हरवलेला षड्जं - ३ (जुन्या मायबोलीवर प्रकाशित)

Submitted by दाद on 16 August, 2010 - 18:29

नकळत डोळे मिटले त्याचे, आक्रसलेला चेहरा, ताठरलेले खांदे सैलावले..... तिच्या हळव्या, मवाळ, हुरहुर लावणार्‍या सुरांसहं आपल्याच आत आत उतरत गेला तो, .....शोधत गेला..... त्याचाच हरवलेला, षड्ज!

कुठे आहोत आपण नक्की आयुष्यात? का असला प्रश्नं कायम छळतो आपल्याला?
त्या वळणावर.... जेव्हा आपण या मारव्यातल्या षड्जासारखे हरवलो, कधी निषादाचा तर कधी रिषभाचा आसरा शोधण्याच्या, आर्जवाच्या दैवावर सोडून दिलं आपल्याला... त्या, त्या वळणावरून कधी पुढे आलो का? काय हरवलं तिथे?... त्या वेळी?....
त्या दिवसापर्यंत, हे गृहितच धरून चाललो होतो. सावनी अशीच गात रहाणार, आपण तिला साथ करत रहाणार.... आयुष्य ह्यापेक्षा वेगळं असणार नाही.
आपण फ़र्ममध्ये सांगून अर्धा दिवस टाकून जाणार होतो, साथीला.
नेहमी सावनीचं म्हणजे कार्यक्रमाच्या, स्पर्धेच्या दिवशी सकाळी फोन करायचा.
’ए, लक्षात आहे ना? चार आणि पाचचे दोन्ही तबले घेऊन ये. आणि मध्यमाचा चारचाच आणलास तरी चालेल..... नाहीतर असं करतोस का? ते सुद्धा दोन्ही आणशील का? सॉरी रे. तुला जड होणार सगळं..... आणि.... मलाही पिकप करशील का रे? आई इतक्या लवकर येणार नाहीये.... आणि मला तिच्यासारखं अगदी कट्टाकट्टी नाही पोचायचं... थोडा वेळ हवा का नको सेटल व्हायला तिथे?’
मध्ये श्वास न घेता बोलायची, जवळ जवळ.

शिवाय मागे विंगेत चार चारदा, ’बिहागची हवा आहे की नाही रे आज? आईचं काहीतरीच असतं..... म्हणे केदार गा...’
’होईल ना रे व्यवस्थीत, अशू?’,
’सारंगची वेळ निघून चाललीये... श्शी काय वैतागये, वेळ पाळता येत नाही या आधीच्या गाणार्‍यांना... ’,
’पाणी हवय रे... पण आत्त्ता प्याले ना, की सारखे आवंढे येतात.... नुसता घसा ओला करू का?’,
’वेळ मिळाला तरच तराणा म्हणायचाय.... मला कळेल का रे वेळ संपल्याचं?... नाहीतर तूच खूण करशील? मी घड्याळ बघणं वाईट दिसेल ना’
’उद्या पेपर आहे साइकचा आणि काही अभ्यास झाला नाहीये....’
हे आणि असलंच बरंच काही.
अश्विन नुसताच धीर द्यायचा, ’सावनी, एका जागी स्वस्थ उभी रहा. दोन दीर्घ श्वास घे. इट्स ओके, तुझ्या कार्यक्रमावर लक्षं केंद्रित कर.... सगळं ठीक होईल.’

सावनीची आई, तिची पहिली गुरू. सावनीला घडवण्यात सर्वस्वी कारणीभूत. मालतीबाई पूर्वी स्वत: अतिशय सुंदर गायच्या. किराण्याची परंपरा पुढे चालवू शकतील असा फिरोजजींना विश्वास देऊ शकणार्‍या त्यांच्या काळातल्या त्याच. घराण्याचं सगळं गाणं ह्या शिष्येच्या गळ्यात उतरवलं पंडितजींनी.
आलेलं वाईकरांचं बड्या घरचं स्थळ नाकारून मालतीबाईंनी तबलजी बरोबर पळून जाऊन लग्नं केलं. पुढे बहरलं काहीच नाही, सगळंच सुकलं. जेमतेम परिस्थितीवर मात करता करता कोमेजून गेल्या त्या. शिकवण्या करण्यात जन्मं गेला त्यांचा. सावनीला मात्रं तयार केली त्यांनी. सावनीची तयारी ऐकून स्वत: पद्माताईंनी तिला आमंत्रण दिलं होतं... शिकण्याचं. ताईच येणार होत्या त्या कार्यक्रमाला.

त्यादिवशी सावनीने सकाळी फोन केला नाही. त्याने फोन केला तर हॉलवरच भेटू म्हणून गडबडीने ठेवला फोन. आलं असेल टेन्शन जरा लवकर, असं अश्विनलाही वाटलं. नंतर मालतीबाईंनीच त्याला फोन करून सांगितलं की सावनी स्पर्धेला येणार नाहीये, थोडं बरं नाहीये... वगैरे वगैरे. मग रजा फुकट जायला नको म्हणून तोही गेला नाही. दुपारी कधीतरी अलकाचा, सावनीच्या मैत्रिणीचा फोन आला. तिला थोडी कल्पना होती, अश्विनला किती अन काय वाटतं सावनीबद्दल त्याची.

’अश्विन, तुला ह्यातून काही मिळवायचं असेल तर.... आता वेळ घालवू नकोस..... आज काहीही झालं तरी संध्याकाळच्या सावनीच्या कार्यक्रमाला ये आणि तिला भेट, बोल तिच्याशी स्पष्टपणे. ’, अलकाच्या स्वरात घबराट होती.
’सावनी संध्याकाळी गाणारेय? पण स्पर्धेला गेली नाही ना? बरं नाहीयेना तिला? तिच्या आईतर म्हणाल्या की...’, अश्विनला आश्चर्यच वाटलं हे ऐकून.
’अरे, ती... ती नं... चांगली गायली आज सकाळी, पहिली आलीये. आणि पद्माताई... त्या पण खूष आहेत तिच्यावर. तिला आपली शिष्या म्हणून स्वीकार... त्यांच्याचबरोबर राहील ती मग...’, अलका चाचरत बोलत होती, त्यात शिवाय मोबाईल कटही झाला.
ऑफिसमधून फार बोलता आलंच नसतं क्लायंटच्या समोर, शिवाय संध्याकाळी भेटू तेव्हा विचारूच खडसावून म्हणून अश्विनने परत फोनही केला नाही.

संध्याकाळी तो गडबडीने हॉलवर पोचला आणि विंगेत जाणार इतक्यात त्याला मालतीबाईंनी अडवलं. ’सावनी खूप अपसेट आहे. तिला भेटू नकोस आत्ताच अगदी.’
अश्विन तरीही म्हणाला, ’का? मी का नाही भेटायचं? आणि तिला बरं नव्हतं आणि गाणार नव्हती म्हणालात ना? सकाळी? मग.... काय चाललय?... मला का नाही....’,
आईंच्या चेहर्‍याकडे बघून तो आवाज शांत करून परत इतकच म्हणाला, ’बिलीव्ह मी, ऍक्च्युअली मला भेटली तर जरा शांत ...’

त्याच्या डोळ्यात बघत थंड पण खंबीर स्वरात त्या म्हणाल्या, ’ तू कोण? अश्विन? तुला तिच्या भल्याचं जास्तं कळतं की मला, तिच्या सख्ख्या आईला?’
अश्विनच्या कपाळावरची शीर उडू लागली, ’मी कोण? मी.... मी...’

.......आणि त्याला शब्द सुचेनात. खरच आपण कोण सावनीचे? कधी विचारलं आपण तिला... जग म्हणतं तसं फॉर्मली? गृहीत धरून चाललोय.... आयुष्याची हीच वाट, अशीच, आपल्याला हवी तशी चालणार आहोत.... आपल्याबरोबर सावनी असणारच आहे, ती गाईल, आपण तबला वाजवू साथीला.....

’मला कल्पना आहे तुला काय वाटतं तिच्याबद्दल.... पण तिला विचारलंस? बोललास कधी तिच्याकडे? नाही ना? तिच्या मनाचा विचार केलास कधी? सावनीला अजून खूप काही मिळवाय....’ आई अजून काही बोलू जाणार इतक्यात मागून सावनी हातात तानपुरा घेऊन स्टेजवर जाण्यासाठी आली.

त्याला बघून थबकली... आवेगाने पुढे येऊन काही बोलणार इतक्यात.... तिच्याकडे बघून अश्विनच्या तोंडून एकच वाक्य बिघून गेलं, ’कॉन्ग्रॅच्युलेशन्स, सावनी! हे बघ..... आत्ताच नको विचार करूस कसलाच... ही मैफिल महत्वाची... मग भेटू.... निवांतपणे बोलू’

कुठेतरी मागे जाऊन बसला..... पुढ्यातल्या दिग्गज, यशस्वी कलाकारांच्या रांगा टाळून. कार्यक्रम संपतानाच पद्माताईंचं भाषण झालं. अगदी उल्हासित स्वरात त्यांनी, या उदयोन्मुख हिर्‍याला पैलू पाडण्याचं कार्य अतिशय आनंदाने करणार असल्याचं सांगितलं. त्यासाठी सगळं सगळं, अगदी आई-वडीलांसुद्धा सोडून ती त्यांच्या बरोबर रहाणार होती. गुरू-शिष्यं परंपरेतलं आजच्या काळातलं हे एकमेव उदाहरण असेल.... वगैरे वगैरे.....

अश्विन थांबला, तिला भेटण्यासाठी. अतिशय प्रफुल्लित चेहर्‍याने, हसून सगळ्यांच्या अभिनंदनाचा स्वीकार करणारी सावनी त्याला अनेकांनी घेरलेली दिसली. त्याच्याकडे बघूनही न बघितल्यासारखं केलं का तिनं? कुणास ठाऊक.
तिला नुसताच हात करून तो जड पावलांनी वळला.
मालतीबाई टाळत होत्या त्याचं घरी येणं हे त्यालाही जाणवलं. दोनच दिवसांत नंतर अलकाच्या मदतीने भेटलाच तो सावनीला कसातरी. आई बाहेर गेली होती तिची, पण सावनी तेव्हासुद्धा गडबडीतच होती. बाहेर जायलाच निघाली होती.
तिला जबरदस्तीने समोर बसवून डोळ्यांत बघत विचारलं त्याने, ’सावनी, खरं सांग तुला काय वाटतं माझ्याबद्दल? की मीच वेड्यासारखा....’
एक क्षणभर.... किंवा त्याहीपेक्षा कमी वेळ असेल कदाचित पण कुठेतरी तिच्या डोळ्यात त्याला तो, त्याचा षड्ज, सापडल्या सारखा वाटला. इतक्यात तिच्या आईचा आवाज आला गेटपाशी आणि हाती येत असलेली त्याची सावनी परत एकदा निसटली....
’अरे, असलं काय विचारतोस? अगदी जवळचा मित्र आहेस आणखी काय?... अलका जशी, तसाच तू ही. चल, पळते आता, नाहीतर आई वैतागेल, अजून किती करायचंय! भेटुया रे सवडीने, मी जाण्यापूर्वी. आणि भेटणं जमलं नाहीच तरी, कॉन्टॅक्ट ठेवा रे माझ्याशी नाहीतर हरवाल.....’

’बेस्ट लक, सावनी, काळजी घे’ असं म्हणून तो वळला आणि जमेल तितक्या भराभर दूर गेला, जातच राहिला..... त्यानंतर आयुष्यभर..... हरवलेच ते एकमेकांना... तिथेच त्याच वळणावर.

सावनी दहा दिवसांतच पद्माताईंबरोबर दौर्‍यावर गेली, परदेशी. तिने फोन करायचा प्रयत्न केला नंतर पण त्यानेच दाद दिली नाही. कुठेतरी अतिशय लाजिरवाणं वाटलं त्याला. सावनीची झेप आपल्याला खरच झेपणारी नाही हेच परत परत सांगत राहिला तो स्वत:ला.....

पुढली वाट शरीर चाललं, मन चाललं.... बहुतेक! मग काय मागे राहिलं?.... आपणच तर तोडून आलो तो दोर. तुकड्या तुकड्यांत आयुष्य जगायचं नाही असं ठरवूनच नाही का दूर गेलो? बदली करवून घेतली, फिरतीची नोकरी शोधली, परदेशी गेलो.....

खरच कुठे गेलो? कुठेच नाही. त्याच वळणावर घुटमळत राहिलो. पुढला स्वर, सापडत नसला, पुढला विचार सुचत नसला की कसं तेच तेच गातात, वाजवतात? तसंच. खरच, कधी बढत झालीच का आपल्या आयुष्याची? गाणारं माणूस निघून गेलं..... षड्जं तिथेच... निषाद आणि रिषभाच्या गुंत्यात..... ’तळ्यात-मळ्यात’ करत.

टिपिकल मारवा झाला की काय आपल्या आयुष्याचा? ताकद असली तरच निसटता येतं निषाद, रिषभाच्या चकव्यातून....

त्याने डोळे उघडले तेव्हा मारव्याची मध्य लयीतली बंदिश सुरू झाली होती. तोच मवाळ सूर, तेच हळवेपण, तीच हुरहुर लावणारे.... पण सूर ऐकू येईनातच, त्याला. कार्यक्रमभर स्वत:च्या हरवलेल्या षड्जाच्या, निषाद-रिषभाच्या चकव्यात राहिला ... परत परत, तेच तेच स्वत:लाच सांगत.... स्वत:ला टाळत.... फिरत राहिला... वेगवेगळ्या स्वरात, पट्टीत, लयीत...... नक्की काय हरवलंय आपलं?

क्रमश:
शेवटला भाग - http://www.maayboli.com/node/18785

गुलमोहर: