काय बदलले ?

Submitted by UlhasBhide on 9 August, 2010 - 08:15

काय बदलले ?

असे कसे हे काय जाहले, मलाच माझे ही ना कळले
तूहि तोच अन् मीहि तीच मग, समजेना ते काय बदलले

तुला भेटण्या अधीर उत्सुक, मनास का हुरहूर लागते
अवचित येता तू सामोरी, क्षणात का मी जगा विसरते

झोप येइना रात्र न सरते, कूस बदलते, मी तळमळते
कधी चुकूनच लागे डोळा, स्वप्न तुझे मग झोप उडविते

का वेडयागत कधि कधी रे, माझ्याशिच मी उगाच हसते
कधी उगीचच होते हळवी, डोळ्यामध्ये पाणि तरळते

कधी अवस्था विचित्र होते, जे न हरवले तेच शोधते
काय शोधते तेच विसरते, काय विसरले ते ना स्मरते

सर्व पाहती का मज ऐसे, जणु एखादे गुपित लपविते
आरशातली प्रतिमा भासे, शंकित नजरेने मज बघते

सांग जसे हे माझे झाले, तुज ठायी का तसेच घडले
मीहि तीच अन् तूहि तोच मग, सांगशील का काय बदलले

…… उल्हास भिडे (१-१०-२००९)

गुलमोहर: 

सांग जसे हे माझे झाले, तुज ठायी का तसेच घडले
मीहि तीच अन् तूहि तोच मग, सांगशील का काय बदलले>>>>

हेच तर अवघडये नेमके काय ते?
मस्त, गेय कविता.
आवडली!!! Happy

धन्यवाद,
मयुरेश, भरत

माझ्या दृष्टीकोनातून, खर तर हे एक
सहज सुचलेल (रचलेल नव्हे) गीत आहे.
भरत यांनी त्यातला कव्यांश बरोबर शोधला. Happy