गर्दी चालेल; अपमान नाही..

Submitted by ठमादेवी on 10 September, 2010 - 05:54

‘सेक्स टॉइज, मसाजर, व्हायब्रेटर.. ओन्ली फॉर लेडीज.. अमुक अमुक क्रमांकावर फोन करा..’ नाही, हे आवाहन आम्ही करीत नाही आहोत.. ही अशी थेट आवाहनं हल्ली रेल्वेच्या लेडिज डब्यांमध्ये दिसून येऊ लागली आहेत. लैंगिक चाळ्यांकडे महिलांचं लक्ष वेधून घेणा-या जाहिरातींकडून आता त्यांना अशा गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या जाहिराती डब्यांमध्ये दिसू लागल्या आहेत. स्त्रियांबाबतच्या अश्लील आंबटशौकाकडून थेट धंद्याकडे असं या विकृतीचं रूपांतर सुरू आहे आणि ज्या रेल्वेत हे सुरू आहे, ते रेल्वे प्रशासन ढिम्म बसून आहे, त्यामुळे बायांनो, तुमचं तुम्हीच सावध राहिलेलं बरं!

रात्रीच्या वेळी जनरल होणारा महिलांचा डबा हा तर अशा विकृत मनोवृत्तीसाठीचं मोकळं कुरणच ठरू लागला आहे. नाइट शिफ्ट किंवा रात्री उशिरा कामावरून घरी परतणा-या बायका या डब्यात बसायला घाबरतात. शिवाय या डब्यांच्या भिंतींवर रंगरंगोटी केलेले प्रताप पाहून दिवसाही प्रवास करणा-या बायकांना कानकोंडं होतं. बरं, स्त्रियांच्या गुप्तांगांची चित्रं काढणारे, त्याचबरोबर आपल्याही गुप्तांगांचं प्रदर्शन करणारे हे काही उच्च कोटीचे कलाकार असतात, असंही नाही. अत्यंत असभ्य मनोवृत्तीचं दर्शन त्यांच्या या तितक्याच असभ्य आणि अर्वाच्य भाषेतून, कलाकारीतून दिसतं. रेल्वेमधून प्रवास करणा-या बायकांना नुसती लाज आणण्याचा नव्हे, तर त्यांना अपमानित करण्याचा हा प्रकार निरंतर सुरू आहे आणि रेल्वे त्याला आळा घालू शकलेली नाही, हे तर स्पष्टच आहे. ‘‘अनेकदा रेल्वे यार्डमध्ये गेल्यावर तिथे भिकारी किंवा रस्त्यावरची मुलं येतात आणि रेल्वेच्या डब्यात झोपतात. तीच हे प्रकार करत असावीत,’’ असं रेल्वे व्यवस्थापनाकडून सांगितलं जातं. पण रेल्वेच्या खासगी मालमत्तेत बाहेरचे लोक येऊच कसे शकतात, हा प्रश्न अनुत्तरित आहे. कुणी तरी बाहेरून येतं, काहीही करतं आणि राजरोसपणे निघून जातं? हा काय प्रकार आहे?

हा प्रकार कमी की काय म्हणून काही महिन्यांपूर्वी महिलांसाठी पुरुष मसाजर्स येतील, त्यांना हवा तसा मसाज करतील आणि त्यातून बायकांना पूर्ण ‘सॅटिसफॅक्शन’ मिळेल, अशी जाहिरातच लेडिज डब्यात लावली होती. त्यासाठी या बायकांनी म्हणे विशिष्ट क्रमांकावर फोन करायचा.. आणि हो, त्यांची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवण्याचंही आश्वासन.. ही जाहिरात वाचणा-या काही बायकांनी डोक्याला हात लावला. या जाहिरातीची नुसती हस्तलिखित पोस्टर्स नव्हती तर ती छापील होती, ‘अधिकृतपणे’ चौकटीत ठोकून चिकटवलेली होती. म्हणजे, हे सर्व रेल्वेच्या मर्जीनेच होतंय की काय, अशीही शंका व्यक्त केली गेली. त्यापाठोपाठ आता सेक्स टॉइजची ही हस्तलिखित जाहिरात डब्यांमधून झळकू लागली आहे.
रेल्वे प्रशासन या सगळ्याकडे का डोळेझाक करतं आहे? रेल्वेत काम करणारा महिलावर्ग लोकलने प्रवास करतच नाही की काय? त्यांच्या डोळ्यांवर या गोष्टी जात नाहीत? आपल्या वरिष्ठांच्या कानावर या गोष्टी घालून, प्रसंगी तक्रार करून अशा गोष्टी त्यांना टाळता येणार नाहीत का? रेल्वे हा सरकारी विभाग आहे. ‘तक्रार केल्याशिवाय आम्ही हलणार नाही,’ हा त्यांचा खाक्या.. पण रेल्वेने प्रवास करणा-या आपल्या महिलावर्गाला अशा गोष्टी कानावर घालण्याचं आवाहन केलं, तर तक्रारींचा पाऊस पडू शकेल! पण त्याला इच्छाशक्ती लागते. सकाळ-संध्याकाळ धक्काबुक्की करत, एकमेकींची उणीदुणी काढत आम्ही प्रवास करू. पण हे अश्लील लिखाण थांबवा. आम्हाला गर्दीत प्रवास करणं मान्य आहे, पण अपमानित होऊन नाही..

गुलमोहर: 

भयंकर आहे हे.. Uhoh पत्यांच्या बाजाराच्या तक्रारी ऐकल्या होत्या पण हि गोष्ट खरोखर भयंकर आहे. रेल्वे प्रशासन अश्या गोष्टींना परवानगी देतात याचीच खरोखर लाज वाटते. गर्दिने ठरवलं तर नक्कीच अश्या लोकांना त्या गर्दितच पायदळी तुडवता येईल. तुडवाच अश्या लोकांना अन अभिमानाने जगा.

कोमल, खरेच भयानक आहे हा प्रकार. यासाठी रेल्वे प्रशासनाकडे लेखी तक्रार करणे शक्य आहे. ती करावीच. यासाठी एकट्यादुकट्या महिलेने नव्हे तर समुहाने तक्रार करावी. रेल्वे प्रवासी संघटना आहेत. त्यांच्याकडे जाता येईल.
सध्या कुठलाही फोन नंबर गुप्त नाही. त्यामुळे त्या नंबर्सबाबत तक्रार, त्या टेलिफोन कंपनीतही करता येईल.
पुरुषांच्या प्रसाधनगृहात पण अश्या जाहिराती असतात, पण त्यांचे प्रमाण फारच कमी होते. (सध्याचे माहीत नाही)

म्हणून काही महिन्यांपूर्वी महिलांसाठी पुरुष मसाजर्स येतील, त्यांना हवा तसा मसाज करतील << काही वर्षापुर्वी सकाळ मधे सुद्धा छोट्या जाहिराती सदरात ह्या छापून यायच्या. मग अश्या काहि पार्लर वर पोलिसांनी छापे घातल्यावर सकाळ ने अश्या जाहिराती स्विकारणे बंद केले आहे. पण पुढारी, प्रभात सारख्या पेपर मधुन हे आजुनही येत असते.

या अश्या जाहिराती सर्रास सर्व वृत्तपत्रातुन येत असतात आणि तिथे हे सगळे उद्योग राजरोसपणे चालतात. मधल्या काळात बारबाला मोठ्या प्रमाणात अश्या मसाज पार्लर व्यवसायत स्थिरावल्याचे पेपरातच छापुन आले होते.
पण सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांना खजिल व्हावे लागेल अश्या जाहिराती आणि मजकूर छापणे हे निंद्यच आहे. पोलिसांनी याची रितसर दखल घ्यायला हवी. यार्डात असताना रात्रिच्या वेळी शक्यतो अश्या जाहिराती डब्यात चिकटवायची कामे दिली जातात. १००० पँप्लेटना ठराविक रक्कम दिली जाते. त्यामुळे रात्रिच्या वेळी काही टोळकी ह्या जाहिराती सर्व डब्यात चिकटवतात. जोडिला अश्लील चित्रे आणि मजकुरही लिहित असावेत. कधी गस्तीवरच्या पोलिसाने हटकले तर धुम ठोकायची नाहितर चिरिमिरी देऊन सटकायचे ही पध्दत.

मसाज पार्लरही कंप्लेंट आल्यावर तेवढ्यापुरती बंद होतात आणि हप्ते पोचल्यावर पुन्हा चालु. नाहितर हे उद्योग भाड्याच्या जागेत चालत असल्याने एकिकडुन हाकलले तर दुसरीकडे सुरु होतात. जागा बदलल्या तरी उद्योग तेच..... Angry

इथे सगळ्या गोष्टी हप्ते देऊन मॅनेज होतात............ कसे थांबवणार हे सगळे???? Angry

रेल्वेकडे तक्रार केल्यानंतर रेल्वे ही पोस्टर्स काढून टाकते आणि डब्याला नवा रंग फासते. हे गुन्हेगार काही रेल्वेच्या हातात सापडत नाहीत. काही जाहिरातदारांचं रेल्वेशी साटंलोटं असावं की काय, अशी शंकाही येते. बाकी रेल्वे यार्डमध्ये गेल्यानंतर तर आओ जाओ घर तुम्हारा अशीच परिस्थिती असते. त्यामुळे त्याला आळा घालण्याची जबाबदारी रेल्वे पूर्ण करेल अशी अपेक्षाच करणं चुकीचं.

कोमल, एक कल्पना सुचली.
आपल्या घरात जूनी रद्दी, मासिके असतात ना त्याचे तूकडे घेऊन जायचे. एखादा स्वस्तातला पण चांगला गोंद घ्यायचा. अगदी खळ करुन नेली तरी चालेल. या सगळ्या जाहिरातींवर हे चिकटवून टाकायचे. (या कामात कॉलेजमधल्या मुली नक्कीच मदत करतील.) त्याला भरपूर प्रसिद्धी द्यायची, चॅनेलवाल्यांना बोलवायचे. मग बघूया रेल्वे प्रशासन काय उत्तर देते ते.

Central Railway commuters can send their SMS complaints/suggestions to 90044 11111, while Western Railway’s number is 90044 77777.

बापरे! देशात ही परिस्थिती आलीये हे माहित नव्हतं.

ही सेक्स टॉईज वगैरे परदेशातही इतकी उघडपणे दिसत नाहीत्त. मग 'आपल्या देशात', 'ट्रेनमधे स्त्रियांच्या डब्यात' ते विकणार्‍या जाहिराती लावणं हे 'विकृतच' आहे. रोखलं गेलंच पाहिजे.
( एखादी विकृत गोष्टही सतत दिसु लागली, की तीच बरोबर तर नव्हे असं वाटु लागु शकतं. )

ही मनसे ची साईट आहे. त्याच्या तक्रार विभागाची लिंक: -
http://www.manase.org/maharashtra.php?mid=69&smid=26
* मी मनसेचा कार्यकर्ता नाही. पण मला ह्या साईटच्या ( आणि अर्थातच मनसेच्या ) उपयुक्ततेबद्दल चांगला अनुभव आहे.

दिनेशदा : कल्पना चान्गली आहे पण प्रत्यक्षात उतरणे कठीण...
भुंगा : मसाज पार्लर्स च्या असोसिएशन ने मध्ये हायकोर्टात एक केस केली होती... त्यात पोलिसाचे आमच्यावर छापे घालणे बेकायदा आहे, असा दावा केला होता... नशीब की कोर्टाने ती फेटाळून लावली...
आपल्या देशात स्त्रियान्चे जगणे मुश्किल आहे... एकदा यशवन्त नाट्यमन्दिरात एका कार्यक्रमाला गेले होते. तिथे लेडिज टॉयलेटच्या काचा फुटलेल्या... त्या कोणाच्या लक्षात आल्या नाहीत. सर्वात वाईट म्हणजे तिथला एक सफाई कर्मचारीच आत वाकून पाहत होता... त्याला जाऊन पकडले व बेदम चोप दिला...

दिनेशदा आयडिया प्रत्यक्षात आणायला बायकांना पण रात्री किंवा सुट्टीच्या दिवशी यार्डात जावे लागेल. रोजच्या गर्दीच्या दिवसात ऑफिसला जाताना हे गोंदेने चिकटवणे वगैरे अशक्य आहे. Sad

ऋयामची मनसे साईट आयडिया योग्य वाटते. काहितरी अ‍ॅक्शन घेतलीच जाईल आणि आपोआप मिडियाला कळेल. सामान्य प्रवाश्यांना आटापिटा नाही करावा लागणार.....!

काहितरी अ‍ॅक्शन घेतलीच जाईल आणि आपोआप मिडियाला कळेल.<<
मनसे ची आयडिया चांगली आहे, त्या प्रमाणे एका आय डी ने कट्ट्यावर चर्चे मधे एक उपाय सुचवला होता त्या प्रमाणे चेन मेल्स द्वारे मनसे, एखादे मिडिया चॅनेल च्या आणि रेल्वे , किंवा तत्सम आय्डी वर तक्रारीचा ईमेल लिहित रहायचे एकाच वेळेस सगळ्यांनी. चेन मेल पाठवायची आणि त्यात ह्या लोकांना (मिडिया / रेल्वे / मनसे) ह्याना ई मेल च्या मेलिंग लिस्ट मधे प्रत्तेक वेळेस प्रत्तेकने ठेवायचे

कोमल-
आपला आक्षेप यापैकी नक्की कशाला आहे? थोडी मुद्यांची गल्लत होते आहे का?

रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ कारभार
स्त्रियांसाठी उपरोल्लेखित टॉईज की जाहिराती? ( पुरूषांसाठी असली तर ते निंदनीय आहे की नाही ?)
स्त्रियांचा रोजचा प्रवास आणि ग्राफिटी
असल्या जाहिराती आणि छेडछाड
छेडछाड आणि शोषण

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=934...
(लिंक साभार- अरुंधती कुलकर्णी)

खरंच या प्रकारांना आळा घातला जावा म्हणून काहीतरी ठोस उपाययोजना व्हायलाच हवी आहे. बरोब्बर महिला वर्गाच्या डब्यांनाच अशा घाण व विकृत जाहिरातींसाठी निवडले जाते. किती तरी वेळा भिकारी, गर्दुल्ले, चरसी प्रथम वर्गाच्या महिला वर्गाच्या डब्यात राजरोसपणे घुसतात. बरोब्बर गर्दीची वेळ टाळून निवांत वेळी जेव्हा डब्यात कमी महिला असल्याने प्रतिकार होण्याची शक्यता कमी असेल त्या वेळा हे लोक निवडतात. त्यातूनही एखादीने आरडा-ओरडा केलाच तर डब्यातील बाकिच्याही बायका तिला सपोर्ट करतीलच असे नाही. मी स्वतः हा अनुभव खूप वेळा घेतलाय. कधी कधी बाजुच्या प्रथम वर्गाच्या पुरुष वर्गाच्या डब्यातील पुरुषांची मदत घ्यावी लागते अशा लोकांना महिला डब्यातून हाकलायला! पण बाई बाईला सपोर्ट करतेय हे चित्र फार कमी वेळा दिसतं. मागे अशाच एका भांडणात एका भिकार्‍याने प्रतिकार करणार्‍या महाविद्यालयीन युवतीला चालत्या ट्रेन मधून ढकलून दिल्याची बातमी होती. तिथेही बायकांचा उदासीनपणा नडला. Angry :खेद:

बर्‍याचदा रेल्वेचे सुरक्षा पोलिस प्रथम वर्गाच्या महिला वर्गाच्या डब्यातून प्रवास करतात. दुपारच्या वेळी डब्यात कुणीच स्त्री नसताना असे २-३ पोलिस असतील तर महिला तो डबा टाळून द्वितीय वर्गाने जाणे पसंत करतात. हे पोलिसही शेवटी पुरुषच. त्यांनीच गैरफायदा घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. Sad

चालत्या गाडीत बायकांचा सहज तास / दिड तास जातो. त्या वेळात हे (म्हणजे चिकटवणे) अगदीच अशक्य नाही. अर्थात त्यासाठी सर्व प्रवाश्यांचे सहकार्य लागेल.

महिलांच्या डब्यात पोलीस ठेवणे, हे माझ्या आठवणीप्रमाणे मंदा पाटणकर, हत्या प्रकरणापासून सुरु झाले, (निदान ३५ वर्षे झाली त्याला) पण त्याने फारसा फरक पडलेला दिसत नाही. पुर्वी या डब्यात गर्दी नसायची, म्हणून मी लहानपणी आईबरोबर अनेकवेळा या डब्यातून प्रवास करायचो. आता तिथेही गर्दी असतेच. पण समुहशक्तीचा आसुड उगारला जात नाही.

१९७१ च्या युद्धाच्या वेळी, ब्लॅकआउट असायचा. गाडीतले दिवेही अगंदी मंद असायचे, पण त्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडला नव्हता.

हा प्रकारच निंदनिय आहे .
कोमल के त्यात कठीण काय आहे ?
मला वाटतं दिनेश ने सुचवलेला उपाय म्हणजे त्याला मुंहतोड जवाब आहे . अशा फालतु जाहिराती दररोज बघायला लागण्या ऐवजी दिनेशने सांगितलेला उपाय करणं नक्कीच चांगलं नाही का ?

मला असे वाटते की, या लेखात मला जे म्हणायचे आहे ते स्पष्ट आहे... वेगळे स्पष्टीकरण देण्याची गरज नाही... सगळ्या प्रश्नाची उत्तरे लेखातच आहेत... दिनेशदाची कल्पना चान्गली आहे... पण हे थोडेसे पोलिसान्च्या अतिक्रमणविरोधी मोहिमेसारखे आहे... पाठ फिरली की परत येतात...

मलाही दिनेशदांनी सुचवलेला उपाय चांगला वाटतोय. किमान तुमचा निषेध प्रशासनापर्यंत पोहोचल तरी. नुसतेच तक्रार करून जे साध्य होणार नाही ते यातून साध्य होईल. मिडीयाची दखल घेतली जाते. (मिडीयाच आजकाल कशाची दखल घेत नाही किंवा कशाचीही घेते हा मुद्दा वेगळा). त्यामुळे तुमच्या गांधीगिरीला तुफान प्रतिसाद मिळेल. याबाबत शंका बाळगू नका. ५-१० जणींनी मिळून जरी एका डब्यात हे केले तरी त्याचे अनुकरण बाकिच्या करतील.

मला असे वाटते की, या लेखात मला जे म्हणायचे आहे ते स्पष्ट आहे... वेगळे स्पष्टीकरण देण्याची गरज नाही... <<
इतके डिफेन्सिव्ह व्हायची काय गरज आहे?

अतिशय घाणेरडा प्रकार आहे Angry

दिनेशदांना अनुमोदन. शिवाय ऋयामने सुचवलेला मनसे वेबसाईटचा पर्यायही उत्तम.

>> मला असे वाटते की, या लेखात मला जे म्हणायचे आहे ते स्पष्ट आहे... वेगळे स्पष्टीकरण देण्याची गरज नाही...

अगदी, अगदी! Happy

रैना / नीधप,

या लेखात कोमल यांनी बर्‍याच मुदद्यांना स्पर्श केलेला आहे. रैना यांनी त्यांच्या प्रतिक्रियेत सगळे मुद्दे व्यवस्थित लिहिले आहेत. त्यापैकी कोणताही एकच मुद्दा बोट ठेवण्यासाठी घेणं योग्य नाहीय. ते सगळे मुद्दे या लेखात मांडलेल्या स्त्रियांचा अपमान होण्याच्या व्यथेला पूरक आहेत. शक्यतोवर या सर्व मुद्द्यांवर काहीतरी ठोस उपाययोजना झाली पाहिजे.

आशा करतो कि तुमचा संभ्रम दूर झाला असेल आणि तुमच्या पुढच्या प्रतिक्रियेत तुम्ही या प्रकारांबाबत काही ठोस उपाययोजना सुचवाल Happy

दिनेशदा यांची युक्ती चांगली आहे. फारच गर्दी असेल तर कधी सुट्टीच्या दिवशी जमला तर प्रय्त्न करून नक्कीच पहा.

प्रश्न विचारायचे नाहीत आणि विचारले तर लिहिणारीकडून फटकळपणे हुडुत असं उत्तर मिळेल एवढं नक्की समजलं मला.

रैना, तू दिलेल्या सगळ्याच मुद्द्यांवर आक्षेप घेतलेला आहे, फ्रस्ट्रेशन दिसतय, पण मुद्द्यांची गल्लत कशी काय आहे?

हे तर झालंच..पण खुपदा महिलांना रेल्वे प्लाटफॉर्म वर पुरुषांच्या आंबट शौकीन चाळ्यांना अन शेर्यांना सामोरे जावे लागते त्याचे काय?
अन मुख्य म्हणजे कोणी सहप्रवासी सुद्धा मदतीला नसतात...एकला चलो रे..मुली पासून स्त्रीपर्यंतचा प्रवास असाच होतो. रस्ता असो कि रेल्वे .