जपलेली हळहळ...

Submitted by ह.बा. on 25 August, 2010 - 04:17

कातरवेळी दाटुन येते जुनाट मरगळ
जुन्या वहीतुन सुटतो जेव्हा तरणा दरवळ

पाकळीत त्या निरोप तर जिरला नाही ना?
पिकलेल्या काळजास लागे हिरवी कळकळ

मला वाटले सुकून गेले दव गालीचे
पाना पाना मधून आली कानी खळखळ

तुला मला जोडतो असा रस्ताही नाही
तरी बायको आज वाटली मजला अडगळ

किती बदलली घरे आजवर पत्ता नाही
वही तेवढी एकुलती, जपलेली हळहळ

गुलमोहर: 

>> तरणा दरवळ >>> अरे क्काय! काय सुंदर रचना करतोयस हबा!! केवळ अप्रतीम. ५ गावे इनाम. माझ्या आवडत्या दहात Happy

..... पण हबा, >> तुला मला जोडतो असा रस्ताही नाही
तरी बायको आज वाटली मजला अडगळ >> माझी मजा इथे जरा कमी गेली रे. मला काही हे झेपलेले नाही. जरा समजावुन सांगशिल. मी बहुतेक अगदी अर्थाने जातेय, त्यातला भाव मला बहुतेक ओळखता नाही आला Sad

हबा तुस्सी छा गये सोणियो Happy

>>तुला मला जोडतो असा रस्ताही नाही
>>तरी बायको आज वाटली मजला अडगळ
या मधे बायकोवर अन्याय झाल्यासारखा वाटतो आहे.

हे कसे वाटते सांग
तुला मला जोडतो असा रस्ताही नाही
जरी संसार भासतो ना मज अडगळ

या मधे मनात आठवणी जपून देखील संसार यशस्वी करून दाखवला आहे असे वाटते.
अर्थात हा प्रत्येकाचा स्वतंत्र विचार आहे, एखाद्याला खरेच बायको अडगळ वाटत असेल तर काय करणार.

>>तुला मला जोडतो असा रस्ताही नाही
>>तरी बायको आज वाटली मजला अडगळ
या मधे बायकोवर अन्याय झाल्यासारखा वाटतो आहे.
>>> झाल्यासारखा वाटतोय म्हणजे काय? केलायच मी तो. निदान शाब्दीक अन्याय करण्याची हिम्मत अजूनही माझ्यात आहे हेच त्यातून सिध्द्द होते आहे. Uhoh (च्यायला आजकाल कवितेत बायकोचा उल्लेखही तिच्यावरचा अन्याय ठरू लागलाय.... पुढच्या जन्मी बाईच कर रे देवा... निदान मोकळेपणाने बोलून वर शतकानुशतके झालेल्या अन्यायाचा बदला युगानुयुगे घेण्याचं सुखं तरी मिळेल...)

महेश, तू स्त्री आहेस की स्त्रीमुक्तीसाठी पुरूषांच रक्त अटवणारा बबल्या?

हे कसे वाटते सांग
तुला मला जोडतो असा रस्ताही नाही
जरी संसार भासतो ना मज अडगळ>>>
तुझी सुचना खरच खूपच मोलाची आहे. पण माझा कवितेचा सखोल अभ्यास नसल्याने मला तुझ्या पातळिवर येऊन भावनांचा अतिसुक्ष्म कल्लोळ गुलाबी शब्दांच्या मखमली गालिचावर अलगदपणे झोपवता येणार नाही. माझी आगतिकता समजून घे. तू लिहीलेल्या शेराचा दर्जा फारच उच्च वाटला. मी असे लिहीण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद.

-हबा

>> महेश, तू स्त्री आहेस की स्त्रीमुक्तीसाठी पुरूषांच रक्त अटवणारा बबल्या? >>
हबा, महेश च्या विधानातुन / सूचनेतुन तो एक प्रेमळ नवरा असे मला वाटतेय.

>> निदान शाब्दीक अन्याय करण्याची हिम्मत >>
हिम्मत नव्हे, मला तर दुष्टपणा वाटला. अर्थात दुष्टपणाच अपेक्षीत असेल इथे तर नाइलाज. असे मला वाटतेय.

>> च्यायला आजकाल कवितेत बायकोचा उल्लेखही तिच्यावरचा अन्याय ठरू लागलाय.... पुढच्या जन्मी बाईच कर रे देवा... निदान मोकळेपणाने बोलून वर शतकानुशतके झालेल्या अन्यायाचा बदला युगानुयुगे घेण्याचं सुखं तरी मिळेल. >>
अन्याय काय एकतर्फी आहे? अन्याय दोन्हीकडे झालेला आहे. पण म्हणुन इतक्या सुंदर कवितेत असा अनुल्लेख म्हणजे जरा गालबोट वाटतोय... पुढच्या जन्मी कशाला, एकदा काही क्षण फक्त बाई असल्याची कल्पना कर म्हणजे वास्तव येइल तुझ्या डोळ्यासमोर. आणि मग बदला / सूड / सुख जे काही घ्यायचं असेल ते आणखी उच्च पातळीवरुन घेता येइल. असे मला वाटतेय

ह्या दोन ओळी सोडल्या तर ही कविता माझ्या आवडत्या दहात आहे. हे मी एक स्त्री / स्त्री मुक्तीवादी वगैरे म्हणुन लिहित नसून एक वाचक / प्रशंसक म्हणुन लिहित आहे. बाकी कविता तुमचीच आहे, हक्काने .

..... पण हबा, >> तुला मला जोडतो असा रस्ताही नाही
तरी बायको आज वाटली मजला अडगळ >>
जरा समजावुन सांगशिल.

तुला मला जोडतो असा रस्ताही नाही >>> तुझ्या माझ्यात काही नातं असण्याचा काहीही संबंध नाही. तसा विचारच कधी मी किंवा तू ही केलेला नाही तरीही का कुणास ठाऊक पण तुझी आठवण येते तेव्हा
तरी बायको आज वाटली मजला अडगळ >>> म्हणजेच, तुला कल्पनेत स्विकारतानाही आपल्याला बायको असल्याची आठवण मला येते (हे चांगलं की वाईट?). हे काय आहे मला माहिती नाही. आणि यापेक्षा जास्त स्पष्टीकरण मी देऊ शकत नाही. बाकी राहिला प्रश्न त्या स्त्री स्वातंत्र्याचा वगैरे तर मी शिव्या देण्यापासून ते बस मधे उभा राहण्यापार्यंत आणि घरात स्वयंपाक करण्यापासून ते झाडू मारण्यापर्यंत सगळ्या बाबतीत स्त्री पुरूष समानताच मानतो. माझ्या कॉलेजमधल्या मैत्रिणींना मी अजूनही बोल दोस्ता म्हणूनच बोलावतो. स्त्री आहे म्हणून बोलताना वेगळा टोन नाही, कामात कमी जास्त नाही, गमतीला सिरीयस करून भावना दुखाऊन घेऊ नकोस.

.

वरील काही पोष्टींमध्ये "बायको" रुपी "स्त्री" वर अन्याय झाल्याचे ज्यांना दु:ख होत आहे त्यांनां एक छोटीशी विनंती

त्याच पुरुषाने "प्रेयसी"रुपी "स्त्री" साठीच ज्या भावना दाखवल्यात त्यावरुन तो खरच अख्ख्या "स्त्री" डोमेन वरच अन्याय करतोय अस खरच वाटतय का ह्याचा विचार करावा....

मी वयाने आणी अनुभवाने जवळपास वरील सगळ्यांपेक्षा लहानच आहे म्हणुन जर माझ्या बोलण्यात काही चुक होत असेल तर आधीच क्षमस्व ...

कवितेतील भाव समाजावे अश्या अनुभवांमधुन जात आहे त्यामुळे जरा अधिकच आवडली.....

धन्यवाद ह.बा.

>> यापेक्षा जास्त स्पष्टीकरण मी देऊ शकत नाही. >> नको. यापेक्षा जास्त अपेक्षितही नाही.
>> गमतीला सिरीयस करून भावना दुखाऊन घेऊ नकोस. >> ई..... भावना वगैरे कसल्या ह्यात! हा एक जनरल विवाद होता. सिरियस तर तुच झालायस असं वाटतंय.

हब्या, मी मिसली होती रे ही गझल...
मला तर वाटतं त्या अडगळीतून बायकोबद्दलची अपार निष्ठाच व्यक्त होतेय Wink

आवडली हे सांगणे नलगे !!

हबा, दोस्त अरे ही चर्चा मिसलीच की ...
तुझे खालील स्पष्टीकरण एकदम पटेश !
>>तुझ्या माझ्यात काही नातं असण्याचा काहीही संबंध नाही. तसा विचारच कधी मी किंवा तू ही केलेला >>नाही तरीही का कुणास ठाऊक पण तुझी आठवण येते तेव्हा
>>तरी बायको आज वाटली मजला अडगळ >>> म्हणजेच, तुला कल्पनेत स्विकारतानाही आपल्याला >>बायको असल्याची आठवण मला येते
खरेतर कवितेची जास्त चिरफाड करू नये. कारण कवीने ज्या विचारांमधे असताना लिहिली असेल त्याच विचारांनी वाचक वाचतील असे नाही. इति लेखनसीमा !