त्या आठवणी....

Submitted by पल्ली on 1 May, 2008 - 14:46

मिरजगावकर म्हणुन मला पहिली ते चवथीत एक छान बाई होत्या. मोनालिसासारखं त्यांच्या चेहर्यावर गूढ हास्य असायचं...कानात सोन्याच्या मोठ्या रिंगा आणि कपाळावर मोठ्ठी टीकली. काय गोड दिसत त्या...माझ्यावर त्यांचा खुप जीव होता. मलाही त्या खुप आवडायच्या. मला छान चित्रं काढता येतात म्हणून त्या नेहमी मला फळ्यावर चित्र काढायला लावायच्या. मला अभिमानानं भरुन यायचं अगदी. त्यांच्या वाढदिवसाला मी एखादा गजरा, फुल, छोटासा केक असं काही न्यायची. काहीच नाही तर ग्रिटिंग कार्ड तर जरुर असायचं...स्वतः बनवलेलं!
माझा वाढदिवस त्याही कधी विसरल्या नाहीत. मुलीसारखं प्रेम करायच्या माझ्यावर. त्यांच्यामुळे रोज शाळेत जावंसं वाटायचं. त्यांच्यासाठी बुचाची फुलं गोळा करण्यात केवढा आनंद व्हायचा! माझ्या आईशी त्यांची गट्टी झाली होती, एकमेकीची सुख्दु:ख सांगाय्च्या म्हणे आपापसांत. त्यांना सासरी त्रास होता म्हणे. नवरा जणु वैरी साता जन्माचा. शाळा सुटल्यावर अर्धा तास तरी गप्पा व्हायच्या. आईनंही आमची कथा सांगितली असणार्.....दोघींनी एकमेकींचे डोळे पुसल्याचं मी स्वप्नांत सुद्धा पाहीलं होतं!
वर्ष १९८४! बहुधा ऑगस्ट महीना असावा.... निटसं आठवत नाही. त्यांचा वाढदिवस होता. त्यांच्यासाठी एक गुलाबाचं फुल आणि लिमलेटच्या गोळ्या घेउन मी आणि माझी आई लगबगीनं शाळेकडे निघालो. बारिकसा रिमझिम पाऊस पदत होता. हवेत मस्त गारवा होता. मनात एक आनंदी फुलपाखरू बागडत होतं. सगळ्यांसमोर मी ऐटीत बाईना शुभेच्छा देणार होते. शाळा कधी जवळ आली कळलंच नाही. जशी जशी शाळा जवळ येउ लागली तशी आईच्या हाताची पकड माझ्या हातावर घट्ट होत चालली होती. शाळेच्या दाराशी आल्यावर आई जबरेच्या आवाजात म्हणाली, पल्ल्या-तु इथेच थांब.....
मला कळेना काय झालं? मी केविलवाणं होत म्हणाले,'मी पन येते ना प्लीज....'
आईनं एकवार वळुन माझ्याकडे पाहीलं ....'चल'
आणि मी उड्या मारतच आईबरोबर त्या शुभ्र एंब्युलन्स्पाशी पोचले. आतल्या थंड गार काळ्या रेक्झिनच्या लादीवर मिरजगावकर बाई शांत झोपल्या होत्या. शाळा भरायच्या वेळेला कशा काय झोपल्या ह्या? मी मनांत म्हणत राहिले...उठा ना बाई, मला हे फुल द्यायचंय तुम्हाला. तेवढ्यात आईचे शब्द आले,'नमस्कार कर बाईना.'
'अगं पण तुच तर म्हणतेस ना झोपलेल्या माणसाला नमस्कार करु नये म्हणुन्..मग आ....'
माझा 'आ' तसाच राहीला. आईनं मला तिच्या पोटशी घट्ट धरलं होतं.....शाळेचे शिपाई काका म्हणाले...'भडका झाला म्हने स्टोव्हचा..' कोणीतरी म्हणालं 'झाला कसला? घडवला असणार त्या....' बाईचा लय जीव शाळंवर्..म्हनून तर इथवर आणलं' 'आता कोण त्यांच्या लेकरासनी बघनार व्हं?'

शुभ्र अँब्युलन्स निघाली.

आई म्हणाली, 'बाईंना नीट बघुन घे. परत दिसणार नाहीत त्या. देवाकडे गेल्या त्या..'
मी खिडकीतुन पहाण्याचा प्रयत्न केला. बाईंचा चेहरा थोडासाच दिसला, भाजल्यासारखा. किती सुंदर फुलं होती बाईंच्या अंगावर. बाईंना पिवळा चाफा आवडतो, तो कसा नाही! त्या निरागस वयात दु:खाचं क्रौर्य पहाण्यापेक्षा सौंदर्य पहाणंच माझ्या डोळ्यानी पसंत केलं होतं. शुभ्र अँब्युलन्स दिसेनाशी झाली आणि मग मला रडु आलं बहुतेक्..एव्हाना पाऊस थांबला होता.....

तेव्हापसुन शुभ्र रंगाचा खुप राग यायचा. मग मी शाळेच्या फळ्यावर सरस्वती देवतेची सादी सुद्धा निळि रंगवली होती...बाईंच्या आवडत्या रंगात.........

(ह्या कथेतील नावे केवळ कथेतील पात्र रचना म्हणुन योजलेली आहेत, कुणाशी साधर्म्य वाटल्यास योगायोग)

गुलमोहर: 

अशी कितीतरी निरागस फुले........ "बाई" स्मरणात राहून आयुष्यभर सुगंध देत रहातात...... पारिजात फुलला दारी.... फुले का पडती शेजारी...... प्रमाणे....... "घरात किंमत नसते...... बाहेरच्या जगात मात्र ती असतात अनमोल हिरे....." छान आहे कथा..... मनाला भिडणारी.......

पल्ले हा खालचा डिसक्लेमर खरा नाहीये. तू छोट्या नूमवित होतीस ना गं ? तू पाणी काढलंस डोळ्यातून.. अगं त्यांची मोठी मुलगी माझ्या वर्गात होती माझी फा. फे. ... तिच्याकडे रहायला जायचे तेव्हाही बघत रहायचे मी तिच्या आईकडे. तुझा फोन नंबर दे जरा. बोलते तुझ्याशी.

पल्लि,
कथा खरि असो वा खोटि डोळ्यातुन पाणी आले.
मलाहि माझ्या शाळेतील एका बाईंची आठवण आलि.
त्या बहुधा हार्ट् ऐटेक ने गेल्या, त्यांचि मुलगि माझ्या वर्गात होति,
माझि खुप चांगलि मैत्रिण. त्या घटनेचि आठवण आलि आणि प्रसंग पुन्हा डोळ्यासमोर आला.

खुपच छान लिहिले आहेस. मी माध्यमिक शाळेत असताना आमच्याही मराठीच्या बाईंनी नवर्‍याच्या जाचाला वैतागुन..... अजुनही आठवते. शाळेत त्यानां सुन्न मनाने श्रद्धांजली वाहीली होती आम्ही...अजुनही त्यांनी शिकवलेल्या कविता आठवल्या की त्याच उभ्या राहतात डोळ्यांसमोर..

aamachyaa shaaletalya ek baai pan maagachya athavadyat gelyaa. aamhi shaalet asataanaa tyaanna khup traas dyaayacho.tyaanni ekda aamachya vargaat chidun table uchalun aapatala hota.tyaa retire pan jhaalyaa navhatya. aamhaa maaji vidyarthyaanna shocking news hoti ti

>> त्या निरागस वयात दु:खाचं क्रौर्य पहाण्यापेक्षा सौंदर्य पहाणंच माझ्या डोळ्यानी पसंत केलं होतं

छान लिहीले आहे....अगदी ह्रुदयस्पर्शी.

***त्या निरागस वयात दु:खाचं क्रौर्य पहाण्यापेक्षा सौंदर्य पहाणंच माझ्या डोळ्यानी पसंत केलं होतं***
आवडलं. छोटी कथा.

पल्लि प्रतिसाद द्यायला शब्द नाहित... कस हातळतेस दु:खीविषयाला हि सहजतेने. छोटि पण परिपुर्ण कथा.

पल्ली, कथा खूप छान जमली आहे. प्रसंगाचं कारुण्य कमी शब्दात अगदी नेटकं आणि व्यवस्थीत उतरलं आहे.

इतक्या कमी शब्दात इतका आशय! अप्रतीम!

डोळे पाणावले ग वाचून.....