श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग २८

Submitted by बेफ़िकीर on 9 September, 2010 - 01:19

काही प्रश्नच निर्माण झाला नाही. रामभाऊ कदमांनी चक्क प्रकाराकडे दुर्लक्ष केलं अन साखरपुडा व्यवस्थित पार पडला.

खरा प्रश्न होता बारावीच्या निकालाचा! निकाल म्हणजे अक्षरशः निकाल लागतो की काय अशी शीला अन राजाला भीती होती. कारण या वर्षात इतक्या विचित्र मनस्थितीमध्ये नैना वावरलेली होती की अभ्यासावर तिचं लक्ष लागणं त्यांना अवघडच वाटत होतं!

तेच झालं! दोन विषय राहिले. नैना नापास झाली. धड ना बारावीचे वर्ष पदरात पडले, धड ना पुढच्या शिक्षणाची हमी, धड ना महेशबरोबर आयुष्य व्यतीत करण्याची संधी!

जेव्हा सर्व बाजुंनी दुर्दैव चालून येतं तेव्हा माणूस खूप खूप शांत होतो. साखरपुड्याला दोन महिने होऊनही आईचे कडक लक्ष असल्याने एकदाही महेशला भेटता न येणे, अगदी पाच मिनिटांसाठीही, धड मैत्रिणींना भेटायला जाता न येणे, नापास होणे आणि काही कारणाने वडिलांबरोबर सासरी गेलेले असताना नियोजीत वराच्या धाकट्या अविवाहीत बहिणीने नापास होण्यावरून कुचेष्टा करणे! सगळ्याच पातळ्यांवर अपयश आले होते.

इकडे महेशही तडफडत होता. पण एक झाले होते. नैनाचा साखरपुडा झालेला आहे, त्यानंतर ती दोन सेकंदही आपल्याला भेटू शकलेली नाही आणि लग्न आता फक्त तीन महिन्यांवर आलेले आहे या सर्व घटनांमुळे मनातल्या मनात तो समजून चुकलेला होता. 'नैना राजाराम शिंदे' हा आपल्या आयुष्यातील अध्याय संपला! कायमचा! आता नैनाला अधिक त्रास होऊ नये म्हणून तोही त्यांच्या घराकडे न बघताच जायचा, यायचा! वाड्यात कोणत्याही कार्यक्रमात सहभागी व्हायचा नाही. जेणेकरून उगाच शिंदे कुटुंबियांशी कोणताच संबंध येऊ नये. शिंदे कुटुंबीय स्वतःच आता वाड्यात कशातच सहभागी व्हायचे नाहीत. पण चुकून आलेच तर आपल्याला पाहून त्यांनाही मनस्ताप होऊ नये अन आपल्यालाही या दृष्टीने महेश स्वतःही जायचा नाही. खरे तर तो आता घरातच कमी असायचा. कॉलेज झाले की परस्पर व्यायामशाळा, तिथून आले की आंघोळ करून बाबांना थोडीशी मदत करून जेवण झाले की कॅफे सेंट्रल!

या सर्व प्रकारात त्यातल्यात्यात चांगली अन 'अजून जरा चांगली झाली असती तर बरी' अशी घटना घडली.

महेशने वाडिया कॉलेजमधून मेकॅनिकलचा डिप्लोमा कोर्स यशस्वीरीत्या पार पाडला. शेवटच्या सेमिस्टरला त्याला ७९ % मार्क्स मिळाले. ही अतिशय चांगली गोष्ट होती. याहीवेळेस श्रीनिवासने पेढे वाटले. अगदी शिंद्यांनाही तो पेढे द्यायला गेला पण राजाकाका घरात नव्हता अन शीलाकाकूने सरळ 'नको, पेढे नकोत, त्याला अभिनंदन सांगा' इतकेच बाहेरच्या बाहेर सांगून श्रीला कटवले.

खरे तर आत्ताच्या क्वालिफिकेशनवरच महेश नोकरीला लागू शकत होता. पण कॅपस इंटरव्हिव्हपैकी थर्मॅक्सने त्याला नकार दिला अन सँडविक व ऍटलास कॉपको या कंपन्यांमध्ये काही वेळा संप होतात असे कुणीतरी सांगीतल्याने त्याने मुलाखत दिलीच नाही. अर्थातच, पुढे शिकायचे होतेच! पण निदान आपली वर्थ काय हे तपासावे म्हणून थर्मॅक्सचा इंटरव्हिव्ह त्याने दिला होता.

पण एक मोठी गोची झाली होती. वाडियातील पहिल्या सात नंबरांना शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळू शकायचा. सिव्हिल, इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल यातील प्रत्येक प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्याला व इलेक्ट्रिकल व मेकॅनिकलच्या दुसऱ्या क्रमांकांनाही ! इलेक्ट्रिकलच्या पहिल्या क्रमांकाला इलेक्ट्रॉनिक्सला तर मेकॅनिकलच्या दुसऱ्या क्रमांकाला मेटॅलर्जीला!

आणि यानंतरच्या क्रमांकांना अर्थातच खासगी महाविद्यालयांमध्ये जावे लागायचे.

आणि महेश आला नववा! त्याला प्रायव्हेट कॉलेजमध्येच जावे लागणार होते.

एम आय टी, व्ही आय टी आणि भारती विद्यापीठ या तीन खासगी कॉलेजेसपैकी त्यावेळेस एम आय टी अधिक रेप्युटेड होते. महेशला प्रवेश कुठेही मिळाला असता कारण मार्क्स चांगलेच होते. पण! तीनही कॉलेजेसना देणगी अपेक्षित होती व ती मेरिटमध्ये असलेल्यांकडूनही! आणि एम आय टीची अपेक्षा होती दहा हजार, भारतीची साडे आठ हजार आणि व्ही आय टीची सहा हजार! व्ही आय टी स्वस्त असले तरी ते दर्जानेही स्वस्त आहे असे महेशला उगीचच काहींनी सांगीतलेले होते. त्यामुळे शेवटी भारती विद्यापीठ - धनकवडी फायनल झाले आणि...

पहिल्या वर्षाची आठ हजार फी आणि साडे आठ हजार देणगी असे साडे सोळा हजार देणे फारच अवघड असूनही श्रीनिवासने आपल्या बचतीतून ते दिलेच! आता प्रश्न होता इतर खरेदीचा! साधी ड्रॉइंग शीटस घ्यायची तरी अल्ट्रा व्हाईट क्वालिटीची लागत अन एकेक पेपर चार चार रुपयांचा! एकेक पुस्तक तीनतीनशे रुपयांचे!

आणि एवढे सगळे करूनही शेवटी हा प्रश्न होताच.... कॉलेजला जायचे कसे? इतक्या लांब अन इतक्या चढावर असलेल्या कॉलेजला सायकलवरून जाईपर्यंतच दमायची वेळ येईल!

मधूसूदनने समीरला एम एटी घेतलेली होती नुकतीच! श्री महेशला लुना घ्यायच्या विचारात होता. ओढाताण भलतीच होणार होती. पण त्याला पर्याय नव्हता.

महेश आता मोठा झालेला होता. समीरदादाला एम एटी आहे म्हणून मलाही पाहिजे असे हट्ट करण्याचे त्याचे वयही राहिलेले नव्हते अन स्वभाव तर कधीच गेलेला होता.

पण लुनासारख्या लहानशा दुचाकीवरून जायचे याची त्याला मनातून लाजही वाटत होती अन वैतागही येत होता. लायसेन्स मिळालेले होते. आता घ्यायचीच तर एकदाच मोठी गाडी, म्हणजे एम एटी. घ्यावी अशी त्याची इच्छा होती. लुना होती सहा हजाराला अन एम एटी. साडे आठ हजाराला!

मधूसूदननेही श्रीला तोच सल्ला दिला होता. हळूहळू श्रीलाही पटू लागले होते. एम एटीचे कंझंप्शन होते एका लिटरला साठ किलोमीटर! जाहिरात ७२ ची करत होते. पण साठ तरी मिळेलच असे इतर लोक सांगायचे. कॉलेज होते दहा किलोमीटरवर! म्हणजे रोजचे वीस किलोमीटर! म्हणजे दर तीन दिवसांना दहा रुपयाचे पेट्रोल! झाले की महिन्याचे शंभर रुपये! आणायचे कुठून इतके पैसे?

सेकंडहॅंड गाडीचा प्रस्ताव मात्र महेशने उधळून लावला होता. त्याने बाबांना सांगीतले होते की सेकंड हॅंड गाडी तुम्ही कितीही मोठी घेतलीत, अगदी बजाज कब जरी घेतलीत, तरीही तिचे लपलेले खर्च असतात. ते महिन्या दोन महिन्यातच डोके वर काढू लागतात. काय घ्यायचे ते नवेच घ्या!

एका एफ. डी. ची रिसीट मोडून डोनेशन भरले होते. दुसरीतून फी! सुट्या, वरच्या पैशांमधून पुस्तके, साहित्य, स्टेशनरी हे सगळे!

एका प्रकारे या इंजिनियरिंगच्या सुरुवातीलाच श्रीच्या बचतीला बऱ्यापैकी खिंडार पडलेले होते. त्यात आता दुचाकी आणायची वेळ आली होती.

एक्स्टेन्शन मिळालेले सप्रे अजूनही स्टोअरचे हेड होते. आता ते वयामुळे म्हणा किंवा कशाहीमुळे, पण बरेचसे शांत झालेले होते. त्यांचे अनेक अधिकार 'रेग्युलर एंप्लॉयी' नसल्याने आता लागू पडत नव्हते. त्यांना आता फक्त बेसिक व डी. ए. मिळायचा अन कारचे पेट्रोल! इतकी अनुभवी व्यक्ती जाऊ नये म्हणून कंपनीने ठेवलेले होते एवढेच! पण सप्रेंच्या बोलण्याला अजून मान होता. आणि आज सकाळी सकाळीच श्री सप्रेंच्या केबीनमध्ये बसलेला होता.

सप्रे - बोल!
श्री - सर ते.. मुलाला एम एटी. घ्यायचीय.. कॉलेज लांब आहे..
सप्रे - मिळाली का ऍडमिशन?
श्री - हो.. भारती विद्यापीठ..
सप्रे - डोनेशन घेतलं का रे?
श्री - थोडसं.. कॉलेजच्या निधीसाठी..
सप्रे - किती?
श्री - साडे आठ..
सप्रे - माय गॉड.. काय शिक्षणं झालीयत हल्ली..
श्री - खरंय सर...
सप्रे - बरं मग?
श्री - तर.. आता काय झालंय.. माझे एकंदर वीस हजार या फी. डोनेशन अन इतर खरेदीत गेलेले आहेत..
सप्रे - हं..
श्री - गाडीसाठी जरा ऍडव्हान्स..
सप्रे - किती..
श्री - मला आठ हजार हवे आहेत..
सप्रे - ऍप्लिकेशन दे.. मी चिंचाळकरला फॉरवर्ड करतो..
श्री - थॅंक्यू सर...

पण दोन तासांनी समजले. चिंचाळकरांना सप्रे काहीतरी बोलले. त्याचे कारण म्हणजे चिंचाळकरांनी सप्रेंचे ऍप्रूव्हल असलेला अर्ज 'प्लीज गेट इट ऍप्रूव्हड बाय ईडी. ' असे लिहून परत पाठवला होता. कारण त्यांना 'आता सप्रेंना ऍप्रूव्हलचे अधिकार नाहीत' हे माहीत होते. स्वतःची नोकरी नीट सांभाळण्यासाठी त्यांना कायदेशीररीत्या अर्ज मंजूर होणे आवश्यक वाटले होते. सप्रे आधीच डोक्याने भडक! त्यांचा पुर्वीचा स्वभाव उफाळून आला अन ते चिंचाळकरांना अद्वातद्वा बोलले. चिंचाळकरांनी सप्रेंवर सूड उगवण्याची नामी संधी समजून अन सप्रे आता काहीच वाकडे करू शकत नाहीत हे समजून तो प्रतिष्ठेचा प्रश्न केला. त्याने एक इंटर्नल मेमो उगाचच स्वतःहून ईडी. ऑफीसला पाठवला.

'माझ्याकडे सप्रेंचे ऍप्रूव्हल असलेले ऍडव्हान्सचे अर्ज अजून येत आहेत, त्यावर कंपनीच्या नियमानुसार योग्य ती कारवाई व्हावी असे मला वाटते, माहितीसाठी' असा त्या मेमोचा सारांश होता.

त्यावर चिंचाळकरांना काही उत्तर यायच्या आधी ईडी. ऑफीसमधून सप्रेंनाच फोन आला.

त्यावर साहेबांनी सांगीतले. 'प्लीज रूट ऑल सच डॉक्युमेंटस थ्रू मी'!

झालं! आजवरच्या सेवेचं हे असं फळ मिळालं! सप्रेंना ते फारच लागलं. आर्थिक सपोर्ट मिळत राहावा यासाठी स्वतःच्या एक्स्टेन्शनचा अर्ज मंजूर करून घेणाऱ्या सप्रेंना आता आपल्या पोझिशनची खरी जाणीव झाली. त्यांनी श्रीला बोलावून एक नवीन अर्ज बनवून थेट साहेबांच्या ऑफीसमध्ये ऍप्रूव्हलसाठी पाठवायला सांगीतले.

आता श्री घाबरला. तरीही त्याने अर्ज बनवला. एकदा भाषा वगैरे बरोबर आहे ना हे विचारण्यासाठी सप्रेंना नजरेखालून घालायला सांगीतला. सप्रे हा विषय प्रतिष्ठेचा बनवू शकत नव्हते चिंचाळकरांप्रमाणे! चिंचाळकर रेग्युलर अधिकारी होते.

श्रीने लंचनंतर सरळ अर्ज वरच्या साहेबांच्या ऑफीसमध्ये सबमिट केला. आणि आता वाट पाहाणे इतकेच हाती होते. कसातरी वेळ काढून पाच वाजले अन श्रीने साहेबांच्या पी. ए. ला फोन लावला.

'बॉस हॅज ऑलरेडी कमेंटेड ऑन इट ऍंड फॉर्वर्डेड इट टू फायनान्स' असे उत्तर मिळाले. सप्रेंच्या खात्यातील माणूस असल्यामुळे लगेच चिंचाळकरांना फोन केला असता तर त्यांना सप्रेंच्या सकाळच्या वागण्यामुळे आपलाही राग आला असता असे वाटल्याने श्री आणखीन अर्धा तास गप्प बसून राहिला. आता कोपरकर, स्वाती, सप्रे अन चिटणीस सगळेच निघून गेले. सहा वाजता एक प्यून त्या दिवशीचे इंटर्नल मेमो त्या त्या खात्यांना पोचवतो म्हणून त्याची वाट पाहात श्री बसून राहिला. बरोब्बर सव्वा सहा वाजता श्रीचा अर्ज फायनान्समधून परत आला.

'नॉट ऍप्रूव्हड ड्यू टू अर्लिअर ऍड्व्हान्सेस यट टू बी रिकव्हर्ड'

आधीचा ऍडव्हान्स फक्त तीन हजार राहिलेला होता. त्यासाठी आठ हजार थांबवलेले होते. हा ऍडव्हान्स मिळवण्यासाठी एक रकमी तीन हजार भरणे आवश्यक होते. आणि ते असते तर हा अर्जच पाच हजाराचा नसता का केला असा प्रश्न श्रीच्या मनात आला.

कित्येक वर्षांच्या सर्व्हिसमध्येही काही अर्थ नव्हता. गोष्टी इतर लोकांच्या तंत्राप्रमाणे अन कंपनीच्या नियमाप्रमाणे होत होत्या. नियमाप्रमाणे होण्यात गैर काहीच नव्हते. पण श्रीला नैराश्य आलेले होते. चिंचाळकरांना सप्रे बोलले नसते तर चिंचाळकरांनी निदान इतकी 'कर्ट' भाषा वापरली नसती असे त्याला वाटले. वरच्या साहेबांनी 'सी व्हॉट कॅन बी डन ऍज पर रुल्स' असा रिमार्क मारला होता. इतक्या मोठ्या अधिकाऱ्याने असा बुळचट रिमार्क का द्यावा? श्रीला हे समजत नव्हते. एवढे अधिकार असताना 'पे अपटू फाईव्ह थाऊजंड' वगैरेही म्हणता येत नाही का? कंपनीच्या नियमांमध्ये बसते तसे करा हे सांगायला हा टिकोजीराव हवा कशाला?

निराश झालेला श्री कसातरी तंद्रीत चालत गेटबाहेर आला.

समोरच्याच चहाच्या दुकानातील बाहेरच्या टेबलवर बसला. संधिप्रकाश होता. अधिकच उदास वाटत होतं! घरी जाऊन काय करणार? पोळ्या, भाजी, भात अन आमटी! हेच ना? माझ्या आयुष्यात कधीच मन रमवणे, मजा करणे, आरामात पडून राहाणे, लोळणे, गप्पा ठोकत बसणे, पिक्चरला जाणे, बायकोला 'ए चहा टाक गं' असं सांगणे.. यातलं काहीच का नाही?

माझं नशीब असं का आहे? कोण आहे मी? फक्त एक बाप? एका आईविना असलेल्या मुलाचा बाप? तो डिझाईनचा आपटे कसा सिगारेट वगैरे फुंकत स्टाईलमध्ये फिरतो. बायकोही नोकरी करते त्याची! आहे आपल्याच लेव्हलला! पण साहेबासारखा राहतो.

आपल्याकडे आठ हजार नसावेत? पुन्हा एखादी रिसीटच मोडावी लागावी? लोक लाखालाखाचे व्यवहार चुटकीसरशी करतात. आपण आठ हजाराचा अर्ज करतो?

आज आपण उशीरा घरी पोचलो तर? महेशने भात लावलेला असेल. जातानच ब्रेड घेऊन जाऊ. पुन्हा पोळ्याबिळ्या कुठे करत बसायच्या? लसणाच्या चटणीबरोबर ब्रेड खाऊ अन साधं वरण भात! बास झालं! फार तर एक चहा रात्री पण घेऊ! आपण कशाला थाटात जेवायला हवंय? नाहीतरी आठ हजारासाठी झगडणारे आपण एक साधे कर्मचारी!

श्रीने नकळत आणखीन एक चहा मागवला.

मी का असा जगलो? लग्न का नाही केलं मी? स्वातीचं ठीक आहे! पण कुणाशीच लग्न का नाही केलं? माझ्या काहीच आवश्यकता नाहीत? मला नाही वाटत घरी गेल्यावर कुणाला तरी हक्काने चहा कर असे सांगता यावे?

दम लागणं वाढलं आहे. लोक रोज दारू पिऊन सकाळी ऑफीसमध्ये फ्रेश! आपण कोणतेही व्यसन न करताही थकलेले! एकदा डॉक्टरकडे जाऊन सगळंच तपासून घ्यायला हवं! नाहीतर काहीतरी भलतंच निघायचं! महेशचे लग्न होऊन त्यांचा संसार सुरळीत चालू होईपर्यंत आपण मरणे योग्य नाही. रमाला शब्द दिला आहे. आणि रमाला दिलेल्या शब्दाचं काय? आपल्यालाच वाटतं की? की महेशचं सगळं लागीलाग लागेपर्यंत जगणं आवश्यक आहे. सारख रमा, रमा काय करायचं? ती याला जन्म देऊन निघून गेली. हा एक मोठा आनंद आपल्या आयुष्यात आला. त्यामुळे बाकी सगळेच छोटे आनंद संपले. आता हा एकच आनंद! महेशला आनंदी पाहाणे, मोठा माणूस झालेला पाहाणे, संसारात रमलेला पाहाणे!

"सिगरेट? "

बेन्सन ऍंड हेजेसच्या माईल्ड व्हरायटीचे डार्क निळ्या रंगाचे सिगारेटसचे श्रीमंती पाकीट अचानक टेबलावर समोर पडलेले पाहून भानावर आलेल्या श्रीने वर पाहिले अन तो दचकलाच!

राजन बर्गे!

किर्लोस्कर ऑईल इंजीन्सच्या स्मॉल इंजीन व बेअरिंग डिव्हीजनचा पुणे विभागाचा एकमेव सुपर डीलर!

याच्या वडिलांनी शंतनूरावांच्या काळात कंपनीत मन लावून नोकरी केलेली! निवृत्तीनंतर शंतनुरावांकडे डीलरशीप मागायला गेले. शंतनुराव म्हणजे अक्षरशः किंग माणूस! कित्येकांचे संसार त्यांनी उभे केले असतील. बर्गेंचे एकंदर काम व निष्ठा त्यांना माहीत होती. हळूहळू मिळालेल्या डीलरशीपचे सोने करून बर्गेंनी उभारलेला हा प्रचंड विस्तार आता त्यांचा एकुलता एक मुलगा राजन बर्गे सांभाळत होता. वय वर्षे पंचेचाळीस!

त्याने सोन्याचे प्लॅटिनम करून दाखवले होते. आता कंपनीचेच कर्मचारी त्याला वचकून असायचे इतका तो कंपनीत महत्त्वाचा ठरलेला होता.

फायनान्स, मार्केटिंग, स्टोअर्स, एक्साईज आणि सर्व पी. ए. व वरिष्ठ अधिकारी यांना वेळोवेळी दिवाळी गिफ्टस किंवा इतर भेटी देऊन खुष ठेवत होता. चाळीस चाळीस लाखांचे क्रेडिट करूनही पुढचा माल उचलत होता. पुणे विभागात दुसरा डीलर असावा अशी गरजच निर्माण होऊ दिली नव्हती.

धंदा करण्यात अत्यंत वाकबगार असलेला राजन बर्गे शौक करण्यात मात्र तितकाच आघाडीवर होता. गोवा, पाचगणी अन खंडाळा येथे त्याने स्वतः साठी बांधलेली छोटी छोटी गेस्ट हाऊसेस बरेचदा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनीच व्यापलेली असायची. तोही तिथे अनेकदा जायचा. मदिरा व मदिराक्षीच्या सहवासात असणे हे त्याचे आता जीवितकार्य उरलेले होते.

आणि नेमके दोनच महिन्यांपुर्वी श्रीने त्याचा एक साडे पाच लाखांचा डिस्पॅच सिस्टीमप्रमाणे नसल्यामुळे अडवला होता. एका सेट मध्ये असलेल्या बेअरिंगच्या कॉंबिनेशनऐवजी बर्गे त्या सेटमधील एकाच प्रकारचे बेअरिंग मागत होता व सेल्स डिपार्टमेंटकडून आलेल्या मेमोप्रमाणे तसे करणे श्रीला शक्य नव्हते. बर्गेचे तसे करण्याचे कारण होते. ते बेअरिंग त्याच्याकडे झालेल्या एका छोट्या चोरीत गेलेले होते अन त्याला तेवढेच विकत घ्यायचे होते. पण सगळा सेटच घ्यावा लागत असल्यामुळे त्याच्याकडे पडलेले अर्धवट सेटस आता निरुपयोगी ठरत होते.

सप्रे हा माणूस अत्यंत शुद्ध होता. त्यामुळे त्यांच्या नादी न लागता बर्गेने सरळ श्रीला विश्वासात घेऊन सांगीतले होते की 'असे असे करा, आय विल सी दॅट यू विल बी प्रोटेक्टेड अल्सो एंड रिवॉर्डेड अल्सो'!

श्री हा सप्रेंहून सरळ होता. त्याने बर्गेच्या थाटामाटाला जराही न बिचकता सरळ नाही म्हणून सांगीतले होते अन बर्गेच्या स्टॉकमधले महागड्या बेअरिंग्जचे अर्धवट सेटस आजही तसेच होते.

धंदेवाल्या लोकांचे एक असते. जो खातो त्याला ते भरपूर खायला देतात पण मनात त्याच्याबद्दल आदर बाळगत नाहीत. पण जो खात नाही त्याच्याबद्दल त्यांना आदर जरी वाटत असला तरी असे लोक त्यांच्या प्रगतीतील अडथळे वाटतात त्यांना! त्यामुळे अशा लोकांना शक्य तितक्या झपाट्याने कंट्रोलमधे आणण्याची संधी ते शोधतही असतात अन सोडतही नाहीत.

कंपनीतून आपल्या आलिशान ऍंबॅसिडर मधून बाहेर पडल्यावर समोरच्या दुकानात विमनस्कपणे बसलेला श्री दिसल्याबरोबर बर्गेने ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगीतली होती. आणि असा एकटा बसलेला शुद्ध माणूस निवांतपणे भेटायला मिळाला या खुषीत त्याने सिगारेटचे पाकीट डायरेक्ट श्रीसमोर फेकले होते. तोंडावर 'तुमच्यामुळे तर मी जगतो साहेब' असे भाव व रुंद स्माईल असलेल्या बर्गेला पाहतानाच श्रीच्या मनात धडकी भरली होती. उद्या याला वाटले तर वरच्या साहेबांना सांगून हा आपल्याबद्दलचे मतही वाईट करू शकतो हे श्रीला माहीत होते.

श्री - न.. नाही... आय डोंट स्मोक..
बर्गे - ओह.. सॉरी...
श्री - तुम्ही?
बर्गे - या.. आय थॉट आय विल जस्ट हॅव अ कप ऑफ टी ऍंड मूव्ह.. भयंकर वैतागलो आज..

काहीतरी बोलायचे म्हणून अन बर्गे अगदी समोरच्याच खुर्चीत बसल्यामुळे श्री म्हणाला..

श्री - का?
बर्गे - दॅट चिंचाळकर फेलो.. रास्कल..

अशा शिव्या आपण का देऊ शकत नाही? खरे तर आपल्यालाही चिंचाळकरांना असेच म्हणावेसे वाटत आहे. पण आपल्या तोंडातून हा शब्द बाहेर पडला तरी शोभायचा नाही. पण बर्गेंचे चिंचाळकरांकडे काय झाले हे श्रीला समजत नव्हते.

श्री - काय झालं?

बर्गेने तोंडातला धूर गेटच्या दिशेने सोडला. जणू 'ही कंपनी मी विकत घेऊ शकतो' असे त्याचे आविर्भाव होते गर्विष्ठ! कोणतीही संस्था एका माणसापेक्षा मोठी असते हे त्याच्या गावीही नव्हते. चहाचा मोठा घोट घेत म्हणाला..

बर्गे - दुसरं काय? शॉर्ट पेमेंटमुळे माल अडवतो सारखा.. आता आज मी चौदा लाखांच पेमेंट केल.. त्याच्या अगेन्स्ट चार लाखांचा माल नको का द्यायला..

सेल्सला नसल्यामुळे श्रीला नक्की फिगर्स माहीत नव्हत्या. पण कॅंटीनमध्ये जेवताना एकदा त्याने कुणाकडून तरी ऐकलेलं होत. बर्गेंच आऊटस्टॅंडिंग एका कोटीच्या पुढे गेल्यामुळे साहेबांनी फायनान्सला अन सेल्सला त्या दिवशी झापलेले होते.

ऍड्व्हान्स पेमेंट टर्म्स असताना एकेक कोटीची थकबाकी ठेवू शकणारा अन तरीही माल उचलू शकणारा असा हा माणूस आहे इतके श्रीला माहीत होते. तेच साहेब त्या दिवशी बर्गेने आयोजीत केलेल्या सब डीलर कॉंफरन्समध्ये सहा पेग लावून नाचलेले होते हेही दुसऱ्या दिवशी कंपनीत समजलेले होते. साहेबांना कोण विचारणार?

श्री - हं.. मग .. शेवटी काय झालं?
बर्गे - उलटा पालटा झापला लेकाला! आहे कोण तो? ईडींकडेच जाऊन बसलो मी..

श्री हबकला. खुद्द चिंचाळकरांविरुद्ध कंपनीच्या बाहेरचा माणूस जिथे टॉपच्या साहेबाकडे जातो तिथे आपण काय बोलणार?

बर्गे - साहेब तुमचाही एक अर्ज साल्याने परत पाठवला ना?

हे फार खासगी होतं! याची चर्चा बाहेरच्या माणसाशी करण्याचे श्रीला काहीच कारण नव्हते. पण बर्गेला आधीच ते कळलेले आहे व तो इतका मोठा माणूस आहे हे पाहून बिचकलेला श्री 'हो' म्हणून गेला.

बर्गे - हाऊ मच वॉज दॅट? आय थिंक.. सम एट थाऊजंड ऑर समथिंग ... राईट??
श्री - हो.. मुलाला एम एटी. घ्यायचीय.. भारती विद्यापीठात ऍडमिशन मिळाली ना..!
बर्गे - ओह दॅटस वंडरफूल... ही इज गोइंग टू बी ऍन इंजिनीयर?
श्री - येस सर..
बर्गे - वॉव्ह.. म्हणजे तुमच्यानंतर तो इथे लागणार.... हा हा हा हा

खरे तर ही कल्पना श्रीलाही फारच सुखद वाटली. पण 'कसलं काय कसलं काय' करत तो गुळमुळीत हासला.

बर्गे - मी काय म्हणतो.. हे असलं आठ अन दहा हजारासाठी साला त्या चिंचाळकराचे काय पाय धरायचे..???

पुन्हा गुळमुळीत हासण आलं!

श्री - काय करणार.. आम्ही आपले नोकरदार लोक..
बर्गे - नाही नाही.. आय ऍग्री.. पण साहेबांना का नाही भेटलात??
श्री - साहेबांनी चिंचाळकरांनाच नियमाप्रमाणे काय ते करायला सांगीतलं! त्यामुळे..

हे आपण उगीचच या बाहेरच्या माणसाशी बोलतोय हे श्रीला कळत होतं. पण बर्गेचा अपमान करून उठून जाणं शक्यच नव्हतं!

बर्गे - पेंढारकर साहेब.. मी खरं सांगू?
श्री - .....????
बर्गे - कंपनी आज चालतीय ना? ती तुमच्यासारख्या निष्ठावंतांमुळे..
श्री - .... छे छे.. मी कसला हो? मी सिनियर ऑफीसर आहे साधा..
बर्गे - प्लीज.. तुम्ही स्वतःला असे कमी मानत जाऊ नका.. बाय द वे... माझ्याकडे एक एम. एटी. आहे.. दोनेक वर्षे वापरलेली..
श्री - .... नाही नाही... तसं काही नाही.. मी घेईन ना..
बर्गे - यू डोंट सीम टू अंडरस्टॅंड! आय ऍम नॉट गिव्हिंग इट टू यू फ्री ऍट ऑल.. ऐकून तर घ्या?
श्री - .... काय?
बर्गे - आमचा स्टोअरचा अन एक्साईजचा माणूस सोडून गेला.. ईफ यू कॅन मेंटेने दोज रेकॉर्डस फॉर अस... आय विल पे द सॅलरी..
श्री - .... मी???
बर्गे - आय मीन.. पार्टटाईम जॉबसारखं...
श्री - कधी??
बर्गे - केव्हाही? यू कॅन कम एव्हरी इव्हिनिंग, ऑर ऑन ओन्ली सॅटर्डेज ऍंड संडेज..
श्री - .. म्हणजे.. किती दिवस?
बर्गे - अरेच्या? साहेब ऑफीस तुमचं आहे... तुम्ही म्हणाल तितके दिवस! तुम्ही येईनासे झालात तर दुसरा माणूस ठेवावा लागेल आम्हाला..
श्री - .... यू मीन.. यू मीन अ.. अ जॉब?
बर्गे - ऍब्सोल्युटली अ जॉब साहेब..
श्री - म्हणजे... असा.. नियमीत स्वरुपाचा?
बर्गे - अत्यंत नियमीत...
श्री - पण.. इथे कळलं तर?
बर्गे - सांगणार कोण? एक तर मी किंवा तुम्ही... तुम्हाला सांगायचं तर सांगा... मी कशाला सांगू? तुमच्यासारखा अनुभवी माणूस मिळाल्याचे?
श्री - ... पण...
बर्गे - आणि ऑफ कोर्स! माझ्याकडे काम करणे हे तुमच्या कंपनीच्या इंटरेस्टच्या विरुद्ध नाहीच आहे.. दोन वेगळे वेगळे बिझीनेसेस आहेत ते!
श्री - नाही पण.. नियुक्ती पत्रात म्हंटलेलं असतं.. दुसरी नोकरी करायची नाही म्हणून..
बर्गे - पेंढारकर साहेब.. ही दुसरी नोकरी नाहीच आहे.. आपण कोणताच पत्रव्यवहार करायचा नाहीये.. तुम्ही काम करायचंत अन कॅश घेऊन जायची.. आणि मुख्य म्हणजे.. इथे तुम्हाला काही त्रास झाला... तर राजन बर्गेच्या शब्दावर तो त्रास बंद होईल..
श्री - ... सर...
बर्गे - यू कॅन टेक दॅट एम. एटी. टूमॉरो.. निघू? आणि जमल्यास निर्णय उद्या याल तेव्हाच कळवा..
श्री - सर.... थोड बोलायचं.. होतं..
बर्गे - बोला ना साहेब?
श्री - म्हणजे.. समजा मी रोज सात ते नऊ आलो..
बर्गे - केव्हाही या हो? काउंटर दहा वाजता बंद होतो...
श्री - तर.‌साधारण किती.. मिळतील..
बर्गे - हा हा हा हा! काय विचारता साहेब?
श्री - नाही... म्हणजे काही तरी अंडरस्टॅंडिंग असलेलं बरं...
बर्गे - ओके.. लूक ऍट इट धिस वे.. आय विल पे यू पंधराशे रुपये.. तुम्ही सर्व रेकॉर्डस दर महिन्याची करायचीत.. पंधराशे पर मंथ..
श्री - पं..
बर्गे - तुमची काही .. वेगळी अपेक्षा..
श्री - छे छे.. तसं नाही.. पण.. मला..
बर्गे - साहेब तुम्ही आधी दिलखुलासपणे बोलायला सुरुवात करा बरं! तुम्ही मला असं भासवताय की मीच काहीतरी उपकार करतोय..
श्री - नाही नाही.. मला म्हणायचं होतं की.. तुम्ही.. सहा महिन्यांचा पगार..
बर्गे - ऍडव्हान्स?
श्री - ...
बर्गे - उद्या सकाळी घेऊन जा..
श्री - ....????
बर्गे - ट्रस्ट मी.. उद्या सकाळी नऊ हजार रुपये घेऊन जा.. नवी कोरी एम एटी घ्या मुलाला... ऍंड स्टार्ट वर्किंग फ्रॉम धिस वीक?
श्री - ..... सर...
बर्गे - तुम्हाला आता थॅंक्स म्हणायचे असेल ना?...

बर्गेच्या स्वरातील मिष्कीलपणामुळे खूपच मोकळे मोकळे वाटलेल्या श्रीन बर्गेशी हस्तांदोलन केले... आणि बर्गेची गाडी निघून गेल्यावर घड्याळात पाहिले तर सात!

लवकर घरी जायची जरूरीच नव्हती. केवढा मोठा प्रश्न सुटला होता. चिंचाळकर अन वरच्या साहेबांना नाही जमले ते बर्गेने मिनिटात केले. आपले नशीब वाईट नाहीये. उत्तम आहे.

"सिगारेट?? "

बर्गेचा तो प्रश्न श्रीला आत्ता आठवला. कित्येक वर्षांनी त्याने पानाच्या टपरीवरून एक ब्रिस्टॉल घेतली. मीही माझ्यासाठी जगणार आहे असे त्याने स्वतःलाच अन आकाशाकडे पाहून रमालाही सांगीतले.

कित्येक वर्षांनी आत गेलेला तंबाखूचा धूर डोळ्यातून पाणी काढून गेला खरा! पण कित्ती मस्त, हलकं हलकं वाटत होतं!

चालत चालत घरी पोचलेल्या श्रीला गणेशने निरोप सांगीतला. महेशदादा मित्राकडे राहणार आहे अभ्यासाला अन हॉटेलमध्ये जेवणार आहे. तुम्हाला वाट पाहू नका म्हणून सांगीतलंय!

पुन्हा नैराश्य आलं श्रीला घरात आल्यावर! वाटलं होतं.. कदाचित महेशने कूकर तरी लावला असेल. नव्हता लावलेला. आता पोळी, भाजी सगळंच करणं आलं? का जेवून यावं गोडबोल्यांच्या खानावळीत? पण आता बाहेर पडायचाही कंटाळा आला आहे. त्या बर्गेच्या चर्चेत रमल्यामुळे ब्रेड आणायलाही विसरलो आपण! मावशींना कसं विचारायचं काही आहे का पोळी भाजी वगैरे?

श्री सरळ मधूच्या घरात आला.

मधू काहीतरी आणायला बाहेर गेला होता.

प्रमिला - भावजी.. चहा टाकू?
श्री - ... अं?
प्रमिला - चहा??.. बसा...

खरे तर सांगायचे होते की 'वहिनी मला जेवायला वाढा'! पण मधू बाहेर गेलेला.. प्रमिला कितीही जवळची असली तरी असं कसं सांगायचं?

याचाच अर्थ! आपल्याला अगदी 'आपलं' म्हणता येईल असं कोणीही नाही आयुष्यात! चहा काय? मीही करेनच की घरात! त्यासाठी या प्रेमळ माउलीला कशाला त्रास द्यायचा? माउली! खरे होते! क्षणोक्षणी प्रमिलात त्याला माउलीच दिसत होती. काही क्षण ती प्रिया भासण्याचेही आलेले होते आयुष्यात! पण ते सगळे पाण्यावरच्या तरंगांप्रमाणे! आता वयंही झालेली होती. तारुण्या केव्हाच अच्छा टाटा करून गेलेलं होतं या पिढीला!

वहिनींना 'जेवायला वाढा' म्हणून सांगीतलं तर आनंदाने वाढतील. नाही असं नाही. पण.. ज्या अर्थी मनात प्रश्न येतो की मधू नसताना आपण यांना असं कसं म्हणायचं त्या अर्थी.. आपल्याला हे नातं परकंच वाटतं!

'चहा नको वहिनी, सहज आलो होतो' असे म्हणून श्री परत घरी आला सुद्धा! प्रमिलालाही त्यात काही विशेष वाटलं नाही.

रमाच्या फोटोसमोर उभा राहून श्री मनातल्या मनात म्हणाला..

'भरपूर जेवायची भूक होती.. पण.. इच्छा नाही उरली आता.. चिरंजीव जेवणार आहेत बाहेर.. तू बसतेस फोटोत.. काय स्वयंपाक करायचा अन कशाला जेवायचं असं होतं.. पण. आज एक पार्टटाईम नोकरी मिळाली बर का? आता बाळासाठी एम एटी येणार आहे उद्या परवाच तुझ्या.. चलो.. गुडनाईट रमा.. '

श्रीने पलंगावरची चादर बदलायला घेतली. आज न जेवताच झोपायची इच्छा होत होती. पलंगावर पडल्या पडल्या आढ्याकडे बघत असताना त्याच्या मनात विचार आला.

'किती मळलीय खोली! रमा असती तर केव्हाच रंग लावायला लावला असता आपल्याला! कशातच कसं लक्ष नाही आपलं? असो! आता दुसरी नोकरी लागलीय.. आता हळूहळू घरही रंगवून घेऊ.. इंजीनीयर राहतो ते घर चांगलं दिसायलाच हवं.. फ्लॅट घेण्याचं स्वप्न राहिलंच!

डोळे मिटत नव्हते. पोटात भूक अन डोक्यात विचार! दिवा बंद केला तरी झोप येत नव्हती. कधीतरी पंधरा वीस मिनिटांनी अचानक दार वाजलं! आला की काय महेश? दचकून श्रीने दार उघडलं तर...

"पोळ्या अन आर्वीची भाजीय.. आज केलीवती.. म्हंटलं नेऊन द्यावी.. झोपलावतात की काय? जेवण झालं नाही ना अजून???? "

आली तशी सेकंदात प्रमिला निघून गेली. आणि श्रीच्या कानात आवाज घुमला.. आज आयुष्यात दुसऱ्यांदा त्याला हा अनुभव आला होता.. दचकलाच श्री..

आवाज रमाचाच होता.. शेवटचा ऐकून दोन दशके व्हायला आली तरी हा आवाज खूप ओळखीचा होता त्याच्या.. अगदी जवळून.. रमाचा आवाज... !!!

"मी बरी उपाशी झोपू देईन तुम्हाला"

त्या रात्री भरपेट जेवून झोपायच्या वेळेला श्रीचे हृदय अश्रूंमध्ये रुपांतरीत होऊन दोन्ही हातांमध्ये धरलेल्या रमाच्या फोटोवर ओसंडले होते.

=====================================================

इतिहासात ज्याची नोंद होणार नव्हती तरीही रंगतदार होणार होता अशा भारत विरुद्ध पाकिस्तान च्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात एक चमत्कार घडला. श्रीकांतच्या नेतृत्वाखाली खेळायला मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला गोलंदाजी मिळाली अन पाकिस्तानने बऱ्यापैकी धावा कुटल्या. आता वेंगसरकर, शास्त्री, अझरउद्दीन व खुद्द श्रीकांत यांच्यावर फलंदाजीची प्रचंड मदार होती. जबाबदारी होती. मात्र कुणीच टिकले नाही. एकटा श्रीकांत टिकला. परिस्थिती अशी आली की तीन, चार विकेटस हातात अन साधारण तीस चेंडून सत्तरच्या आसपास धावा करायच्या होत्या. नॉन स्ट्रायकर एंडला कप्तान श्रीकांत अपमानीत मुद्रेने पाकिस्तानी खेळांडुंचा जल्लोष पाहात असताना एक सतरा अठरा वर्षाचा कोवळा मुलगा आला आणि आयुष्यात परत अब्दुल कादीरला भारतात गोलंदाजी करावेसे वाटणार नाही अशी परिस्थिती केली त्याची!

सचिन तेंडुलकर! १९ चेंडूत पन्नास! चार षटकार, पाच चौकार! त्यातील सात फटके एकट्या कादीरला अन उरलेले दोन अक्रमला!

अक्षरशः उड्या मारल्या श्रीकांतने एकदा तर! मॅचच फिरली.

पण हारलाच भारत! दुसऱ्या बाजूने शेवटचा गडी धावा करू न शकल्यामुळे ओव्हर्स संपल्या अन पाकिस्तान जिंकला तेव्हा अक्रम आणि यच्चयावत खेळाडूंनी त्याच्याकडे येऊन हस्तांदोलन करून अभिनंदन, खरे तर 'परत नको बाबा भेटूस' असे भाव व्यक्त करण्याचे काम केले.

आणि सचिन लीलया हाफ व्हॉलीवर येऊन कादीरला साइटस्क्रीनवरून बाहेर फेकत असताना अख्खा भारत जल्लोष करत होता... फक्त...
दोनच मने ती मॅच समोर चाललेली असूनही क्षणाक्षणाला तीळ तीळ तुटत होती...

महेश श्रीनिवास पेंढारकर

आणि

नैना राजाराम शिंदे.. चि‌. सौ. का. नैना राजाराम शिंदे.. उद्याची सौ. नैना संग्राम कदम....

आज सीमांत पूजन होतं!

नाही नाही म्हणत, आजवर आपल्यावर झालेल्या प्रत्येक उपकाराचे योग्य ते स्मरण ठेवून राजा अन शीलाने अगदी श्रीसकट सगळ्या वाड्याला आमंत्रण दिले होते. आणि आज सकाळपासून महेशचा वाड्यातून पायच निघत नव्हता.

एकदाही भेटू शकला नव्हता तो तिला! आज एकदाच, वाड्यातून कायमचे जाण्याआधी कदाचित ती सेकंदभर वर पाहायला थांबली असती.. तेवढेच तोही तिला पाहणार होता.. तिच्या लग्नाला किंवा सीमांतपूजनाला तो जाणे अशक्य होते.

आणि भारत पाकिस्तान सामना संपला तशी रहदारी वाढली, सूर्याला आजचे काम झाले असल्याचे समजल्याने तो पश्चिमेला निघाला आणि..

शिंद्यांच्या घरातील लगबग अधिकच वाढली. आधीच त्या घरात काही दिवसांपासून दहा, बारा नातेवाईक आलेले होते. पण आज सायंकाळी एकदाचे कार्यासाठी निघायचे यामुळे प्रचंड लगबग सुरू झाली होती. महेशच्या भावना काय असतील हे समजून श्रीनिवास केव्हाच घराबाहेर पडला होता अन त्याला जाताना म्हणाला होता..

"आज बहुतेक मला चिटणीसांकडे राहावे लागेल.. कारण ते आजारी आहेत अन त्यांच्या घरचे सगळे गावाला गेले आहेत... "

महेशला खरा संदेश समजला होता... "बघ बेटा, एकदाचे तिला डोळे भरून बघून घे"

रक्तदाब कमालीचा वाढला होता महेशचा! आवरा आवर करून बरेच नातेवाईक आत बाहेर करत होते. सात वाजता रिक्षेतून नैनाला कार्यालयात नेणार होते.

कायम आपल्याशीच खेळणारी नैना..

सायकलवरून पडल्यावर आपल्याला लागले म्हणून रडून रडून आकांत करणारी नैना..

समीरदादाला राखी बांधून झाल्यावर आपल्याकडे सहेतुक ढुंकूनदेखील न बघणारी... "ए .. मला शिवू नकोस" म्हणणारी...

"डिंपलला ऋषी कपूर भेटलाच नसता तर? " विचारणारी...

ट्रीपचा तो पुसटसा किस... ती तिच्या घरातील भेट... ते तिचे वादळी पावसासारखे बरसणे..

मंगळसुत्र घेणारी.. रुमाल देणारी.. संभाजी बागेतल्या त्या मिठीतून स्वतःला अजिबात न सोडवून घेणारी..

आपल्यासाठी रडणारी.. आपल्यासाठी आक्रोश करणारी.. नैना.. नैना..... नैना...

का आलीस माझ्या जीवनात? कशासाठी? हे दुःख देण्यासाठी? हेच दुःख स्वतःही भोगण्यासाठी?

नंतर आठवले...

'मला पळवून ने म्हणणारी नैना' .....

स्वतःवर थुंकावेसे वाटले महेशला... एक मुलगी म्हणते.. प्रेम आहे ना? ... मग चल... आपण पळून जाऊ..

आणि आपण? आपण छक्क्यासारखे बापाला काय वाटेल याचा विचार करत बसतो अन कुढतो... लायकीच नाही आपली तिचे होण्याची...

महेश खिडकीतच उभा राहणार होता. कारण तो समोर दिसला तर दोघांची नजरानजर होऊ नये याचे शीलाकाकू व्यवस्थित प्लॅनिंग करणार होती हे त्याला माहीत होते. वरूनच तिला पाहायचे! एकदा, एकदा तर एकदा! तिने पाहिले तर... तेही!

महेशला तिथे उभे राहावतही नव्हते अन तिथून बाजूला होणेही जमत नव्हते.

ये गलियां ये चौबारा...
यहां आना ना दोबारा...
अब हम तो भये परदेसी...
अब तेरा यहां कोई नही.. अब तेरा यहा कोई नही...

नैनाच्या कुठल्यातरी नातेवाईकाने नालायकपणे लग्न साजरे करायचे म्हणून लग्नाच्या गाण्यांची कॅसेट लावलेली होती. प्रेमरोगमधील पद्मिनी कोल्हापुरे ऋषी कपूरला चिडवून चिडवून, ठेंगा दाखवून ते गाणे म्हणत होती.

आणि महेश दचकलाच... त्याचे अन नैनाचे प्रकरण वाड्यात जाहीर झाल्यापासून नैनाची ती खिडकी बंदच असायची. त्या खिडकीवर शीलाकाकूचे सतत लक्ष असायचे. आत्ताही ती बंदच होती.. पण... महेश दचकला... खिडकी अस्पष्टपणे उघडल्यासारखे त्याला वाटले..

एक गोरापान हात, मेंदीने रंगलेला, मनगटाच्याही पुढे हिरव्या बांगड्या असलेला.. महेशला दिसला.. नाजूक हालचाली करत त्या हाताने एक कागदाचा बोळा जमेल तितका लांब फेकला अन काहीही समजायच्या आत धाडकन खिडकी बंद झाली..

शहारा आला महेशच्या अंगावर! आत्ता हिला कुणी पाहिले असते तर? या पातळीवर ती आपल्याला चिठ्ठी लिहू शकते? कशी सगळ्यांची नजर चुकवली असेल तिने? ही चिठ्ठी नुसती तिथे जाऊन उचलायचीही आपल्याला भीती वाटतीय.. कसं झालं असेल हे तिचं धाडस???

पण गेलाच महेश! जायला तर हवेच होते. माणसाला चमत्कारांची अपेक्षा असते. कदाचित तिने लिहीले असेल! असा असा माणुस आपल्याला दोघांनाही पळवून नेणार आहे अन मग आपण लग्न करायचं आहे आज! काय माहीत?

कुणाच्याही डोळ्यावर येणार नाही अशा पद्धतीने अत्यंत त्वरेने तो बोळा उचलून महेश पुन्हा आपल्या घरात आला..

................. चिठ्ठी वाचायला सुरुवात केली...

"आज रात्रीपासून माझं तुझं नातं संपणार महेश.. पण मनातून? मनातून कधीच नाही संपणार.. मी दुसऱ्याची होणार.. पण मनाने नाही.. मनाने मी कायम तुझीच आहे.. अगदी माझी बदनामी झाली तरी चालेल सासरी.. पण वेळ पडली तर सांगेनच मी.. की मी तुझीच आहे.. पण तू आता हळूहळू विसर मला.. वेळ येईल तेव्हा लग्नं कर.. चांगली बायको आण.. माझ्यापेक्षाही चांगली.. मी माहेरी आल्यावर आपण एकमेकांच्या समोर सहज येऊ शकू... कारण तेव्हा मला तुझ्यापासून दूर ठेवायची जबाबदारी बरीचशी माझ्या सासरच्यांची असेल... माझं लग्न झालेलं असल्यामुळे आपल्याला एकमेकांशी चार शब्द बोलण्यात कुणी आडकाठी आणणार नाही फारसे.. पण आई बाबांनी जागाच बदलली किंवा माझ्या मिस्टरांचीच बदली वगैरे झाली तर तेही कठिण आहे... महेश.. उद्यापासून आमच्या घराची ती खिडकी.. जिथे मी बसायचे अन तुझ्याकडे बघायचे.. ती कायमची उघडेल... कारण आता तिथे नैना कधीच नसेल.. पण.. पण तू कधीतरी बघत जा हं त्या खिडकीकडे.. नेमकी त्याचवेळेस मीही तुझ्याकडे बघतीय असं मला वाटेल..

महेश, आमच्या घरामागच्या बोळातील एका कोपऱ्यात एक पिवळ्या रंगाची प्लॅस्टिकची पिशवी आहे.. त्यात तुझ्यासाठी मी एक भेट ठेवलेली आहे.. तेवढी प्लीज घे..

आज पासून माझ्याशी संपर्क करायचा प्रयत्न प्लीज करू नकोस.. त्याचे कारण त्यात माझ्या सासरच्यांची अन माहेरच्यांचीही बदनामी व्हायची शक्यता आहे... फक्त.. कधी रास्ता पेठेतून गेलास तर आमच्या मेढे वाड्यासमोर एक चहाचे दुकान आहे.. तिथे कधीतरी चहा पीत जा... कारण त्या दुकानातून माझी अन संग्रामची बेडरूम बरोबर दिसते.. कदाचित तेवढेच आपण एकमेकांना दिसू.. आग्रह नाही..

नैना हळूहळू तुझ्या आयुष्यातून पुसट होत जाईल महेश.. पण.. तिच्या आयुष्यातून तू कधीच तसा होणार नाहीस..

आज जाताना मला डोक्यावरून पदर घ्यायला सांगीतला आहे.. मामा अन मामी मला धरून नेणार आहेत.. वर बघायचे नाही असे आईने सांगीतले आहे... वीराच्या मारुतीच्या कट्यावर उभा राहा... सव्वा सात वाजल्यापासून.. वाड्यासमोरची रिक्षा हालली की टक लावून पाहा... ज्या रिक्षेत मामा अन मामी असतील त्या रिक्षेत मी मधे बसलेली असेन... तुला माझा चेहरा नाही दिसू शकणार... पण मला तू क्षणभर नक्कीच दिसशील.. त्यावर उरलेले सगळे आयुष्य घालवीन मी... आणि तू तिथे दिसलास.....

..... तरच तुझंही माझ्यावर खरं प्रेम होतं हे मानेन मी...

.... आय लव्ह यू महेश... लव्ह यू... "

चिठ्ठी वाचून महेशच्या मनात जी आक्रंदने झाली त्याचे वर्णन करणे शक्य नाही. कोणत्याही कवीला, लेखकाला शक्य नाही.

या मुलीला एवढेही समजत नव्हते? की समीरदादा आधीच सासरच्यांना सांगून आला आहे की ही कुणावर तरी प्रेम करते, हिला सून करून आणू नका, असे असताना ही चिठ्ठी लिहीते? एवढी मोठी चिठ्ठी?

काय प्रेम आहे का काय? 'तू दिसलास तर मी समजेन तुझंही प्रेम आहे'! ???? आपण फक्त दिसायचं? आपलं फक्त दिसणं हेही प्रेम सिद्ध करायला पुरेसं आहे? आणि आपण तिच्याकडून, तिच्या घरच्यांकडून आपल्या वडिलांकडून मात्र अपेक्षा करणार! माझं अन तिचं लग्न लावून द्या! नपुंसक आहोत आपण नपुंसक! बाकी काही नाही. तिने पळून जायचा प्रस्ताव मांडायचा, तोही लेखी, स्वतःच्या घरात कुणीही नसताना आपल्याला घरात घ्यायचं का तर आपल्याला तिचा सहवास हवाहवासा वाटतो. आपल्याबरोबर संभाजी पार्कमधे यायचं अन अंधार्‍या कोपर्‍यात बसायचं! हे सगळं तिने करायचं! आणि आपण? आपण परवानग्या अन अ‍ॅप्रूव्हल्स मागत बसणार घरच्यांची! थुत!

तीरासारखे जाऊन तिला ओढून आपल्या घरात आणावे असे वाटत होते त्याला! पण ते त्याच्या रक्तातच नव्हते. खरच!

चूपचाप वीराच्या मारुतीपाशी जाऊन उभा राहिला तो! राजाकाका आणि शीलाकाकूचे महेशवर डोळ्यात तेल घालून लक्ष होते. मान खाली घालून उदासपणे वाड्याच्या बाहेर पडणारा महेश पाहून त्यांना बरे वाटले. ऐनवेळेस काहीतरी अचाट उपद्व्याप होणार नाही हे त्यांना समजले. त्याला नैना चाललेली बघवणार नाही म्हणून तो बाहेर जात आहे असे त्यांना वाटले. हा वीराच्या मारुतीच्या आड लपून राहिला. अंधार पडलेला होता. श्वास रोखून वाड्याच्या दाराकडे पाहात होता महेश! आणि..

... दोन रिक्षा आल्या. दोन्ही रिक्षेत लगबगीने सहा माणसे बसली. एकात दोन बायका एक पुरुष आणि दुसर्‍यात एक बाई अन दोन पुरुष! अर्थातच, दोन बायका अन एक पुरुष म्हणजे तिचे मामा, मामी अन ती असणार होते हे महेशने ताडले. पापणीही न लववता तो त्या रिक्षेकडे पाहात होता. रिक्षा सुरू झाली अन महेशने सरळ दोन पावले पुढे टाकली. असे न होवो की काही कारणाने तिला आपण दिसलोच नाही.

काय प्रसंग होता तो! रिक्षा भर्रकन निघून जाताना मधल्या सीटवरच्या बाईच्या डोक्यावरील पदर तिच्या डाव्या हाताने वर झाला होता आणि उजवा हात महेशकडे पाहून हालला होता. नक्की दिसले असे नाही, पण नैनाचे डोळे रडून रडून लालबुंद झाले असावेत असे एका दुकानाच्या प्रकाशात तिचा चेहरा दिसल्यामुळे महेशला वाटले. महेशनेही अर्थातच दोन्ही हात हलवले होते. हरिहरेश्वरापलीकडे रिक्षा जाईपर्यंत महेश डोळ्यांनीच त्या रिक्षेचा पाठलाग करत होता. त्यानंतर मात्र इतर वाहनांमुळे ती रिक्षा दिसेनाशी झाली आणि वीराच्या मारुतीच्या कट्ट्यावर कोसळून महेश कधी नव्हे असा रडू लागला.

कधी नव्हे असा....

खरे तर तो रडत नव्हताच! स्वतःच्याच काळजाचे तुकडे झालेले अनुभवत होता. अशी वेळ वैर्‍यावर येऊ नये!

हा मुलगा असा का रडत असावा हे रस्त्यावरच्या कुणालाही समजत नव्हते. एका वीराच्या मारुती शिवाय आणि लांबवर असलेल्या गंभीर हासणार्‍या ओंकारेश्वराशिवाय!

सगळंच संपलेलं होतं! आता दास्ताने वाड्यात राहण्याचीही इच्छा होत नव्हती. गरजच नव्हती तिथे राहण्याची! काय करणार तिथे राहून? ती खिडकी उद्या सायंकाळपासून उघडेलच काकू! कोण दिसणार आहे आता तिथे? काय केलं हे आपण? आत्ता तिच्या सासरच्यांना चिठ्ठी नेऊन दाखवली तर तिचं लग्न मोडेल! करू शकू आपण हे? इतके वाईट होऊ शकू एखाद्या कुटुंबाच्या निरागस आनंदाच्या बाबतीत! का होऊ नये? आपला आनंद जर नैनाला प्राप्त करण्यात आहे तर तिच्या आईवडिलांचा आनंद त्यासाठी हिरावून घेण्यात आपल्याला कोणती विवेकबुद्धी विरोध करतीय? कसले हे नपुंसक संस्कार? का हे सहन करायचे? अजूनही वेळ गेलेली नाही. कदमांना ही चिठ्ठी दिसली तर कार्यालयातून निघूनही जातील. पण...

पण आपल्यात ती हिम्मत नाही.

आत्ता समजलं! बाबा घरातून का निघून गेले ते! कारण त्यांचा आपल्यावर विश्वास आहे. आपण नैना वाड्यातून निघतानाही मनातल्या मनात आक्रोशण्याशिवाय काहीही करू शकणार नाही ही आपली भ्याड प्रवृत्ती त्यांना माहीत आहे.

व्वा! वा वा महेश पेंढारकर! काय बोलायचं तुमच्या क्षमतेबद्दल? फारच सेफ प्रेम करता तुम्ही! थू साल्या तुझ्या जिंदगानीवर! थू: .....!

भेट? भेट काय ठेवलीय आपल्यासाठी मागच्या बोळात?

रडके डोळे घेऊन महेश मागच्या बोळात धावला. खरोखरच एका अंधार्‍या, दुर्लक्षित कोपर्‍यात एक प्लॅस्टिकची पिवळी पिशवी होती. घाईघाईने त्यातली वस्तू बाहेर काढली त्याने!

एका सुंदर बागेत एक तरुण जोडपे एकमेकांच्या बाहुपाशात रममाण झाल्याचे पेंटिंग असलेली एक फ्रेम होती ती! चांगली दिड फूट बाय दिड फूट! खाली लिहीले होते...

"तुझेच असल्यावर कुणाचीही झाले तरी काय? तुझीच राहणार ना?"

एखादा माणूस किती रडू शकतो हे समजले असते त्यावेळेस कुणी महेशला पाहिले असते तर! आणि पाहिलेच...

महेशच्या खांद्यावर एक हात पडला मागून! आश्वासक असा!

किरणदादा! किरणदादाच्या मागे कुमार साने होता! फॅशनेबल राहणारा... आणि लांब बोळाच्या सुरुवातीपाशी.. समीरदादा....

एकमेकांचे संदेश, धीर देणे, पुन्हा रडणे या सर्व गोष्टी नजरेतूनच झाल्या... त्यानंतर कुमार काहीतरी बोलला.. इंग्लीशमधेच... आणि पाचव्या मिनिटाला महेशला दोन, तीन महिन्यांपुर्वीच आणलेली नवी कोरी एम एटी आणि कुमारची बजाज चेतक यावरून निघालेले चार जण...

... डेक्कन जिमखान्यावरील 'सितारा' या अंधारी बारमधे बसलेले होते..

ओल्ड ट्रॅव्हर्न व्हिस्की ही अत्यंत स्वस्त व्हिस्की असल्यामुळे तीच परवडू शकत होती.. आणि तिच्या किंमतीशी काहीही देणे घेणे नसलेल्या महेशने आयुष्यातला पहिला घोट इतका मोठा घेतला होता की सिक्स्टीचा पेग अर्ध्यावर आला होता..

कुठेतरी उगीचच जगजीतसिंग बरळत होता...

तुम नही.. गम नही.. शराब नही...
ऐसी तनहाईका जवाब नही...

हळूहळू व्हिस्कीने आपला प्रताप दाखवायला सुरुवात केली. पहिला पेग चांगलीच चढवून गेला. शरीराला 'अल्कोहोल रक्तात मिसळण्याचा' अनुभवच नसल्याने शरीर अजूनही तसे साथ देत होतेच! दुसरा पेग भरला तरी अवाक्षर काढले नव्हते कुणीही...

अच्छा अच्छा! असंय होय? म्हणजे तू, दु:ख किंवा दारू यातील काहीही एक जरी असले तरी एकांत जाणवत नाही तर! बर बर! जगजीत सिंगा... तुला लाख लाख सलाम बाबा! अरे पण? असं कसं म्हणतोस? ती असल्यावर एकाकीपण कसं जाणवेल?

याचं उत्तर हळूहळू संपू लागलेल्या दुसर्‍या पेगने दिलं!

ती असल्यावरही, ती असतानाही एकाकीपण जाणवावं ही प्रेमाची अशी अवस्था आहे जिथे तिच्या प्राप्तीची कोणतीही अभिलाषा उरलेली नसते व माणूस केवळ जिवंत आहोत म्हणून जगत असतो.

म्हणजे? म्हणजे जगात अशी काही माणसेही असतात ज्यांच्या मुहब्बतीचा इजहारच झालेला नसतो. त्यामानाने आपण तर किती सुखी?

गाहे गाहे इसे पढा कीजे
दिलसे बेहतर कोई किताब नही...

वा वा! वा जगजीत सिंग वा! खरंय रे बाबा! तू नुसताच गातोयस... माझं मन वाचायला काढलं तर सालं आयुष्य नकोसं होईल!

"भर"

कुमार साने या विवाहीत माणसाला आपण 'अहो, जाहो' करतो हे पूर्णपणे विसरून महेश कुमारला म्हणाला.. "भर"!

कुणीही अजून बोलत नव्हते. कुमारने सरळ महेशचा तिसरा पेग भरला. त्या तिघांचाही दुसरा संपायचा होता. व्हिस्की आता अगदी मेंदूतून दिग्दर्शन करायला लागलेली होती.

"ही दारूय का रे?"

महेशचा तिसरा पेग अर्धा झालेला असताना त्याने विचारलेल्या या प्रश्नावर मात्र हास्याचा धबधबाच फुटला. जो तो एकमेकांना टाळ्या देत हसायला लागला.

आणि परिणाम किती विचित्र होतो पहा व्हिस्कीचा! तेही पहिल्यांदाच घेतलेल्या! ती व्हिस्की आपल्याला आपल्यावरच हसायचे बळ देते...

.. महेश चक्क हसू लागला.. खो खो..

तोही समीरदादाला टाळ्या देऊ लागला.. इतके प्यायला नको आहे हेच सगळे विसरून गेलेले होते..

काहीतरी खावे ही भावनाही प्रचंड भूक लागलेली असून नष्ट होत होती... कारण ओल्ड ट्रॅव्हर्नचा प्रत्येक पेग फुल्ल सोड्याबरोबर घेतला जात होता... किरणने हळूच चार्म्स पेटवली.. मग कुमारने त्याची फोर स्क्वेअर स्पेशल काढली... कुणाचीही अन कशाचीही लाज न बाळगता महेशने सरळ किरणदादाच्या हातातली चार्म्स बोटांनी ओढली अन फकाफका फुंकली... अजूनच चढली दारू!

आता मात्र अती होऊ लागले होते. एकतर पहिल्यांदा घेतलेली! त्यात केवळ पंचेचाळीस मिनिटांमधे तीन लार्ज संपवून हातात चवथा लार्ज तयार! आता सेन्सिबल बोलणे शक्य होत नव्हते महेशला! समीरलाही इतकी सवय नव्हतीच! कुमार आणि किरण यांना बर्‍यापैकी सवय होती तशी! महिन्यातून तीन चार वेळा तरी ते एकमेकांबरोबर बसायचे! आणखीन कुणाबरोबर बसत असले तर माहीत नाही.

किरण - तू घेतलीवतीस आधी का आजच पहिल्यांदा?
समीर - ए.. तुला विचारतोय दादा...
महेश - .. का... य?
किरण - पहिल्यांदा घेतलीस का आज?
महेश - हं! ... क्का?
किरण - अंहं! विचारलं! .. फार घेतोयस पण तू.. पहिल्यांदा घेण्याच्या मानाने..
कुमार - ही एज कॅरींग अ ब्रोकन हार्ट... इनसाईड हिम... लेट हिम ड्रिन्क मॅन..
महेश - ए समीरदादा... हा लेकाचा साने इंग्लीश का बोलतो रे?

पुन्हा तिघे हसायला लागले. यावेळेस महेशला हसू आले नाही. त्याला गरगरू लागले होते.

चिकन तंदुरी आले. महेश सोडून सगळे त्यावर तुटून पडले. महेशला खारेदाणेही खायची इच्छा होत नव्हती.

महेश - म्म... मला.. इथे..... इथे का आणलंत रे.... भाडखाऊंनो...???

महेश कधीही शिव्या देत नाही याची पूर्ण जाणीव असल्यामुळे पुन्हा सगळे हासले. आता त्यांच्या हासण्याचा रागही येत नव्हता त्याला! त्रास होत होता त्याला! तरीही चवथ्या पेगचे घुटके घेतच होता तो!

उत्तर मिळाले. मगाशी अगदी जवळून यतोय असे वाटणारा कॅसेटचा आवाज आता अगदी परग्रहावरून येत असावा असा सुखद वाटत होता... आणि शेख आदम आबूवालाचा मक्ता पंकज उधास टाळ्या घेऊन ऐकवत होता...

शराब इतनी शरीफाना चीज है 'आदम'
के पीके आदमी सच बोलता है सुबहो शाम
खुदा का शुक्र है वर्ना गुजरती कैसे शाम...
शराब जिसने बनायी उसे हमारा सलाम... उसे हमारा सलाम..

'वर्ना गुजरती कैसे शाम' या ओळींनी ४४०चा शॉक बसावा तशी उतरली महेशची! डाव्या हाताशी मगाचची फ्रेम होती. त्या फ्रेमवर हात फिरवताना आत्तापर्यंत प्यायलेली ओल्ड ट्रॅव्हर्न अश्रू होऊन डोळ्यांमधून घळाघळा वाहू लागली.

तिघांनाही माहीत होतं त्याचं कारण! त्याला एकदाच, मनापासून भरपूर रडवायलाच आज त्यांनी त्याला इथे आणलेले होते. त्याला व्यसन लागावे अशी इच्छा तर नव्हतीच, उलट आपल्यामुळे त्याला व्यसन लागू शकेल याची भीती व पश्चात्तापही होता. पण.. तरीही सगळ्या विवेकबुद्धीच्या विचारांना बाजूला करून ते त्याला इथे घेऊन आले होते. हा उपाय निश्चीतच नव्हता. पण रडण्यासाठी, मन मोकळे होण्यासाठी मदत होणार होती. इतके रडल्यानंतर कदाचित त्या कारणाने महेश पुन्हा निराश झालेला दिसला नसता. आणि आज त्याला वाड्यात एकट्यालाच ठेवले असते तर रात्री त्याने काय केले असते याची सगळ्यांना भीती वाटत होती. कारण श्री काकाही घरी नव्हते. एकतर महेशने स्वतःला तरी काहीतरी इजा करून घेतली असती किंवा वेड्यासारखा कार्यालयात जाऊन काहीतरी विचित्रही वागला असता. त्यापेक्षा आपल्या नजरेसमोर तो असावा यासाठी त्यांनी त्याला इथे आणलेले होते. वीराच्या मारुतीपाशी तो उभा राहिला त्याही आधीपासून तिघांचेही त्याच्यावर लक्ष होते. आणि आत्ता या क्षणी त्याला रडताना पाहून कुणीही रडू नकोस असे म्हणत नव्हते. उलट त्यांना वाटत होते त्याने आणखीन रडावे! एकदाचे अश्रूंबरोबर नैनाला मनातून पुर्ण काढून टाकावे. मात्र समीरला त्याचे रडणे पाहवेना! त्याने हळूच महेशच्या पाठीवरून हात फिरवला.

तीच समीरची चूक ठरली. समीरदादाचा प्रेमळ हात पाठीवरून फिरताच महेशला आवरले नाही. त्याने बसल्याबसल्याच समीरला मिठी मारून ओक्साबोक्शी रडायला सुरुवात केली. 'सितारा' बारमधील वातावरण एकदम भयानक गंभीर झालं! स्टाफही यांच्याकडे पाहायला लागला. कुमार आढ्याकडे बघत फोर स्क्वेअरचा धूर सोडत होता. किरण चार्म्सचे थोटूक करत मान खाली घालून बसला होता. आणि महेश आणि समीरचे शर्ट्स एकमेकांच्या डोळ्यांमधील पाण्याने भिजत होते.

आवेग ओसरला तेव्हा सगळे अवाकच झाले...

"मी रडायला नको होते.. सॉरी... मगाशी शिवी बिवी दिली असली तरी सॉरी... यापुढे नैना हा विषय संपला... माझ्यासाठी अन तुमच्याहीसाठी... ओके?... प्लीज आस्क हिम टू रिपीट द ब्लडी ड्रिन्क... "

मध्यरात्री दिड वाजता चौघेही दास्ताने वाड्यात आले तेव्हा मावशी, राजश्री अन मानेकाका जागेच होते. प्रमिला अन मधूसूदन तर वाड्याच्या दारातच होते. समीरने येताना तीन चार पाने खाल्लेली होती. गार वार्‍यामुळे त्याची उतरलेलीही होती. त्यामुळे त्याच्या तोंडाचा वास येत नव्हता. कुमारच्या अन किरणच्या तोंडाचा वास आला तरी वाड्यातील कुणीच त्या दोघांना काहीहीबोलू शकत नव्हते. आणि येणारा दारूचा वास हा किरण व कुमारने प्यायल्यामुळे येत आहे व महेश व समीर पिणे शक्यच नाही अशी खात्री असूनही महेश लडखडत चालत आहे हे पाहून प्रमिलाने पुढे होऊन त्याच्या श्रीमुखात भडकावली होती... आणि जिना चढून वर जाताना दारात आजी उभी आहे हे पाहून महेशने मान खाली घातली. पवार मावशी टक लावून त्याच्याकडे पाहात होत्या. तोपर्यंत मधूसूदनने समीरच्या श्रीमुखात भडकावलेली होती खाली. कुमार अन किरण गपचूप अपराधी नजरेने आपापल्या घरात निघून गेले होते.

मावशी - आत्ता झोप.. उद्या बोलू...

महेशने पश्चात्तापाचा अतिरेक झाल्यामुळे खाडकन आपल्य अखोलीचे दार लावून घेतले अन कुठेही न पाहता सरळ पलंगावर आडवा झाला..

गुंगीमुळे पूर्ण झोप लागायच्या आधी त्याला तीनच गोष्टी जाणवल्या होत्या...

आपल्यावरील आत्यंतिक प्रेमामुळे वाड्यातील अभ्यंकर आजी सोडल्या तर एकही माणूस लग्नाला गेलेला नव्हता...

नैनाला आपण थोडीशी साथ दिली असती तर आज ती आपलीच राहिली असती....

... आणि....

... आपण पहिल्यांदा दारू प्यायल्यामुळे की काय कोणास ठाऊक... पण झिरोच्या बल्बच्या प्रकाशात दिसणारे फोटोतल्या आईचे डोळे किंचित... अगदी किंचित... रागीट वाटत आहेत...

=============================================

'तीन महिन्यांच्या पार्टटाईम जॉबमधून चार हजार पाचशे रुपये फिटले आता नवीन एम. एटी. साठी बर्गेंनी दिलेल्या नऊ हजारापैकी'

चिटणीसांकडे रात्री राहून सकाळी उठून कंपनीत काम झाल्यावर तिथून थेट बर्गेंच्या ऑफीसमधे प्रवेशताना श्रीच्या मनात विचार येत होता. काल रात्री महेशने काय केले बघायला हवे असेही त्याला वाटत होते.

बर्गे - या या पेंढारकर साहेब.. या..

बर्गे आपल्याला पगार देऊनही साहेब म्हणतात याची श्रीला लाज वाटायची.. पण पर्याय नव्हता. आपण कंपनीत जोवर स्टोअरचे सिनियर ऑफीसर आहोत तोवर तो साहेबच म्हणणार हे त्याला माहीत होते.

नेहमीचे काम चालू असताना श्रीच्या टेबलसमोर अचानक बर्गे आला.

श्री - ... येस सर...
बर्गे - काही नाही.. म्हंटलं तीन महिने झाले... आवडतंय की नाही काम पाहावं...
श्री - म्हणजे काय सर? आवडतच आहे की? ... काही चुकलं तर सांभाळून घ्या..
बर्गे - छे छे! अहो इतक्या अनुभवी माणसाने उलट आमची रेकॉर्ड्स सांभाळायला पाहिजेत....
श्री - तसं काही नाही सर...
बर्गे - साहेब ते... तुमच्या मागे पडलेले बॉक्सेस कसलेत हो?
श्री - हे.. मिसमॅच सेट्स आहेत काही काही..
बर्गे - बापरे! किती तरी आहेत.. बरीच व्हॅल्यू असेल...
श्री - काय करणार!
बर्गे - मी काय म्हणतो साहेब! एकदा... तुमच्या अधिकारात सगळं.. मॅचिंग करून द्या की..
श्री - ... सर.. तुम्हाला माहीतच आहे..
बर्गे - नाही नाही आय अ‍ॅग्री... आय अ‍ॅग्री... सिस्टीम आहेच... पण शेवटी आमचीही चूक नाही ना चोरी झाली त्यात..
श्री - नाही नाही सर चूक नाही म्हणत मी... पण त्यात .. म्हणजे.. कंपनीचा काही दोष नाही ना..
बर्गे - अरे हो! हे डोक्यातच आलं नव्हतं माझ्या.. सॉरी हं! मला वाटायचं की धंद्यातही माणूसकी पाळता येते...

हा टोमणा भयानक झोंबला श्रीला! बर्गेने काहीही आवश्यकता नसताना श्रीला नऊ हजार रुपये अ‍ॅडव्हान्स देऊन सहा महिने पंधराशे रुपयांचा पगार देऊ केला होता व ते पैसे तो पगारातून वळते करून घेत होता. अत्यंत आवश्यक असताना श्रीला हा जॉबही मिळालेला होता आणि एम एटी ही घेता आलेली होती. उपकारच होते बर्गेंचे! बर्गेंनी उगाचच धंदा करतानाही माणूसकी दाखवलेली होती. आणि श्री मात्र ती दाखवत नाही आहे हे त्याच्या निदर्शनास आणलेही होते.

प्ण श्रीला ते काम म्हणजे माणुसकी वाटत नव्हती. उद्या बर्गे हक्काने म्हणाले असते की रात्रभर थांबून हे कंप्लीट करा तर तो थांबलाही असता. पण कंपनीतून मिसमॅच बेअरिंग्ज मुद्दाम बाहेर काढून बर्गेंकडचे मिसमॅच सेट्स मॅच करुन द्यायचे हे त्याला भ्रष्ट कामच वाटत होते.

पण श्री आता उपकारांखाली दबलेला होता. त्यातूनच तो म्हणाला..

श्री - बघतो मी सर... काही करता येतंय का...
बर्गे - बघा ना... उद्या सकाळी टाकू का ऑर्डर पुढची?

एक मोठा पॉज घेऊन श्री म्हणाला..

".... ... टाका"

प्रचंड ताणामधेच घरी पोचलेल्या श्रीला काल रात्री आपल्या चिरंजीवांनी दारू प्यायलेली आहे हे माहीतही नव्हते अन वाड्यातील कुणी सांगीतलेही नाही. महेश काल रात्री झोपलेला आज दुपारी एक वाजताच उठला होता एकदम! बाबा आल्यावर त्यांना काकू किंवा आजी सांगणार अन आपल्याला प्रचंड झाप मिळणार असे त्याला वाटत होते. त्यातच भयानक हॅन्ग ओव्हर होता. डोके दुखत होते. कालचे सगळे पेग्ज आता प्रताप दाखवत होते. आवाज झाला तरी डोक्यातून कळ येत होती. भूक लागली होती अन कितीही खाल्ले तरी पोटातील राहिलेल्या अल्कोहोलची भावना मनातून जात नव्हती. संध्याकाळी सातच्या आसपास कुठे जरा त्याला बरे वाटू लागले होते. समोर पाहिले तर कार्यालयातून शिंद्यांकडचे सगळे परत आलेले होते. दास्ताने वाड्यातील संपूर्ण मजा अन आनंद संपल्याचे महेशला आणखीनच जाणवले. बाबा आल्यावर थकलेले असतील म्हणून त्याने बाहेरून दोन प्लेट भाजी आणली अन भात व वरण लावले. पोळ्या मात्र बाबांनाच कराव्या लागणार होत्या!

जेवताना अत्यंत जुजबी बोलणी झाली दोघांची! झोपायच्या आधी मात्र आत्यंतिक ताणामुळे महेशने खर्जातल्या अन पश्चात्तापाच्या आवाजात खाली बघत सांगीतले..

"बाबा... काल मी चुकून... दारू प्यायलो... मला ... क्षमा करा...."

श्रीनिवास पेंढारकर - एक बाप!

हारल्याची भावना आली त्याच्या मनात! कधीतरी आपणही दोन घोट लावलेले होते पिट्याबरोबर हे त्याला आठवले. "पुन्हा कधी पिऊ नकोस" हे वाक्य अत्यंत शांत आवाजात म्हणून श्री सरळ महेशकडे पाठ करुन झोपून गेला. त्याही अवस्थेत त्याचे लक्ष रमाच्या फोटोकडे होते. भ्रष्टाचारात उद्या सकाळी सामील व्हायचा ताण आणि उत्तम संस्कारांमध्ये वाढवलेल्या आपल्या बाळाने काल दारू प्यायलाचा ताण तो रमाला नजरेतून सांगत होता.

दुसर्‍या दिवशी सकाळी ऑफीसला गेल्यापासूनच श्रीचे लक्ष सतत मॅचिंग बेअरिंग्जकडे लागलेले होते. डब्ल्यू. आय. पी. मधून येणारा सर्व माल आज तो स्वतः जातीने तपासत होता. दुपारी दोन वाजता लंचनंतर त्याला हव्या त्या बेअरिंग्जचे लॉट्स स्टोअरमधे आले.

कोणाचेही लक्ष नाही असे पाहून श्रीने हवी ती बेअरिंग्ज काढून खोटी पॅकिंग लिस्ट प्रिन्ट केली अन बॉक्समधे टाकली. कंत्राटावर असलेल्या पोरांनी 'साहेबांनी लिहिल्याप्रमाणे' पॅकिंग केले अन काहीही माहीत नसलेल्या स्वातीने इन्व्हॉईस केले. बर्गेंचा एक उगीचच रेंगाळणारा माणूस ते सगळे हळूच लांबून निरखत होता.

'बर्गे ऑटो' असे इन्व्हॉईस अन एक्साईजचे कागदपत्र तयार झाल्यावर सप्रेंच्या सह्या अन शिक्के झाले अन टेम्पोत माल भरला गेला त्याच क्षणी बर्गेंच्या माणसाने स्वतःच्या ऑफीसमधे फोन करून काहीतरी सांगीतले.

सगळंच सोपं वाटलं होतं श्रीला! पण मनात प्रचंड पश्चात्ताप होता. आणि तो कंपनीतून बर्गेंच्याकडे जायला निघणार तेवढ्यात ई.डीं. च्या ऑफीसमधून आलेला फोन सप्रेंनी घेतला अन श्रीला बोलावले..

"आय थिन्क ही हॅज अ‍ॅप्रूव्हड दॅट ओल्ड केस टूडे, मीट हिम, ओके? आय अ‍ॅम लिव्हींग द ऑफिस नाऊ, टेल मी टूमॉरो.."

हादरलेला श्री धापा टाकत ई.डीं. च्या ऑफीसमधे पोचला. एका विशाल केबीनमधे साहेब बसलेले होते. पी.ए. ने श्रीला आत जायला सांगीतलेले होते. साहेब गंभीर नजरेने कोणतेतरी कागद तपासत होते.

श्री - ... गुड ... इव्हिनिंग सर..
साहेब - ओह? आलात ? या ... बसा... देअर इज समथिंग सिरियस टू टॉक अबाऊट...

तब्बल पाच मिनिटे हादरलेला श्री साहेबांकडे बघत नुसता खिळून बसलेला होता. साहेबांनी कागदपत्रे बाजूला सरकवली अन म्हणाले...

साहेब - मि. पेंढारकर... आय हॅव कम टू नो दॅट यू ऑल्सो वर्क फॉर बर्गे ऑटो इन द इव्हिनिंग?

पंधराव्या मिनिटाला हातात 'यू आर रिलीव्हड अ‍ॅन्ड यू कॅन कलेक्ट यूअर रिफंडेबल अमाऊंट विदिन टू डेज' असे पत्र घेऊन .....

श्रीनिवास पेंढारकर... गालांवर ओघळणार्‍या पाण्याच्या सरी रुमालाने टिपत.... चालत चालत आपल्या घरी निघालेले होते....

एक बाप.... आज केविलवाणा झालेला होता.... केविलवाणा.....!!!

गुलमोहर: 

अरेरे...खुप वाईट....बिचारे पेंढारकर....
बेफिकीर रडवलत आजही....

केवळ निशब्द........बाकी लिखाण मस्तच नेहमीप्रमाणे.....सुरेख

सावरी

दुखद घटनांचा दिवस! महेश-नयनाची ताटातूट आणि श्रीनिवास चा जॉब जाणे. आता काय होईल? दुर्दैव.....

उत्तरार्ध वाचून मूड बदलायच्या आत पूर्वार्धाविषयी...

एकट्या पडलेल्या श्रीचे मनोगत वाचतांना फार त्रास झाला...

श्री उपाशी झोपण्याच्या तयारीत असतांना प्रमिलाने त्याला त्याची आवडती आर्वीची भाजी आणून दिली...हा पूर्ण प्रसंग फार आवडला वाचायला.

"मी बरी उपाशी झोपू देईन तुम्हाला">>> रमाचे हे श्रीच्या कानातले हळूवार शब्द... तिचे त्याच्या आसपास कायम असणे आणि त्याची श्रीला प्रत्येकवेळा येणारी अनुभूती नेहमी एका वेगळ्याच जगात घेऊन जाते. अशाप्रकारचे सगळेच प्रसंग फार सुंदर खुलवले आहेत तुम्ही, बेफिकीरजी...

=====================================================

अरेरे!!! महेश-नैनाचे लग्न नक्की होणार हे गृहितच धरून चालले होते... शेवटी नाहीच झाले ना, अगदी दिपू-काजल प्रमाणेच Sad

=====================================================

बापरे! एका धक्क्यातून सावरत नाही तोवर श्रीची नोकरी गेली हा अजूनच मोठा धक्का मिळाला... श्री ने केलेली अफरातफरसुद्धा बाहेर येणार की काय आता? Uhoh दु:खाची, संकटांची मालिकाच सुरू झाली की आता Sad

मला अजिबात आवडला नाही हा भाग. का हो असे रडविता? छा, सगळ्या दाटून राहीलेल्या भावना बाहेर पडू पाहतायत. खपली काढलीत तुम्ही साहेब.

बेफिकिर जि, काय हे, राव, नेना च लग्न ठरवलत, महेश दारु प्यायला लागला, अनि आता, श्रि चि नोकरि....

बाकि, मस्तच झालय. Happy