आयुष्यात थोड वेगळ....

Submitted by कमलाकर देसले on 23 August, 2010 - 12:24

आयुष्यात थोडं वेगळं,जगता आलं पाहीजे
आहे त्यात थोडं वेगळं बघता आलं पाहीजे

सूर्य तर रोज उगवतो,आम्ही त्याला रोज बघतो
असं म्हणून कसं चालेलं?
प्रकाशाचं देणं तसं देता आलं पाहीजे
आयुष्यात.......................

पहाटेच्या पुजेसाठी, वेणीतल्या गजर्‍यासाठी
काय तेवढी फुले फुलतात ?
मातीतले गंधगाणे गाता आले पाहीजे
आयुष्यात.........

नेमेची येतो पावसाळा,तेच पाणी तोच चिखल
येवढाच फक्त नको खल.
मऊ मुलायम श्रावण सरीत भिजता आलं पाहीजे
आयुष्यात........

घरची आणि शेजारची काय, मुलं म्हणजे पोरं टोरं?
ते खरे तर गोकुळचे चोर
पेंद्या सुदामा होऊन त्यांच्यात खेळता आलं पाहीजे
आयुष्यात...........

वेदनेच्या वाटेवरच्या प्रवाश्याला काटा रुतला
वाटावा की मलाच रुतला
डोळ्यातली दोन आसवे जपता आली पाहीजे
आयुष्यात.....

म्रुगाची सर बरसून जाते, मातीचे स्वप्न उमलून येते
नवीन यात काय घड्ते?
कोंभासारखं कठीणतेला भेद्ता आलं पाहिजे
आयुष्यात ......

चालूच राहणार येणे जाणे,नेहमीच "त्यांचे" उदास गाणे
फुटकी घागर, नको सागर
उदासीच्या वाळवंटातला झरा होता आलं पाहीजे
आयुष्यात..........

तुम्ही कोण आणि मी कोण? कोण कुणाची काढ्ते आठ्वण?
देहाची का होते साठ्वण?
याद येईल अशी साद घालता आली पाहीजे
आयुष्यात...............
flowers_pondicherry.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आवडली मला....

नेमेची येतो पावसाळा,तेच पाणी तोच चिखल
येवढाच फक्त नको खल.
मऊ मुलायम श्रावण सरीत भिजता आलं पाहीजे>>> हे सगळ्यात जास्त आवडलं Happy