खेळ मनाचे

Submitted by सुनिल परचुरे on 12 August, 2010 - 09:07

खेळ मनाचे
" राधिके कसा वाटला आपला नवीन फ्लॅट ? "
"जयेश एकदम मस्त. पण मला हे एवढे मोठे सरप्राईज ?"
"मग , वाढदिवस कुणाचा आहे ? अग मुंबईत आपला थ्रिबेडरुमचा फ्लॅट आहेच कि . पण तिथे माझे आई-बाबाही असतात. घरात नाही म्हटल तरी हवी तशी प्रायव्हसी मिळत नाही."
"प्रायव्हसी .... म्हणजे तुला ती कशी हवीय ?"
'राधे ..." अस म्हणून जयेशने एकदम तिला मिठितच घेतली.
"अग म्हणजे माझ एक स्वप्न होत, स्विट सेकंड होमच. तस पुण्यात आता अगदी कोथरुडच्या ह्या टोकापासून ते पर्वतीपुढे किंवा शिवाजीनगर पर्यंत जे घराचे भाव आहेत न , ते एकतर आपल्याला परवडण्यातले नाहीत. शिवाय सेकंड होम म्हणून आपल्याला जी शांतता, मस्त ओपन वातावरण हव ते इथे , ह्या सिंहगड रोडवर अजून तरी आहे. आता ही सोसायटी तशी नवीनच आहे. सामानही जरुरी पुरत थोडसच घेतलय . पण तु इथे असलीस की मला तरी हे घर म्हणजे ताजमहालच वाटतो...."
"अहो बादशाहा .." पण जयेशने तिला पुढे बोलुच दिल नाही.
"खर सांगु मला अजून आपला हनीमुन चालुच आहे अस वाटतय. परवाच आई म्हणाली कि अरे तुमच्या लग्नाचा महिन्याचा वाढदिवस आला.... पण मला आपल्या लग्नाला महिना झाला अस वाटतच नाही ."
"पण बाकी तुला जागेचा चाईस मस्तच हं ."
"मग मी हा फ्लॅट लग्नाच्या काही महीने आधीच घेतला होता. मग जेव्हा कळल की आपल्या लग्नाच्या तारखे नंतर महिन्यानेच तुझा वाढदिवस येतोय मग म्हटल चला तेव्हा तुला सरप्राईज देऊ. आई-बाबांनाही हा दाखवला होता. त्यांनाही आवडला म्हणून लगेच घेतला.त्यांनाही सांगितले होत की तुला ह्यातल काही सांगु नका म्हणून.
खरच मुंबईत एवढी गर्दी आहे , पण इकडे एकदम शांत आहे. वाराही बघन काय भणभणता येतोय. माझ्या सारखा...".
"थांब रे..."
"म्हटल शनिवार रविवार सुट्टी आहेच, अजून त्याला दोन दिवस जोडून मस्त तुझा वाढदिवस ऐंजॉय करु. रोज बाहेर खाऊ. रात्रीच जेवण काय मस्त होत. कँडल लाईट डिनर.... आवडल ? हा आता इथे गँस कनेक्शन करीता नंबर लावला आहे. पण तो पर्यंत एक हॉटप्लेट आणून ठेवलीय. चहापाणी करायला. बाकी फक्त आराम करायचा. सेव्ह द एनर्जी..."
"कशा करता ? "
"कशा करता ? "हसतच जयेश म्हणाला.
एवढयात त्याचा मोबाईल वाजला. स्क्रिनवर नांव आल मन्या..
"हं बोल मनोज."
"सॉरी यार, मला माहीतीय की आत्ता रात्री 10 वाजता मी तुला फोन करतोय म्हणजे तुला जबरदस्त डिस्टर्ब करतोय..."
"कामाच बोल,"
"म्हणजे बॉसनीच तुला मला फोन करायला सांगितले."
"का, त्यांना माहीत नाही मी रजेवर आहे ?"
"हां हां माहीत आहे. पण ज्या फॉरीनच्या पार्टीसमोर तु नेक्स मंडेला प्रेझेंटेशन करणार होतास न त्यांचा प्रोग्राम प्रिपोन्ड झालाय. ते उद्याच शुक्रवारी येतायत. दुपारी दोन वाजता. तेव्हाच तुझ प्रेझेंटेशन ठेवलय. बाँस म्हणाले तुला येऊन प्रेझेंटेशन देऊन परत पुण्याला जाऊ दे. पुढचे ते बघतील."
"अरे यार काय साली ही माणस आहेत. ओ काही तरी कारण सांग ना की फोन लागत नाही, तब्येत बरी नाही - "
"अरे ह्या प्रोजेक्टवरच तुझ पुढच करियर...."
"हां हां, बर बघतो मी."
"बघु नकोस, ये उद्या ?"

"हं सारा मुडच घालवला ह्यांनी ?"
"का, काय झाल ?"
"अग यु.एस. वरुन एक पार्टी नेक्स वीकला येणार होती . ती उद्याच येतेय. मला सकाळीच जाव लागणार."
"ठीक आहे नं."
"अग ठीक काय, एवढा मस्त प्रोग्रॅम ऍरेंज केला आणि.."
"अरे पण होत अस कधी कधी ."
"दुपारी दोनला प्रेझेंटेशन म्हणजे मला निदान दुपारी 1 वाजेपर्यंत तरी ऑफिसमध्ये पोहोचायला हवे. म्हणजे निदान सकाळी 10 पर्यंत तरी निघालया हवे , म्हणजे एकाळी 9 च्या आधीच उठायला हवे. ओ शिट. शिवाय नंतर दिवसभर तु एकटी."
"अरे एकटी म्हणजे जंगलात का पडलीय, आणि एकटी कशाला ? तु येतोच आहेस न संध्याकाळपर्यंत."
"हो ग आता तिथे गेलो म्हणजे अडकायला होईल. पण जायलाच हव. थांब, ह्या मनोजचा काही भरोसा नाही, मस्करीही केली असेल माझी."
"मग..."
" डॉ. राजीवनाच फोन करुन विचारतो."
"हॅलो , हॅलो डॉक्टर , मी जयेश."
"हाय.. यु गॉट द मेसेज ?"
"या सर"
"देन डु इट. हे प्रपोजल त्यांनी पास केल तर आपल्या कंपनीकरता फँटॅस्टिकच आहे. आणि आय नो दॅड यु वील सस्केसफुली डु इट. ओं के.. हा पण सॉरी ह एक दिवस तुला मी डिस्टर्ब केल."
"नो प्रॉब्लेम सर, आय वील डु इट."
"छे, म्हणजे खरच आहे तर हे सगळ. उद्या मला सकाळी जावच लागणार, चला झोपुया."

दुस-या दिवशी जयेश सकाळीच निघाला, म्हणाला काळजी करु नकोस, मी तुला मोबाइलवर सतत अपडेट करत राहीन व लौकरात लौकर येण्याचा प्रयत्न करीन. काहीच काम नसल्याने राधिकाने 12 वाजेपर्यंत सर्व आरामात आवरले. मग ति जरा फिरायला म्हणून बाहेर पडली. काल रात्रि आली तेव्हा वाटल होत की कुठल्या कुठे ह्याने ब्लॉक घेतलाय . पण आता रस्त्यावर एवढी रहदारी होती की मुंबइची आठवण यावी. तिला एक सुपर मार्केटही दिसल. काही तरी घरात असाव म्हणून , साखर, चहा पावडर, दुध, जयेशची आवडती क्रिम बिस्किट, वेफर्स, पाण्याची बाटली अशाच सटर फटर वस्तु तिने घेतल्या. तिथे मेणबत्या दिसल्या, तेव्हा तिला वाटल की ह्याचा कधीही इकडे उपयोग होऊ शकतो. म्हणून तिने मेणबत्या, काडेपेटीचा बॉक्स एक छोटी बॅटरीही घेतली. जवळच एका शेट्टीच्या हॉटेलात जाऊन तिचा आवडता ओनियन उत्तपाही खाल्ला. तिथेच बाजूला नवीन पिझ्झ्याच हाऊस दिसल. तिथून ऑरडर करता फोन नंबरही घेतला. मस्त फिरत ति परत घरी आली.

"मी मगाशीच पोचलोय, आता अर्ध्या तासात मी माझ काम चालु करीन."
"तु काही खाल्लस का ?"
"अग खाल्ल थोड, पण तु काय केलस ?"
"अरे मस्त फिरुन आले, थोडी खरेदीही केलीय."
"संध्याकाळी बघतो मी इथन निघालो की लगेच तुला मोबाईल करीन, लव्ह यु स्वीटहार्ट, ओके."

दुपारी त्यांच्या फ्लॅटभर ती हिंडत होती. त्यांचा फ्लॅट टु बेडरुम विथ टेरेस होता. आता हळुहळु इथे घर सजवायला काय काय वस्तु घेता येतील ह्याचाच तिचा विचार सुरु झाला. विचार करता करता कधी तिला डोळा लागला कळलच नाही. अचानक तिला जाग आली, तिला अस वाटल की कुणीतरी तिला हलवून जाग करतय. धसक्यानेच ति उठली. पण बघते तर समोर बेडरुमची खिडकी उघडि होती व त्यातुन भणाणता वारा अंगावर येत होता. तेव्हा तसा भास झाला असेल अस समजून ती उठली. दुध तापवून चहा केला व तो पितापिता ती टेरेसवर आली. समोर दुरवर हिरवे डोंगर, ढगाळ वातावरण ,थंड बोचरी हवा येत होति. खरच काय सुंदर जागा आहे, पण आत्ता जयेश जवळ हवा होता अस तिला वाटल. सोसायटी समोरच मोठ पिंपळाच झाड होत. त्याच्या पानांचा वारा आली की नुसता सळसळाटीचा आवाज यायचा. पिंपळाच पान पाहिल्यावर तिला आपल्या 4 थीच्या वहीत ठेवलेल पिंपळपान आठवल. अजुन ते तसेच आहे.लहानपणाच्या सर्व आठवणींनी विणलेले ..जाळीदार पिंपळपान.
एवढ्यात समोरच्या विंगमध्ये काहीतरी रडारड तिला एकु आली. कुणीतरी त्या घरातले आजोगा गेलेले दिसत होते. तिथेच तिरडीवर त्यांना बांधण सुरु होते. खप्पड तोंड , पांढरीदाढी असा त्यां आजोबांचा चेहरा तिला त्यांच्या तिस-या मजल्या वरच्या टेरेसवरुनही चांगला दिसला. लगेच तिने तिथली नजर हटवली. वरील चौथ्या मजल्यावर बघतांना तिला जयेशच बोलण आठवल की ह्या चार मजली बिल्डींगमध्ये पहिल्या मजल्यावर फक्त दोघेजण राहायला आले आहेत. दुस-यावर व चौथ्यावर अजून कुणीच आल नाही आहे, कारण सगळेच मुंबईचे राहणारे आहेत. असेच कधी तरी शनिवार रविवार येतात. बापरे म्हणजे आता इथे आपण एकटयाच आहोत हा मनात विचार आल्या आल्या ति आत आली. नशिब पुण्याला येताना तिने एक तिची आवडी ऍगाथा ख्रिस्तिची कादंबरी आणली होती. पण मग वाचण्याचाही तिला कंटाळा आला.

"हॅलो, मी निघतोय ह, बघ निघता निघता पाच वाजलेच . पण काळीज करु नकोस, मी लवकर येतो."
"कस झाल प्रेझेंटेशन."
"मस्तच."
"हे बघ काळजी करु नकोस आणि नॉर्मल स्पिड ने ये. पावसाचे दिवस आहेत आणि मुख्य म्हणजे तुझ्या स्पीडवर कंट्रोल ठेवायला मी बाजूला नाहीये ."
"हो ग ,120 च्या स्लो स्पीडने येतो बस , झाल समाधान. आणि रात्री आल्या आल्या आपण बाहेर जेवायला जाऊ"
"नको मी इथे एक पिझ्झा हाऊस बघितलय, त्याला ऑर्डर देऊन मागवून ठेवीन. तुला यायला उशीर झाला तरी हॉटप्लेटवर गरम करुन खाऊ. परत रात्री बाहेर पडायला नको."
"ओके."

आता हा निघालाय म्हणजे कमीत कमी 8.30 तरी होणार. आता तो पर्यंत काय कराव परत हा प्रश्न तिला पडला. मग जरा तिने किचनमध्ये ही पाहिल कि अजून कुठली व किती भांडी लागतील, कशी अँरेजमेंट करावी. कुठे काय ठेवाव ह्याच परत गणित सुरु झाल.
"हॅलो-"
"अरे गाडी चालवतांना जास्त फोनवर बोलू नकोस"
"आता मी मानखुर्दला आहे, तासभर लागला मुंबई बाहेर पडायला. असा राग आलाय न सगळ्यांचा..."
"हे बघ प्लिज शांतपणे ये. आणि फोन बंद कर बघु."
हा जयेश म्हणजे कंपनीत एवढया मोठया पोस्टवर आहे पण कधी कधी लहान मुला सारखाच वागतो. असाच टाइमपास करता करता 7.30 वाजले. लगेच तिने दोन पिझ्झा व बरोबर एका कोकची ऑर्डर दिला. तेवढयात जयेशचा फोन..
"अग मी इथे घाटातच अडकालोय. पावसामुळे एके ठिकाणी लँडस्लाईड झालय. रोडची एक साईड बंद केलीय. त्यामुळे एकाच लेनमधुन सर्व जायच्या यायच्या गाडया जातायत, ट्रॅफिक जाम झालाय, पण यु डोंड वरी."
"अरे हो हो तु आरामात ये. मी पिझ्झाची ऑर्डर दिलीय.पण हा एक मिनिट...अरे बापरे माझ्या सेलफोनची बॅटरी लो झालीय, मी चार्जिंगला लावते पण आ , हे काय "
"काय , काय झाल? राधिका ए राधिका, काय झाल"
"आं नाही रे लाइट गेलेत. माझी सेलचि बॅटरीही एकदम लो झालिय . माहित नाही मला बॅटरि चार्ज..."
एवढ म्हणतानाच तो सेलफोन बंद पडला. ति स्वतावरच चिडली. आपल्य एवढ लक्षात नाही आल कि दिवसभरात तो चार्जींगला लावायला हवा होता. आता इथे हा एकच दोघांमधला संवादाचा दुवा होता. बापरे त्यात लाइट नाहीत. राधिका आधी उठली व पटकन पुढच दार बंद आहे न ते बघितले. अंदाजाने घरात फिरुन टेरेसच दारही बंद आहे न याची खात्री केली. मधुनच जोरदार वा-याची झुळुक येत होती. म्हणून तिने सर्व रुमच्या खिडक्याही बंद केल्या. मग तिच्या लक्षात आल की आपण शहाणपणाने मेणबत्या व बॅटरी आणली होती ति आधी शोधावी म्हणून कशीतरी धडपडत ति किचनच्या प्लॅटफॉर्मशी आली. खरेदि करुन आल्यावर सर्व पिशव्या तिने तिथेच ठेवल्या होत्या. त्यातुन तिने आधी एक मेणबत्ती काढली. काडेपेटीही थोडि सादळली होती. कशीबशी एक काडी पेटली. पण खिडकीच्या फटीतून गु गु करत वारा आत येत होता. त्याच्यापुढे काही तिचा टिकाव लागला नाही. परत प्रयत्न करुन एकदाची मेणबत्ती पेटवली व ति हॉलमध्ये जायला लागली. एवढयात दारावर थाप पडली. एक भितिची शिरशिरी पटकन तिच्या अंगातुन गेली.
"कोण.. कोण, कोण आहे ?"
"मॅडम पिझ्झ्याची ऑर्डर तुम्हीच दिलिय न ?"
"हो , आलेच हं.'
हळुच तिने लॅच उघडल, बाहेर एक तरुण मुलगा हातात पिझ्झा बॉक्स व कोकची बाटली घेऊन उभा.
"हे बील. पैसे देताय न "
बापरे आता पर्स आत बेडरुममध्ये आहे, पण आपण आत आलो आणि ह्या अंधारात हा दार लाऊन आत आला तर? ति थोडी बावचळली, पण प्रसंगावधानाने ति म्हणाली,
"जयेश , अरे जयेश . पैसे देतोस का? हा म्हणजे नं, अस म्हणत म्हणत ती बॅटरी घेऊन आत आली. पटकन पर्समधून शंभराच्या नोटा काढल्या,
"हे लाईट अचानक कसे गेले ?"
"अहो मॅडम इथे असच, पावसाळा आहे न.आता येतील कधीतरी दोन तिन तासांनी. बर पण सुट्टे 20 रुपये ...."
"नाही, नसले तरी चालतील ठीक आहे" अस म्हणत तिने पटकन दार लावले.

दोन मिनिटे ती तशीच काळोखात बसून होती, पण मनाशीच तिने ठरवल की अस घाबरुन चालणार नाही. मेणबत्ती लाऊन हॉलमध्ये जयेशची वाट बघत बसु. परत तिने मेणबत्ती लावायचा प्रयत्न सुरु केला. उठताना आधी ती टिपॉयच्या कडेला ठेचकाळलीच. घर ओळखिच नसल्याने इथल्या काळोखात काही अंदाजच येत नव्हता. तिला मनाशीच हसु आल. खर तर रात्री झोपतांना आपण दिवे बंद करतो, काळोख करतो पण तेव्हा काही वाटत नाही . पण आत्ता लाइट नाहीत तर आपण एवढे अस्वस्थ का होतो ?

कशीबशी मेणबत्ती लाऊन तिने टिपॉयवर ठेवली, समोर केनच्या सोफ्यावर ति बसली. बसतांना ही थोडासा करकर आवाज झाला. पण पाय वर येऊन हाताची मिठि मारुन ति बसली . समोर टिपॉयवर पिझ्झ्याचा बॉक्स व कोकची बाटली होती. मेणबत्तीची ज्योत सारखी वा-याने हालत होती. त्यामुळे समोरच्या भिंतीवर त्या बॉक्स व कोकच्या बाटलीच्या विविध आकाराच्या छाया सतत हालत होत्या. ते बघून तिला अवघडायला लागले. एवढयात खालून रडण्याचे आवाज एकु आले. क्षणभर का होईना पण ती घाबरली, पण मग लगेच तिच्या लक्षात आले की खाली आजोबा गेले त्यांच्याकडे कुणीतरी आता आल असेल व रडारड सुरु झाली असेल.
पण त्या भिंतीवरच्या सावल्यांचीही तिला भिति वाटु लागली. म्हणून तिने ति मेणबत्ती विझवून टॉर्च पेटवला व तो वरती छताला तोंड करुन चालू ठेवला. आता ती भिंतीवरची धुसर छाया तरी गेली.

मधुनच हातावरच्या घडाळ्यात किति वाजले ते तिने बघितले .10.30 वाजायला आले होते, अजुन जयेशचा पत्ता न्व्हता. मोबाईलही बंद, लाईटही नाहीत, तिला जयेशच्या आठवणीने रडायला यायला लागले. मधुनच वारा शांत होत होता. बाहेर पिंपळाच्या पानांची सळसळ मधुनच एकु येई. दुपारी सुंदर वाटणा-या सर्व गोष्टी तिला आता भितिदायक वाटु लागल्य होत्या. एवढयात टीपॉयवरचा टॉर्च वा-याने आडवा झाला व पुढे मागे होऊ लागला. एका अनामिक भितिने ति किंचाळली .तेवढयात तिच्या हाताला काहीतरी ओले लागले म्हणून तिने तो टॉर्च जवळ घेऊन बघितले तर....रक्त . बापरे हे कसले रक्त? मग तिचे तिच्या पायाकडे लक्ष गेले. मघाशी ठेचकाळली तेव्हाच ते आलेले दिसत होते. इथे आता ह्याला लावायला काहीच नाही .तेवढयात तिला खालून घुंगराचा खुळ खुळ असा आवाज एकु आला.
त्या थंडाव्यातही तिला दरदरुन घाम फुटला. आता हा कसला आवाज? खुळ खुळ . आणि हळुहळु तो आवाज वर येत होता. आता कोण असेल ? आपल्या खालच्या वरच्या मजल्यावर तर कुणीच नाही मग कोण असेल ? कुणी चोर, पण तो मग आवाज कशाला करत येईल ? मग कोण भुत... का ते आज गेलेले आजोबा हातात घुंगराची काठी घेऊन... भितीने तिला कापर भरल्यासारख झाले . तो आवाज अगदी जवळ आला आणि तिच्या घरा समोरच येऊन थांबला, सुन्न होऊन ती एकत होती आणि
आणि दारावर एक थाप पडली, कुणीतरी लॅच उघडायचा प्रयत्न करत होत , परत दारावर थाप
"राधिका राधिका -"
तिचा घसा कोरडा पडला होता. पण आवाज तर ओळखीचा , जयेशचा वाटत होता.
"राधिका ,अग दार उघड न . आतुन कडी लावलीस का ?"
"कोण, कोण आहे ?"
"अग मी जयेश .अस काय करतेस ?"
पण ती उठली. अंगात त्राण गेल्यासारख झाल होत. हळुहळु कडी काढली. लॅच उघडून आधि त्याच्या तोंडावर बॅटरीचा प्रकाश टाकला .
"अग अस काय बघतेय मी .. जयेश"
तिने त्याला घट्ट मिठी मारली, हाच आपला जयेश . हाच स्पर्श ,हाच आवाज ज्याची आपण वाट पहात होतो .व ती मोठमोठयाने रडायला लागली.
"अग काय झाल, आधी आत चल बघु."
"मला ... मला आंनद झालाय. आनंदात ही रडता येत हे मला आता समजल."
"तु इथे आधी बस बघु. थांब हे बघ मी येताना थोडफार खायला फळ, पाण्याची बाटलीही आणलीय. आधी पाणी पी बघु."
दोन घोट पाणी प्यायल्यावर तिला बर वाटल.
"काय झाल ?"
"मी, मी खुप घाबरले. खरतर अशी जरुरी नव्हती, पण का कोण जाणे म्हणजे आपल्या मनातच...."
मग तिने हळुहळु घडलेले सर्व सांगितले
"आणि शेवटी तो घुंगराचा आवाज ...घुंगराचा .. खालुन वर येत होता . पहिला मजला, मग दुसरा मजला मग आपल्या इथे येऊन थांबला."
हे एकल्यावर जयेश मोठमोठयाने हसायला लागला. राधिका त्याच्याकडे बघतच बसली. तिला वाटल कि आता ह्याला भुताने पछाडला की काय.
"अग कसला घुंगराचा आवाज? काळोख होताना म्हणून मी ही सामानाची पिशवी खाद्यांला लावली व हातात मोबाईल सतत ऑन ठेवला की त्याच्या प्रकाशात मी पाय-या वरुन धडपडणार नाही व उजव्या हातात हा किल्ल्यांचा जुडगा मी हळु हळु उडवत आवाज करत वर येत होतो. हि माझी सवयच आहे. हातात काही वस्तु आली की फिरवायची किंवा उडवायची. तो चाव्यांचा जुडगा उडवतांनाचा आवाज भितिने तुला घुंगराचा आवाज वाटला " .... तो पोट धरुन हसायला लागला.

तेव्हढ्यात लाइट आले .पटापट आवरुन तिने हॉटप्लेटवर पिझ्झा गरम केला,व डिनर सुरु केल.
भिंतीवरच्या काळ्या सावल्या केव्हाच लुप्त झाल्या होत्या.

गुलमोहर: 

मस्त Happy

सही लिहीलयं.. Happy

फक्त एक तपशीलातली चुक खटकली.
पटापट आवरुन तिने हॉटप्लेटवर पिझ्झा गरम केला, कँडल लावल्या व कँडल लाईट डिनर सुरु केल. लाईट्स नाहीयेत ना? मग हॉट्प्लेट कशी सुरु? तेवढं बदलाल का?

पटापट आवरुन तिने हॉटप्लेटवर पिझ्झा गरम केला,>> लाइट गेले होते ना???
माफ करा... पण राहावले नाहि म्हणुन विचारले.
बाकि एकदम छान लिहिलय...
पु.ले.शु.

कथा आवडली.. छान छोटी आणि सुटसुटीत. Happy
फक्त ते लाईट नसताना हॉटप्लेट कशी लावली ते सांगा ... Happy

तेव्हढ्यात लाइट आले .पटापट आवरुन तिने हॉटप्लेटवर पिझ्झा गरम केला>>>>>> लिहिला आहे की लाइट आले म्हनून. मस्त आहे...... आवडली

छान आहे. वातावरण छान उभे रहात होते तोच कथेचा शेवट होतो तुटल्यासारखे वाटते पुढे अजुन सुरु राहिली असती तर बरे वाटते. कदाचित पुढील भाग लिहावा अशी विनंती.