काळा कुडा

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

काळा कुडा
kalakuda.jpg

आपण यापुर्वी पांढर्‍या कुड्याची ओळख करून घेतली आहेच. ( यालाच कुटज असे नाव आहे. यापासून कुटजरिष्ट हे आयुर्वेदिक औषध करतात. याच्या फ़ुलांची भाजी करतात. )
त्या पांढर्‍या कुड्याचा जंगलातला भाऊ म्हणजे हा काळा कुडा. पांढरा कुडा तसा विपुल असतो, पण त्यामानाने या काळ्या कुड्याची झाडे कमी दिसतात.
याची पाने भाल्यासारखी टोकदार साधारण दहा सेमी लांबीची असतात. खोड तपकिरी रंगाचे. झाड दहा मीटर्सची उंची गाठू शकते.

याची फ़ूले शुभ्र रंगाची पाच पाकळ्याची आणि आकाराने सुबक असतात. मधल्या पुंकेसराभोवती छोटे रिंगण असते त्याने फ़ुलाला वेगळाच उठाव येतो. पांढर्‍या कुड्याची फ़ुले उन्हाने पिवळी पडतात पण हि मात्र शुभ्रच राहतात.

kalakuda_zad.jpgkuda_D.jpg
फ़ुलानंतर या झाडाला एकाच देठावरून दोन नाजुक शेंगा लागतात. त्या साधारण फ़ुटभर वाढल्या कि एक शेंग वक्राकार होते आणि दुसर्‍या शेंगेला जाऊन चिकटते. रोमन D सारखा हा आकार होतो. हा बंध बराच दृढ असतो. असल्या रियुनियनचे दुसरे उदाहरण नसेल.
या शेंगा पुढे उकलतात आणि त्यातून रेशमासारख्या धाग्यात गुंडाळलेल्या बिया वार्‍यावर उडतात.

kalakuda_sheng.jpg
या झाडाचा चीक शुभ्र दूधासारखा निघतो. या चिकाचे काहि थेंब दुधात घातले तर दूध विरजून घट्ट होते पण आंबट होत नाही. कोकणात डोंगराळ भागात हि झाडे दिसतात. मी रामटेकलाही ही झाडे विपुल बघितली.

याचे शास्त्रीय नाव Wrightia tinctoria विल्यम राईट या स्कॉटिश वनस्पतीतज्ञाच्या स्मरणार्थ, ठेवलेले.

विषय: 
प्रकार: 

लहानपणी आई कुड्याचं पाळ(असं छोटंसं खोड) सहाणेवर उगाळून द्यायची. हल्ली जसं टॉनिक वगैरे देतात मुलांना तसं बर्‍यापैकी फ्रीक्वेन्टली द्यायची. पोटाच्या तक्रारींवर खूप उपयुक्त . परिणाम खूप प्रदीर्घ काळासाठी आणि कायमचा असतो.
आत्ता त्याचे झाड पहायला मिळाले. तुमचा बोटॅनिकल अभ्यास प्रचं ड दिसतोय.

आभार mmm333 तो पांढरा कुडा. भरपूर फुलतो तो, या दिवसात. ती फुले चार पाकळ्यांची, गुच्छाने येतात. त्याच्या फुलांची भाजी करतात. फुलांचे सांडगे पण करतात. आवर्जून खावी भाजी ती, पण हा कुडा वेगळा.

अभ्यास नाही हो, केवळ आवड.

कुडा. पांढरा व काळा. सुंदर छायाचित्र व माहिती. खाण्याजोगी तसेच औषधी वनस्पती. फुलांचे सांडगे कसे करतात?

पांढर्‍या कूड्याची फूले, या दिवसात भरपूर लागतात. हि फुले खुडून, पाण्यात उकळून घेतात. मग घट्ट पिळुन नुसत्या कांद्यामिरचीवर फोडणीला देतात. भाजी शिजली कि मीठ घालायचे. या भाजीला नैसर्गिकरित्याच सुगंध येतो.
सांडग्यासाठी हि फुले उन्हात वाळवतात. मग रात्री उघड्यावर ठेवतात. दवांने ती ओलसर झाली कि चुरुन त्यात तिखट, मीठ, हळद हिंग घालुन सांडगे करतात. ते तळून खाता येतात. यात ताक, मुगाची डाळ वगैरे घालूनही सांडगे करता येतात. पांढर्‍या कुडाच्या शेगाचीही भाजी करतात. आता पावसाळा सुरु झाला, कि या सगळ्या रानभाज्यांचे दिवस आलेच म्हणायचे.
मुंबईला ठाणे, बोरिवली आणि दादर भागात या भाज्या आवर्जून विकायला येतात, आणि ज्याना माहित आहेत, ते एकदातरी भाजी खाल्याशिवाय रहात नाहीत.