एक ओलेती संध्याकाळ अन स्लोवेनिया-क्रोएशिया!!!!

Submitted by Girish Kulkarni on 26 August, 2010 - 07:54

****************************************************
****************************************************

नुकताच इटलीला जाऊन आलो. तस इटलीला जाण नेहमीच होत असल्यामुळे तो देश नवीन नाहीच पण यावेळेस इटलीत माझ्या आवडत्या त्रिएस्तेला जायच असल्यान मी वेळात वेळ काढुन लगतच्या क्रोएशिया -स्लोवेनियाला जायचा प्लॅन अगोदरच बनवुन ठेवलेला... अन त्यामुळे या ट्रिपच औत्सुक्य जरा जास्त. अन्यथा खास स्लोवेनिया-क्रोएशिअयासाठी वेळ काढणं दुरापास्त होतं... स्लोवेनिया मनात रेंगाळायला आणखी एक कारण म्हणजे या वीस लाखाच्या देशाचा यावेळचा फुटबॉल वल्डकपमधला प्रवेश..!!!

आम्हाला व्हेनिसला उतरुन त्रिएस्तेला कारनी जायच होतं... त्रिएस्ते इटलीच्या उत्तर सीमाभागात वसलेल प्राचीन शहर. पुर्वीच्या अ‍ॅस्ट्रो-हंगेरीयन एम्पायरच हे एक प्रमुख ठिकाण पहील्या महायुद्धानंतर इटलीत सामील झालेलय. आज दोन-अडीच लाखाची वस्ती असलेल हे गाव पहील्या भेटीतच माझ आवडत झाल त्याला आता जवळजवळ पाच वर्षे झाली असतील. इथे राहाणार्‍या लोकांचा मी अतिशय प्रामाणिकपणे हेवा करतो...एका बाजुला हिरवेकंच डोंगर अन दुसर्‍या बाजुला अथांग सागर... सगळ गाव एका दिलफेक पोर्ट्रेटसारख भासतं नेहमी.. स्वस्थ निसर्ग स्वस्थ समाजजीवन निर्माण करत असावा का हा प्रश्न मला नेहमी त्रिएस्तेसारखी गावं बघितल्यावर पडतो. इथले तिन्ही प्रहर अन त्यातल चैतन्य जगायला एक वेगळीच उभारी देतं..

Trieste.JPG

इथे काही माझे इटालीयन मित्रही आहेत.. त्यांच्या घरात वावरतांना मला बरचस आपल्याकडच्या घरात वावरल्यासारखच वाटत... देखणा इटालीयन माणुस आपल्यासारखाच लाऊड अन भावुक. त्यांच ते 'हॅपी गो लकी' टेक्शर मला खुप भावतं... इटालीयन बायका तर काय विचारता....इटालीयन बाईच्या हसण्यावर फिदा होणार नाही तो रसिक माणुसच नाही...असो! मात्र अशा देखण्या लोकांच्या देशात आपल्या कबीर बेदीनं बायकांना तब्बल दोन दशकं त्याच्या "सँडोकॅन" या टीव्ही सिरीयलमधनं अक्षरशः वेड लावलेल हे ऐकुन लई झ्याक वाटतं !!!

Trieste5.jpg

अन हे रात्रीच त्रिएस्ते .... तेच ठिकाण.. तिच फ्रेम... उजेडाची जादू सगळ किती वेगळ भासवते...

Trstbynight.jpg

त्रिएस्तेला आलो त्यादिवशी मस्त अंगावर रेंगाळणार उन होतं. संध्याकाळपास्न मात्र भुरुभुरु पावसाला सुरुवात झाली अन दुसर्‍या दिवशीचा माझा सकाळचा जॉग स्वर्गीय करुन गेली. मी इथं सगळ्या ऋतुत आलोय पण पावसाळ्यात ही पहीलीच ट्रिप .. काय दिसत होत पावसात ते...उफ्फ !!! एक मोठ्ठी रोमँटीक धुन बॅकराऊंडला वाजतेय अस वातावरण.... मोठ्ठे ओव्हरकोट / छत्र्या घेऊन लगबगीन फिरणारी जनता.. अन त्यात छत्री बंद करुन फिरत असलेला मी अस मस्त दृश्य होतं.

TriesteRains.JPGTrieste (2).JPGtrieste (3).JPG

कामाचा कंटाळा मला आजवरच्या नोकरीत कधीच आला नाही किंव्हा मला आवडीचीच कामं मिळत गेलीत आयुष्यात असही असाव पण असा मौसम मला काम करु देत नाही... मी त्यामुळे लवकरात लवकर सगळ आटोपुन त्रिएस्तेच्या आहारी जायच ठरवल...

हे त्रिएस्तेच "फिश मार्केट्"...एखाद्या म्युसियम्सारख जपलय इथल्या लोकांनी... इथला मासा खाऊन तृप्त न झालेला माणुस विरळा... इथलं सीफुड हा अनेक मस्त्यगोत्रींचा वीक पॉईंट आहे.. मी मत्स्याहारी नाही त्यामुळे आत गेलो नाही अन्यथा तिथल्या मस्त्यकुलोत्पन्नांचे फोटो काढले असते.

FishMrkt.JPGTrieste (4).JPG

काम संपवुन वाट पहात असलेला शुक्रवार आला. मी तयारच होतो. आमचा इटालीयन मित्रही तयारच होता. त्रिएस्तेहुन स्लोवेनिया तीस-चाळीस मिनीटांच्या अंतरावर पण त्या निसर्ग नामक ललनेन तुम्हाला भुरळ घातली तर मात्र वेळेच काही खर नाही..... स्लोवेनियाला जाणारा रस्ता म्हणजे एक न संपणारा बगीचाच....

Portoroza.JPG

आम्ही प्रथम स्लोवेनियाला जाणार होतो. तिथली दोन गावं हिंडुन मग क्रोएशियात जायच होत पण...!!!

चाळीस मिनीटात आम्ही स्लोवेनियात दाखल झालो. पोर्तोरोझा (गुलाबाच्या पाकळीसारख)
अस सुंदर नाव असलेल ते एक मस्त बैठया बांधणीच गाव होतं...

Portoroza (2).JPGportoroza (3).JPG

आम्ही पोर्तोरोझात गाडी लावुन जरा वातावरणाच फील घ्यायला सुरुवात केलेली अन पावसान येतोयची वर्दी पाठवायला सुरुवात केलीही...

Portoroza (4).JPG

धीरे धीरे पावसाचा जोर इतका वाढला की समोरच काहीही दिसेना... आम्ही बसलो होतो त्या रेस्टॉरंटलाही वार्‍यान जाम झोडपल...सार गाव बघता बघता जलमय झाल...

Portoroza rains.JPGPertzRains-3.jpg

पाऊस काही थांबायला तयार नव्हता... आमच्या इटालीयन मित्रान इथुनच परताव म्हणुन सजेस्ट केल. स्लोवेनियात अन मग पुढे क्रोएशियात पावसाचा जोर जास्त आहे म्हणुन बातम्या यायला लागल्या होत्या... मग आम्हालाही नाईलाजान परतीसाठी हो म्हणाव लागल... सगळा प्लॅन पावसान चौपट केला होता....

portoroza rains (2).JPGPetrzaRains4.jpg

स्लोवेनियाहुन परततांना मात्र पावसाचा जाम राग आला होता... माझा विकांताचा त्यान केव्हढ्या दादागिरीन विचका केलेला... जाऊ दे .. स्लोवेनिया एका महान मायबोलीकराच्या सहवासाला मुकला म्हणायचा... आपल काय आहे..... आपण तर एका छोट्या राष्ट्राच्या टुरीझमला मदत करायला आलो होतो... राहाता राहीलं पावसाच तर त्याला मी सोडणार नाही कवितेत बघुन घेईन...आम्हाला (फक्त..) तिथ बरसता येत हे पावसाला ठाव नाहीय बहुधा...

त्या भर पावसात मग आम्ही त्रिएस्तेला परतलो. आमच्या मुडला जरा रिवाईव्ह करायला आमचा इटालीयन मित्र आम्हाला एका नितांत सुंदर रेस्टॉरंटला घेऊन गेला.. नाव होत.. क्युबन!!! जागा बहुधा एकदम एलीट लोकांची पसंती असावी.. मस्त रंगीत गर्दी होती..

Triesterest1.JPG

इथ खाल्ल्लेला पास्ता हा मी आतापर्यंत जगभरात खालेल्ल्या पास्त्यांत सगळ्यात उत्कृष्ट यात वाद नाही !!! १८६५ पासुनच हे रेस्टॉरंट जगभरातल्या सगळ्या मान्यवरांची पायधुळ अन फोटो बाळगुन आहे ... यात पोप आहेत.. अन बरेच मान्यवर आहेत्...त्यांच्याबाजुला इवलासा मी !!!

triesteRest.JPG

स्लोवेनियाचा बेत फसलेला पाहील्यावर मग लगेचच मी दुसर्‍या दिवशी वेनिसला निघायच ठरवल..
वेनिसचे मी शेकडो फोटो काढलेयत आतापर्यंत अन ते टाकायला एक दिर्घ मालिका लिहावी लागेलय... ते पुन्हा कधीतरी करुयात... इथे फक्त विमानतळावरुन दिसणारं वेनिस देतोय ...

Venise from the airport.jpg

जिभेवर रिचवलेल्या एकाहुन एक इटालीयन वाईन्सची चव ...पोटात तो अप्रतीम पास्ता , डोक्यात फसलेला स्लोवेनियन प्लॅन अन अबोव्ह ऑल तनामनावर बरसलेला तो अविस्मरणीय स्लोवेनियन पाऊस.... अगदी रेअरच होत सगळ...अन तितकीच रेअर होती ती ओलेती संध्याकाळही !!!!

आदाब !!!!

***************************************************
***************************************************

गुलमोहर: 

या देशांची नावे टेनिसच्या स्पर्धा पाहतानाच कानावर पडतात. मस्त स्नॅप्स. चित्रातल्यासारखी घरे. एका छायाचित्रात पुनवेचा चांदवा क्षणभर विश्रांती घ्यायला झाडावर येउन बसल्यासारखा दिसतोय.

मस्त...

स्लोवेनियाहुन परततांना मात्र पावसाचा जाम राग आला होता... माझा विकांताचा त्यान केव्हढ्या दादागिरीन विचका केलेला... जाऊ दे .. स्लोवेनिया एका महान मायबोलीकराच्या सहवासाला मुकला म्हणायचा... आपल काय आहे..... आपण तर एका छोट्या राष्ट्राच्या टुरीझमला मदत करायला आलो होतो... राहाता राहीलं पावसाच तर त्याला मी सोडणार नाही कवितेत बघुन घेईन...आम्हाला (फक्त..) तिथ बरसता येत हे पावसाला ठाव नाहीय बहुधा..:हाहा:हे आवडलं

खूप छान वर्णन आणि फोटो ही....
गिरिशदा, एकदम तिथेच असल्याचा फिल आला फोटो पाहता पाहता...