सर्व्हे रिपोर्टः विभाग- स्वतःविषयी

Submitted by संयोजक_संयुक्ता on 18 August, 2010 - 02:05

या भागात ६ प्रश्न समाविष्ट करण्यात आले होते. यातील सर्व प्रश्न अनिवार्य होते. आपल्या स्त्री म्हणुन असलेले भूमिकांच्या पलिकडे जाऊन स्त्रीत्वाबद्दल, त्या आधी स्वतःच्या व्यक्तित्त्वाबद्दल विचार करण्यास उद्युक्त करावे या हेतूने हे प्रश्न योजले होते. सर्वच प्रश्नांना अतिशय मनमोकळेपणे उत्तरे आली.

  हा भाग वाचायला सुरवात करण्याआधी कृपया प्राथमिक माहिती पूर्ण वाचावी.
 • तुमचे छंद आणि तुम्ही आठवड्याभरात त्यासाठी किती वेळ देऊ शकता?

  याला उत्तर देताना काही जणींनी फक्त आपले छंद नमूद केले आहेत, काहींनी छंद व त्यासाठी दिवसातून /आठवड्यातून /महिन्यातून सरासरी किती वेळ दिला जातो हे सांगितले आहे, काहींनी छंदाचे नाव न सांगता, नुसतेच आपण आपल्या छंदासाठी किती वेळ काढतो हे सांगितले आहे.

  • बहुतांश मैत्रिणींनी एकापेक्षा जास्त छंद नोंदवले आहेत. तरीसुद्धा ६ मैत्रिणींनी कोणतेही छंद नसल्याचे, किंवा छंदाला अजिबात वेळ देता येत नसल्याचे सांगितले आहे. या सर्व स्त्रिया भारतीय वंशाच्या आहेत (सध्या भारतात स्थित आणि परदेशात स्थित).
  • ६४ स्त्रियांनी 'वाचन' हा आपला छंद असल्याचे सांगितले आहे. लेखन हा आपला छंद आहे असे १० जणींनी नोंदवले आहे.
  • ४० जणींनी 'मायबोली' हा आपला छंद असल्याचे नोंदवले आहे.
  • गायन/ संगीत हा आपला छंद असल्याचे १६ जणींनी सांगितले, तर संगीत ऐकायला आवडत असल्याचं ११ जणींनी नमूद केलं.
  • याव्यतिरिक्त व्यायाम /योगासनं /पळणे -चालणे इ. ना ११ जणींनी तर खेळ / ट्रेक इ. ना ६ जणींनी पसंती दर्शवली आहे.
  • शिवणकाम/ वीणकाम ही १२ जणींची आवड आहे तर सांगितले आहे.
  • याशिवाय चित्रकला, नृत्य, स्वयंपाक, हस्तकला, टीव्ही पाहणे, सिनेमा पाहणे, गप्पा मारणे / socialising/ भिशी, इंटरनेट, बागकाम, प्रवास, नाटक, पूजा /साधना हे ही छंद सांगितले आहेत.

  आपल्या छंदांसाठी किती वेळ काढला जातो हे सर्वच मैत्रिणींनी सांगितले नसल्याने त्याबद्दल ठोस आकडेवारी देता येत नाही. परंतू बहुतांशी छंदांसाठी मैत्रिणी सरासरी किती वेळ काढतात याचा अंदाज आलेल्या उत्तरांवरुन घेता येतो.

  • वाचनासारख्या छंदासाठी रोज सरासरी एक ते दोन तास
  • मायबोलीसाठी दिवसाकाठी दोन ते तीन तास काढले जातात.
  • चित्रकला, गायन, नृत्य, शिवणकाम, बागकाम इ. सारख्या छंदांसाठी आठवड्यातून सरासरी दोन ते चार तास दिले जात असल्याचे दिसून आले आहे.
  • मैत्रिणींशी गप्पा मारणे, टीव्ही पहाणे, net surfing, social networking इ. सारख्या बाबींसाठी बर्‍याच मैत्रिणी दिवसाकाठी सरासरी एक ते दोन तास खर्च करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच योगासने, व्यायाम, साधना, एखादा खेळ इ. सारख्या बाबींसाठी आठवड्यातून ४ तासांपासून दिवसाकाठी २ तासांपर्यंत वेळ दिला जात असल्याचे बर्‍याच जणींनी सांगितले.

  काही मैत्रिणींनी सध्या घरी असल्याने, नोकरी करत नसल्याने छंद बर्‍यापैकी जोपासता येत आहेत, परंतू नोकरी सुरु झाल्यावर भविष्यात हे शक्य होइल याची शाश्वती नसल्याचे सांगितले आहे. तर काही जणींनी (६) छंद बरेच असले तरी त्यासाठी वेळ देता येत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.

  परदेशात रहाणार्‍या भारतीय मैत्रिणींनी अजिबात वेळ नाही / आठवड्यातून १ तास पासून कमाल २०-३० तासांपर्यंत वेळ छंदांसाठी काढल्याचे सांगितले आहे.

  सध्या भारतात स्थित मैत्रिणींनी छंदांना वेळ देत नाही किंवा जमेल तसा वेळ दिला जातो , किमान आठवड्यातून २ तासांपासून कमाल १०-१२ तासांपर्यंत वेळ दिला जात असल्याचे सांगितले आहे.

 • आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे निर्णय - शिक्षण / लग्न / संतती / करियर यापैकी सर्वस्वी तुमचा असा निर्णय कोणता होता?

  या प्रश्नाला उत्तर देताना सर्वाधिक म्हणजे ३५ जणींनी (यात ३ परदेशी वंशाच्या स्त्रियांचा समावेश आहे) सगळे निर्णय सर्वस्वी स्वत:चे असल्याचे नोंदवले आहे, ६ जणींनी सगळे निर्णय स्वतःच घेतले असले तरी निर्णय घेताना घरच्यांचा /जोडीदाराचा सल्ला /मत विचारात घेतले होते असे सांगितले.

  ९ जणींनी संततीबद्दलचा निर्णय एकट्याने घेता येऊ शकत नाही, तो दोघांच्या संमतीनेच घेतला जाऊ शकतो, त्यामुळे त्या निर्णयात जोडीदाराचा सहभाग होता असे सांगितले. असे म्हणणार्‍यांमध्ये एका परदेशी वंशाच्या स्त्रीचा समावेश आहे.

  २६ मैत्रिणींनी फक्त लग्नाचा निर्णय सर्वस्वी त्यांचा होता असे सांगितले. (एक अभारतीय वंशाची स्त्री).

  ७ मैत्रिणींनी मात्र यापैकी कोणताही निर्णय सर्वस्वी स्वतःचा नव्हता असे सांगितले आहे. यात एक अभारतीय वंशाची स्त्रीसुद्धा आहे.

  या व्यतिरिक्त २५ मैत्रिणींनी एकापेक्षा जास्त पर्याय (म्हणजेच एकापेक्षा जास्त निर्णय) निवडले आहेत. (२ परदेशी स्त्रिया)

  निर्णय घेणे न घेणे याचा इतर socio-economic घटकांशी (वय, शिक्षण, व्यवसाय इ.) संबंध आहे का हे तपासले असता, असा काही संबंध आढळला नाही. असा संबंध न आढळण्याचे कारण, sample size व homogeneous sample असणे हेच असण्याची शक्यता जास्त आहे.

  एकूण ८२ जणींनी लग्नाचा निर्णय स्वतःचा असल्याचे सांगितले आहे. यापैकी फक्त १४ मैत्रिणींनी त्यांना लग्नासाठी दबाव जाणवल्याचे नोंदवले, तर ९ जणींनी थोडासा दबाव जाणवल्याचे सांगितले. एका मैत्रिणीनी कोणताही दबाव जाणवायच्या आधीच लग्न ठरले असे सांगितले. म्हणजे ज्या ८२ मैत्रिणींनी लग्नाचा निर्णय स्वतः घेतला आहे त्यापैकी २३ जणींना थोड्याफार प्रमाणात लग्नासाठी दबाव जाणवला होता. (अर्थात यावरून त्यांनी दबावाखाली लग्न केले असे अनुमान काढता येत नाही. कारण दबाव असला तरी त्या दबावाला बळी न पडता निर्णय घेणे हा पर्याय असतोच. किंवा अप्रत्यक्ष दबावाचा निर्णयावर परिणाम झाला असेही होऊ शकते.)

  ७१ मैत्रिणींनी शिक्षणाचा निर्णय स्वतः घेतला असल्याचे सांगितले आहे, त्यापैकी १४ मैत्रिणींनी परिस्थितीनुसार शिक्षण घेतले (ते पसंतीचे होतेच असे नाही) असे सांगितले तर एकीने थोडेफार पसंतीचे शिक्षण घेतल्याचे सांगितले. ३ मैत्रिणींनी परिस्थितीमुळे शिक्षण सोडावे लागल्याचे सांगितले तर ३ जणींनी शिक्षणाच्या बाबतीत घरात भेदभाव जाणवल्याचे सांगितले आहे. या ७१ मैत्रिणींमध्ये अजून शिकायचा मानस असलेल्या मैत्रिणींची संख्याही भरपूर आहे.

  कोणताच निर्णय स्वतःचा नाही असे सांगणार्‍या ७ मैत्रिणींनी आपल्या पसंतीच्या अभ्यासक्रमात शिक्षण घेतल्याचे सांगितले आहे तर ३ मैत्रिणींनी परिस्थितीमुळे शिक्षण सोडावे लागल्याचे सांगितले. तसेच यापैकी एका मैत्रिणीला शिक्षणाच्या बाबतित भेदभाव जाणवल्याचे तिने सांगितले आहे. अजून शिक्षण घेण्याची इच्छा असल्याचेही एका मैत्रिणीने सांगितले.

 • लग्न / नोकरी /मुलं ह्या संबंधी नसलेली, तुम्हाला वाटणारी तुमची सगळ्यात मोठी achievement कोणती?

  या प्रश्नाच्या उत्तरात सर्वात जास्त म्हणजे २८ जणींनी लग्न /नोकरी /मूल या व्यतिरिक्त किंवा एकूणच कोणतीच अचिव्हमेंट नाही असे सांगितले. आपली अचिव्हमेंट कोणती याचे उत्तर देताना मैत्रिणी खरोखरच विचारात पडल्याचे त्यांच्या उत्तरावरून जाणवते.

  - ह्या प्रश्नानी आतून हादरवून सोडलं...तर एकीकडे अरे माझी शिकणारी मुलं हीच तर माझी मोठी अचिव्हमेंट आहे असंच सांगावंस वाटलं.

  - अवघड आहे उत्तर देणे..जे काही केलेय मागल्या काही वर्षात ते लग्न/नौकरी नी मुल ह्याच्याशी निगडीतच आहे.

  - काहीच नाही????????????

  तर काही मैत्रिणींनी अजून काही अचीव्ह केलंय असं वाटत नसल्याचे सांगितले.

  - tough question don't have one

  - मला माझी सर्वात मोठी अचिव्हमेन्ट अजून प्राप्त करायची आहे. त्यादृष्टीने प्रयत्न चालू आहेत.

  २३ जणींनी त्यांची अचिव्हमेंट शिक्षणाच्या संबंधित आहे असे सांगितले. यामध्ये चांगल्या गुणांनी मिळवलेल्या पदव्या, योगा मध्ये मिळवलेले प्राविण्य यासारख्या बाबींचा उल्लेख केला आहे.

  - समोर आलेल्या परिस्थितीतुन बेस्ट मार्ग निवडत पुर्ण केलेले शिक्षण.

  - finished studies with PhD, learned how to repair almost everything at home, learned crafts (sewing, knitting, painting, tatting)

  त्याखालोखाल २० जणींनी आपली अचिव्हमेंट आपल्या छंदांशी निगडीत असल्याचे सांगितले. छंदांशी निगडीत अचिव्हमेंट सांगताना मैत्रिणींनी आपले गायन, वाचन, लेखन, नृत्य, पेंटींग अशासारखे छंद व त्यामध्ये मिळवलेले प्राविण्य, त्या छंदांच्या माध्यमातून जगाशी साधलेला संवाद याबद्दल सांगितले आहे.

  - मी ब्लॉग लिहीते. चार लोक आवडीने वाचू शकतात इतपत मला लिहीता येते ह्याचा मला मनापासून आनंद होतो.

  - मी परत एकदा लिहीती झाले हीच मोठी गोष्ट आहे सध्या माझ्या साठी. विसरुनच गेलेले हा छंद ते ही कारण काही नसताना.

  - माझ्या निवेदनाच कुसुमाग्रज-पाडगावकरांनी काव्यसंग्रह देऊन केलेलं कौतुक. मुख्यंमंत्री असताना मनोहर जोशींनी निवेदनासाठी गाडी पाठवुन मुद्दाम बोलावुन घेतले होते [निवेदक ठरलेला असुनही आदल्या दिवशीच्या माझ्या निवेदनावर खुश होऊन मला संधी दिली]

  - स्वानंदी ग्रुपची सदस्या असल्याने पहिल्याच कार्यक्रमाला दोन वर्षाच्या मुलीला सोडून नाशिकला जावे लागले. पण तिथल्या उत्कृष्ट परफॉर्मन्स मुळे जो उदंड प्रतिसाद मिळाला तो मी विसरु शकत नाही.

  - Winning a music competition to play a solo with an orchestra

  ११ मैत्रिणींनी आपल्या achievements आर्थिक बाबीशी संबंधित असल्याचे सांगितले आहे, जसे की आर्थिक स्वातंत्र्य उपभोगणे किंवा स्वतःच्या पायावर उभे रहाणे.

  - माझी सगळ्यात मोठी अचिव्हमेंट मी जगात सगळीकडे एकटी स्वतःच्या पैशाने फिरले आणि पुढेही फिरत राहीन हा निर्णय ही आहे. तसेच नोकरी सोदायची हिंमत करून स्वतःचे छंद जोपासन्याकडे लक्ष देणे ही वाटते.

  - मी १९ व्या वर्षापसून आर्थिक स्वावलंबी झाले. माझ्या ईंजिनीयरींग शिक्षण,भावाचे ईंजिनियरीण्गचे शिक्षण्खर्च, व माझा लग्नखर्च स्वतः केला.

  - स्वत:च्या पायावर उभे राहणे. वाईट मार्गाला न लागणे. बालवयातील वाईट शारीरीक अनुभव व वाईट परिस्थिती या सर्वावर मात करुन सर्वसामान्यांप्रमाणे जगणे. आईवडीलांना सांभाळणे.

  जरी लग्न /नोकरी आणि मूल या व्यतिरिक्त असलेल्या अचिव्हमेंट बद्दल प्रश्न विचारला असला तरीही आपल्या संसारातील विविध भूमिकांमध्ये यशस्वी होण्याला (उदा. एक चांगली मुलगी /चांगली आई इ.)/ जोडीदार किंवा इतर नातेवाईकांमध्ये सकारात्मक बदल घडवण्यास आपण मदत करणे ही आपली अचिव्हमेंट असे ७ जणींनी संबोधले आहे. तर नोकरी ही आपली अचिव्हमेंट आहे असे ६ जणी सांगतात.

  - सासरच्या माणसांशी असलेली अटॅचमेंट

  - माझ्या जवळच्या नातेवाईकांना आणि मैत्रिणींना माझा सल्ला मह्त्वाचा वाटतो.

  - जोडीदाराच्या डोक्यातून जात/सोवळे काढून टाकण्यात आलेलं यश

  - माझ्या जुन्या नोकरीत (भारतातल्या )नविन टेक्नॉलॉजी, नव्या प्रॉडक्ट डेवलप्मेन्ट ची सुरुवात मी जवळपास एकहाती केली

  आपला आत्मविश्वास वाढणे/ स्वत्त्व सापडणे ही आयुष्यातील सर्वात महत्वाची अचिव्हमेंट आहे असे पाच मैत्रिणींनी सांगितले.

  - स्वतः महत्वाचे आहोत अस वाटणं. माझ्यात सेल्फ इस्टीमचा अभाव होता. पण जाणिव पुर्वक प्रयत्न करुन मी तो परत मिळवला आहे.

  - आत्मभान. स्वतःशी संवाद साधून स्वतःच स्वतःची समजूत काढू शकणे.

  - बर्‍यापैकी वेळ हाताशी असल्यानी भरपूर वाचता येतय. मी कधीच वाचली नसती असती कितीतरी पुस्तकं वाचली.त्यामुळे विचाराच्या कक्षा रुंदावल्या. समतोल विचार करणं वाढलं.

  स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला सुरवात केली / नवीन देशात / समाजात एकटीने वावरले ही एक मोठी अचिव्हमेंट आहे असेही ६ मैत्रिणींनी सांगितले.

  - Surviving in another country and start taking decisions of my life on my own.

  - भारतातल्या एका खेड्यात २४ वर्षे राहुन, अचानक परदेशात आल्यावर (नवर्‍यासोबत येउन) विनात्रास दैनंदीन कामे, उदा. घरासाठीच्या वस्तुंची खरेदी, मैत्रीणींशी संपर्क इ. करते.

  - Coming to a whole new country at the age of 24 and making it my own.

  वेगवेगळ्या प्रकारे आपण समाजासाठी करत असलेले काम ही मोठी अचिव्हमेंट वाटते असेही १० जणींनी सांगितले.

  - दुर्गम खेडेगावात एकटीने राहून जवळपासच्या ७-८ गावातील महिलांबरोबर काम केले. बचत गट हळूहळू bank चे व्यवहार आपले आपण करू लागले. त्यांच्यामध्ये झालेली जाग्रुती ही सगळ्यात मोठी achievement.

  - I started a book club that has been meetig almost 20 years.

  - helping organize a fund raiser for a non-profit organization that helps survivors of domestic violence.

  - Whenever I have felt like I achieved something, it was unrelated to kids/family/job .
  This is when I felt I could give any kind of support/comfort to anybody and bring some
  happiness or at least help to have at least ""feel good"" moments .. Is this too romantic? Maybe ...

  अध्यात्म /ध्यानधारणा /मिनिस्ट्री या आपल्या अचिव्हमेंटस असल्याचे तिघींनी सांगितले तर मी मिळवलेले भरपूर मित्रमैत्रिणी हीच माझी मोठी अचिव्हमेंट आहे असे तिघींनी सांगितले. लग्न न करणे ही आपली अचिव्हमेंट वाटते असेही एका मैत्रिणीने सांगितले, तर लग्नासाठी dating करणे ही अचिव्हमेंट वाटत असल्याचेही एकीने सांगितले. याशिवाय २ मैत्रिणींनी त्यांना हा प्रश्न समजला नसल्याचे सांगितले आहे तर एकीने याविषयी कधी विचारच केला नाही अशी कबूली दिली आहे.

 • तुमच्या टॉप ५ चिंता कोणत्या ?

  याही प्रश्नाला विस्तृत उत्तरं मिळाली. आपल्याला जाणवणार्‍या छोट्या-मोठ्या चिंता सगळ्यांनी एखाद्या मैत्रिणीशी हितगुज केल्याप्रमाणे कोणताही आडपडदा न ठेवता सांगितल्या. खरंतर सगळ्या मैत्रिणींची उत्तरं त्यांच्या शब्दात फेरफार न करता मांडता येणं शक्य असतं तर तसं मांडणं आम्हाला जास्त आवडलं असतं. ते शक्य नसल्याने ज्याप्रमाणे इच्छांचे वर्गीकरण केले, त्याचप्रमाणे चिंतांचेही वर्गीकरण करुन मांडायचा प्रयत्न केला आहे.

  • मुलांचे संगोपन/भविष्य/ शिक्षण
   आपल्या मुलांच्या संदर्भात ५४ मैत्रिणींनी वेगवेगळ्या चिंता (मुलांचे संगोपन, शिक्षण, भविष्य इ.) व्यक्त केल्या आहेत. मुलांचे संगोपन व त्यांच्या वाढीसंदर्भात २० मैत्रिणींना काळजी वाटते. यामध्ये माझ्या मुलांचे संगोपन मी नीट करू शकेन ना? मुले चांगली नागरिक बनतिल ना/ आपल्या पालकांसारखेच चांगले पालक म्हणून जबाबदारी आपल्याला पार पाडता येईल ना? मुलांना एखाद्या वाईट अनुभवाला सामोरे जावे लागणार नाही ना? या आणि अशा अनेक चिंतांचा समावेश आहे. २२ जणींनी आपल्या मुलांच्या शिक्षणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर ८ मैत्रिणी मुलांच्या भविष्याच्या चिंतेत आहेत तर तिघींनी मुलांच्या आर्थिक स्थैर्याबद्दल काळजी वाटत असल्याचे सांगितले आहे. एका मैत्रिणीने मुलाच्या खाण्या-पिण्याची चिंता वाटते असेही सांगितले आहे.
  • आर्थिक बाबी
   ४० मैत्रिणींनी त्यांना आर्थिक बाबींबद्दल चिंता वाटत असल्याचे सांगितले. यामध्ये सध्याची व भविष्यातील आर्थिक स्थिती, नोकरी सोडावी लागल्यास येणारा आर्थिक स्थितीतील बदल, कर्ज इ. चा समावेश आहे. स्वतःच्या घराबद्दल (घर घेणे /बांधणे शक्य होईल का/ किंवा कधी शक्य होईल ) चिंता व्यक्त करणार्‍या मैत्रिणींची संख्या ७ आहे.
  • आरोग्य/ म्हतारपण
   म्हातारपण व म्हातारपणीचे आपले (तसेच जोडीदाराचे) आरोग्य यासंदर्भात २५ मैत्रिणींना चिंता वाटते तर ९ जणींनी निवृत्तीनंतर काय करायचे (रिटायरमेंट प्लान नाही) हे ठरवले नसल्याची चिंता वाटते. तसेच तिघींनी म्हातारपणामध्ये येणार्‍या empty nest या परिस्थितीची काळजी वाटत असल्याचे सांगितले. ३ मैत्रिणींनी आपल्याला एकटेपणा निभावता येईल का याची चिंता वाटत असल्याचे सांगितले.

   आपल्या जोडीदाराच्या व आपल्या पालकांच्या आरोग्याची नेहेमी चिंता वाटत असल्याचे ३३ जणींनी सांगितले आहे तर आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची चिंता (मूल, जोडीदार, बहिण-भाऊ, आई-वडील इ.)२० जणींनी व्यक्त केली. मात्र स्वतःच्या आरोग्याबद्दल चिंता वाटत असल्याचे मात्र १९ जणींनीच सांगितले. तसेच एका मैत्रिणीने वाढत्या वयामुळे शरीरात होणारे बदल जवळ येत असल्याची चिंता (biological clock) वाटत असल्याचे सांगितले.

  • करियर/ शिक्षण/ नातेसंबंध/ समतोल / मूल होणे / सामाजिक इ.
   स्वतःच्या करियर, शिक्षणाच्या बाबतित बर्‍याच जणींनी इच्छा व्यक्त केल्या असल्या तरी यासंदर्भात तुलनेने थोड्या कमी चिंता व्यक्त केल्या आहेत. २८ मैत्रिणींना स्वतःच्या करियर / नोकरी / व्यवसाय इ. संदर्भात कोणती ना कोणती चिंता जाणवते. यात नवीन चांगली नोकरी, नोकरीमध्ये बढती, बर्‍याच दिवसांच्या खंडानंतर परत करियर /नोकरी करता येणे, स्वतःचा व्यवसाय सुरु करणे किंवा व्यवसायात यशस्वी होणे इ. चा समावेश आहे. आपल्या शिक्षणाबद्दल मात्र फक्त ३ मैत्रिणींनी चिंता व्यक्त केली आहे.
   २ जणींना स्वत:च्या लग्नासंदर्भात चिंता वाटते.
  • नातेसंबंध टिकवण्यासंदर्भात /जपण्यासंदर्भात ४ जणींना चिंता वाटते. यात जोडीदाराशी संबंध, नवरा व मूल यांमधले संबंध, सासरच्या व्यक्तींशी असलेले संबंध यांचाही समावेश आहे.
  • स्वत:च्या स्वभावाशी निगडीत चिंता ९ जणींना वाटते. यात कमी सहनशक्ती , खूप चिडचिड, कमी आत्मविश्वास, restlessness इ. चा समावेश आहे.
  • आपल्याला मूल होणे यासंदर्भात ८ जणींना चिंता वाटते. यामध्ये मूल होण्याबाबतचा निर्णय न घेवू शकणे, वय वाढल्यामूळे येणार्‍या संभावित अडचणी अशासारख्या बाबींचा समावेश आहे. तसेच दुसरे मूल होऊ द्यावे अथवा नाही याची चिंता वाटते असेही तिघींनी सांगितले.
  • नोकरी व घर यामध्ये वेळेचा समतोल साधण्याची ६ जणींना चिंता वाटते. आपल्या नातेवाईकांबद्दल ६ जणी चिंतेत असतात. तसेच जोडीदाराची नोकरी व शिक्षण या बाबींची चिंता ५ जणींना वाटते.
  • आपल्या स्थायिक होण्यासंदर्भात ७ जणी चिंतेत आहेत. यात कुठे स्थायिक होणार, कधी स्थायिक होणार, अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी ग्रीन कार्ड कधी मिळेल, भारतात स्थायिक होणं जमेल ना अशा चिंतांचा समावेश आहे. physical security ची काळजी एका मैत्रिणीला वाटते.
  • समाजाशी निगडीत बाबी जसे की जागतिक शांतता, पर्यावरण, मूलभूत सुविधा, पाणी इ. बद्दल ७ जणींना चिंता वाटते तर आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो जे पूर्ण करु शकत नाही आहोत याची काळजी तिघींना वाटते.
  • १३ मैत्रिणींनी कसलीही चिंता वाटत नाही असे सांगितले तर ३ मैत्रिणींनी चिंता करत नाही आजचा क्षण महत्त्वाचा वाटतो असे सांगितले. एका मैत्रिणीने देव आहे की नाही याची चिंता करत असल्याचेही सांगितले.
 • तुमच्या इच्छा यादीतील टॉप ५ गोष्टी

  या प्रश्नाला उत्तर देताना, मैत्रिणींनी अगदी मनमोकळेपणे, आपल्या मनातील इच्छा विस्तृतपणे सांगितल्या. प्रत्येकीचं उत्तर / प्रत्येकीच्या इच्छा जशाच्या तशा, त्यांच्या शब्दात मांडणं शक्यच नाहीये म्हणून आम्ही त्या इच्छांचे वर्गीकरण करायचा प्रयत्न केला आहे.

  प्रवास करणे /फिरणे ही आपली इच्छा असल्याचे ५० जणींनी सांगितले आहे. यामध्ये काही जणींनी फक्त ढोबळपणे प्रवास असे नमूद केले आहे तर काहीजणींनी specifically जगप्रवास, युरोपमध्ये फिरायला जायचंय, भारतात भटकायचंय असं सांगितलं. याशिवाय घरातून पाठीवर बॅग घेवून फिरायला जायचंय परतीचं तिकिट न काढता आणि कंटाळा आल्याशिवाय परत यायचं नाहीये असं सांगणारी मैत्रिणसुद्धा आहे.

  आपल्या मुलांच्या/ जोडीदारांच्या भविष्यासंबंधीच्या इच्छा २८ जणींनी सांगितल्या आहेत. आपल्या मुलांची घडवणूक चांगली व्हावी, त्यांना चांगले शिक्षण मिळावे, त्यांच्या मनाजोगे चांगले करियर करता यावे, मुलींचे चांगल्या ठिकाणी लग्न व्हावे अशीही इच्छा व्यक्त केली आहे.
  आपल्या जोडीदाराच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, जोडीदाराचे करियर, शिक्षण, आरोग्य इ. बाबींसंबंधीच्या इच्छा १६ जणींनी व्यक्त केल्या आहेत.

  स्थावर व जंगम मालमत्तेसंबधी इच्छा- 'घर' ४२ जणींनी व्यक्त केली आहे. यामध्ये स्वतःच्या घराचे / बंगला व त्याच्या सजावटीचे स्वप्न बघणार्‍यांची संख्या जास्त आहे. ३४ जणींनी घराबद्दलची इच्छा दर्शवली आहे. यामध्येसुद्धा ढोबळपणे नुसते 'घर हवे' असे सांगणार्‍या मैत्रिणीपासून टेरेस गार्डन असणारा फ्लॅट हवाय, फ्लॅट नाही, एक सुंदर घर बांधायचंय, समुद्रकिनारी घर बांधायचंय असं सांगणार्‍या मैत्रिणी आहेत.

  संपत्तीबद्दल किंवा सांपत्तिक स्थितीसंबंधी / आर्थिक परिस्थितीसंबंधातील इच्छा सांगणार्‍या २१ जणी आहेत. यामध्ये भरपूर कमवणे, पुरेसे कमवणे, कसलीही काळजी न करता खर्च करण्याइतके कमवणे, भरपूर मनसोक्त खरेदी करणे, कामाला नोकर असणे, चांगली कामवाली असणे इ. इच्छा समाविष्ट केल्या आहेत.

  पुढे शिक्षण घेण्याची, शिक्षण पूर्ण करण्याची, उच्च शिक्षण / (पीएचडी) घेण्याची इच्छा १२ जणींनी व्यक्त केली आहे तर आपल्या करियरसंबंधीच्या / नोकरीसंबंधीच्या / व्यवसायांबंधीच्या इच्छा ४४ जणींनी व्यक्त केल्या. यामध्ये चांगली नोकरी मिळवणे, नविन नोकरी मिळणे, चांगला प्रोजेक्ट / चांगले काम मिळणे, करियरमध्ये यशस्वी होणे, नविन व्यवसाय सुरु करणे, स्वतःची शाळा/ स्टुडिओ सुरु करणे, चांगली व्यावसायिक होणे इ. सारख्या इच्छांचा समावेश आहे.

  formal शिक्षण घेण्याव्यतिरिक्त वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये/ छंदांमध्ये शिक्षण घेण्याची, नविन गोष्टी शिकण्याची इच्छा २० जणींनी दर्शवली. यामध्ये गायन, नृत्य, स्वयंपाक यासारख्या छंदांचा पण समावेश आहे.
  वाचनाची, पुस्तके घेण्याची, स्वतःची मोठ्ठी लायब्ररी बाळगण्याची इच्छा ११ जणींनी व्यक्त केली तर लेखन करायचे आहे, चांगली लेखिका म्हणून नाव मिळावे अशी इच्छा असल्याचे ५ जणींनी सांगितले. सांस्कृतिक गोष्टींचा - नाटक / साहित्य / संगीत इ.इ. आस्वाद घेण्याची इच्छा आहे असे दोघींनी सांगितले.

  स्वतःच्या आरोग्यासंबंधीच्या (शारीरिक आणि मानसिक) इच्छा ज्यात स्वतःची तब्येत ठीक असावी, वजन आटोक्यात असावे /कमी व्हावे, नियमित व्यायाम व्हावा, डाएट करता यावे, आत्मविश्वास निर्माण व्हावा, चिडचिड कमी व्हावी अशा प्रकारच्या इच्छा सांगितल्या आहेत. अशा इच्छा सांगणार्‍या मैत्रिणींची संख्या ३० आहे. याचबरोबर अतीदीर्घायुष्य नसावे अशी इच्छाही चौघींनी सांगितली.

  आपल्या मुलं व जोडीदाराच्या व्यतिरिक्त इतर नातेवाईकांच्या संबंधीत इच्छा (जसे की भावाला चांगली नोकरी, बहिणीला मूल, वहिनीला मूल इ.इ.) व्यक्त करणार्‍या मैत्रिणींची संख्या ६ आहे. आईवडिलांचा सहवास लाभावा, त्यांच्यासाठी खर्च करता यावा अशी इच्छा बाळगणार्‍या १५ मैत्रिणी आहेत.

  आपल्याला स्थायिक व्हायचंय, स्थैर्य पाहिजे अशी इच्छा १२ जणींनी व्यक्त केली. अशी इच्छा सांगताना भारतात स्थायिक होण्याची इच्छा आहे, कुठेतरी एकदाचं स्थायिक व्हावं अशी इच्छा आहे, ग्रीन कार्ड मिळावं अशी इच्छा आहे, भारतात जाऊन एखाद्या खेडेगावामध्ये स्थायिक व्हायची इच्छा आहे असेही मैत्रिणींनी सांगितले.

  मनासारखा जोडीदार मिळावा, पालकांच्या संमतीने आपल्या पसंतीच्या व्यक्तीबरोबर लग्न व्हावे अशी इच्छा ४ जणींनी दर्शवली आहे.

  तर स्वतःचे मूल असावे, एका निरोगी बालकाला जन्म द्यावा अशी इच्छा असल्याचे १२ जणींनी सांगितले.

  घर व नोकरीमध्ये समन्वय साधता यावा, घरात / मुलांबरोबर / जोडीदाराबरोबर वेळ मिळावा (quality time), घरच्यांबरोबर / जोडीदाराबरोबर सुट्टी घालवायची आहे अश्या इच्छा १२ जणींनी नोंदवल्या.

  याशिवाय घरामध्ये आनंदी वातावरण असावे असं वाटत असल्याचं ९ जणींनी, सगळ्या लोकांशी चांगले संबंध असावेत असं ५ जणींनी, चांगले अन् भरपूर मित्र-मैत्रिणी लाभावेत असं तिघींनी, आयुष्यात समाधान लाभावं असं ६ जणींनी, personal space मिळावी असं दोघींनी सांगितलं आहे.

  आत्मसाक्षात्कार व्हावा अशी इच्छा आहे असे तिघींनी सांगितले तर जगात शांतता नांदावी, सर्व जण सुखी असावेत अशी इच्छा ५ जणींनी व्यक्त केली. समाजसेवा करायची इच्छा व्यक्त करणार्‍या १३ मैत्रिणी आहेत.

  इच्छांबाबत कधी विचार केला नाही असे एका मैत्रिणीने सांगितले तर इच्छा नेहेमी बदलत असतात असे एकीने सांगितले. तसेच सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत असेही ५ मैत्रिणींनी सांगितले.

 • मुलं, संसार, नवरा/जोडीदार, नोकरी, आई-वडील, सासु-सासरे, शिक्षण, छंद, आरोग्य, निर्णयस्वातंत्र्य, गोतावळा हे आपल्या प्रायॉरिटीप्रमाणे उतरत्या भाजणीने (re-arrange) करा

  या प्रश्नाचे विश्लेषण करताना केवळ घटकांच्या गणिती शक्यता तपासल्यास त्या विश्लेषणातून आपल्या हाती फारसे काही लागत नाही. म्हणून फक्त काही ठळक नोंदींशी आपला परिचय करून देतो.

  या प्रश्नाला उत्तर देताना आपल्या आयुष्यातील अनुक्रमे महत्त्वाचे घटक निवडताना, ४६% मैत्रिणींने 'मुलं ' हा पर्याय प्रथम क्रमांकावर निवडला तर १५% मैत्रिणींनी 'नवरा /जोडीदार' हे प्रथम क्रमांकावर निवडले. आपल्या संसाराला प्रथम पसंती देणार्‍या ४% मैत्रिणी आहेत.

  १६% मैत्रिणींना निर्णयस्वातंत्र्य सगळ्यात महत्वाचे वाटते तर ९% मैत्रिणींना आरोग्य महत्त्वाचे वाटते. याव्यतिरिक्त २.५% मैत्रिणींनी मानसिक आरोग्य /मनःशांतीला सर्वात जास्त महत्त्व आहे असे लिहीले आहे.
  याशिवाय ५% मैत्रिणींनी आई-वडील /पालक व ३% यांनी शिक्षणाला प्रथम पसंती दिली आहे.

  नोकरी, सासु-सासरे, छंद, गोतावळा यांना मात्र एकाही मैत्रिणीने प्रथम क्रमांकावर निवडले नाही. त्याचबरोबर असेही दिसून आले की साधारणत: मुलंबाळं, नवरा यानंतर त्याखालोखाल नोकरी या घटकाची निवड बहुतांश मैत्रिणींनी केली आहे. ६% मैत्रिणींनी नोकरी /करियर /व्यवसायाला दुसरी पसंती दिली आहे तर इतर मैत्रिणींसाठी आपल्या नोकरीचे स्थान तिसर्‍या किंवा चौथ्या क्रमांकावर किंवा त्याच्याही खाली आहे.

  आपल्या आईवडिलांना सुद्धा बर्‍याच जणींनी मुलं-बाळं, नवरा यानंतरच निवड केल्याचे नोंदवले आहे. त्याखालोखाल सासुसासर्‍यांना महत्त्व असल्याचे दिसून येते. छंद आणि गोतावळा मात्र प्रायोरिटींमध्ये अगदीच शेवटी येतात.
  एका मैत्रिणीने असं ठरवता येत नाही. परिस्थितीप्रमाणे बदलू शकतं असं सांगितलं आहे तर एकीने This is an extremely simple method of ranking important things. I can't do it असंही सांगितलं आहे.

  आईवडिलांना सर्वात जास्त महत्त्व आहे असं नमूद केलेल्यांपैकी दोन जणींनी एकटी असल्याने सध्या आईवडील सर्वात जास्त महत्त्वाचे आहेत असेही नमूद केले आहे.


stline2.gifनिष्कर्ष

प्रश्नावलीच्या या भागाला आलेली उत्तरे अंतर्मुख करणारी आहेत. प्रश्न साधे सोपे परंतू उत्तरे तशी खूप काही सांगून जाणारी.

सध्या भारतात स्थित स्त्रिया, सध्या परदेशात स्थित भारतीय वंशाच्या स्त्रिया यांच्यामध्ये छंदांना देऊ शकणारा सरासरी वेळ (कल) यात थोडा फरक दिसून येतो. तसेच छंदांसाठी अजिबात वेळ काढू न शकणार्‍या स्त्रिया या सर्व भारतीय वंशाच्या आहेत याकडे आम्ही आपले लक्ष वेधू इच्छितो.

सगळे निर्णय स्वतःचे असे नोंदवलेल्या स्त्रियांची संख्या लक्षणीय आहे.
तसेच लग्न/ नोकरी/ मुलं या व्यतिरिक्त (त्यांच्यामते) कसलीही अचिव्हमेंट नसलेल्या स्त्रियांचे प्रमाण २३% असे नोंदवले गेले आहे.

चिंतांमध्ये मुलांच्या भवितव्याबाबत चिंता सर्वाधिक मैत्रिणींने नमूद केलेल्या आढळून येतात. आरोग्य या भागाला आलेल्या एकंदरित उत्तरांशी ताडून पाहता स्वतःच्या आरोग्याबाबत चिंतांचे प्रमाण इथे नमूद केलेले कमी आढळून येते.

आयुष्यातील अग्रक्रमानुसार घटकांची निवड करताना मैत्रिणींनी लिंगभावाबाबत पारंपारिक समजांना दृढ करणारे घटक अग्रक्रमावर नोंदवले आहेत. ते का? त्याची कारणमीमांसा, जैविक अथवा सामाजिक याचा उहापोह या प्रश्नावलीच्या आवाक्याबाहेरचा आहे.

वाचकांना उत्तरांमध्ये आपले स्वतःचे प्रतिबिंब दिसते का? म्हणजेच ही उत्तरे पुरेशी प्रातिनिधिक आहे असे आपल्याला वाटते का ते जरुर लिहा.

स्त्रियांचे भावविश्व समजून घेण्यास या उत्तरांनी मदत होते का? विशेषतः पुरूषांना याबाबत काय वाटते?

या पाचही प्रश्नांना आलेली उत्तरे लिंगाधारित आहेत असे आपल्याला वाटते का? म्हणजेच या उत्तरांना पुरूष वाचकांची उत्तरे निश्चित वेगळी येतील असे आपल्याला वाटते का?

अतिषय माहीतीपुर्ण सर्व्हे रीपोर्ट !!

स्त्रियांचे भावविश्व समजून घेण्यास या उत्तरांनी मदत होते का? >>>> नक्कीच !
विशेष करुन
तुमच्या इच्छा यादीतील टॉप ५ गोष्टी आणि तुमच्या टॉप ५ चिंता कोणत्या ? हाभाग फार महत्वाचा वाटला !!

यंदा आलेले लेख आणि त्यासोबत प्रकाशीत केलेला सर्वे रिपोर्ट काही मुद्दे पूर्णपणे परस्परविरोधी तर काही अगदी अनुमोदन देणारे.

हा रिपोर्ट आत्ताच पूर्ण प्रकाशीत केला हे खर तर चांगलच झालं अस म्हणता येईल...ज्या मैत्रिणींनी सर्वेसाठी फॉर्मस भरले होते त्यांना पुन्हा एकदा स्वतःला तपासून बघण्याची उत्तम संधी.

दोन्ही उपक्रमांसाठी संयुक्ता टीमच अभिनंदन.

हा रिपोर्ट चांगलाच आहे, पण मला हा प्रातिनिधिक वाटत नाही. सर्वेक्षणात भाग घेतलेल्या स्त्रियांची उत्तरे मात्र विचार करायला लावणारी आहेत.

ह्या सर्व मैत्रिणींच्या चिंता व इच्छा यांचा आढावाही मननीय आहे.

<< एका मैत्रिणीने देव आहे की नाही याची चिंता करत असल्याचेही सांगितले >> ऑन अ लाइटर नोट, हे वाक्य वाचताना मला खूप मजा वाटली.