईंचा प्रश्न लै खास! Happy

छान अनुभव व छान मांडणी.
[सूनबाईनी बहुधा दिवसभर सासू-सासर्‍याची कटकट नको म्हणून पाठवलं असणार त्याना ह्या सहलीवर ! इटॅलीअन आजीबाईना कां असावं म्हणतो मी शेक्सपिअरचं अप्रूप ! ]